आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

४ ऑगस्ट, दिवस २१६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी १०१ ते १२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २५८१ ते २५९२
“४ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 4 August
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ४ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २५८१ ते २५९२ चे पारायण आपण करणार आहोत.
४ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी १०१ ते १२५,
101-14
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
आपपृथ्वी उत्कटे । आणि तमोमात्रे निकृष्टे । स्थावरु उमटे । उद्भिजु हा ॥101॥
आप व पृथ्वी यांच्या आधिक्याने आणि केवळ नीच अशा तमोगुणाने स्थावर असा उद्भिज उत्पन्न होतो.
102-14
पांचा पांचही विरजी । होती मनबुद्ध्यादि साजी । ही हेतु जारजी । ऐसे जाण ॥102॥
पंचमहाभूते ही सर्वच आपसात सहकार्य करतात व मन व बुद्धी इत्यादि ज्ञानसाधने तरतरीत होतात. ही मनुष्यादि जारज योनी उत्पन्न होण्याची कारणे आहेत असे समज.
103-14
ऐसे चारी हे सरळ । करचरणतळ । महाप्रकृति स्थूळ । तेचि शिर ॥103॥
या प्रमाणे चार भूतयोनी, हे ज्याचे सरळ चार हात व पाय आहेत व स्थूल जी महाप्रकृती हे ज्याचे मस्तक आहे.
104-14
प्रवृत्ति पेलले पोट । निवृत्ति ते पाठी नीट । सुर योनी आंगे आठ । ऊर्ध्वाची ॥104॥
प्रवृत्ती हे ज्याचे पुढे आलेले पोट आहे व निवृत्ती ही नीट (सरळ) पाठ आहे व अष्ट देवयोनी ही ज्याची वरची (कमरेच्या वरची) अंगे आहेत.
105-14
कंठु उल्हासता स्वर्गु । मृत्युलोकु मध्यभागु । अधोदेशु चांगु । नितंबु तो ॥105॥
आनंदभरित असा जो स्वर्ग हा ज्याचा कंठ (गळा) आहे, मृत्यूलोक ही ज्याची कंबर आहे व पाताळ ज्याचा चांगला कंबरेचा पृष्ठभाग आहे.
106-14
ऐसे लेकरू एक । प्रसवली हे देख । जयाचे तिन्ही लोक । बाळसे गा ॥106॥
अर्जुना, ज्याचे बाळसे तिन्ही लोक आहेत असे एक मूल ही प्रसवली पहा.
107-14
चौऱ्यांयशी लक्ष योनी । तिये कांडा पेरा सांदणी । वाढे प्रतिदिनी । बाळक हे ॥107॥
चौर्यांशी लक्ष योनी ह्या ज्याच्या (ज्या बालकाच्या) कांड्यांचे व पेरांचे सांधे आहेत असे हे बालक दिवसेंदिवस वाढत आहे.
108-14
नाना देह अवयवी । नामाची लेणी लेववी । मोहस्तन्ये वाढवी । नित्य नवे ॥108॥
(माया ही या बालकाच्या) देहाच्या निरनिराळ्या अवयवांवर नामांचे अलंकार घालते व मोहरूपी दूधाने ती माया या बालकाला नित्य नवेपणाने वाढवते.
109-14
सृष्टी वेगवेगळीया । तिया करांघ्री आंगोळिया । भिन्नाभिमान सूदलिया । मुदिया तेथे ॥109॥
वेगवेगळ्या सृष्ट्या, त्या या बालकाची हातांची व पायांची बोटे आहेत व प्रत्येक योनीत असणारे निरनिराळे अभिमान हे त्या बोटात घातलेल्या अंगठ्या होत.
110-14
हे एकलौते चराचर । अविचारित सुंदर । प्रसवोनि थोर । थोरावली ॥110॥
स्थावर-जंगमात्मक जगद्रूपी एकुलते एक व अविचारकाली सुंदर वाटणारे असे हे मोठे बालक, त्याला जन्म देऊन ही माया थोर झाली (म्हणजे वाढली).
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
111-14
पै ब्रह्मा प्रातःकाळु । विष्णु तो मध्यान्ह वेळु । सदाशिव सायंकाळु । बाळा यया ॥111॥
ब्रह्मदेव हा या बालकाचा प्रात:काळ आहे, विष्णू हा त्या बालकाचा माध्यन्ह-काळ आहे व सदाशिव हा स्थितिकालामध्ये त्याचा सायंकाळ आहे.
112-14
महाप्रळयसेजे । खेळोनि निवांत निजे । विषमज्ञाने उमजे । कल्पोदयी ॥112॥
हे बालक स्थितीकालामध्ये अनंत घडामोडींचा खेळ खेळुन खेळुन दमुन आले की ते महाप्रलयाच्या अंथरुणावर शांत झोपी जाते. आणि ज्यावेळेस कल्पाचा सुर्योदय झाला असता.
हे बालक भेदज्ञानाने जागे होते.
113-14
अर्जुना इयापरी । मिथ्यादृष्टीच्या घरी । युगानुवृत्तीची करी । चोज पाउले ॥113॥
अर्जुना, याप्रमाणे हे बालक मिथ्या दृष्टिच्या घरात कृतयुग, ञेता, द्वापार, आणि कलीयुग या चार युगांच्या अनुक्रमांची पावले कौतुकाने पुढे पुढे टाकत जाते.
114-14
संकल्पु जयाचा इष्टु । अहंकारु तो विनटु । ऐसिया होय शेवटु । ज्ञाने यया ॥114॥
या बालकाचा तर्हेतर्हेचे संकल्प करने हा या बालकाचा आवडता आहे व अहंकार हा याचा खेळगडी आहे. अशा या बालकाचा शेवट (नाश) त्यावेळी आत्मज्ञानाने होतो.
115-14
आता असो हे बहु बोली । ऐसे विश्व माया व्याली । तेथ साह्य जाली । माझी सत्ता ॥115॥
आता हे पुष्कळ बोलणे पुरे झाले. वर वर्णन केल्याप्रमाणे माया ही सर्व जगताला जन्म देते. या क्रमात त्या मायेला माझ्या अधिष्ठानाचा आधार मिळतो.
किंवा माझ्या सत्तेच्या आधारेच मायापासुन हे विश्व तयार झाले.
सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः ।
तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता ॥14. 4॥
भावार्थ हे कौतेया, सर्व योनीमधे ही जी शरीरे निर्माण होतात, त्या सर्वाची ञिगुणमयी माया ही गर्भ धारण करणारी माता आहे आणि मी त्या त्या योनीत बीज तयार करणारा पिता आहे.
116-14
याकारणे मी पिता । महद्ब्रह्म हे माता । अपत्य पंडुसुता । जगडंबरु ॥116॥
भगवान या कारणास्तव अर्जुनास सांगतात की, मी या सर्व विक्ष्वाचा पिता आहे आणि महद्ब्रह्म माया ही आई आहे व हा एवढा विशाल जगताचा जो आकार दिसत आहे. हे आम्हा दोघांपासुन झालेले मुल आहे.
117-14
आता शरीरे बहुते । देखोनि न भेदे हो चित्ते । जे मनबुद्ध्यादि भूते । एकेचि येथे ॥117॥
आता वेगवेगळ्या प्रकारचे शरीरे पाहून तुझ्या चित्तात भेद येऊ देऊ नकोस. कारण की या वेगवेगळ्या प्रकारच्या शरीरात मन, बुद्धी, अहंकार व पंचमहाभूते, ही जी जगातील आठ तत्वे आहेत, ती एकच आहेत.
118-14
हा गा एकचि देही । काय अनारिसे अवयव नाही । तेवी विचित्र विश्व पाही । एकचि हे ॥118॥
अरे अर्जुना, ज्याप्रमाने एकाच देहामधे निरनिराळे (भिन्न भिन्न प्रकारचे) अवयव नसतात काय ? त्याप्रमाणे हे विचित्र जग, विक्ष्व वेगळ्या प्रकारचे दिसले तरी ते तत्वतः एकच आहे.
119-14
पै उंचा नीचा डाहाळिया । विषमा वेगळालिया । येकाचि जेवी जालिया । बीजाचिया ॥119॥
जसे एखादे झाड असते. त्याच्या फांद्या काही उंचच्या उंच तर काही खाली काही वाकड्या अशा प्रकारे त्या सर्व फांद्या भिन्न भिन्न स्वरुपाच्या असतात. तरी त्या शेवटी एकाच झाडाच्या किंवा त्या एकाच बीजापासुन उत्पन्न झालेल्या असतात.
120-14
आणि संबंधु तोही ऐसा । मृत्तिके घटु लेकु जैसा । का पटत्व कापुसा । नातू होय ॥120॥
म्हणुन आमचा या विशाल जगाशी संबंध आहे, पण तो देखील कसा आहे. जसा की मातीपासुन तयार झालेला घट हा मातीपासुन तयार झालेला मुलगा होय. किंवा थोडक्यात सांगायचे झाल्यास जसे कापड हे कापसाचे नातवंड आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-14
नाना कल्लोळपरंपरा । संतती जैसी सागरा । आम्हा आणि चराचरा । संबंधु तैसा ॥121॥
अथवा लाटांची परंपरा ही जशी संतती आहे, तसा आमचा व चराचराचा संबंध आहे.
122-14
म्हणोनि वन्हि आणि ज्वाळ । दोन्ही वन्हीचि केवळ । तेवी मी गा सकळ । संबंधु तैसा ॥122॥
म्हणून अग्नी आणि ज्वाळा हे दोन्ही केवळ एक अग्नीच आहेत, त्याप्रमाणे मी आणि जग म्हणजे मीच असुन माझ्यापासुन सर्व जग हे वेगळे आहे. व हा सर्व संबंध, कल्पना करने मिथ्या आहे.
123-14
जालेनि जगे मी झाके । तरी जगत्वे कोण फाके ? । किळेवरी माणिके । लोपिजे काई ? ॥123॥
जगाच्या उत्पत्तीने जर मी झांकला जात असेन तर या पृथ्वीतलावावरचे व्यवहार कोणाच्या आधाराने चालतात माणिकाच्या तेजाने माणिक लोपले जाते काय ?
124-14
अळंकाराते आले । तरी सोनेपण काइ गेले ? । की कमळ फाकले । कमळत्वा मुके ? ॥124॥
सोने हे अलंकार स्वरुपाला आले असता त्याचे सोनेपण गेले काय ? अथवा कमळ उमलले असता त्यातील कमळपण नष्ट होते काय ?
125-14
सांग पा धनंजया । अवयवी अवयविया । आच्छादिजे, की तया । तेचि रूप ? ॥125॥
भगवान अर्जुनास सांगतात की अवयव धारण करनारा हा अवयवांकडून झाकला जातो काय ? कारण अवयव हेच अवयवीचे स्वरूप आहे ?
दिवस २१६ वा. ४, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २५८१ ते २५९२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २५८१
फोडिले भांडारे । माप घेऊनिया खरे ॥१॥
केली हरीनामाची वरो । मागितले आता सरो ॥धृपद॥
देशात सुकाळ । झाला हारपला काळ ॥२॥
घ्यावे धणीवरी । तुका म्हणे लहान थोरी ॥३॥
अर्थ
भक्ती चे खरे माप घेऊन मी परमार्थाचे भांडार फोडले आहे. आता मी हरी नामाची रेल चेल सर्वत्र केली आहे पूर्वी खूप नुकसान झाले होते आता ते मी संपवून टाकले आहे. देशामध्ये हरिनामामुळे सुकाळ आला असून पूर्वी जो हरिनामाचा दुष्काळ पडला होता तो दुष्काळ हरपला आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे लहान थोरांनी देखील हरिनाम तृप्ती होईपर्यंत घ्यावे.
अभंग क्र. २५८२
आनंदाचे डोही आनंदतरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥१॥
काय सांगो जाले काहीचियाबाही । पुढे चाली नाही आवडीने ॥धृपद॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥२॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥
अर्थ
माझ्या मनामध्ये ब्रम्हनंदाच्या आनंदाचा डोह तयार झाला असून आता त्या ठिकाणी कोणत्याही विषयाचा अन्यथा कोणत्याही गोष्टीचे तरंग उठले तरी आनंदच होतो कारण सर्व अंग आनंदाने सामावलेले असून सर्वत्र आनंदच आनंद असतो. त्या आनंदामुळे काय झाले काही कळत नाही माझी अवस्था काहीतरीच झाली आहे आणि त्या आनंदामुळे पुढची प्रपंचाकडे होणारी चाल संपली आहे. गर्भातील बालकाची जी आवड आहे ती आईचे डोहाळे होतात कारण गर्भातील बालकाची आवडच आईच्या ठिकाण बिंबित होते. तुकाराम महाराज म्हणतात ब्रम्हनंदाचा ठसा माझ्या अंतःकरणात उमटला असून तोच माझ्या अनुभवात आला असून मुखावाटे बाहेर आला आहे.
अभंग क्र. २५८३
म्हणऊनि धरिले पाय । अवो माय विठ्ठले ॥१॥
आपुलेचि करूनि घ्यावे । आश्वासावे नाभिसे ॥धृपद॥
वाढली ते तळमळ चित्ता । शम आता करावी ॥२॥
तुका म्हणे जीवी वसे । मज नसे वेगळा ॥३॥
अर्थ
हे माय विठ्ठले मला संसाराची खूप भीती वाटली म्हणूनच मी तुझे पाय धरले आहेत. तु मला आपलेसे करून घ्यावे आणि “भिऊ नकोस” असे आश्वासन तु मला द्यावे. माझ्या चित्तामध्ये फार तळमळ वाढली आहे त्याचे आता तु शमण कर. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठले तु माझ्या जिवामध्येच रहा वस्ती कर माझ्यापेक्षा वेगळे राहू नकोस.
अभंग क्र. २५८४
कल्याण या आशीर्वादे । जाती द्वंद्वे नासोनि ॥१॥
आश्वासिले नारायणे । प्रेमदाने अंतरिच्या ॥धृपद॥
गेली निवारोनि आता । सकळ चिंता यावरी ॥२॥
तुका म्हणे गाता गीत । आले हित सामोरे ॥३॥
अर्थ
देवाने जर तुझे कल्याण होईल असा आशीर्वाद दिला तर मग सुख-दुःखादी द्वंद्वे नासून जातात. नारायणाने मला अंतकरणातील प्रेम दान देऊन मला आश्वासन दिले आहे कि “तुझे कल्याण होईल”. त्यामुळे माझ्या सर्व चिंतेचे निवारण होऊन माझी सर्व काळजी दूर झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी नारायणाचे गीत गायले त्यामुळे माझे हित माझ्यासमोर आले आहे.
अभंग क्र. २५८५
हरीनाम वेली पावली विस्तार । फळी पुष्पी भार वोल्हावली ॥१॥
तेथे माझ्या मना होई पक्षिराज । साधावया काज तृप्तीचे या ॥धृपद॥
मुळीचिया बीजे दाखविली गोडी । लवकरचि जोडी झालियाची ॥२॥
तुका म्हणे क्षणक्षणा जातो काळ । गोडी ते रसाळ अंतरेल ॥३॥
अर्थ
हरी नाम वेली ही खुप विस्तार पावली व ती वेली फळ पुष्पाने चांगलीच लगबगली आहे. त्यामुळे हे मना तुझे कार्य पूर्ण होण्यासाठी तु त्या हरिनाम रुपी वेलीवर पक्षीराज होऊन बैस. हरिनाम रुपी वेलीचे मुळ बीज म्हणजे हरी आहे व तो गोड आहे म्हणजेच बीज गोड आहे त्यामुळे फळ फुले ही गोड असणारच त्यामुळे हे मना तुला ज्या फळाची प्राप्ती करून घ्यायची आहे ती प्राप्त करून घेण्यासाठी त्वरा करा. तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच अरे हे मना क्षणाक्षणाला काळ जात आहे त्यामुळे तु लवकर हरिनाम रुपी वेलीवर बस आणि त्या फळांच्या रसाची गोडी घे नाहीतर तु उशीर केला की तुला त्या हरिनाम वेलीवरील फळांच्या रसाची गोडी अंतरेल.
अभंग क्र. २५८६
बरवे ऐसे आले मना । नारायणा या काळे ॥१॥
देव आह्मा प्राणसखा । झाले दुःखा खंडण ॥धृपद॥
जन्मांतरिंच्या पुण्यरासी । होत्या त्यासी फळ आले ॥२॥
तुका म्हणे निजठेवा । होईल देवा लाधलो ॥३॥
अर्थ
माझे हित करावे असे या नारायणाच्या या वेळी मनात आले ते फार बरे झाले. देव आमचा प्राण सखा आहे त्यामुळे सर्व दुःखांचे खंडन झाले आहे. अनेक जन्माच्या फळाच्या गाठी होत्या त्यामुळेच तर आज ते फळास आले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात मला देवाची प्राप्ती झाली देवाची व माझी भेट झाली त्यामुळे मला नीज ठेवा प्राप्त झाला आहे.
अभंग क्र. २५८७
जरि आड यती लाज । कैसे काज साधते ॥१॥
करणे केले उठाउठी । पायी मिठी घातली ॥धृपद॥
समर्पीला जीव भाव । धरिला भाव अखंड ॥२॥
तुका म्हणे आड काही । काळ नाही घातला ॥३॥
अर्थ
जर कोणतेही कार्य करत असताना लाज आडवी आली तर मग ते कार्य कसे साधेल. त्यामुळेच मी कोणताही विचार न करता घाई केली आणि हरीच्या पायाला मिठी मारली. मी माझा देहभाव हरीला समर्पण केला व त्याच्याच ठिकाणी माझा भक्ती भाव अखंड ठेवला आहे. तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या पायाला मिठी मारण्याविषयी मी कोणत्याही प्रकारची लाज धरली नाही कोणत्याही प्रकारचा वेळ वाया घातला नाही त्याविषयी तातडी केली म्हणून बरे झाले.
अभंग क्र. २५८८
पात्र शुद्ध चित्त ग्वाही । न लगे काही सांगणे ॥१॥
शूर तरी सत्यचि व्हावे । साटी जीवे करूनि ॥धृपद॥
अमुपच सुखमान । स्वामी जन मानवे ॥२॥
तुका म्हणे जैसी वाणी । तैसे मनी परिपाक ॥३॥
अर्थ
आपले चारित्र्य शुद्ध आहे किंवा नाही याविषयी आपले चित्त साक्षी असते याविषयी दुसऱ्याने किंवा दुसऱ्याला काही सांगण्याची गरज नाही. शुर व्हायचे असेल तर जीवावर उदार होऊन खरे शुर व्हा. त्याला भरपूर सुख प्राप्त होऊन राजा आणि प्रजा या दोन्हीमध्ये ही मान मिळतो. तुकाराम महाराज म्हणतात आपली जसी वाणी असेल तसेच मनातही विचार असून त्या प्रमाणे जो वागतो तोच परिपाकी म्हणजे सर्वमान्य होतो.
अभंग क्र. २५८९
प्रगटले ज्ञान । नारायण भूती ते ॥१॥
अनुभवच घेऊ व्हावा । विनंती देवा करूनिया ॥धृपद॥
देखोवेखी वदे वाणी । पडिल्या कानी प्रमाणे ॥२॥
तुका म्हणे योगक्षेम । घडे ते वर्म साधावे ॥३॥
अर्थ
सर्व भूतमात्रा मध्ये एक नारायण आहे अशी प्रचिती आली की आपले ज्ञान प्रकट झाले हे उघड आहे. शाब्दिक ज्ञानापेक्षा अनुभवाचे ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे अनुभव देवाला विनंती करून मागावा. सर्वत्र नारायण आहे असे कोणाचे तरी ऐकून पाहून किंवा कुणीतरी प्रमाण दिले की सर्वत्र नारायण आहे त्याचे ते शब्द ऐकून त्याच्या शब्द कानावर पडले की ते ऐकून जो बोलतो तो केवळ शब्द ज्ञानी होतो परंतु तो अनुभव शून्य असतो. तुकाराम महाराज म्हणतात सर्व भूते एक नारायण आहे असा अनुभव ज्या योगाने प्राप्त होईल तेच वर्म साधावे.
अभंग क्र. २५९०
मुख्य आधी विषयत्याग । विधिभाग पाळणे ॥१॥
मन पावे समाधान । हेचि दान देवाचे ॥धृपद॥
उदासीन वृत्ति देही । चाड नाही पाळणे ॥२॥
तुका म्हणे नाही भय । सम सोय विषमाची ॥३॥
अर्थ
परमार्थामध्ये प्रथम अहंकार आणि विषयांचा त्याग करावा आणि आपल्या वाटेला जो विधी भाग आहे त्याचे पालन करावे. त्यामुळे मनाचे समाधान होते आणि हेच खरे दान देवाचे आहे. देह वृत्ती विषयी उदासीनता असावी आणि त्याचे पालन पोषण करण्याची आवड नसावी. तुकाराम महाराज म्हणतात भेद आणि अभेद या अज्ञानाचा ज्यांच्या ठिकाणी त्याग झाला आहे त्यांना कोणत्याही प्रकारचे भय नाही.
अभंग क्र. २५९१
आता हेचि सार हेचि सार । मूळबीज रे आइका ॥१॥
आवडीने आवडी उरे । जे ज्या झुरे ते त्यासी ॥धृपद॥
प्रेमाचिया सूत्रदोरी । नाही उरी उरवी ॥२॥
तुका म्हणे चिंतन बरे । आहे खरे खऱ्यापे ॥३॥
अर्थ
अरे परमार्था मध्ये मुळ बीज काय आहे आणि मुख्य सार काय आहे हे ऐका. प्रेमाने प्रेम वाढत असते आणि ज्याला ज्याची आवड असते ते प्राप्त करून घ्यावे म्हणून तो झुरत असतो. प्रेमाची सूत्र दोरी अशी आहे की आपण ज्याच्यावर प्रेम करतो आणि जो आपल्यावर प्रेम करतो ते दोघेही ऐकमेकांना प्रेमसुत्रदोरीत एकत्र बांधून ठेवत असतात वेगळे उरु देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे नेहमी हरीच्या चिंतनात रहावे हे चांगले कारण जो खरा आहे त्यालाच खऱ्याची प्राप्ती होते.
अभंग क्र. २५९२
केला तैसा अंगीकार । माझा भार चालवी ॥१॥
होऊ अंतराय बुद्धी । कृपानिधी नेंदावी ॥धृपद॥
आम्ही तरी जड जीव । कैचा भाव सपुरता ॥२॥
अनन्यभावे घ्यावी सेवा । आम्हा देवा घडेसी ॥३॥
तुह्मी आम्ही शरणागते । कृपावंते रक्षीजे ॥४॥
तुका म्हणे भाकु कीव । असो जीव जड आम्ही ॥५॥
अर्थ
देवा आता तुम्ही माझा अंगिकार केला ना तसाच तुम्ही माझा योग क्षेमाचा भारही चालवा. हे कृपानिधी माझी बुद्धी तुमच्याविषयी आतरेल असे तुम्ही होऊ देऊ नका. देवा आहो आम्ही तर काय जड जीवच आहोत त्यामुळे तुमच्या विषयी श्रद्धा देखील या ठिकाणी नाहीये. त्यामुळे हे देवा तुम्ही आमच्याकडून अंनन्य भक्तिभावाने तुमची सेवा करून घ्या त्यानिमित्ताने तुमची सेवा ही आमच्या हातून घडेल. हे कृपावंत देवा आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत त्यामुळे तुम्ही आमचे रक्षण करा. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही तर जड जीव आहोत त्यामुळे तुला काकुळतीला येऊन तुझी कीव आम्ही भाकु.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















