आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२७ ऑगस्ट, दिवस २३९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी २५१ ते २७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २८५७ ते २८६८
“२७ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २७ August
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २७ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २८५७ ते २८६८ चे पारायण आपण करणार आहोत.
२७ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी २५१ ते २७५
251-15
एऱ्हवी दोरीचिया उरगा । डांगा मेळविता पै गा । तो शिणुचि वाउगा । केला होय ॥251॥
या संसारवृक्षाच्या नाशाकरता आत्मज्ञाना व्यतिरिक्त इतर साधने म्हणजे ओझेच सहज विचार करून पाहिले तर दोरीवर भासणार्या सर्पाला मारण्याकरता लांब लांब काठ्या गोळा केल्या असता त्या काठ्यांचे ओझे उगीच गोळा केल्यासारखे होते.
252-15
तरावया मृगजळाची गंगा । डोणीलागी धावता दांगा- । माजी वोहळे बुडिजे पै गा । साच जेवी ॥252॥
मृगजळाची नदी उतरून जाण्याकरता नावेसाठी (होडी) रानोमाळ धावावयास लागले तर त्याने खर्या ओढ्यात सापडून बुडावे,
253-15
तेवी नाथिलिया संसारात्र । उपाई जाचतया वीरा । आपणपे लोपे वारा । विकोपी जाय ॥253॥
अर्जुना, त्याप्रमाणे खोट्या संसाराचा नाश करण्याच्या उपायांमधे खटपट करणार्याला साधनांचे जिवापाड श्रम होऊन तो खटपट करणारा आपण स्वत: मरतो.
254-15
म्हणौनि स्वप्नीचिया घाया । ओखद चेवोचि धनंजया । तेवी अज्ञानमूळा यया । ज्ञानचि खड्ग ॥254॥
म्हणून अर्जुना, स्वप्नातील भीतीला जागे होणे हेच औषध आहे, त्याप्रमाणे अज्ञानरूपी मूळ असलेल्या याला नाश करण्यास समर्थ एक ज्ञानखड्गच आहे.
255-15
परी तेचि लीला परजवे । तैसे वैराग्याचे नवे । अभंगबळ होआवे । बुद्धीसी गा ॥255॥
(ज्ञानखड्ग फिरवण्यास वैराग्याची आवश्यकता) परंतु अरे तेच ज्ञानरूपी खड्ग सहज फिरवता येईल, तसे वैराग्याचे न खचणारे सामर्थ्य बुद्धीला नित्य नवे पाहिजे.
256-15
उठलेनि वैराग्ये जेणे । हा त्रिवर्गु ऐसा सांडणे । जैसे वमुनिया सुणे । आताचि गेले ॥256॥
ज्या वैराग्याचा उठाव झाला असता ह्या त्रिवर्गाचा (स्वर्ग, मृत्यू व पाताळाचा) असा त्याग होतो की जसे काही कुत्रे आताच ओकून गेले आहे.
257-15
हा ठायवरी पांडवा । पदार्थजाती आघवा । विटवी तो होआवा । वैराग्य लाठु ॥257॥
अर्जुना, येथपर्यंत सर्व पदार्थमात्रसंबंधाने वीट उत्पन्न करील असे हे दांडगे वैराग्य पाहिजे.
258-15
मग देहाहंतेचे दळे । सांडूनि एकेचि वेळे । प्रत्यक्बुद्धी करतळे । हातवसावे ॥258॥
(हे ज्ञानखड्ग कसे चालवावे ?) मग त्या ज्ञानखड्गावरील देहाभिमानरूपी म्यान एकदम काढून अंतर्मुख झालेल्या बुद्धिरूपी मुठीत ते धरावे
259-15
निसळे विवेकसाहणे । जे ब्रह्माहमस्मिबोधे सणाणे । मग पुरतेनि बोधे उटणे । एकलेचि ॥259॥
ते ज्ञानरूपी खड्ग विवेकरूपी सहाणेवर पाजळलेले असावे व ‘अहं ब्रह्मास्मि ” (मी ब्रह्म आहे ” अशा बोधाची त्यास सणसणीत (तीक्ष्ण) धार असावी व मग ते एकट्या पूर्णबोधाने घासावे.
260-15
परी निश्चयाचे मुष्टिबळ । पाहावे एकदोनी वेळ । मग तुळावे अति चोखाळ । मननवरी ॥260॥
परंतु (मी ब्रह्म आहे अशा) निश्चयरूपी मुठीचे बळ एकदोन वेळ पहावे (आणि मी ब्रह्म आहे असा दृढ निश्चय झाला आहे असे वाटले की मग ते अती शुद्ध मननापर्यंत तोलून धरावे (म्हणजे अद्वैतबोधाचे अती शुद्ध असे चिंतन करावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
261-15
पाठी हतियेरा आपणया । निदिध्यासे एक जालिया । पुढे दुजे नुरेल घाया- । पुरते गा ॥261॥
नंतर (ज्ञानरूपी) हत्यार व आपण निजध्यासाने एक झाल्यावर (आपण ज्ञानरूप झाल्यावर) अर्जुना, आपल्यापुढे घाव मारण्यापुरते दुसरे (हत्यार) उरणार नाही.
262-15
ते आत्मज्ञानाचे खांडे । अद्वैतप्रभेचेनि वाडे । नेदील उरो कवणेकडे । भववृक्षासी ॥262॥
ती आत्मज्ञानरूपी दुधारी तलवार आपल्या अद्वैत प्रकाशाच्या आधिक्याने संसारवृक्षाला कोणीकडेही उरू देणार नाही.
263-15
शरदागमीचा वारा । जैसा केरु फेडी अंबरा । का उदयला रवी आंधारा । घोटु भरी ॥263॥
शरद् ऋतूच्या आरंभीचा वारा जसा आकाशातील ढगरूपी कचरा नाहीसा करतो अथवा उगवलेला सूर्य जसा अंधाराचा घोट भरतो,
264-15
नाना उपवढ होता खेवो । नुरे स्वप्नसंभ्रमाचा ठावो । स्वप्नप्रतीतिधारेचा वाहो । करील तैसे ॥264॥
अथवा जागे होताक्षणीच स्वप्नांच्या गर्दीचा ठावठिकाणा उरत नाही. त्याप्रमाणे आत्मानुभवरूपी धारेचा प्रहार करील (म्हणजे संसारवृक्षाचा ठावठिकाणा उरू देणार नाही).
265-15
तेव्हा ऊर्ध्वीचे मूळ । का अधीचे हन शाखाजाळ । ते काहीचि न दिसे मृगजळ । चादिणा जेवी ॥265॥
तेव्हा या संसारवृक्षाचा वरचा भाग अथवा वरचे मूळ अथवा शाखांचा खालचा विस्तार हे जसे चांदण्यात मृगजळ दिसणार नाही तसे काही एक दिसणार नाही.
266-15
ऐसेनि गा वीरनाथा । आत्मज्ञानाचिया खड्गलता । छेदुनिया भवाश्वत्था । ऊर्ध्वमूळाते ॥266॥
अर्जुना, अशा रीतीने आत्मज्ञानरूपी तलवारीच्या पात्याने वर मूळ आहे असा जो संसारवृक्ष, तो छेदून (म्हणजे आत्मविचाराने त्याचा निरास करून)
ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः ।
तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी ॥15. 4॥*
श्लोकार्थ
👉 नंतर त्या (आपल्या) रूपास पहावे, की ज्या ठिकाणी गेले असता (मुमुक्षु) पुन्हा परत येत नाहीत, ज्यापासून ही (विश्व) परंपरा वाढली, अशा त्या आद्य पुरुषास आत्मस्वरूपास ज्ञानाच्या अंगाने ) शरण जावे.
(आत्मस्वरूपानुभव कसा घ्यावा ?
267-15
मग इदंतेसि वाळले । जे मीपणेवीण डाहारले । ते रूप पाहिजे आपले । आपणचि ॥267॥
(संसारवृक्षाच्या नाशानंतर येणारी आत्मानुभूती कशी घ्यावी) वर सांगितल्याप्रमाणे आत्मविचाराने देहादि अनात्मतत्वरूप प्रपंचाचा निरास झाल्यावर मग आपल्याहून जे भिन्न प्रतीत होते, त्यासंबंधाने इदंभाव (हे ते पणा) स्फुरतो त्याचा ज्या वस्तूच्या ठिकाणी किंचितही संबंध नसतो व (इदंच्या सापेक्ष आपल्यासंबंधाने अहंभाव (मीपणा) असतो. आत्मस्वरूप एकरस असल्याकारणाने तेथे भिन्न प्रतीती नाही, म्हणून तेथे इदं स्फुरण नाही आणि इदं स्फुरण नाही म्हणून) अहंस्फुरणही जेथे नसते असे जे अहं-इदं-वृत्तिशून्य, प्रसिद्ध असलेले आत्मस्वरूप, ते आपले स्वरूप आपणच पहावे.
268-15
परी दर्पणाचेनि आधारे । एकचि करून दुसरे । मुख पाहाती गव्हारे । तैसे नको हो ॥268॥
परंतु आरशाच्या आधाराने समोर आरसा घेऊन जसे अज्ञानी लोक एका मुखाची दोन मुखे करून म्हणजे बिंब व प्रतिबिंब अशा तर्हेने आपणच आपल्याला पहातात. तसे हे आत्मस्वरूपाला दृश्य-द्रष्टा करून पहाणे नको.
269-15
हे पाहाणे ऐसे असे वीरा । जैसा न बोडलिया विहिरा । मग आपलिया उगमी झरा । भरोनि ठाके ॥269॥
अर्जुना, हे आपल्या आत्मस्वरूपाचे पाहणे असे आहे की विहीर उकरण्याच्या पूर्वी झरा जसा आपल्या उगमाच्या ठिकाणी पाण्याने भरलेला असतोच, तो जरी दृश्य झाला नाही तरी तो आपल्या स्वरूपाने आहेच.
270-15
नातरी आटलिया अंभ । निजबिंबी प्रतिबिंब । निहटे का नभी नभ । घटाभावी ॥270॥
अथवा पाणी आटाल्यावर प्रतिबिंब जसे आपल्या बिंबाच्या ठिकाणी मिळते, अथवा घट फुटल्यावर जसे घटाकाश महाकाशाच्या ठिकाणी मिळते,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
271-15
नाना इंधनांशु सरलेया । वन्हि परते जेवी आपणपया । तैसे आपेआप धनंजया । न्याहाळणे जे गा ॥271॥
अथवा अग्नीतील जळणारी लाकडे नि:शेष संपल्यावर अग्नी जसा मूळ स्वरूपात येऊन मिळातो, त्याचप्रमाणे अर्जुना, जे आपण आपल्याला सहज पहाणे आहे.
272-15
जिव्हे आपली चवी चाखणे । चक्षू निज बुबुळ देखणे । आहे तया ऐसे निरीक्षणे । आपुले पै ॥272॥
जिभेने जशी आपलीच चव चाखावी, अथवा डोळ्याने जसे आपले बुबुळ पहावे, त्याप्रमाणे आपण आपल्याला पहाणे आहे.
273-15
का प्रभेसि प्रभा मिळे । गगन गगनावरी लोळे । नाना पाणी भरले खोळे । पाणियाचिये ॥273॥
अथवा तेज तेजात मिसळावे, अथवा आकाशाने आकाशावर लोळावे, किंवा पाणी जसे पाण्याच्याच पदरात भरावे
274-15
आपणचि आपणयाते । पाहिजे जे अद्वैते । ते ऐसे होय निरुते । बोलिजतु असे ॥274॥
आपणच आपल्याला द्वैतभावाने जे पहावयाचे ते असे (वर सांगितल्याप्रमाणे) आहे हे मी खरे सांगतो.
275-15
जे पाहिजतेनवीण पाहिजे । काही नेणणाचि जाणिजे । आद्यपुरुष का म्हणिजे । जया ठायाते ॥275॥
जे आत्मस्वरूप पहाणेपणा घेतल्याशिवाय पहावे, (दृश्यसापेक्ष द्रष्ट्याची कल्पना टाकून पहावे), काही न जाणणे, हेच त्याचे जाणणे होय व ज्या ठिकाणाला (ज्या आत्मस्वरूपाला) आद्य (आरंभीचा) पुरुष असे म्हणतात.
दिवस २३९ वा. २७, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २८५७ ते २८६८
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २८५७
मागत्याची कोठे घडते निरास । लेकरा उदास नाही होत ॥१॥
कासया मी होऊ उतावीळ जीवी । जाणता गोसावी सर्व आहे ॥धृपद॥
झाला तरी वेळ कवतुकासाठी । निर्दया तो पोटी उपजेना ॥२॥
तुका म्हणे त्यासी ठाउके उचित । होईंल संकेत नेमियेला ॥३॥
अर्थ
देवाजवळ कोणी काहीही मागण्यास गेले तर त्याची निराशा कोठे होते काय आई आपल्या लेकराविषयी कधी उदास होत नाही. त्यामुळे मी उतावीळ तरी कशासाठी होऊ माझा जीव मी उतावीळ का करु कारण माझा सर्व जाणता माझा गोसावी आहे. माझ्या स्वामीच्या भक्तांच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ जरी लागला तरी ते केवळ त्याची गंमत त्याचे कौतुक पाहण्यासाठीच होईल परंतू माझ्या स्वामीच्या पोटात कधीही निदर्यता उत्पन्न होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “माझ्या स्वामीला उचित काय आहे ते सर्व ठाऊक आहे त्यामुळे योग्य संकेत मिळाला की भक्तांचे कल्याण तो नक्कीच करतो हा त्याचा नियमच आहे. ”
अभंग क्र. २८५८
आरुषा वचनी मातेची आवडी । म्हणऊनि तांतडी घेत नाही ॥१॥
काय होईल माझे मांडिले कवतुक । आदराची भूक रडारोवी ॥धृपद॥
लपोनिया करी चुकुर माऊली । नाही होती केली निष्ठा सांडी ॥२॥
तुका म्हणे करी पारखी वचने । भेवउनि तान्हे आळवावे ॥३॥
अर्थ
लहान मुल आपला हट्ट गोड बोबड्या शब्दात आईजवळ बोलतो परंतू तो त्याचा हट्ट आईला इतका गोड वाटतो की त्यामुळे त्याची समजूत काढण्यासाठी ती तातडी करत नाही. लहान बाळ रडू लागले जास्त हट्ट करु लागले तर आईला त्याचे कौतुक वाटते गंमत वाटते व नंतर त्याची समजूत काढण्याचाही फार आनंद होतो त्याप्रमाणेच देवाने देखील माझे कौतुक करायचे ठरवले की काय हे मला कळत नाही. एखादे वेळी आई मुलाची गंमत करण्यासाठी लपून बसते थोडासा चुकारपणाही करते परंतू मुलाविषयी असलेल्या प्रेमाची निष्ठाला धक्का लागावा असा हेतू मात्र तिच्या मनात नसतो. तुकाराम महाराज म्हणतात, “एखादया वेळी आई आपल्या तान्ह्या बाळाला कठोर शब्दात बोलते देखील त्याला भीती देखील दाखवते परंतू पुन्हा त्याला जवळ घेऊन प्रेमाने आळवते. ”
अभंग क्र. २८५९
प्रीतीच्या भांडणा नाही शिरपाव । वचनाचेचि भाव निष्ठुरता ॥१॥
जीणे तरी एका जीवे उभयता । पुत्राचिया पिता दुखवे दुःखे ॥धृपद॥
काय जाणे तुटो मायेचे लिगाड । विषम ते आड उरो नेणे ॥२॥
तुका म्हणे मज करुणा उत्तरे । करिता विश्वंभरे पाविजेल ॥३॥
अर्थ
प्रेमात जे भांडण होते त्याला शेंडा आणि बुडूख काहीच नसते केवळ बोलण्यातच निष्ठूरता असतो. पिता आणि पुत्र दोघेही एकाच जीवाने जीवन जगतात पुत्राच्या थोडयाशा दु:खाने देखील पित्याला दु:ख होते. देवाची माझ्या विषयी मायेची उपाधी तुटली आहे की काय हे मला समजत नाही कारण देवात व माझ्यात जी विषमता आहे तो देवच आता ती विषमता उरुच देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “मी विश्वंभराशी दोन प्रेमाचे करुणेचे शब्द बोललो की तो लगेच मला दर्शन देईल. ”
अभंग क्र. २८६०
नको घालू झांसा । मना उपाधिवोळसा ॥१॥
जे जे वाहावे संकल्प । पुण्य तरी तेचि पाप ॥धृपद॥
उपजतो भेव । होतो कासावीस जीव ॥२॥
तुका म्हणे पाहो । होईल ते निवांत साहो ॥३॥
अर्थ
हे मना उपाधीच्या वशमधे मला घालून पापाची भीती मला दाखवू नकोस. अरे उपाधीमुळे तू जे जे काही संकल्प पाहशील ते पुण्य न ठरता पापच ठरेल. अरे तसे करण्याने भीती निर्माण होते आणि जीव कासावीस होतो. तुकाराम महाराज म्हणतात, “त्यामुळे जे जे काही होईल ते ते आम्ही केवळ पाहू आणि निवांत ते सहन देखील करु. ”
अभंग क्र. २८६१
बीजी फळाचा भरवसा । जतन सिंचनासरिसा । चाविलिया आशा । काकुलती ते नाड ॥१॥
हा तो गडसंदीचा ठाव । पिके पिकविला भाव । संकोचोनि जीव । दशा केली जतन ॥धृपद॥
माती घाली धनावरी । रांडा रोटा वरीवरी । सुखाचे सेजारी । दुःख भ्रमे भोगीतसे ॥२॥
तुका म्हणे दिशाभुली । झाल्या उफराटी चाली । निवाड्याची बोली । अनुभवे साक्षीसी ॥३॥
अर्थ
जमिनीत बी पेरले त्याला पाणी दिले आणि त्याचे रक्षण केले तर त्याला नक्कीच फळ येईल असा भरवशाच ठेवावा. परंतू असे काहीच न करता केवळ अपेक्षा धरली की आपल्याला फळ मिळावे आणि काकूळतीला येऊन बसावे असे केल्याने काहीही होणार नाही तर केवळ आपलेच नुकसान होईल. हा देह म्हणजे अडचणीचे मोठे ठिकाणच आहे आपण यामध्ये जसा भाव ठेऊ तसेच आपल्याला फळ मिळते. परंतू काही लोक संकूचित वृत्तीचे असतात ते असे संकोचून जीवदशाचेच जतन करतात. धनलोभी मनुष्य पुष्कळ धन असते तरी देखील चोरीला जाईल या भीतीने मातीत पुरुन ठेवतो आणि जशी रांड स्त्री म्हणजे विधवा स्त्री मर्यादीत धनावर आपले जीवन जगते तसा हा धनलोभी जीवन जगत असतो. तशीच गत जीवाची झाली आहे आत्मसुख आपल्या शेजारी आहे तरी देखील प्रमाणेच जीव दु:ख भोगत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “मनुष्याला जर दिशाभूल झाली तर तो उलटया दिशेने चालत असतो. त्याप्रमाणे संसारातील जीव देखील उलटया दिशेने चालत आहेत हे मी अनुभवाने व स्वत:च्या साक्षीने बोलत आहे. ”
अभंग क्र. २८६२
काय उरली ते करू विनवणी । वेचलो वचनी पांडुरंगा ॥१॥
अव्हेरलो आता कैचे नामरूप । आदर निरोप तरि तो नाही ॥धृपद॥
माझा मायबाप ये गेलो सलगी । तो हे तुम्हा जगी सोयरिका ॥२॥
तुका म्हणे आता जोडोनिया हात । करी दंडवत ठायिंचा ठायी ॥३॥
अर्थ
हे पाडूरंगा आता काय विनंती करण्याची उरली आहे तुला विनंती करण्यासाठी मी पुष्कळ वचन देखील खर्च केले आहे. देवा अरे तू माझा कधी स्वीकार केला नाही नेहमी माझा अव्हेर केला माझा आदर तर कधीही केला नाही साधा माझा एक निरोप देखील कधी पाठवला नाही मग तुला नामरुप आहे हे आम्ही कसे जाणून घ्यावे ? अहो देवा तुम्ही मायबाप आहात असे मी समजतो त्यामुळे तुझ्याशी सलगी करु गेलो तर तुला तर सारे जग सोयरीक आहे त्याच्यामुळे तू आमच्याकडे लक्ष तरी का देशील ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता मी माझे दोन्ही हात जोडून तुला जागोजागी दंडवत करीत आहे. ”
अभंग क्र. २८६३
आवडी धरूनि करू गेलो लाड । भक्तिप्रेमकोड न पुरेचि ॥१॥
म्हणऊनि जीव ठेला असावोनि । खेद होतो मनी बहुसाल ॥धृपद॥
वेठीऐसे वाटे निर्फळ कारण । शीतळ होऊन खोडावलो ॥२॥
तुका म्हणे सरते नव्हेचि पायापे । बळ केले पापे नव्हे भेटी ॥३॥
अर्थ
देवा तुझी आवड धरुन तुझे लाड करण्यासाठी गेलो तर माझ्या भक्तीप्रेमाची इच्छाच पूर्ण होत नाही. म्हणूनच माझा जीव व्याकूळ होऊन मनात खूप खेद होत आहे. देवा मी आतापर्यंत तुमच जी भक्ती केली ती सर्व वेठबिगारीप्रमाणे ठरली म्हणजे निष्फळच ठरली त्यामुळे मी आता लाकडाच्या खोडाप्रमाणे शांत उभा राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुमच्या पायाशी मान्य झालो नाही कारण माझ्या पापाचे फळ फारच वाढले आहे त्यामुळेच तुमच्या पायाची भेट मला होत नाही. ”
अभंग क्र. २८६४
प्रीतीचा तो कळवळा । जिव्हाळाचि वेगळा ॥१॥
बहु नेदी रडो माता । दुश्चित होता धीर नव्हे ॥धृपद॥
वरी वरी तोंडापुरते । मोहोरी ते कळतसे ॥२॥
जाणोनिया नेणता तुका । नव्हे लोकासारिखा ॥३॥
अर्थ
प्रेमाचा कळवळा आणि जिव्हाळा हा वेगळाच असतो. असेच प्रेम आई व मुलाचे असते मुलगा जर दु:खी कष्टी झाला तर ती त्याला रडूही देत नाही व तो जर दु:खी झाला तर तीला धीर धरवत नाही. वरवर तोंडापुरते गोड बोलणे त्याच्याविषयी प्रेम दाखवणे हे संकटकाळी किती व्यर्थ आहे हे कळून येते. तुकाराम महाराज म्हणतात, “मला सर्व काही समजते परंतू तरी देखील मी नेणता असल्यासारखेच सर्वाना दाखवतो. खरे प्रेम कोणते खोटे प्रेम कोणते हे मला सर्व समजते मी लोकासारखा नाही. ”
अभंग क्र. २८६५
हा गे हाचि आता लाहो । माझा अहो विठ्ठला ॥१॥
दंडवत दंडवत । वेगळी मात न बोले ॥धृपद॥
वेगळाल्या कोठे भागे । लाग लागे लावावा ॥२॥
तुका म्हणे केल्या जमा । वृत्ति क्षमा भाजूनि ॥३॥
अर्थ
अहो विठ्ठला आता मला एकच छंद लागला आहे तो म्हणजे, माझ्यासमोरुन कोणीही चालले तरी मी त्याला दंडवत करुन नमस्कार करेन. त्याच्याशी वेगळे काहीही बोलणार नाही. अहो कुठे वेगवेगळया गोष्टींच्या मागे लागत बसावे ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी सर्व वृत्ती क्षमा भाजून अंत:करणात जमा करुन ठेवले आहे त्यामुळे मला कोणाचाही व्देष राग येत नाही. ”
अभंग क्र. २८६६
तुम्हासी न कळे सांगा काय एक । कासया संकल्प वागवू मी ॥१॥
आहे तेथे सत्ता ठेविले स्थापूनि । प्रमाणेंचि वाणी वदे आज्ञा ॥धृपद॥
कृपा झाली मग न लगे अंगसंग । निजध्यासे रंग चढता राहे ॥२॥
तुका म्हणे मागे बोलिलो ते वाव । आता हाचि भाव दृढ झाला ॥३॥
अर्थ
देवा तुम्हाला काय कळत नाही ते सांगा मग तुम्हाला काही मागण्याच्या अपेक्षाने मी विविध संकल्प मनामध्ये का वागू ? देवा तुमच्या सत्तेने मी जसा आहे तसाच राहीन आणि मी जे काही बोलेन ते तुमची आज्ञाप्रमाण मानूनच बोलेन. देवा एकदा की माझी तुमची माझ्यावर कृपा झाली तर मग मला तुमची अंगसंग देखील नको आहे कारण तुमच्या निजध्यासानेच प्रेमाचा रंग चढता राहील. तुकाराम महाराज म्हणतात, “मी मागे देवा तुम्हाला जे काही बोललो आहे ते सर्व व्यर्थ झाले असे समजा आता स्वस्थ राहणे हाच माझा दृढनिश्चय झाला आहे. ”
अभंग क्र. २८६७
आवडी न पुरे मायबापापासी । घडो का येविसी सकईल ॥१॥
होईल नेमले आपुलिया काळे । आलीयाचे बळे आग्रहो उरे ॥धृपद॥
जाणविले तेथे थोडे एक वेळा । सकळ ही कळा सर्वोत्तमी ॥२॥
तुका म्हणे निवेदिले गुह्य गुज । आता तुझी तुज सकळ चिंत्ता ॥३॥
अर्थ
आई बाबापुढे मुलाची आवड पूर्ण होणार नाही असे घडू तरी शकेल काय ? जे ज्यावेळी होणार आहे ते त्यावेळीच होणार आहे आणि जर कोणत्याही कार्याला बळजबरीने आग्रह केला तर मात्र त्याचा केवळ आग्रहच शिल्लक राहात असतो. मी माझी आवड अगदी थोडया वेळातच देवाला सांगितली आहे आणि तो माझी आवड नक्कीच पूर्ण करील कारण माझा देव सर्वकाळ सर्वोत्तम आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुझ्या जवळ सर्व गुह्यगोष्टी निवेदन केल्या आहेत आता त्यासंबंधी सर्व चिंता तुझी तुलाच आहे. ”
अभंग क्र. २८६८
झाले आता साठे । कासयाचे लहान मोठे ॥१॥
एक एका पडिलो हाती । झाली तेव्हांची निश्चिंती ॥धृपद॥
नाही फिरो येत मागे । झाले साक्षीचिया अंगे ॥२॥
तुका म्हणे देवा । आता येथे नाही हेवा ॥३॥
अर्थ
देवा आम्ही आमचा देहभाव तुला अर्पण केला आहे आणि त्याच्या बदल्यात तुझे नीजस्वरुप आम्हाला प्राप्त झाले आहे मग आपल्यामध्ये कसला आता लहान मोठा फरक राहिला आहे ? अहो देवा ज्यावेळी आपण एकमेकाच्या हाती आलो म्हणजे आपण दोघे एकरुप झालो तेव्हाच माझी निश्चिंती झाली. देवा आता तुझ्या या नीजस्वरुपामधून आम्हाला मागे फिरता येणार नाही कारण साक्षी ठेवूनच आपण एकरुप झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे देवा आता मी तुझ्या नीजस्वरुपामध्ये एकरुप झालो आहे त्यामुळे आता येथे कोणाविषयी हेवा ठेवावा ? ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















