आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

३१ जानेवारी, दिवस ३१, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा, ओवी १०१ ते १२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३६१ ते ३७२
“३१ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 31 January
राम कृष्ण हरी आज दिनांक ३१ जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
101-3
इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यंते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङक्ते स्तेन एव सः ॥3. 12॥
भावार्थ :-
स्वधर्माचे आचरण केल्याने (यज्ञाने) तृप्त झालेले देव तुम्हाला प्रिय व हितकर भोग्य वस्तू देतील. त्यांनी दिलेल्या भोग्य वस्तू देवाला समर्पण न करता जो त्याचा उपभोग घेतो (घेईल), तो चोर समजावा.
तैसे सर्व सुखेंसहित । दैवचि मूर्तिमंत । येईल देखा काढत । तुम्हापांठी ॥101॥
पाहा, त्याप्रमाणे सर्वसुखासह मूर्तिमंत भाग्यच तुमचा मार्ग शोध करीत-करीत तुमच्या पाठीमागे येईल.
102-3
ऐसे समस्त भोगभरित । होआल तुम्ही अनार्त । जरी स्वधर्मैकनिरत । वर्ताल बापा ॥102॥
अशा रीतीने बाबांनो, जर तुम्ही एकनिष्टपणाने स्वधर्माचे आचरण कराल, तर सर्व ऐश्वर्याने तृप्त होऊन तुमच्या मनात विषयांची इच्छा राहणार नाही.
103-3
का जालिया सकल संपदा । जो अनुसरेल इंद्रियमदा । लुब्ध होऊनिया स्वादां । विषयांचिया ॥103॥
याउलट, सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होऊन देखील जो विषयांच्या गोडीला लुब्ध होऊन उन्मत्त इंद्रियांच्या सांगण्याप्रमाणे वागेल; आणि
104-3
तिही यज्ञभाविकी सुरी । जे हे संपत्ति दिधली पुरी । तया स्वमार्गी सर्वेश्वरी । न भजेल तो ॥104॥
यज्ञानी संतुष्ट झालेल्या त्या देवांनी जी ही पूर्ण संपत्ती दिली आहे, त्या संपत्तीच्या द्वारा जो स्वधर्माने ईश्वराला भजणार नाही,
105-3
अग्निमुखी हवन । न करील देवतापूजन । प्राप्त वेळे भोजन । ब्राह्मणांचे ॥105॥
जो अग्नीच्या मुखात हवन करणार नाही, देवतापूजन करणार नाही, यथाकाळी परमार्थाच्या मार्गावरून वाटचाल करणाऱ्यास (ब्राम्हनांस) जो भोजन देणार नाही,
106-3
विमुखु होईल गुरुभक्ती । आदरु न करील अतिथी । संतोषु नेदील ज्ञाती । आपुलिये ॥106॥
जो गुरुभक्ती करणार नाही, अंतःकरणापासून अतिथींचा आदर करणार नाही, मानवजातीला संतोष देणार नाही,
107-3
ऐसा स्वधर्मक्रियारहितु । आथिलेपणे प्रमत्तु । केवळ भोगासक्तु । होईल जो ॥107॥
अशा प्रकारे जो स्व धर्माचे आचरण करणार नाही, जो सम्पन्नतेमुळे उन्मत्त होऊन केवळ विषयभोगांमध्ये आसक्त होईल,
108-3
तया मग अपावो थोरु आहे । जेणे ते हातीचे सकळ जाये । देखा प्राप्तही न लाहे । भोग भोगू ॥108॥
त्याला मोठमोठे अपाय होतील. त्यामुळे त्याच्याजवळ असलेले सर्व ऎश्वर्य नाहीसे होईल. त्याला प्राप्त असलेले भोगही तो भोगू शकणार नाही.
109-3
जैसे गतायुषीं शरीरी । चैतन्य वासु न करी । का निदैवाचा घरी । न राहे लक्ष्मी ॥109॥
जसे आयुष्य संपलेल्या शरीरात जीवात्मा राहत नाही किंवा दैवहीन माणसाच्या घरात लक्ष्मी राहत नाही,
110-3
तैसा स्वधर्मु जरी लोपला । तरी सर्व सुखांचा थारा मोडला । जैसा दीपासवे हरपला । प्रकाशु जाय ॥110॥
ज्याप्रमाणे दिवा मालविला की प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे स्वधर्म जर लोप पावला, तर सुखाचा प्रकाश नाहीसा होऊन दुःखाचा अंधकार पसरतो.
111-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तैसी निजवृत्ति जेथ सांडे । तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे । आइका प्रजाहो हे फुडे । विरंचि म्हणे ॥111॥
याप्रमाणे जो स्वधर्मचा त्याग करतो, त्याचे स्वातंत्र्य नष्ट होते. प्रजाजन हो ! हे नीट ऐका (समजून घ्या), असे ब्रम्हदेव म्हणाले.
112-3
म्हणऊनि स्वधर्मु जो सांडील । तयाते काळु दंडील । चोरु म्हणूनि हरील । सर्वस्व तयांचे ॥112॥
म्हणून स्वधर्मचा जो त्याग करील, त्याला काळच शिक्षा करील आणि हा चोर आहे, असे जाणून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल.
113-3
मग सकळ दोष भंवते । गिंवसोनि घेती तयाते । रात्रिसमयी स्मशानाते । भूते जैशी ॥113॥
रात्र झाली की, ज्याप्रमाणे पिशाच्य स्मशान व्यापून टाकतात, त्याप्रमाणे सर्व पापे अशा माणसाला पछाडतात.
114-3
तैशी त्रिभुवनींची दुःखे । आणि नानाविध पातके । दैन्यजात तितुके । तेथेचि वसे ॥114॥
त्याप्रमाणे त्रिभुवनातील विविध दुःखे, नाना तऱ्हेची पातके, सर्व दारिद्रे त्या स्वधर्माने न वागणाऱ्या माणसाजवळ राहतात.
115-3
ऐसे होय तया उन्मत्ता । मग न सुटे बापां रुदता । परी कल्पांतीही सर्वथा । प्राणिगण हो ॥115॥
प्रजाजन हो ! याप्रमाणे त्या उन्मत्त माणसाला दुःख भोगावे लागते. बाबांनो ! त्याने कितीही आक्रोश केला, तरी कल्पाच्या अंतापर्यंतदेखील (युगा) त्याची त्यातून सुटका होत नाही.
116-3
म्हणोनि निजवृत्ति हे न संडावी । इंद्रिये बरळो नेदावी । ऐसे प्रजांते शिकवी । चतुराननु ॥116॥
म्हणून स्वधर्म आचरण सोडू नये आणि इंद्रियांना भलत्याच मार्गाने जाऊ देऊ नये. याप्रमाणे ब्रम्हदेव प्रजेला समजावून सांगू लागले.
117-3
जैसे जळचरा जळ सांडे । आणि तत्क्षणी मरण मांडे । हा स्वधर्मु तेणे पाडे । विसंबों नये ॥117॥
ज्याप्रमाणे एखाद्या (जलचर प्राणी) माश्याला पाण्याचा वियोग झाला की त्याच क्षणी मरण येते त्यप्रमाणे स्वधर्माचरणाच्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो, म्हणून त्याने स्वधर्म कधीहि सोडू नये.
118-3
म्हणोनि तुम्ही समस्ती । आपुलालिया कर्मी उचिती । निरत व्हावे पुढतपुढती । म्हणिपत असे ॥118॥
म्हणून तुम्ही सर्वानी आपल्या स्वधर्माप्रमाणे निरंतर कर्मे करावीत, हे मी पुनः पुनः सांगत आहे, असे ब्रम्हदेव म्हणाले.
119-3
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यते सर्वकिल्बिषैः ।
भुङजते ते त्वघं पापा ये पचंत्यात्मकारणात् ॥3. 13॥
भावार्थ :-
यज्ञातील शेष राहिलेले अन्न खाणारे महान पुरुष सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतात. आणि जे पापी लोक आपल्या शरीर पोषणाकरताच भोजन करतात, ते तर अन्नाच्या रूपाने केवळ पापच भक्षण करत असतात.
देखा विहित क्रियविधी । निर्हेतुका बुद्धी । जो असतिये समृद्धी । विनियोगु करी ॥119॥
पाहा, जो विहित कर्म अनासक्त बुद्धीने करतो आणि आपल्या संपत्तीचा विनियोग स्वधर्मासाठी करतो,
120-3
गुरु गोत्र अग्नि पूजी । अवसरी भजे द्विजी । निमितादिकी यजी । पितरोद्देश ॥120॥
जो गुरूंची मनोभावे सेवा करतो, स्वगोत्रातील लोकांवर उपकार करतो, अग्नीची पूजा करतो, योग्य प्रसंगी ब्राम्हणांची सेवा करतो आणि पितरांच्या करिता श्राद्धादि नैमित्तिक कर्मे करतो;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-3
या यज्ञक्रिया उचिता । यज्ञेशी हवन करिता । हुतशेष स्वभावतः । उरे जे जे ॥121॥
या सर्व विहित, उचित अशा यज्ञाकर्माच्या रूपाने यज्ञभोक्ता ईश्वराच्या ठिकाणी हवन करून जे जे यज्ञशेष सहज राहील,
122-3
ते सुखे आपुला घरी । कुटुंबेसी भोजन करी । की भोग्यचि ते निवारी । कल्मषाते ॥122॥
ते सुखा-समाधानाने जो कुटुंबासह सेवन करतो; त्या सेवणामुळेच त्याची सर्व पापे नाहीसे होतात.
123-3
ते यज्ञावशिष्ट भोगी । म्हणोनि सांडिजे तो अधी । जयापरी महारोगी । अमृतसिद्धी ॥123॥
ज्याप्रमाणे अमृताच्या सेवनाने महारोग नाहीसे होतात, त्याप्रमाणे यज्ञातील अवशेष जो भोगतो (किंवा त्याचे सेवन जो करतो) त्याची सर्व पातके (दुःख) नाहीसे होतात.
124-3
का तत्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा । तो शेषभोगी तैसा । नाकळे दोषा ॥124॥
अथवा ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ माणसाला भ्रांतीपासून यत्किंचितही बाधा होत नाही, त्याप्रमाणे यज्ञशेष सेवन करणारा पापाच्या तडाख्यात सापडत नाही. (करणाऱ्यास दोष लागत नाही)
125-3
म्हणोनि स्वधर्मे जे अर्जे । ते स्वधर्मेचि विनियोगिजे । मग उरे ते भोगिजे । संतोषेंसी ॥125॥
म्हणून स्वधर्माच्या आचरणाने जे मिळेल, त्याचा विनियोग (खर्च करावे) स्वधर्मासाठीच करावा. मग जे शिल्लक राहील, त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा.
दिवस ३१ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३६१ ते ३७२
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 361
नये जरी काही । तरी भलतेचि वाही ॥१॥
म्हणविल्या दास । कोण न धरी वेठीस ॥धृपद॥
समर्थाच्या नावे । भलतैसे विकावे ॥२॥
तुका म्हणे सत्ता । वरी असे त्या बहुता ॥३॥
अर्थ
तुला कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसेल तरी चालेल, मी हरीचा दास आहे असे जरी तू म्हटले तरी तुला जन्म मृत्यूचा कोणीही वेठीस धरणार नाही. कारण श्री हरीचे नाम हे समर्थ आहे व त्याचे नांव घेतले तर मग कोणताही माल म्हणजे कोणताही मनुष्य जन्म मृत्यूच्या तावडीतून सुटतो. तुकाराम महाराज म्हणतात त्या समर्थाची सत्ता सर्वावर असते.
अभंग क्र. 362
न संडवे अन्न । मज न सेववे वन ॥१॥
म्हणउनी नारायणा । कीव भाकितो करुणा ॥धृपद॥
नाही अधिकार । काही घोकाया अक्षर ॥२॥
तुका म्हणे थोडे । आयुष्य अवघेचि कोडे ॥३॥
अर्थ
अन्नाचा त्याग करणे व वैराग्याने वनात जाऊन राहणे हे मला शक्य होत नाही. म्हणून हे नारायणा मी तुला अति करून तेणे तुला शरण आलो आहे. वेदाअक्षरं पठण करण्याचा अधिकार मला नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा आयुष्य थोडे आहे आणि अडचणी फार आहेत.
अभंग क्र. 363
एकाची उत्तरे । गोड अमृत मधुरे ॥१॥
ऐशा देवाच्या विभुती । भिन्न प्रारब्धाची गती ॥धृपद॥
एकाची वचने । कडु अत्यंत तीक्षणे ॥२॥
प्रकाराचे तीन । तुका म्हणे केले जन ॥३॥
अर्थ
संत तुकाराम महाराज म्हणतात देवा एका माणसाचे उत्तरे अर्थात बोलणे हे एक प्रकारचं गोड असं अमृतच आहे, असे हे गोड मधूर बोलणारे लोक भगवंताच्या विभूती आहेत, कारण प्रत्येकाची प्रारब्ध गती ही भिन्न भिन्न असते, तसे पहात गेलो तर एकाचे बोलणे, त्याचे वचन अत्यंत कडू आणि तीक्ष्ण असते, आणि खरंच जर पाऊस असाल तर या सृष्टीमधील तीन प्रकारचे लोक देवाने तयार केलेले आहेत सत्वगुणी, रजिगुणी, आणि तमोगुनी.
अभंग क्र. 364
वचने ही नाड । न बोले ते मुके खोड ॥१॥
दोही वेगळे ते हित । बोली अबोलणी नीत ॥धृपद॥
अंधार प्रकाशी । जाय दिवस पावे निशी ॥२॥
बीज पृथिवीच्या पोटी । तुका म्हणे दावी दृष्टी ॥३॥
अर्थ
ज्यादा बोलणे हे हि चांगले नाही व कमी बोलणे हे चांगले नाही कारण ज्यादा बोलल्यावर लोक त्याला वाचाळ म्हणतात व न बोलल्यास लोक त्याला मुका म्हणतात. म्हणून या पेक्षा भिन्न जे आपले स्वरुपबोध यातून बोलणे हे योग्य. सकाळी सूर्योदयाच्या आगोदरचा अंधार व संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर चा अंधार हे दोन्ही सारखेचतसे मौन आणि बोलने हे एकमेकांत अशाप्रकारे जाते. तुकाराम महाराज म्हणतात बीज पृथ्वीच्या पोटात असते व त्यापासून वृक्षाची निर्मिती होते पण बीज आणि वृक्ष या दोघामध्ये पृथ्वी समान आहे.
अभंग क्र. 365
विचारावाचून । न पविजे समाधान ॥१॥
देह त्रिगुणाचा बांधा । माजी नाही गुण सुदा ॥धृपद॥
देवाचिये चाडे । देवा द्यावे जे जे घडे ॥२॥
तुका म्हणे होते । बहु गोमटे उचिते ॥३॥
अर्थ
विचारा वाचून समाधान प्राप्त होत नाही. विचार करताना हा देह त्रिगुणा पासून तयार झालेला आहे कोणताही गुण परमार्थ करण्यास अनुकूल नाही हा विचार करावा. त्यामुळे कोणतेही कर्म केलेले असो ते कर्म देवाला अर्पण करावे. तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे आपण कोणतेही कर्म देवाला अर्पण केले तर ते कर्म योग्य आणि उचित ठरते.
अभंग क्र. 366
तुटे भवरोग । संचितक्रियमाणभोग ॥१॥
ऐसे विठोबाचे नाम । उच्चारिता खंडे जन्म ॥धृपद॥
वसो न सके पाप । जाय त्रिविध तो ताप ॥२॥
तुका म्हणे माया । होय दासी लागे पाया ॥३॥
अर्थ
एक विठोबा चे नाम असे आहे या नामाने भव रोगापासून आपल्याला सुटका करता येते संचित प्रारब्ध आणि क्रियमाण यांच्यापासून होणाऱ्या भोगाचाही त्यामुळे नाश होतो. असे हे विठोबाचे नाम पवित्र आहे त्याचे उच्चार केले असता जन्ममरण रुपी बाधा खंड ते. विठोबाचे नामस्मरण केल्यामुळे त्रिविध तापाचे नाश होतो व कोणत्याही प्रकारचे पाप होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात विठोबाचे नामस्मरण इतके अवर्णनीय आहे कि ते सर्व जगाला भुलविणारी माया जे कोणी विठोबाचे नामस्मरण करतात ती माया त्याच्या चरणांची दासी होते.
अभंग क्र. 367
मुसावले अंग । रंगी मेळविला रंग ॥१॥
एकी एक दृढ जाले । मुळा आपुलिया आले ॥धृपद॥
सागरी थेंबुटा । पडिल्या निवडे कोण्या वाटा ॥२॥
तुका म्हणे नवे । नव्हे जाणावे हे देवे ॥३॥
अर्थ
देवा माझे सर्वांग हे ब्रम्हभावाने रंगून गेले आहे कारण माझ्या जीवाचा रंग आत्मत्वा मध्ये मिळवला आहे. जीव आणि शिव हे दोन्ही एकमेकात समरस झाले आहेत. जसे सागरांमध्ये एक थेंब पाणी पडल्यावर ते वेगळे काढता येणार नाही त्याप्रमाणे हे जीव ब्रम्हाशी ऐक्य झाल्यामुळे हे आता वेगळे होणे अशक्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे काही नवीन आहे असे तुम्ही समजू नये कारणहे तुम्हाला माहीत आहे की जीव आणि शिव हे दोन्ही मूळचेच ऐक्य रूप आहे.
अभंग क्र. 368
अनुतापे दोष । जाय न लगता निमिष ॥१॥
परि तो राहे विसावला । आदी अवसानी भला ॥धृपद॥
हेचि प्रायिश्चत । अनुतापी न्हाय चित्त ॥२॥
तुका म्हणे पापा । शिवो नये अनुतापा ॥३॥
अर्थ
याअगोदर झालेल्या वाईट कर्माचा पश्चाताप आला कि त्या पापाचे निवृत्ती एक क्षणही वयाला न जाता होते. पण तो पश्चाताप आपण असे पर्यंत टिकून राहिला पाहिजे तरच चांगले. अशा अनुतापामध्ये मनाला स्नान घडले पाहिजे मग ते झालेले प्रायश्चित्त खरे असते. तुकाराम महाराज म्हणतात अनुताप (केलेल्या वाईट कर्माविषयी झालेले प्रायश्चित्त) ज्यावेळेस होते त्यावेळेला पाप मनाला शिवत नाही.
अभंग क्र. 369
चहू आश्रमांचे धर्म । न राखता जोडे कर्म ॥१॥
तैसी नव्हे भोळी सेवा । एक भावचि कारण देवा ॥धृपद॥
तपे इंद्रिया आघात । क्षणे एका वाताहात ॥२॥
मंत्र चळे थोडा । तरि धडचि होय वेडा ॥३॥
व्रत करिता सांग । तरी एक चुकता भंग ॥४॥
धर्म धर्मा सत्त्वचि कारण । नाही तरी केला सिण ॥५॥
भूतदयेसि आघात । उंचनिच पाहे चित्त ॥५॥
तुका म्हणे दुजे । विधिनिषेधाचे ओझे ॥॥
अर्थ
चारीआश्रमांना जे ठरवून दिलेले विहित कर्म आहेत ते जर व्यवस्थित पार पडले नाही किंवा केले नाही तर काहीही उपयोग होत नाही. पण जर भगवंताविषयी भोळी सेवा केली तर तशी ती फार कठीण नाही तेथे फक्त भगवंताविषयी भक्ति भाव हवा आहे. अनेक वर्ष तपे करावी आणि जरी इंद्रियनिग्रह न करावा तर हजारो वर्षांची केलेली तपश्चर्या एका क्षणात वाताहात होते. वेदमंत्र उच्चार करतान त्या काही थोडी जरी चूक झाली तर मग तो कितीही शहाणा असेल तरी तो वेडा ठरला जातो अशी भीती तेथे असते. अनेक कर्मे केली पण एखाद्या वेळीचूक आढळली तर मागील सर्व व्रते भंगतात. कोणतेही धर्मकार्य करण्यास सत्व गुण आवश्यक असते नाही तर व्यर्थ शिन होतो. भूत दया करावयास गेले आणि हा लहान हा मोठा व भेद केला तर त्या भूत दयेवर आघात होतो. तुकाराम महाराज म्हणतात हरी भक्ती जर सोडली तर इतर सर्व मार्गा मध्ये विधिनिषेधाचे ओझे आहे.
अभंग क्र. 370
सोडिला संसार । माया तयावरी फार ॥१॥
धावत चाले मागे मागे । सुखदुःख साहे अंगे ॥धृपद॥
याने घ्यावे नाम । तीसीकरणे त्याचे काम ॥२॥
तुका म्हणे भोळी । विठ्ठल कृपेची कोवळी ॥३॥
अर्थ
ज्याने देवा करतात संसार सोडला त्याच्यावर देवाचे अत्यंत माया असते. अशा भक्तांकरिता देव स्वतः त्यांच्या मागे-पुढे त्यांचे रक्षण करण्याकरता राबत असतो त्यांच्यावर होणारे हे सर्व सुख दुखः आपल्या अंगावर देव घेत असतो. या भक्ताने त्या देवाचे नामस्मरण करत राहावा आणि त्या देवाने या भक्तांचे सर्व काम करीत राहावा असा प्रकार आहे. तुकाराम महाराज म्हणतात श्री विठ्ठल माऊली हि फार भोळी आहे आणि ती तिच्या भक्तांवर कृपा करण्यासाठी फार कोवळी आहे.
अभंग क्र. 371
बैसू खेळू जेवू । तेथे नाम तुझे गाऊ ॥१॥
रामकृष्णनाममाळा । घालू ओवुनिया गळा ॥धृपद॥
विश्वास हा धरू । नाम बळकट करू ॥२॥
तुका म्हणे आता । आम्हा जीवन शरणागता ॥३॥
अर्थ
आम्ही जेथे जेथे जेवू-खाऊ खेळु कोणतेही कर्म करत राहू तेथे तुझे नाम घेत जाऊ. रामकृष्ण नामाची माळ आम्ही आमच्या गळ्यात म्हणजे कंठात घालू. हे नांव आम्हाला तारणारे आहे हा विश्वास मनात धरून आम्ही तुझे नाम अखंड घेण्यासाठी आजून दृढनिश्चय करू. तुकाराम महाराज म्हणतात आम्हा शरणागतांना जीवनात तुझे नाम घेणे आता एवढेच काम आहे.
अभंग क्र. 372
पाटी पोटी देव । कैचा हरीदासा भेव ॥१॥
करा आनंदे कीर्तन । नका आशंकितमन ॥धृपद॥
एथे कोठे काळ । करील देवापाशी बळ ॥२॥
तुका म्हणे धनी । सपुरता काय वाणी ॥३॥
अर्थ
मागेपुढे देव असताना मग भक्तांना कसले भय आले ? म्हणूनच तुम्ही आनंदाने हरिकीर्तन करा कोणत्याही प्रकारचे भय किंवा शंका मनात धरू नका. देव आपल्या सोबत असल्यावर मग काळाचे काय सामर्थ्य चालणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला आमचा धनी पूर्णपणे समर्थ असल्यावर आम्हाला कसली कमतरता आहे ?
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















