आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२५ ऑगस्ट, दिवस २३७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी २०१ ते २२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २८३३ ते २८४४
“२५ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २५ August
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २५ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २८३३ ते २८४४ चे पारायण आपण करणार आहोत.
२५ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी २०१ ते २२५
201-15
प्राकृताही तरी रुखा । जे फळे दाटली होय शाखा । ते वोवांडली देखा । बुडासि ये ॥201॥
आणि हे पहा, इतर लौकिक वृक्षाचेही असेच आहे. तरी फळांनी लगडलेली जी फांदी असते ती लवली असता पुन्हा मुळाकडे येते.
202-15
तैसे जेथूनि हा आघवा । संसारतरूचा उठावा । तिये मूळी टेकती पांडवा । वाढतेनि ज्ञाने ॥202॥
त्याप्रमाने अर्जुना येथून या संसारवृक्षाचा सर्व विस्तार उत्पन्न झाला आहे, अर्जुना, त्या मुळाच्या ठिकाणी वाढणार्या ज्ञानाच्या योगाने मनुष्यरूपी शाखा येऊन टेकतात.
203-15
म्हणौनि ब्रह्मेशानापरौते । वाढणे नाही जीवाते । तेथूनि मग वरौते । ब्रह्मचि की ॥203॥
म्हणून ब्रह्मदेव आणि देवाचे देव महादेव यांच्या पलीकडे जीवांना वाढणे नाही. मग तेथून वर केवळ ब्रह्मच आहे.
204-15
परी हे असो ऐसे । ब्रह्मादिक ते आंगवसे । ऊर्ध्वमुळासरिसे । न तुकती गा ॥204॥
परंतु हे असू दे. ब्रम्हादिक कितीही मोठे झाले. तरी उर्ध्वमुळ जे माया विशिष्ट ब्रम्ह म्हणजे ईश्वर, हे याच्या बरोबरीच्या तुलनेला येऊ शकत नाही. प्रलयाच्यावेळी ब्रम्हादिक संपुन जातील पण, ईश्वर कधीही नष्ट पावत नाही.
205-15
आणीकही शाखा उपरता । जिया सनकादिक नामे विख्याता । तिया फळी मूळी नाडळता । भरलिया ब्रह्मी ॥205॥
सनकादिक नावांनी वरच्या (निवृत्ति मार्गाच्या) सनकादिरुपी प्रसिद्ध शाखा आहेत, त्या या संसारवृक्षाच्या मुळात अथवा फळात न सापडता ब्रह्मस्वरूपी एकरुप झालेल्या असतात.
206-15
ऐसी मनुष्यापासूनि जाणावी । ऊर्ध्वी ब्रह्मादिशेष पालवी । शाखांची वाढी बरवी । उंचावे पै ॥206॥
याप्रमाणे मनुष्यापासून तो थेट वरचे जे ब्रह्मादिक, ही जी (संसारवृक्षाची) शेवटची पालवी तेथपर्यंत, या संसारवृक्षाच्या फांद्यांची वाढ चांगली उंचावते हे समज.
207-15
पार्था ऊर्ध्वीचिया ब्रह्मादि । मनुष्यत्वचि होय आदि । म्हणौनि इये अधी । म्हणितली मूळे ॥207॥
अर्जुना वरचे जे ब्रह्मादिक लोक आहेत त्यांना मनुष्यत्वच (मनुष्यपणा) मूळ कारण आहे, म्हणून मनुष्यत्व ही खालची मुळे आहेत असे
म्हटल आहे.
208-15
एवं तुज अलौकिकु । हा अधोर्ध्वशाखु । सांगितला भवरुखु । ऊर्ध्वमूळु ॥15-208॥
याप्रमाने वर खाली फांद्या असलेला व वर मुळ असलेला हा अलौकिक भववृक्ष सांगितला आहे.
209-15
आणि अधीची ही मूळे । उपपत्ती परिसविली सविवळे । आता परिस उन्मूळे । कैसेनि हा ॥209॥
ह्या प्रमाणे या वृक्षाच्या अधोर्ध्व मुळाचे आम्ही तुला सविस्तर कथन केले, आता ह्याचे उन्मूलन (उच्छेद) कसे होवू शकेल ते ऐक.
न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा ।
अश्वत्थमेनं सुविरूढमूल मसङ्गशस्त्रेण दृढेण छित्त्वा ॥15. 3॥
श्लोकार्थ
परंतु (वर जसे वर्णन केले) त्याप्रमाणॆ इहलोकी याचे स्वरूप उपलब्ध होत नाही. याला अंत नाही, आदिही नाही व स्थितीही नाही, अत्यंत दृढमूल अशा या अश्वत्थवृक्षाला बळकट अशा असंगरूपी वैराग्यजन्यज्ञानरूपी शस्त्राने छेदून संसारवृक्षाचा नाश होण्याचा उपाय
(संसारवृक्षाची विशालता)
210-15
परी तुझ्या हन पोटी । ऐसे गमेल किरीटी । जे एवढे झाड उत्पाटी । ऐसे कायि असे ? ॥210॥
परंतु अर्जुना, तुझ्या मनाला कदाचित असे वाटेल की या एवढ्या मोठ्या विशाल विस्तार पावलेल्या संसाररुपी झाड उपडले जाईल असे एवढे साधन काही आहे काय ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
211-15
के ब्रह्मयाच्या शेवटवरी । ऊर्ध्व शाखांची थोरी । आणि मूळ तव निराकारी । ऊर्ध्वी असे ॥211॥
कोठे शेवट ब्रह्मदेवापर्यंत याच्या वरच्या शाखांचा विस्तार आणि मूळ (कोठे) वर निराकार ब्रह्मामधे आहे.
212-15
हा स्थावराही तळी । फांकत असे अधींच्या डाळी । माजी धावतसे दुजा मूळी । मनुष्यरूपी ॥212॥
हा संसारवृक्ष खालच्या फांद्यांनी शेवटी असलेल्या वृक्षादि स्थावरापर्यंत विस्तारतो व दुसर्या मनुष्यरूपी मुळांनी मधे विस्तारतो.
213-15
ऐसा गाढा आणि अफाटु । आता कोण करी यया शेवटु । तरी झणी हा हळुवटु । धरिसी भावो ॥213॥
असा हा संसारवृक्ष बळकट व अमर्याद आहे, तर आता याचा शेवट (उपटून टाकणे) कोण करील ? असा क्षुद्र विचार तू कदाचित मनात आणशील तर आणू नकोस.
214-15
परी हा उन्मूळावया दोषे । येथ सायासचि कायिसे । काय बाळा बागुल देशे । दवडावा आहे ? ॥214॥
(संसारवृक्ष खरा नाहीच)
परंतु याला उपटून टाकण्याचा हेतू जर असेल तर याला उपटून टाकण्याच्या कामी श्रमच ते काय आहेत ? (म्हणजे श्रम नाहीतच). मुलाकरता (लेकराची भीती नाहीशी व्हावी म्हणून) बागुलबुवास खरोखर देशोधडीस लावावा लागतो काय ?
215-15
गंधर्वदुर्ग कायी पाडावे । काय शशविषाण मोडावे । होआवे मग तोडावे । खपुष्प की ? ॥215॥
ढगांच्या आकृतीत दिसणारे किल्ले पाडून टाकले पाहेत काय ? सशाचे शिंग मोडून टाकले पाहिजे काय ? आकाशाचे फूल असावे आणि मग ते तोडावे का ?
216-15
तैसा संसारु हा वीरा । रुख नाही साचोकारा । मा उन्मूळणी दरारा । कायिसा तरी ? ॥216॥
त्याप्रमाणे अर्जुना, हा संसारवृक्ष जर खरा नाही (केवळ मिथ्याभास आहे) तर मग त्याला उपटून टाकण्याची भीती तरी कसली ?
217-15
आम्ही सांगितली जे परी । मूळडाळांची उजरी । ते वांझेची घरभरी । लेकुरे जैशी ॥217॥
आम्ही संसारवृक्षाच्या मुळाच्या व फांद्यांच्या उत्कर्षाचा (विस्ताराचा) जो प्रकार सांगितला तो प्रकार जसे काही वांझेची घर भरून लेकरे आहेत (असेच सांगण्याच्या प्रकारापैकीच होय).
218-15
कय कीजती चेइलेपणी स्वप्नीची तिये बोलणी । तैशी जाण ते काहाणी । दुगळीचि ते ॥218॥
जागे झाल्यावर मग ती स्वप्नातील बडबड काय कामाची ? त्याप्रमाणे ह्या संसारवृक्षाची गोष्ट पोकळ आहे असे समज.
219-15
वाचूनि आम्ही निरूपिले जैसे । ययाचे अचळ मूळ असे तैसे । आणि तैसाचि जरी हा असे । साचोकारा ॥219॥
याशिवाय आम्ही ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे याचे मूळ जर दृढ असते आणि हा संसारवृक्ष जर आम्ही सांगितल्याप्रमाणेच (स्वरूपे करून) खरा असता.
220-15
तरी कोणाचेनि संताने । निपजती तया उन्मूळणे । काय फुंकिलिया गगने । जाइजेल गा ॥220॥
तर कोणता असा मायेचा पूत आहे की ज्याच्या सामर्थ्याने याची पाळेमुळे खणून काढण्याचे काम घडून येईल ? अर्जुना, नुसत्या फुंकण्याने हे (एवढे) आकाश उडून जाईल काय ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
221-15
म्हणौनि पै धनंजया । आम्ही वानिले रूप ते माया । कासवीचेनि तुपे राया । वोगरिले जैसे ॥221॥
म्हणून अर्जुना, आम्ही जे या संसारवृक्षाचे वर्णन केले ते खोटे आहे. (कसे तर) जशी राजाला कासवीच्या तुपाने मेजवानी करावी तसे.
222-15
मृगजळाची गा तळी । तिये दिठी दुरूनि न्याहाळी । वाचूनि तेणे पाणिये साळी केळी । लाविसी काई ? ॥222॥
बा अर्जुना मृगजळाची तळी आहेत ती दृष्टीने दुरूनच पहा, याशिवाय त्या मृगजळाच्या पाण्याने भात व केळी लावता येतील काय ?
223-15
मूळ अज्ञानचि तव लटिके । मा तयाचे कार्य हे केतुके । म्हणौनि संसाररुख सतुके । वावोचि गा ॥223॥
बा अर्जुना, या संसारवृक्षाचे मूळ जे अज्ञान तेच आधी खोटे आहे, तर मग त्याचे कार्य ते केवढे ? (काय किंमतीचे असणार ?) म्हणून संसारवृक्ष खरा कोठून असणार ? तर तो मिथ्याच आहे.
224-15
आणि अंतु यया नाही । ऐसे बोलिजे जे काही । तेही साचचि पाही । येके परी ॥224॥
आणि या संसारवृक्षाला अंत नाही असे जे म्हणतात तेही एक प्रकाराने खरे आहे असे समज.
225-15
तरी प्रबोधु जव नोहे । तव निद्रे काय अंतु आहे ? । की रात्री न सरे तव न पाहे । तया आरौते ? ॥225॥
संसारवृक्ष कोठपर्यंत खरा वाटतो ? तर जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत झोपेला अंत आहे काय ? अथवा रात्र सरली नाही तोपर्यंत त्याच्या आधी उजाडत नाही.
दिवस २३७ वा. २५, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २८३३ ते २८४४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २८३३
नाही खंड झाला । माझा तुमचा विठ्ठला ॥१॥
कैसे कैसे हो दुश्चित । आहे चौघांपाशी नीत ॥धृपद॥
मुळीचे लिहिले । मज आता सापडले ॥२॥
तुका म्हणे मज । न लगे बोलणे सहज ॥३॥
अर्थ
हे विठ्ठला तुमची आणि माझी अजून खंडणी म्हणजे वाटणी झाली नाही त्यामुळे आपण एकच आहोत. अहो मग देवा तुम्ही आमच्याविषयी असे उदास का असता याविषयी संतांजवळ नीती आहे मग आपला हा निवाडा संतच करतील. देवा परमार्थामध्ये सर्व मूळ म्हणजे वेद आहे आणि वेदामध्ये जे काही लिहिले आहे ते आता मला सापडले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो देवा विठ्ठला त्या वेदामध्ये असे लिहिले आहे की तत्वमसि म्हणजे ते ब्रम्ह तूच आहेस मग आता या व्यतिरिक्त मला सहज देखील काही बोलण्याची गरजच नाही. ”
अभंग क्र. २८३४
हेचि वादकाची कळा । नाही येऊ येत बळा ॥१॥
धीर करावा करावा । तरी तो आहे आम्हा देवा ॥धृपद॥
रिघावे पोटात । पाया पडोन घ्यावा अंत ॥२॥
तुका म्हणे वरी । गोडा आणावा उत्तरी ॥३॥
अर्थ
खरा जो वाद-विवाद पटु आहे तो कोणालाही राग न येऊ देता आपले म्हणणे खरे करून दाखवतो हीच त्याच्या मध्ये खरी कला आहे. देवा यासाठी धीर असावा लागतो आणि तो आम्हा मध्ये तर भरपूर भरलेला आहे. आपण वाद करत असताना समोर माणसाच्या मनात काय आहे ते त्याच्याकडून गोड बोलून जाणून घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात आपला ज्याच्याबरोबर वाद चालू आहे त्याचा व आपला वाद तर मिटला पाहिजे परंतु कोणत्याही प्रकारचा वाद विकोपाला न जाता अगदी गोड भाषेत वाद मिटवुणं घ्यावा.
अभंग क्र. २८३५
एक परि बहिरे बरे । परि ती ढोरे ग्यानगंडे ॥१॥
कपाळासी लागली अगी । अभागी का जीतसे ॥धृपद॥
एक परि बरे वेडे । तर्कि कुडे जळो ते ॥२॥
तुका म्हणे खातडवासी । अमृतासी नोळखे ॥३॥
अर्थ
एक वेळेस बहिरे बरे परंतु ज्यांना ज्ञानाचा अभिमान आहे ते जनावरा सारखेच आहेत. त्यांच्या कपाळाला अभिमानाची आग लागलेली असते असे अभागी मनुष्य का जगत असतात ? एक वेळेस वेडी माणसे बरे आहेत परंतु तर्ककुतर्क करणारी माणसे फार वाईट असतात त्यांना आग लागो. तुकाराम महाराज म्हणतात नेहमी घाण खाणाऱ्यांना अमृताची गोडी काय कळणार आहे त्याप्रमाणे ज्ञानाचा अभिमान असणाऱ्या आणि तर्ककुतर्क करणाऱ्या व्यक्तींना भक्तीची गोडी कळणार नाही.
अभंग क्र. २८३६
खेळो मनासवे जीवाच्या संवादे । कौतुक विनोदे निरांजनी ॥१॥
पची पडिले ते रुचे वेळोवेळा । होतसे डोहळा आवडीसी ॥धृपद॥
एकाताचे सुख जडले जिव्हारी । वीट परिचारी बरा आला ॥२॥
पाणी ऐसी बुद्धी नव्हे आता कदा । लंपट गोविंदा झालो पायी ॥३॥
आणीक ते चिंता न लगे करावी । नित्य नित्य नवी आवडी हे ॥४॥
तुका म्हणे धडा राहिला पडोन । पांडुरंगी मन विसावले ॥५॥
अर्थ
आम्ही मन आणि जीव यांच्याशीच कौतुकाने विनोदाने संवाद करून व त्यांच्याशीच एकातामध्ये क्रीडा करू. जे आपल्याला पचनी पडते तेच आपल्याला वेळ वेळा आवडते आणि जे नेहमी आवडते त्याचेच डोहळे होतात. आता एकांत जीवाला फार आवडू लागला आहे आणि आजूबाजूला जे वास्तव्य करतात त्यांचा फार वीट आला आहे हे फार बरे झाले आहे. जगाप्रमाणे वर्तन करणे आता हे बुध्दीला कदापिही पटत नाही आता मी गोविंदाच्या पाई रत झालो आहे. त्यामुळे आता कोणत्याही गोष्टीची चिंता करायची गरज लागत नाही गोविंदा विषयीच नित्यनवीन आवड निर्माण होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता माझ्या मनाला तसे वळणच लागले असून पांडुरंगाच्या ठिकाणी माझे मन विश्रांती घेत आहे.
अभंग क्र. २८३७
झाली झडपणी खडतर देवता । संचरली आता निघो नये ॥१॥
मज उपचार झणी उपचार झणी आता करा । न साहे दुसरा भार काही ॥धृपद॥
नेऊनिया घाला चंद्रभागे तिरी । जीवा नाही उरी काही आता ॥२॥
तुका म्हणे कळो आले वर्तमान । माझे तो वचन आच्छादले ॥३॥
अर्थ
विठ्ठल ही देवता फार खडतर आहे तिने माझ्या अंगांमध्ये झडप घातली असून माझ्या अंगांमध्ये ती संचारली आहे काही केल्या माझ्या अंगातून ती बाहेर येत नाही. आता तुम्ही माझ्यावर कोणत्याही प्रकारचा उपचार करा त्याचा काहीही उपयोग होणार नाही याउलट मला त्या उपचाराचा त्रास होईल. अरे मला कोणीतरी चंद्रभागेच्या तीरावर घेऊन घाला नाही तर माझ्या जीवाचा काहीच भरोसा राहिला नाही. तुकाराम महाराज म्हणतात लोकांनो तुम्हाला आता माझी वर्तमानस्थिती चांगलीच समजली आहे माझे आता बोललेच बंद झाले आहे.
अभंग क्र. २८३८
अंगी देवी खेळे । का रे तुम्हासी न कळे । कोणाचे हे चाळे । सुख दुःख न मनिता ॥१॥
मी तो आता येथे नाही । ओळखी वचनाच्या ठायी । पालटाचा घेई । भाव खरा लोपे ना ॥धृपद॥
आपुलाले तुम्ही पुसा । सोवा पेव्याच सरिसा । स्थिरावल्या कैसा काय । जाणो विचार ॥२॥
तुका म्हणे लाभकाळ । तेथे नसावे शीतळ । मग तैशी वेळ । कोठे जाते सांपडो ॥३॥
अर्थ
अरे माझ्या अंगांमध्ये देवी संचारली आहे हे तुम्हाला का रे कळत नाही ? मला सुख व दुःख देखील समजत नाही हे चाळे कोणाचे आहे ? माझ्या बोलण्यावरून तुम्ही समजून घ्या की मी देहभानावर नाही. आणि माझ्या मध्ये जो काही बदल झाला आहे तो पालटला देखील जाणार नाही आणि झाकला देखील जाणार नाही. तुम्ही हे लक्षात घ्या की माझ्या अंगांमध्ये देवीचा संचार झाला आहे धान्य जसे पेवेमध्ये गुप्त स्वरूपात असतात त्याप्रमाणे तुमच्या मनातील गुप्त प्रश्न तुम्ही मला विचारा. अहो माझ्या अंगामध्ये देवीचा संचार झाला आहे आणि त्या देवीचा संचार जर स्थिर झाला तर नंतर मला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा विचार काय समजणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात आता ही वेळ म्हणजे लाभ करून घेण्याची आहे त्यामुळे तुम्ही येथे शांत राहू नका. आणि एकदा की ही सुवर्णसंधी तुमच्या हातातून गेली तर मग कुठे तुम्ही या सुवर्णसंधीला सापडत जाताल ?
अभंग क्र. २८३९
उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ । आपले सकळ । ते प्रसंगी पाहिजे ॥१॥
नेम नाही लाभ हानि । अवचित घडती दोनी । विचारूनि मनी । पाहिजे ते प्रयोजावे ॥धृपद॥
जाळ जाळा काळे । करपोनेदावे आगळे । जेविता वेगळे । ज्याचे त्याचे तेथे शोभे ॥२॥
पाळी नांगर पाभारी । तन निवडूनि सोंकरी । तुका म्हणे घरी । सेज जमा शेवटी ॥३॥
अर्थ
योग्य वेळ आल्यानंतर आपले हित साध्य करण्यासाठी बुध्दीच्या बळाचा वापर करुन, प्रसंगानुरुप त्या बुध्दीबळाचा वापर केला पाहिजे. लाभ आणि हानी केव्हा घडेल याचा नेम नाही अचानक दोन्हीपैकी एक काहीतरी घडते. त्यामुळे आपला लाभ कशात होईल याविषयी मनाशीच विचार करावा आणि योग्य त्या कार्याचे प्रयोजन म्हणजे त्याची युक्ती करावी. अन्न शिजवताना अग्नी तर लागतोच परंतू काही वेळेस अग्नी लागतो तर काही वेळेस लागत नाही त्यामुळे अन्न शिजवणाऱ्याने अन्न करपले नाही पाहिजे याची खात्री घेतली पाहिजे. त्याप्रमाणे अन्नग्रहण करताना आपण जेवताना आपल्या स्थितीप्रमाणे आपल्या अधिकाराप्रमाणे योग्य ठिकाणी बसून अन्नग्रहण करावे जेवायला जो तो ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे ज्याच्या त्याच्या ठिकाणी बसला तरच ते शोभत असते. तुकाराम महाराज म्हणतात, “शेती करताना प्रथम पाळी नंतर शेत नांगरणी त्यानंतर पेरणी करावी लागते आणि पेरणी केल्यानंतर तण काढून शेतमालाचे रक्षण करावे लागते. आणि मग शेवटी एकदा की शेतमाल आला की त्याचे खळे करुन मग घरी घेऊन यावे. ”
अभंग क्र. २८४०
पडिलिया ताळा । मग अवघा निर्वाळा । तेथे कोणी बळा । नाही येत कोणासी ॥१॥
जोडिले ते लागे हाती । आपआपली निश्चिंती । हर्ष आणि खंती । तेथे दोनी नासली ॥धृपद॥
सहज सरलिया कारणे । मग एकला आपण । दिसे तरी भिन्न । वचनाचा प्रसंग ॥२॥
करूनि झाडा पाडा । तुका वेगळा लिगाडा । निश्चिंतीच्या गोडा । गोष्टी म्हणु लागती ॥३॥
अर्थ
एकदा की सर्वत्र ब्रम्ह आहे असे लक्षात आले की मग सर्वत्र ब्रम्हच दिसू लागते. मग तेथे कोणीही कोणाला विरोध करण्यासाठी येत नाही. एकदा की आपल्याला एखाद्या गोष्टीचा लाभ झाला तर ते आपल्या हाती लागतच असते म्हणजे आपल्याला ब्रम्हस्वरुपाचा लाभ झाला की ते आपल्या हाती लागते मग त्याने आपणच आपल्या ठिकाणी निश्चिंत राहतो. मग तेथे हर्ष आणि खंत या दोन्हीचाही नाश होतो. एकदा की व्दैत नाहीसे मग आपणच एकटे असतो. आणि जरी अशावेळी व्दैत दिसले तरी ते शब्दाने प्रसंगापुरतेच दिसते. तुकाराम महाराज म्हणतात, “मी सर्व उपाधीचा झाडापाडा करुन त्यापासून वेगळा होऊन राहीलो आहे त्यामुळेच मला निश्चिंतीच्या गोड गोष्टी लागत आहेत. ”
अभंग क्र. २८४१
जो वितो तो माझा पिता । उखता तो उखत्यांचा ॥१॥
जनार्दनी सरती कर्मे । बाधा भ्रमे अन्यत्र ॥धृपद॥
अपसव्य सव्यामधी । ऐसी शुद्धी न धरिता ॥२॥
तुका म्हणे खांद्या पाने । सिंचता भिन्न कोरडी ॥३॥
अर्थ
ज्याने हे विश्व निर्माण केले आहे तोच माझा पिता आहे आणि सर्व विश्वाचा देखील तोच पिता आहे. त्यामुळेच जनार्दनाला सर्व कर्मे अर्पण करावीत म्हणजे तेच मोक्षाला कारण ठरतात आणि तसे केले नाही तर कर्मामुळे ऐहिक आणि पारलौकिक फल मिळेल या भ्रमानेच ती बाधक होतात. सव्य आणि अपसव्य याचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता कोणत्याही कर्माचे फल आपल्याला मिळेल अशा विचार देखील धरु नये आणि शुध्द मनाने जनार्दनाला सर्व कर्मे अर्पण करावीत. तुकाराम महाराज म्हणतात, “जर वृक्षाच्या मुळाला पाणी न घालता पानाला फळाला पाणी घातले आणि वृक्षाचे मूळ कोरडेच ठेवले तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही अगदी त्याप्रमाणे आपले सर्व कर्मे निष्काम भावनेने जनार्दनाला अर्पण केले नाही तर त्याचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे जनार्दनाला सर्व कर्मे निष्काम भावनेने अर्पण करावी. ”
अभंग क्र. २८४२
माउलीची चाली लेकराचे ओढी । तयालागी काढी प्राण प्रीती ॥१॥
ऐसी बळिवंत आवडी जी देवा । संतमहानुभावा विनवितो ॥धृपद॥
मोहे मोहियेले सर्वकाळ चित्त । विसरु तो घेत नाही क्षण ॥२॥
तुका म्हणे दिला प्रेमाचा वोरस । सांभाळिले दास आपुले ते ॥३॥
अर्थ
माऊलीचे कोणतेही वर्तन असो ते लेकराच्या प्रेमापोटी ओढी पोटीच असते त्याच्यासाठी ती माऊली आपल्या प्राणाचा देखील विचार करत नाही. त्याप्रमाणे हे देवा हे संतजनहो तुमची आवड देखील माझ्यासाठी एवढीच बलवंत आहे त्यामुळे मी तुम्हाला सारखी विनंती करत आहे. आईचे चित्त मुलाच्या मोहाने सर्व काळ मोहीत झालेले असते एक क्षण देखील मुलाला ती विसरु देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “अगदी त्याप्रमाणे संतानी व देवाने देखील आपल्या प्रेमाचा पान्हा मला दिला आहे व आपल्या दासाला त्यानी सांभाळले आहे. ”
अभंग क्र. २८४३
केवढा तो अहंकार । माझा तुम्हा नव्हे दूर ॥१॥
आता कोण पडे पाया । तुमच्या अहो पंढरिराया ॥धृपद॥
का जी कृपेने कृपण । वेचतसे ऐसे धन ॥२॥
तुका म्हणे देवे । दुजियाचे पोते न्यावे ॥३॥
अर्थ
देवा माझा अहंकार तरी केवढा आहे, मी तुम्हाला शरण आलो तरी देखील तुम्हाला तो दूर करता येत नाही. अहो पंढरीराया जर तुम्हाला माझा अहंकारच घालवता येत नाही तर मग तुमच्या पाया कोण पडणार आहे ? देवा तुम्ही कृपा करण्याविषयी असे कृपण म्हणजे कंजूष का आहात कृपा करण्याविषयी तुम्ही असा कंजूषपणा करत आहात जसे काही तुमचे काही धनच खर्च होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो देवा तुमच्यात व माझ्यात जो व्दैतपणा आहे त्याचे पोते तुम्ही घेऊन जावे. ”
अभंग क्र. २८४४
अपराधी म्हणोन येतो काकुलती । नाही तरी होती काय चाड ॥१॥
येईल तारू तरी तारा जो जी देवा । नाही तरी सेवा घ्यावी भार ॥धृपद॥
कासया मी आता वंचू हे शरीर । आहे बारगीर जायजणे ॥२॥
तुका म्हणे मन करूनि मोकळे । आहे साळेंढाळे उदार ते ॥३॥
अर्थ
देवा मी अनेक जन्माचा अपराधी आहे त्यामुळेच तर मी तुला काकूळती येत आहे नाहीतर तुला शरण येण्याची मला काही आवड होती काय ? देवा तुम्हाला आम्हाला या भवसागरातून तारता येत असेल तर तारा नाहीतर आमच्या सेवेचा भार तुमच्या माथ्यावर घ्यावा. मी माझ्या शरीराचा त्याग काय म्हणून करु कशासाठी करु कारण हे शरीर तर पंचमहाभूताचेच आहे ते केव्हा तरी जाणारच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा हे शरीर कधी ना कधी जाणारच आहे परंतू या शरीराने तुझी सेवा करावी यासाठी माझ्या मनाला अगदी मोकळे करुन उदार मी केले आहे. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















