२६ ऑगस्ट, दिवस २३८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी २२६ ते २५० सार्थ तुकाराम गाथा अभंग २८४५ ते २८५६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२६ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २६ August
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २६ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २८४५ ते २८५६ चे पारायण आपण करणार आहोत.
२६ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी २२६ ते २५०

226-15
तैसा जव पार्था । विवेकु नुधवी माथा । तव अंतु नाही अश्वत्था । भवरूपा या ॥226॥
त्याप्रमाणे अर्जुना, जोपर्यंत विचाराने डोके वर काढले नाही तोपर्यंत या संसाररूपी वृक्षाला अंत नाही.
227-15
वाजते वारे निवांत । जव न राहे जेथिचे तेथ । तव तरंगता अनंत । म्हणावीचि की ॥227॥
जोपर्यंत वहाणारा वारा जागच्या जागी शांत रहात नाही, तोपर्यंत लाटपणा अनंतच म्हटला पाहिजे.
228-15
म्हणौनि सूर्यु जै हारपे । तै मृगजळाभासु लोपे । का प्रभा जाय दीपे । मालवलेनि ॥228॥
(ज्ञानाने अविद्या नाहीशी झाली की संसारवृक्षाचा नाश होतो. ) येवढ्याकरता सूर्य जेव्हा मावळतो, तेव्हा मृगजळ भासण्याचे नाहीसे होते अथवा दिवा मालवल्याने दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो
229-15
तैसे मूळ अविद्या खाये । ते ज्ञान जै उभे होये । तैचि यया अंतु आहे । एऱ्हवी नाही ॥229॥
त्याप्रमाणे संसारवृक्षास मूळ असलेल्या अविद्येला खाऊन टाकणारे (नाहीसे करणारे) ज्ञान उठाव करेल तेव्हाच या संसार-वृक्षाला शेवट आहे, एरवी नाही.
230-15
तेवीचि हा अनादी । ऐसी ही आथी शाब्दी । तो आळु नोहे अनुरोधी । बोलाते या ॥230॥
(संसारवृक्ष अनादि कसा ?) त्याप्रमाणे हा संसारवृक्ष अनादि, (आरंभरहित) आहे असे जे म्हणतात ते म्हणणे या संसारवृक्षावर आरोप नाही तर एका दृष्टीने ते म्हणणे या संसारवृक्षाच्या अनादित्वास अनुसरून आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


231-15
जे संसारवृक्षाच्या ठायी । साचोकार तव नाही । मा नाही तया आदि काई । कोण होईल ? ॥231॥
कारण की संसारवृक्ष तर स्वरूपाने खरा नाही. तर मग जो (स्वरूपाने खरा) नाही त्याला कोणी आरंभ असेल काय ?
232-15
जो साच जेथूनि उपजे । तयाते आदि हे साजे । आता नाहीचि तो म्हणिजे । कोठूनिया ? ॥232॥
जो खरोखर जेथून (कोठून तरी) उत्पन्न होतो त्याला आरंभ आहे हे म्हणणे शोभते. आता जो स्वरूपेकरून नाहीच, त्याचा आरंभ कोठून म्हणावयाचा ?
233-15
म्हणौनि जन्मे ना आहे । ऐसिया सांगो कवण माये । यालागी नाहीपणेचि होये । अनादि हा ॥233॥
म्हणून जो उत्पन्न होत नाही व ज्याला अस्तित्व नाही, तशाला कोण आई आहे म्हणून सांगू ? {अर्थात त्याचा आरंभ काय सांगावयाचा ?}
234-15
वांझेचिया लेका । कैची जन्मपत्रिका । नभी निळी भूमिका । के कल्पू पा ॥234॥
वांझेच्या मुलाला जन्मपत्रिका कोठची ? आकाशात निळी जमीन कोठे कल्पावयाची ?
235-15
व्योमकुसुमांचा पांडवा । कवणे देठु तोडावा । म्हणौनि नाही ऐसिया भवा । आदि कैची ? ॥235॥
अर्जुना आकाशाच्या फुलाचा देठ कोणी तोडावा ? म्हणून स्वरूपेकरून जो नाही, अशा संसाराला आरंभ कसला ?


236-15
जैसे घटाचे नाहींपण । असतचि असे केलेनिवीण । तैसा समूळ वृक्षु जाण । अनादि हा ॥236॥
ज्याप्रमाणे घटाचा नाहीपणा (प्रागभाव) हा कोणी उत्पन्न केल्याशिवाय आहेच आहे, त्याप्रमाणे हा संपूर्ण संसारवृक्ष अनादि आहे असे समज.
237-15
अर्जुना ऐसेनि पाही । आद्यंतु ययासि नाही । माजी स्थिती आभासे काही । परी टवाळ ते ॥237॥
(संसारवृक्षाचे भासणे मिथ्या आहे तरी भासतो) अर्जुना याप्रमाणे पहा की या संसारवृक्षाला आदि व अंत नाही, मध्ये स्थितीकाली तो काही भासत आसतो पण ते त्याचे भासणे मिथ्या आहे.
238-15
ब्रह्मगिरीहूनि न निगे । आणि समुद्रीही कीर न रिगे । माजी दिसे वाउगे । मृगांबु जैसे ॥238॥
ज्याप्रमाणे ब्रह्मगिरी पर्वतापासून निघत नाही आणि शेवटी खरोखर समुद्रासही मिळत नाही तरी मध्येच मृगजळ दिसते.
239-15
तेसा आद्यंती कीर नाही । आणि साचही नोहे कही । परी लटिकेपणाची नवाई । पडिभासे गा ॥239॥
त्याप्रमाणे हे अर्जुना, संसारवृक्ष आरंभी व अंती खरोखर नाही आणि तो कधीही खरा नाही. परंतु खोटेपणाचे नवल असे आहे की तो नसून भासतो.
240-15
नाना रंगी गजबजे । जैसे इंद्रधनुष्य देखिजे । तैसा नेणतया आपजे । आहे ऐसा ॥240॥
ज्याप्रमाणे अनेक रंगांनी भरलेले इंद्रधनुष्य दिसते, त्याप्रमाणे अज्ञान्याला हा संसारवृक्ष आहे असे भासते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


241-15
ऐसेनि स्थितीचिये वेळे । भुलवी अज्ञानाचे डोळे । लाघवी हरी मेखळे । लोकु जैसा ॥241॥
अशा रीतीने स्थितीकाली हा संसारवृक्ष अज्ञानी मनुष्याच्या दृष्टीला चकवतो. तो कसा तर जसा बहुरूपी हा कफनी धारण करून (साधूची सोंगे आणून) लोकांना फसवतो तसा.
242-15
आणि नसतीचि श्यामिका । व्योमी दिसे तैसी दिसो का । तरी दिसणेही क्षणा एका । होय जाय ॥242॥
आणि नसलेलाच निळेपणा आकाशात दिसतो, तसा दिसेना का ? तरी ते दिसणेही एका क्षणात होते व जाते.
243-15
स्वप्नीही मानिले लटिके । तरी निर्वाहो का एकसारिखे । तेवी आभासु हा क्षणिके । रिताचि गा ॥243॥
स्वपनातील खोटे पदार्थ वस्तुत: नाहीत, तरी पण ते खरे आहेत असे जरी मानले तरी एकसारखे टिकतात का ? तर टिकत नाहीत. (ते जसे क्षणिक भासणारे आहेत) तशा क्षणिक भासणार्‍या पद्धतीचा हा संसारवृक्षाचा आभास आहे.
244-15
देखता आहे आवडे । घेऊ जाइजे तरी नातुडे । जैसा टिकु कीजे माकडे । जळामाजी ॥244॥
आपले पाण्यात दिसणारे प्रतिबिंब धरण्याकरता माकडाने ज्याप्रमाणे बोट घालावे, (तरी पण ते प्रतिबिंब त्यास सापडत नाही) त्याप्रमाणे हा संसारवृक्षाचा भास पाहिला असता आहे असा वाटतो आणि त्यास धरावयास गेले तर (म्हणजे विचाराने त्याचे अस्तित्व पाहू गेले तर) तो सापडत नाही.
245-15
तरंगभंगु सांडी पडे । विजूही न पुरे होडे । आभासासि तेणे पाडे । होणे जाणे गा ॥245॥
बा अर्जुना, लाटांचे होणे व जाणे (ह्या संसारभासाच्या होण्या-जाण्याच्या उपमेला) कमी पडते. विजेचा उदयास्त जरी अती त्वरित असतो तरी वीज देखील याच्या बरोबरीला येत नाही, तितक्या मानाने (त्वरेने) संसारभासाचे होणे-जाणे आहे.


246-15
जैसा ग्रीष्मशेषीचा वारा । नेणिजे समोर की पाठीमोरा । तैसी स्थिती नाही तरुवरा । भवरूपा यया ॥246॥
ज्याप्रमाणे ग्रीष्मांतीचा वारा हा समोरून वाहतो की पाठीमागून वहातो हे कळत नाही (त्याची स्थिती जशी एकच नसते) त्याप्रमाणे या संसाररूपी श्रेष्ठ वृक्षाला स्थितीकाली एकच अवस्था नाही, म्हणजे प्रत्येक क्षणी त्याचे स्थित्यंतर होते. म्हणजे संसाराला स्थितीही नाही.
247-15
एवं आदि ना अंतु स्थिती । ना रूप ययासि आथी । आता कायसी कुंथाकुंथी । उन्मूळणी गा ॥247॥
याप्रमाणे संसारवृक्षाला आदि, अंत व स्थिती ही नाहीत व याला रूपही नाही. आता असे जर आहे तर हे अर्जुना, याला उपटून टाकण्यात श्रम ते काय ?
248-15
आपुलिया अज्ञानासाठी । नव्हता थांवला किरीटी । तरी आता आत्माज्ञानाच्या लोटी । खांडेनि गा ॥248॥
या संसारवृक्षाच्या नाशाचा उपाय म्हणजे आत्मज्ञानरूपी दुधारी तलवार
अर्जुना हा नसलेला वृक्ष (केवळ) आपल्या अज्ञानामुळे बळावला आहे. तर आता त्याला आत्मज्ञानरूपी दुधारी तलवारीने नाहीसा कर.
249-15
वाचूनि ज्ञानेवीण ऐके । उपाय करिसी जितुके । तिही गुंफसि अधिके । रुखी इये ॥249॥
याशिवाय एका ज्ञानावाचून त्याच्या नाशाकरता जितके उपाय तू करशील त्यांच्या त्या उपायांच्या योगाने तू या संसारवृक्षात अधिक अडकशील.
250-15
मग किती खांदोखांदी । यया हिंडावे ऊर्ध्वी अधी । म्हणौनि मूळचि अज्ञान छेदी । सम्यक् ज्ञाने ॥250॥
मग या संसारवृक्षाच्या फांद्या-फांद्यांनी खाली व वर किती फिरावे ? त्या फिरण्याला अंतच नाही. म्हणून या संसारवृक्षाचे अज्ञानरूपी मूळच यथार्थज्ञानाने तोडून टाक.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २३८ वा. २६, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २८४५ ते २८५६
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २८४५
माझे तो फुकाचे काय वेचे कष्ट । नव्हे क्रियानष्ट तुम्हाऐसा ॥१॥
काहीच न वंची आजिच्या प्रसंगी । सकळा ही अंगी करीन पूजा ॥धृपद॥
द्यावे तुम्ही काही हे तो नाही आस । असो या उदास देहभावे ॥२॥
तुका म्हणे माझी मावळली खंती । समाधान चित्ती सर्वकाळ ॥३॥
अर्थ
देवा तुमची सेवा करण्यासाठी मला कोणते कष्ट होणार आहे माझे काय खर्च होणार आहे ते तर मला फुकटचं मिळालेले आहे त्यामुळे मी कोणत्याही टवाळगिरी तेथे करणार नाही आणि तुमच्यासारखा मी क्रियानिष्ठही नाही. देवा मी तुमची सेवा करण्यासाठी आजच्या प्रसंगी कोणत्याही प्रकारची टाळाटाळी करणार नाही टवाळगिरी करणार नाही सर्वांगाने मी तुमची पूजा करील. देवा मी तुमची सेवा केली त्या बदल्यात तुम्ही मला काहीतरी दयावे ही देखील आशा इच्छा अपेक्षा मी करणार नाही कारण मी या देहभावाविषयी उदासीन झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुमची सेवा करणार त्यामुळे माझी सर्व प्रकारची खंतच आता मावळली गेली आहे चित्ताला सर्वकाळ समाधान मिळत आहे. ”
अभंग क्र. २८४६
स्वामीचिया सत्ता । आधी वर्मे येती हाता । पुढती विशेषता । लाभे लाभ आगळा ॥१॥
कर्री कवतुकाचे बोल । परि जिव्हाळ्याची ओल । आवडे रसाळ । मायबापा लाडाचे ॥धृपद॥
मन मेळविले मना । नाही अभावी शाहणा । अंतरींच्या खुणा । वरी दिल्या उमटोनि ॥२॥
पराश्रमे काळा । अवघ्या जागविल्या वेळा । देवासी निराळा । तुका क्षण न सोडी ॥३॥
अर्थ
स्वामीच्या सत्तेने प्रेमलक्षण वर्म आधी हाती येते. मग पुढे विवेक आणि वैराग्य याचा लाभ होऊन साक्षात्काराचा विशेष लाभ होतो. मी माझ्या स्वामीशी कौतुकाने बोलतो खरे परंतू त्या बोलण्यामध्ये प्रेमाच्या जिव्हाळयाचा ओलावा आहे. आणि असे रसाळ आणि लाडाचे माझे बोलणे आहे त्यामुळेच तर माझ्या मायबापाला ते आवडते. मी माझ्या स्वामीच्या मनाशी माझे मन मिळवून घेतले आहे भावहीन असलेला शहाणा मनुष्य मी नाही. मी माझ्या अंत:करणात ज्या खुणा आहेत त्याच खुणा वरती बाह्यरंगावर देखील उमटून दिल्या आहेत म्हणजे त्या स्पष्ट केलेल्या आहेत. मी माझ्या मनाला मोठया कष्टाने वेळोवेळी जागृत ठेवले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “त्यामुळे मी देवाला एक क्षण देखील सोडत नाही आणि त्याच्यापेक्षा वेगळा होऊन राहात नाही. ”
अभंग क्र. २८४७
एके ठायी अन्नपाणी । ग्रासोग्रासी चिंतनी ॥१॥
वेळोवेळा जागवितो । दुजे येईल म्हणु भीतो ॥धृपद॥
नाही ही गुंतत उपचारी । मानदंभाचे वेव्हारी ॥२॥
तुका झालासे शाहाणा । आड लपे नारायणा ॥३॥
अर्थ
मी एका देवाच्याच ठिकाणी माझे चित्त ठेवून अन्नपाणी सेवन करताना ते त्याला समर्पण करतो व घासाघासाला त्याचे चिंतन करतो. त्यामुळे मी वेळोवेळा देवाचे चिंतन करुन चित्ताला नेहमी जागृत ठेवत असतो देवावाचून दुसरे काहीही चित्तात येईल म्हणून मी खूप भीत आहे. मी देह उपचार करण्याबाबत व मानदंभाच्या व्यवहारामध्ये गुंतत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “मी आता शहाणा झालो आहे आणि या सर्व गोष्टीपासून अलिप्त राहण्यासाठी मी नारायणाच्या आड लपत आहे. ”
अभंग क्र. २८४८
वैरागरापाशी रत्नाचिया खाणी । हेचि घ्यावी धणी फावेल तो ॥१॥
येथे नाही तर्कवितर्काची चाड । होतसे निवाड खऱ्याखोट्या ॥धृपद॥
उगाच सारवा वाढिला तो ठाव । वाढितिया भाव कळतसे ॥२॥
तुका म्हणे नव्हे टांचणीचे पाणी । येथे झरवणी जैशा तैसे ॥३॥
अर्थ
वैरागर नावाचा मणी असतो तो काय करतो तर वाळूच्या खड्यांना स्पर्श करताच त्यांनाही रत्न करुन टाकतो त्यामुळे ज्याच्याजवळ वैरागर नावाचा मणी आहे त्यांनी आपल्याला हवे तेवढे रत्न करुन घेऊन आपली आवड आपली इच्छा पूर्ण करुन घ्यावी. अहो येथे तर्क किंवा वितर्क करण्याची काहीच गरज नाही खऱ्या खोटयाचा निवाडा येथे होत असतो. भोजन पंक्तीत जर वाढणारा व्यक्ती चतुर असेल तर आपण केवळ पात्रासमोर बसावे व जे जे समोर येईल ते ते खावे कारण वाढणारा व्यक्ती चतुर असतो तो आपल्या मनातील सर्वभाव जाणून घेत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “कोणत्याही काळी एखादया झऱ्यातून कितीही पाणी नेले तरी तो झरा वाहतच असतो व तेथे पाणी जसेच्या तसेच राहाते ते कधीही संपत नसते त्याप्रमाणे आपण भगवंताच्या या ठिकाणी एक शांततेने त्याचे चिंतन चित्तात करावे व त्याचे चिंतन दुसऱ्यालाही दयावे ते कितीही वाटले तरी संपत नाही. ”
अभंग क्र. २८४९
समर्थ या नावे दिनांचा कृपाळ । हे तव सकळ स्वामीअंगी ॥१॥
मज काय लागे करणे विनवणी । विदित चरणी सकळ आहे ॥धृपद॥
दयासिंधु तुम्हा भांडवल दया । सिंचावे आता या कृपामृते ॥२॥
तुका म्हणे अहो पंढरिनिवासे । बहु जीव आसे लागलासे ॥३॥
अर्थ
जो दीनांचा कृपाळू आहे त्याचे नांव समर्थ आहे आणि हे सर्व गुण तर माझ्या स्वामीच्या अंगात आहेत. मी एक दीन आहे आणि माझा स्वामी कृपाळू समर्थ आहे त्यामुळे माझी कोणतीही विनंती त्यांना सांगण्याचे काय कारण आहे कारण माझी सर्व विनंती तर त्याच्या चरणाजवळ विदीतच आहे. दयासिंधू हे माझे स्वामी तुमच्याजवळ दया करणे हेच तर तुमचे भांडवल आहे त्यामुळे तुमच्या कृपेचे अमृत माझ्यावर आता सिंचन करावे. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो पंढरीनिवासा तुम्ही माझ्यावर कधीतरी दया कराल या आशेनेच माझा जीव तुमच्याकडे खूप लागला आहे. ”
अभंग क्र. २८५०
लेखिले कवित्व माझे सहज बोल । न लगेचि ओल जिव्हाळ्याची ॥१॥
नयेचि उत्तर काही परतोनि । झालो नारायणे न सरते ॥धृपद॥
लाजिरवाणी का वदली हे वाचा । नव्हेचि ठायीचा मननशीळ ॥२॥
तुका म्हणे फळ नव्हेचि सायासा । पंढरीनिवासा काय झाले ॥३॥
अर्थ
मी सहज जरी बोललो काही सहज जरी लिहिले तरी त्याला कवित्व मानले जाते परंतू त्यामध्ये काही प्रेमाचा जिव्हाळयाचा ओलावा लागत नाही. हे नारायणा मी तुझे एवढे काव्य केले तुझी एवढी स्तुती केली तरी देखील तुझ्या कृपेचा मला अनुभव अजूनही येत नाही त्यामुळे मला असे वाटत आहे की मी तुझ्याजवळ अजूनही मान्य झालो नाही. तरी माझी निर्लज्ज वाणी तुमचे काव्य का करीत आहे का ती व्यर्थ बडबड करत आहे कारण मी मूळचाच तुमचा मननशील भक्त नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पंढरीनिवासा मी कष्ट करुन केलेल्या काव्य रचनेला अजूनही फळ का येत नाही ते मला कळत नाही व नेमके झाले काय तेही मला समजत नाही. ”
अभंग क्र. २८५१
येणे झाला तुझ्या पोतडीचा झाडा । केलासी उघडा पांडुरंगा ॥१॥
भरूनिया घरी राहिलो वाखती । आपुली निश्चिंती आपुल्यापे ॥धृपद॥
आता काय उरी उरली ते सांगा । आणिलेति जगाचिये साक्षी ॥२॥
तुका म्हणे कोठे पाहोजासी आता । माझी झाली सत्ता तुम्हावरी ॥३॥
अर्थ
हे पाडूरंगा तुझ्या पोत्यामध्ये जे काही तुझे कृपारुपी धन होते ते सर्व काही लुटले असून तुला पूर्णपणे उघडा केला आहे. हे पाडूरंगा तुझे जे धन आमच्या ह्दयरुपी घरामध्ये आम्ही ठेवले असून आमच्याच ठिकाणी आम्ही निश्चिंत राहीलो आहे. देवा अहो आम्ही तुम्हाला उघडे करुन सर्व जगासमोर आणले आहे यापेक्षा आता काय उरले आहे ते तुम्ही सांगा ? तुकाराम महाराज म्हणतात, “हे पाडूरंगा आता तू कोठे जाशील हेच आम्ही पाहातो कारण तुमच्यावर आमची सत्ता झाली आहे. ”
अभंग क्र. २८५२
तुमच्या पाळणा ओढतसे मन । गेलो विसरोन आपणासी ॥१॥
लागेल पालट फेडावे उसणे । येणेचि प्रमाणे पांडुरंगा ॥धृपद॥
तुमचे आवडी संबंधाचा त्याग । घेतला से लाग जगनिंदेचा ॥२॥
तुका म्हणे जैसा माझा जीव ओढे । तैसेच तिकडे पाहिजेल ॥३॥
अर्थ
देवा तुमचे रक्षण करण्याकरता माझे मन ओढ घेत आहे परंतू त्या छंदामध्ये मीच मला स्वत:ला विसरुन गेलो आहे. हे पाडूरंगा मी तुमचे जसे रक्षण करतोना तसेच तुम्ही माझेही रक्षण करावे मग आपले उसने फेडले जाईल कारण उसने फेडणे ही जगाची रीतच आहे. देवा मी तुमची आवड धरली त्यामुळे मी सर्व माझ्यासंबधी जणांचा त्याग केला आणि जग माझी आता निंदा करत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा जसा माझा जीव तुमच्याकडे ओढ घेत आहे त्याप्रमाणे तुम्ही देखील माझ्याकडे ओढ घेतली पाहिजे. ”
अभंग क्र. २८५३
नाही मज कोणी उरला दुर्जन । मायबापाविण ब्रम्हांडांत ॥१॥
कासया जिकीर करणे येविसी । भयाची मानसी चिंता खंती ॥धृपद॥
विश्वंभराचिये लागलो सांभाळी । सत्तेने तो चाळी आपुलिये ॥२॥
तुका म्हणे माझे पाळणपोषण । करिता आपण पांडुरंगा ॥३॥
अर्थ
संपूर्ण ब्रम्हांडामध्ये माझा मायबाप पाडूरंगच सामावलेला आहे त्यामुळे माझ्यासाठी ब्रम्हांडात कोणीही दुर्जन उरलेला नाही. त्यामुळे मला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची काय गरज आहे कारण मनामध्ये भय चिंता आणि खंतच राहिली नाही. विश्वाचा चालक असा विश्वंभर तोच माझा सांभाळ करीत आहे व त्याच्याच सत्तेखाली मी चालत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पाडूरंगा तुम्हीच माझे पालनपोषण करीत आहात. ”
अभंग क्र. २८५४
मज काही सीण न व्हावा यासाठी । कृपा तुम्हा पोटी उपजली ॥१॥
होते तैसे केले आपले उचित । शिकविले हित बहु बरे ॥धृपद॥
आम्ही न मनावी कोणाची आशंका । तुम्हा भय लोका आहे मनी ॥२॥
तुका म्हणे आता संचिताचा ठेवा । वोढवला घ्यावा जैसा तैसा ॥३॥
अर्थ
देवा मला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी तुमच्या ह्दयामध्ये कृपा उत्पन्न झाली आहे. देवा तुमच्यासाठी जे उचित आहे जे योग्य आहे तसेच तुम्ही केले आहे आणि मला चांगल्या हिताच्या गोष्टी खूप शिकवल्या आहेत. देवा अहो आम्हाला कसलीही प्रकारची शंका भीती नाही परंतू भक्तांचा उध्दार तुम्ही जर केला नाही तर लोक तुम्हाला नावे ठेवतील याचे भय तर तुमच्या मनात नक्कीच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “जसा संचिताचा प्रारब्धाचा ठेवा असेल तसा भोगावाच लागतो असा नियमच आहे. ”
अभंग क्र. २८५५
कोणाचे चिंतन करू ऐशा काळे । पायाचिया बळे कंठीतसे ॥१॥
पाहातसे वाट येई गा विठ्ठला । मज का हा केला परदेश ॥धृपद॥
बहुतांचे सत्ते झालो कासावीस । जाय रात्रंदिवस वैरियांचा ॥२॥
तुका म्हणे बैसे मनाचिये मुळी । तरीच ही जाळी उगवती ॥३॥
अर्थ
देवा संकटकाळामध्ये मी कोणाचे चिंतन करु कोणाला आठवू त्या संकटकाळामध्ये मी तुझ्या पायाच्याच आधाराने काळ कंठीत करीत आहे. हे विठ्ठला मी तुझी वाट पाहात आहे तू माझ्याकडे लवकर ये मला हा देश तू परदेश का केला आहेस ? देवा काम क्रोध आणि विविध प्रकारच्या विकाराच्या सत्तेने मी कासावीस झालो आहे आणि रात्रंदिवस मला वैऱ्यासारखा जात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तू माझ्या मनाच्या मूळापर्यंत जाऊन बस तरच या भवसागराच्या जाळयातून मी सुटू शकेल. ”
अभंग क्र. २८५६
का जी तुम्ही ऐसे नव्हा कृपावंत । निवे माझे चित्त ठायीच्या ठायी ॥१॥
काही शम नये विषम अंतरा । शांतीचा तो बरा ऐसा योग ॥धृपद॥
दुःखी होतो पंचभूताच्या विकारे । जडत्वे दातारे राखावी ती ॥२॥
तुका म्हणे मोडा अहंकाराची मान । धरितो चरण म्हणऊनि ॥३॥
अर्थ
देवा माझे चित्त जागच्या जागी निवांत राहील शांत होईल अशी माझ्यावर तुम्ही कृपा करुन कृपावंत का होत नाही. देवा माझ्या अंत:करणामध्ये सर्वत्र समानता तर विषमता कोठेही निर्माण होऊ नये आणि माझ्या अंत:करणात शांतीच नांदेल असा योग तुम्ही जुळवा. हे दातारा पंचभूताच्या विकाराने मी सारखा दु:खी होत आहे माझे स्वरुप आनंदस्वरुप आहे तरी देखील मी जडजीव आहे असेच मला ते पंचभूते दाखवित आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा एकदाची त्या अहंकाराची मान मोडून टाका म्हणूनच मी तुमचे चरण धरीत आहे. ”

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading