आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

९ जून, दिवस १६० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा, ओवी १२६ ते १५० सार्थ तुकाराम गाथा अभंग १९०९ ते १९२०
“९ जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ९ jun
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ९ जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १९०९ ते १९२० चे पारायण आपण करणार आहोत.
९ जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी १२६ ते १५०,
126-12
बुद्धीचिये पाठी पोटी । कर्माआदि का शेवटी । माते बांधणे किरीटी । दुवाड जरी ॥126॥
बुद्धीच्या आत-बाहेर व कर्माच्या आदि किंवा अंती, मला बांधून ठेवणे, अर्जुना ! तुला कठीण वाटत असेल.
127-12
तरी हेही असो । सांडी माझा अतिसो परि संयतिसी वसो । बुद्धि तुझी ॥127॥
पण ही परमेश्वराला कर्तृत्व समर्पण करण्याची प्रक्रिया राहू दे. कर्माच्या आदि-अंती माझी आठवण ठेवण्याचा ध्यासही सोड पण आपल्या बुद्धीने इंद्रियांचा व मनाचा निग्रह करून राहा- म्हणजे इंद्रिये व मन यांना स्वैर सोडून, त्यांच्या स्वाधीन बुद्धीला होऊ देऊ नकोस.
128-12
आणि जेणे जेणे वेळे । घडती कर्मे सकळे । तयांची तिये फळे । त्यजितु जाय ॥128॥
आणि ज्या ज्या वेळी जे जे कर्म घडेल, त्यांचे मिळणारे फळ टाकीत जा. – म्हणजे त्याचे फळ मिळण्याची मुळीच इच्छा करू नकोस.
129-12
वृक्ष का वेली । लोटती फळे आली । तैसी सांडी निपजली । कर्मे सिद्धे ॥129॥
ज्याप्रमाणे वृक्ष किंवा वेल, आलेल्या फळांचा उपयोग न करता तशीच राहू देऊन अखेर गळू देतात, त्याप्रमाणे फलाशा न धरता टाकून दे.
130-12
परि माते मनी धरावे । का मजौद्देशे करावे । हे काही नको आघवे । जाऊ दे शून्यी ॥130॥
कर्म करताना माझे ध्यान ठेऊन किंवा माझ्या प्राप्तीच्या उद्देशाने कर्म केले पाहिजे असे काही मनात वागवू नकोस. ही कर्मे शून्यात जाऊ दे – म्हणजे निरालंब कर्मे कर.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-12
खडकी जैसे वर्षले । का आगीमाजी पेरिले । कर्म मानी देखिले । स्वप्न जैसे ॥131॥
होणारे कर्म हे खडकावर झालेल्या वर्षावाप्रमाणे किंवा अग्नीत पेरलेल्या बीजाप्रमाणे अथवा स्वप्न पाहिल्याप्रमाणे समज.
132-12
अगा आत्मजेच्या विषी । जीवु जैसा निरभिलाषी । तैसा कर्मी अशेषी । निष्कामु होई ॥132॥
बा अर्जुना ! मनुष्य जसा आपल्या कन्येच्या ठिकाणी यत्किंचितही कामाभिलाष ठेवित नसतो, त्याप्रमाणे संपूर्ण कर्माचे ठिकाणी तू फलेच्छारहित हो.
133-12
वन्हीची ज्वाळा जैसी । वाया जाय आकाशी । क्रिया जिरो दे तैसी । शून्यामाजी ॥133॥
ज्याप्रमाणे अग्नीची ज्वाळा व्यर्थच आकाशात जाते, त्याप्रमाणे तुझी संपूर्ण क्रिया शून्यात जाऊ दे. किंवा निरालंब होऊ दे.
134-12
अर्जुना हा फलत्यागु । आवडे कीर असलगु । परी योगामाजी योगु । धुरेचा हा ॥134॥
अर्जुना ! हा फलत्याग अत्यंत सोपा दिसतो खरा, पण सर्व योगांमध्ये हा अग्रेसर योग आहे.
135-12
येणे फलत्यागे सांडे । ते ते कर्म न विरूढे । एकचि वेळे वेळुझाडे । वांझे जैसी ॥135॥
ज्याप्रमाणे वेळूची झाडे एकदाच फळून वांझ होतात, त्याप्रमाणे या फलत्यागाने ज्या ज्या कर्माचा आपला संबंध तुटतो, ते ते कर्म पुढे फलद्रूप होत नाही.
136-12
तैसे येणेचि शरीरे । शरीरा येणे सरे । किंबहुना येरझारे । चिरा पडे ॥136॥
त्याचप्रमाणे या प्राप्त शरीराबरोबर पुनः शरीराला येणे नाहीसे होते. किंबहुना जन्ममरणरूपी फेर्याच बंद पडतात.
137-12
पै अभ्यासाचिया पाउटी । ठाकिजे ज्ञान किरीटी । ज्ञाने येइजे भेटी । ध्यानाचिये ॥137॥
अर्जुना ! अभ्यासाच्या पायरीने आत्मज्ञान प्राप्त करून, पुढे आत्मज्ञानाच्या द्वारा ध्यानाच्या भूमिकेची भेट घ्यावी.
138-12
मग ध्यानासि खेंव । देती आघवेचि भाव । तेव्हा कर्मजात सर्व । दूरी ठाके ॥138॥
याप्रमाणे भगवंताचे ध्यान चित्तात दृढ झाले असता, चित्ताचे व इंद्रियांचे सर्व व्यापार सहजच ध्यानात असलेल्या भगवंताला समर्पण होतात आणि जीवाचा संपूर्ण कर्माशी संबंध तुटतो.
139-12
कर्म जेथ दुरावे । तेथ फलत्यागु संभवे । त्यागास्तव आंगवे । शांति सगळी ॥139॥
कर्माचा निःशेष संबंध सुटला असताच कर्मफळ भोगण्याचा प्रसंग येत नाही, म्हणून कर्मफलत्याग होतो. अशा कर्मरूपत्यागानेच चित्त पूर्ण शांत होते.
140-12
म्हणौनि यावया शांति । हाचि अनुक्रमु सुभद्रापती । म्हणौनि अभ्यासुचि प्रस्तुती । करणे एथ ॥140॥
म्हणून चित्ताला अशी निर्वासन स्थिती प्राप्त होण्याकरिता, हे अर्जुना ! आता सांगितलेला हाच क्रम इष्ट असून, येथे प्रथम अभ्यासच केला पाहिजे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद् ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिनिरन्तरम् ॥12. 12॥
अर्थ अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा कर्मफलत्याग श्रेष्ठ आहे आणि नंतर कर्मफलत्यागापेक्षाही शांती श्रेष्ठ आहे. ॥12-12॥
(भक्तियोगातील क्रम = अभ्यास – ज्ञान – ध्यान – कर्मफलत्याग)
141-12
अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥141॥
हे अर्जुना ! अभ्यासापासूनच दुर्गम असे आत्मज्ञान प्राप्त होते. मग त्या ज्ञानापासून विशेष अशा ध्यानाची प्राप्ती होते.
142-12
मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥142॥
त्या ध्यानापासून उत्तम असा कर्मफलत्याग प्राप्त होऊन, त्या त्यागापासून परमेश्वराच्या शांतीसुखाचा किंवा निर्वासन अशा ब्रह्मसुखाचा लाभ होतो.
143-12
ऐसिया या वाटा । इहीचि पेणा सुभटा । शांतीचा माजिवटा । ठाकिला जेणे ॥143॥
हे उत्तम योद्ध्या अर्जुना ! अशा या ब्रह्मसुखाच्या प्राप्तीच्या निरनिराळ्या प्रक्रियामार्गाने व याच टप्प्याटप्प्याने जाऊन, ज्याने निर्वासन अशी पूर्णब्रह्मस्थिती प्राप्त करून घेतली.
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥12. 13॥
अर्थ सर्व भूतांचे ठिकाणी द्वेषरहित (सर्व भूतांचे ठिकाणी) मैत्री असणारा, कृपायुक्त, मी माझेपणारहित सुख व दु:ख समान मानणारा क्षमाशील ॥12-13॥
(भक्ताची लक्षणे)
144-12
जो सर्व भूतांच्या ठायी । द्वेषांते नेणेचि कही । आपपरु नाही । चैतन्या जैसा ॥144॥
ज्याप्रमाणे सर्वव्यापी चैतन्याला आप-पर भाव मुळीच नाही, त्याप्रमाणे अद्वैतचैतन्यस्वरूप झाल्यामुळे ज्याला आप-पर भासतच नाही, म्हणून जो कोणत्याही प्राण्याच्या ठिकाणी द्वेष करीत नाही.
145-12
उत्तमाते धरिजे । अधमाते अव्हेरिजे । हे काहीचि नेणिजे । वसुधा जेवी ॥145॥
उत्तम वस्तूंना धारण करावे व सर्व वाईट वस्तूंना दूर लोटावे असा भेदभाव करण्याचे, ज्याप्रमाणे पृथ्वी मनात आणीत नाही.
146-12
का रायाचे देह चाळू । रंकाते परौते गाळू । हे न म्हणेची कृपाळू । प्राणु पै गा ॥146॥
किंवा, बा अर्जुना ! राजाच्या देहाचे चलनवलन करीन आणि दारिद्र्याचा देह टाकून देईन, असे सर्वावर दया करणारा प्राण कधी म्हणत नाही.
147-12
गाईची तृषा हरू । का व्याघ्रा विष होऊनि मारू । ऐसे नेणेचि गा करू । तोय जैसे ॥147॥
किंवा फक्त गाईचीच तहान भागवीन, पण व्याघ्राचा मात्र विष होऊन प्राण घेईन, असे पाणी कधी करू इच्छित नाही.
148-12
तैसी आघवियांचि भूतमात्री । एकपणे जया मैत्री । कृपेशी धात्री । आपणचि जो ॥148॥
त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी एकपणे-म्हणजे प्राणीमात्रांचे ठिकाणी मीच एक आहे या अद्वैत-जाणीवेने जो सर्वाशी मैत्री करतो- म्हणजे सर्वाच्या हिताची इच्छा ठेवतो- सर्व प्राणीमात्रावर केल्या जाणार्या कृपेची आपणच जो जन्मदात्री आई होतो,
149-12
आणि मी हे भाष नेणे । माझे काहीचि न म्हणे । सुख दुःख जाणणे । नाही जया ॥149॥
आणि हा देह म्हणजे मी, असा देहाहंकार ज्यांना कधी उठत नाही, म्हणून माझे काही आहे अशी ज्यांच्या चित्तात आसक्ती नसते व ज्यांना सुखदुःखाचा भोगही होत नाही,
150-12
तेवीचि क्षमेलागी । पृथ्वीसि पवाडु आंगी । संतोषा उत्संगी । दिधले घर ॥150॥
त्याचप्रमाणे क्षमेच्या दृष्टीने ज्याच्या अंगी पृथ्वीचाच विस्तार झाला आहे आणि ज्याने आपल्या मांडीवर संतोषाला राहण्याला नेहमी जागा दिली.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १६० वा, ९, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १९०९ ते १९२०
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. १९०९
ज्याचे गावी केला वास । त्यासी नसावे उदास ॥१॥
तरीच जोडिले ते भोगे । काही आघात न लगे ॥धृपद॥
वाढवावी थोरी । मुखे म्हणे तुझे हरी ॥२॥
तुका म्हणे हे गोमटी । दासा न घलावी तुटी ॥३॥
अर्थ
ज्या प्रमुख व्यक्तीच्या गावात आपण वास केला त्या व्यक्तीविषय आपण उदास नसावेत. मग आपण जे काही धन जोडले आहे त्याचे भोग आपल्याला घेता येईल आणि कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला होणार नाहीत. हे हरी त्याप्रमाणे हे जगत रूपी तुझे गाव आहे आणि तेथे आम्ही राहतो मग आम्ही तुझ्याशी उदास राहून कसे चालेल त्यामुळे आम्ही तुझी थोरवी सतत वाढवत राहू आणि आम्ही तुमचेच आहोत असे मुखाने सतत म्हणत राहू. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुमचे दास तुमच्या गावात राहात आहेत त्यामुळे त्यांना आनंदी राहू द्यावे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तुट राहू देऊ नये.
अभंग क्र. १९१०
माझा तुह्मी देवा केला अंगीकार । हे मज साचार कैसे कळे ॥१॥
का हो काही माझ्या नये अनुभवा । विचारिता देवा आहे तैसा ॥धृपद॥
लौकिकाचा मज लाविसी आभार । शिरोरत्नभार दुःखाचा हा ॥२॥
तुका म्हणे नाही पालट अंतरी । तेथे दिसे हरी ठकाठकी ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही माझा अंगिकार केला आहे हे मला कसे कळेल ? देवा तुम्ही जर माझा अंगिकार केला आहे तर मग तसे काही माझ्या अनुभवाला का येत नाही विचार करून पाहिले तर देवा मी पूर्वी जसा होतो तसाच आताही आहे असेच मला दिसते आहे. देवा पण तुम्ही माझ्या मागे विनाकारण लौकिकाचा भार लावलेला आहे रत्न कितीही मूल्यवान असले परंतु ते जरी डोक्यावर ठेवले तर त्याचा विनाकारण दुखदायक भारच होतो म्हणजे ते ओझेच वाटते. तुकाराम महाराज म्हणतात हे हरी माझ्या अंतःकरणात अजूनही मला पालट झालेला दिसून येत नाही त्यामुळे तुम्ही माझी फसवणूकच करता आहात असे मला दिसून येत आहे.
अभंग क्र. १९११
तोंडे बोलावे ते तरी वाटे खरे । जीवे येरेयेरे वंचिजे ना ॥१॥
हे तुम्हा सांगणे काय उगवूनि । जावे समजोनि पांडुरंगा ॥धृपद॥
जेवित्याची खूण वाढित्या अंतरी । प्रीतीने हे धरी चाली तेथे ॥२॥
तुका म्हणे बहु परीचे आदर । अत्यंत वेव्हार संपादणी ॥३॥
अर्थ
तोंडाने जर बोलले तरच ते खरे वाटते परंतु जिवांनी एकमेकांशी वंचना करू नये निष्कपट पणे बोलावे. हे पांडुरंगा या गोष्टी तुम्हा समजून सांगणे गरजेचे आहे काय तुम्हीच त्या गोष्टी समजून घ्याव्यात. जेवण करणाऱ्या व्यक्ती विषयी अंतरात किती प्रेम आहे हे कसे लक्षात येते तर जेवणाऱ्या व्यक्तीसाठी वाढणाऱ्या व्यक्तीने त्याने न मागता त्याला जो पदार्थ हवा आहे तो आदराने प्रीतीने तेथे नेऊन जावा तेव्हा ही खूण त्याच्या अंतरात जेवणार्या विषयी किती प्रेम आहे हे स्पष्ट करते. तुकाराम महाराज म्हणतात आदराच्या व्यवहाराचे अनेक प्रकार असतात काही व्यवहार हे अत्यंत प्रेमाचे असतात तर काही व्यवहार वर वर संपादने म्हणजे सोंग दाखवण्याची असतात.
अभंग क्र. १९१२
न पालटे एक । भक्त भोळाचि भाविक ॥१॥
येरा नास आहे पुढे । पुण्य सरता उघडे ॥धृपद॥
नेणे गर्भवास । एक विष्णूचाचि दास ॥२॥
तुका म्हणे खरे । नाम विठोबाचे बरे ॥३॥
अर्थ
जो खरंच भोळा भाविक भक्त आहे तो कधीही बदलत नाही. पण इतरांचा पुढे पुण्य संपले की मग नाश होतो. एका विष्णू दासांनाच गर्भवासाचे दुःख काय असते ते माहित नसते. तुकाराम महाराज म्हणतात या ब्रह्मांडामध्ये एक विठोबाचेच नाम चांगले आहे आणि तेच खरे आहे.
अभंग क्र. १९१३
मना एक करी । म्हणे जाईन पंढरी । उभा विटेवरी । तो पाहेन सावळा ॥१॥
करीन सांगसी ते काम । जरी जपसी हे नाम । नित्य वाचे राम । हरी कृष्ण गोविंद ॥धृपद॥
लागे संताचिया पाया । कथे उल्हास गावया । आलो मागावया । शरण देई उचित ॥२॥
नाचे रंगी वाहे टाळी । होय सादर ते काळी । तुका म्हणे मळी । सांडूनिया अंतरीची ॥३॥
अर्थ
हे मना तु एक गोष्ट कर तु असे म्हण की मी पंढरीला जाईल, आणि तेथे जाऊन मी विटेवर उभा असलेल्या त्या सावळ्या विठोबाला पाहिन असे म्हटले की तुझी एक दिवस इच्छा पूर्ण होईल. अरे मना मी तु सांगितलेली कोणतेही काम करीन जेव्हा तु नित्य स्वरूपात हे नामजप करशील तेंव्हा. हे मना ते नांव म्हणजे राम कृष्ण हरि गोविंद याचे तु नित्य जप करीत रहा. तु कथेमध्ये हरीचे गुण गाण्यासाठी उल्हास मनात धर आणि संतांच्या चरणाला नेहमी लागत जा. अरे मना हेच दान मी तुला मागण्यासाठी शरण आलो आहे त्यामुळे तु मला उचित असे दान द्यावेस. तुकाराम महाराज म्हणतात हे मना अरे तु कथेच्या काळी हरिनाम रंगात नाचत जा आणि हाताने टाळी वाजवत जावेस. आणि हे मना तू तुझ्या अंतकरणातील मळ म्हणजे जे काही विकार आहेत ते टाकून द्यावे.
अभंग क्र. १९१४
न राहे क्षण एक वैकुंठी । क्षीरसागरी त्रिपुटी ।
जाय तेथे दाटी । वैष्णवांची धावोनि ॥१॥
भाविक गे माये भोळे गुणाचे । आवडे तयाचे नाम घेता तयासी ॥धृपद॥
जो नातुडे कवणिये परी । तपे दाने व्रते थोरी ।
म्हणता वाचे हरी । राम कृष्ण गोविंदा ॥२॥
चौदा भुवने जया पोटी । तो राहे भक्ताचिये कंठी ।
करूनिया साटी । चित्त प्रेम दोहीची ॥३॥
जया रूप ना आकार । धरी नाना अवतार ।
घेतली हजार । नावे ठेवूनि आपणा ॥४॥
ऐसा भक्तांचा ॠणी । पाहाता आगमी पुराणी ।
नाही तुका म्हणे ध्यानी । तो कीर्तनी नाचतसे ॥५॥
अर्थ
हा हरी वैकुंठामध्ये व त्याचे क्षयन करण्याचे स्थान म्हणजे शिरसागर येथे एक क्षण भर देखील राहत नाही. जिथे वैष्णवांची दाटी आहे तेथे हा हरी धावत जातो. माझे हे भोळे वैष्णव फार भाविक आहेत आणि फार गुणाचे आहेत आणि हरीचे नाम हे आपल्या मुखाद्वारे घेतात त्या हरीला ही त्यामुळे हे वैष्णव फार आवडतात. जो हरी, तप, दान व्रत इत्यादी थोर साधनांच्या द्वारे ही आकळला जात नाही. तो हरी वाचेने राम कृष्ण हरि गोविंदा असे नाम उच्चारले की सहज प्राप्त होतो. ज्याच्या पोटामध्ये चौदा भुवने आहेत तो भक्तांच्या कंठामध्ये नामरूपाने राहतो. हा हरी भक्तांचे चित्त आणि त्यांचे प्रेम या दोघाची अदलाबदल करून नेहमी भक्तांजवळ राहत असतो. ज्या हरी ला रुप नाही आणि आकार नाही असा हरी भक्तांसाठी विविध प्रकारचे अवतार घेतो. आणि भक्तांचा उद्धार करण्या करता त्याने हजारो नावे स्वतःला ठेवून घेतले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात हा असा देव भक्तांचा ऋणी आहे याला वेद आणि पुराणांमध्ये पाहिले असता, जो हरी योगी लोकांच�
3
अभंग क्र. १९१५
स्वल्प वाटे चला जाऊ । वाचे गाऊ विठ्ठल ॥१॥
तुह्मी आह्मी खेळीमेळी । गदा रोळी आनंदे ॥धृपद॥
ध्वजा कुंचे गरुडटके । शृंगार निके करोनि ॥२॥
तुका म्हणे हेचि नीट । जवळी वाट वैकुंठा ॥३॥
अर्थ
चला आता आपण सोप्या वाटेने जाऊ ती वाट म्हणजे आपण आपल्या मुखाने वाचेने विठ्ठल नाम गाऊ. तुम्ही आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विठ्ठल नाम घोषाचा आनंदाने गदारोळ म्हनजे गर्जना करू. गरुड चिन्ह असलेली ध्वजा व त्याला वरती गोंडे असा चांगला शृंगार करून आपण जाऊ, तुकाराम महाराज म्हणतात आणि वैकुंठाला जाण्यासाठी हीच एक चांगली आणि जवळची वाट आहे.
3
अभंग क्र. १९१६
आनंदाच्या कोटी । साठवल्या आह्मां पोटी ॥१॥
प्रेम चालिला प्रवाहो । नामओघ लवलाहो ॥धृपद॥
अखंड खंडेना जीवन । राम कृष्ण नारायण ॥२॥
घडी अहक्य परत्र । तुका म्हणे समतीर ॥३॥
अर्थ
आनंदाचे कोटी कोटी प्रकार आमच्या पोटामध्ये साठवलेले आहेत. कारण आमच्या मध्ये हरिनामाचा प्रवाह सारखा चालू आहे आणि मुखामध्ये हरीचे हरिनामाचा ओघ चांगलाच वाहत आहे. आमचे जीवन अखंड चालत आहे ते कधीही खंडत नाही आणि ते जीवन म्हणजे रामकृष्ण नारायण हे नाम आहे. तुकाराम महाराज म्हणतात हा रामकृष्ण नारायण नामाचा प्रवाह आमचा येहलोकात आणि परलोकात सारखाच वाहत आहे.
3
अभंग क्र. १९१७
चाहाडाची माता । व्यभिचारीण तत्वता ॥१॥
पाहे संतांचे उणे । छिद्र छळावया सुने ॥धृपद॥
जेणो त्याच्या बाचे । काही सोडिले गाठीचे ॥२॥
तुका म्हणे घात । व्हावा ऐसी जोडी मात ॥३॥
अर्थ
चहाडी करणाऱ्याची ची आई खरोखरच व्यभिचारिणी असली पाहिजे. तो चहाडी करणारा मनुष्य नेहमी संतांचे उने पाहतो त्याची कानाची छिद्र हे मोकळेच असावेत आणि संतांना नेहमी तो छळत असतो मागच्या जन्मी तो कुत्राच असावा. अशा माणसाच्या बापाच्या पदरात असलेले धनच संतांनी बळच ओढून घेतले आहे असे त्याला वाटते. तुकाराम महाराज महणतात असे मनुष्य चांगल्या माणसांचा घात होईल असे नेहमी बोलत असतात.
3
अभंग क्र. १९१८
सापे ज्यासी खावे । तेणे प्राणासी मुकावे ॥१॥
काय लाधला दुर्जन । तोंडावरी थुंकी जन ॥धृपद॥
विंचु हाणी नांगी । अग्न लावी आणिका अंगी ॥२॥
तुका म्हणे जाती । नरका पाउली चालती ॥३॥
अर्थ
ज्याला सर्प चावतो तो प्राणाला मुखतो. परंतु दुर्जन मनुष्य सर्वाचा घात करतो त्याच्या अशा वागण्याने सर्व लोक त्याच्या तोंडावर थुंकतात. विंचू तर केवळ नांगी मारतो परंतु हा दुर्जन मनुष्य चांगल्या मनुष्याच्या अंगात आग लावतो म्हणजे त्याला भडकवत असतो. तुकाराम महाराज म्हणतात दृष्ट जातीचे ही लोक समाजात भरपूर आहेत परंतु त्यांचे वागणे त्यांना त्यांच्या पायाने नरकाच्या दिशेने चालत नेतात.
3
अभंग क्र. १९१९
खडा रवाळी साकर । जाला नामाचाची फेर । न दिसे अंतर । गोडी ठायी निवडिता ॥१॥
तुम्ही आम्ही पांडुरंगा । भिन्न ऐसे काय सांगा । चालविले जगा । मी हे माझे यासाठी ॥ध्रु॥
पायी हाती नाकी शिरी । हेम राहे अळंकारी । मुसे आल्यावरी । काय निवडे वेगळे ॥२॥
निजलिया लाभ हानी । तोच खरी ते स्वप्नी । तुका म्हणे दोन्ही । निवारिली जागता ॥३॥
अर्थ
खडीसाखर आणि रवाळ म्हणजे बारीक साखर यांच्यामध्ये केवळ नामाचाच भेद आहे. परंतु दोघाची गोडी सारखीच असते त्यामध्ये आतर कोणत्याही प्रकारचं नसते. त्याप्रमाणे हे पांडुरंगा तुम्ही आणि आम्ही भिन्न कसे आहोत ते सांगा ? तुम्ही या जगाला मी आणि माझे या भेदाने फसविले आहे. स्त्रियांच्या पायात हातात नाकात आणि डोक्यावर सोन्याचे विविध अलंकर असतात. परंतु तेच आलंकार मुसेत घालून आळविले तर त्यामध्ये काही वेगळे भेद राहते काय ? तुकाराम महाराज म्हणतात झोपल्यावर स्वप्न पडते आणि त्या स्वप्नामध्ये काही लाभ हानी झाला तर तो लाभा हानी कोठपर्यंत खरा ठरतो तर केवळ स्वप्न संपे पर्यंत. एकदा की मनुष्य जागा झाला की लाभ आणि हानी या दोन्हीचाही बाद होतो
3
अभंग क्र. १९२०
आम्ही जाणो तुझा भाव । कैचा भक्त कैचा देव । बीजा नाही ठाव । कैचे फळ शेवटी ॥१॥
संपादिले बहु रूप । कैचे पुण्य कैचे पाप । नव्हते आम्ही आप । आपणासी देखिले ॥धृपद॥
एके ठायी घरच्याघरी । न कळता झाली चोरी । तेथे तेचि दुरी । जाणे याणे खुटंले ॥२॥
तुका म्हणे धरुनि हाती । उरी ठेविली मागुती । एकांती लोकाती । देव भक्त सोहळा ॥३॥
अर्थ
देवा आम्ही तुझा निजस्वरूप भाव जाणतो आहोत मग तेथे कसला भक्त आणि कसला देव ? अहो जिथे बिजच नाही तेथे फळ तरी शेवटी कसे असेल ? देवा तुम्ही अनेक प्रकारचे सोग संपादन केले आहेत मग तेथे कसले पुण्य आणि कसले पाप. देवा तुम्ही आणि आम्ही हे एकरूप आहोत हे आम्ही आज पर्यंत ओळखले नव्हते म्हणूनच आम्हाला पाप आणि पुण्य खरे वाटत होते. देवा तुझे आणि माझे निजस्वरूपाचे हे एकच घर आहे परंतु अज्ञानामुळे मला हे दोन्हीही तुझे व माझे घर वेगवेगळे वाटत होते त्यामुळे माझ्या सोहम भावाची चोरी झाली. त्या अज्ञानामुळे माझे फार नुसकान झाले परंतु मला पुन्हा माझ्या सोहम भावाचे ज्ञान झाले आणि त्यामुळे माझे संसारातील माझे जन्ममरण खुंटली आहे. तुकाराम महाराज म्हणतात आमचा द्वैतभाव जरी नाहीसा झाला असला तरी देखील आम्ही द्वैतभाव आमच्या हाती धरून आमच्या उराशी आम्ही बाळगून ठेवला आहे. कारण एकातात आणि लोकातात हा देवभक्त सोहळा चालावा म्हणून.
3
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















