आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१८ ऑगस्ट, दिवस २३० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी २६ ते ५० सार्थ तुकाराम गाथा अभंग २७४९ ते २७६०
“१८ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १८ August
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १८ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २७४९ ते २७६० चे पारायण आपण करणार आहोत.
१८ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी २६ ते ५० ,
26-15
तैसे श्रीनिवृत्तिराजे । अज्ञानपण हे माझे । आणिले वोजे । ज्ञानाचिया ॥26॥
(निवृत्तिनाथांच्या गुरुकृपेचे महत्व) त्याप्रमाणे श्रीनिवृत्तिनाथांनी माझे अज्ञानपण ज्ञानाच्या योग्यतेस आणले.
27-15
परी हे असो आता । प्रेम रुळतसे बोलता । के गुरुगौरव वर्णिता । उन्मेष असे ? ॥27॥
पण आता हे गुरुकृपेचे वर्णन राहू द्या, कारण की त्या वर्णनाने गुरुविषयीचे शुद्ध प्रेम मलीन होते. श्रीगुरूचे महत्व वर्णन करणारे ज्ञान कोठे आहे ?
28-15
आता तेणेचि पसाये । तुम्हा संताचे मी पाये । वोळगेन अभिप्राये । गीतेचेनि ॥28॥
आता त्याच श्रीगुरूच्या प्रसन्नतेच्या जोरावर गीतेचे हृद्गत सांगाण्याच्या साधनाने मी (ज्ञानदेव) तुम्हा संतांच्या चरणांची सेवा करीन.
29-15
तरी तोचि प्रस्तुती । चौदाविया अध्यायाच्या अंती । निर्णयो कैवल्यपती । ऐसा केला ॥29॥
चौदाव्या अध्यायाचा सिद्धांत ‘ज्ञानान्मोक्ष: ” तर आता तोच अभिप्राय ऐका की मोक्षाचे स्वामी जे श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी चौदाव्या अध्यायाच्या शेवटी असा सिद्धांत केला
30-15
जे ज्ञान जयाच्या हाती । तोचि समर्थु मुक्ति । जैसा शतमख संपत्ती । स्वर्गीचिये ॥30॥
की ज्याप्रमाणे शंभर यज्ञ केलेला पुरुष स्वर्गाचे ऐश्वर्य (इंद्रपद) मिळावण्य़ास समर्थ होतो, त्याप्रमाणे ज्ञान ज्याच्या हस्तगत झालेले आहे, तोच मोक्ष मिळवण्य़ास समर्थ होतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
31-15
का शत एक जन्मा । जो जन्मोनि ब्रह्मकर्मा । करी तोचि ब्रह्मा । आन नोहे ॥31॥
अथवा जो शंभर जन्म, ब्रह्मकर्म करत करत घालवतो, तोच काय तो निश्चितपणे त्यास ब्रह्मदेवाचे पद भेटते दुसरे कुणासही ही नाही.
32-15
नाना सूर्याचा प्रकाशु । लाहे जेवी डोळसु । तेवी ज्ञानेचि सौरसु । मोक्षाचा तो ॥32॥
ज्याप्रमाने डोळे चांगले असणार्या माणसाला जसा सुर्यप्रकाशाचा फायदा होतो.
तसेच आत्मज्ञान असणार्या माणसासच मोक्षप्राप्तिचा आनंद घेता येतो.
33-15
तरी तया ज्ञानालागी । कवणा पा योग्यता आंगी । हे पाहता जगी । देखिला एकु ॥33॥
ज्याप्रमाने ते आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणाच्या अंगी पाञता आहे. याचा काही प्रमानात विचार करुन पाहिले असता, संपुर्ण जगामध्ये तोच एक योग्य आधिकारी दिसुन येतो.
34-15
जे पाताळीचेही निधान । दावील कीर अंजन । परी होआवे लोचन । पायाळाचे ॥34॥
ज्याप्रमाने जमिनीमध्ये असलेली साधन सामुग्री अर्थात द्रव्य डोळ्यात अंजन घातल्यास दृष्टीस पडते, परंतु ते अंजन घालण्यास डोळे सुद्धा पायाळू मनुष्याचेच पाहिजेत.
35-15
तैसे मोक्ष देईल ज्ञान । येथे कीर नाही आन । परी तेचि थारे ऐसे मन । शुद्ध होआवे ॥35॥
त्याप्रमाणे आत्मज्ञाना- पासुन मोक्ष प्राप्त होतो. यामध्ये शंका घेण्यास तिळमाञ जागा नाही. पंरतु ते ज्ञान आत्मसाथ करावयाचे झाल्यास प्रथमतःहा अंतकरणाची शुद्धता ही खुप महत्वाची आहे.
36-15
तरी विरक्तीवाचूनि कही । ज्ञानासि तगणेचि नाही । हे विचारूनि ठाई । ठेविले देवे ॥36॥
ज्ञान टिकण्यास वैराग्याची आवश्यकता तर वैराग्यावाचून कोठेही ज्ञान टिकावयाचे नाही, हे देवाने आपल्याशी विचार करून ठेवले आहे.
37-15
आता विरक्तीची कवण परी । जे येऊनि मनाते वरी । हेही सर्वज्ञे श्रीहरी । देखिले असे ॥37॥
आता वैराग्याचा असा कोणता प्रकार आहे की जो आपण होऊन येऊन मुमुक्षूच्या मनाला माळ घालील ? हे देखील सर्व जाणणार्या श्रीहरीने विचार करून पाहिले आहे.
38-15
जे विषे रांधिली रससोये । जै जेवणारा ठाउवी होये । तै तो ताटचि सांडूनि जाये । जयापरी ॥38॥
(पंधराव्या अध्यायाची प्रस्तावना संसार क्षणभंगुर आहे हे कळेल तर वैराग्य निर्माण होईल )
ज्याप्रमाणे विष घालून तयार केलेले अन्न जेव्हा जेवणार्यास माहीत होते तेव्हा तो जसा त्याच्यापुढे असलेले अन्न वाढलेले पात्रच टाकून निघून जातो.
39-15
तैसी संसारा या समस्ता । जाणिजे जै अनित्यता । तै वैराग्य दवडिता । पाठी लागे ॥39॥
त्याप्रमाणे या सर्व संसाराला अनित्यता आहे, असे ज्यावेळेला कळेल त्यावेळी वैराग्याला घालवून दिले तरी ते वैराग्य आपण होऊन साधकाच्या पाठीमागे लागते.
40-15
आता अनित्यत्व या कैसे । तेचि वृक्षाकारमिषे । सांगिजत असे विश्वेशे । पंचदशी ॥40॥
आता या संसाराला क्षणभंगुरता कशा प्रकारे आहे, याचेच उदाहरण भगवान श्रीकृष्ण पंधराव्या अध्यायामध्ये वृक्षाची उपमा देऊन त्याचे वर्णन करत आहेत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
41-15
उपडिले कवतिके । झाड येरिमोहरा ठाके । ते वेगे जैसे सुके । तैसे हे नोहे ॥41॥
सहज उन्मळून पडलेले झाड, शेंडा खाली व बूड वर असे पडले असते, तेव्हा ते लवकर सुकते, त्याप्रमानेच हे संसाररुपी वृक्ष वर मुळ आणि खाली फांद्या असे जरी असले, तरी ते लवकर सुकुन जाणारे नाही. अर्जुना हे माञ लक्षात ठेव.
42-15
याचि एकेपरी । रूपकाचिया कुसरी । सारीतसे वारी । संसाराची ॥42॥
ज्याप्रमाने संसारविषयी झाडाचे कौशल्याने रुपक करुन भगवंतानी या जन्म आणि मृत्युच्या चक्रव्युहातुन संसाररुपी येरझार संपवुन टाकली आहे.
43-15
करूनि संसार वावो । स्वरुपी अहंतेचा ठावो । होआवया अध्यावो । पंधरावा हा ॥43॥
संसार हा एक मिथ्या आहे हे सिद्ध करुन दाखवून आत्मस्वरूपामध्ये मी पणाचा अंतर्भाव व्हावा हाच ह्या पंधराव्या अध्यायाचा मुख्य विषय आहे.
44-15
आता हेचि आघवे । ग्रंथगर्भीचे चांगावे । उपलविजेल जीवे । आकर्णिजे ॥44॥
आता हेच ग्रंथातील सर्व चांगले उत्तमोत्तम सिद्धांत विस्तारपुर्वक स्पष्ट करुन सांगण्यात येतील तरी ते तुम्ही श्रोत्यांनी तन मन लावून एकाग्रचित्ताने हे ज्ञान श्रवण करावे.
45-15
तरी महानंदु समुद्र । जो पूर्ण पूर्णीमा चंद्र । तो द्वारकेचा नरेंद्र । ऐसे म्हणे ॥45॥
तर अनंत असणारा ब्रह्मानंदाचा समुद्र, पूर्ण पौर्णिमेचा चंद्र व द्वारकेचा राजा, जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो असे म्हणाला. (संसारवृक्ष)
46-15
अगा पै पंडुकुमरा । येता स्वरूपाचिया घरा । करीतसे आडवारा । विश्वाभासु जो ॥46॥
अरे बाबा अर्जुना, आपण आपल्या ब्रम्हरुपी स्वरुपाच्या घरी येताना जे भ्रमरुपी द्वैत समोरुन झपाटणार्या वार्याप्रमाने अडवणुक करीत असते.
47-15
तो हा जगडंबरु । नोहे, येथ संसारु । हा जाणिजे महातरु । थांबला असे ॥47॥
ते हे भले मोठे अवाढव्य विशालकाय जगत् दिसत आहे, यालाच संसार असे म्हणतात. या विवेचनामध्ये हा संसार मुळीच नसुन सगळ्या बाजुनी पसरलेला मोठा वृक्ष असे, असे जानुन घेण्यास परमात्मा अर्जुनास सांगतात.
48-15
परी येरा रुखांसारिखा । हा तळी मूळे वरी शाखा । तैसा नोहे म्हणौनि लेखा । नयेचि कवणा ॥48॥
परंतु इतर सर्वसामान्य वृक्षांसारखा, खाली मुळे व वर फांद्या असलेला असा हा वृक्ष नाही. हा अलौकिक असा वृक्ष आहे म्हणून या वृक्षाचे कोणासही वर्णन करता येत नाही कोणाला अंत लागत नाही.
49-15
आगी का कुऱ्हाडी । होय रिगावा जरी बुडी । तरी हो का भलतेवढी । वरिचील वाढी ॥49॥
ज्यावेळेस झाडाच्या बुडापाशी आग लावली असता अथवा कुर्हाडीचे कितीही घाव घातले असता तरी ही त्याचे कार्य बंद न पडता त्या झाडाची वाढ ही होतच असते.
50-15
जे तुटलिया मूळापाशी । उलंडेल का शाखांशी । परी तैशी गोठी कायशी । हा सोपा नव्हे ॥50॥
ज्याप्रमाने सर्व साधारण असणारी झाडे ज्यावेळेस मुळासकट उपटले असता ते झाड फांद्यासकट उन्मळुन पडते. पंरतु तशा प्रकारे या संसाररुपी वृक्षाची अवस्था नसते कारण हा संसाररुपी वृक्ष तोडण्यास बोलण्या इतका सोप्पा नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २३० वा. १८, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २७४९ ते २७६०
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २७४९
पाहाता हे बरवे झाले । कळो आले यावरी ॥१॥
मागिलांचा झाला झाडा । त्या निवाडास्तव हे ॥धृपद॥
विसावले अंग दिसे । सरिसे सरिसे अनुभव ॥२॥
तुका म्हणे बरे झाले । देवे नेले गवसूनि ॥३॥
अर्थ
पाहिले तर माझे खूप चांगले झाले आहे, मागील सर्व संचितकर्मांचा झाडा झाला आहे त्या निवाड्यावरुनच हे मला हे कळले आहे. माझे शरीर देवाच्या संगतीने विसावले आणि सारखे सारखे मला दिसते आहे की, माझे खूप चांगले झाले आहे हा अनुभव मला दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे फार बरे झाले की देवाने मला शोधून त्याच्याबरोबर नेले. ”
अभंग क्र. २७५०
चक्रफेरी गळी गळा । होता गोवियेला माळा ॥१॥
फुटोनिया गेला कुंभ । झालो निष्काम स्वयंभ ॥धृपद॥
धरितचि नाही थारा । वेठी भ्रमण खोंकरा ॥२॥
तुका म्हणे कोडे । आगी काय जाणे मढे ॥३॥
अर्थ
काळचक्राच्या माळामध्ये माझा गळा गुंतला होता. रहाट गाडग्यामधील एखादा कुंभ फुटला की तो जसा निष्काम होतो त्याप्रमाणे माझा देहरुपी कुंभ फुटून गेला व त्यामुळे मी निष्काम व स्वयंभू झालो. रहाट गाडग्याच्या मधून एखादा माठ फुटला तर पुन्हा त्याला कुणी धरत नाही व रहाट गाडग्याला कुणी जोडण्याचा प्रयत्न करीत नाही त्याप्रमाणे माझी या कालचक्ररुपी रहाट गाडग्यातून मुक्ती झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मढयाला कसली आली अग्नीची भीती त्याप्रमाणे मला देखील आता कसली राहिलीय त्या कालचक्राची भीती ? ”
अभंग क्र. २७५१
श्रमपरिहारा । मूळ झालो दातारा ॥१॥
देह निवेदूनि पायी । झालो निष्काम उतराई ॥धृपद॥
आपली ते सत्ता । येथे असो नेदी आता ॥२॥
राहिला निराळा । तुका खटपटी वेगळा ॥३॥
अर्थ
हे दातारा श्रमाच्या परिहाराला मीच मूळ झालो आहे. आता हा देहच तुमच्या पायी मी उतरुन टाकला आणि तुमच्या ऋणातून उतराई होऊन निष्काम झालो आहे. या देहावर आता आपली सत्ता मी राहू देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “मी आता या संसाराच्या खटपटीपासून वेगळा आणि सर्वापेक्षा निराळा होऊन राहिलो आहे. ”
अभंग क्र. २७५२
पाठवाल तेथे गर्जेन पवाडे । काहि देहाकडे नावलोकी ॥१॥
म्हणउनि मागे कंठींचा सौरस । पावतील नास विघ्ने पुढे ॥धृपद॥
कृपेच्या कटाक्षे न भिये कळिकाळा । येता येत बळाशक्तीपुढे ॥२॥
तुका म्हणे गुढी आणीन पायापे । होईल ते सोपे नाम तुझे ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही जेथे पाठवाल तेथे मी तुमच्या किर्तीचे पोवाडे गर्जून सांगेन देहाकडे लक्ष देखील देणार नाही. पुढे येणा-या विघ्नांचा नाश व्हावा म्हणूनच मी कंठामध्ये तुमच्या नामरसाची कृपा मागत आहे. देवा तुम्ही आमच्यावर कृपा कटाक्ष जरी टाकले तरी मी कळीकाळाला भिणार नाही कारण तुमच्या शक्तीबळापुढे त्या कळी काळाचे काय चालणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुझ्या नामाची तुझ्या किर्तीची गुढी मी सर्वत्र वर्णन करील आणि शेवटी परत तुझ्या पायाजवळच आणीन त्यामुळे तुझे नाम घेणे अधिक सोपे होईन. ”
अभंग क्र. २७५३
उपजल्या काळे शुभ का शकुन । आता आवरोन राहिलेती ॥१॥
नाही मागितली वचनाची जोडी । निष्काम रोकडी वरीवरी ॥धृपद॥
सत्याविण काय उगीच लांबणी । करियाची वाणी येर भूस ॥२॥
तुका म्हणे ऐसी कोणा चाळवणी । न विचारा मनी पांडुरंगा ॥३॥
अर्थ
देवा ज्यावेळी मी परमार्थ करण्यास सुरवात केली त्यावेळी मला तुमची प्राप्ती होईल असे शुभशकुन होऊ लागले परंतू आता तर तुम्ही तोंड लपून बसला आहात. देवा केवळ शब्दानुशब्द जोडून अभंगाची रचना करण्याचे आणि वरवर केवळ निष्कामता दाखवण्याचे तुम्हाला मागितले नव्हते. परमार्थामध्ये सत्य वागण्याला महत्व आहे सत्याविणा केवळ सोंग दाखवणे कार्याची लावणी करण्यात काय अर्थ आहे आणि आपल्या वाणीने जे काही बोलू ते कार्य सफल झाले तर चांगले, नाहीतर आपली वाणी ही व्यर्थ भूशासारखी ठरते. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पाडूरंगा अशा प्रकारची फसवणूक कोणाची करावी व कोणाची नाही करावी हे तुम्ही तुमच्या मनाशीच विचार करुन का नाही पाहात. ”
अभंग क्र. २७५४
नव्हे मी आहाच आशेचे बांधले । जे हे टोंकविले नारायणा ॥१॥
अंतर तो तुम्हा बरे कळो येते । वेव्हार उचिते चाळवीजे ॥धृपद॥
मने कल्पीले आवरीता पाप । संकल्पी विकल्प याचि नावे ॥२॥
तुका म्हणे आम्हा न सोसे जळजळ । सिजल्यावरी जाळ कढ खोटा ॥३॥
अर्थ
हे नारायणा मी कोणत्याही इच्छेने किंवा आशेने बांधलेला गेलो नाही तरीही तुम्ही मला इतकी वाट पाहायला लावली. देवा तुम्हाला खरे आणि खोटे भक्त या दोघामधील अंतर म्हणजे भेद चांगलाच कळून येतो तरी देखील तुम्ही ख-या भक्ताला देखील व्यवहार करताना फसवता हे योग्य नाही. मनाने काहीतरी पुण्यकर्म करण्याचा संकल्प केला आणि तो जर आवरला तर यालाच संकल्पाच्या ठिकाणी विकल्प असे म्हणतात आणि पुण्यकर्म करण्याचे जर आवरले तर पुण्य तर लागत नाही उलट पाप लागते. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा एकदा की आमच्या मनामध्ये भक्तीविषयी विकल्प निर्माण जर झाला तर त्यानंतर तुम्ही आम्हाला कितीही प्रेम दिले किंवा जीव लावले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही कारण शिजलेल्या अन्नाला जर पुन्हा अग्नी जाळ दिला तर त्याचा काही उपयोग होत नाही तसाच हा प्रकारही व्यर्थ ठरेल. ”
अभंग क्र. २७५५
ताके कृपण तो जेवू काय घाली । आहाच ते चालीवरी कळे ॥१॥
काय तुम्हा वेचे घातले साकडे । माझे आले कोडे आजिवरी ॥धृपद॥
सेवेविण आम्ही न लिंपोत्या कार्या । झाला देवराया निर्धार हा ॥२॥
तुका म्हणे तुझी राखावया ब्रीदे । येणे अनुवादे गर्जतसे ॥३॥
अर्थ
जो मनुष्य ताक देण्यासाठीच कंजूषपणा करतो तो काय जीव लावणार त्याच्या या अशा वागण्यावरुनच त्याची चाल कळते. देवा मी आजपर्यंत तुम्हाला असे काय खर्च करायला लावले किंवा तुमच्याजवळ असे कोणते साकडे घातले आहे की ज्यामुळे तुम्हाला आज माझे कोडे पडले आहे ? हे देवराया केवळ तुमची सेवा आम्हाला घडावी यावाचून आम्ही प्रपंचातील कोणत्याही मायीक पदार्थांमध्ये गुंतलेलो नाहीत असा निर्धार तर आमचा पहिलाच झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुझी जी काही ब्रीदे आहेत त्या सर्वाचे रक्षण करण्याकरताच मी तुझ्या नामाचे पोवाडे गर्जून व त्याचे अनुवाद करुन सर्वाना सांगत आहे. ”
अभंग क्र. २७५६
वृत्तीवरी आम्हा येणे काशासाठी । एवढी हे आटी सोसावया ॥१॥
जाणतसा परी नेणते जी देवा । भ्रमचि बरवा राखावा तो ॥धृपद॥
मोडूनि क्षरलो अभेदाची मूस । तुम्हा का अळस वोढवला ॥२॥
तुका म्हणे होई लवकरि उदार । लांबणीचे फार काम नाही ॥३॥
अर्थ
देवा आम्ही वृत्तीशून्य म्हणजे ब्राम्ही अवस्थेत असून देखील पुन्हा वृत्तीवर का आलो आणि एवढी आटाआटी का करावी लागत आहे ? देवा तुम्हाला याविषयी सर्व माहित आहे तरी देखील तुम्ही नेणतेपणाचे ढोंग दाखवित आहात तुमचा हा भ्रम तुम्ही चांगला राखून ठेवावा. देवा धर्माचे रक्षण करण्याकरता मी अभेदाचे मूस मोडून व्दैत स्थितीत आलो तेवढयात तुम्हालाच धर्मरक्षण करण्याचा आळस का आला आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा त्यामुळे तुम्हीही आमच्यासारखे धर्मरक्षणाकरता लवकर उदार व्हा आणि अवतार घ्या या कार्यासाठी फार लांबणीला जाण्याचे काम नाही. ”
अभंग क्र. २७५७
सुलभ कीर्तने दिले ठसावूनि । करिता धरणी उरी कोण ॥१॥
आता न टळावे केलिया नेमासी । उदाराचा होसी हीन काय ॥धृपद॥
एका नेमे कोठे दुसरा पालट । पादर तो धीट म्हणती त्यासी ॥२॥
तुका म्हणे किती बोलसील उणे । एकाच वचने खंड करी ॥३॥
अर्थ
हरीप्राप्तीसाठी नामसंकीर्तन हे साधन अतिशय सुलभ आहे असे मी सर्वत्र ठासून सांगितले आहे व हा उपदेश करताना धरणीवरील कोणती जागा माझ्याकडून शिल्लक राहिली आहे काय ? देवा आता जो नियम केला आहे त्या नियमाला तू टाळू नकोस म्हणजे जे भक्त तुझे नामसंकीर्तन करतील त्यांना तू दर्शन दे नाही तर तू याआधी उदार होतास, मग आता हीन होतोस की काय ? एखादया व्यक्तीने एखादा नियम केला आणि त्या नियमामध्ये पुन्हा दुसरा काही बदल केला तर त्या व्यक्तीला पादरधीट म्हणजे भित्रा म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा अरे तू माझ्याकडून किती बोलणे ऐकून घेशील किती उणेपणा घेशील त्यापेक्षा तू माझे बोललेले एकच वचन ऐक आणि माझ्या बोलण्याचे खंडन कर. ”
अभंग क्र. २७५८
जेथे माझी दृष्टि राहिली बैसोन । तेथेचि हे मन गुंडाळते ॥१॥
टाळावी ते पीडा आपणापासून । दिठाविले अन्न ओकविते ॥धृपद॥
तुम्हासी का कोडे कोणी ये विशीचे । नवलाव याचे वाटतसे ॥२॥
तुका म्हणे वेगी उभारा जी कर । कीर्ती मुखे थोर गर्जईन ॥३॥
अर्थ
देवा जिथे माझी दृष्टी दृढ झाली आहे तिथेच माझे मन घोटाळत आहे. त्यामुळे हे देवा माझी दृष्टी ज्या गोष्टीवर पडली आहे ती गोष्ट मला देऊन टाक आणि आपली पीडा तू नाहीसी कर कारण दृष्टावलेले अन्न जर खाल्ले तर ते आपल्याला ओकायला भाग पाडते. देवा तू मला काही मागितले तर त्याचे संकट तुम्हाला पडते या गोष्टीचे मला नवल वाटते कारण तुम्ही समर्थ आहात तरी देखील तुम्हाला संकट पडते. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा ज्याला जे हवे असेल त्याला ते देण्यासाठी तुम्ही तुमचे दोन्ही कर वेगाने उभारा असे केले तर तुमची थोर किर्ती मी सर्वत्र गर्जून सांगेन. ”
अभंग क्र. २७५९
इच्छेपाशी आलो फिरोनि मागुता । स्वामी सेवकता आवडीचे ॥१॥
द्यावे लवकरी मागितले दान । मुळीचे जतन करूनि असे ॥धृपद॥
उपाय हे करी एकाचि वचना । दावूनिया खुणा ठाया येतो ॥२॥
तुका म्हणे गाठी किती तुजपाशी । जगाच्या तोडिसी चिंतनाने ॥३॥
अर्थ
देवा मला कसलीही इच्छा राहिली नाही असे मी म्हणलो परंतू मला स्वामी आणि सेवक ही आवड आहे व मी परत फिरुन त्याच्याजवळच आलो आहे. त्यामुळे हे देवा मी जे तुम्हाला स्वामी सेवकाचे दान मागितले आहे ते मला लवकर दया मूळीचे जे अव्दैत आहे ते तर मी जतनच करुन ठेवले आहे. भक्त जे मागेल ते मी भक्ताला देत असतो हे तुमचेच वचन आहे आणि तुम्ही दिलेल्या खुणा याचा आधार घेऊनच मी तुमच्याजवळ येत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही नाम चिंतनाच्या व्दारा जगाच्या सर्व संशयरुपी गाठी तोडून टाकता येतात परंतू तुमच्याजवळच कितीतरी गाठी आहेत. ”
अभंग क्र. २७६०
कोठे आम्ही आता वेचावी हे वाणी । कोण मना आणी जाणोनिया ॥१॥
न करावी सांडी आता टाळाटाळी । दैन हे कळी होईल माझी ॥धृपद॥
घरोघरी झाल्या ज्ञानाचिया गोष्टी । सत्यासवे गाठी न पडावी ॥२॥
तुका म्हणे आम्हा भाकिता करुणा । भलताचि शाहाणा शोध काढी ॥३॥
अर्थ
आम्ही आमची उपदेशरुपी वाणी कोठे खर्च करावी आणि आमचा उपदेश जाणून घेऊन ते मनावर कोण घेणार आहे ? देवा त्यामुळे तुम्ही आता माझी टाळाटाळी व हेळसांड करु नये तुम्ही जर माझी टाळाटाळ केली तर माझी या कलियुगामध्ये फजिती होईल. देवा अरे सत्याचा अनुभव तर कोणालाही नाही परंतू शब्दज्ञानाच्या गोष्टी घरोघरी चालू आहेत त्यामुळे मी कितीही माझी वाणी खर्च करुन हरीकथा सांगितली तरी कोणीही ती कथा मनावर घेणार नाही व त्या कथा जाणून घेणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुम्हाला करुणा भाकीत असताना एखादा भलताच शहाणा मनुष्यमध्येच येतो आणि मला वेगळेच काहीतरी सांगून मी तुम्हाला करुणा भाकीत असताना जे वचन बोललो त्यामध्ये वेगळेच शोध काढत बसतो. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















