८ जून, दिवस १५९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा, ओवी १०१ ते १२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १८९७ ते १९०८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“८ जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ८ jun
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ८ जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १८९७ ते १९०८ चे पारायण आपण करणार आहोत.
८ जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी १०१ ते १२५,

101-12
उचललेया प्राणासरिसी । इंद्रियेही निगती जैसी । तैसा मनोबुद्धिपाशी । अहंकारु ये ॥101॥
किंवा ज्याप्रमाणे प्राण निघून गेल्याबरोबर इंद्रियेही प्राणाबरोबर निघून जातात, त्याप्रमाणे मन व बुद्धी जेथे जडतात तेथेच अहंकारही राहतो.
102-12
म्हणौनि माझिया स्वरूपी । मनबुद्धि इये निक्षेपी । येतुलेनि सर्वव्यापी । मीचि होसी ॥102॥
म्हणून माझ्या स्वरूपाचे ठिकाणी (अर्जुना ! ) आपली मनबुद्धी लाव म्हणजे एवढ्यानेच सर्वव्यापी असा जो मी तोच तू होशील.
103-12
यया बोला काही । अनारिसे नाही । आपली आण पाही । वाहतु असे गा ॥103॥
हे माझे बोलणे यत्किंचितही अन्यथा नाही, हे मी आपली शपथ वाहून सांगतो.

अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् ।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनन्जय ॥12. 9॥

अर्थ अथवा हे धनंजया माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करण्याला असमर्थ असलास तर (चित्तैकाग्रतेचा अथवा ध्यानाचा) अभ्यास करून माझी प्राप्ती करून घेण्य़ाची इच्छा कर. ॥12-9॥
104-12
अथवा हे चित्त । मनबुद्धिसहित । माझ्या हाती अचुंबित । न शकसी देवो ॥104॥
किंवा मनबुद्धीसहित हे चित्त जर एकदम माझ्या स्वाधीन करू शकत नसलास
105-12
तरी गा ऐसे करी । यया आठा पाहारांमाझारी । मोटके निमिषभरी । देतु जाय ॥105॥
तर, हे अर्जुना ! असे कर की, या चोवीस तासांमध्ये घटकाभर थोडेसे माझ्याकडे चित्त लावण्याचा प्रयत्न करत जा.

106-12
मग जे जे का निमिख । देखेल माझे सुख । तेतुले अरोचक । विषयी घेईल ॥106॥
मग असा प्रयत्न करीत असता, माझे सुख अनुभविण्यात जसा जसा क्षण जाईल तसा तसा चित्ताला विषयसुखाचा कंटाळा येत जाईल.
107-12
जैसा शरत्कालु रिगे । आणि सरिता वोहटू लागे । तैसे चित्त काढेल वेगे । प्रपंचौनि ॥107॥
ज्याप्रमाणे शरदऋतूला प्रारंभ झाला असता नद्यांचे पाणी ओसरू लागते, त्याप्रमाणे विषयसुखाचा वीट येता येता, तुझे चित्त विषयसुखातून वेगाने निघेल.
108-12
मग पुनवेहूनि जैसे । शशिबिंब दिसेंदिसे । हारपत अंवसे । नाहीचि होय ॥108॥
मग ज्याप्रमाणे चंद्रबिंब, पौर्णिमेपासून दिवसेंदिवस कमी होत होत अमावास्येला नाहीसे होते.
109-12
तैसे भोगाआतूनि निगता । चित्त मजमाजी रिगता । हळूहळू पंडुसुता । मीचि होईल ॥109॥
त्याप्रमाणे चित्त विषयसुखाच्या वासनेतून क्रमाने निघून, माझ्या ठिकाणी प्रविष्ट होऊ लागले असता अर्जुना ! तू हळूहळू मीच होशील.
110-12
अगा अभ्यासयोगु म्हणिजे । तो हा एकु जाणिजे । येणे काही न निपजे । ऐसे नाही ॥110॥
बा अर्जुना ! ज्याला अभ्यासयोग म्हणतात, तो हाच होय, असे जाण. या अभ्यासयोगाने प्राप्त होत नाही असे काहीही नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

111-12
पै अभ्यासाचेनि बळे । एका गति । अंतराळे । व्याघ्र सर्प प्रांजळे । केले एकी ॥111॥
कारण अभ्यासाच्या बळाने कोणी आकाशगामी झाले. कोणी व्याघ्र, सर्प अशा दुष्ट प्राण्यांना सुस्वभावी केले
112-12
विष की आहारी पडे । समुद्री पायवाट जोडे । एकी वाग्ब्रह्म थोकडे । अभ्यासे केले ॥112॥
अभ्यासाने विषही आहार होऊ शकते, समुद्रावरूनही पायवाटाप्रमाणे चालता येते. कोणी अभ्यासाच्या बळाने वेदादिशास्त्रे मुखोद्गत केली.
113-12
म्हणौनि अभ्यासासी काही । सर्वथा दुष्कर नाही । यालागी माझ्या ठायी । अभ्यासे मीळ ॥113॥
याप्रमाणे अभ्यासाला काहीही असाध्य नाही; म्हणून अभ्यासाने माझी प्राप्ती होऊ शकते.

श्लोक
अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।
मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि ॥12. 10॥

अर्थ अभ्यासयोगाला देखील असमर्थ असलास, तर सर्वस्वी माझ्याकरता कर्मे करणारा हो. माझ्याकरता कर्मे केलीस तरी देखील तू सिद्धी मिळवशील.
(भक्तीयोग = मार्ग 3 रा माझ्या करता कर्मे कर. मला कर्मे अर्पण कर)
114-12
का अभ्यासाही लागी । कसु नाही तुझिया अंगी । तरी आहासी जया भागी । तैसाचि आस ॥114॥
किंवा हा अभ्यास करण्याचेही तुझ्या अंगी सामर्थ्य नसेल तर तुझी क्षात्र-प्रकृती या गुणभागाची बनली असेल तशा प्रकृतीतच तू राहा.
115-12
इंद्रिये न कोंडी । भोगाते न तोडी । अभिमानु न संडी । स्वजातीचा ॥115॥
इंद्रियांचा निग्रह करू नकोस, विषयभोगाचा त्यागही करू नकोस व आपल्या जातीचाही अभिमान सोडू नकोस.

116-12
कुळधर्मु चाळी । विधिनिषेध पाळी । मग सुखे तुज सरळी । दिधली आहे ॥116॥
कुलपरंपरागत धर्माचे आचरण कर. अमुक कर व अमुक करू नकोस, असे जे शास्त्र तुला सांगितले असेल, त्या विधिनिषेधांचे पालन कर. याप्रमाणे तुला वागण्याची सुखाने मोकळीक दिली आहे.
117-12
परी मने वाचा देहे । जैसा जो व्यापारु होये । तो मी करीतु आहे । ऐसे न म्हणे ॥117॥
पण मन – वाचा – शरीर यांच्याकडून जसा व जो व्यापार होईल, तो मी करीत आहे, असे मात्र म्हणू नकोस- म्हणजे असे तुझ्या चित्तात उठता कामा नये.
118-12
करणे का न करणे । हे आघवे तोचि जाणे । विश्व चळतसे जेणे । परमात्मेनि ॥118॥
अद्वैत व पूर्ण सच्चिदानंदस्वरूप परमात्म्यावरच कर्म स्फुरत असल्यामुळे, उत्पन्न होणार्‍या कर्माच्या पूर्वी, कर्मांत व कर्माच्या शेवटी तोच असतो. त्याच्याच योगाने विश्वांतील सर्व घडामोडी होतात; म्हणून कर्म करणे किंवा न करणे हे त्यालाच माहीत (असे समजावे).
119-12
उणयापुरेयाचे काही । उरो नेदी आपुलिया ठायी । स्वजाती करूनि घेई । जीवित्व हे ॥119॥
हे कर्म उणे झाले की पुरे झाले असे काही मनात राहु देऊ नकोस. आपले जीवत्व म्हणजे जीवन सजात म्हणजे केवळ कर्माच्या जातीचे किंवा केवळ कर्मरूपच करून घे.
120-12
माळिये जेउते नेले । तेउते निवांतचि गेले । तया पाणिया ऐसे केले । होआवे गा ॥120॥
जसे पाणी, माळी जिकडे नेतो तिकडे ते शांतपणे जाते, त्या पाण्याप्रमाणे तू आपले कर्म होऊ दे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

121-12
म्हणौनि प्रवृत्ति आणि निवृत्ती । इये वोझी नेघे मती । अखंड चित्तवृत्ती । माझ्या ठायी ॥121॥
म्हणून मी कर्म करतो आणि मी कर्म करीत नाही, असे दोन्ही प्रवृत्ति-निवृत्तिरूप कर्माचे ओझे बुद्धीत वागवू नकोस, म्हणजे कल्पनारहित झालेली चित्तवृत्ती माझे ठिकाणीच अखंड राहील.
122-12
एऱ्हवी तरी सुभटा । उजू का अव्हाटा । रथु काई खटपटा । करितु असे ? ॥122॥
हे उत्तम योद्ध्या अर्जुना ! रथ आपण होऊन सरळ मार्गाने किंवा आडमार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो काय ?
123-12
आणि जे जे कर्म निपजे । ते थोडे बहु न म्हणिजे । निवांतचि अर्पिजे । माझ्या ठायी ॥123॥
आणि जे जे कर्म होत जाईल, ते थोडे झाले किंवा बहु झाले असे न म्हणता, स्वस्थ चित्ताने माझे ठिकाणी अर्पण करावे.

अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः ।
सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ॥12. 11॥

अर्थ माझ्या ठायी आश्रय करून, माझ्या ठिकाणी कर्मांचा संन्यास करण्यास देखील जर तू असमर्थ असशील तर नियतचित्त होऊन सर्व कर्मफलांचा त्याग कर. ॥12-11॥
भक्तियोग – मार्ग 4 था कर्मफलाचा त्याग कर.
124-12
ऐसिया मद्भावना । तनुत्यागी अर्जुना । तू सायुज्य सदना । माझिया येसी ॥124॥
हे अर्जुना ! याप्रमाणे माझी भावना करून कर्म करीत राहिले असता, देहपातानंतर तू माझ्या ऐक्यरूपी मंदिरात प्राप्त होशील.
125-12
ना तरी हेही तूज । नेदवे कर्म मज । तरी तू गा बुझ । पंडुकुमरा ॥125॥
अथवा पांडुकुमारा अर्जुना ! जर आपल्या कर्मकर्तृत्वाचा अहंकार सोडून तुझ्याच्याने संपूर्ण कर्म मला अर्पण करवत नसेल, तर तू अशा रीतीने मला भज.

दिवस १५९ वा, ८, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १८९७ ते १९०८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. १८९७
न म्हणे साना थोर । दृष्ट पापी अथवा चोर ॥१॥
सकळा द्यावी एकी चवी । तहान हरूनि निववी ॥धृपद॥
न म्हणे दिवस राती । सर्व काल सर्वा भूती ॥२॥
तुका म्हणे झारी । घेता तांब्याने खापरी ॥३॥
अर्थ

पाणी पिण्यासाठी जर कोणी पाण्याजवळ गेले तर पाणी हा लहान-मोठा दुष्ट पापी अथवा कोणी चोर आहे असे तो कधीच म्हणत नाही ते सर्वाना एक सारखीच चव देते आणि सर्वाची तहान भागवते व सगळ्यांना तृप्त करते. तहानलेला व्यक्ती पाण्याजवळ पाणी पिण्यासाठी गेला तर पाणी म्हणत नाही की रात्र आहे किंवा दिवस आहे ते सर्वासाठी सर्वकाळ सारखेच असते. तुकाराम महाराज गाणी झारीने किंवा थांबणे अथवा मातीचे खापर आणि तुकाराम महाराज म्हणतात पाणी झारीने किंवा तांब्याने अथवा मातीच्या खापराणे घेऊन जरी प्यायले तरी ते सर्वाना सारखीच गोडी देत असते.

अभंग क्र. १८९८
इच्छा चाड नाही । न धरी संकोच ही काही ॥१॥
उदका नेले तिकडे जावे । केले तैसै सहज व्हावे ॥धृपद॥
मोहरी कांदा ऊस । एक वाफा भिन्न रस ॥२॥
तुका म्हणे सुख । पीडा इच्छा पावे दुःख ॥३॥
अर्थ

पाण्याला कोणत्याही प्रकारची इच्छा किंवा आवड नसते आणि ते कोणाबद्दल संकोच ही धरीत नाही. पाण्याला ज्याने जिकडे न्यावे तिकडे ते पाणी जाते आणि जसा तो वापर करील त्यात त्याचप्रकारे ते पाणी होते. मोहरी कांदा ऊस जरी एकाच वाफ्यात लावलेले असले आणि त्या वाफ्यात पाणी सोडले तरी पाणी ज्याच्या त्याच्या चवीनुसार आपली ही चव बदलते. तुकाराम महाराज म्हणतात ज्या व्यक्तीच्या ठिकाणी सुख आणि दुखः हे विकार आहेत त्याला काही गोष्टींपासून सुख होते तर काही गोष्टी पासून दुख होते परंतु संतांच्या ठिकाणी असा भाव नसतो संत हे पाण्याप्रमाणेच आहेत ते जिकडे जावे तिकडे तसेच होतात त्यामुळे त्यांना सुख आणि दुखः बाधत नाही.

अभंग क्र. १८९९
तरले ते मागे आपुलिया सत्ता । कमाई अनंता करूनिया ॥१॥
उसने फेडिता धर्म तेथे कोण । ते तुज अनन तुह्मी त्यासी ॥धृपद॥
मज ऐसा कोण सांगा वाया गेला । तो तुह्मी तारिला पांडुरंगा ॥२॥
तुका म्हणे नामासारिखी करणी । न देखे हे मनी समजावे ॥३॥
अर्थ

हे अनंता मागे अनेक भक्त आपल्या सत्तेने मोक्ष रुपी कमाई करून तरलेत. उसने फेडणे म्हणजे तो धर्म होत नाही भक्त तुझी अनन्य भक्तीने भक्ती करतात आणि त्या बदल्यात तु त्यांना मोक्ष देतोस त्यांचा उद्धार करतोस हे केवळ उसने फेडल्या सारखेच होते मग त्यामध्ये धर्म आला ते कोठून ते सांगा ? हे पांडुरंगा माझ्यासारखा पतीत वाया गेलेला आहे आणि त्याला तुम्ही तारले आहे असे कोणी आहे का ते सांगा ? तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमचे नांव पतितपावन आहे पण त्याप्रमाणे तुम्ही कृती करत नाही आणि ही गोष्ट तुम्ही देखील मनात समजून घ्यावे.

अभंग क्र. १९००
कवणांशी भांडो कोण माझे साहे । कोण मज आहे तुजविण ॥१॥
धरिले उदास दुरदुरांतरे । सांडी एकसरे केली माझी ॥धृपद॥
आइकोन माझे नाइकसी बोल । देखोनिया खोळबुंथी घेसी ॥२॥
तुका म्हणे एके गावींची वसती । म्हणऊनि खंती वाटे देवा ॥३॥
अर्थ

देवा मी तरी कोणाशी भांडू मला तरी तुझ्यावाचून कोण सह्य करणार आहे आणि तुझ्या वाचून माझे कोणी आहे का ? आणि तुही माझ्या विषयी उदासीनता धरून मला अत्यंत दूर लोटून माझा त्याग केला आहेस. देवा माझे बोल ऐकूनही तू नाही ऐकल्यासारखा करतोस आणि मला पाहिले की लगेच मायेचा खुळ अंगावर पाघरून घेतोस. तुकाराम महाराज म्हणतात देवा आपण दोघेही एकाच गावचे वस्तीत राहणारे आहोत तरी तुम्ही माझा असा त्याग करतात त्यामुळे मला खुप खंत वाटते आहे.

अभंग क्र. १९०१
आळविता कंठ शोकला भीतर । आयुष्य वेचे धीर नाही मना ॥१॥
अझूनी का नये हे तुझ्या अंतरा । दिनाच्या माहेरा पांडुरंगा ॥धृपद॥
धन दिसे डोळा दगडाचे परी । भोग ते शरीर विष जाले ॥२॥
चुकलो काय ते मग क्षमा करी । आळींगुनी हरी प्रमे द्यावे ॥३॥
अवस्था राहिली रूपाची अंतरी । बाहेर भीतरी सर्व काळ ॥४॥
तुका म्हणे माझे सकळ उपाय । पांडुरंगा पाय तुझे आता ॥५॥
अर्थ

देवा तुम्हाला करुणतेने हाक मारून मारून आता माझ्या कंठ आतून शुष्क झाला आहे तुमच्या भेटिवाचून माझे आयुष्य आता क्षणाक्षणाला व्यर्थ ठरत आहे आता तुमच्या भेटीसाठी माझ्या मनाला आणखी धीर धरवत नाही. हे दीनाच्या माहेर असलेल्या पांडुरंगा तुमच्या अंतकरणात असे अजूनही का येत नाही की मला एकदा भेट द्यावी. धन आता माझ्या डोळ्याला दगडाप्रमाणे वाटत आहेत आणि शरीर भोग विषा प्रमाणे झाले आहेत. हे हरी माझ्याकडून काही चुकले असेल तर तुम्ही मला त्याबद्दल क्षमा करावी आणि मला आलिंगन देऊन तुम्ही तुमचे प्रेम मला द्यावे. देवा तुमचे सगुण रुप एकदा तरी पाहावे असे माझ्या अंतरंगात व बाह्य दृष्टीला देखील सर्वकाळ वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा आता माझे काही उपाय शिल्लक राहिले असतील तर ते म्हणजे आता केवळ तुझे पायच आहेत.
This message was deleted

अभंग क्र. १९०२
नाही काष्ठाचा गुमान । गोवी भ्रमरा सुमन ॥१॥
प्रेम प्रीतीचे बांधले । ते न सुटे काही केले ॥धृपद॥
पदरी घाली पिळा । बाप निर्बळ साटी बाळा ॥२॥
तुका म्हणे भावे । भेणे देवे आकारावे ॥३॥
अर्थ

भ्रमराला मोठी मोठी लाकडे फोडण्यास अजिबात कष्ट होत नाही तर फोडतांना त्याची परवा वाटत नाही परंतु त्याला केवळ कोमल कमळ अडकवुन टाकते. याचे कारण म्हणजे प्रेम आहे जे प्रेमाने प्रीतीने बांधले जातात ते काही केले ही सुटले जात नाहीत. कितीही बलाढ्य बाप असला तरी पण त्याच्या लहान मुलाने त्याच्या पायाला मिठी मारली की त्याला सारून त्या बापाला पुढे जाता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात अगदी त्याप्रमाणे भक्तांचा भक्तिभाव पाहून त्या भयाने देव आकाराला येतो.

अभंग क्र. १९०३
भावाचिया बळे । आह्मी निर्भर दुर्बळे ॥१॥
नाही आणिकाची सत्ता । सदा समाधान चित्ता ॥धृपद॥
तर्का नाही ठाव । येथे रिघावया वाव ॥२॥
एकछत्री राज । तुक्या पांडुरंगी काज ॥३॥
अर्थ

आम्ही भक्त जरी दुबळे असलो तरी भक्तिभावाच्या बळाने मोठे सामर्थ्यवान झालो आहोत. आता आमच्यावर कोणाचीही सत्ता नाही कारण आमचे चित्त सदासर्वकाळ समाधानी असते. आता माझ्या अंतकरणामध्ये तर्काला घुसण्यासाठी किंवा राहण्यासाठी कोठेही जागा शिल्लक राहिली नाही किंवा वाव राहिलेला नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता केवळ पांडुरंगाशीच आमचे काम उरले आहेत त्यामुळे सर्वत्र एकछत्री राज्य झाले आहे.

अभंग क्र. १९०४
भावापुढे बळ । नाही कोणाचे सबळ ॥१॥
करी देवावरी सत्ता । कोण त्याहूनि परता ॥धृपद॥
बैसे तेथे येती । न पाचारिता सर्व शक्ती ॥२॥
तुका म्हणे राहे । तयाकडे कोण पाहे ॥३॥
अर्थ

भक्तिभाव प्रेमापुढे कोणाचे कितीही बळ असले तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. भक्तीभाव प्रेम यापुढे देवाचेही काही चालत नाही ते देवावर देखील सत्ता करते मग त्यापेक्षा कोणी मोठा आहे काय ? ज्याच्या जवळ भक्तीभाव प्रेम आहे तो भक्त कोठेही जरी बसलेला असेल तरी त्याने न बोलावता देखील सर्व शक्ती त्याच्या पुढे येऊन उभा राहतात. तुकाराम महाराज म्हणतात त्या सर्व शक्तींकडे कोण पाहतोय कारण तो हरिभक्त नेहमी हरी भक्तीमध्ये तल्लीन असतो.

अभंग क्र. १९०५
सत्तावर्त्ते मन । पाळी विठ्ठलाची आन ॥१॥
आज्ञा वाहोनिया शिरी । सांगितले तेचि करी ॥धृपद॥
सरलीसे धाव । न लगे वाढवावी हाव ॥२॥
आहे नाही त्याचे । तुका म्हणे कळे साचे ॥३॥
अर्थ

आता माझ्या मनावर विठ्ठलाची सत्ता आहे आणि त्या सत्ते प्रमाणेच मी वागत आहे आणि मी माझ्या मनाला आता कोणत्याही विषयाकडे धावून न जाण्याची विठ्ठलाची शपथ घातली आहे त्या शपथीचे मी पालन करीत आहे. मी माझ्या मनाला जी आज्ञा करेल ती आज्ञा आपल्या मस्तकावर मन धारण करते आणि मी जे सांगेल तेच काम ते मन करते. आता माझ्या मनाची विषयांकडे जी धाव घेण्याची प्रवृत्ती होती ती सरली आहे आणि ती वाढवावी असेही त्याला वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता मनामध्ये काय खरे आहे व काय खोटे आहे हे आता आम्हाला चांगलेच समजले आहे.
अभंग क्र. १९०६
खावे ल्यावे द्यावे । जमा खर्च तुझ्या नावे ॥१॥
आता चुकली खटपट । झाड्या पाड्याचा बोभाट ॥धृपद॥
आहे नाही त्याचे । आम्हा काम सांगायचे ॥२॥
तुका म्हणे चिंता । भार वाहे तुझ्या माथा ॥३॥
अर्थ

देवा आम्ही जे काही खातो जे काही वस्र नेसतो पाघरतो जे काही देवाणघेवाण करतो त्या सर्व जमाखर्चाचा हिशोब तुझ्याच नावावर आम्ही करत असतो. त्यामुळे आता आमचे रोजचे हिशोब ठेवण्याची जी खटपट आहे ती चुकली आहे आणि कोणालाही हिशोब देण्याची गरज पडत नाही म्हणजे त्याचा भोबटा होत नाही. आमच्याजवळ काय आहे किंवा काय नाही हे सांगण्याची आम्हाला गरजच काय राहते ? तुकाराम महाराज म्हणतात देवा आता आमचा सर्व योग क्षेमाचा भार आता तुझ्या माथ्यावर घातला आहे त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज राहिली नाही.

अभंग क्र. १९०७
आता बरे जाले । माझे माथांचे निघाले ॥१॥
चुकली हे मरमर । भार माथांचे डोंगर ॥धृपद॥
नसता काही जोडी । केली बहुते तडातोडी ॥२॥
जाला झाडापाडा । तुका म्हणे गेली पीडा ॥३॥
अर्थ

देवा आता फार बरे झाले माझ्या माथ्या वरील सर्व भार कमी झाला. देवा आता या प्रपंचाविषयी माझी सर्व मरमर चुकली कारण माझ्या डोक्यावर या प्रपंचाचे फार मोठे मोठे ओझे होते ते पण सर्व चुकले. या प्रपंचामध्ये मला फायदा तर काही झाला नाही परंतु त्यामुळे मला फार तडजोड करावी लागली. तुकाराम महाराज महाराज एकदाचा या प्रपंचाचा हिशोब संपला आणि जन्ममरणाची जी पीडा होती तीही संपली आहे.

अभंग क्र. १९०८
संचितचि खावे । पुढे कोणाचे न घ्यावे ॥१॥
आता पुरे हे चाकरी । राहो बैसोनिया घरी ॥धृपद॥
नाही काम हाती । आराणूक दिवसराती ॥२॥
तुका म्हणे सत्ता । आता पुरे पराधीन ॥३॥
अर्थ

आता जेवढे संचिताचे भोग असतील तेवढेच भोगून मोकळे व्हावे पुढे कोणतेही क्रियमाण कर्म करु नये. आता या प्रपंचाची चाकरी खूप झाली आणि आपले खरे घर म्हणजे स्वस्वरूप आहे तेथे आपण बसून राहू. रात्रंदिवस या प्रपंचाची कामे करून देखील समाधान प्राप्त झाले नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता या प्रपंचाची पराधीनता पुरी झाली आता आम्ही आमच्या स्वतंत्र सत्तेने राहू.

जून नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading