२९ ऑगस्ट, दिवस २४१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ३०१ ते ३२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २८८१ ते २८९२

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२९ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २९ August
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २९ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २८८१ ते २८९२
चे पारायण आपण करणार आहोत.
२९ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ३०१ ते ३२५

301-15
जैसा अग्नीचा डोंगरु । नेघे कोणी बीज अंकुरु । तैसा मनी जया विकारु । उदैजेना ॥301॥
आगीमध्ये जसे कसलेही बी रुजणे शक्य नाही, तसा ज्याच्या मनात विकार (सत्यत्वाने) उत्पन्नच होत नाही. 1
302-15
जैसा काढिलिया मंदराचळु । राहे क्षीराब्धि निश्चळु । तैसा नुठी जया सळु । कामोर्मीचा ॥302॥
रवि (मंथा) म्हणून योजलेला मंदारपर्वत काढल्यावर समुद्र जसा स्थिर झाला त्याप्रमाणे, सदैव शांत असल्यामुळे ज्याच्या चित्तात कामाची उर्मी उठत नाही. 2
303-15
चंद्रमा कळी धाला । न दिसे कोणे आंगी वोसावला । तेवी अपेक्षेचा अवखळा । न पडे जया ॥303॥
षोडषकलापूर्ण चंद्र जसा कोणत्याही अंगाने अपूर्ण नसतो, तसा पूर्णस्वरूप ह्याला कसलीच अपेक्षा असणे शक्य नाही. 3
304-15
हे किती बोलू असांगडे । जेवी परमाणु नुरे वायूपुढे । तैसे विषयांचे नावडे । नांवचि जया ॥304॥
ह्या पुरुषाच्या निरुपम गोष्टी तुला किती सांगाव्या ? वायूपुढे जसे परमाणूचे नावही घेण्याची सोय नाही, तसे ह्याला विषयाचे नांवही आवडत नाही. 4
305-15
एवं जे जे कोणी ऐसे । केले ज्ञानाग्नि हुताशे । ते तेथ मिळती जैसे । हेमी हेम ॥305॥
ह्याप्रमाणे जे किंवा ज्ञानाग्नीने शुद्ध झाले आहेत, ते, सुवर्णातिसुवर्ण मिळावे त्याप्रमाणे क्षेत्रं प्राप्त होतात. 5


306-15
तेथ म्हणिजे कवणे ठाई । ऐसेही पुससी काही । तरी ते पद गा नाही । वेचु जया ॥306॥
तेथे म्हणजे कोठे असे म्हणशील तर, ज्या पदाचा केव्हाही नाश होत नाही अशी जी परमात्मवस्तु तेथे प्राप्त होतात. (तदरूप होतात) 6
307-15
दृश्यपणे देखिजे । का ज्ञेयत्वे जाणिजे । अमुके ऐसे म्हणिजे । ते जे नव्हे ॥307॥
जे दृष्टीचा विषय होईल, किंवा जे जाणले जाईल, जे असे किंवा तसे आहे असे म्हणता येईल, असे जे नाही (ते, ते पद होय. ) 7
न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः ।
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥15. 6॥
308-15
पै दीपाचिया बंबाळी । का चंद्र हन जे उजळी । हे काय बोलो अंशुमाळी । प्रकाशी जे ॥308॥
दिव्याच्या भडक तेजांत किंवा चंद्रप्रकाशात जे स्पष्ट दिसते, इतकेच काय सांगावे ? तर सूर्य ज्याचे प्रकाशन करितो. 8
309-15
ते आघवेचि दिसणे । जयाचे का न देखणे । विश्व भासतसे जेणे । लपालेनी ॥309॥
हा सर्व दिसण्याचा व्यवहार, म्हणजे ज्याचे अदर्शन किंवा अज्ञान आहे; कारण, त्या वस्तूच्या अदर्शन स्थितीतच (अज्ञानांतच) विश्वाभास होत असतो. 9
310-15
जैसे शिंपीपण हारपे । तव तव खरे होय रुपे । का दोरी लोपता सापे । फार होइजे ॥310॥
शिपीचा शिंपीपण जसा जसा नजरेआड होतो तसे तसे रुपे खरे वाटू लागते, किंवा दोरीचा दोरपणा लोपेल तोंवरच सापाची प्रतिष्ठा असणार. 310
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


311-15
तैसी चंद्रसूर्यादि थोरे । इये तेजे जिये फारे । तिये जयाचेनि आधारे । प्रकाशती ॥311॥
त्याचप्रमाणे, हे चंद्रसूर्यादि प्रकाशित थोर पदार्थ जिच्या अंधारांत म्हणजे (अज्ञानांत) प्रकाशित होतात. 11
312-15
ते वस्तु की तेजोराशी । सर्वभूतात्मक सरिसी । चंद्रसूर्याच्या मानसी । प्रकाशे जे ॥312॥
ती वस्तु तेजोराशि (तेजाची खाण) खरी; ती सर्व भूतांचा आत्मा असून सर्वत्र सम आहे, आणि चंद्र- सुर्यांनाही तिचाच प्रकाश आहे. 12
313-15
म्हणौनि चंद्रसूर्य कडवसा । पडती वस्तूच्या प्रकाशा । यालागी तेज जे तेजसा । ते वस्तूचे आंग ॥313॥
(अशी वस्तुस्थिति आहे) म्हणून, वस्तूच्या प्रकाशापुढे चंद्र व सूर्य हे कवडशासारखे क्षुद्र होत; यास्तव तेजिष्ठ वस्तूंच्या ठिकाणचे तेज ती वस्तुप्रभा होय. 13
314-15
आणि जयाच्या प्रकाशी । जग हारपे चंद्रार्केंसी । सचंद्र नक्षत्रे जैसी । दिनोदयी ॥314॥
सूर्योदय झाल्यावर चंद्रासह सर्व नक्षत्रे जशी लोप पावतात, त्याप्रमाणे, जी आत्मवस्तु स्वप्रकाशत्वाने प्रकाशित झाली असता (आत्मानुभवकाली) चंद्रसूर्यासह जगाचा लोप होतो, 14
315-15
नातरी प्रबोधलिये वेळे । ते स्वप्नीची डिंडीमा मावळे । का नुरेचि सांजवेळे । मृगतृष्णिका ॥315॥
किंवा जागृतीत स्वप्नातील सर्व व्यवहार मावळतो अथवा संध्याकाळ झाल्यावर ज्याप्रमाणे मृगजल आपोआप नाहीसे होते. 15


316-15
तैसा जिये वस्तूच्या ठायी । कोण्हीच का आभासु नाही । ते माझे निजधाम पाही । पाटाचे गा ॥316॥
त्याप्रमाणे, ज्या वस्तूच्या ठिकाण अन्य कसलाही आभास नाही ते, अर्जुना, माझे मुख्यस्थान म्हणजे स्वरूप होय. 16
317-15
पुढती जे तेथ गेले । ते न घेती माघौती पाउले । महोदधी का मिनले । स्रोत जैसे ॥317॥
महासागराला मिळून सागररूप झालेले ओढे जसे माघारे येणे संभवत नाही, त्याप्रमाणे त्या स्थानाला जे गेले त्यांची पुन्हा जन्माला येण्याची गोष्टच नको. 17
318-15
का लवणाची कुंजरी । सूदलिया लवणसागरी । होयचि ना माघारी । परती जैसी ॥318॥
किंवा मिठाची केलेली हत्तीण लवण सागरांत सोडली असता, जशी परत येणे शक्य नाही. 18
319-15
नाना गेलिया अंतराळा । न येतीचि वन्हिज्वाळा । नाही तप्तलोहौनि जळा । निघणे जेवी ॥319॥
अथवा आकाशात गेलेल्या अग्निज्वाला जशा परत फिरत नाहीत किंवा तापलेल्या लोखंडावर टाकलेले पाणी परत पाणीरूपाने आढळणे शक्य नाही. 19
320-15
तेवी मजसी एकवट । जे जाले ज्ञाने चोखट । तया पुनरावृत्तीची वाट । मोडली गा ॥320॥
त्याप्रमाणे, यथार्थज्ञानाने जे माझ्याशी ऐक पावले म्हणजे मद्रूप झालेत्यांना पुन्हा मागे येण्याला रस्ता नाही. (पुनर्जन्म नाही) 320
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


321-15
तेथ प्रज्ञापृथ्वीचा रावो । पार्थु म्हणे जी जी पसावो । परी विनंती एकी देवो । चित्त देतु ॥321॥
(येथून 342 ओवी पर्यंतच्या ओव्या ह्या पुढील श्लोकाचे अवतरण जाणाव्या)
हे भाषण ऐकून सर्व बुद्धिमंतांमध्ये श्रेष्ठ असा जो अर्जुन, तो म्हणाला, हो हो ! मजवर आपला केवढा प्रसाद आहे म्हणून सांगावे ! पण, प्रभो, आणखी एक शंका येते, तिचे निरसन व्हावे अशी इच्छा आहे. 21
322-15
तरी देवेसि स्वये एक होती । मग माघौते जे न येती । ते देवेसि भिन्न आथी । की अभिन्न जी ॥322॥
ती अशी – जे आपल्याशी एकवट झाले, म्हणजे ऐक्य पावले म्हणून माघारे येत नाहीत, ते, प्रभो, आपल्याहूनमूळचे भिन्न आहेत की अभिन्न आहेत ? 22
323-15
जरी भिन्नचि अनादिसिद्ध । तरी न येती हे असंबद्ध । जे फुला गेले षट्पद । ते फुलेचि होती पा ॥323॥
जर ते अनादिसिद्ध म्हणजे मूळचेच भिन्न असतील तर माघरे येत नाहीत हे म्हणणे जुळत नाही; पहा कि मधु सेवनार्थं पुष्पांशी ऐक्य पावलेले भ्रमर काय पुष्परूपच होतात म्हणावयाचे ? 23
324-15
पै लक्ष्याहूनि अनारिसे । बाण लक्ष्यी शिवोनि जैसे । मागुते पडती तैसे । येतीचि ते ॥324॥
दुसरे असे की नेम मारावयाच्या वस्तुहून भिन्न असलेले बाण त्याला स्पर्शून जसे मागे खाली पडतात, तसे भिन्न असून आपल्याला मिळालेले परत आलेच पाहिजेत. 24
325-15
नातरी तूचि ते स्वभावे । तरी कोणे कोणासि मिळावे । आपणयासी आपण रुपावे । शस्त्रे केवी ? ॥325॥
नाहीतर तुम्ही तेच ते अशी जर वस्तुस्थिति असेल, तर, कोणी कोणास मिळावयाचें ? शस्त्र आपले आपल्यालाच कसे खोचणार ? 25

दिवस २४१ वा. २९, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २८८१ ते २८९२
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २८८१
केले तरी आता साचची करावे । विचारिले द्यावे कृपादान ॥१॥
संकल्पासी नाही बोलिला विकल्प । तुम्हा पाप पुण्य कळे देवा ॥ध्रु॥
उदार विख्यात तुम्ही भूमंडळी । ऐसी ब्रीदावळी गर्जतसे ॥२॥
तुका म्हणे अहो रखुमाईच्या वरा । उपरोध धरा माझा आता ॥३॥
अर्थ
हे देवा तुम्हाला खरोखरच माझे कल्याण करायचे असेल तर तुम्ही कृपा करुन ते करा आणि विचार करुन मला कृपादान दयावे. देवा कोणताही चांगला संकल्प करण्याचा ठरवला तर ते करु नये असे कोठेही सांगितले आहे काय आणि तुम्हाला पाप आणि पुण्य हे तर चांगलेच कळते. देवा सर्व भूमंडळावर तुम्ही उदार आहात अशी ब्रीदावळी गर्जत आहे व ही तुमची ब्रीदावळी सर्वत्र विख्यात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो रुक्मिणीच्या वरा तुमची जगामध्ये उदार अशी किर्ती विख्यात आहे मग माझे तुम्ही कल्याण का करत नाही माझाच तुम्ही संकोच का करता ? ”
अभंग क्र. २८८२
अहो पुरुषोत्तमा । तुम्हा काशाची उपमा ॥१॥
सतत तो नाही बुद्धी । नाळविता नाही शुद्धि ॥धृपद॥
जागविले तरी । तुम्हा व्यक्ती येणे हरी ॥२॥
तुका म्हणे देवा । तुम्हा नित्य दिस नवा ॥३॥
अर्थ
अहो पुरुषोत्तमा तुम्हाला कशाची उपमा दयावी ? माझी बुध्दी स्वतंत्र नाही आणि तुम्हाला आळवण्यास गेले तर माझा देह भाव जाग्यावर राहात नाही. हे हरी तुम्हाला जागविले तर तुम्ही लगेच व्यक्त होता म्हणजे अवतार घेता. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्हाला प्रत्येक दिवस नवा आहे. ”
अभंग क्र. २८८३
मथने भोगे सार । ताके घडे उपकार ॥१॥
बरवी सायासाची जोडी । अनुभविया ठावी गोडी ॥धृपद॥
पाक आणि रुचि । जेथे तेथे ते कइंची ॥२॥
वाढितो पंगती । तुका आवडी संगती ॥३॥
अर्थ
दह्याचे मंथन केले तर लोणी आपल्याला मिळते आणि उरलेले ताक दुसऱ्याला दिले तर त्यात परोपकार घडते. अशा प्रकारे कष्ट केल्याने चांगला लाभ आपल्याला प्राप्त होतो आणि अनुभवी माणसाला त्या लाभाची गोडी ठाऊक असते. स्वयंपाक आणि त्या स्वयंपाकाची रुची हे एका ठिकाणी जेथे तेथे कसे येऊ शकतात परंतू ज्याला स्वयंपाकाची पूर्ण माहिती आहे त्याच्याविषयी अनुभव आहे तेथे मात्र स्वयंपाक आणि स्वयंपाकाविषयी आवड हे मात्र येतेच. तुकाराम महाराज म्हणतात, “माझ्या आवडीचे ब्रम्हरसाचे भोजन संतांच्या संगतीत राहून व जे कोणी संतांच्या पंगतीत बसले आहेत त्यांना मी माझ्या आवडीचे ब्रम्‍ह रसाचे भजन वाढत आहे. ”
अभंग क्र. २८८४
चिंतनाची जोडी । हाचि लाभ घडोघडी ॥१॥
तुम्ही वसूनि अंतरी । मज जागवा निर्धारी ॥धृपद॥
जेथे जेथे जाय मन । आड घाला सुदर्शन ॥२॥
तुका म्हणे भोजे । मग मी नाचेंन निर्ल्लज ॥३॥
अर्थ
हरीनामाचे चिंतन केल्याने मला सतत चिंतनाचाच लाभ घडोघडीला होत आहे. त्यामुळे देवा तुम्ही माझ्या अंत:करणात वस्ती करा आणि हरीनाम चिंतन करण्याविषयीच्या माझ्या निर्धाराला नेहमी जागृत करा. देवा माझे मन तुमच्या चिंतनावाचून जेथे जेथे जाईल तेथे तुमचे सुदर्शन त्याला आडवे घाला. तुकाराम महाराज म्हणतात, “मग मी निर्लज्ज होऊन हरीनाम चिंतनात आनंदाने नाचेन. ”
अभंग क्र. २८८५
आवडीवी न पुरे धणी । प्रीत मनी बैसली ॥१॥
नित्य नवा कळवळा । मायबाळामध्ये तो ॥धृपद॥
सुख सुखा भेटो आले । होय वाल्हे पोटींचे ॥२॥
तुका म्हणे ब्रम्हानंदे । संतवृंदे चरणापे ॥३॥
अर्थ
संतांच्याविषयी इतकी आवड माझ्या मनात बसली आहे की ती कधीही तृप्त होतच नाही. मायबाळामध्ये जसा नित्य नवा कळवळा आहे अगदी तसाच आमच्यामध्ये आहे. आई आणि मुलाची भेट जर घडली तर ती भेट नाही तर सुखच जणू सुखाला भेटायला आले आहे असे वाटते इतके ते घट्ट प्रेम असते. तुकाराम महाराज म्हणतात, “संत हे ब्रम्हानंदाचे स्वरुप असतात त्यामुळे त्यांच्या चरणाचीच आवड धरावी. ”
अभंग क्र. २८८६
जडलो तो आता पायी । होऊ काई वेगळा ॥१॥
तुम्ही संती कृपा केली । गंगे चाली ओघाची ॥धृपद॥
सांभाळिलो मायबापा । केलो तापावेगळा ॥२॥
वोरसे या जीव धाला । तुका ठेला मौन्यचि ॥३॥
अर्थ
हे संतजनहो मी आता तुमच्या पायाशी जडलो गेलो आहे आता मग त्यापासून मी वेगळा होईल काय ? गंगेचा ओघ ज्याप्रमाणे रस्त्यातील सर्व लोकांचे पाप धुवून टाकते सर्व वृक्षांना सर्वानाच तृप्त करते त्याप्रमाणे तुम्ही संतांनी माझ्यावर कृपा केली आहे. हे मायबापानो तुम्ही माझा सांभाळ केला आणि मला त्रिविधतापापासून वेगळे केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे संतजनहो तुमच्या कृपा आर्शिवादाने तुमच्या प्रेमाने माझा जीव तृप्त झाला आहे त्यामुळे अधिक काय बोलावे त्यामुळेच मी मौन धारण केले आहे. ”
अभंग क्र. २८८७
काळावरी सत्ता । ऐशा करितो वारता ॥१॥
तो मी हीना हूनि सांडे । देवे दुऱ्हे काळतोंडे ॥धृपद॥
मानूनी भरवसा । होतो दासा मी ऐसा ॥२॥
तुका म्हणे मान । गेलो वाढवू थोरपण ॥३॥
अर्थ
माझी काळावर सत्ता आहे अशा गप्पा मी मारत होतो. परंतू मी तर हीनाहूनही हीन आहे देव माझ्यापासून अंतरल्यामुळे मी काळतोंडा झालो आहे. मी असा भरवसा धरला होता की माझी काळावर सत्ता आहे आणि “मी विठ्ठलाचा दास आहे” असे देखील गर्वाने म्हणत होतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी लोकांमध्ये माझा मान सन्मान वाढवायला गेलो माझा मोठेपणा वाढवायला गेलो परंतू मी माझेच नुकसान करुन घेतले. ”
अभंग क्र. २८८८
समर्थाचे सेवे कोठे नाही घात । पाहो नये अंत पांडुरंगा ॥१॥
आहे तैसी नीत विचारावी बरी । येऊनी भीतरी वास करा ॥धृपद॥
निढळ राखिले तरी भयाभीत । हर्षामर्ष चित्त पावतसे ॥२॥
तुका म्हणे तरी कळेल निवाड । दर्शनाची चाड शुभकीर्ति ॥३॥
अर्थ
समर्थ व्यक्तीची जो सेवा करतो त्याचा कोठेही घात होत नाही त्यामुळे पाडूरंगा तुम्ही समर्थ आहात आणि मी तुमचा सेवक आहे त्यामुळे तुम्ही माझा अंत पाहू नका. समर्थ व्यक्तीने कसे वागावे कसे राहावे याविषयी धर्मनीती आहे त्या धर्मनीतीचा तुम्ही विचार करावा आणि विचार केल्यानंतर माझ्या अंत:करणामध्ये येऊन तुम्ही वास करावा. देवा तुम्ही जर मला असेच अभागी ठेवले तर माझ्या चित्ताला जन्ममरणाचे भय वाटेल व मला अनेक प्रकारचे सुखदु:खे प्राप्त होतील. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मला केवळ तुमच्या दर्शनाचीच एक आवड आहे तुम्ही मला दर्शन दया तरच जगाला तुमची किर्ती कळेल व तुम्ही सर्व समर्थ आहात असा निवाडा देखील होईल. ”
अभंग क्र. २८८९
बहु धीर केला । जाण न होसी विठ्ठला ॥१॥
आता धरीन पदरी । करीन तुज मज सरी ॥धृपद॥
झालो जीवासी उदार । उभा राहिलो समोर ॥२॥
तुका विनवी संता । ऐसे सांगा पंढरिनाथा ॥३॥
अर्थ
हे विठ्ठला मी आजपर्यंत खूपच धीर धरला आहे परंतू तुला त्याची जाणीवच होत नाहीये. परंतू मी आता तुझा पदरच धरीन आणि तुझी व माझी बरोबरीच करीन. आता बाकी काही नाही मी माझ्या जीवावर उदार झालो आहे आणि तुझ्या समोर उभा राहीलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पंढरीनाथा माझी सर्व कळकळ मी संतांना सांगेन. ”
अभंग क्र. २८९०
नेदावी सलगी न करावा संग । करी चित्ता भंग वेळोवेळा ॥१॥
सर्प शांतिरूप न म्हणावा भला । झोंबे खवळीला तात्काळ तो ॥२॥
तुका म्हणे दुरी राखावा दुर्जन । करावे वचन न घडे ते ॥३॥
अर्थ
दुष्ट व्यक्तीशी कधीही सलगी व त्याचा कधीही संग करु नये कारण तो वेळोवेळा आपल्या शांत चित्तेचा भंग करत असतो. सर्पाला कधीही शांतस्वरुप म्हणू नये हेच चांगले कारण त्याला थोडे जरी खवळविले तरी तो तात्काळ चावा घेण्याचा प्रयत्न करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “अगदी त्याप्रमाणे दुर्जन व्यक्तीपासून आपण दूरच राहावे त्याच्याशी कधीही बोलण्याची वेळ येऊ नये असेच राहावे. ”
अभंग क्र. २८९१
अभयदान मज देई वो दातारा । कृपेच्या सागरा मायबापा ॥१॥
देहभाव तुझ्या ठेवियेला पायी । आणीक मी काही दुजे नेणे ॥धृपद॥
सेवाभक्तिहीन नेणता पतित । आता माझे हित तुझ्या पायी ॥२॥
तुका म्हणे तुझे नाम दिनानाथ । ते मज उचित करी आता ॥३॥
अर्थ
हे दातारा कृपेच्या सागरा मायबापा तू मला अभयदान दयावे. देवा मी माझा देहभावच तुझ्या पायी ठेवलेला आहे याशिवाय मी दुसरे काहीही जाणत नाही. देवा मी सेवाहीन व भक्तीहीन आहे अज्ञानी आहे पतित आहे आता माझे सर्व हित तुझ्या पायाजवळच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुझे नाम दीनानाथ आहे त्यामुळे माझ्या दीनाचा तू नाथ हो आणि माझा उध्दार कर व तुझ्या नामाला तू सार्थ कर. ”
अभंग क्र. २८९२
करावा वर्षाव । तृषाक्रांत झाला जीव ॥१॥
पाहे आकाशाची वास । जाणता तू जगदिश ॥धृपद॥
संयोगे विस्तार । वाढी लागे तो अंकूर ॥२॥
तुका म्हणे फळे । चरणांबुजे ते सकळ ॥३॥
अर्थ
देवा तुमच्या कृपेचा तुमच्या प्रेमाचा वर्षाव माझ्यावर करा कारण माझा जीव फार तृष्णांकित झाला आहे. देवा तू आकाशाचेच स्वरुप आहेस त्यामुळे मी आकाशाकडे आशा देऊन पाहात आहे. मोठया आशेने आकाशाकडे पाहात आहे. हे जगदीशा तू सर्व काही जाणतो आहेस. हे जगदीशा तुझ्या कृपाजलाचा जर संयोग झाला तर माझ्या अंत:करणातील ज्ञानांकुराचा वाढ होऊ लागतो आणि ते विस्तार पावु लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुमचे चरण म्हणजे माझ्यासाठी सर्व प्रकारचे फळच आहे. ”

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading