आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२७ नोव्हेंबर, दिवस ३३१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १०५१ ते १०७५ + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३९६१ ते ३९७२
“२७ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 27 November
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २७ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
२७ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १०५१ ते १०७५ ,
1051-18
जो न मोकली मारुनी । जीवो नेदी उपजवोनि । विचंबवी खोडा घालुनी । हाडांचिया ॥1051॥
जो अहंकार, मनुष्याला मारूनही टाकीत नाही किंवा सुखाने जगू ही देत नाही; तर, देहरूपी अस्थिपंजरांत जीवाला अडकवून त्याची कुचंबणा मात्र करितो. 51
1052-18
तयाचा देहदुर्ग हा थारा । मोडूनि घेतला तो वीरा । आणि बळ हा दुसरा । मारिला वैरी ॥1052॥
त्या अहंकाराचे वसतिस्थान जो देहरूप किल्ला तो हस्तगत करून घेतो, (देहबुद्धिबाधित करितो) व दुसरा वैरी जो (बल) त्याचाही नाश करतो. 52
1053-18
जो विषयाचेनि नांवे । चौगुणेही वरी थांवे । जेणे मृतावस्था धावे । सर्वत्र जगा ॥1053॥
जो बलरूप शत्रु, विषयाचे नुसते नांव घेतांच चौपटीपेक्षां वाढतो, व ज्याच्या योगे सर्व जगाला मृतावस्था प्राप्त होते. 53
1054-18
तो विषय विषाचा अथावो । आघविया दोषांचा रावो । परी ध्यानखड्गाचा घावो । साहेल कैचा ? ॥1054॥
तो बलरूपी शत्रु विषयरूपी विषांचा डोह असून सर्व दोषांचा राजा आहे, तरीही ध्यानरूपी तलवारीचा वार सहन करण्याचे त्याला सामर्थ्य कोठले असणार ? 54
1055-18
आणि प्रिय विषयप्राप्ती । करी जया सुखाची व्यक्ती । तेचि घालूनि बुंथी । आंगी जो वाजे ॥1055॥
आणि (दर्प) आवडीच्या विषयाची प्राप्ति झाली म्हणजे त्याला जे सुख होते, त्या सुखाचीच खोळ अंगावर घेऊन जो बढाई मारू लागतो. 55
1056-18
जो सन्मार्गा भुलवी । मग अधर्माच्या आडवी । सूनि वाघा सांपडवी । नरकादिका ॥1056॥
ज्याने सन्मार्गाचे आकलन होऊ शकत नाही व जो अधर्माच्या अरण्यात नेऊन नरकरूपी व्याघ्रांच्या जबड्यात अचुक नेऊन घालतो, 56
1057-18
तो विश्वासे मारिता रिपु । निवटूनि घातला दर्पु । आणि जयाचा अहा कंपु । तापसांसी ॥1057॥
असा विश्वास देऊन घात करणारा वैरी जो दर्प त्याचे निर्दालन केले; आणि (काम) ज्याचे नांव ऐकताच तपस्व्यांनाही भीतीने कंप सुटतो. 57
1058-18
क्रोधा ऐसा महादोखु । जयाचा देखा परिपाकु । भरिजे तव अधिकु । रिता होय जो ॥1058॥
व ज्या कामाचे पर्यवसान अखेर क्रोधासारख्या महादोषांत होते व ज्याचा स्वभाव असा आहे की त्याची जो जो पूर्ती करावी तो तो त्याची तृष्णा वाढतच जाते. 58
1059-18
तो कामु कोणेच ठायी । नसे ऐसे केले पाही । की तेचि क्रोधाही । सहजे आले ॥1059॥
अशा त्या कामाचे ज्याने समूळ निर्दालन केले आहे व ज्या कारणनाशामुळे त्याचे कार्य जो क्रोध त्याचीही सहज तीच गति झाली. 59
1060-18
मुळाचे तोडणे जैसे । होय का शाखोद्देशे । कामु नाशलेनि नाशे । तैसा क्रोधु ॥1060॥
वृक्षाचं मूळ तोडण्यात शाखांनी मरावे हा हेतु असतो. तसा कामाच्या नाशाने त्याच्या शाखेसारखा असलेला क्रोधही नाश पावतो. 1060
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1061-18
म्हणौनि काम वैरी । जाला जेथ ठाणोरी । तेथ सरली वारी । क्रोधाचीही ॥1061॥
म्हणून जेथे काम ह्या शत्रूचा नाश होऊन गेला, तेथे क्रोधाची येरझार सहजच बंद पडणार. 61
1062-18
आणि समर्थु आपुला खोडा । शिसे वाहवी जैसा होडा । तैसा भुंजौनि जो गाढा । परीग्रहो ॥1062॥
(परिग्रह) आणि ज्याप्रमाणे खोड्याची शिक्षा ज्याला द्यावयाची असेल, त्याजकडूनच डोक्यावर तो खोडा अधिकारी निश्चयैकरून वाहवितात, त्याप्रमाणे जीवांना भोग देऊनच पुन्हा त्या भोगेच्छेच्या पायी त्यांना संकटांत टाकणारा असा परिग्रह हा गाढा शत्रु आहे. 62
1063-18
जो माथांचि पालाणवी । अंगा अवगुण घालवी । जीवे दांडी घेववी । ममत्वाची ॥1063॥
त्याप्रमाणे हा परिग्रह आपले खोगीर जीवांच्या माथ्यावर ठेवून, त्याच्यात अनेक अवगुण उत्पन्न करितो व त्यांना हातात ममत्वाची काठी टेक्यासाठी घ्यावयास लावित. 63
1064-18
शिष्यशास्त्रादिविलासे । मठादिमुद्रेचेनि मिसे । घातले आहाती फांसे । निःसंगा जेणे ॥1064॥
हा शिष्य समुदाय माझा, हे ग्रंथ माझे, असा अभिनिवेशाचा खेळ खेळून, त्याचप्रमाणे, हा मठ माझा येथे योगाभ्यास होतो, वगैरे मिशानी हा परिग्रहशत्रु निःसंग अशा वैराग्यशील जीवांनाही फशी पाडतो. 64
1065-18
घरी कुटुंबपणे सरे । तरी वनी वन्य होऊनि अवतरे । नागवीयाही शरीरे । लागला आहे ॥1065॥
कुटुंबीयांच्या त्यागने तेथील परिग्रहादि व्यवहार संपला, तरी वनांत गेल्यावर वन्य पदार्था विषय ममत्व उत्पन्न करितो. अशाप्रकारेंत्याने अगद उघडचा नागड्या लोकांनाही सोडले नाही. 65
1066-18
ऐसा दुर्जयो जो परीग्रहो । तयाचा फेडूनि ठावो । भवविजयाचा उत्साहो । भोगीतसे जो ॥1066॥
अस दुर्जय जो परिग्रह शत्रू त्याचा पार नायनाट करून ज्याने संसार अजूवर विजय मिळविण्याचा उत्साह चित्तांत धरिला आहे. 66
1067-18
तेथ अमानित्वादि आघवे । ज्ञानगुणाचे जे मेळावे । ते कैवल्यदेशीचे आघवे । रावो जैसे आले ॥1067॥
अशा स्थितांत, त्याच्या भेटीला अमानित्वादि ज्ञानगुणांचे समुदाय हेच कोणी जणु मोक्षदेशाचे मांडलिक राजे त्याजपाशी येतात. 67
1068-18
तेव्हा सम्यक्ज्ञानाचिया । राणिवा उगाणूनि तया । परिवारु होऊनिया । राहत आंगे ॥1068॥
व त्या साधकाला यथार्थ ब्रह्मात्मैक्यज्ञान हेच एक सार्वभौमराज्य अर्पण करून अमानित्वादि गुण आपण स्वतः त्याचे सेवक होऊन रहातात. 68
1069-18
प्रवृत्तीचिये राजबिदी । अवस्थाभेदप्रमदी । कीजत आहे प्रतिपदी । सुखाचे लोण ॥1069॥
तो साधक प्रवृत्तीच्या राजमार्गाने आक्रमण करीत असता, जाग्रदादि तीन अवस्थारूपी प्रमदा (तरुण स्त्रिया) त्याजवरून पदोपदी सुखाचे निबलोण उतरून टाकितात. 69
1070-18
पुढा बोधाचिये कांबीवरी । विवेकु दृश्याची मांदी सारी । योगभूमिका आरती करी । येती जैसिया ॥1070॥
अशा त्या साधक सार्वभौमापुढे, विवेकरूप चोपदार हातातील बोधरूप दंडाने दृश्याची गर्दी मोडीत चालतो. (दृश्याचा बाध करितो) व योगभूमिका जणू त्यास आरती घेऊनच सामोऱ्या येतात. 1070
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1071-18
तेथ ऋद्धिसिद्धींची अनेगे । वृंदे मिळती प्रसंगे । तिये पुष्पवर्षीं आंगे । नाहातसे तो ॥1071॥
त्याप्रसंगी, ऋद्धिसिद्धींचे अनेक समुदाय तेथे प्राप्त होतात व त्यांनी केलेल्या पुष्पवृष्टीने तो जणू काही स्नानच करीत असतो. 71
1072-18
ऐसेनि ब्रह्मैक्यासारिखे । स्वराज्य येता जवळिके । झळंबित आहे हरिखे । तिन्ही लोक ॥1072॥
ह्याप्रमाणे, ब्रम्हैक्यज्ञानासारखा स्वराज्यप्राप्तीच योग जवळ येत असता त्याचा हर्ष त्रिभुवनात मावत नाही. 72
1073-18
तेव्हा वैरिया का मैत्रिया । तयासि माझे म्हणावया । समानता धनंजया । उरेचिही ना ॥1073॥
तशा स्थितीत हा माझा शत्रु, हा माझा मित्र, किंवा दोघे सारखेच इतके म्हणण्यापुरतेही त्याच्यापुढे द्वैत उरत नाही. 73
1074-18
हे ना भलतेणे व्याजे । तो जयाते म्हणे माझे । ते नोडवेचि का दुजे । अद्वितीय जाला ॥1074॥
इतकेच नव्हे तर, कोणत्याही निमित्ताने त्याने ज्याला “माझे “ असे म्हणावे, एवढे देखील द्वैतपणाने (सत्यत्वाने) त्याच्यापुढे उरत नाही. कारण, तो अद्वितीय ब्रह्मरूपच झालेला असतो. 74
1075-18
पै आपुलिया एकी सत्ता । सर्वही कवळूनिया पंडुसुता । कही न लगती ममता । धाडिली तेणे ॥1075॥
त्याच्या सर्वात्मभावापुढे विश्वाला पृथक् अशी सत्ताच उरत नसल्याने ममत्वाला कोठे अवसरच नसतो; मग ममता उरणारच कशी ? 75
दिवस ३३१ वा. २७, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३९६१ ते ३९७२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
दिवस ३३१ वा. २७, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३९६१ ते ३९७२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३९६१
आणिका उपदेशूं नेणे नाचो आपण । मुंढा वाया मारगेली वाया हासे जन ॥१॥
तैसा नव्हे चाळा आवरी मन डोळा । पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥धृपद॥
बाहिरल्या वेषे आत जैसे तैसे । झाकले तो बरे पोट भरे तेणे वेसे ॥२॥
तुका म्हणे केला तरी करी शुद्ध भाव । नाही तरी जासी वाया हा ना तोसा ठाव ॥३॥
अर्थ
इतरांना उपदेश करण्याचे आम्ही जाणत नसून आम्ही मुंडा म्हणजे देवाबरोबर भक्तिभावाने नाचत आहोत आणि अधिकार नसताना जर उपदेश केला तर त्याला मार खावा लागतो आणि त्याचे जीवन वायाला जाऊन सर्व लोक त्याला हसतात. अशा प्रकारे खोटा चाळा न करता परस्त्री आणि परधनावर मन आणि डोळा ठेवण्याचे आवरावे आणि मागे संत ज्या मार्गाने गेले त्या संतरुपी सोय-यांच्याप्रमाणे आपण वागावे. जर तु बाहेरुन नुसतेच स्वै-यांचे सोंग घेतले परंतू आतमधे काम आणि क्रोध जसेच्या तसे ठेवले तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही जोपर्यंत तुमचे आतले स्वरुप झाकले आहे तोपर्यंत ठीक आहे पण एकदा की ते लोकांना समजले तर लोक तुम्हाला हसतील तुमच्या या बाहेरच्या सोंगाने तुमचे पोट तर भरेल पण तुम्हाला काही उपयोग होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “तर तुम्ही तुमचा भक्तिभाव शुध्द केला तर चांगलेच आहे नाही तर तुम्हाला ना संसारात जागा ना देवाजवळ जागा मिळेल. ”
1:17
अभंग क्र. ३९६२ (सौरि, स्वैरिणी)
टाक रुका चाल रांडे का गे केली गोवी । पुसोनिया आले ठाव म्हणोनि देते सिवी ॥१॥
आता येणे छंदे नाचो विनोदे । नाही या गोविंदे माझे मजसी केले ॥धृपद॥
कोरडे ते बोल का गे वेचितेसी वाया । वर्ते करूनि दावी तुझ्या मुळीचिया ठाया ॥२॥
याजसाठी डौर म्या धरियेला हाती । तुका म्हणे तुम्हा गाठी सोडायाची खंती ॥३॥
अर्थ
संतरुपी सौरी संसाररुपी सौरीला म्हणते, “अगं रांडे तू तर देहाभिमान टाकून दे का बरे त्यात व्यर्थ गुंतली आहे मी त्या ठिकाणावरुन बाहेर आले आहे म्हणूनच तर तुला शिव्या देत आहे. चल आता आपण भजनाच्या छंदामध्ये नाचूया गोविंदाने मला त्याच्यासारखेच, त्याच्या स्वरुपासारखेच केले आहे. अगं तू भक्ति, ज्ञान, वैराग्या वाचून व्यर्थ कोडे बोल का बोलते आहेस बरे जसे बोलते तसे वर्तन करुन तुझ्या मूळ स्वरुपाची प्राप्ती तू करुन घ्यावी. ” तुकाराम महाराज म्हणतात, “तुम्ही देहाभिमाना विषयीच्या गाठी आणि त्याविषयीची खंत सोडावी यासाठीच आम्ही उपदेशरुपी डमरु हातात धरला आहे. ”
1:17
अभंग क्र. ३९६३ (सौरि, स्वैरिणी)
मोकळी गुंते रिती कुंथे नाही भार दावे । धेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावे ॥१॥
ऐका बाई लाज नाही आणिका त्या गरतीची । समाधानी उंच स्थानी जाणे सेवा पतीची ॥धृपद॥
न बोलता करी चिंता न मारिता पळे । दादला सेज नावडे निजे जगझोडीचे चाळे ॥२॥
देखत आंध बहिर कानी बोल बोलता मुके । तुका म्हणे पतन सोयरी ऐसी झाली एके ॥३॥
अर्थ
संसारी सौरी हिच्या माथ्यावर कोणताही भार नसताना तिने विनाकारण संसाराचा भार आपल्या माथ्यावर घेतला आहे आणि विनाकारण ती गुंतत आहे खरे तर ती परमार्थिकदृष्टया परमार्थ करण्यासाठी मोकळी आहे परंतू तिने स्वत:ला अहंभावाने देहाच्या खोडामध्ये गुंतून ठेवले असून ती तेथेच गुंतून बसलेली आहे. हे बयांनो तुम्ही ऐका, जी सौराचारनी स्त्री आहे तिला लाज तरी कशी वाटत नाही आणि जी स्त्री आपल्या पतीची सेवा करण्याचे जाणते तिचे स्थान हे उच्च असून ती नेहमी समाधानी असते. कुणी काहीही न बोलता विनाकारण चिंता करणे किंवा कुणीही न मारता विनाकारणच पळणे आणि सेजेवर आपल्या नव-याबरोबर झोपणे जिला आवडत नाही त्या स्त्रीचे चाळे म्हणजे जगझोडीप्रमाणेच आहे, व्याभिचारीणी स्त्रीप्रमाणेच तीचे वर्तन आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्यांना दिसत असूनही ते हरीचे रुप पाहात नाहीत ते आंधळे आहेत, ज्यांना ऐकायला येत असून देखील हरीचे वर्णन, हरीचे गीत जे ऐकत नाहीत ते बहिरे आहेत आणि ज्यांना बोलता येत असूनही हरीचे नाम ते घेत नाहीत ते मुके आहेत आणि असे कितीतरी लोक पतनाला गेलेले असून ते नरकाच्या घरचे सोयरेच ठरले आहेत. ”
1:17
अभंग क्र. ३९६४ (सौरि, स्वैरिणी)
साते चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारी बैसले पारी नाचो फेर धरा ॥१॥
या साहेबाचे झाले देणे वेळोवेळा न लगे येणे । आता हाटी काशासाठी हिंडो पाटी दुकाने ॥धृपद॥
अवघ्या जणी मुंढा धणी नाचो एके घाई । सरसावले सुख कैसा चाळा एके ठायी ॥२॥
म्हणे तुका वोळगो एका तोड चिंता माया । देऊनिया उद्गार जाऊ मुळीचिया ठाया ॥३॥
अर्थ
हे बयांनो तुम्ही डोळयामध्ये ज्ञानरुपी काजळ घाला हरीविषयी स्नेहरुपी तेल केसाला लावा पश्चात्तापाच्या फणीने अंत:करणातील विकार विंचरा, बुध्दीची वेणी चांगली बांधा आणि पंढरीच्या बाजारात चला आताच दारासमोरुन संतरुपी दिवान गेले आहेत ते पारावर बसले आहेत त्यांच्यापुढे जाऊन आपण फेर धरुन नाचू या चला. या संतरुपी साहेबांचे आपल्यावर ज्ञानदानाचे खूप मोठे कर्ज आहे एकदा की, आपण त्यांच्यापुढे जाऊन नाचलो की, मग ते कर्ज फिटले जाईल मग पुन्हा आपल्याला त्यांचेकडे येणे जाणे नाही आणि एकदा की त्यांनी आपल्यावर कृपा केली तर संसाराच्या बाजारात विषयांच्या दुकानापुढे उभे राहून हिंडण्याची देखील आपल्याला काहीच गरज नाही. आता आपण सर्वजणींनी मुंडा जो आपला धनी पाडूरंग आहे त्याच्यापुढे जाऊन एक घाई धरुन नाचू या. एकदा की आपल्याला आत्मस्थिती प्राप्त झाली की मग इतर चाळे करण्याचे आपल्याला सुचेलच कसे ? तुकाराम महाराज म्हणतात, एका हरीच्या ठिकाणीच आपण शरण जाऊन चिंता, माया तोडूया आणि त्याच्याच ठिकाणी सर्व गार्हाणे सांगून आपल्या मूळ स्वरुपाच्या ठिकाणी जाऊ या. ”
1:17
अभंग क्र. ३९६५ (सौरि, स्वैरिणी)
सौरी सुर झाले दुर डौर घेतला हाती । माया मोह सांडवले तीही लोकी झाले सरती ॥१॥
चाल विठाबाई अवघी पाच देही । न धरी गुज काही वाळवंटी सांपडता ॥धृपद॥
हिंडोनि चौऱ्यांशी घर आले तुझ्या दारा । एक्या रुक्यासाठी आंचवले संसारा ॥२॥
लाज मेली शंका गेली नाचो महाद्वारी । भ्रांति सावले फिटोनि गेले आता कैची उरी ॥३॥
झाले भांडी जगा सांडी नाही भीड चाड । घालीन चरणी मिठी पुरविन जीविंचे ते कोड ॥४॥
तुका म्हणे रुका करी संसारतुटी । आता तुम्हा आम्हा कैसी झाली जीवे साटी ॥५॥
अर्थ
मी सौरी सर्व स्वैरींमध्ये शूर झाले कारण मी माझ्या हातामध्ये डौर म्हणजे डमरु घेतला आहे त्यामुळे मी माझी माया आणि मोह दूर लोटून दिले असून तीन्ही लोकांमध्ये मी सरती (मान्य) झाली आहे. हे विठाबाई माझ्या पंचमहाभूतात्मक देहामध्ये तू चाल आता आपण दोघे मिळून गुह्य गोष्टी बोलू तू मला चंद्रभागेच्या वाळवंटात सापडली आहेस म्हणून कोणत्याही गोष्टी गुह्य ठेवू नकोस. हे विठाबाई मी चौ-याऐंशी लक्ष योनी घर हिंडून तुझ्या दारापर्यंत आली आहे तुझ्या एकरुक्यासाठी म्हणजे भक्तिप्रेमरुपी पैशासाठी संसाराला त्यागले आहे. आता आमची लाज मेली, शंका नाहिसी झाली, कोणाचेही भय आम्हाला राहिले नाही आम्ही आता हरीभजनामध्ये महाव्दारात आनंदाने नाचत आहोत आणि देहात्म भ्रांतीचे वस्त्र फिटून गेल्यामुळे खाली उरलेच काय आहे ? आता मी भांडखोर झाले असून सर्व जगाने माझा त्याग केला आहे मला कोणाचीही भीड किंवा आवड राहिली नाही आता मी तुझ्या चरणाला मिठी घालून माझ्या आवडीचे सर्व कोड पूर्ण करुन घेणार आहे. तुकाराम महार�
1:17
अभंग क्र. ३९६६ (सौरि, स्वैरिणी)
सम सपाट वेसनकाट निःसंग झाले सौरी । कुडपीयेला देश आता येऊ नेदी दुसरी ॥१॥
गाऊ रघुरामा हेचि उरले आम्हा । नाही जीवतमा वित्तगोतासहीत ॥धृपद॥
ठाव झाला रिता झाकुनि काय आता । कोणासवे लाज कोण दुजे पाहता ॥२॥
सौरीयांचा संग आम्हा दुरावले जग । भिन्न झाले सुख देहभाव पालटला रंग ॥३॥
लाज भय झणी नाही तजियेली दोन्ही । फिराविला वेष नव्हो कोणाचींच कोणी ॥४॥
तुका म्हणे हा आम्हा वेष दिला जेणे । जनाप्रतित सवे असो एकपणे ॥५॥
अर्थ
सर्व जागा समसमान असून मी सर्वत्र हरीरुपच पाहात आहे सर्व व्यसनाचा त्याग करुन मी नि:संग सौरी म्हणजे स्वैरीनी झाले आहे. सर्व देश हे ब्रम्हस्वरुप असून आता व्दैतच राहिले नसून मी दुसरे कोणालाही येऊ देणार नाही. आमच्यासाठी आता काही उरले नाही एका रघुरामाचे नाम आम्ही गाऊ आता आमच्यासाठी वित्त, गोतच्या सहीत आमचा जीवाची देखील तमा, पर्वा आम्हाला राहिलेली नाही. आता मला माहित झाले आहे की हा देह रिकामा झाला आहे मग याला वस्त्राने झाकून तरी काय होणार आहे आता वस्तुत: पाहिले तर सर्व जगच देवरुप झाले आहे त्यामुळे लाज तरी कोणाची धरावी. आता आम्ही संतरुपी सौरांचा संग केला आहे त्यामुळे सर्व जग आम्हाला दुरावले आहे आणि जगापेक्षा वेगळया प्रकारचे सुख आम्हाला झाले असून आमचा देहभाव, आमचा रंग पालटला आहे. आता आमच्या ठिकाणी लाज आणि भय राहिलीच नाही लोकांविषयी लाज आणि भय आमच्या ठिकाणी राहिली नसून आम्ही दोन्ही गोष्टीचा त्याग केला आहे पूर्वी आमचा जो वेश होता तो म्हणजे देहभावाचा त्याचा त्याग करुन आम्ही ब्रम्ह नावाचा वेश परिधान केला आहे त्यामुळे आत�
1:17
अभंग क्र. ३९६७
नहो नरनारी संवसारी अंतरलो । निर्लज्ज निष्काम जना वेगळेचि ठेलो ॥१॥
चाल रघुरामा ने आपल्या गावा । तुजविण आम्हा कोण सोयरा सांगाती ॥धृपद॥
जनवाद लोकनिंद्य पिशुनाचे चेरे । साहू तुजसाठी अंतरली सहोदरे ॥२॥
बहुता पाठी निरोप हाटी पाठविला तुज । तुका म्हणे आता सांडुनि लौकिकाचि लाज ॥३॥
अर्थ
आम्ही संसारापासून अंतरलो आहोत त्यामुळे आम्ही नरही नाहीत आणि नारीही नाहीत निष्काम, निर्लज्ज होऊन आम्ही सर्व लोकापेक्षा वेगळे होऊन राहिलो आहोत. हे रघुरामा चल तू आम्हाला तुझ्या गावाला घेऊन जा तुझ्यावाचून आम्हाला कोण सोयरा आणि सोबती आहे. देवा तुझ्यासाठी आम्ही लोकवाद, लोकनिंदा व नीच लोकांचे, आम्हाला टाकून बोलणे हे सर्व सहन करत आहोत जेव्हापासून आम्ही तुझी भक्ति करत आहोत तेव्हापासून आम्हाला सर्व सहोदरे म्हणजे भाऊ, बहीण अंतरले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आम्ही आता लोकलौकिकाची लाज सोडून संतांबरोबर तुझ्या आषाढी, कातिर्कीच्या बाजारहाटामध्येच म्हणजे आम्हाला तू निजधामाला घेऊन जा, असा आम्ही संतांकडे खूप वेळा निरोप पाठविला आहे. ”
1:18
अभंग क्र. ३९६८ (लळित)
आजी दिवस झाला । धन्य सोनियाचा भला ॥१॥
झाले संताचे पंगती । बरवे भोजन निगुती ॥धृपद॥
रामकृष्णनामे । बरवी मोहियेली प्रेमे ॥२॥
तुका म्हणे आला । चवी रसाळ हा काला ॥३॥
अर्थ
आजचा दिवस अतिशय सोनियाचा म्हणजे चांगला उगवला आहे आजचा दिवसच धन्य आहे. आज संतांच्या पंगतीत बसून त्यांच्या जवळ बसून मला चांगले परमार्थिक भोजन मिळाले आहे. राम कृष्ण या नामातील प्रेमाने जेवणातील प्रत्येक पकान्न स्निग्ध आणि मधुर झाले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात कि देवाच्या चिंतनाचा व अभेदरूपी हा काला अतिशय रसाळ झाला आहे.
1:18
अभंग क्र. ३९६९
तुम्ही ये तरी सांगा काही । आम्हाविशी रखुमाबाई ॥१॥
काही उरले ते ठायी । वेगी पाठवुनी देई ॥धृपद॥
टोंकत बैसलो देखा । इच्छीतसे ग्रासा एका ॥२॥
प्रेम देउनि बहुडा झाला । तुका म्हणे विठ्ठल बोला ॥३॥
अर्थ
हे रखुमाई, तुम्ही विठ्ठलाला आमच्या संदर्भात काहीतरी सांगा. जे काही उष्टांन्न त्यांच्याकडे उरले असेल तर ते तात्काळ आम्हाला द्यावे, असे सांगा. एकतरी घास मिळावा अशी अपेक्षा धरून मी बसलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विनंती केल्याबरोबर रुक्मिमी मातेने आम्हाला ब्रम्हरसाचे रुचक भोजन दिले. आता फक्त ‘विट्ठल-विट्ठल ” म्हणू.
1:18
अभंग क्र. ३९७०
वाट पाहे वाहे निढळी ठेवुनिया हात । पंढरीचे वाटे दृष्टी लागलेसे चित्त ॥१॥
कई येता देखेंन माझा मायबाप । घटिका बोटे दिवस लेखी धरूनिया माप ॥धृपद॥
डावा डोळा लवे उजवी स्फुरतसे बाहे । मन उतावळि भाव सांडुनिया देहे ॥२॥
सुखसेज गोडचित्ती न लगे आणीक । नाठवे घर दार तहान पळाली भूक ॥३॥
तुका म्हणे धन्य दिवस ऐसा तो कोण । पंढरीचे वाटे येता मूळ देखेन ॥४॥
अर्थ
मस्तकाला हाथ लाऊन मी विठ्ठलाची वाट पाहत आहे. माझी नजर आमी मन पूर्णपणे पंढरीच्या वाटेला लागले आहे. माझा मायबाप माझ्याकडे येत असलेला कधी एकदा पाहतो, असे मला झाले आहे. दिवस, घटका चालल्या आहेत. मी बोटावर त्याची मोजणी करीत आहे. दावा डोळा लावतो आहे, उजवा बाहू स्पुरून पाहतो आहे. देहभाव विसरून माझे मन उतावीळ झाले आहे. सुखाच्या अंथरुणावर अंग टाकले असता मन सुखावतनाही. घरदार नकोसे वाटत आहे. तहान-भूक हरपली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माला नेण्यासाठी पंढरीच्या वाटेवरून येणारे मूळ माझे आई बाप (विठ्ठल) कधी पाहीन ? असा धान्य दिवस कधी उगवेल ?
अभंग क्र. ३९७१
तुझे दास्य करू आणिका मागो खावया । धिग झाले जिणे माझे पंढरीराया ॥१॥
काय गा विठोबा तुज आता म्हणावे । शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे ॥धृपद॥
संसाराचा धाक निरंतर आम्हासी । मरण भले परि काय अवकळा तैसी ॥२॥
तुझे शरणागत शरण जाऊ आणिकासी । तुका म्हणे कवणा लाज हे का नेणसी ॥३॥
अर्थ
हे पंढरीराया, तुझे आम्ही दास व्हावे व पोटासाठी दुसर्याच्या तोंडाकडे पाहावे ? धिक्कार असो या अश्या जगण्याचा ! हे विठ्ठला, तुला आता काय म्हणावे बरे ? तुम्हा थोरामोठ्यांच्या दैवाने अशुभाही शुभ होते. (मग आमच्याच बाबतीत असे का ? ) प्रपंच्याचा धाक नेहमीचा आमच्या मागे लागला आहे. अशी अवकळा येण्यापेक्षा मरण आलेले बरे ! तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही तुला शरण आलो आहेत. मग इतरांना शरण जाऊ कसा आणि जरी इतरांना शरण गेलो तर त्याची लाज कोणाला, हे तुम्ही जाणत नाही काय ?
1:18
अभंग क्र. ३९७२
पुरविली आळी । जे जे केली ते ते काळी ॥१॥
माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥धृपद॥
घेतले नुतरी । उचलोनि कडियेवरी ॥२॥
तुका म्हणे घास । मुखी घाली ब्रम्हरस ॥३॥
अर्थ
पाडूरंगा आम्ही ज्या ज्यावेळी जो जो हट्ट केला त्या त्यावेळी तू तो हट्ट पूर्ण केलास. अहो या पाडूरंगा सारखी आई कुठे आहे काय हे कोणी तरी सांगा. एकदा की, त्याने भक्ताला कडेवर उचलून घेतले की मग त्या भक्ताला पुन्हा ती खाली उतरवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “पाडूरंग भक्तांच्या मुखामध्ये आणि माझ्या मुखामध्ये ब्रम्हरसाचा घास घालतो. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















