आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

७ जून, दिवस १५८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा, ओवी ७६ ते १०० सार्थ तुकाराम गाथा अभंग १८८५ ते १८९६
“७ जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 7 jun
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ७ जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १८८५ ते १८९६ चे पारायण आपण करणार आहोत.
७ जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ७६ ते १००,
ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥12. 6॥
अर्थ पण हे पार्था, जे सर्व कर्मे मला अर्पण करून मत्पर होऊन अनन्य योगाने (भक्तीने) माझे ध्यान करीत उपासना करतात ॥12-6॥
76-12
कर्मेंद्रिये सुखे । करिती कर्मे अशेखे । जिये का वर्णविशेखे । भागा आली ॥76
भगवंतांनी निरनिराळ्या वर्णाश्रमाला धरून जी कर्मे विहित केली असतील, ती सर्व कर्मे फक्त, भगवंताची आज्ञा समजून कर्मेंद्रियाच्या द्वारा, प्रेमाने करीत असतात.
77-12
विधीते पाळित । निषेधाते गाळित । मज देऊनि जाळित । कर्मफळे ॥77॥
जे करावे म्हणून सांगितले असेल, तेच भक्त करतात व जे करू नये म्हणून सांगितले असेल; ते कधी करत नाहीत. अशा रीतीने मला कर्म समर्पण करून संपूर्ण कर्माचे फळ ते उत्पन्न होऊ देत नाहीत.
78-12
ययापरी पाही । अर्जुना माझे ठाई । संन्यासूनि नाही । करिती कर्मे ॥78॥
याप्रमाणे, अर्जुना ! माझे ठिकाणी सर्व कर्माचा संन्यास करून कर्मे नाहीशी करतात, पहा.
79-12
आणीकही जे जे सर्व । कायिक वाचिक मानसिक भाव । तया मीवाचूनि धाव । आनौती नाही ॥79॥
आणखीही शरीर, वाणी, मन, यांच्याकडून होणार्या सर्व कर्मांची एक माझ्यावाचून दुसरीकडे प्रवृत्तीच नसते – म्हणजे भक्तांचे संपूर्ण व्यापार केवळ एका भगवंताला विषय करूनच होतात.
80-12
ऐसे जे मत्पर । उपासिती निरंतर । ध्यानमिषे घर । माझे झाले ॥80॥
असे अनन्य व मत्परायण झालेले भक्त, माझी अखंड उपासना करतात व त्या अखंड उपासनेने माझे ध्यान होऊन त्यांचे चित्त, माझे राहण्याचे घर होऊन बसते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
81-12
जयांचिये आवडी । केली मजशी कुळवाडी । भोग मोक्ष बापुडी । त्यजिली कुळे ॥81॥
ज्यांच्या आवडीने एका माझ्याशीच संपूर्ण व्यवहार केला व माझ्या प्रेमसुखाच्या दृष्टीने तुच्छ भासणारे विषयसुख व मोक्षसुख या दोन्ही कुळांचा त्याग केला.
82-12
ऐसे अनन्ययोगे । विकले जीवे मने आंगे । तयांचे कायि एक सांगे । जे सर्व मी करी ॥82॥
अशा रीतीने अनन्य होऊन ज्यांनी आपले शरीर, मन व जीवभाव मला समर्पण केले, त्यांचे सर्व काम मीच करीत असल्यामुळे कोणते एखादेच काम करतो, सांग बरे !
तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।
भवामि न चिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥12. 7॥
अर्थ त्या माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवले आहे अशांना मी अल्पकाळात मृत्यु व जन्मरूपी संसारसागरातून वर काढतो ॥12-7॥
83-12
किंबहुना धनुर्धरा । जो मातेचिया ये उदरा । तो मातेचा सोयरा । केतुला पा ॥83॥
किंबहुना अर्जुना ! जो मातेच्या उदरी येतो, तो मातेचा कितपत सोयरा असतो, बरे.
84-12
तेवी मी तया । जैसे असती तैसिया । कळिकाळ नोकोनिया । घेतला पट्टा ॥84॥
त्याप्रमाणेच माझे भक्त जशा स्थितीत असतील तशा स्थितीत मी त्यांच्यावर, प्रेम करून व त्यांच्या कळिकाळाचे निर्दाळन करून, त्यांना आपल्या पदरात घेतले आहे.
85-12
एऱ्हवी तरी माझिया भक्ता । आणि संसाराची चिंता । काय समर्थाची कांता । कोरान्न मागे ॥85॥
माझ्या भक्ताला संसाराची कधी चिंता नसते. समर्थाच्या स्त्रियेला कोरान्न (म्हणजे कोरडी भिक्षा) मागण्याचा प्रसंग येतो काय ?
86-12
तैसे ते माझे । कलत्र हे जाणिजे । कायिसेनिही न लजे । तयांचेनि मी ॥86॥
याचप्रमाणे माझे भक्त माझ्या कुटुंबापैकीच आहेत असे मी समजतो, मग त्यांना कोणतीही आपत्ती आली तर तिची लाज मला नाही का ?
87-12
जन्ममृत्यूचिया लाटी । झळंबती इया सृष्टी । ते देखोनिया पोटी । ऐसे जाहले ॥87॥
माझे भक्त या सृष्टीत जन्ममृत्यूच्या लाटात बुडत आहेत असे पाहून माझ्या मनात असे आले.
88-12
भवसिंधूचेनि माजे । कवणासि धाकु नुपजे । तेथ जरी की माझे । बिहिती हन ॥88॥
की, भवसागराच्या लाटांची कोणाला भीती वाटत नाही ? अर्थात त्यांची माझ्या भक्तांनाही भीती वाटतेच.
89-12
म्हणौनि गा पांडवा । मूर्तीचा मेळावा । करूनि त्यांचिया गावा । धावतु आलो ॥89॥
म्हणून अर्जुना, राम कृष्णादि अवतार घेऊन या मृत्यूलोकी त्यांच्या गावी मी धाव घेतली.
90-12
नामाचिया सहस्रवरी । नावा इया अवधारी । सजूनिया संसारी । तारू जाहलो ॥90॥
माझ्या सहस्त्रनाम रूपी नावा तयार करून या संसाररूप सागरात मी त्यांना तारले आहे, असे समज.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
91-12
सडे जे देखिले । ते ध्यानकासे लाविले । परीग्रही घातले । तरियावरी ॥91॥
एकटे जे असतील त्यांना मी ध्यानमार्गाची कास लावली आणि जे गृहस्थाश्रमी आहेत त्यांना नामरूपी नावेवर बसविले.
92-12
प्रेमाची पेटी । बांधली एकाचिया पोटी । मग आणिले तटी । सायुज्याचिया ॥92॥
मी आपल्या प्रेमाची पेटी एकाच्या पोटात बांधली आणि मग सर्वाना सायुज्याच्या तटी आणले – म्हणजे संसार समुद्राचे परतीर जे सगुणस्वरूप, त्या सगुण स्वरूपाशी त्यांचे ऐक्य केले.
93-12
परी भक्तांचेनि नांवे । चतुष्पदादि आघवे । वैकुंठीचिये राणिवे । योग्य केले ॥93॥
इतकेच नव्हे तर, ‘भक्त’ या नावास पात्र झालेल्या पश्वादि प्राण्यांना देखील वैकुंठाच्या राज्यावर बसण्यास योग्य केले.
94-12
म्हणौनि गा भक्ता । नाही एकही चिंता । तयाते समुद्धर्ता । आथि मी सदा ॥94॥
म्हणून हे अर्जुना ! भक्तांना कशाचीही चिंता नसते. त्यांना सर्व संकटातून मुक्त करण्याकरिता मी सर्वदा सज्ज असतो.
95-12
आणि जेव्हाचि का भक्ती । दीधली आपुली चित्तवृत्ती । तेव्हाचि मज सूति । त्यांचिये नाटी ॥95॥
आणि ज्या क्षणी भक्त आपली चित्तवृत्ती मला निःशेष समर्पण करतात, त्या क्षणी ते मला आपल्या सर्व व्यवहारात घालतात—म्हणजे त्या क्षणापासून त्यांचा सर्व व्यवहार मीच करीत असतो.
96-12
याकारणे गा भक्तराया । हा मंत्र तुवा धनंजया । शिकिजे जे यया । मार्गा भजिजे ॥96॥
म्हणूनच भक्तश्रेष्ठ अर्जुना, तू किंवा सर्वच जीवांनी माझ्या या भक्तीमार्गाचाच आश्रय करावा, हाच माझा गूढ उपदेश आहे, हे पक्के जाणून घे.
मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि मय्येव अत उर्ध्वं न संशयः ॥12. 8॥
अर्थ माझ्या ठिकाणी मन वृत्तिवंत करून घाल, माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर. (म्हणजे) या पुढे तू माझ्या ठिकाणी निवास करशील (मद्रूप होशील) यात शंका नाही.
97-12
अगा मानस हे एक । माझ्या स्वरूपी वृत्तिक । करूनि घाली निष्टंक । बुद्धि निश्चयेसी ॥97॥
आपले मन माझ्या ठिकाणी स्थिर कर. आपली बुध्दी माझ्या ठिकाणी प्रविष्ट कर. असे झाल्यानंतर तू माझ्या ठिकाणीच राहशील— म्हणजे माझ्याशी अखंड ऐक्य पावशील— यात संशय नाही.
98-12
इये दोनी सरिसी । मजमाजी प्रेमेसी । रिगाली तरी पावसी । माते तू गा ॥98॥
बा अर्जुना ! तू आपले संपूर्ण वृत्तीसह एक हे मन व तसेच निश्चयव्यापारासह बुध्दी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी दृढ लावून घाल.
99-12
जे मन बुद्धि इही । घर केले माझ्या ठायी । तरी सांगे मग काइ । मी तू ऐसे उरे ? ॥99॥
बुध्दी आणि मन ही दोन्ही माझ्या ठिकाणी अखंड वस्ती केली असता ” मी-तू ” असा भेद जो दिसतो, तो मागे राहील काय ? हे सांग.
100-12
म्हणौनि दीप पालवे । सवेचि तेज मालवे । का रविबिंबासवे । प्रकाशु जाय ॥100॥
म्हणून ज्याप्रमाणे दिव्याला फडक्याने वारा घातल्या बरोबर दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो किंवा ज्याप्रमाणे सूर्यबिंब अस्तास गेले असता, त्याचा प्रकाशही जातो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १५८ वा, ७, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १८८५ ते १८९६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. १८८५
देव बराडी देव बराडी । घाली देंठासाठी उडी ॥१॥
देव भ्याड देव भ्याड । राखे बळीचे कवाड ॥धृपद॥
देव भाविक देव भाविक । होय दासाचे सेवक ॥२॥
देव होया देव होया । जैसा म्हणे तैसा तया ॥३॥
देव लहान देव लहान । तुका म्हणे अनुरेण ॥४॥
अर्थ
देव भिकारी आहे कारण तो केवळ भाजीच्या देठा करता देखील भक्ताकडे उडी घालतो. देव फार भ्याड आहे फार भ्याड आहे कारण तो बळीच्या दाराचे रक्षण करतो आहे. देव फार भाविक आहे फार भाविक आहे तो त्याचा दासाचा ही सेवक होतो. देव भक्त जसे सांगतील तसे रूप धारण करतो व तसाच होतो. तुकाराम महाराज म्हणतात देव खुप लहान आहे खूपच लहान आहे अनु रेणू पेक्षाही लहान आहे.
अभंग क्र. १८८६
देव भला देव भला । मिळोनि जाय जैसा त्याला ॥१॥
देव उदार देव उदार । देता नाही थोडे फार ॥धृपद॥
देव बळी देव बळी । जोडा नाही भूमंडळी ॥२॥
देव व्हावा देव व्हावा । आवडे तो सर्वा जीवा ॥३॥
देव चांगला देव चांगला । तुका चरणी लागला ॥४॥
अर्थ
देव भला आहे फारच भला आहे कारण तो जसा भक्त मिळेल तसाच त्याच्या रुपाशी तो एकरूप होतो. देव फार उदार आहे फारच उदार आहे कारण तो भक्तांना काही देण्यास लागला की थोडे आहे की फार आहे याचा विचारच करत नाही. देव फार बलवान आहे फारच बलवान आहे आणि त्याला पुर्ण भु-मंडळांमध्ये कोणता जोडच नाही. देव मला पाहिजे देव मला पाहिजे असे तर सर्वानाच वाटते कारण तो आनंदरूप असल्यामुळे सर्व जीवांना आवडतो. तुकाराम तुकाराम महाराज म्हणतात देव फार चांगला आहे फारच चांगला आहे म्हणून तर मी त्याच्या चरणी लागलो आहे.
अभंग क्र. १८८७
देव पाहो देव पाहो । उंचे ठायी उभे राहो ॥१॥
देव देखिला देव देखिला । तो नाही कोणा भ्याला ॥धृपद॥
देवासी काही मागो मागो । जीव भाव त्यासी सांगो ॥२॥
देव जाणे देव जाणे । पुरवी मनींचिये खुणे ॥३॥
देव कातर देव कातर । तुका म्हणे अभ्यंतर ॥४॥
अर्थ
अर्थ:–आपण देव पाहू, आणि देव पाहण्याकरिता निष्काम कर्म, निष्काम भक्ती, विवेक, वैराग्य, शमादिषटक, जिज्ञासुत्व, गुरुशरणागती आणि महावाक्यश्रवण अशा क्रमाने अधिकाराची उंची वाढवून त्यावर आपण उभे राहू. ज्याने आत्मत्वाने देव बघितला, तो कोणालाही भीत नाही. कारण, त्याच्या दृष्टीने स्वभिन्न, स्वविरोधी, स्वपेक्षा बलवान कोणी राहात नाही. देवाला आपण काहीतरी मागावे, आणि आपल्या मनातील भाव त्याला सांगावा. देव भक्तांच्या मनातील जाणतो ; आणि गूढ इच्छा पूर्ण करतो. तुकाराम महाराज म्हणतात, देव हा मायेत लपून अंगचोरपणा करतो. म्हणून त्याचे अभ्यंतर कोणाला कळत नाही.
अभंग क्र. १८८८
देव आमचा देव आमचा । जीव सकळ जीवाचा ॥१॥
देव आहे देव आहे । जवळी आम्हा अंतरबाहे ॥धृपद॥
देव गोड देव गोड । पुरवी कोडाचे ही कोड ॥२॥
देव आम्हा राखे राखे । घाली कळिकाळासी काखे ॥३॥
देव दयाळ देव दयाळ । करी तुकयाचा सांभाळ ॥४॥
अर्थ
अर्थ:–देव आमचा आहे. तो सकळ जीवाचा अधिष्ठानभूत जीव आहे. देव आमच्याजवळ आहे. तसाच तो अंतर्बाह्य व्यापकही आहे. देव स्वभावाने गोड आहे ; म्हणून भक्तांच्या मनोरथचेही पूर्ण करतो. देव भक्तांचे सर्व भयांपासून रक्षण करतो. कारण, तो कळिकाळालादेखील काखेत मारतो. तुकाराम महाराज म्हणतात, देव फार दयाळू आहे ; म्हणून तो माझा सांभाळ करतो.
अभंग क्र. १८८९
जाऊ देवाचिया गावा । देव देईल विसावा ॥१॥
देवा सांगो सुखदुःख । देव निवारील भूक ॥धृपद॥
घालू देवासीच भार । देव सुखाचा सागर ॥२॥
राहो जवळी देवापाशी । आता जडोनि पायासी ॥३॥
तुका म्हणे आम्ही बाळे । या देवाची लडिवाळें ॥४॥
अर्थ
चला, आपण देवाच्या गावाला – पंढरीला जाऊ ; तो आपल्याला विश्रांती देईल. देवाजवळ आपली सुखदुःखे सांगू ; म्हणजे तो आपली तळमळ दूर करील. देवावरच संसाराचा भार घालू, कारण देव सुखाचा सागर आहे. याकरिताच देवाच्या पायाशी जडून राहू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही देवाची लडिवाळ मुले आहोत.
अभंग क्र. १८९०
प्रेम तेथे वास करी । मुखी उच्चारिता हरी ॥१॥
प्रेमे यावे तया गावा । चोजवी तया वैष्णवा ॥धृपद॥
प्रेमे पाठी लागे बळे । भक्त देखोनिया भोळे ॥२॥
प्रेम न वजे दवडिता । शिरे बळे जेथे कथा ॥३॥
तुका म्हणे थोर आशा । प्रेमा घरी विष्णुदासा ॥४॥
अर्थ
अर्थ:–जेथे मुखाने हरिनामाचा अखंड उच्चार केला जातो, तेथे हरीविषयक प्रेम वास्तव्य करते. कारण, प्रेम हे हरिभक्त जेथे राहतात, त्या गावाचा शोध काढीत तेथे येऊन राहते, आणि भाविक भक्त पाहून त्यांच्या पाठीशी बळेच लागते. जेथे हरिकथा चालू असते, तेथे ते प्रेम बळेच प्रवेश करते ; आणि त्याला बाहेर घालविले तरी ते जात नाही. असे ते निलाजरे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हरिभक्तांच्या घरी आपल्याला आश्रय मिळेल अशी त्या प्रेमाला फार आशा वाटते ; म्हणून प्रेम त्यांच्या घरी आपण होऊन येते.
अभंग क्र. १८९१
संत मानितील मज । तेणे वाटतसे लाज ॥१॥
तुह्मी कृपा केली नाही । चित्त माझे मज ग्वाही ॥धृपद॥
गोविलो थोरिवा । दुःख वाटतसे जीवा ॥२॥
तुका म्हणे माया । अवरा हे पंढरिराया ॥३॥
अर्थ
देवा संत मला मानसन्मान देतात त्यामुळे मला लाज वाटते. कारण तुम्ही अजूनही माझ्यावर कृपा केले नाही याबद्दल माझे चित्तच मला साक्ष देत आहे. मी उगाच मोठेपणा मध्ये गुंतलो त्यामुळे आता माझ्या जीवाला दुःख वाटते आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरी राया आता तुम्ही तुमची माया आवरा.
अभंग क्र. १८९२
नाही तुह्मी केला । अंगीकार तो विठ्ठला ॥१॥
सोंगे न पावीजे थडी । माजी फुटकी सांगडी ॥धृपद॥
प्रेम नाही अंगी । भले म्हणविले जगी ॥२॥
तुका म्हणे देवा । मज वाया का चाळवा ॥३॥
अर्थ
हे विठ्ठला जोपर्यंत तुम्ही माझा अंगिकार केला नाही, तोपर्यंत मी केवळ तुझा भक्त आहे हा दंभ रोवित आहे परंतु ही भव नदी मी त्याच्या जीवावर तरु शकत नाही कारण माझी सांगडी मध्येच फुटली आहे. अंगांमध्ये हरी विषयी प्रेमच नाही आणि नुसतं चांगला भक्त आहे असे म्हणून घेतले तर काय उपयोग आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात अहो मला केवळ भक्तीचा मोठेपण देऊन चांगला भक्त म्हणण्याचा मोठेपणा देऊन देवा असे का फसवत आहात ?
अभंग क्र. १८९३
आता चक्रधरा । झणी आह्मांस अव्हेरा ॥१॥
तुमची म्हणविल्यावरी । जैसी तैसी तरी हरी ॥धृपद॥
काळ आह्मां खाय । तरी तुझे नांव जाय ॥२॥
तुका म्हणे देवा । आता पण सिद्धी न्यावा ॥३॥
अर्थ
हे चक्रधरा तुम्ही माझा अव्हेर करू नका. अहो देवा चक्रधरा आम्ही एकदा तुमचे आहोत असे म्हटल्यावर आम्ही जसे असु तसे, मग आम्ही कसे का असेना तुम्ही आम्हाला या भव नदितुन तारलेच पाहिजे. जर काळाने आम्हाला खाल्ले तर तुझ्याच नावाची बदनामी होईल. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही जो भक्तांचे रक्षण करण्याचा पण घेतला आहे तो माझे रक्षण करून सिद्धीस न्यावा.
अभंग क्र. १८९४
मज ऐसे कोण उद्धरिले सांगा । ब्रीदे पांडुरंगा बोलतसा ॥१॥
हातींच्या कांकणा कासया आरिसा । उरलो मी जैसा तैसा आहे ॥धृपद॥
धनवंतरी हरी रोग्याचिये व्यथे । ते तो काही येथे न देखिजे ॥२॥
तुका म्हणे नाही अनुभव अंगे । वचन वाउगे कोण मानी ॥३॥
अर्थ
पांडुरंगा तुम्ही स्वतःला दीनानाथ पतितपावन अशी ब्रिदे लावून सर्व जगतामध्ये मिरवित असता मग माझ्यासारख्या एखाद्या पतित भक्ताचा तुम्ही केव्हा उध्दार केला आहे हे सांगा तुम्हीच ? अहो हाताच्या कंकण पहाण्यासाठी आरसा कशासाठी पाहिजे म्हणजेच मी जसा पूर्वी पापी होतो तसाच आताही आहे. देवा अहो धन्वंतरीने रोगाची रोग व्यथा ही दूर केली पाहिजे परंतु धन्वंतरीच्या औषधाने देखील रोगाची व्यथा जर थांबली नाही तर मग त्याचा काही उपयोग आहे का हे तुम्हीच सांगा. तुकाराम महाराज म्हणतात देवा जर एखाद्या व्यक्तीने आपणास काही सांगितले आणि त्याच्या बोलण्याचा खरोखर अनुभव आला तर ठीक आहे परंतु केवळ कोरडे वचनच एखादा मनुष्य बोलू लागला आणि त्याचा काही अनुभव आला नाही तर त्या मनुष्याच्या बोलण्याला कोण मान देत असेल ?
अभंग क्र. १८९५
काय ते सामर्थ्य न चले या काळे । काय जाली बळ शक्तीहीण ॥१॥
माझिया संचिते आणिलासी हरी । जाले तुजवरी वरीष्ठ ते ॥धृपद॥
काय गमाविली सुदर्शन गदा । त्या भेणे गोविंदा लाजतसा ॥२॥
तुका म्हणे काय ब्रिदाचे ते काम । सांडा परते नाम दिनानाथ ॥३॥
अर्थ
देवा या कलियुगामध्ये तुझे सामर्थ्य चालेना असे का झाले आहे का तुझे बळ जाऊन तु शक्तिहीन झाला आहेस ? देवा मला असे वाटते माझे संचित तुझ्यापेक्षाही वरिष्ठ झाले आहेत कारण त्यांनी तुझा पराभव केला आहे. हे गोविंदा अहो तुम्ही तुमची सुदर्शन आणि गदा गामवली आहे ती काय आणि माझे संचित तुम्ही नाहीसे करू शकत नाही त्या भीतीने तुम्ही माझ्या समोर येण्यास लाजत आहात की काय ? तुकाराम महाराज म्हणतात देवा असे जर असेल तर तुमच्या ब्रिदाचे तरी काय काम उरले आहे तुमचे ते दीनानाथ नाम सोडून द्यावे.
अभंग क्र. १८९६
बळ बुद्धी वेचुनिया शक्ती । उदक चालावे युक्ती ॥१॥
नाही चळण तया अंगी । धावे लवणामागे वेगी ॥धृपद॥
पाट मोट कळा । भरित पखाला सागळा ॥२॥
बीजा ज्यासी घ्यावे । तुका म्हणे तैसे व्हावे ॥३॥
अर्थ
बळ बुद्धी आणि शक्ती खर्च करून आपल्याला उदक म्हणजे पाणी आपल्या युक्तीने चालवावे लागते. कारण पाणी आपण हून कुठे जात नसते जिथे लवण असते तिथे ते तीव्र गतीने वाहत असते. पाण्याला आपण पाटाणे किंवा मोटाने जेथे पाहिजे तेथे नेउ शकतो किंवा आपल्याला झारीने अथवा पालखीने देखील नेता येते. तुकाराम महाराज म्हणतात पाणी आपण ज्याला देऊ म्हणजे मिरचीला देवु तर तिखट आणि ऊसाला देऊ तर गोड होते म्हणजे जसे बीज असेल तसे पाणी आपले रूप धारण करते.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















