आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

९ ऑगस्ट, दिवस २२१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी २२६ ते २५० + सार्थ तुकाराम गाथा अभंग २६४१ ते २६५२
“९ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan xxxx August
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ९ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २६४१ ते २६५२ चे पारायण आपण करणार आहोत.
९ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी २२६ ते २५०,
226-14
इयाचि परी देख । तमसत्त्व अधोमुख । बैसोनि जै आगळीक । धरी रज ॥226॥
हे पहा, याचप्रमाणे ज्यावेळी तमोगुण व सत्वगुण खाली तोंड करून बसतात (कमी होतात) व रजोगुण ज्यावेळेला वृद्धी पावतो.
(रजोगुणाचे लक्षण)
227-14
आपलिया कार्याचा । धुमाड गावी देहाचा । माजवी तै चिन्हांचा । उदयो ऐसा ॥227॥
तेव्हा रजोगुण शरीररूप गावात आपल्या कार्याचा धुमाकूळ घालतो. त्यावेळी शरीरात लक्षणांचा असा उदय होतो.
228-14
पांजरली वाहुटळी । करी वेगळ वेटाळी । तैसी विषयी सरळी । इंद्रिया होय ॥228॥
पसरलेली वाहुटळ निरनिराळ्या पदार्थांचे (बरे वाईट न पहाता) एकीकरण करते, त्याप्रमाणे इंद्रियांना विषयांमधे मोकळीक असते.
229-14
परदारादि पडे । परी विरुद्ध ऐसे नावडे । मग शेळियेचेनि तोंडे । सैंघ चारी ॥229॥
परस्त्री वगैरेशी प्रसंग आला असता या गोष्टी शास्त्रनिषिद्ध आहेत असे त्यास वाटत नाही व मग तो शेळीप्रमाणे इंद्रियांना बरे वाईट विषय सरसकट चरतो.
230-14
हा ठायवरी लोभु । करी स्वैरत्वाचा राबु । वेटाळिता अलाभु । ते ते उरे ॥230॥
येथपर्यंत त्या रजोगुणी पुरुषाचा लोभ स्वेच्छाचारीपणाचा धुमाकूळ घालतो व दुसर्याच्या वस्तु लुबाडताना जेवढ्या वस्तू प्राप्त ककरून घेणे अशक्य असते, तेवढ्याच वस्तू शिल्लक रहातात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
231-14
आणि आड पडलिया । उद्यम जाती भलतिया । प्रवृत्ती धनंजया । हातु न काढी ॥231॥
आणि अर्जुना, कोणताही धंदा समोर आला असता, करण्याचा प्रसंग आला असता, तो धंदा करण्याविषयीचा मनाचा कल मागे घेत नाही.
232-14
तेवीचि एखादा प्रासादु । का करावा अश्वमेधु । ऐसा अचाट छंदु । घेऊनि उठी ॥232॥
त्याचप्रमाणे एखादे भले मोठे मंदिर बांधावे अथवा अश्वमेध यज्ञ करावा, असा अघटित नादाच्या मागे तो लागतो.
233-14
नगरेचि रचावी । जळाशये निर्मावी । महावने लावावी । नानाविधे ॥233॥
मोठमोठी शहरे निर्माण करावीत, जलाशय (तळी विहिरी) वगैरे पाण्याचे साठे बांधावेत व नाना प्रकारचे मोठे बगीचे अरण्यात निर्माण कराव्यात.
234-14
ऐसैसा अफाटी कर्मी । समारंभु उपक्रमी । आणि दृष्टादृष्ट कामी । पुरे न म्हणे ॥234॥
त्याप्रमाने तो अचाट कर्मांना आरंभ करतो आणि इहलोकीचे व परलोकप्राप्तीची इच्छा त्याला कधीही प्राप्त होत नाही.
235-14
सागरुही सांडी पडे । आगी न लाहे तीन कवडे । ऐसे अभिलाषी जोडे । दुर्भरत्व ॥235॥
समुद्र दुर्लभ खरा, पण तो या रजोगुणी पुरुषाच्या अभिलाषापुढे हार खाईल. अग्नीला कितीही जाळ घातला तरी, त्याची तृप्ती होत नाही असा तो दुर्भर आहे. खरा, परंतु त्याच्या अभिलाषांच्या दुर्भरत्वापुढे अग्नीची तीन कवड्या इतकीही किंमत नाही, असे त्याच्या अभिलाषांच्या ठिकाणी दुर्भरत्व असते.
236-14
स्पृहा मना पुढा पुढा । आशेचा घे दवडा । विश्व घापे चाडा । पायातळी ॥236॥
विषयतृष्णा किंवा विषयाची इच्छा ही चंचल मनाच्या पुढे पुढे आशेची धाव घेते व सर्व विश्वही फिरण्यास त्याला पुरेसे होत नाही.
237-14
इत्यादि वाढता रजी । इये चिन्हे होती साजी । आणि ऐशा समाजी । वेचे जरी देह ॥237॥
याप्रमाणे रजोगुणाचा उत्कर्ष झाला म्हणजे अशी लक्षणे प्रखरपणे (प्रगट) होतात. व अशा लक्षणांच्या समुदायात जर देह पडला तर (मृत्यू आला)
238-14
तरी आघवाचि इही । परिवारला आनी देही । रिगे परी योनिही । मानुषीचि ॥238॥
तर या सर्व लक्षणांनी युक्त असा तो याच रजोगुणांनी युक्त होऊन मनुष्ययोनीतच दुसर्या देहाने जन्म घेत असतो.
239-14
सुरवाडेंसि भिकारी । वसो पा राजमंदिरी । तरी काय अवधारी । रावो होईल ? ॥239॥
हे पहा एखादा भिकारी मनुष्य जर सर्व सुखासह आणि मोठ्या चैनीने रुबाबदारपणाने राजवाड्यात बसला ? तर तेवढ्यावरून तो राजा होऊ शकेल का ?
240-14
बैल तेथे करबांडे । हे न चुके गा फुडे । नेईजो का वऱ्हाडे । समर्थाचेनी ॥240॥
बैलाला जरी श्रीमंताच्या वर्हाडाबरोबरच्या गाडीला जोडून नेला, जाताना त्यातील वर्हाड पाच पक्वान्ने खातात. पण बैलाच्या नशीबी कडबा खाणेच ठरलेले असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
241-14
म्हणौनि व्यापारा हाती । उसंतु दिहा ना राती । तैसयाचिये पांती । जुंपिजे तो ॥241॥
म्हणून व्यापार कामधंदा यातुन ज्यांना राञंदिवस थोडीसुद्धा विश्रांती मिळत नाही अशा प्रकारच्या लोकांच्या पंक्तीस तो जुंपला जातो. म्हणजे तशांच्या कुळात त्याला जन्म प्राप्त होतो.
242-14
कर्मजडाच्या ठायी । किंबहुना होय देही । जो रजोवृत्तीच्या डोही । बुडोनि निमे ॥242॥
फार काय सांगायचे ? जो रजोगुणांनी बनलेल्या वृत्तीच्या डोहात बुडून मरण पावतो, तो काम्य कर्मे करणार्या कर्मठ लोकांच्या कुळामध्ये जन्मास येतो.
243-14
मग तैसाचि पुढती । रजसत्त्ववृत्ती । गिळूनि ये उन्नती । तमोगुण ॥243॥
त्याचप्रमाणे जेव्हा रजोगुण व सत्वगुण नाहीसे होऊन तमोगुण उन्नतीला येतो, म्हणजे वाढत जातो.
244-14
तैचि जिये लिंगे । देहीची सबाह्य सांगे । तिये परिस चांगे । श्रोत्रबळे ॥244॥
त्या वेळची जी लक्षणे देहाच्या आत व बाहेर असतात ती आम्ही सांगतो. ती चांगल्या प्रकारे एकाग्र चित्ताने श्रवण कर.
245-14
तरी होय ऐसे मन । जैसे रविचंद्रहीन । रात्रीचे का गगन । अंवसेचिये ॥245॥
ज्याप्रमाने सुर्य-चंद्राशिवाय अमावस्येच्या राञीचे आकाश पुर्णपणे अंधारमय असते. त्याप्रमानेच तमोगुणी मन हे विवेकहीन होते.
246-14
तैसे अंतर असोस । होय स्फूर्तिहीन उद्वस । विचाराची भाष । हारपे तै ॥246॥
त्याप्रमाणे त्याचे अंत:करण अमावस्येच्या राञीसारखे पूर्णपणे विचारशून्य व रिकामे असते व तेव्हा त्या अंत:करणात सारासार विवेकाची गोष्ट नाहीशी होते. विचाराच्या भाषेला त्या ठीकानी जागाच शिल्लक रहात नाही.
247-14
बुद्धि मेचवेना धोंडी । हा ठायवरी मवाळे सांडी । आठवो देशधडी । जाला दिसे ॥247॥
ज्याप्रमाने बुद्धी अवघड वेळेस दगडास सुद्धा मागे सारेन म्हणजे एकवेळेस दगड, बरा अशा वेळेस या मर्यादेपर्यंत बुद्धीने विचारशक्ती गमावलेली असते अथवा टाकुन दिलेली असते. आणि त्याची स्मरनशक्ती सुद्धा नष्ट झालेली असते.
248-14
अविवेकाचेनि माजे । सबाह्य शरीर गाजे । एकलेनि घेपे दीजे । मौढ्य तेथ ॥248॥
त्याच्या शरिरावरती आतील आणि बाहेरील अविवेक, अविचार हा नजरेस पडत असतो. व त्या तमोगुणी माणसाचे संपुर्ण व्यवहार हे मुर्खपणाचे प्रमान देतात.
249-14
आचारभंगाची हाडे । रुपती इंद्रियांपुढे । मरे जरी तेणेकडे । क्रिया जाय ॥249॥
या तमोगुणी पुरुषाच्या इंद्रियासमोर अनाचार हा कायमस्वरुपी उभा असतो. आणि जेव्हा ह्या तमोगुणी मनुष्याने हे शरीर त्यागले असता अथवा मृत्युलोकास गेला तरी, त्याने केलेली दष्कृत्ये किंवा पापक्रियाही त्यासोबतच यमयातना भोगावयास जात असते.
250-14
पै आणिकही एक दिसे । जे दुष्कृती चित्त उल्हासे । आंधारी देखणे जैसे । डुडुळाचे ॥250॥
ज्याप्रमाने काळकुट्ट अंधार्या राञीत सुद्धा घुबडास अतिस्पष्ट दिसते. त्याप्रमाने बाकीच्या लोकांपेक्षा त्यास वाईट कर्म किंवा पापकर्म करावयाचे झाल्यास सुद्धा त्यांच्या चित्तामध्ये फार उल्हास, आनंद असतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २२१ वा. ९, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २६४१ ते २६५२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २६४१
बराडियाची आवडी पुरे । जया झुरे साठी ते ॥१॥
तैसे जाले माझ्या मना । नुठी चरणावरूनि ॥धृपद॥
भागलिया पेणे पावे । विसांवे ते टाकणी ॥२॥
तुका म्हणे छाया भेटे । बरे वाटे तापे त्या ॥३॥
अर्थ
मागणारा व्यक्ती ज्या गोष्टीसाठी झुरत असतो ती त्याला भेटली की त्याची आवड पूर्ण होते. देवा त्याप्रमाणे माझ्या मनाचे झाले आहे. ते (मन) तुझ्या चरणाची इतकी आवड धरुन होते की ते (तुझे चरण) प्राप्त झाले त्यामुळे आता त्याच्यावरुन उठतच नाही. प्रवासी प्रवास करुन आपल्या ठिकाणावर ज्यावेळेस पोहोचतो तेथे तो विश्रांती घेतो. तुकाराम महाराज एखादया प्रवासाच्या उन्हाने अंग तापले आणि त्याला थंड छाया बसण्यासाठी मिळाली तर त्याला बरे वाटते त्याप्रमाणे माझ्या मनाला तुझ्या चरणाची मिठी पडली आहे त्यामुळे मलाही फार बरे वाटते आहे. ”
अभंग क्र. २६४२
बहुजन्मे सोस केला । त्याचा झाला परिणाम ॥१॥
विठ्ठलसे नाम कंठी । आवडी पोटी संचिते ॥धृपद॥
येथुन तेथवरी आता । न लगे चिंता करावी ॥२॥
तुका म्हणे धाले मन । हेचि दान शकुनाचे ॥३॥
अर्थ
मी खूप जन्मापासून ज्या गोष्टीची हाव धरली होती त्याचा आज शेवट झाला आहे. माझ्या पुण्य पूर्व संचित कर्मामुळे विठ्ठलाचे नाम मी कंठात धरले आहे आणि माझ्या ह्दयात त्याची आवड निर्माण झाली आहे आता माझ्या या जन्मापासून तर मागे जेवढे मी जन्म भोगले त्या सर्व जन्माची चिंता करण्याची गरजच राहिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “आता माझे मन तृप्त झाले असून हरीच्या प्राप्तीचे शुभशकुनाचे दानच हे आहेत. ”
अभंग क्र. २६४३
उसंतिल्या कर्मवाटा । बहु मोटा आघात ॥१॥
शीघ्र यावे शीघ्र यावे । हाती न्यावे धरूनि ॥धृपद॥
भागलो या खटपटे । घटपटे करिता ॥२॥
तुका म्हणे कृपावंता । माझी चिंता खंडावी ॥३॥
अर्थ
देवा संचितकर्मचा वाटा मी फेडित आलो आहे परंतू तसे करताना मला खूप आघात होत आहेत. त्यामुळे हे देवा तुम्ही लवकर लवकर या आणि मला हाताला धरुन न्यावे. देवा संसाराची खटपट आणि घटपट या न्यायांचा विचार केला आणि त्यामुळे मी खूप भागलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे कृपावंता माझ्या हया चिंतेचे तुम्ही खंडण करावे. ”
अभंग क्र. २६४४
तुम्हासी हे अवघे ठावे । किती द्यावे स्मरण ॥१॥
का बा तुम्ही ऐसे नेणे । निष्ठुर पणे टाळितसा ॥धृपद॥
आळविता मायबापा । नये कृपा अझूनि ॥२॥
तुका म्हणे जगदीशा । काय असा निजले ॥३॥
अर्थ
देवा तुम्हाला माझे सर्व दु:ख माहित आहे तरी तुम्हाला त्याची किती वेळा आठवण करुन दयावी. देवा तुम्ही मला निष्ठूरपणे का टाळता आहात माझे दु:ख तुम्हाला का समजत नाही ? हे अनंता मायबापा मी तुला इतक्या वेळा आळवले आहे तरी देखील अजून तुझी कृपा माझ्यावर का झाली नाही ? तुकाराम महाराज म्हणतात, “हे जगदीशा मला तुमची कृपा हवी आहे ती कृपा तुम्ही माझ्यावर करा असे काय निजले आहात ? ”
अभंग क्र. २६४५
नेले सळेंबळे । चित्तावित्ताचे गांठोळे ॥१॥
साह्य झाली घरिच्या घरी । होता ठायीच कुठोरी ॥धृपद॥
मी पातलो या भावा । कपट ते नेणे देवा ॥२॥
तुका म्हणे उघडे केले । माझे माझ्या हाते नेले ॥३॥
अर्थ
अहो देवाने बळजबरी करून माझे चित्तरूपी गाठोडे नेले आहे. अहो देव माझ्या देहरूपी घरांमध्ये हृदयाच्या कोपऱ्यात लपून बसला होता आणि माझ्या घरच्या म्हणजे इंद्रिय रुपी सर्व स्वजनांनी त्याला सहाय्य केले आणि मग देवाने माझ्या घरात चोरी केली. देवा मी तुमच्यावर खरा भक्तिभाव ठेवला व या संसारात आलो परंतु तुमचे कपट मला माहीतच नव्हते. तुकाराम महाराज म्हणतात देव तू माझ्या हातातले सर्व काही नेले म्हणजे चित्तरुपी गाठोडे घेऊन गेला आणि मला उघडे पाडले.
अभंग क्र. २६४६
झाला हा डांगोरा । मुखी लहानही थोरा ॥१॥
नागविलो जनाचारी । कोणी बैसो नेदी दारी ॥धृपद॥
संचिताचा ठेवा । आता आला तैसा घ्यावा ॥२॥
तुका म्हणे देवे । केले आता हे बरवे ॥३॥
अर्थ
लहान व थोर यांच्या मुखातून अशी दवंडी पिटवली जात आहे की, देवाने मला जनमाणसामध्ये नागवे केले आहे आणि कोणीही मला दारात देखील बसू देत नाही. देवा अरे माझे संचित कर्म असेल तसेच मला भोग भोगावे लागतील यामध्ये तुझा काय दोष आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “उलट देवाने जे केले आहे ते चांगलेच केले आहे. ”
अभंग क्र. २६४७
किती चौघाचारे । येथे गोविली वेव्हारे ॥१॥
असे बांधविले गळे । होऊ न सकती निराळे ॥धृपद॥
आपले आपण । केले का नाही जतन ॥२॥
तुका म्हणे खंडदंडे । येरझारी लपती लंडे ॥३॥
अर्थ
असे कितीतरी लोक आहेत की ते चारचौघांमध्ये लौकिकाच्या व्यवहारामध्ये गुंतलेले आहेत. अशा प्रकारे या लोकांनी आपल्याला लौकिकाच्या व्यवहाराने बांधून घेतले आहेत ते त्यापासून वेगळे होऊच शकत नाही. या लोकांनी आपल्या स्वत:च्या हिताचेच जतन का केले नाही ? तुकाराम महाराज म्हणतात, “यमाच्या दंडापासून आणि जन्ममरणाच्या येरझाऱ्यापासून हे लबाड लोक लपत आहेत. ”
अभंग क्र. २६४८
पांडुरंगा सारीखा सांडुनि वेव्हारा । आणिकाची करा आस वाया ॥१॥
बहुता दिधला उद्धार उदारे । निवडीना खरे खोटे काही ॥धृपद॥
याचिया अंकिता वैकुंठ बंदर । आणीक वेव्हार चालितना ॥२॥
तुका म्हणे माझे हातीचे वजन । यासी बोल कोण ठेवू सके ॥३॥
अर्थ
पाडूरंगासारखा मोठा सावकार सोडून तुम्ही इतर व्यर्थ कोणाची आशा का धरता ? त्याला शरण आलेल्या भक्तांचा त्याने उदारपणे उध्दार केला ते खरे आहे की खोटे आहे याचा देखील त्याने निवाडा केला नाही. याला अंकीत असलेले शरण आलेले भक्तांचे बंदर म्हणजे वैकुंठ आहे तेथे दुसरा कोणताही व्यवहार चालतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “मी जे काही तुम्हाला सांगत आहे तो माझा स्वत:चा अनुभव आहे आणि मी जे काही बोलतो आहे याचे वजन मी माझ्या हाताने केले आहे व माझ्या बोलण्याला कुणी नांव ठेवू शकेल काय ? ”
अभंग क्र. २६४९
ठेवूनि इमान राहिलो चरणी । म्हणउनि धणी कृपा करी ॥१॥
आम्हासी भांडार करणे जतन । आले गेले कोण उंच निच ॥धृपद॥
करूनि सांभाळी राहिलो निराळा । एक एक वेळा आज्ञा केली ॥२॥
तुका म्हणे योग्यायोग्य हे विनीत । देवा नाही येथे चित्त देणे ॥३॥
अर्थ
मी इमान ठेवून माझ्या धन्याच्या चरणाजवळ राहिलो आहे त्याच्यामुळेच तर माझा धनी माझ्यावर कृपा करतो. आमच्याकडे धन्याचे म्हणजे देवाचे भांडारच आहे त्याचे जतन आम्हाला करावे लागते आणि तेथे कोण चांगला कोण वाईट येतो जातो याची खबरदारी आम्हाला घ्यावी लागते. देवाने त्याच्या भांडाराचे सांभाळ करण्यासाठी आमची निवड केली आहे आणि तो यापासून वेगळा राहिला आहे त्याने एकदाच आम्हाला सांगितले की कोणते काम कोणत्या वेळी करायचे, ही आज्ञाही त्याने आम्हाला दिली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “येथे काय योग्य आहे काय नाही कोण नम्र आहे कोण नाही हे आम्हीच ठरवतो देवाला येथे याबाबतीत आम्ही लक्ष देण्याचे कामच ठेवले नाही. ”
अभंग क्र. २६५०
आता नव्हे गोड करिता संसार । आणीक संचार झाला माजी ॥१॥
ब्रम्हरसे गेले भरूनिया अंग । आधील तो रंग पालटला ॥धृपद॥
रसनेचिये रुची कंठी नारायण । बैसोनिया मन निवविले ॥२॥
तुका म्हणे आता बैसलो ठाकणी । इच्छेची ते धणी पुरईल ॥३॥
अर्थ
संसार करताना आता मला गोड वाटत नाही कारण एक वेगळाच संचार माझ्यामध्ये झाला आहे. तो संचार म्हणजे माझ्या संपूर्ण अंगामध्ये ब्रम्हरसच भरुन गेले आहे आणि पहिला जो माझ्या ठिकाणी देहाभिमानाचा रंग होता तो आता पूर्णपणे पालटला आहे. आता रसनेला म्हणजे जिव्हेला नारायणाचे नामच आवडत आहे आणि कंठामध्येच नारायण वसला त्यामुळे माझे मनही आता शांत झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मी आता एकाच ठिकाणी बसलो आहे मी कोठेही जाणार नाही व मी जेथे बसलो आहे तेथेच माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ”
अभंग क्र. २६५१
आता काशासाठी दुरी । अंतर उरी राखिली ॥१॥
करी लवकरी मुळा । लहान तळा मुळीचिया ॥धृपद॥
दोही ठायी उद्वेगवाणे । दरुषणे निश्चिंती ॥२॥
तुका म्हणे वेग व्हावा । ऐसी जीवा उत्कंठा ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही तुमच्यात व आमच्यात अजूनही का भेद ठेवला आहे, का बरे आम्हाला तुमच्यापासून दूर करता ? देवा जे मूळ आहे ते म्हणजे तुझे स्वरुप आहे त्या मुळाशी माझे लहान मूळ म्हणजे माझ्या जीवाला त्या मूळ स्वरुपाशी लवकर एकरुप कर. देवा माझे मन संसारात आणि परमार्थामध्ये दोन्हीकडेही समाधानी नाही एकदा की तुझे आत्मस्वरुपाने दर्शन झाले की मग मी निश्चिंत होईन. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आपल्या दोघामधील भेद नष्ट व्हावा लवकरच तू मला तुझ्या स्वरुपाशी एकरुप करावे अशीच उत्कंठता माझ्या जीवाला आहे. ”
अभंग क्र. २६५२
पडिली हे रूढि जगा परिचार । चालविती वेव्हार सत्य ह्मूण ॥१॥
मरणाची का रे नाही आठवण । संचिताचे धन लोभ हेवा ॥धृपद॥
देहाचे भय ते काळाचे भातुके । ग्रासूनि ते एके ठेविलेसे ॥२॥
तुका म्हणे काही उघडा रे डोळे । जाणोनि अंधळे होऊ नका ॥३॥
अर्थ
जगामध्ये अशी रुढी प्रस्थापित झाली आहे की देह आणि प्रपंचातील व्यवहार हे सत्य आहेत त्यामुळेच तर लोक प्रपंच करतात. पण तुला मरणाची तरी कशी आठवण नाही राहिली का रे धनाचा हेवा धरुन त्याचा संचय करतो कशासाठी ? अरे देहाला तर काळाचे भय आहे ते तर काळाच खाऊच आहे काळाने देहाला केव्हाच ग्रासून ठेवले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे तुम्ही आता तरी डोळे उघडा रे सर्व जाणून देखील तुम्ही असे आंधळे होऊ नका. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















