७ ऑगस्ट, दिवस २१९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी १७६ ते २०० सार्थ तुकाराम गाथा अभंग २६१७ ते २६२८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“७ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan August
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ७ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २६१७ ते २६२८ चे पारायण आपण करणार आहोत.
७ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी १७६ ते २००,

176-14
अविवेक महामंत्र । जे मौढ्यमद्याचे पात्र । हे असो, मोहनास्त्र । जीवांसि जे ॥176॥
अविचार हाच या तमोगुणाचा महामंत्र आहे व तो तमोगुण मूर्खपणारूपी दारूचे भांडे आहे. हे राहू दे. फार काय सांगावे ? जो तमोगुण जीवाला मोहनास्त्र (भूल पाडणारे अस्त्र) आहे.
177-14
पार्था ते गा तम । रचूनि ऐसे वर्म । चौखुरी देहात्म- । मानियाते ॥177॥
अर्जुना या लक्षणास तमोगुण असे म्हणतात. व जे या शरिरालाच आत्मा समजु लागतात. त्यांना हा तमोगुण चारही बाजुनी विळखा टाकतो.
178-14
हे एकचि कीर शरीरी । माजो लागे चराचरी । आणि तेथ दुसरी । गोठी नाही ॥178॥
आणि चराचरात कोणत्याही शरीरामधे हा खरोखर एकच माजू लागला की मग ह्या अवस्थेत तमोगुणाशिवाय दुसर्‍या कोणत्याच गोष्टचा शिरकाव होत नाही.
179-14
सर्वेंद्रिया जाड्य । मनामाजी मौढ्य । माल्हाती जे दार्ढ्य । आलस्याचे ॥179॥
हा तमोगुण सर्व इंद्रियांचे ठिकाणी जडपणा आणतो, आणि मनामधे मूर्खपणा उत्पन्न करतो व ते दोघे (मन आणि इंद्रिये) आळसाच्या दृढपणाचा आश्रय करतात.
180-14
आंगे आंग मोडामोडी । कार्यजाती अनावडी । नुसती परवडी । जांभयांची ॥180॥
तमोगुणी असलेला मनुष्य सतत शरिराला आळे-पिळे देतो. किंवा कोणतेही काम करण्याविषयी त्याला कंटाळा असतो व एकापाठीमागून एक अशा एकसारख्या नुसत्या जांभया देत असतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


181-14
उघडियाची दिठी । देखणे नाही किरीटी । नाळविताचि उठी । वो म्हणौनि ॥181॥
अर्जुना त्याचे डोळे जरी उघडे असले तरी त्याला दिसत नाही व कोणी हाक मारली नसता ‘ओ ” म्हणून उठतो.
182-14
पडलिये धोंडी । नेणे कानी मुरडी । तयाचि परी मुरकुंडी । उकलू नेणे ॥182॥
जमिनीवर पडलेल्या धोंड्याला जसे एका बाजूहून दुसर्‍या बाजूला फिरणे माहीत नसते, त्याप्रमाणे तो मारलेली मुरकुंडी केव्हाही सोडीत नाही.
183-14
पृथ्वी पाताळी जांवो । का आकाशही वरी येवो । परी उठणे हा भावो । उपजो नेणे ॥183॥
पृथ्वी पाताळात जावो अथवा आकाश अंगावर कोसळून पडो, परंतु ‘उठावे ” हा विचार उत्पन्न होण्याचे त्याला माहीत नसते
184-14
उचितानुचित आघवे । झांसुरता नाठवे जीवे । जेथीचा तेथ लोळावे । ऐसी मेधा ॥184॥
आळसाने स्वस्थ निश्चेष्ट पडले असता योग्य काय किंवा अयोग्य काय हे सर्व अंत:करणात आठवत नाही व जेथेच्या तेथे (जेथे पडला असेल तेथे) लोळावे अशी त्याची बुद्धी असते.
185-14
उभऊनि करतळे । पडिघाये कपोळे । पायाचे शिरियाळे । मांडू लागे ॥185॥
दोन्ही तळहात वर करून गाल धरतो आणि दोन्ही गुडघ्यात डोके घालतो.


186-14
आणि निद्रेविषयी चांगु । जीवी आथि लागु । झोपी जाता स्वर्गु । वावो म्हणे ॥186॥
आणि निद्रेविषयी अंत:करणात चांगली आवड असते आणि झोप यावयास लागली म्हणजे स्वर्गसुखही तुच्छ आहे असे म्हणतो.
187-14
ब्रह्मायु होईजे । मा निजलेयाचि असिजे । हे वाचूनि दुजे । व्यसन नाही ॥187॥
ब्रह्मदेवाच्या आयुष्याचे व्हावे आणि मग निजूनच रहावे यावाचून दुसरा नाद नाही.
188-14
का वाटे जाता वोघे । कल्हातांही डोळा लागे । अमृतही परी नेघे । जरी नीद आली ॥188॥
सहज वाटेने जात असता कलंडून पडला तरी त्याचा डोळा लागतो आणि जर त्यास झोप आली तर तो अमृतसुद्धा घेत नाही.
189-14
तेवीचि आक्रोशबळे । व्यापारे कोणे एके वेळे । निगाले तरी आंधळे । रोषे जैसे ॥189॥
जसा एखादा आंधळा रागावून कामाला निघाला म्हणजे तो कोणीकडे जाईल व कोठे पडेल याचा नेमच नाही, त्याप्रमाणे हा तमोगुणी मनुष्य त्वेषाच्या आवेशाने कोणत्या एखाद्या वेळी कामास निघाला असता काय करील याचा नेम नाही.
190-14
केधवा कैसे राहाटावे । कोणेसी काय बोलावे । हे ठाकते की नागवे । हेही नेणे ॥190॥
केव्हा कसे वागावे, कोणाशी काय बोलावे, अमूक एक गोष्ट साध्य आहे की असाध्य आहे हेही त्यास कळत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


191-14
वणवा मिया आघवा । पांखे पुसोनि घेयावा । पतंगु पा हावा । घाली जेवी ॥191॥
अरे ज्याप्रमाणे पतंग हा सर्व वणवा मी आपल्या पंखानेच पुसून घ्यावा या उत्कट इच्छेने वणव्यात उडी घालतो.
192-14
तैसा वळघे साहसा । अकरणीच धिंवसा । किंबहुना ऐसा । प्रमादु रुचे ॥192॥
त्या पतंगाप्रमाणे हा तमोगुणी पुरुष एखाद्या धोक्याच्या कामाकडे वळतो व जे काम करू नये ते करण्याची त्याला प्रबल इच्छा असते. फार काय सांगावे ? याप्रमाणे त्यास प्रमाद (भलतेच करणे) आवडतो.
193-14
एवं निद्रालस्यप्रमादी । तम इया त्रिबंधी । बांधे निरुपाधी । चोखटाते ॥193॥
याप्रमाणे तमोगुण हा निद्रा, आळस व प्रमाद या तीन प्रकारांनी निरुपाधिक व शुद्ध आत्म्याला बांधतो.
194-14
जैसा वन्ही काष्ठी भरे । तै दिसे काष्ठाकारे । व्योम घटे आवरे । ते घटाकाश ॥194॥
ज्याप्रमाने अग्नीने लाकूड व्यापले असता, अग्नी हा लाकडाच्या आकाराचा दिसतो त्याप्रमाणे पोकळी घटात सापडली असता तिला घटाकाश म्हणतात.
195-14
नाना सरोवर भरले । तै चंद्रत्व तेथे बिंबले । तैसे गुणाभासी बांधले । आत्मत्व गमे ॥195॥
अथवा ज्यावेळी सरोवर पाण्याने भरले असते तेव्हा त्यात चंद्र प्रतिबिंबित होतो व त्यामुळे चंद्र सरोवरात बांधला गेल्यासारखा दिसतो, तसे आत्मत्व हे गुणात भासल्यामुळे आत्मा हा गुणांनी बांधल्यासारखा वाटतो.

सत्त्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत ।
ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत ॥14. 9॥
श्लोकार्थ -: -: हे भारता, सत्वगुण सुखाचे ठिकाणी व रजोगुण कर्माचे ठिकाणी आसक्ती उत्पन्न करतो. आणि तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमादाचे ठिकाणी आसक्ती उत्पन्न करतो.
(त्रिगुणांचे कार्य)
रजस्तमश्चाभिभूय सत्त्वं भवति भारत ।
रजः सत्त्वं तमश्चैव तमः सत्त्वं रजस्तथा ॥14. 10॥
श्लोकार्थ -: -: हे भरतकुलोत्पन्ना, रज व तम यांना जिंकून सत्व प्रगट होतो, रज व सत्व यांना जिंकून तम प्रगट होतो व तम व सत्व यांना जिंकून रज प्रगट होतो.
तीन गुणांची वृद्धी कशी होते.


196-14
पै हरूनि कफवात । जै देही आटोपे पित्त । तै करी संतप्त । देह जेवी ॥196॥
परंतु कफ व वात यांना मागे सारून जेव्हा पित्त देहात व्यापते, तेव्हा ते पित्त देहाला जसे संतप्त करते,
197-14
का वरिष आतप जैसे । जिणौनि शीतचि दिसे । तेव्हा होय हिंव ऐसे । आकाश हे ॥197॥
अथवा पावसाळा व उन्हाळा यास जिंकून (हे गेल्यानंतर) जेव्हा थंडीच दिसते तेव्हा आकाश थंडगार असे होते.
198-14
नाना स्वप्न जागृती । लोपूनि ये सुषुप्ती । तै क्षणु एक चित्तवृत्ती । तेचि होय ॥198॥
अथवा जागृत अवस्था व स्वप्नावस्था नाहीशी होऊन जेव्हा गाढ निद्रेची अवस्था प्राप्त होते, तेव्हा क्षणभर चित्तवृत्ती सुषुप्तीच (जडमूढ) होते.
199-14
तैसी रजतमे हारवी । जै सत्त्व माजु मिरवी । तै जीवाकरवी म्हणवी । सुखिया ना मी ? ॥199॥
त्याप्रमाणेच रजोगुण व तमोगुण नाहीसे करून तो सत्वगुण जीवाकडून ‘मी सुखी आहे ना ? ” असे म्हणवतो.
200-14
तैसेचि सत्त्व रज । लोपूनि तमाचे भोज । वळघे तै सहज । प्रमादी होय ॥200॥
त्याचप्रमाणे सत्वगुण व रजोगुण हे नाहीसे करून जेव्हा तमोगुणाची वृद्धी होते तेव्हा आत्मा हा सहजच प्रमादी (चुका करणारा) होतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २१९ वा. ७, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २६१७ ते २६२८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २६१७
धोंड्यासवे आदिळता फुटे डोके । तो तो त्याच्या दुःखे घामेजेना ॥१॥
इंगळासी सन्निधान अतित्याई । क्षेम देता काई सुख वाटे ॥धृपद॥
सप्रेमे कुरवाळी महाफणी व्याळ । आपुले तो ढाळ सांडी केवी ॥२॥
तुका म्हणे आम्हासवे जो रुसला । तयाचा अबोला आकाशासी ॥३॥
अर्थ
दगडावर डोके आदळले की डोके फुटेल परंतू त्याच्या दु:खाने दगडाला कधीही घाम फुटणार नाही. एखादया आततायी मनुष्याने इंगळाला किंवा विंचवाला जवळ घेऊन प्रेमाने आलिंगन दिले तर त्याला त्यापासून काही सुख वाटणार आहे काय ? महाफणी असलेल्या नागाला प्रेमाने कुरवाळले तरी तो आपला दंश करण्याचा जो मूळ स्वभाव आहे तो सोडील काय ? तुकाराम महाराज म्हणतात, “जो आमच्याशी रुसतो तो स्वत: आकाशा बरोबरच अबोला आहे म्हणजे आमच्याशी जो रुसतो त्याचेच नुकसान होते. ”
अभंग क्र. २६१८
आता तळमळ । केली पाहिजे शीतळ ॥१॥
पाहा करील ते देव । पायी ठेवुनिया भाव ॥धृपद॥
तोचि अन्नदाता । नाही आणिकाची सत्ता ॥२॥
तुका म्हणे दासा । नुपेक्षील हा भरवसा ॥३॥
अर्थ
आता देहाला पोसण्याची जी तळमळ आहे ती शीतळ केली पाहिजे. आणि देव जे काही करील ते देवाच्या पायाच्या ठिकाणी श्रेष्ठ भक्तीभाव ठेवून फक्त पाहा. तो देव सर्वाचा अन्नदाता आहे त्याच्यावाचून दुसरी कोणाचीही येथे सत्ता नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “तो हरी त्याच्या दासाची उपेक्षा कधीही करणार नाही असा माझा पूर्ण भरवसा आहे. ”
अभंग क्र. २६१९
लांब धावे पाय चोरी । भरोवरी जनाच्या ॥१॥
आता कैसे होय याचे । सिजता काचे राहिले ॥धृपद॥
खाय ओकी वेळोवेळा । कैसी कळा राहेल ॥२॥
तुका म्हणे भावहीण । त्याचा सीण पाचावा ॥३॥
अर्थ
लोकांबरोबर धावताना जो लांब लांब पळतो तोच थकल्यानंतर पाय चोरी करुन हळूहळू पळत असतो. आता याचे कसे होईल जसे अन्न शिजताना एखादा कुचर दाणा शिजतच नाही त्याप्रमाणे हा धावताना सुरवातीला जोरात पळाला आणि थकल्यानंतर पाय चोरी करुन पळू लागला आहे. जो अन्न खातो आणि लगेच वेळोवेळा सारखे ओकतो त्याच्या अंगी तेजस्वीपणाची कळा कशी राहील ? तुकाराम महाराज म्हणतात, “ “जसे दुखणे बरे होत आले परंतू ते पुन्हा पालटले” असा शीण जे भक्तीभाव न ठेवता परमार्थ करतात त्यांना होतो. ”
अभंग क्र. २६२०
माझ्या इंद्रियांसी लागले भांडण । म्हणतील कान रसना धाली ॥१॥
करिती तळमळ हस्त पाद भाळ । नेत्रांसी दुष्काळ पडिला थोर ॥धृपद॥
गुण गाय मुख आइकती कान । आमचे कारण तैसे नव्हे ॥२॥
दरुषणे फिटे नेत्रांचा पाग । जेथे ज्याचा भाग घेईल ते ॥३॥
तुका म्हणे ऐसे करी नारायणा । माझी ही वासना ऐसी आहे ॥४॥
अर्थ
देवा माझ्या इंद्रियांमध्ये आता भांडण लागले आहे काही इंद्रिये म्हणतात (कान आणि जिव्हा) तुझे गुण ऐकून आणि गाऊन तृप्त झालेत परंतू आम्ही तसेच आहोत. देवा माझ्या हाताला तुझी पूजा पायाला तुझी यात्रा आणि कपाळाला तुला वंदन करण्याची तळमळ लागली आहे व ते सारखे तळमळत आहेत आणि नेत्राला तर तुझ्या स्वरुपाचे दर्शन घेण्याचा मोठा दुष्काळच पडला आहे. देवा अहो बाकीचे इंद्रिये म्हणतात की मुख आणि कान हे तुझे गुणगान करणे व ऐकणे यामुळे सुखी आहेत परंतू आमच्या भाग्यात तसे सुख येतच नाही. देवा तुझ्या दर्शनामुळे नेत्रांचे पाग फिटेल आणि ज्या इंद्रियांचा जो भाग असेल तो ते भोगतील. तुकाराम महाराज म्हणतात, “हे नारायणा तू आता मला दर्शन दयावे असेच कर कारण माझी देखील अशीच वासना आहे. ”
अभंग क्र. २६२१
सिद्धीचा दास नव्हे श्रुतीचा अंकिला । होईन विठ्ठला दास तुझा ॥१॥
सर्व सुख असे माझिये मानसी । राहिले तयासी नाश नाही ॥धृपद॥
तेणे पुण्य पाप न देखे लोचनी । आणिका वाचूनि पांडुरंगा ॥२॥
न करी मी आस साधनी सायास । भक्तीप्रेमरस सांडूनिया ॥३॥
गर्भवासी दुःख नाही येता जाता । हृदयी असता नाम तुझे ॥४॥
तुका म्हणे तुझा होईन अंकिला । न भे मी विठ्ठला कळिकाळासी ॥५॥
अर्थ
हे विठ्ठला मी सिध्दीचा दास किंवा श्रृतीचा अंकीत होणार नाही तर केवळ तुझा दासच होईन. कारण तुझी भक्ती केल्यामुळे जगातील सर्व सुख माझ्या अंत:करणात येऊन राहीले आहेत व त्या सुखाचा कधीही नाश होत नाही. हे पाडूरंगा मी तुझ्यावाचून इतर कोणालाही माझ्या डोळयाने पाहणार नाही व त्यामुळेच मला पाप पुण्य लागणार नाही. देवा मी तुझ्या भक्ती प्रेमरसावाचून इतर कोणतीही इच्छा आणि कोणत्याही साधनाचे सायास करणार नाही. देवा तुझे नाम जर माझ्या ह्दयात आहे म्हणजेच असले तर मला कितीही जन्ममरणाचे गर्भवास भोगताना दु:ख वाटणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हे विठ्ठला मी तुझाच अंकीत होईन मग मी कळी काळाला देखील भिणार नाही. ”
अभंग क्र. २६२२
जन्मा येऊनि तया लाभ जाला । बिडवई भेटला पांडुरंगा ॥१॥
संसारदुःखे नासिली तेणे । उत्तम हे केणे नामघोष ॥धृपद॥
धन्य तेचि संत सिद्ध महानुभाव । पंढरीचा ठाव ठाकियेला ॥२॥
प्रेमदाते तेच पतितपावन । धन्य दरुषन होय त्याला ॥३॥
पावटणि पंथे जालिया सिद्धी । वोगळे समाधि सायुज्यता ॥४॥
प्रेम अराणूक नाही भय धाक । मज तेणे सुखे काही चिंता ॥५॥
ते दुर्लभ संसारासी । जडजीव उद्धारलोकासी ॥६॥
तुका म्हणे त्यासी । धन्य भाग्य दरूषणे ॥७॥
अर्थ
जन्माला येऊन त्यांनाच लाभ झाला ज्यांना भवसागरातून तारणारा पाडूरंग भेटला. संसारच्या दु:खाचा त्यांनी नाश केला ज्यांच्याजवळ हरीच्या नामघोषाचा उत्तम माल आहे ज्यांनी पंढरीच्या ठिकाणी आपला थारा धरला आहे ते संत सिध्द महानुभाव धन्य आहेत. ते संत सिध्द महानुभाव जगामध्ये प्रेमाचे दान वाटत असतात आणि पतितांचे पावन देखील ते करतात त्यांचे दर्शन ज्याला होईल त्यालाही धन्य म्हणावे. संत ज्या मार्गाने चालतात त्या मार्गातील पावटणी अष्टमहासिध्दी होतात आणि समाधी व मोक्ष हे तर त्यांची सेवाच करतात. ते साधू संत स्वत:शीच म्हणतात की मला हरीचेच सुख आहे त्यामुळे कशाची चिंता आहे आणि त्यांना हरीचे प्रेम मिळाले त्यामुळे त्यांना कशाचे भय किंवा धाक नसते. असे हे सिध्द संत महानुभाव संसारी लोकांना भेटणे दुलर्भच आहे ते नेहमी जड जीवाचा उध्दार करत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्या कोणाला असा सिध्द संत महानुभावाचे दर्शन झाले त्यांचे भाग्य धन्य आहे. ”
अभंग क्र. २६२३
काय दिवस गेले अवघे चि वराडे । ते आले साकडे कथेमाजी ॥१॥
क्षण एके ठायी मन स्थिर नाही । अराणूक कइ होईल पुढे ॥धृपद॥
कथेचे विसर दोषामूळे होय । तरणोपाय कैचा मग ॥२॥
काय ते सांचवुनि उरले हे मागे । घटिका एक संगे काय गेले ॥३॥
तेचि वाणी येथे करा उजळणी । काढावी मंथूनि शुद्ध रत्ने ॥४॥
तुका म्हणे हेचि बोलावया चाड । नाम घेता गोड हित असे ॥५॥
अर्थ
अरे लग्नात वऱ्हाडी म्हणून जाताना तू किती तरी दिवस गेला आहेस परंतू हरीकथेला येतानाच तुला अडचण झाली काय ? अरे तुझे मन एका ठिकाणी देखील स्थिर राहात नाही एक क्षणभर देखील स्थिर होत नाही तर मग तुला पुढे समाधान तरी कसे होईल. अरे हरीकथेचा विसर जर तुझ्या दोषामुळे होऊ लागला तर हा भवसागर मग तू कसा तरशील ? अरे तू कितीही धनद्रव्य जरी साचवून ठेवले तरी मागे तुझे काय उरले एक घटकादेखील तु हरीसंगती केली आहे काय ? संसारामध्ये विविध प्रकारचे शब्द वापरुन मलिन झालेल्या आपल्या वाणीला हरीचे नाम घेऊन उजळणी दया त्या वाणीला शुध्द करा आणि हरीकथेमधून अनेक प्रकारचे चांगल्या प्रकारचे शब्दरत्ने निवडून काढा. तुकाराम महाराज म्हणतात, “हे लोक हो मी तुम्हाला उपदेश करत आहे कारण तुम्ही हरीचे गोड नाम घ्या त्यातच तुमचे हित आहे. ”
अभंग क्र. २६२४
शुद्धाशुद्ध निवडे कैसे । चर्म मास भिन्न नाही ॥१॥
काही अधिक नाही उणे । कवण्या गुणे देवासी ॥धृपद॥
उदक भिन्न असे काई । वोहोळ बावी सरिता नई ॥२॥
सूर्य तेजे निवडी काय । रश्मी रसा सकळा खाय ॥३॥
वर्णा भिन्न दुधा नाही । सकळा गाई सारखे ॥४॥
करिता भिन्न नाही माती । मडक्या गति भिन्न नावे ॥५॥
वर्त्ते एकविध अग्नी । नाही मनी शुद्धाशुद्ध ॥६॥
तुका म्हणे पात्र चाड । किंवा विष अमृत गोड ॥७॥
अर्थ
सर्वाचे मांस आणि कातडे सगळेच सारखे आहेत ते भिन्न नाहीत मग यामध्ये हा शुध्द आहे किंवा अशुध्द आहे असा निवड तरी कसा करता येईल ? देवाजवळ कोणी एखादा गुणाने अधिक किंवा कमी असा भेद नाही. ओहळे विहिरी नदी हे जरी नावाने भिन्न आहेत तरी त्यामधील पाणी जो प्रकार आहे तो वेगळा आहे काय ? सूर्य आपल्या किरणांव्दारे पृथ्वीवरील विविध रसांचे सेवन करतो तरी देखील त्याच्या तेजाचा भेद किंवा निवड करता येईल काय ? गाया जरी विविध वर्णाच्या असल्या तरी त्यांच्या दुधाचा रंग एकच आहे. मडकी रांजण परळ इत्यादी वस्तू मातीपासून तयार होत असले तरी मातीत मात्र भेद नाही. अग्नी सर्वत्र सारखाच राहात असतो त्याच्या मनामध्ये हा शुध्द किंवा अशुध्द असे येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “जर आपल्या हातामध्ये पात्र दिले तर आपण त्या पात्राची आवड धरु की त्याच्या आतमध्ये विष आहे की अमृत आहे याकडे लक्ष देऊ, तर आपण त्यामध्ये काय आहे त्याकडे लक्ष देऊ त्याप्रमाणे मनुष्य कोणताही असो कोणत्याही जातीतला असो आपण त्याचे चर्म किंवा मांस पाहू नये तर त्यातील एक देवच आपण पाहावा”
अभंग क्र. २६२५
न धरी प्रतिष्ठा कोणाचीहि यम । म्हणता का रे राम लाजा झणी ॥१॥
सापडे हातीचे सोडवील काळा । तो का वेळोवेळा नये वाचे ॥धृपद॥
कोण लोक जो हा सुटला तो एक । गेले कुंभपाक रवरवांत ॥२॥
तुका म्हणे हित तो म्हणा विठ्ठल । न म्हणेल तो भोगील कळेल ते ॥३॥
अर्थ
यमाकडे कुणीही गेले तर यम त्याची प्रतिष्ठा किंवा त्याची वाहवा करीत नाही त्यामुळे राम हे नाम घेताना तुम्ही लाज का धरता. जे रामनाम तुम्ही काळाच्या हातात जरी सापडलात तरी तुम्हाला सोडवते ते नाम तुमच्या वाचेत का येत नाहीत. स्वत:च्या सामर्थ्यावर स्वत:च्या शक्तीने या त्रैलोक्यामध्ये असा कोणता एक मनुष्य आहे की जो काळाच्या हातून सुटला असे कित्येक लोक आहेत की ज्यांनी रामाचे नाम घेतले नाही त्यामुळे घोर अशा कुंभपाक व रौरव नावाच्या नरकात गेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “आपले हित व्हावे त्यासाठी विठ्ठल विठ्ठल असे म्हणत राहा आणि जो म्हणणार नाही त्याला पुढे नरक भोगण्याची वेळ आली मग त्याला होणारा त्रास पुढे कळेल. ”
अभंग क्र. २६२६
म्हणविता हरी न म्हणे तयाला । दरवडा पडिला देहामाजी ॥१॥
आयुष्यधन त्याचे नेले यमदूती । भुलविला निश्चिंती कामरंगे ॥धृपद॥
नावडे ती कथा देऊळासी जाता । प्रियधनसुता लक्ष तेथे ॥२॥
कोण नेतो तया घटिका दिवसा एका । का रे म्हणे तुका नागविसी ॥३॥
अर्थ
एखादया मनुष्याला हरी हरी म्हण असे सांगितले तरीही तो म्हणत नसला तर त्याच्या अंत:करणात काम क्रोधादी विकारांचा दरोडा पडला आहे असे समजावे. ज्याला कामवासनेने निश्चिंत भुलविले आहे त्याचे आयुष्य आणि धन हे दोन्ही यमाचे दूत नेतात असे समजावे. अश्या मनुष्याला कथा आवडत नाही देवळात जाऊन देवाचे दर्शन घेणे आवडत नाही कारण त्याचे सर्व लक्ष त्याच्या पत्नी धन आणि मुलाकडे लागलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे तू जर एक दिवस एक घटका हरीकथा ऐकली तर त्यावेळेला कोणी तुझ्या पत्नीला धनाला मुलांना नेणार आहे काय मग तू हरीकथा न ऐकून स्वत:ला का नागवितोस ? ”
अभंग क्र. २६२७
कथे बैसोनि सादरे । सुखचर्चा परस्परे । नवल काय तो उद्धरे । आणीक तरे सुगंधे ॥१॥
पुण्य घेई रे फुकाचे । पाप दुष्टवासनेचे । पेरिल्या बीजाचे । फळ घेई सेवटी ॥धृपद॥
कथा विरस पाडी आळस । छळणा करूनि मोडी रस । बुडवी आपणासरिसे । विटाळसी नावेसी ॥२॥
सज्जन चंदनाचिये परी । दुर्जन देशत्यागे दुरी । राहे म्हणे हरी । विनंती करी तुका हे ॥३॥
अर्थ
हरीकथेमधे आदराने बसून हरिभक्त हरीकथेची परस्पराशी सुख चर्चा करतात. त्यांचा तर उध्दार होईल यात नवल काय आहे परंतू त्यांच्या अंगावरुन वाहणारे सुगंधी वारे त्यांच्याजवळ बसणा-यांच्या अंगावरुन गेले तर तेही तरुन जातील. त्यामुळे फुकट हरीकथेत बसून फुकटचे पुण्य घ्यावे आणि दुष्ट पापी वासनेचे त्याग करुन टाकावे. तू जसे बीज पेरशील तसेच तुला शेवटी फळ मिळेल जो आळस करुन कथेचा विसर पाडतो आणि भक्ताचा छळ करुन कथेचा रसभंग करतो, जशी विटाळ स्त्री नावेत बसली तर ती सर्वानाही विटाळ करते त्याप्रमाणे तो मनुष्य स्वत:ही बुडतो आणि आपल्या सर्व कुळालाही बुडवितो. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा चंदनाप्रमाणे सज्जन व्यक्तीला माझ्याजवळ कर आणि दुर्जन व्यक्तीच्या देशाचा देखील त्याग करुन त्यांच्यापासून मला दूर ठेव. हे हरी अशी विनंती मी तुम्हाला करीत आहे. ”
अभंग क्र. २६२८
कळो आले तुझे जिणे । देवा तू माझे पोसणे ॥१॥
वाट पाहासी आमुची । सत्ता सतत कईची ॥धृपद॥
बोलाविता यावे रूपा । सदा निर्गुणीचि लपा ॥२॥
तुका म्हणे तू परदेशी । येथे आम्हा अंगे जिसी ॥३॥
अर्थ
देवा तुझे जगणे कसे आहे ते मला कळून आले आहे ते म्हणजे असे की तुला मी पोसणारा आहे. देवा तू सतत आमची वाट पाहात असतोस मग तुला सतत निर्गुणात राहण्याची सत्ता तरी कोठे आहे ? देवा तुला आम्ही बोलविले की तू लगेच नामरुपाला येतोस नाहीतर तू नेहमी निर्गुण स्वरुपातच लपलेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तू तर निर्गुण परदेशी आहेस परंतू आम्ही तुला बोलविले की तू लगेच सगुण होतोस आणि येथे आमच्यामुळेच तू जगतोस. ”

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading