२८ ऑगस्ट, दिवस २४० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी २७६ ते ३०० सार्थ तुकाराम गाथा अभंग २८६९ ते २८८०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२८ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २८ August
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २८ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २८६९ ते २८८० चे पारायण आपण करणार आहोत.
२८ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी २७६ ते ३००

276-15
तेथही उपाधीचा वोथंबा । घेऊनि श्रुति उभविती जिभा । मग नामरूपाचा वडंबा । करिती वाया ॥276॥
त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील माया-उपाधीचा आश्रय घेऊन आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यास तयार होतात आणि मग त्या ठिकाणी नामरूपाचा व्यर्थ गलबला करतात.
277-15
पै भवस्वर्गा उबगले । मुमुक्षु योगज्ञाना वळघले । पुढती न यो इया निगाले । पैजा जेथ ॥277॥
संसार व स्वर्ग यांना कंटाळलेले व योग (अष्टांग योग) व ज्ञान यांचा आश्रय घेतलेले मुमुक्षु लोक पुन्हा स्वर्ग व संसार यांच्याकडे येणार नाही, अशा प्रतिज्ञेने ज्या आत्मस्वरूपाकडे जाण्य़ास निघाले.
278-15
संसाराचिया पाया पुढा । पळती वीतराग होडा । ओलांडोनि ब्रह्मपदाचा कर्मकडा । घालिती मागा ॥278॥
ते वैराग्यशील पुरुष (संसार त्यांचा पाठलाग करीत असतांना) त्या संसाराच्या पायापुढे प्रतिज्ञेने पळतात व कर्माचा शेवट जे ब्रह्मपद (सत्यलोक) हाच कोणी कडा त्या कड्याचे उल्लंघन करून त्यास मागे टाकतात,
279-15
अहंतादिभावा आपुलिया । झाडा देऊनि आघवेया । पत्र घेती ज्ञानिये जया । मूळघरासी ॥279॥
आपल्या अहंकारादि सर्व अनात्मवृत्तींचा झाडा देऊन ज्या मूळच्या आत्मस्वरूपी घरास जाण्याकरता ज्ञानी लोक दाखला घेतात.
280-15
पै जेथुनी हे एवढी । विश्वपरंपरेची वेलांडी । वाढती आशा जैशी कोरडी । निदैवाची ॥280॥
ज्या वस्तूच्या अज्ञानाने, जगाचे विपरीत असलेले जबरदस्त मिथ्या ज्ञान उत्पन्न केले आणि ज्या वस्तूच्या अज्ञानाने नसलेले मीतूपण जगात प्रचारात आणले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


281-15
जिये का वस्तूचे नेणणे । आणिले थोर जगा जाणणे । नाही ते नांदविले जेणे । मी तू जगी ॥281॥
ज्याप्रमाणे निर्दैवी पुरुषाची पोकळ आशा वाढत असते, त्याप्रमाणे ज्या स्वरूपापासून विश्वपरंपरेच्या विस्ताराची एवढी वाढ होते.
282-15
पार्था ते वस्तु पहिले । आपणपे आपुले । पाहिजे जैसे हिंवले । हिंव हिंवे ॥282॥
अर्जुना, ती आपली पहिली वस्तू (आपले मूळ आत्मस्वरूप) आपण आपल्याच ठिकाणी पहावी. ती कशी तर जसे थंडीने थंडी व्हावी, त्याप्रमाणे (अभिप्राय असा की या हिंवाच्या (थंडीच्या) दृष्टांतात त्रिपुटी जशी एक आहे असे समजणे, हेच आपण आपल्या मूळ स्वरूपाला पहाणे होय).
283-15
आणीकही एक तया । वोळखण असे धनंजया । तरी जया का भेटलिया । येणेचि नाही ॥283॥
अर्जुना, त्याला (आत्मवस्तूला) ओळखण्याची आणखी एक खूण आहे, ती ही की ज्याच्याशी ऐक्य झाले असता पुनर्जन्मच प्राप्त होत नाही.
284-15
परी तया भेटती ऐसे । जे ज्ञाने सर्वत्र सरिसे । महाप्रळयांबूचे जैसे । भरलेपण ॥284॥
परंतु महाप्रळयकाळच्या पाण्याने जसे सर्वत्र सारखे भरलेपण असते, तसे ज्ञानाने ज्यांचा आत्मभाव सर्वत्र सारखा पसरलेला असतो. असे जे पुरुष ते त्या आत्मवस्तूला भेटतात.

निर्माणमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः ।
द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् ॥15. 5॥
श्लोकार्थ :-
मोहमानरहित, संगरूपी दोष जिंकलेले आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्यांची नित्य स्थिती आहे असे सर्व काम पूर्णपणे निवृत्त झालेले, सुख व दु:खनामक द्वंद्वापासून मुक्त झालेले असे ज्ञानी ते अच्युत पद पावतात.
(आत्मस्वरूपात कोण मिसळतात ?
285-15
जया पुरुषांचे का मन । सांडोनि गेले मोह मान । वर्षांती जैसे घन । आकाशाते ॥285॥
वर्षा ऋतूच्या शेवटी ढग आकाशाला टाकून जातात, त्याप्रमाणे ज्या पुरुषांच्या मनाला मोह व मान आपण स्वत: टाकून गेले.


286-15
निकवड्या निष्ठुरा । उबगिजे जेवी सोयरा । तैसे नागवती विकारा । वेटाळू जे ॥286॥
ज्याप्रमाणे दरिद्री व निर्दय अशा पुरुषाला त्याचे नातलग कंटाळतात, त्याप्रमाणे जे पुरुष विकारांच्या तावडीत सापडत नाहीत.
287-15
फळली केळी उन्मूळे । तैसी आत्मलाभे प्रबळे । तयाची क्रिया ढाळेढाळे । गळती आहे ॥287॥
ज्याप्रमाणे फळे आलेले केळीचे झाड आपोआप उपटून पडते, त्याप्रमाणे प्रबल आत्मलाभामुळे (आत्मानुभावामुळे ज्यांची प्रतिक्रिया हळू हळू (आपोआप) सुटत आहे.
288-15
आगी लगलिया रुखी । देखोनि सैरा पळती पक्षी । तैसे सांडिले अशेखी । विकल्पी जे ॥288॥
ज्याप्रमाणे वृक्षाला आग लागली असे पाहून (त्या वृक्षावर असलेले पक्षी) जिकडे रस्ता सापडेल तिकडे पळतात, त्याप्रमाणे सर्व विकल्पांनी ज्या पुरुषास टाकले.
289-15
आइके सकळ दोषतृणी । अंकुरिजती जिये मेदिनी । तिये भेदबुद्धीची काहाणी । नाही जयाते ॥289॥
अर्जुना, ऐक. ज्या भेदरूपी जमिनीवर सर्व प्रकारचे दोषरूपी गवत वाढते, त्या भेदबुद्धीची ज्यांच्या ठिकाणी वार्ताही नसते.
290-15
सूर्योदयासरिसी । रात्री पळोनि जाय अपैसी । गेली देहअहंता तैसी । अविद्येसवे ॥290॥
सूर्योदयाबरोबर ज्याप्रमाणे रात्र आपोआप पळून जाते, त्याप्रमाणे ज्या पुरुषापासून अविद्येसह देहाहंता पळून गेली.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


291-15
पै आयुष्यहीना जीवाते । शरीर सांडी जेवी अवचिते । तेवी निदसुरे द्वैते । सांडिले जे ॥291॥
किंवा आयुष्य संपलेल्या जीवाला शरीर ज्याप्रमाणे अवचित सोडतो, त्याप्रमाणे अविद्यात्मक द्वैताने ज्यांना एकदम सोडले आहे.
292-15
लोहाचे सांकडे परिसा । न जोडे अंधारु रवि जैसा । द्वैतबुद्धीचा तैसा । सदा दुकाळ जया ॥292॥
परिसाला लोखंडाचा सदा दुष्काळ, सूर्याला जसे अंधाराचे दर्शन नाही, तसा ज्याच्या बुद्धीत द्वैताचा सदा दुष्काळ म्हणजे कधी उदयच नाही. 92
293-15
अगा सुखदुःखाकारे । द्वंद्वे देही जिये गोचरे । तिये जया का समोरे । होतीचिना ॥293॥
अर्जुना, देहाच्या ठायी अनुभवाला येणारी जी सुखदुःखादि द्वंद्वे ती ज्याच्या समोर येतच नाहीत 93
294-15
स्वप्नीचे राज्य का मरण । नोहे हर्षशोकासि कारण । उपवढलिया जाण । जियापरी ॥294॥
स्वप्नात मिळालेले राज्य किंवा आलेले मरण हे जसे जागृतीत हर्षशोकाला कारण होत नाही. 94
295-15
तैसे सुखदुःखरूपी । द्वंद्वी जे पुण्यपापी । न घेपिजती सर्पी । गरुड जैसे ॥295
गरुड जसे सर्पाकडून धरले जात नाहीत, त्याप्रमाणे, सुखदुःख व पापपुण्यादि द्वंद्वांकडून ज्यांना धक्का पोचू शकत नाही. 95॥


296-15
आणि अनात्मवर्गनीर । सांडूनि आत्मरसाचे क्षीर । चरताति जे सविचार । राजहंसु ॥296॥
आणि, (सत्य व अनृत ह्यांच्या मिश्रणाने उद्भवलेल्या जगद्व्यवहारातील) अनृत म्हणजे अनात्मवर्णरूप पाणी टाकून, जे विचारी ज्ञानी, राजहंसाप्रमाणे सत्य म्हणजे आत्मरसरूप दुग्ध सेवन करतात. 96
297-15
जैसा वर्षोनि भूतळी । आपला रसु अंशुमाळी । मागौता आणी रश्मिजाळी । बिंबासीचि ॥297॥
सूर्य, आपला रस, म्हणजे तेजाचे कार्य जे पाणी, त्याचा पृथ्वीवर वर्षाव करून, पुन्हा ते पाणी किरणद्वारा आपल्या ठिकाणी जसे आकर्षण करून घेतो. 97
298-15
तैसे आत्मभ्रांतीसाठी । वस्तु विखुरली बारावाटी । ते एकवटिती ज्ञानदृष्टी । अखंड जे ॥298॥
त्याप्रमाणे, जे सर्वाधिष्ठान आत्मरूप, तद्विषयक भ्रांतीमुळे किंवा अनोळखी मुळे, अनेक अनात्मवस्तुरूपाने पसरलेले आहे ते, ज्यांची अखंड यथार्थ- ज्ञानदृष्टि आहे त्यांच्या दृष्टीने एकरूपाला येते. (म्हणजे त्याच्या ठिकाणी कल्पिलेले अनंतत्व जाऊन ” सर्व खल्विदं ब्रह्म ” असे अनुभवास येते. ) 98
299-15
किंबहुना आत्मयाचा । निर्धारी विवेकु जयांचा । बुडाला वोघु गंगेचा । सिंधूमाजी जैसा ॥299॥
किंबहुना, गंगेचा ओघ सागरांत जसा सागररूप होतो, तसा आत्मनिर्धारविषयक ज्यांचा विवेकही आत्मरूपच होतो. 99
300-15
पै आघवेचि आपुलेपणे । नुरेचि जया अभिलाषणे । जैसे येथूनि पऱ्हा जाणे । आकाशा नाही ॥300॥
आणि, सर्वव्यापक आकाशाला जसे अलीकडे किंवा पलीकडे जाणे संभवत नाही, त्याप्रमाणे, सर्वात्मभावामुळे त्याने अभिलाष (इच्छा ) धरावा अशी दुसरी वस्तूच उरत नाही. 300
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २४० वा. २८, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २८६९ ते २८८०
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २८६९
वोखटा तरी मी विटलो देहासी । पुरे आता जैसी जोडी पुन्हा ॥१॥
किती मरमर सोसावी पुढती । राहिलो संगती विठोबाचे ॥धृपद॥
आता कोण याचा करील आदर । जावो कलेवर विटंबोनि ॥२॥
तुका म्हणे आता सांडि तेचि सांडि । कोण फिरे लंडी यासी मागे ॥३॥
अर्थ
हा देह फार वाईट आहे मी याला फार विटलो आहे पुन्हा याची प्राप्ती होणे आता हे पुरे झाले. या देहाचा लाभ करुन घेऊन किती मरमर म्हणजे जन्ममरण पुढे सोसत राहावेत त्यापेक्षा विठोबाशी एकरुप होऊन मी त्याच्या संगतीत राहिलो आहे. आता या देहाचा आदर तरी कोण करेन कितीही या देहाची विटंबना झाली तरी काही हरकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “आता या देहाचा त्याग केला म्हणजे केलाच, पुन्हा भामटेपणा करुन याच्याकडे कोण माघारी फिरणार ?
अभंग क्र. २८७०
हेही ऐसे तेही ऐसे । उभय पिसे अविचार ॥१॥
अभिमानाचे ठेलाठेली । मधी झाली हिंपुष्टी ॥धृपद॥
धीरा शांती ठाव नुरे । हाचि उरे आबाळ्या ॥२॥
कौतुक हे पाहे तुका । कढता लोका अधणी ॥३॥
अर्थ
हि माणसेही अशीच आणि ते पशूही तसेच दोघेही वेडे अविचारी आहेत. दोघाच्याही ठिकाणी देहाविषयी अभिमान आहे त्यामुळे अभिमानाच्या धक्काबुक्कीमध्ये दोघेही कष्टी झाले आहेत. धैर्य आणि शांती या दोघाच्याही ठिकाणी तर कोठेही उरलीच नाही त्यामुळे त्यांना वेगवेगळे कष्ट होऊ नये एवढेच मात्र उरले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “सर्व लोक त्रिविधतापाच्या आंदनीमध्ये कढत आहे आणि हे कौतुक मी पाहात आहे. ”
अभंग क्र. २८७१
हित जाणे चित्त । कळो येतसे उचित ॥१॥
परिहार ते संपादणी । सत्य कारण कारणी ॥धृपद॥
वरदळ ते नुतरे कसी । आगीमध्ये तेंथे रसी ॥२॥
तुका म्हणे करुनी खरे । ठेविता ते पुढे बरे ॥३॥
अर्थ
आपले हित कशात आहे हे चित्त जाणत असते आणि चित्ताला त्यामुळेच योग्य काय आहे ते कळून येत असते. नुसतेच परमार्थाचे सोंग संपादनी करुन लोकांमध्ये त्याचा दंभ दाखवण्यात काहीही उपयोग नसतो आपण परमार्थामध्ये जे सत्य कर्म करतो तेच फलासाठी कारण ठरतात. हिणकस पदार्थ कसासाठी खरा उतरत नाही कारण तो अग्नीमध्ये घातला तर त्या रसामध्ये हिणकस पदार्थ राहतोच. तुकाराम महाराज म्हणतात, “त्यामुळेच आपले चित्त हे खरे म्हणजे चांगले करुन ठेवावे ते जर चांगले करुन ठेवले तर ते पुढे आपल्या हितासाठी चांगलेच ठरते. ”
अभंग क्र. २८७२
देवे दिला देह भजना गोमटा । तो या झाला फाटा बाधिकेचा ॥१॥
ताठोनिया मान राहिली वरती । अहंकारा हाती लवो नेदी ॥धृपद॥
दास म्हणावया न वळे रसना । सइर वचना बा सगळे ॥२॥
तुका म्हणे कोठे ठेवावा विटाळ । स्नाने नीर्मळ व्हावयासी ॥३॥
अर्थ
देवाने हा गोमटा म्हणजे उत्तम देह हरीभजन करण्याकरता दिला परंतू संसाराच्या आडरान फाटयामध्येच हा देह गुंतून राहिला. हा देह अहंकाराच्या हातात सापडलेला आहे त्यामुळे मनुष्याची मान सारखी ताठच असते नेहमी वरती असते ती मान कोणाच्याही पुढे लवत देखील नाही. हरीचा दास म्हणून घेण्यासाठी याची जीभ कधीही वळत नाही परंतू स्वैर वचन बोलण्याकरता याचा गळा नेहमी वासलेलाच असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “हा देह म्हणजे एक प्रकारचा विटाळच आहे त्यासाठी कितीही निर्मळ होण्यासाठी स्नान केले तरी काही उपयोग होणार नाही जर या देहाने हरीचे भजन केले नाही संत सज्जन ज्येष्ठांपुढे आपली मान लवविली नाही तर या देहाचा काहीही उपयोग नाही. ”
अभंग क्र. २८७३
काय करू पोरा लागली चट । धरी वाट देउळाची ॥१॥
सांगितले नेघे कानी । दुजे मनी विठ्ठल ॥धृपद॥
काम घरी न करी धंदा । येथे सदा दुश्चित ॥२॥
आमचे कुळी नव्हते ऐसे । हेच पिसे निवडले ॥३॥
लौकिकाची नाही लाज । माझे मज पारिखे ॥४॥
तुका म्हणे नरका जाणे । त्या वचने दुष्टांची ॥५॥
अर्थ
एक अभक्त बाप सांगतो की काय करावे माझ्या पोराला देवाच्या भजनाची फारच चट लागली आहे तो देवळाचीच वाट धरतो आहे. त्याला दुसरे कोणतेही काम सांगितले की तरी तो कानाने ऐकत नाही विठ्ठलवाचून त्याच्या मनात दुसरे काहीच नाही. घरी तो कोणत्याही प्रकारचे कामधंदा करीत नाही. तो घरी असला की तो नेहमी उदासच असतो. आमच्या कुळामध्ये यापूर्वी विठ्ठलाच्या भजनाची आवड असणारे देवळात जाणारे आणि विठ्ठलच मनात असणारे यापूर्वी कोणीही नव्हते परंतू हेच एक वेडे आमच्या कुळामध्ये वेगळे निवडले गेले आहे. याला लोकलज्जा देखील नाही हा माझा असून मला परका आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा दुष्ट माणसाचे कोणतेही बोलणे मुलाने जर ऐकले तर तो मुलगा नरकाला जाईल. ”
अभंग क्र. २८७४
कारणापे असता दृष्टी । शंका पोटी उपजेना ॥१॥
शूर मिरवे रणांगणी । मरणीच संतोषे ॥धृपद॥
पाहिजे तो कळवळा । मग बळा काय उणे ॥२॥
तुका म्हणे उदारपणे । काय उणे मनाचे ॥३॥
अर्थ
आपल्या कार्‍याकडे आपण जर एकदृष्टी लावली तर कोणत्याही प्रकारची शंका उत्पन्न होत नाही व आपले कार्य सफल होते. शूर योध्दा रणांगणावरच शोभून दिसतो आणि त्याला जरी मरण आले तरी त्याला संतोषच वाटतो. कोणतेही कार्य करताना त्या कार्‍याविषयी कळवळा पाहिजे तळमळ पाहिजे मग तेथे बळ आपोआप उत्पन्न होते मग तेथे बळाला कोणत्याही प्रकारची उणीव राहते काय ? तुकाराम महाराज म्हणतात, “जर आपल्यामध्ये उदारपणा असेल तर तेथे मनाचा काय कमीपणा असणार आहे ? ”
अभंग क्र. २८७५
नव्हती हे उसणे बोल । आहाच फोल रंजवण ॥१॥
अनुभव तो वरावरी । नाही दुरी वेगळा ॥धृपद॥
पाहिजे ते आले रुची । काचाकुची काशाची ॥२॥
तुका म्हणे लाजे आड । त्याची चाड कोणासी ॥३॥
अर्थ
लोकहो माझे बोल हे कोणाचे उसने किंवा कोणाचे मनोरंजन करण्यासाठी व्यर्थ मुळातच नाही. माझे बोल म्हणजे प्रत्यक्ष अनुभव आहे हे केवळ वरवरचे अनुभव नाही तर ते सगळयापेक्षा वेगळे आहेत. मी जे काही बोलतो ते सर्वाच्या पचनी पडलेच पाहिजे आणि त्याचा अनुभवही सर्वाना आलाच पाहिजे एकदा की माझ्या बोलण्याचा अनुभव तुम्हाला आला की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संकोच राहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “माझे अनुभवाचे बोल हे समजून घेण्याविषयी व त्याचा अनुभव घेण्याविषयी जर कोणापुढे लाज आडवी येत असेल तर त्याची आवड तरी कोणाला आहे. ”
अभंग क्र. २८७६
जो जो घ्यावा सोस । माझे वारी गर्भवास । लटिक्याचा दोष । अधिक जडे अंगेसी ॥१॥
आता आहे तैसे असो । अनुताप अंगी वसो । येवढेंचि नसो । माझे आणि परावे ॥धृपद॥
जागा झालेपणे । काय असावे स्वप्ने । शब्दाचिया शिणे । कष्ट मिथ्या मानावे ॥२॥
छाये माकड विटे । धावे कुपी काय भेटे । तुका म्हणे फुटे । डोई गुडघे कोंपर ॥३॥
अर्थ
देवा जसाजसा तुझा छंद घ्यावा तसातसा तुझा छंदच माझ्या गर्भवासाला मारीत आहे. आणि या खोटया संसाराचे दोषच अधिक अंगाला जडत असतात. देवा आता मी जसा आहे तसा मला असू दयावे केवळ संसाराचा पश्चात्ताप माझ्या अंगामध्ये नेहमी वसू दयावा. परंतू देवा एवढे मात्र नक्की करा की माझे आणि तुझे हा भेदभाव माझ्या ठिकाणी नसू दयावा. झोपेतून जागे झाले की, मग स्वप्ने खरे राहात असतात काय ? मग मिथ्या शब्दाने व्यर्थ क्षीण करुन घेऊन कष्ट तरी का मानावे ? तुकाराम महाराज म्हणतात, “एका वानराने आपले प्रतिबिंब विहिरीतल्या पाण्यात पाहिले आणि त्याचा राग धरुन त्याला पकडण्यासाठी त्याने विहिरीत उडी मारली तर तेथे त्याला काही भेटणार आहे काय ? मात्र जर विहिरीत उडी मारली तर त्याचे डोके गुडघे कोपर मात्र नक्कीच फुटेन. ”
अभंग क्र. २८७७
गुणाचाचि साठां । करू न वजो आणिका वाटा ॥१॥
करिती छंद नानापरी । भरोन सिणती आडभरी ॥धृपद॥
नेमली पंगती । आम्हा संतांची संगती ॥२॥
तुका म्हणे लीळा । येर कवतुक पाहो डोळा ॥३॥
अर्थ
आम्ही चांगल्या गुणाचाच साठा करुन ठेवू इतर कोणत्याही वाटेला आम्ही जाणार नाही. नाना प्रकारच्या विषयांच्या आडरानामध्ये अनेक लोकच जातात अनेक प्रकारचे छंद जोपासतात आणि त्यामुळे अडचणी येतात व दु:खी होतात. आम्ही संतांची पंगत निवडून त्यांची संगती नेहमी निवडली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्ही या जगाचे कौतुक सगळयापेक्षा अलिप्त राहून आमच्या डोळयाने लीला पाहू. ”
अभंग क्र. २८७८
शिकल्या शब्दाचे उत्पादितो ज्ञान । दर्पणींचे धन उपर वाया ॥१॥
अनुभव कइ होईन भोगिता । साकडे ते आता हेचि आले ॥धृपद॥
गाये नाचे करी शरीराचे धर्म । बीजनाम वर्म तुमचे दान ॥२॥
तुका म्हणे केला उशीर न साहे । द्याल तरी आहे सर्व सद्धि ॥३॥
अर्थ
दर्पणामध्ये म्हणजे आरशात वरवर दिसणारे धन हे व्यर्थ असते परंतू खरे धन बाहेरचे असते त्याप्रमाणे मी जे शब्द शिकलो ज्या शब्दाचे ज्ञान मी ग्रहण केले ते शाब्दिक ज्ञान हे व्यर्थच आहे. त्या शाब्दिक ज्ञानापेक्षा मला त्या शब्दाचा अर्थ अनुभव केव्हा प्राप्त होईल व त्याचा आनंद मी केव्हा भोगेल याचेच साकडे मला पडले आहे. देवा तुझ्या नामाच्या छंदामध्ये मी नाचतो गायन काम करतो परंतू ते तर शरीराचे धर्म आहे परंतू तुझ्या त्या नामबीजाचे जे गुह्य आहे ते मला समजावे याकरता तुझे कृपेचे दान हवे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आणि देवा ते कृपादान मला देण्यासाठी तुम्ही उशीर केला तर ते मला सहन होणार नाही कारण तुम्ही जर मनात आणले तर सर्व काही तुमच्याकडे सिध्द म्हणजे तयारच आहे. ”
अभंग क्र. २८७९
सिकविला तैसा पढो जाणे पुसा । कैची साच दशा तैसी अंगी ।
स्वप्नींच्या सुखे नाही होत राजा । तैसा दिसे माझा अनुभव ॥१॥
कासया हा केला जिव्हे अळंकार । पायासी अंतर दिसतसे ॥धृपद॥
दर्पणींचे धन हाती ना पदरी । डोळा दिसे परी सत्याचिये ।
आस केली तरी लाळचि घोटावी । ठकाठकी तेवी दिसतसे ॥२॥
कवित्व रसाळ वदविली वाणी । साक्ष ही पुराणी घडे ऐसी ।
तुका म्हणे गुरे राखोनि गोंवारी । माझी म्हणे परि लाभ नाही ॥३॥
अर्थ
जसे आपण पोपटाला शिकवू त्याप्रमाणे पोपट शिकेल परंतू त्या शब्दाचा अर्थ स्वतः शिकून घेण्याची कला त्याच्या अंगात असेल काय ? स्वप्नामध्ये कोणी राजा झाला तर तो खरोखर राजा होतो काय त्याप्रमाणेच माझा परमार्थातील अनुभव देखील व्यर्थ दिसत आहे. कशासाठी मी माझ्या जीभेला कवित्वेचे अलंकार परिधान केले असेल त्यामुळे मला हरीचे चरण अंतरल्याचे दिसत आहे. दर्पणामध्ये म्हणजे आरशात दिसणारे धन हातातही येत नाही आणि पदरातही पडत नाही परंतू डोळयाने पाहिले तर ते अगदी सत्य दिसते. आरशातील धनाची अपेक्षा जर केली तर केवळ लाळच घोटीत बसावे लागते. त्याप्रमाणेच माझा परमार्थ देखील फसवाफसवीचा मला दिसत आहे. देवा पुराणामध्ये अशी साक्ष आहे की तुझी किर्ती गायिली की तुझी प्राप्ती होते त्यामुळेच तर मी माझ्या रसाळ वाणीतून तुझे कवित्व वर्णन केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “एखादा गुराखी दुसऱ्यांची गुरे राखतो आणि आपला लौकिक वाढवण्यासाठी लोकांना सांगतो की ही गुरे माझीच आहेत परंतू त्याच्या या खोटया बोलण्याने त्याला लाभ मात्र काही होत नाही. ”
अभंग क्र. २८८०
अनुभव तो नाही तुमच्या दर्शनी । अइकिले काने वदे वाणी ।
जेविल्याचा कैसा अनुभव अंतरी । म्हणता मांडे पुरी काय होते ॥१॥
नाही नाही गेली तळमळ दातारा । का जी हरीहरा चाळविले ॥धृपद॥
पत्री कुशळता भेटी अनादर । काय ते उत्तर येईल मानू ।
अंतरी सबाह्यी का नाही पारिखे । करूनि पारिखे वर्ततसा ॥२॥
आलो आलो ऐसी दाऊनिया आस । वाहो बुडत्यास काय द्यावे ।
तुका म्हणे अहो चतुरा शिरोमणि । किती माझी वाणी तुम्ही कोठे ॥३॥
अर्थ
देवा मी तुमचे दर्शन प्रत्यक्ष घेतले नाही तुमचा अनुभवही घेतला नाही परंतू संतांच्या मुखाने जे कानाने ऐकले तेच मी लोकांना सांगत आहे. देवा जर जेवणच केले नाही तर त्या जेवणाच्या गोडीचा अनुभव अंतरंगात कसा येईल मांडे पुरी केवळ नुसते असे म्हटले तर काय होणार आहे ? हे दातारा तुमच्या अनुभवाची तुमच्या दर्शनाची तळमळ अजूनही माझ्या अंतकरणातून गेलेली नाही हरीहरा तुम्ही मला का फसविले आहे ? आपल्या मित्रांना किंवा आप्टेष्टांना कोणालाही पत्रामध्ये चांगली कुशलता दाखवायची आणि चांगले पत्रामध्ये बोलायचे परंतू प्रत्यक्षात भेट झाली तर त्याचा अनादर करायचा आपले असे बोलणे कोणाला मान्य होईल काय ? देवा तुम्ही अंतरंगात आणि बाह्यरंगात दोन्हीकडे सारखे का वागत नाही मला परके करुन माझ्याशी परकेपणाने का वागता ? एखादया पाण्यात बुडणाऱ्याला आलो आलो मी तुला वाचवतो तुझी मदत करतो अशी अपेक्षा दाखवायची परंतू करायचे मात्र काहीच नाही अशा वागण्याला काही अर्थ आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात, “अहो चतुरांच्या शिरोमणी माझी वाणी कोठे आणि तुम्ही कोठे माझी वाणी ती केवढी आहे तरीही मी तुमच्याशी कोडकौतुक आणि बोलत आहे ? ”

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading