१९ ऑगस्ट, दिवस २३१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ५१ ते ७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २७६१ ते २७७२

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१९ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १९ August
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १९ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २७६१ ते २७७२ चे पारायण आपण करणार आहोत.
१९ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ५१ ते ७५ ,

51-15
अर्जुना हे कवतिक । सांगता असे अलौकिक । जे वाढी अधोमुख । रुखा यया ॥५१॥
अर्जुना, या संसारवृक्षाचे आश्चर्य सांगावयास लागले तर लोकोत्तर आहे. कारण की या संसारवृक्षाची वाढ खालच्या बाजुस आहे.
52-15
जैसा भानू उंची नेणो के । रश्मिजाळ तळी फाके । संसार हे कावरुखे । झाड तैसे ॥५२॥
ज्याप्रमाणे सूर्य आकाशात किती उंच आहे हे कळत नाही, परंतु सुर्याच्या किरणसमुदाय संपुर्ण जग प्रकाशमय करते, (यावरुन त्याची अथांगपणा जाणवेल) त्याचप्रमाने हे संसाररुपी वृक्ष वर मुळ आणि खाली शाखा पसरलेल्या असल्यामुळे विचिञ आश्चर्य आहे.
53-15
आणि आथी नाथी तितुके । रुंधले असे येणेचि एके । कल्पांतीचेनि उदके । व्योम जैसे ॥५३॥
ज्याप्रमाणे या विक्ष्वामध्ये जेवढ्या वस्तु आहेत, तेवढ्या सर्व वस्तु वृक्षाने व्यापुन टाकलेल्या आहेत. ज्याप्रमाने कल्पातांच्या वेळेस संपुर्ण आकाश पाण्याने व्यापुन टाकले जाते.
54-15
का रवीच्या अस्तमानी । आंधारेनि कोंदे रजनी । तैसा हाचि गगनी । मांडला असे ॥५४॥
अथवा सूर्याचा अस्त झाला म्हणजे जशी रात्र अंधाराने व्यापून जाते, त्याप्रमाणे ह्याच एका वृक्षाने आकाश व्यापले आहे.
55-15
यया फळ ना चुंबिता । फूल ना तुरंबिता । जे काही पंडुसुता । ते रुखुचि हा ॥५५॥
अर्जुना या संसारवृक्षाचे फळ खाण्याकरता पाहवयास गेले तर याला फळ नाही व वास घेण्याकरता फूल पाहयला गेले तर याला फूलही नाही मग जे काही आहे ते हा वृक्षच आहे.


56-15
हा ऊर्ध्वमूळ आहे । परी उन्मूळिला नोहे । येणेचि हा होये । शाड्वळु गा ॥५६॥
हा संसारवृक्ष वर मूळ असलेला आहे, परंतु हा उपटून पडलेला नाही. या वृक्षाचे मुळ हे परब्रम्ह आहे. याच कारणाने अर्जुना हा संसारवृक्ष नेहेमी हिरवागार आणि टवटवित आहे.
57-15
आणि ऊर्ध्वमूळ ऐसे । निगदिले कीर असे । परी अधीही असोसे । मूळे यया ॥५७॥
आणि हा संसारवृक्ष वर मूळ असलेला आहे असे सांगितले खरे, परंतु याला खालीही पुष्कळ मुळे आहेत.
58-15
प्रबळला चौमेरी । पिंपळा का वडाचिया परी । जे पारंबियांमाझारी । डहाळिया असती ॥५८॥
झपाट्याने वाढणार्‍या लव्हाळ्याच्या गवताप्रमाणे जो आहे, तसाच पिंपळाप्रमाणे अथवा वडाच्या वृक्षाप्रमाणे हा संसाररुपीवृक्ष आहे. कारण की पिंपळाप्रमाणे अथवा वडाप्रमाणे याच्या पारंब्यांमध्ये डहाळ्या आहेत.
59-15
तेवीचि गा धनंजया । संसारतरु यया । अधीचि आथी खांदिया । हेही नाही ॥५९॥
त्याचप्रमाणे अर्जुना ! या संसारवृक्षाला खालीच फांद्या आहेत असेही नाही.
60-15
तरी ऊर्ध्वाहीकडे । शाखांचे मांदोडे । दिसताति अपाडे । सासिन्नले ॥६०॥
तरी याला वरच्या बाजूसही या संसारवृक्षाला फांद्यांचे पुष्कळ समुदाय विस्तारलेले दिसतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


61-15
जाले गगनचि पा वेलिये । का वारा मांडला रुखाचेनि आये । नाना अवस्थात्रये । उदयला असे ॥61॥
ह्या विशालमय वृक्षाचा विस्तार होण्यासाठी ज्याप्रमाने संपुर्ण आकाश आश्रयभुत कारण असुन संपुर्ण वारा या वृक्षाच्याच सामर्थ्याने वाहत असतो, हा संसाररुपी वृक्ष उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन अवस्थाच्या रुपाने प्रगट झाला आहे.
62-15
ऐसा हा एकु । विश्वाकार विटंकु । उदयाला जाण रुखु । ऊर्ध्वमूळु ॥62॥
असा हा एक वर मूळ असलेला विश्वाकार वृक्ष घनदाट उगवलेला आहे असे समज.
63-15
आता ऊर्ध्व या कवण । येथे मूळ ते किं लक्षण । का अधोमुखपण । शाखा कैसिया ॥63॥
आता या संसारवृक्षाचा वरचा भाग काय आहे ? संसारवृक्षाचे जे मूळ आहे, त्याचे लक्षण कोणते आहे ? या वृक्षाच्या फांद्याना खाली मुख असणे आणि ते पसरणे, याचे कारण काय आहे ? व याच्या फांद्या कशा प्रकारच्या आहेत ?
64-15
अथवा द्रुमा यया । अधी जिया मूळिया । तिया कोण कैसिया । ऊर्ध्व शाखा ॥64॥
अथवा या वृक्षाला खाली ज्या मुळ्या आहेत, त्यांचे स्वरुप काय आहे ? त्या कोणत्या व वरच्या शाखा कोणत्या व कशा प्रकारच्या आहेत ?
65-15
आणि अश्वत्थु हा ऐसी । प्रसिद्धी कायसी । आत्मविदविलासी । निर्णयो केला ॥65॥
आणि याची अश्वत्थ अशी प्रसिद्धी कशाकरता प्रात्त झाली आहे ? आणि आत्मज्ञानी लोकांनी या अश्वत्थाबद्दल जो काही निर्णय केला आहे.


66-15
हे आघवेचि बरवे । तुझिये प्रतीतीसि फावे । तैसेनि सांगो सोलिवे । विन्यासे गा ॥66॥
अर्जुना, या सर्व गोष्टी तुझ्या चांगल्या अनुभवाला किंवा ध्यानात येतील अशा निर्मळ भाषेत विवरण करुन तुला सांगत आहे.
67-15
पंरतु ऐके गा सुभगा । हा प्रसंगु असे तुमचिजोगा । कानचि करी हो सर्वांगा । हिंये आथिलिया ॥67॥
परंतु हे भाग्यवान अर्जुना, हे गितारुपी अमृत पिण्यास तुच योग्य आहेस. म्हणुन तुझ्या सर्व इंद्रियाचे कान करुन अंतकरणापासुन ऐक.
68-15
ऐसे प्रेमरसे सुरफुरे । बोलिले जव यादववीरे । तव अवधान अर्जुनाकारे । मूर्त जाले ॥68॥
जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्यांनी प्रेमरसाच्या अतिशय भराने असे भाषण केले, तेव्हा अर्जुनाच्या आकाराने मृतरुपी अवधान प्रगटले असुन त्यास दाही दिशांनी कवटाळले आहे,
69-15
देव निरूपिती ते थेंकुले । येवढे श्रोतेपण फाकले । जैसे आकाशा खेंव पसरिले । दाही दिशी ॥69॥
ज्याप्रमाणे आकाश जसे विशाल असुन त्यास दाही दिशांनी कवटाळले आहे. त्याप्रमाने श्रीकृष्णाने जे विस्तारपुर्वक निरुपण केले. ते अर्जुनाच्या श्रोतेपणामुळे कमी पडले.
70-15
श्रीकृष्णोक्तिसागरा । हा अगस्तीचि दुसरा । म्हनौनि घोटु भरो पाहे एकसरा । अवघेयाचा ॥70॥
श्रीकृष्णाच्या विचाररूपी समुद्रास गायब करणारा अर्जुन हा दुसरा अगस्ती ऋषीच उत्पन्न झाला. म्हणून तो श्रीकृष्णाच्या संपूर्ण निरूपणाचा एकदम घोट घेण्यास पाहू लागला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


71-15
ऐसी सोय सांडूनि खवळिली । आवडी अर्जुनी देवे देखिली । तेथ जालेनि सुखे केली । कुरवंडी तया ॥71॥
श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी श्रवणाविषयी अमर्याद आवड उत्पन्न झालेली पाहिली, तेव्हा त्यास श्रीकृष्णास जे सुख झाले त्या सुखाची त्यांनी अर्जुनावरून ओवाळणी केली.

श्रीभगवानुवाच ।
उर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् ।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥15. 1॥
*श्लोकार्थ :- श्रीकृष्ण म्हणाले, ज्याचे मूळ उर्ध्वभागी आहे, ज्याच्या शाखा खाली आहेत, जो *विनाशी* आहे, तरी ज्याला अविनाशी असे (सामान्य जन) म्हणतात, वेद ज्याची पाने आहेत, असा जो प्रपंचरूपी वृक्ष, त्याला जाणणारा (या वृक्षाला मूलकारण परम पुरुष असून वृक्षरूपी विस्तार ही माया आहे व त्यापासून वस्तुत: भिन्न नाही असे जाणणारा) तो खरा वेदवेत्ता अथवा ज्ञानी हो संसारावरील वृक्षरूपक भगवंतांनी कशाकरता सांगितले ?
72-15
मग म्हणे धनंजया । ते ऊर्ध्व गा तरू यया । येणे रुखेचि का जया । ऊर्ध्वता गमे ॥15-72॥
मग भगवान म्हणतात, हे अर्जुना, या संसारवृक्षाला ब्रह्म हे ऊर्ध्व वर आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी ऊर्ध्वपणा खाली असलेल्या या संसारवृक्षामुळे वाटत आहे.
73-15
एऱ्हवी मध्योर्ध्व अध । हे नाही जेथ भेद । अद्वयासी एकवद । जया ठायी ॥73॥
(ब्रह्म) वास्तविक विचार केला तर ज्या ब्रह्माच्या ठिकाणी वरील मधला व खालचा असे भेद नाहीत, फार काय सांगावे ? ज्याच्या ठिकाणी दुसरे नाही अशाविषयी एकवाक्यता आहे.
74-15
जो नाइकिजता नादु । जो असौरभ्य मकरंदु । जो आंगाथिला आनंदु । सुरतेविण ॥74॥
जो कानाला विषय न होणारा नाद व नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद आणि मैथुनादि साधनाशिवाय असलेला मूर्तिमंत आनंद होय.
75-15
जया जे आऱ्हा परौते । जया जे पुढे मागौते । दिसतेविण दिसते । अदृश्य जे ॥75॥
ज्याला जे अलीकडे व पलीकडे आहे, ज्याला जे पुढे व मागे आहे व पहाणार्‍यावाचून जे पहाणे आहे व स्वभावत: इंद्रियांना जे अगोचर आहे.

दिवस २३१ वा. १९, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २७६१ ते २७७२
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २७६१
डगमगी मन निराशेच्या गुणे । हे तो नारायणे शांतवीजे ॥१॥
धीर तू गंभीर जीवन जगाचे । जळो विभागाचे आहाचते ॥धृपद॥
भेईल जीव हे देखोनि कठिण । केला जातो सीण तो तो वाया ॥२॥
तुका म्हणे आवश्यक हे वचन । पाळावेचि दान समयो आहे ॥३॥
अर्थ
हे नारायणा तू आमच्या इच्छा पूर्ण केल्या नाहीस आमचे म्हणणे ऐकले नाहीस तर निराशेने आमचे मन डगमगेल ते मन डगमगू नये त्यामुळे तू त्याला शांत कर. देवा तू धैर्यवान आहेस गंभीर आहेस जगाचे जीवन आहेस परंतू आमच्या विभागाला तुझी भक्ती करण्याचे आले आहे परंतू त्यातही आम्ही सोंग आणतो आहे व आमच्या अशा वागण्याला आग लागो. देवा तुमचे असे हे कठीण वागणे पाहून माझा जीव भीत आहे कारण भक्ताने भक्तीमार्गामध्ये केलेले विविध प्रकारचे कठीण श्रम हे वाया जातात की काय असेच मला वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात. “देवा तुम्ही गीतेमध्ये जे तुमचे वचन सांगितले आहे ते पाळण्याची तुम्हाला आवश्यकता आहे आणि मला दान देण्याची हीच योग्य वेळ आहे. ”
अभंग क्र. २७६२
आम्ही पाहा कैसी एकतत्त्वी झालो । राखणे लागलो वासनेसी ॥१॥
तुम्हाविण काही नावडावे या जीवा । केला तोचि देवा दृढ पण ॥धृपद॥
वर्म नेणो परि वृत्ती भंगो नेदुं । वंदिलेचि वंदू आवडीने ॥२॥
तुका म्हणे कले नामाचे जीवन । वारताही भिन्न नेणो आता ॥३॥
अर्थ
देवा आम्ही तुमची भक्ती करावी अशी आमची वासना आहे व त्या वासनेचे आम्ही रक्षण करत आहोत पाहा आम्ही कसे एकत्रित झालो आहोत. देवा तुमचेवाचून या जीवाला काहीही आवडू नये असाच आम्ही दृढपण केला आहे. देवा आम्हाला तुझे वर्म कळत नाही परंतू आमची तुझ्याविषयी एकनिष्ठ वृत्ती जी आहे ती आम्ही पागू देणार नाही आणि जे वंदय आहेत त्यांना आम्ही आवडीने वंदन करु. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुझ्या नामालाच आम्ही आमचे जीवन केले आहे त्यावाचून इतर कोणतीही वार्ता आम्ही ऐकणार नाहीत. ”
अभंग क्र. २७६३
आपण तो असा । समर्थ जी हृषीकेशा ॥१॥
करा करा बुझावणी । काय विलंब वचनी ॥धृपद॥
हेंगे ऐसे म्हणा । उठूनि लागेन चरणा ॥२॥
घेऊनिया सुखे । नाचेल तुका कवतुके ॥३॥
अर्थ
हे ऋषीकेशा आपण तर समर्थच आहात. मग तुम्ही माझ्या मनाचे समाधान करा ना माझ्याशी बोलण्यासाठी तुम्ही एवढा विलंब का लावत आहात ? हे ऋषीकेशा तुम्ही तुमचे मन मोठे करुन मला दान देताना केवळ असे म्हणा “तू हे मागितले आहेस ना, हे घे मग” मी उठून लगेच तुमच्या चरणाला लागेन. तुकाराम महाराज म्हणतात, “मग तुम्ही मला ते दिले की मी ते सुखाने घेईन व तुमच्यापुढे कौतुकाने नाचेन. ”
अभंग क्र. २७६४
द्याल ऐसे दिसे । तुमचे साचपण इच्छे ॥१॥
म्हणऊनि न भंगे निर्धार । केले लोचने सादर ॥धृपद॥
मुखाचीच वास । पुरला पाहे अवकाश ॥२॥
तुका म्हणे कळे । काय लाभ कोणे वेळे ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही, मी जी इच्छा करीन ती देताल असे मला वाटते कारण तुम्ही खरे आहात. त्यामुळेच माझा निर्धार भंगत नाही आणि मी सावधानपणानेच तुमच्यापुढे डोळे लावून उभा आहे. देवा तुम्ही माझ्याशी काहीतरी बोला हीच इच्छा माझी आहे त्यामुळे मी तुमच्या मुखाकडेच पाहत आहे आणि माझ्याशी तुम्ही केव्हा बोलाल याचाच मी मनाशी विचार करत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुमच्याकडून कोणत्यावेळी कोणता लाभ होईल ते मला काही कळत नाही त्यामुळे मी तुमच्या मुखाकडे सारखा लक्ष देऊन आहे. ”
अभंग क्र. २७६५
तुम्ही तो सदैव । अधीरपणे माझी हाव ॥१॥
जळो आशेचे ते जिणे । टोंकतसावे दीनपणे ॥धृपद॥
येथूनि सोडवा । आता अनुभवे देवा ॥२॥
तुका म्हणे झाले । एक मग हे निमाले ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही तर सदैव उदार आहात परंतू मी अधीर आहे माझी हाव अधिकच वाढत आहे. अशा आशाबध्द जगण्याला आग लागो कारण इच्छित वस्तू मिळण्यासाठी त्याला दीनपणाने वाट पाहावी लागते. देवा तुम्हाला आशाळभूत जगणे कसे असते याचा अनुभव आहे ना, तुम्ही बळीराजाच्या घरी किती आशाळभूत होऊन गेला होतात मग आशाळभूत मनुष्य किती दीन असतो हे तुम्हाला माहितच आहे त्यामुळे स्वत:च्या अनुभवावरुन तरी मला यातून सोडवा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा एकदा की माझा अधीरपणा गेला की मग सर्व कामच संपले. ”
अभंग क्र. २७६६
कैसे भले देवा अनुभवा का नये । उशीर तो काय तुम्हापाशी ॥१॥
आहे ते मागतो दिसते जवळी । केल्यामध्ये कळि कोण साध्य ॥धृपद॥
नाही सांडीत मी सेवेची मर्यादा । लाविला तो धंदा नित्य करी ॥२॥
तुका म्हणे हात आवरीला गुंती । माझे तव चित्ती नाही दुजे ॥३॥
अर्थ
देवा आम्ही इतके दिवसापासून तुझी भक्ती करतो तरी देखील आम्हाला तुझ्या दर्शनाचा अनुभव देखील अजून येऊ नये हे चांगले आहे काय अहो आम्हाला दर्शन देण्याकरता तुम्हाला एवढा उशीर होत आहे ? देवा मला तुमच्याजवळ जे दिसते आहे तेच मी मागत आहे आणि यामध्ये देताना भांडण निर्माण करुन तुम्हाला काय साध्य होणार आहे ? देवा तुम्ही माझ्याशी कसेही वागलात तरी मी तुमच्या सेवेची मर्यादा ओलांडीत नाही आणि तुम्ही माझ्या पाठीमागे जो लोकांना धंदा करण्याचा उपदेश लावला आहे तो मी नित्य करीतच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही नको त्या भानगडीत पडलात म्हणून हात आवरला आहे परंतू माझ्या चित्तात तुमची सेवा आणि तुमच्यावाचून दुसरे काहीही नाही. ”
अभंग क्र. २७६७
हुंदकी पिसवी हलवीता दाढी । माळे मणी ओढी निंदेचेते ॥१॥
त्याचे फळ पाकी यमाचे ते दंड । घर केले कुंड कुंभपाकी ॥धृपद॥
क्रोध पोटी मांग आणिला अंतरा । भुंकोनि कुतरा जप करी ॥२॥
तुका म्हणे स्नान केले मळ मूत्रे । जेविली पितरे अमंगळे ॥३॥
अर्थ
एखादा ढोंगी मनुष्य गोमुखीत म्हणजे जप करण्याच्या पिशवीत हात घालून माळ जपण्याचे सोंग करतो व काहीतरी जप करताना दाढी हालवत असतो परंतू तो माळ जपताना दुस-याची निंदा करण्याचेच विचार करत असतो. परंतू त्याचे फळ म्हणजे केवळ यमदंडच आहे आणि घोर कुंभीपाक नरक हेच त्याचे घर आहे. असा हा ढोंगी मनुष्य आपल्या अंत:करणात कामक्रोधरुपी मांगच आणतो आणि असा हा कुत्रा हुंगल्यासारखे जप करतो. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा ढोंगी मनुष्याने स्वत: तर मलमूत्राने तर स्नान केलेच परंतू त्याच्या पितरांना देखील त्याने मलमूत्रे आणि विष्ठाच खाऊ घालून अमंगल केले आहे असे समजावे. ”
अभंग क्र. २७६८
अंगी भरला ताठा । नये वळणी जैसा खुंटा ॥१॥
कैसे न कळे त्या डेंगा । हित आदळले अंगा ॥धृपद॥
जीव जाते वेळे । भल्या कडे ताठी डोळे ॥२॥
मुसळाचे अनु । तुका म्हणे नव्हे धनु ॥३॥
अर्थ
ज्याच्या अंगामध्ये अभिमान ठासून भरलेला असतो मग त्याच्यापुढे कोणीही प्रतिष्ठित आला तरी तो त्याच्यापुढे वाकत नाही जसा खुटा असतो त्याप्रमाणेच तो त्यांच्यापुढे उभा राहातो. अश्या मूर्ख मनुष्याला मरण जरी जवळ आले तरी त्याचे हित त्याला समजत नाही. असा हा मनुष्य त्याचा जीव जरी जात असला तरी आपला अंगातला ताठा सोडत नाही चांगल्या माणसाकडे देखील तो डोळे वासून पाहातो. तुकाराम महाराज म्हणतात, जसे आपण मुसळाचे धनुष्य करु गेलो तर ते थोडे देखील वाकत नाही, असा हा मनुष्य कोणापुढेही अगदी संतापुढेही वाकत नाही. ”
अभंग क्र. २७६९
करूनि कडविड । जमा घडिली लगड ॥१॥
होते तेचि झाले । नाम ठायीचे पडीले ॥धृपद॥
उतरले डाई । उत्तम सुलाख ते ताई ॥२॥
हिंडविता देशोदेश । तुका म्हणे नाही नाश ॥३॥
अर्थ
सोन्याचे किडूकमिडूक जमा करुन त्याची एकच लगड तयार केली तर ते लगड तयार करताना पूर्वी अलंकार होते नंतर ते अलंकार आटविले, म्हणजे ते लगड पूर्वी अलंकार होते परंतू आटवल्यानंतर पुन्हा मूळ स्वरुपात म्हणजे सोन्यातच त्याचे रुपातर झाले व पुन्हा त्याला सोने हेच नाम प्राप्त झाले. मग ते सोने डाईत घालून चांगले अग्नीत सुलाखले तर मग ते उत्तम कसाला उतरते. तुकाराम महाराज म्हणतात, “अश्या प्रकारे सोने कोणत्याही देशोदेशी हिंडवले तरी त्याचे जे मूल्य आहे त्याचा कधीही नाश होत नाही. ”
अभंग क्र. २७७०
पढीयं ते मागा पांडुरंगापाशी । मज दुर्बळासी काय पीडा ॥१॥
याचसाठी दुराविला संवसार । वाढे हे अपार माया तृष्णा ॥धृपद॥
काही करिता कोठे नव्हे समाधान । विचारिता पुण्य तेचि पाप ॥२॥
तुका म्हणे आता निश्चळचि भले । तुज आठविले पांडुरंगा ॥३॥
अर्थ
लोकहो तुम्हाला जे काही लागत असेल ते पाडूरंगाजवळ मागा. मला काहीही तुम्ही मागू नका उगाच माझ्यासारख्या दुर्बळाला का पिडा ? त्यामुळेच मी संसाराला माझ्यापासून दूर केले आहे. देण्या घेण्याच्या व्यवहारामुळेच माया आणि तृष्णा फार वाढत असते. अहो येथे काहीही केले तरी समाधान मिळत नाही पुण्य समजून जे करायला जावे तर ते पापच घडते. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा पाडूरंगा आता तुझेच स्मरण करीत राहावे आणि निश्चिंत राहावे हेच चांगले. ”
अभंग क्र. २७७१
नव्हे मी शाहाणा । तरी म्हणा नारायणा ॥१॥
तुम्हा बोलवाया काही । येच भरलोंसे वाही ॥धृपद॥
आणावेति रूपा । कोपलेती तरी कोपा ॥२॥
कळोनि आवडी । तुका म्हणे जाते घडी ॥३॥
अर्थ
नारायणा मी खूप शहाणा नाही तरीपण मला तुम्ही तुमचा म्हणा. अहो देवा तुम्ही मला बोलावे मला हाक मारावी माझ्याशी बोलावे यासाठीच मी प्रयत्न करीत आहे. देवा तुम्हाला एकदा नामरुपाला आणावे असे मला वाटते त्यानंतर मग तुम्ही माझ्यावर रागावलात तरी निर्धास्तपणे रागावा. तुकाराम महाराज म्हणतात, “हे नारायणा तुम्हाला माझी आवड समजलेली आहे तरीही ती माझी आवड पूर्ण होत नाही, घटका मागून घटका चाललेली आहे. ”
अभंग क्र. २७७२
आम्ही भाविके हे काय जाणो खोडी । आइकोनि प्रौढी विनविले ॥१॥
नाही ऐसे येथे झालेती असता । वाढविली चिंता अधिक सोस ॥धृपद॥
न कळेचि आधी करिता विचार । न धरिता धीर आहाचता ॥२॥
तुका म्हणे आता वचने वचन । वाढले तिक्षण बुद्धी झाली ॥३॥
अर्थ
देवा आम्ही तर भोळे भक्त आहोत तुमच्या खोडी काय काय आहेत ते आम्हाला काय माहित आम्ही तुझी किर्ती ऐकली आणि त्यामुळेच आमची इच्छा पूर्ण करा अशी विनवणी तुम्हाला आम्ही केली आहे. देवा तुम्ही आमच्याजवळ असून देखील आम्हाला दिसत नाही आम्हाला भेटत नाही आमच्याशी बोलत नाही जवळ असूनही येथे नसल्यासारखे करता आणि या कारणामुळेच आम्हाला तुमच्या भेटीविषयी अधिक चिंता आणि हाव वाढली आहे. देवा अहो आम्ही तुमच्या स्वभावाविषयी आधी काहीच विचार केला नाही ते आम्हाला कळलेच नाही परंतू आम्हाला तुमची इतकी आवड लागली आहे की तुमच्या भेटीविषयी आम्ही उतावीळ झालो आहोत त्याकरता आम्ही तुमच्या मागे लागलो तर तुम्हीच म्हणाल की कितीही अधीरता थोडा देखील तुम्हाला कळ सोसवत नाही काय ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता बास झाले बोलण्याने बोलणे अधिकच वाढत राहीन आणि तुमच्याविषयी आमची बुध्दी अतिशय तीष्ण झाली आहे. ”

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading