६ जून, दिवस १५७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा, ओवी ५१ ते ७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १८७३ ते १८८४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“६ जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 6 jun
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ६ जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १८७३ ते १८८४ चे पारायण आपण करणार आहोत.
६ जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ५१ ते ७५,

51-12
मग कुंडलिनियेचा टेंभा । आधारी केला उभा । तया चोजवले प्रभा । निमथावरी ॥51॥
आणि मग, त्याच वज्राग्नीच्या प्रखर उष्णतेने तेजस्वी झालेल्या कुंडलिनीशक्तीचा टेंभा, आधारचक्रावर उभा करून, त्याच्या योगाने ब्रह्मरंध्रापर्यंतचा सुषुम्नानाडीचा मार्ग ज्यांनी प्रकाशित केला,
52-12
नवद्वारांचिया चौचकी । बाणूनि संयतीची आडवंकी । उघडिली खिडकी । ककारांतींची ॥52॥
शरीराच्या नवद्वारांच्या कवाडांना निग्रहाची खीळ घालून, ककारांतीची खिडकी (म्हणजे ह्रदयापासून ब्रह्मरंध्रिपर्यंत गेलेल्या सुषुम्नानाडीचे शेवटील द्वार) उघडी केली.
53-12
प्राणशक्तिचामुंडे । प्रहारूनि संकल्पमेंढे । मनोमहिषाचेनि मुंडे । दिधली बळी ॥53॥
प्राणशक्ति हीच कोणी चामुंडादेवी, तिला संकल्परूपी मेंढे मारून मनोरूपी महिषासुराच्या मुंडक्यासह बळी दिले. (प्राणशक्तीने सुषुम्नानाडीत प्रवेश करून तिची ऊर्ध्व ब्रह्मरंध्राकडे गति होऊ लागली असता, मन व मनाचे संकल्प विकल्प हे संपूर्ण नाहीसे होतात असा अर्थ)
54-12
चंद्रसूर्या बुझावणी । करूनि अनुहताची सुडावणी । सतरावियेचे पाणी । जिंतिले वेगी ॥54॥
इडा, पिंगळा यांचे ऐक्य करून व अनाहतनादाला स्पष्ट करून, सतराव्या कलेचे अमृतरूप पाणी वेगात प्राप्त करून घेतले. (चंद्र किंवा इडा नाडी, ही डाव्या नाकपुडीच्या ठिकाणी असून, त्या नाडीवाटे डाव्या नाकपुडीतील वायू वाहत असतो. सूर्य किंवा पिंगळा नाडी, ही उजव्या नाकपुडीच्या ठिकाणी असून, त्या नाडीचे द्वारा उजव्या नाकपुडीतून वायू वाहत असतो. इडा, पिंगळा या नाड्यांचा निग्रह करून – म्हणजे त्यांना आपापल्या नाडीतून वाहू न दिले असता- त्यांची बुझावणी म्हणजे ऐक्य होते. असे ऐक्य झाले असता ह्रदयातील अनाहतनादही स्पष्ट ऐकू येऊ लागतो व सतराव्या कलेचे अमृतपान होते.
या भूमिकेवर योग्याच्या सूक्ष्म किंवा लिंगदेहाचे निरसन होते. )
55-12
मग मध्यमा मध्य विवरे । तेणे कोरिवे दादरे । ठाकिले चवरे । ब्रह्मरंध्र ॥55॥
मग मध्यमा – म्हणजे प्राण व अपान या दोन नाड्यांच्या मध्ये असणारी जी सुषुम्ना नाडी – हेच कोणी विवर, त्या विवरांत असणार्‍या षट्चक्रांच्या पाकळ्या व मात्रा यांनी कोरलेल्या जिन्याने, ज्यांनी सर्वाच्या शेवटी असलेले ब्रह्मरंध्र गाठले.

56-12
वरी मकारांत सोपान । ते सांडोनिया गहन । काखे सूनिया गगन । भरले ब्रह्मी ॥56॥
मग, मकारान्त म्हणजे धन – अज्ञानसुषुप्तिरूप जो कारण देह – हीच कोणी पायरी – ही बिकट पायरी ओलांडून, आकाशही काखेत मारून, योगी ब्रह्मरूपाशी ऐक्य पावतो.
57-12
ऐसे जे समबुद्धी । गिळावया सोऽहंसिद्धी । आंगविताती निरवधी । योगदुर्गे ॥57॥
अशा रीतीने जे समबुद्धी म्हणजे ब्रह्मबुद्धी होतात, ते ” मी ब्रह्म आहे. ” ही आपली सोहंसिध्दिची जाणीव नाहीशी करण्याकरिता- म्हणजे मूळची जाणीवरहित स्थिती प्राप्त होण्याकरिता -बिकट योगरूपी किल्ले स्वाधीन ठेवण्याचा अखंड – म्हणजे मरेपर्यंत प्रयत्न करतात.
(ब्रह्मज्ञान्याला योगाभ्यासाचे मरेतोपर्यंत अखंड कष्ट करून, सोहंसिध्दीची जाणीव, समाधीने नाहीशी करावी लागते, तेव्हा ते मरणानंतर जाणीवनेणीवरहित अशा निर्विकल्प विदेहमुक्तीला प्राप्त होतात. पण इतके कष्ट करूनही प्रकृतीआधीन जीवाला, योगाने किल्ले स्वाधीन करून घेणे अत्यंत दुष्कर असल्यामुळे, अमुक अवधीत ते स्वाधीन होतील असे मुळीच सांगता येत नाही, हे माऊलिंनी ” आंगविताति निरवधि ” या पदाने दाखविले आहे. )
58-12
आपुलिया साटोवाटी । शून्य घेती उठाउठी । तेही मातेचि किरीटी । पावती गा ॥58॥
जे योगी, आपला जीवभाव निशेःष नाहीसा करून, त्याच्या मोबदल्यात तात्काळ शून्यस्वरूप अशी निर्विकल्प ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेतात, तेही अर्जुना ! भक्तांप्रमाणे मलाच प्राप्त होतात.
59-12
वाचूनि योगचेनि बळे । अधिक काही मिळे । ऐसे नाही आगळे । कष्टचि तया ॥59॥
माझ्या प्राप्तीवाचून योगाने योगाभ्यासाच्या बळावर योग्यांना काही प्राप्त होते असे नाही. भक्तांपेक्षा योग्यांना एका कष्टाचीच अधिक प्राप्ती असते.

क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥12. 5॥

अर्थ अव्यक्त ब्रह्माचे ठिकाणी ज्यांचे चित्त आसक्त आहे त्यांना अधिक क्लेश असतो. कारण देहधार्‍यांना अव्यक्त ब्रह्माच्या प्राप्तीचा मार्ग कष्टाने साध्य होतो. ॥12-5॥
60-12
जिही सकळ भूताचिया हिती । निरालंबी अव्यक्ती । पसरलिया आसक्ती । भक्तीवीण ॥60॥
जे कोणी सगुण स्वरूपाच्या भक्तिवाचून, सर्व प्राणिमात्रांचे एकसमान कल्याणरूप किंवा सुखरूप असणारे, चित्ताचे आलंबन न होणारे, इंद्रियातीत असे जे परब्रह्म, त्याच्या प्राप्तीची मनात तीव्र इच्छा धारण करतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

61-12
तया महेन्द्रादि पदे । करिताति वाटवधे । आणि ऋद्धिसिद्धींची द्वंद्वे । पाडोनि ठाती ॥61॥
त्यांना महेंद्रादि देव, त्यांच्या परमार्थमार्गात वाटमारेपणा करतात – म्हणजे त्यांच्या ठिकाणी इंद्रादिपदाच्या प्राप्तीची इच्छा उत्पन्न करून परमेश्वरप्राप्तीपासून भ्रष्ट करतात – आणि ऋध्दिसिध्दीच्या जोड्या प्राप्त होऊन त्यांच्या परमार्थाच्या आड येतात – म्हणजे ऋध्दिसिध्दी त्यांना प्राप्त होऊन त्या सुखात ते गुंतून पडतात.
62-12
कामक्रोधांचे विलग । उठावती अनेग । आणि शून्येंसी आंग । झुंजवावे की ॥62॥
कामक्रोधादी विकारांचे अनेक उपद्रव चित्तात उठावणी करतात आणि त्यांचा प्रतिकार करणे म्हणजे शून्याशीच शरीराने भांडण्यासारखे आहे.
63-12
ताहाने ताहानचि पियावी । भुकेलिया भूकचि खावी । अहोरात्र वावी । मवावा वारा ॥63॥
किंवा तहान लागलेल्या पुरुषाने तहान पिऊनच तहान शमवावी, भूक लागलेल्या पुरुषाने अन्न न खाता भूक खाऊनच तृप्ती मानावी, किंवा वारा मोजू पाहणार्‍यांनी अहोरात्र दोन्ही हात पसरून ठेवूनच तो मोजावा.
64-12
उनी दिहाचे पहुडणे । निरोधाचे वेल्हावणे । झाडासि साजणे । चाळावे गा ॥64॥
किंवा जगण्यातच निद्रेचे सुख मानावे, इंद्रियनिग्रहातच इंद्रियाचे सुख मानावे व झाडाशी सख्य करून मैत्रीचे सुख भोगावे.
65-12
शीत वेढावे । उष्ण पांघुरावे । वृष्टीचिया असावे । घराआंतु ॥65॥
शीताचे वेष्टन करायचे, उष्णताच पांघरायची आणि पावसाच्या घरात राहायचे (अशासारखे योगसुख आहे)

66-12
किंबहुना पांडवा । हा अग्निप्रवेशु नीच नवा । भातारेवीण करावा । तो हा योगु ॥66॥
किंबहुना अर्जुना ! हा योग म्हणजे पतीवाचून करावा लागणारा नित्य नवा अग्निप्रवेश आहे.
67-12
एथ स्वामीचे काज । ना वापिके व्याज । परी मरणेसी झुंज । नीच नवे ॥67॥
य️ येथे पतीच्या उद्धाराचे किंवा पित्याच्या उद्धाराचे निमित्त नाही. पण मरणाशी नित्य युध्द करावे लागते.
68-12
ऐसे मृत्यूहूनि तीख । का घोटे कढत विख । डोंगर गिळिता मुख । न फाटे काई ? ॥68॥
किंवा असे हे योगाचे कष्ट, अत्यंत कढत विष पिण्यासारखे मृत्यूच्या दुःखापेक्षाही तीव्र आहे. डोंगर गिळला असता मुख फाटणार नाही काय ?
69-12
म्हणौनि योगाचिया वाटा । जे निगाले गा सुभटा । तया दुःखाचाचि शेलवाटा । भागा आला ॥69॥
हे उत्तम योद्ध्या अर्जुना ! जे योगमार्गाचा अभ्यास करण्याला निघाले, त्यांच्या वाट्याला नुसते दुःखच आले.
70-12
पाहे पा लोहाचे चणे । जै बोचरिया पडती खाणे । तै पोट भरणे की प्राणे । शुद्धी म्हणो ॥70॥
अर्जुना ! विचार कर. बोचर्‍या (दंतहीन) माणसाला लोखंडाचे चणे खाण्याचा प्रसंग आला असता, ते त्याचे पोट भरणे म्हणावे लागेल की प्राणे-म्हणजे प्राणांतिक प्रायश्चित्त घेऊन-शुध्द होणे म्हणावे लागेल.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

71-12
म्हणौनि समुद्र बाही । तरणे आथि केही । का गगनामाजी पाई । खोलिजतु असे ? ॥71॥
म्हणून हाताने समुद्र तरणे किंवा पायाने आकाशात चालणे कधी तरी होईल काय ?
72-12
वळघलिया रणाची थाटी । आंगी न लागता कांठी । सूर्याची पाउटी । का होय गा ॥72॥
हे अर्जुना ! युध्दाला सज्ज झालेल्यांना रणांगणात उतरल्यानंतर शरीराला काठीचा देखील प्रहार न लागता (स्वर्गप्राप्तीकरिता) सूर्यमंडळाची प्राप्ती होईल काय ?
73-12
यालागी पांगुळा हेवा । नव्हे वायूसि पांडवा । तेवी देहवंता जीवा । अव्यक्ती गति ॥73॥
म्हणून अर्जुना ! ज्याप्रमाणे पांगळा मनुष्य, वायुशी गतीत स्पर्धा करू शकत नाही, त्याप्रमाणे देहधारी जीवाला निराकार इंद्रियातित अशा ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होणे अत्यंत कठीण आहे.
74-12
ऐसाही जरी धिंवसा । बांधोनिया आकाशा । झोंबती तरी क्लेशा । पात्र होती ॥74॥
असे असूनही, आकाशासारख्या शून्यरूप निराकार परब्रह्माशी झोंबण्याचे धैर्य धरलेच, तर ते क्लेशालाच प्राप्त होतात.
75-12
म्हणौनि येर ते पार्था । नेणतीचि हे व्यथा । जे का भक्तिपंथा । वोटंगले ॥75॥
म्हणून, अर्जुना ! दुसरे जे सगुण भगवंताच्या भक्तिमार्गाचा अवलंब करतात, त्यांना असे दुःख भोगण्याचा प्रसंगच येत नाही.

दिवस १५७ वा, ६, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १८७३ ते १८८४
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. १८७३
नाही जाले मोल कळे देता काळी । कोण पाहो बळी दोघामध्ये ॥१॥
आह्मी तरी जालो जीवासी उदार । कैचा हा धीर तुजपाशी ॥धृपद॥
बहु चाळविले मागे आजिवरी । आता पुढे हरी जाऊ नेदी ॥२॥
नव्हती जो भेटी नामाची ओळखी । म्हणऊनि दुःखी बहु जालो ॥३॥
तुका म्हणे काही राहो नेदी बाकी । एकवेळा चुकी जाली आता ॥४॥
अर्थ

देवा आमच्या सेवेचे कर्ज तुझ्याकडे पुष्कळ झाले आहे, किंवा नाही हे तुला त्याची परतफेड करते वेळी कळून येईल आणि त्याच वेळी आपणा दोघामध्ये आम्ही भक्त बलवान आहोत का तू बलवान आहेस हेही आपण पाहू आम्ही तर तुझ्या सेवेकरिता जीवावर उदार झालो आहोत आता तुझ्याजवळ या सेवेचा मोबदला देण्याचे किती धैर्य व किती उदारपणा आहे. देवा तू आता व मागेही पुष्कळ भक्तांना कोरड्या थापा दिल्या आहेत पण हे हरी आता मात्र माझे मला दिल्याशिवाय तुला एक पाऊल देखील पुढे सरकू देणार नाही. इतके दिवस तुझ्या हरी नावाची ओळख नव्हती म्हणून मी फार दुःखी झालो. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्याविषयी माझी चूक झाली ती झाली पण आता मात्र माझ्या सेवेची बाकी थोडीसुध्दा तुझ्याकडे राहू देणार नाही.

अभंग क्र. १८७४
कैसा कृपाळु हे न कळसी देवा । न बोलसी सेवा घेसी माझी ॥१॥
काय ऐसे बळ आहे तुजपाशी । पाहो हरी घेसी कोण आड ॥धृपद॥
पाडियेला ठायी तुझा थारा मारा । अवघा दातारा लपसी तो ॥२॥
आता तुम्हा आम्हा उरी तोचि बरे । काय हे उत्तरे वाढवूनि ॥३॥
तुका म्हणे मज साह्य झाले संत । म्हणऊनि मात फावली हे ॥४॥
अर्थ

देवा तू माझ्याकडून सेवा करून घेतो परंतु माझ्याशी बोलत देखील नाही मग तू कृपाळू कसा आहेस मला हे काही कळत नाही. हे देवा मी जर तुझ्याशी भांडायला लागलो ना तर तुझ्यात किती बळ आहे हे त्यावेळी पाहू आणि हे हरी आम्ही भांडायला लागलो तर तु कोणा आड लपशील ते ही आम्ही पाहू. हे दातारा जरी तू कुठे लपून बसला तरीही तुला कोण थारा देणार हे मला पूर्णपणे माहित आहे. हे देवा आता तुमच्यात आणि आमच्यात थोडे अंतर आहे ते चांगले आहे नाहीतर मी जर तुमच्यापाशी बोलायला आलो तर शब्दाने शब्द वाढतील अन मग त्याला काय उपयोग आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्याशी भडण्याकरीता मला संत सहाय्य झाले आहेत म्हणून तर बोलण्याची संधी मी साधली आहे.

अभंग क्र. १८७५
चुकलिया आम्हा करितसा दंड । हाकासी का खंड पांडुरंगा ॥१॥
चाळविली एके रिद्धीसिद्धीवरी । तैसा मी भिकारी नव्हे देवा ॥धृपद॥
का मी येथे गुंतो मांडूनि पसारा । मागुता दातारा दंभासाठी ॥२॥
केले म्या जतन आपुले वचन । ठायीचे धरून होतो पोटी ॥३॥
तुका म्हणे ताळा घातला आडाखी । ठावे होते सेकी आडविसी ॥४॥
अर्थ

हे पांडुरंगा आमच्या कडून काही चूक झाली तर तुम्ही आम्हाला लगेच दंड करता आणि मग आमच्या हक्काचा ठेवा दूर तुमच्या जवळ आहे तो देण्यास तुम्ही खंड का करता ? देवा तुमच्याकडे अनेक भक्त आले असतील त्यांना तुम्ही रिद्धी सिद्धी देऊन नादविले आहे परंतु मी असा रिद्धी सिद्धी घेणारा भिकारी नव्हे बरे. हे दातरा मी तुमच्याकडून रिद्धी सिद्धी प्राप्त करून घेऊन त्याचे प्रयोग लोकांमध्ये दाखवून दंभासाठी त्यामध्ये का बरे गुंतुन राहू ? देवा तुम्ही जे काही वचन मला सांगितले आहे ते मी माझ्या चित्तात साठवून ठेवले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा शेवटी तू आम्हाला म्हणशील भक्ती सकाम आहे तर मुळीच नाही हे मलाही माहित होते त्यामुळे मी भक्तिमार्गात निष्काम भक्ती करत आहे.

अभंग क्र. १८७६
कृपावंत कोप न धरावा । चित्ती छळू विक्रोक्ति स्तुती करू ॥१॥
आम्ही तुझा पार काय जाणो देवा । नेणो कैसी सेवा करावी ते ॥धृपद॥
अनंत अरुपा अलक्षा अच्युता । निर्गुणा सचिता सर्वोत्तमा ॥२॥
चांगली हि नामे घेतली ठेवुन । जालासी लहान भक्तीकाजा ॥३॥
तुका म्हणे तुझ्या पायावरी सदा । मस्तक गोविंदा असो माझे ॥४॥
अर्थ

अर्थ:–देवा, आम्ही एखादेवेळी चांगल्या शब्दाने तुमची स्तुती करू, काही वेळा वाकड्या शब्दाने तुम्हाला छळू ; काही प्रसंगी तुमचे वर्म उघड करून तुमची निंदाही करू, परंतु हे कृपावंता, आमच्या अपराधाबद्दल मनात राग मानू नका. देवा, आम्हा अज्ञानी जीवांना तुझा अंत काय कळणार आहे ; आणि तुझी भक्ती कशी करावी, हे तरी आम्हास काय कळते ? हे अनंता, अरूपा, अलक्ष्या, अच्युता, निर्गुणा, सच्चिदानंदा, सर्वोत्तमा. देवा, ही चांगली नावे भक्तांच्या उध्दारार्थ तू स्वतःला ठेवून घेतली आहेत, आणि भक्तांना भक्ती करता यावी, म्हणून व्यापकाचा लहान झाला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, हे गोविंदा, असा तुझा महिमा अगाध असल्यामुळे माझे मस्तक तुझ्या पायावर अखंड असो.

अभंग क्र. १८७७
आता तुझा भाव कळो आला देवा । ठकूनिया सेवा घेसी माझी ॥१॥
टाकूनि साकडे आपुलिये माथा । घातला या संतावरी भार ॥धृपद॥
स्तुती करवूनि पिटिला डांगोरा । ते कोण दातारा साच करी ॥२॥
जातीचे वाणी मी पोटींचे कुडे । नका मजपुढे ठकाठकी ॥३॥
तुका म्हणे नाही आले अनुभवा । आधीच मी देवा कैचा नाचूं ॥४॥
अर्थ

अर्थ:–देवा, आता मात्र तुझ्या मनातील अभिप्राय मला कळला आहे. तू मला काही न देता केवळ थापा मारून माझ्याकडून सेवा करून घेतोस आणि आपल्या डोक्यावर असलेली भक्तोध्दाराची जबाबदारी पार पाडणे कठीण आहे, असे पाहून ती टाकून देतोस, आणि संतावर सर्व भार घालतोस ; हे दातारा, भक्तांकडून आजवर तू पुष्कळच स्तुती करवून घेतली, आणि ” पतितपावन, दीननाथ, भक्तवत्सल ” इत्यादी ब्रीदांचा जगात डांगोरा पिटवून घेतला ; पण हे सर्व करवून घेताना गोड वाटले. आता ही ब्रीदवचने कोण सत्य करून दाखविणार आहे, ते सांग ना ? देवा, मी जातीचा व्यापारी असल्यामुळे कोणताही माल चांगला पारखून घ्यावा, हे माझ्या मनात माप असणारच ; त्यामुळे माझ्यापुढे अशी फसवाफसवी करू नका. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमच्या ब्रीदवचनांचा अनुभव येणार नाही, तोपर्यंत अनुभव येण्याच्या आधीच ” देव फार चांगला आहे. ” अशी व्यर्थ कल्पना करून कशाकरता नाचत बसू.

अभंग क्र. १८७८
जन पूजी याचा मज का आभार । हा तुह्मी विचार जाणा देवा ॥१॥
पत्र कोण मानी वंदितील शिक्का । गौरव सेवका याचि मुळे ॥धृपद॥
मी मीपणे होतो जनामधी आधी । कोणे दिले कधी काय तेव्हा ॥२॥
आता तू भोगिता सर्व नारायणा । नको आम्हा दीना पीडा करू ॥३॥
आपुलिया हाते देसील मुशारा । तुका म्हणे खरा तोचि आम्हा ॥४॥
अर्थ

देवा लोक माझी पूजा करतात याचा भार उगाच माझ्या माथ्यावर कशाला पाहिजे. लोक माझी पुजा करतात याचे खरे कारण कोण आहे ? तुम्हीच आहात ना ! याविषयी तुम्हीच विचार करा. नुसताच पत्रावर मजकूर लिहून आणला तर त्याचा उपयोग नाही परंतु त्यावर जर राजमुद्रेचा शिक्का असेल तर सर्व लोक त्याला वंदन करतात आणि एखाद्या सामान्य शिपायाला देखील त्या रजमुद्रेमुळेच किंमत असते. देवा या जन मानसामध्ये मी आधी मी पणाने वागत होतो त्याआधी मला कोणी काही दिले आहे का ? त्यामुळे हे नारायणा या सर्व मान सन्मान पूजेचा भोक्ता तूच हो तुच त्याचा अधिकारी आहेस आम्हा गरिबांना निष्कारण हा मान सन्मान पूजेचा अधिकार देऊन पिडा देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या सेवेची जी मंजुरी तु आम्हाला देशील तीच आमच्यासाठी खरी आहे.

अभंग क्र. १८७९
आमची का नये तुह्मासी करुणा । किती नारायणा आळवावे ॥१॥
काय जाणा तुह्मी दुर्बळाचे जिणे । वैभवाच्या गुणे आपुलिया ॥धृपद॥
देती घेती करिती खटापटा आणिके । निराळा कौतुके पाहोनिया ॥२॥
दिवस बोटी आह्मी धरियेले माप । वाहातो संकल्प स्वहिताचा ॥३॥
तुका म्हणे मग देसी कोण्या काळे । चुकुर दुर्बळे होतो आह्मी ॥४॥
अर्थ

हे नारायणा तुम्हाला आमची करुणा का बरं येत नाही ? अहो देवा आम्ही तर दुर्बल आहोत आमचे जगणे किती कष्टदायक आहे हे तुम्हाला कसे कळणार कारण तुम्ही वैभवसंपन्न आहात तुमच्या या गुणामुळे तुम्हाला आमचे कष्ट तरी कसे कळेल. देवा दुबळ्या मनुष्याला व्यवहारांमध्ये किती खटपटी कराव्या लागतात देवाण-घेवाण करावे लागतात परंतु श्रीमंत मनुष्य त्या दुबळ्या माणसाची गंमत उभे राहून कौतुकाने पाहतो. अहो आम्ही दुबळे भक्त केवळ हा दिवस गेला तो दिवस गेला असे बोटाने माप मोजत आहोत व स्व:हिताचे संकल्प करतो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही तुझी सेवा करतो त्याचे मोल तु आम्हाला केव्हा देणार त्याचे मोल जर आम्हाला तू दिले नाही तर आम्ही दुबळे राहू व तुझी सेवा करण्यामध्ये चुकारपणा करू.

अभंग क्र. १८८०
तुम्हा आम्हा तुटी होईल यावरी । ऐसे मज हरी दिसतसे ॥१॥
वचनाचा काही न देखो आधार । करावा हा धीर कोठवरी ॥धृपद॥
सारिले संचित होते गाठी काही । पुढे ॠण ते ही नेदी कोणी ॥२॥
जावेचि न लगे कोणांचिया घरा । उडाला पातेरा तुझ्या संगे ॥३॥
तुका म्हणे आम्हा हाचि लाभ जाला । मनुष्यधर्म गेला पांडुरंगा ॥४॥
अर्थ

हे हरी तुम्ही जर आमच्या सेवेचे मोल आम्हाला दिले नाही तर आपली ताटातूट होईल असेच मला दिसत आहे. देवा आम्ही तुमच्याशी बोलतो आणि तुम्ही काही त्याला प्रत्युत्तर देत नाही मग तुमच्या बोलण्याचा तरी आधार कोठ पर्यंत धरावा आणि आम्ही आमचा धीर कुठ पर्यंत धरावा ते तुम्ही सांगा. माझ्या पदरात जेवढे पूर्व पुण्याचे संचीत धन होते ते सर्व संपले आता यापुढे मला कोणी ऋण देणार नाही. देवा आता आम्हाला कोणाच्या घरी जाण्याची सुद्धा मुबा राहिली नाही कारण मी तुमच्या नादाला लागलो आणि आमचा सगळा पातेरा म्हणजे इज्जतीचा बोजावारा उडाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या नादी लागून आम्हाला हाच लाभ झाला की आता आमचा मनुष्यधर्म गेला म्हणजे आम्ही ब्रम्‍हरूपच झालो पांडुरंगा. (या अभंगात तुकाराम महाराजांनी देवाची स्तुतीच केलेली आहे. )

अभंग क्र. १८८१
देव मजुर देव मजुर । नाही उजुर सेवेपुढे ॥१॥
देव गांढ्याळ देव गांढ्याळ । देखोनिया बळ लपतसे ॥२॥
देव वर काई देवतर काई । तुका म्हणे राई तरी मोठी ॥३॥
अर्थ

अर्थ:–देव भक्तांचा मजूर आहे. त्याने भक्तांकडून सेवारूपी वेतन घेतले असल्यामुळे त्याला भक्तांची सेवा करण्याविषयी ‘ हो, नाही ‘ अशी कोणतीच सबब सांगता येत नाही. देव, मोठा भित्रा व नामर्द आहे. कारण, भक्तांचे भावबळ पाहून तो लपून बसतो. तुकाराम महाराज म्हणतात, देव केवढा आहे म्हणता ! एखादी मोहरी तरी मोठी असेल इतका तो सूक्ष्म आहे.

अभंग क्र. १८८२
देव दयाळ देव दयाळ । साहे कोल्होळ बहुतांचा ॥१॥
देव उदार देव उदार । थोड्यासाठी फार देऊ जाणे ॥२॥
देव चांगला देव चांगला । तुका लागला चरणी ॥३॥
अर्थ

देव फार दयाळू आहे फारच दयाळू आहे कारण तो पुष्कळ भक्तांचा कोल्हाळ घराणे सहन करतो. देव उदार आहे फारच उदार आहे त्याची थोडी जरी सेवा केली तर जास्तीत जास्त भक्तांना कसे दान द्यावे हे त्याला समजते. तुकाराम महाराज म्हणतात देव फारच चांगला अगदीच फार चांगला आहे म्हणूनच मी त्याच्या चरणाला लागलो आहे

अभंग क्र. १८८३
देव बासर देव बासर । असे निरंतर जेथे तेथे ॥१॥
देव खोळंबा देव खोळंबा । मज झळंबा म्हूण कोंडी ॥धृपद॥
देव लागट देव लागट । लाविलिया चट जीवी जडे ॥२॥
देव बावळा देव बावळा । भावे जवळा लुडबुडी ॥३॥
देव न व्हावा देव न व्हावा । तुका म्हणे गोवा करी कामी ॥४॥
अर्थ

देव बासर आहे म्हणजे देव कोणत्याही प्रकारची मर्यादा धरून राहत नाही तो जिथे आपण पाहू तेथे नेहमी वास करत असतो. देव स्वतः तर काही करत नाही परंतु त्याने आम्हाला खोळंबा निर्माण केला तो म्हणजे त्याच्या नामाचा छंद लावुन, त्यामुळे आम्हाला त्रास होतो त्यामुळे आम्ही त्याला आमच्या हृदयातच कोंडून ठेवले आहे. देव फार लोचट आहे फारच लोचट आहे कारण एकदा भक्तांनी त्यांच्या भक्तीची सवय, चटक, आवड या देवाला लावली की तो त्यांच्या हृदयातच वास्तव्य करतो. देव फार बावळा आहे फारच बावळा आहे कारण भक्तांची भक्ती भाव बघून त्यांच्याजवळ उगाच लुडबुड करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात मला देव नको कारण हा देव त्याचेच वेड लावतो आणि त्याच्या छंदात आम्हाला रहावसे वाटते त्यामुळे आम्हाला संसारात कोणत्याही प्रकारचे लक्ष देता येत नाही.

अभंग क्र. १८८४
देव निढळ देव निढळ । मूळ नाही डाळ परदेशी ॥१॥
देव अकुळी देव अकुळी । भलते स्थळी सोयरीक ॥२॥
देव लिगाड्या देव लिगाड्या । तुका म्हणे भाड्या दंभे ठकी ॥३॥
अर्थ

देव फुटक्या कपाळाचा आहे याला कोणत्याही प्रकारचे मुळ नाही हा परदेशीच आहे. देव अकुळी आहे म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचे कुळ नाही त्यामुळे त्याची कोणत्याही भक्तांशी सोयरिक होते. तुकाराम महाराज म्हणतात देव मोठे लचांड घेणारा आहे तो भक्तांकडून सेवा रुपी भाडे घेतो आणि त्याचा दंभ दाखवून भक्तांना फसवतो.

जून नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading