१० जून, दिवस १६१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा, ओवी १५१ ते १७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १९२१ ते १९३२

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१० जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १० jun
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १० जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १९२१ ते १९३२ चे पारायण आपण करणार आहोत.
१० जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी १५१ ते १७५,

सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥12. 14॥
अर्थ सर्वदा संतुष्ट, योगी, नियतचित्त, माझ्या ठिकाणी ज्याचे मन दृढ आहे असा, माझे ठिकाणी ज्याने मन व बुद्धी अर्पण केली आहेत असा जो माझा भक्त असतो, तो मला प्रिय आहे. ॥12-14॥
151-12
वार्षियेवीण सागरू । जैसा जळे नित्य निर्भरु । तैसा निरुपचारु । संतोषी जो ॥151॥
ज्याप्रमाणे वर्षाऋतुवाचून देखील समुद्र पूर्ण पाण्याने भरला असतो, त्याप्रमाणे सुखभोग प्राप्त न होता देखील जो अखंड प्रसन्नचित्त असतो.
152-12
वाहूनि आपुली आण । धरी जो अंतःकरण । निश्चया साचपण । जयाचेनि ॥152॥
शपथ वाहून जो आपले अंतःकरण आपल्या स्वाधीन ठेवतो- अंतःकरणाच्या स्वाधीन होत नाही- आणि ज्याचा निश्चय इतका दृढ असतो की त्याच्याच योगाने निश्चयाला सत्यपणा आलेला आहे.
153-12
जीवु परमात्मा दोन्ही । बैसऊनि ऐक्यासनी । जयाचिया हृदयभुवनी । विराजती ॥153॥
ज्याच्या ह्रदयामध्ये जीव परमात्मा हे दोघेही एकाच आसनावर बसून विराजमान झालेले असतात.
154-12
ऐसा योगसमृद्धि । होऊनि जो निरवधि । अर्पी मनोबुद्धी । माझ्या ठायी ॥154॥
अशा रीतीने योगसंपत्तीने समृध्द होऊन, जो माझ्या सगुण स्वरूपाचे ठिकाणी मनबुद्धी अखंड अर्पण करतो.
155-12
आंतु बाहेरि योगु । निर्वाळलेयाहि चांगु । तरी माझा अनुरागु । सप्रेम जया ॥155॥
आतबाहेर दृढ ऐक्य साधल्यावरही माझ्या सगुणस्वरूपाच्या ठिकाणी ज्याचे अत्यंत प्रेम आहे.

156-12
अर्जुना गा तो भक्तु । तोचि योगी तोचि मुक्तु । तो वल्लभा मी कांतु । ऐसा पढिये ॥156॥
अर्जुना तोच भक्त आहे, तोच योगी आहे व तोच मुक्त आहे, असे समज, मी पती व तो पत्नी असा तो मला प्रिय आहे.
157-12
हे ना तो आवडे । मज जीवाचेनि पाडे । हेही एथ थोकडे । रूप करणे ॥157॥
एवढेच नाही, तर असा तो ज्ञानी भक्त मला माझ्या प्राणाप्रमाणे आवडतो. पण ही ही उपमा, त्याच्यावर असलेले माझे प्रेम वर्णन करण्यास कमीच पडते.
158-12
तरी पढियंतयाची काहाणी । हे भुलीची भारणी । इये तव न बोलणी । परी बोलवी श्रद्धा ॥158॥
प्रेमळ भक्तांची कथा म्हणजे चित्ताला भूल किंवा विसर पडणारीच होय; म्हणून ती शब्दाने बोलून दाखविण्यासारखी नाही, तरीपण तुझ्यावरील प्रेमच मला बोलायला लावते.
159-12
म्हणौनि गा आम्हा । वेगा आली उपमा । एऱ्हवी काय प्रेमा । अनुवादु असे ? ॥159॥
म्हणूनच अर्जुना ! भक्तावर माझे प्रेम कसे असते, हे सांगताना ” तो वल्लभ मी कान्ता” ” जीवाचेनि पाडे ” अशा उपमा माझ्या तोंडातून एकदम बाहेर पडल्या. एर्‍हवी पाहता हे प्रेम शब्दाने सांगता येते काय ?
160-12
आता असो हे किरीटी । पै प्रियाचिया गोष्टी । दुणा थांव उठी । आवडी गा ॥160॥
अर्जुना ! आता हे असो. पण प्रेमळाच्या गोष्टी करण्याने मात्र प्रेम दुप्पट उफाळून येते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

161-12
तयाही वरी विपाये । प्रेमळु संवादिया होये । तिये गोडीसी आहे । काटाळे मग ? ॥161॥
तशातही कदाचित प्रेमळ भक्तांच्या कथा श्रवण करणारा श्रोताही प्रेमळच असला, तर मग त्या प्रेमगोडीची कशाशी तुलना करता येईल काय ?
162-12
म्हणौनि गा पंडुसुता । तूचि प्रियु आणि तूचि श्रोता । वरी प्रियाची वार्ता । प्रसंगे आली ॥162॥
म्हणून अर्जुना ! तूच माझा अत्यंत प्रेमळ असा प्रिय भक्त आहेस आणि तूच प्रेमळ श्रोताही असून, त्यातच प्रसंगाने प्रेमळाचे निरूपण आले आहे.
163-12
तरी आता बोलो । भले या सुखा मीनलो । ऐसे म्हणतखेंवी डोलो । लागला देवो ॥163॥
तर आता प्रेमळाची कथाच बोलतो. भाग्याने प्रेमळाच्या कथा सांगण्याचे हे सुख मला प्राप्त झाले, असे म्हणताक्षणीच देव डोलू लागले.
164-12
मग म्हणे जाण । तया भक्तांचे लक्षण । जया मी अंतःकरण । बैसो घाली ॥164॥
मग देव म्हणाले, अर्जुना ! ज्याला मी बसायला आपल्या अंतःकरणाचे आसन घालतो, त्या भक्ताचे लक्षण ऐक.

यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥12. 15॥

अर्थ ज्याच्यापासून लोक उद्वेग पावत नाहीत, व जो लोकांपासून उद्वेग पावत नाही, जो हर्ष, क्रोध, भय आणि उद्वेग यापासून सुटला आहे, तोच मला प्रिय भक्त आहे. ॥12-15॥
(भक्तलक्षणे = पुढे चालू)
165-12
तरी सिंधूचेनि माजे । जळचरा भय नुपजे । आणि जळचरी नुबगिजे । समुद्रु जैसा ॥165॥
ज्याप्रमाणे समुद्रात भयंकर खळबळ माजली, तरी समुद्रांतील प्राण्यांना भय वाटत नाही आणि समुद्राच्या पाण्यात भयंकर प्राणी असले तरी समुद्र कंटाळत नाही.

166-12
तेवी उन्मत्ते जगे । जयासि खंती न लगे । आणि जयाचेनि आंगे । न शिणे लोकु ॥166॥
त्याचप्रमाणे जगाच्या उन्मत्त वागणुकीची सत्पुरुषाला खंत वाटत नाही आणि ज्याच्या वागण्याने लोकांनाही दुःख होत नाही.
167-12
किंबहुना पांडवा । शरीर जैसे अवयवा । तैसा नुबगे जीवा । जीवपणे जो ॥167॥
किंबहुना, हे अर्जुना ! ज्याप्रमाणे शरीर आपल्या अवयवांचा कंटाळा करीत नाही, त्याप्रमाणे जो पुरुष, सर्व जीवाचे ठिकाणी जीवपणाने मीच आहे असे समजून, कोणाचाही कंटाळा करत नाही.
168-12
जगचि देह जाहले । म्हणौनि प्रियाप्रिय गेले । हर्षामर्ष ठेले । दुजेनविण ॥168॥
(सर्व जगात मीच आहे या जाणीवेने) सर्व जगच ज्याचा देह बनला. त्याच्याहून भिन्न काही राहिले नाही, म्हणून त्याची आवड नावड, हर्ष-क्रोध हे संपूर्ण नाहीसे झाले.
169-12
ऐसा द्वंद्वनिर्मुक्तु । भयोद्वेगरहितु । याहीवरी भक्तु । माझ्या ठायी ॥169॥
अशा रीतीने जो द्वंदमुक्त होऊन भयोद्वेगरहित झाला आणि शिवाय माझ्या सगुणस्वरूपाचे प्रेम करणारा भक्त असला,
170-2
तरी तयाचा गा मज मोहो । काय सांगो तो पढियावो । हे असे जीवे जीवो । माझेनि तो ॥170॥
तर अर्जुना ! त्याचा मला कसा मोह असतो व मला कसा प्रिय असतो, हे काय सांगू ! हे असो. ” माझेनि जीवे ” म्हणजे मी सगुणस्वरूपाने प्रगट झालो आहे, म्हणूनच तो जगतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

171-12
जो निजानंदे धाला । परिणामु आयुष्या आला । पूर्णते जाहला । वल्लभु जो ॥171॥
जो आत्मानंदाने तृप्त झाला आणि आत्मानंदाचा परिणाम – म्हणजे शेवट – जो ब्रह्मानंद, तोच जणू जन्माला आला, असा जो पूर्ण ब्रह्मस्थितीचा पती झाला.

अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।
सर्वारंभपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥12. 16॥

अर्थ निरपेक्ष, शुद्ध, तत्वार्थाचा देखणा, उदासीन, संसारदु:खविरहित, कर्मारंभास अवश्य असणारा जो अहंकार, तद्विरहित असा जो माझा भक्त असतो, तो मला प्रिय आहे. ॥16॥
(भक्तलक्षणे पुढे चालू)
172-12
जयाचिया ठायी पांडवा । अपेक्षे नाही रिगावा । सुखासि चढावा । जयाचे असणे ॥172॥
ज्याच्या अंतःकरणात विषयसुखाच्या वासनेचा शिरकावच होत नाही, म्हणून ज्याचे असणे- म्हणजे ज्याची संगती – दुसर्‍याच्या सुखाची वृद्धी करणारी असते.
173-12
मोक्ष देऊनि उदार । काशी होय कीर । परी वेचावे लागे शरीर । तिये गावी ॥173॥
काशीक्षेत्र अत्यंत पुण्यभूमी असून निश्चयाने मोक्ष देण्यास उदार आहे, पण त्या क्षेत्रात मरायला पाहिजे.
174-12
हिमवंतु दोष खाये । परी जीविताची हानि होये । तैसे शुचित्व नोहे । सज्जनाचे ॥174॥
हिमालयभूमी निष्पाप करणारी आहे; पण तेथे जो प्राणाला मुकतो, त्यालाच ती निष्पाप करणारी होते. ज्ञानभक्तीने अत्यंत पुनीत झालेल्या सज्जनांचे पावन करणे तशा प्रकारचे (म्हणजे काशीसारखे किंवा हिमालयाच्या भूमीसारखे) नाही (म्हणजे त्यापेक्षाही विशेष आहे, असा अर्थ).
175-12
शुचित्वे शुचि गांग होये । आणि पापतापही जाये । परी तेथे आहे । बुडणे एक ॥175॥
सर्व पवित्र पदार्थांत अत्यंत पवित्र गंगा होय आणि तिच्या योगाने सर्व पाप व त्रिविध ताप नाहीसे होतात- म्हणजे पुरुष मुक्त होतो- पण या लाभाकरिता गंगेत बुडून मरावे लागते.

दिवस १६१ वा, १०, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १९२१ ते १९३२
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. १९२१
काही बोलिलो बोबडे । मायबापा तुम्हापुढे । सलगी लाडे कोडे । मज क्षमा करावी ॥१॥
काय जाणावा महिमा । तुमचा म्या पुरुषोत्तमा । आवडीने सीमा । सांडविली मज हाती ॥धृपद॥
घडे अवज्ञ सख्यत्वे । बाळे बापासी न भ्यावे । काय म्या सांगावे । आहे ठावे तुह्मासी ॥२॥
तुका म्हणे देवा । प्रेम लोभ न संडावा । पाळिला पाळावा । लळा पुढती आगळा ॥३॥
अर्थ

हे माय बापा देवा मी तुमच्या पुढे काही वेडेवाकडे बोबडे बोल बोललो असेल, किंवा सलगीने लाडाने वेडेवाकडे बोल मी तुमच्याशी बोललो असेल तर मला तुम्ही क्षमा करा देवा. हे पुरुषोत्तमा तुमचा महिमा मी कसा जाणू शकेलक ? माझे तुमच्याविषयी प्रेम आहे आणि अति प्रेमाच्या भरात मी तुमच्याशी काही बोललो देखील असेल कौतुकाने बोललो असेल तर मला तुम्ही क्षमा करा. अति सख्यत्व असले की त्यामुळे भय राहत नाही आणि हेच तर कारण आहे की लहान मूल आपल्या बापाला देखील भीत नाही. या गोष्टी मी तुम्हाला काय सांगावे ह्या सर्व गोष्टी तर तुम्हाला माहीतच आहेत देवा. तुकाराम महाराज म्हणतात देवा तरी माझ्याकडून काही चूक झाली असेल तरी आपल्यातील प्रेम आणि हेवा यामध्ये अंतर पडू देऊ नका. देवा जसा माझा लाड पुर्वी तुम्ही करत होता तसाच लाड या पुढेही करावा यापेक्षा अधिक लाड तुम्ही माझा करत राहावा.
3 3

अभंग क्र. १९२२
बहु भितो जाणपणा । आड न यो नारायणा ।
घेइन प्रेमपान्हा । भक्तीसुख निवाडे ॥१॥
यासी तुळे ऐसे काही । दुजे त्रिभुवनी नाही ।
काला भात दही । ब्रह्मादिका दुर्लभ ॥धृपद॥
निमिषार्ध संतसंगति । वास वैकुंठी कल्पांती ।
मोक्षपदे येती । ते विश्रांति बापुडी ॥२॥
तुका म्हणे हेचि देई । मीतूपणा खंड नाही ।
बोलिले त्या नाही । अभेदाची आवडी ॥३॥
अर्थ

हे नारायणा मी ज्ञानी पणाला फार भितो आणि तुझ्या भक्ती प्रेम व सुखापुढे तो ज्ञानी पणा आड येऊ नये. मी केवळ तुझा प्रेम पान्हा घेणार आहे आणि सर्व साधनांमध्ये केवळ भक्ती सुखच मी निवडणार आहे. भक्ती सुखाची तुलना त्रिभुवनामध्ये दुसरी कशाशी ही होऊ शकत नाही कारण भक्ती सुखामध्ये जो दहीभात काला होतो तो तर ब्रह्मादिकांना देखील दुर्लभ आहे. भक्ती सुखांमध्ये संत संगती एक क्षण देखील जरी झाली तरी त्याचा वास कल्पांत असेपर्यंत वैकुंठात होत असतो आणि मोक्ष पदे तर त्या बिचार्‍या त्याच्याजवळ विश्रांतीसाठी येतात. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या देव पणात आणि माझ्या भक्त पणात तु खंड पडू देऊ नकोस. देवा मी मागे तुला अभेदा विषयी बोललो होतो परंतु त्या अभेदाची मला आवड नाही.
3 3

अभंग क्र. १९२३
देवा आता ऐसा करी उपकार । देहेचा विसर पाडी मज ॥१॥
तरींच हा जीव सुख पावे माझा । बरे केशीराजा कळो आले ॥धृपद॥
ठाव देई चित्ता राख पायापाशी । सकळ वृत्तींसी अखंडित ॥२॥
आस भय आता लाज काम क्रोध । तोडावा संबंध यांचा माझा ॥३॥
मागणे ते एक हेचि आहे आता । नाम मुखी संतसंग देई ॥४॥
तुका म्हणे नको वरपंग देवा । घेई माझी सेवा भावशुद्ध ॥५॥
अर्थ

देवा तु आता माझ्यावर असा उपकार कर कि या देहाचा विसर मला पाडून माझा देह भाव नाहीसा कर. त्यामुळे हे केशी राजा माझ्या जीवाला सुख प्राप्त होईल हे मला समजले आहे. देवा तु माझ्या चित्ताला आणि सर्व वृत्तींना अखंडितपणे तुझ्या पायाजवळ स्थान द्यावे आणि त्यांची राखण करावी. देवा अशा, भय, चिंता, लाज, काम क्रोध यांच्याशी माझा संबंध तोडून टाकावा. देवा आता माझे मागणे एकच आहे ते म्हणजे हे की तू माझ्या मुखामध्ये सतत तुझे नाम राहू द्यावा आणि संत संग घडू द्यावा. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी केवळ बाह्य रंगाने वरवर दाखवण्याकरता तुमची केलेली सेवा तुम्ही घेऊ नका तर जी सेवा मी शुद्ध भक्तिभावाने केलेली आहे तीच तुम्ही सेवा घ्यावी.
3

अभंग क्र. १९२४
तुज न करिता काय नव्हे एक । हे तो सकिळक संतवाणी ॥१॥
घेई माझा भार करी कइवार । उतरी हा पार भवसिंधु ॥धृपद॥
उचित अनुचित पापपुण्यकाला । हा तो नये मला निवडिता ॥२॥
कुंटित राहिली बोलता बोलता । पार न पवता वाणी पुढे ॥३॥
पुसता ही कोणा न कळे हे गुज । राखे आता लाज पांडुरंगा ॥४॥
तुका म्हणे बहु पाहिले या जीवे । वर्म जाले जी ठावे नाम तुझे ॥५॥
अर्थ

देवा तु काय करू शकत नाही तु ठरवले तर सर्व काही करशील अशी सर्व संतांची वाणीच आहे. आणि देवा तू माझा कैवार होय म्हणजेच कैवारी होय आणि माझा योग क्षेमाचा भार तु आपल्या माथ्यावर घ्यावा व मला या भवसिंधु तून पार पांडवा. धर्माचरा प्रमाणे वागावे म्हंटले तर उचित काय आणि अनुचित काय मग पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात याबद्दल माझ्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाले आहे आणि ते मला निवडता देखील येत नाही. देवा आम्ही तुझ्या विषयी बोलायला गेलो तर बोलता बोलता माझी वाणी कुंठित झाली तुझा अंतपारच मला समजला नाही. हे पांडुरंगा आता तुझ्या स्वस्वरूपाचे गुह्य ज्ञान जर कोणाला विचारण्यास गेलो तर त्यांनाही ते कळत नाही त्यामुळे तुच आता लाज राख. तुकाराम महाराज म्हणतात मी आजपर्यंत अनेक साधने पाहिले परंतु मला तुझ्या प्राप्ती चे खरे वर्म सापडले ते म्हणजे तुझे नाम आहे तेच मला तुझी प्राप्ती करून देऊ शकतात.
3

अभंग क्र. १९२५
मज त्याची भीड नुलंघवे देवा । जो म्हणे केशवा दास तुझा ॥१॥
मज आवडती बहु तैसे जन । करिती कीर्तन कथा तुझी ॥धृपद॥
सांडूनिया लाज नाचेन त्यांपुढे । आइकती कोडे नाम तुझे ॥२॥
न लगे उपचार होईन भिकारी । वैष्णवांच्या घरी उष्टावळी ॥३॥
तुका म्हणे जाणो उचित अनुचित । विचारूनि हित तेचि करू ॥४॥
अर्थ

हे केशवा मला त्यांची भिड मोडता येत नाही जे स्वत ला तुझा दास म्हणून घेतात. हे देवा जे लोक तुझे कीर्तन कथा करतात ते लोक मला खूप आवडतात. हे देवा ज्या भक्तांना तुझे नाम घेणे फार आवडते त्या भक्तांपुढे मी माझी सर्व लाज सोडून नाचत राहिन. अशा वैष्णवांकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करणार नाही मी त्यांचा दारचा भिकारी होईल आणि भिकारी होऊन त्यांचे उष्टावळी सेवन करीन. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्हाला उचित अनुचित सर्व समजते त्यामुळे विचार करून आम्ही ज्यात आमचे हित आहे तेच करू.
3

अभंग क्र. १९२६
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हाती धरूनिया ॥१॥
चालो वाटे आह्मी तुझाचि आधार । चालविसी भार सवे माझा ॥धृपद॥
बोलो जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज धीट केले देवा ॥२॥
अवघे जन मज जाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ॥३॥
तुका म्हणे आता खेळतो कौतुके । जाले तुझे सुख अंतर्बाही ॥४॥
अर्थ

हे देवा मी जेथे जातो तेथे तू माझा सांगाती म्हणजे माझ्याबरोबर राहतोस माझ्या हाताला धरून तु मला चालवीतोस. आम्ही वाटेने चालत असताना तुच आमचा आधार बनतोस आणि माझा सर्व भार स्वतः चालवतोस. देवा आम्ही बोलत असताना बरळल्या सारखे काहीतरी बडबड करतो परंतु ते तुच नीट करून घेतो आणि देवा तू आमची लाजही घालवून आम्हाला धीट केले आहेस. देवा सर्व लोक मला सोयरे प्राणसखे झाले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता मी हा अध्यात्माचा खेळ कौतुकाने खेळत आहे तुझे सुख माझ्या अंतरबाह्य झाले आहे.
3

अभंग क्र. १९२७
तुझे पाय माझे राहियेले चित्ती । ते मज दाविती वर्म देवा ॥१॥
आम्हा अंधां तुझ्या पायाचा आधार । जाणसी विचार चालविता ॥धृपद॥
मन स्थिर ठेले इंद्रिये निश्चळ । हे तो माझे बळ नव्हे देवा ॥२॥
पापपुण्य भेद नासिले तिमिर । त्रिगुण शरीर सांडियेले ॥३॥
तुका म्हणे तुझा प्रताप हा खरा । मी जाणे दातारा शरणागत ॥४॥
अर्थ

देवा तुझे पाय माझ्या चित्तामध्ये दृढ राहिले आहे आणि ते मला अध्यात्माचे खरे वर्म दाखवित आहे. देवा आम्ही अध्यात्मवादी तर आंधळे आहोत परंतु त्याच्या साठी आम्हाला तुझ्या पायाचा खूप मोठा आधार आहे आणि अध्यात्मामधील सर्व विचार तुच जाणतो आहेस. देवा माझे मन स्थिर झाले आहे इंद्रिय निश्चल झाले आहेत परंतु हे माझे बळ नव्हे बर का ! देवा माझे पण पुण्य नाहीसे होऊन जीव ब्रह्मातील भेद नाहीसा झाला आहे आणि अज्ञानरूपी अंधकार तर केव्हाच नाहीसा झाला आणि माझ्या शरीरातून तीन गुण बाहेर पडले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात हे दातारा हा खरा तर तुझाच प्रताप आहे आणि हे सर्व मी जाणले आहे म्हणून मी तुला शरण आलो आहे.
3

अभंग क्र. १९२८
जाले पीक आम्हा अवघा सुकाळ । घेऊ अवघा काळ प्रेमसुख ॥१॥
जाली अराणुक अवघियांपासून । अवघा गेला सीण भाग आता ॥धृपद॥
अवघा जाला आम्हा एक पांडुरंग । आता नाही जग माझे तुझे ॥२॥
अवघेचि आह्मी ल्यालो अळंकार । शोभलो हि फार अवघ्यांवरी ॥३॥
तुका म्हणे आह्मी सदैवाचे दास । करणे न लगे आस आणिकाची ॥४॥
अर्थ

देवा सर्वत्र विठ्ठल नामाचे पीक पुष्कळ प्रमाणात पीकले आहे आणि त्यामुळे सर्वत्र सुकाळ झाला असून आम्ही तेच प्रेमसुख घेऊ. मला या संसारापासून खूप त्रास झाला परंतु आता माझा सर्व शिण भागाच गेला आहे. आता सर्व जगच आम्हाला पांडुरंग रूप झाले आहे त्यामुळे जगामध्ये माझे तुझे असे काही उरलेले दिसत नाहीये. आम्ही नाम, भक्ती वैराग्य हे सर्व अलंकार धारण केले आहेत त्यामुळे आम्ही सर्वापेक्षा फारच शोभुन दिसत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या घरी सदैव परमार्थिक धनसंपत्ती आहे अशा हरीचे आम्ही दास झालो आहोत त्यामुळे आम्हाला इतर कोणाचीही इच्छा करण्याची गरज पडत नाही.
3

अभंग क्र. १९२९
साधने आमुची आज्ञेची धारके । प्रमाण सेवके स्वामिसत्ता ॥१॥
प्रकाशिले जग आपुल्या प्रकाशे । रवि कर्मरसे अलिप्त त्या ॥धृपद॥
सांगणे ते ते नाही करणे आपण । मोलाही वचन वाढ झाले ॥२॥
तुका म्हणे आम्हा भांडवल हाती । येरझारा खाती केवढिये ॥३॥
अर्थ

जगातील जेवढे काही पारमार्थिक साधने आहेत ते सर्व आमच्या आज्ञा चे धारक आहेत त्याला प्रमाण म्हणजे स्वामीची सत्ता जशी सेवा भार असते त्याप्रमाणे आमची साधना वर सत्ता आहे. सूर्य ज्या प्रमाणे सर्व जगाला प्रकाश देऊन जगापासून होणाऱ्या बऱ्या-वाईट रसापासून अलिप्त असतो त्याप्रमाणे आम्ही सर्व साधनांपासून अलिप्त आहोत. आम्ही लोकांना सांगायचे आणि आम्हीच तसे वागायचे नाही असे नाही तर आम्ही जसे सांगतो तसेच वागतो कारण शब्दांना वचनांना फार किंमत आहे तुकाराम महाराज म्हणतात आमच्या हातात अता सुखाचे भांडवल आहे त्यामुळे आता जन्म मरणाचे दुखः आम्हाला कितीसे वाटणार आहे ?
3

अभंग क्र. १९३०
शुभ जाल्या दिशा अवघाचि काळ । अशुभ मंगळ मंगळाचे ॥१॥
हातींचिया दीपे दुराविली निशी । न देखिजे कैसी आहे ते ही ॥धृपद॥
सुख दुःखाहूनि नाही विपरीत । देतील आघात हितफळे ॥२॥
तुका म्हणे आता आम्हासी हे भले । अवघेचि जाले जीव जंत ॥३॥
अर्थ

आम्हाला तर दाही दिशा आणि सर्व काळ वेळ शुभ झाले आहेत आणि अशुभ काळ जो आहे तो तर मंगळापेक्षाही मंगळ वाटतोय. हातातील ‍दिपकामुळे अंधार नाहीसा होतो एवढेच नाही तर तो अंधकार कसा आहे तोही दिसत नाही. माझ्यासाठी सुख आणि दुःख हे काही वेग वेगळे नाही आणि जे आघात आहेत तेच मला हितकारक फळ देणार आहेत. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता सर्वकाळ आमच्यासाठी सारखा झाला असून सर्व जीवजंतू हे आमच्यासाठी प्रेम रूपी झाले आहेत.
3

अभंग क्र. १९३१
पाप पुण्य दोन्ही वाहाती मारग । स्वर्गनर्कभोग यांची पेणी ॥१॥
एका आड एक न लगे पुसावे । जेविल्या देखावे मागे भूक ॥धृपद॥
राहाटी पडिले भरोनिया रिती । होतील मागुती येती जाती ॥२॥
तुका म्हणे आह्मी खेळतोयांमधी । नाही केली बुद्धी स्थिर पाहो ॥३॥
अर्थ

या जगामध्ये पाप आणि पुण्य हे दोन मार्ग आहेत चांगल्या कर्मा़नुसार स्वर्ग आणि वाईट कर्मानुसार नर्क प्राप्त होतो होतो. स्वर्ग आणि नर्क एकामागून एक कसे येते ज्याप्रमाणे आपण जेवलो की आपल्याला काही वेळानंतर पुन्हा भूक लागते व भूक लागली की आपण पुन्हा जेवण करतो अगदी त्याप्रमाणे- हे कोणाला विचारावे लागत नही. रहाटाला लावलेली गाडगे जसे एक भरले की दुसरे रिकामे होते आणि दुसरे भरले की पुन्हा ते ही रिकामे होते व ते ही भरते असे एका मागे एक चालू राहते. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आम्ही पाप आणि पुण्य या खेळामध्ये खेळत आहोत परंतु पाप करावे की पुण्य करावे यासाठी बुद्धी स्थिर केली नाही.
3

अभंग क्र. १९३२
आमुची जिवलगे सज्जन सोयरी । नांदतील तिरी भिंवरेच्या ॥१॥
तीच माझ्या चित्ती वसती दिवसराती । भेटावया खंती वाटतसे ॥धृ ॥.
संपदा सोहळे सर्वसुख वसे । वैकुंठ नसे सूरवरासी ॥२॥
ज्याच्या नामे पाप दुःख नासे भय । विठ्ठल बाप माय रखुमाई ॥३॥
माझा जीव जातो अमृत ते कळा । कंठी वेळोवेळा ध्यात असे ॥४॥
तुका म्हणे वाट पाहता शिणले । न त्या पंथे डोळुले पंढरीच्या ॥५॥
अर्थ

आमचे जिवलग सज्जन सोयरे हे चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या पंढरी क्षेत्रात राहतात. आणि तेच सज्जन सोयरे माझ्या चित्तामध्ये रात्रंदिवस राहतात त्यांना भेटण्यासाठी माझ्या मनाला फार उत्सुकता लागलेली आहे. वैकुंठामध्ये ज्या सुखाच्या राशी नाहीत त्या सर्व सुखाच्या राशी संपदा सोहळे या पंढरीत राहतात. ज्यांच्या नावाने पाप दुख भय हे सर्व नाश पावतात नष्ट होतात ते माझे मायबाप विठ्ठल रखुमाई आहेत. ज्याच्यामुळे मी जीवन जगतो असे ते नामामृत कळा मी माझ्या कंठात धारण केले आहे व त्याचेच ध्यान मी वेळोवेळा करतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात पंढरीला माझे जे जिवलग सज्जन सोयरे आहेत ते कोणीतरी येथील अशी मी वाट पाहतो आहे परंतु वाट पाहता पाहता माझे डोळे शिणले आहेत.

जून नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading