२२ ऑगस्ट, दिवस २३४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी १२६ ते १५० सार्थ तुकाराम गाथा अभंग २७९७ ते २८०८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२२ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २२ August
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २२ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २७९७ ते २८०८ चे पारायण आपण करणार आहोत.
२२ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी १२५ ते १५०

126-15.
महाकल्पाच्या शेवटी । उदेलिया उमळती सृष्टी । तैसेचि आणिखीचे दांग उठी । सासिन्नले ॥126॥
उत्पन्न झालेली चतुर्दश भुवने, कल्प संपण्याचे वेळी उन्मळून पडतात व पुन्हा कल्प सुरू झाला म्हणजे भरास आलेले तितकेच जगताचे अनेक समुदाय तयार होतात.
127-15
संहारवाते प्रचंडे । पडती प्रळयातीची सालडे । तव कल्पादीची जुंबाडे । पाल्हेजती ॥127॥
संहारकारक प्रचंड वार्‍याने महाप्रलयकाळाच्या अखेरीची जीर्ण झालेली संसारवृक्षाची साली गळून पडतात न पडतात तोच कल्पाच्या आरंभास सृष्टीचे समुदायचे समुदाय उत्पन्न होतात.
128-15
रिगे मन्वंतर मनूपुढे । वंशावरी वंशांचे मांडे । जैसी इक्षुवृद्धी कांडेंनकांडे । जिंके जेवी ॥128॥
कांड्यामागून कांडे उत्पन्न होऊन जसा ऊस वाढत जातो, त्याप्रमाणे एका मनूच्या काळापासून दुसर्‍या मनूचा काळ येऊन एका वंशामागून दुसरा वंश असा वंशवृद्धीचा विस्तार होतो.
129-15
कलियुगांती कोरडी । चहु युगांची साले सांडी । तव कृतयुगाची पेली देव्हडी । पडे पुढती ॥129॥
कलियुगाच्या अखेरीस चार युगांची जीर्ण झालेली सालपटे गळून पडतात न पडतात इतक्यात कृतयुगाची नविन अतिशय रसरशीत अशी मोठी सालपटे जोमाने उत्पन्न होण्यास लागतात.
130-15
वर्तते वर्ष जाये । ते पुढिला मुळहारी होये । जैसा दिवसु जात की येत आहे । हे चोजवेना ॥130॥
चालू असलेले जे वर्ष संपुन जाते ते पुढच्या वर्षास आमञंन देते. ज्याप्रमाणे दिवस जातो की येतो कळत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


131-15
जैशा वारियाच्या झुळका । सांदा ठाउवा नव्हे देखा । तैसिया उठती पडती शाखा । नेणो किती ॥131॥
ज्याप्रमाणे वार्‍याच्या झुळुकांमागून झुळुका वहात असल्यामुळे त्यांचा जोड कोठे आहे ते कळत नाही, त्याप्रमाणे या संसारवृक्षाच्या उत्पन्न होणार्‍या व नाश पावणार्‍या फंद्यांचा आदि व अंत न समजल्याने त्या किती आहेत हे कळत नाही.
132-15
एकी देहाची डिरी तुटे । तव देहाकुरी बहुवी फुटे । ऐसेनि भवतरु हा वाटे । अव्ययो ऐसा ॥132॥
या संसारवृक्षाचा शरीररूपी एक शेंडा गळून पडतो, तो अनेक देहरूपी अंकुर त्याला (संसारवृक्षाला) फुटतात, अशातर्‍हेने हा संसारवृक्ष अव्यय, अविनाशी आहे असा वाटतो.
133-15
जैसे वाहते पाणी जाय वेगे । तैसेचि आणिक मिळे मागे । येथ असंतचि असिजे जगे । मानिजे संत ॥133॥
जसे वहाणारे पाणी जोराने जात असते व त्यास मागून तसेच वहाणारे पाणी मिळात असते, त्यामुळे पहाणारास एकसारखे तेच पाणी आहे असे वाटते. त्याप्रमाणे हा संसासरवृक्ष अस्थिर असतानाच लोक याला स्थिर असे मानतात.
134-15
का लागोनि डोळा उघडे । तव कोडीवरी घडे मोडे । नेणतया तरंगु आवडे । नित्यु ऐसा ॥134॥
अथवा डोळा मिटून उघडावा इतक्या अवकाशात लाट, कोट वेळा घडते व मोडते, परंतु त्या लाटेचे कोटीवेळा होणे-जाणे ज्यास कळत नाही, त्याला लाट नित्य एकसारखी टिकणारी अशी वाटते.
135-15
वायसा एके बुबुळे दोहीकडे । डोळा चाळीता अपाडे । दोन्ही आथी ऐसा पडे । भ्रमु जेवी जगा ॥135॥
एकच बुबुळ आपल्या दोन्ही डोळ्यात असाधारणपणे कावळा फिरवीत बसल्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यात बुबुळे आहेत असा लोकांना भ्रम पडतो.


136-15
पै भिंगोरी निधिये पडली । ते गमे भूमीसी जैसी जडली । ऐसा वेगातिशयो भुली । हेतु होय ॥136॥
भिंगरी जेव्हा अतिशय वेगाने फिरत असते, तेव्हा ती जमिनीला उभी चिकटली आहे असे वाटते, याप्रमाणे अतिशय वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होतो.
137-15
हे बहु असो झडती । आंधारे भोवंडिता कोलती । ते दिसे जैसी आयती । चक्राकार ॥137॥
हे राहू दे, अंधारामधे कोलती फार लवकर फिरवली असता ती ज्याप्रमाणे अखंडचक्राच्या आकाराची दिसते.
138-15
हा संसारवृक्षु तैसा । मोडतु मांडतु सहसा । न देखोनि लोकु पिसा । अव्ययो मानी ॥138॥
त्याप्रमाणे हा संसारवृक्ष मोठ्या झपाट्याने नाश पावत आहे व रचला जात आहे, हे जगास न कळाल्यामुळे भ्रमिष्ट लोक याला अविनाशी असे मानतात.
139-15
परि ययाचा वेगु देखे । जो हा क्षणिक ऐसा वोळखे । जाणे कोडिवेळा निमिखे । होत जात ॥139॥
परंतु जो याचा वेग पहातो व हा क्षणभंगुर आहे असे समजतो आणि एका निमिषात कोट्यवधी वेळा हा उत्पन्न होतो व नाहीसा होतो असे ज्यास ज्ञान असते,
140-15
नाही अज्ञानावाचूनि मूळ । ययाचे असिलेपण टवाळ । ऐसे झाड सिनसाळ । देखिले जेणे ॥140॥
या संसारवृक्षास अज्ञानाशिवाय दुसरे मूळ नसून याचे अस्तित्वही मिथ्या आहे, असा हा वृक्ष जीर्ण सालीचा नाशिवंत व भासमात्र आहे असे ज्याने जाणले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


141-15
तयाते गा पंडुसुता । मी सर्वज्ञुही म्हणे जाणता । पै वाग्ब्रह्म सिद्धांता । वंद्यु तोची ॥141॥
अर्जुना, त्याला संसारवृक्षाचे क्षणिकत्व जाणणार्‍याला मी जो सर्वज्ञ तोच ज्ञानी असे म्हणतो आणि वेदांच्या सिद्धांताला तोच पूज्य आहे.
142-15
योगजाताचे जोडले । तया एकासीचि उपेगा गेले । किंबहुना जियाले । ज्ञानही त्याचेनी ॥142॥
सर्वप्रकारच्या योगाच्या अभ्यासाचे मिळालेले फळ त्या एकट्याच्याच उपयोगाला गेले. फार काय सांगावे ? ज्ञान-उपदेशाचा संप्रदाय देखील त्या जिवनमुक्त पुरुषाच्या योगानेच सुरु असतो.
143-15
हे असो बहु बोलणे । वानिजैल तो कवणे । जो भवरुखु जाणे । उखि ऐसा ॥143॥
हे फार बोलणे राहू दे. अशा प्रकार हा संसारवृक्ष केवळ मिथ्याभास आहे असे जाणतो, त्याचे कोणाला वर्णन करता येईल ?

अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा
गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः ।
अधश्च मूलान्यनुसन्ततानि
कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके ॥15. 2॥
श्लोकार्थ:-
ज्याप्रमाने ह्या सात्विक, राजस, आणि तामस या गुणांच्या पाण्याने वाढलेल्या विषयभोगरुपी अंकुरांच्या देव, मनुष्य आणि तिर्यक आदि योनिरुप फांद्दा खालचया बाजुस व वर सर्वञ पसरल्या आहेत. तसेच मानव योनीमध्ये कर्माप्रमाने बांधनारी अहंता, ममता आणि वासनारुपी मुळे खाली आणि वर तिन्ही लोकामध्ये सामावली आहेत.
144-15
मग ययाचि प्रपंचरूपा । अधोशाखिया पादपा । डाहाळिया जाती उमपा । ऊर्ध्वाही उजू ॥144॥
मग याच खाली असलेल्या या संसाररुपी झाडाला वरच्या बाजुस सुद्धा पुष्कळ फांद्या तयार होतात.
145-15
आणि अधी फांकली डाळे । तिये होती मूळे । तयाही तळी पघळे । वेल पालवु ॥145॥
आणि तळाशी पसरलेल्या संसारवृक्षाच्या ज्या फांद्या आहेत, त्या फांद्या पारंब्यांप्रमाणे मूळे होतात व त्या मुळांपासून खालच्या भागास वेल व पाला फुटुन त्याची विस्तार होत जातो.


146-15
ऐसे जे आम्ही । म्हणितले उपक्रमी । तेही परिसे सुगमी । बोली सांगो ॥146॥
असे जे आम्ही सुरुवातीला (ओवी 57 ते 64 मधे) म्हटले होते तेच अजुन सोप्या भाषेत सांगतो ऐक.
147-15
तरी बद्धमूळ अज्ञाने । महदादिकी सासिने । वेदांची थोरवने । घेऊनिया ॥147॥
तरी अज्ञानरूपी बळकट बनलेल्या मुळाने अष्टदा प्रकृती तयार होऊन वेदरूपी मोठी पाने फुटून हा संसारवृक्ष पुढे सांगितल्याप्रमाणे वाढतो.
148-15
परी आधी तव स्वेदज । जारज उद्भिज अंडज । हे बुडौनि महाभुज । उठती चारी ॥148॥
परंतु प्रारंभी झाडाच्या बुडापासुन तर स्वेदज, जारज, अंडज व उद्भिज हे बुडापासून (मुळापासून) चार मोठ्या मोठ्या फांद्दा उत्पन्न होतात.
149-15
यया एकैकाचेनि आणगटे । चौऱ्यांशी लक्षधा फुटे । ते वेळी जीवशाखी फाटे । सैंघचि होती ॥149॥
या एकेक खाणीच्या मुळापासून अंकुर फुटून एकंदर चौर्‍यांशी लक्ष प्रकारचे अंकुर फुटतात. त्यावेळी जीवरूपी फांदीच्या ठिकाणी पुष्कळसे फाटे तयार होतात.
150-15
प्रसवती शाखा सरळिया । नाना सृष्टि डाहाळिया । आड फुटती माळिया । जातिचिया ॥150॥
मागे सांगितलेल्या चार खाणीरूप सरळ शाखांनी आणखी सृष्टीरूपी डहाळ्या फुटतात. आणि अनेक जातिरूपी आडव्या फांद्या ह्या संसारवृक्षाला उत्पन्न होतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २३४ वा. २२, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २७९७ ते २८०८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २७९७
दीन आणि दुर्बळांसी । सुखरासी हरीकथा ॥१॥
तारू भवसागरींचे । उंचनीच अधिकारी ॥धृपद॥
चरित्र ते उच्चारावे । केले देवे गोकुळी ॥२॥
तुका म्हणे आवडी धरी । कृपा करी म्हणऊनी ॥३॥
अर्थ
जे दीन आणि दुर्बळ आहेत त्यांच्यासाठी हरीकथा म्हणजे सुखाची राशीच आहे. ही हरीकथा भवसागर तरुन नेणारी नौकाच आहे जहाजच आहे त्यामध्ये उच्च असो किंवा नीच असो सर्वाना बसण्याचा अधिकार आहे. या हरीकथेमध्ये भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केले आहे तेच उच्चारावे म्हणजे लोकांना सांगावे. तुकाराम महाराज म्हणतात, “हरीकथा करणे किंवा ऐकणे याविषयी आवड धरल्याने देव आपल्यावर कृपा करतो त्यामुळे हरीकथेविषयी मनात आवड धरावी. ”
अभंग क्र. २७९८
संतोषे माउली आरुषा वचनी । वोरसोनि स्तनी लावी बाळा ॥१॥
तैसे प्रेमळाचे अवघेचि गोड । पुरवितो कोड पांडुरंग ॥धृपद॥
सेवा करी साहे निष्ठुर उत्तरे । त्याचे वाहे बरे तेचि मनी ॥२॥
तुका म्हणे इच्छावसे खेळे खेळ । चिंता तै सकळ काही नेणे ॥३॥
अर्थ
लहान मुलाच्या बोबड्या बोलण्याने त्याची आई फार संतुष्ट होते आणि प्रेमाने त्याला जवळ घेऊन त्याची इच्छा नसताना देखील त्याला स्तनाला लावते. त्याप्रमाणे पाडूरंगाच्या प्रेमळ भक्ताचे सर्व काही त्याला गोडच वाटते म्हणजे त्याचे वागणे बोलणे सर्व त्याला पाडूरंगाला गोड वाटते व तो त्या भक्ताचे सर्व लाड पूर्ण करतो. आई त्या मुलाची सेवा करते मुलगा कितीही निष्ठूर बोलला तरी ते सहन करते आणि त्याचे बरेच व्हावे अशीच संकल्पना मनात वाहात असते. तुकाराम महाराज म्हणतात, “लहान मूल जर खेळायला गेले तर त्याला त्याच्या तहान भूकेची कसलीही चिंता नसते त्याची सर्व चिंता त्याच्या आईलाच असते अगदी त्याप्रमाणे भक्तांची सर्व पाडूरंगालाच असते. ”
अभंग क्र. २७९९
विनवीजे ऐसे काही । उरले नाही यावरी ॥१॥
आता असो पंढरीनाथा । पायी माथा तुमचिये ॥धृपद॥
मागे सारियेली युक्ती । काही होती जवळी ते ॥२॥
निराशेची न करी आस । तुका दास माघारी ॥३॥
अर्थ
देवा तुला आता काही विनवनी करावे असे काही उरलेच नाही. हे पंढरीनाथा आता माझे मस्तक तुमच्या पायी असावे एवढेच. देवा तुम्हाला वश करण्यासाठी ज्या काही युक्त्या होत्या त्या सर्वाचा मी अवलंबून मागे केला आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा मी आता संसाराविषयी निराश झालो आहे त्यामुळे आता दुसरी कसलीही अपेक्षा मी करणार नाही आता मी तुमचा केवळ दास झालो आहे.
अभंग क्र. २८००
आता येथे झाली जीवा संवसाटी । होते तैसे पोटी फळ आले ॥१॥
आता धरिले ते नो सोडी चरण । सापडले धन निजठेवा ॥धृपद॥
आता हा अळस असो परता दुरी । नेदावी ते उरी उरो काही ॥२॥
आता याचा मज न व्हावा विसर । भरोनि अंतर राहो रूप ॥३॥
आता लोकलाज नयो येथे आड । बहु झाला गोड ब्रम्हरस ॥४॥
तुका म्हणे आता जन्म हा सफळ । अंतरी गोपाळ स्थिरावला ॥५॥
अर्थ
आता मी जीवावरच उदार झालो आहे त्यामुळे माझ्या हृदयामध्ये जे फळ मला अपेक्षित होते ते फळ मला मिळाले आहे. माझ्या हृदयामध्ये होते ते तुमचे चरण ते मला आता प्राप्त झाले आहे त्यामुळे तो नीज ठेवा मला सापडला आहे मी आता तो सोडणार नाही. आता भजन करण्यासाठी माझ्या मध्ये जो आळस होता तो मी बाहेर काढून टाकला आहे तो आता माझ्या ह्रदयात बाकी उरू देणार नाही. देवा आता मला तुझ्या रूपाविषयी कधीही विसर पडू नये तुझे रूप माझ्या अंतरंगात मध्ये अगदी ठासून भरून राहिले पाहिजे. आता मला गोड असा ब्रम्हरस मिळाला आहे त्यामध्ये लोक लज्जाआड येऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात आता माझ्या अंतरंगात मध्ये गोपाळला स्थिरावला आहे त्यामुळे माझा जन्म सफल झाला आता.
अभंग क्र. २८०१
अभंग क्र. २८०१
अनंता जीवांची तोडिली बंधने । मज काळे येणे कृपा कीजे ॥१॥
अनंत पवाडे तुझे विश्वंभरा । भक्तकरुणाकरा नारायणा ॥धृपद॥
अंतरीचे कळो देई गुह्य गुज । अंतरी ते बीज राखेन मी ॥२॥
समदृष्टी तुझे पाहेन पाउले । धरीन संचले हृदयात ॥३॥
तेणे या चित्ताची राहील तळमळ । होतील शीतळ सकळ गात्रे ॥४॥
तुका म्हणे शांति करील प्रवेश । मग नव्हे नाश अखंड तो ॥५॥
अर्थ
देवा अनेक जीवाचे बंधन तू तोडले आहेत तसेच तूझी कृपा यावेळी माझ्यावर कर. नारायणा विश्वंभरा भक्त करुणाकरा अशी तुझे अनंत पवाडे प्रसिद्ध आहेत. देवा तुझ्या अंतकरणातील गुप्त ज्ञान मला कळू दे मग बीज मी माझ्या अंतःकरणात राखण करून ठेवीन. देवा तुझे समचरण मी माझ्या दृष्टीने पाहिन व तेच मी माझ्या हृदयात साठवून ठेवीन. देवा त्यामुळे माझ्या चित्ताची तळमळ शांत होईल आणि माझे सर्व इंद्रिये शितल होतील. तुकाराम महाराज म्हणतात असे जर झाले तर माझ्या चित्त मध्ये शांती नांदेल आणि त्याचा कधीही नाश होणार नाही.
अभंग क्र. २८०२
पराधीन माझे करूनिया जीणे । सांडी काय गुणे केली देवा ॥१॥
उदार हे कीर्ति असे जगामाजी । का ते ऐसे आजि पालटिले ॥धृपद॥
आळवितो परी न पुरेचि रीग । उचित तो त्याग नाही तुम्हा ॥२॥
तुका म्हणे का बा मुळीच व्यालासी । ऐसे का नेणसी पांडुरंगा ॥३॥
अर्थ
देवा माझे जीने हे संचित कर्माचा आधीन झाले आहे म्हणजे मी पराधीन झालो आहे असे तुम्ही का बरे केले आहेत माझी अशी हेळसांड तुम्ही का केली ? देवा जगामध्ये तुमची किर्ती म्हणजे तुम्ही उदार आहात अशी आहे मग माझ्या बाबतीत तुम्ही असा तुमचा रंग का पालटला आहे ? देवा मी तुम्हाला खूप आळवित आहे परंतु माझे आळवणे तुमच्या पर्यंत पोहोचत नाही माझा असा त्याग करणे हे तुमच्यासाठी उचित नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा मुळात तुम्ही मला जन्मच का दिला आणि मला जन्म दिला नसता तर माझा कोणत्याही प्रकारचा भार तुमच्यावर आलाच नसता हे तुम्हाला पूर्वीच समजले नाही काय ?
अभंग क्र. २८०३
नेणपणे नाही केला हा बोभाट । आता आली वाट कळो खरी ॥१॥
आता बहुं शीघ्र यावे लवकरी । वाट पाहे हरी भेटी देई ॥धृपद॥
समर्थाच्या बाळा करुणेचे भाषण । तरी त्याची कोण नांदणूक ॥२॥
तुका म्हणे बहु बोलिले बडिवार । पडिले अंतर लौकिकी ते ॥३॥
अर्थ
देवा तुमच्यात व माझ्यात पिता-पुत्राचा संबंध आहे हे मला यापूर्वी माहीत नव्हते त्यामुळे मी या गोष्टीचा बोभाटा देखील केला नाही परंतु मला आता ही गोष्ट समजून आली आहे की आपण दोघामध्ये काय संबंध आहे त्यामुळे मी आता कोणतेही परमार्थिक गोष्ट पुत्राच्या हक्काने मागणार आहेत ही खरी वाट मला कळून आली आहे. त्यामुळे हे हरी तू लवकर शीघ्रतेने माझ्याकडे यावे मी तुझी वाट पाहत आहे तू लवकर मला भेट द्यावी. समर्थ व्यक्तीच्या बाळाला जर करुनतेचे भाषण करावे लागले तर त्या समर्थ व्यक्तीच्या किर्तीचा काय उपयोग आहे ? तुकाराम महाराज म्हणतात देवा यापूर्वी लोकांकडून मी तुमची खूप कीर्ती ऐकले आहे परंतु तुमच्या असे वागणे म्हणजे लौकिकात अंतर पडण्यासारखे होत आहे.
अभंग क्र. २८०४
जे जे केले ते ते साहे । कैसे पाहे भाविक ॥१॥
ओवाळूनि माझी काया । सांडिली यावरूनि ॥धृपद॥
काय होय नव्हे करू । नेणे धरू सत्ता ते ॥२॥
तुका म्हणे कटी कर । उभे धीर धरूनि ॥३॥
अर्थ
आम्ही भक्तांनी जे जे काही केले ते ते सर्व देवाने सहन केले भोळया भक्तांचा कसा भाविक आहे हा देव पाहा. त्यामुळेच तर मी माझे शरीर या देवावरुन ओवाळून टाकले आहे. या देवाने मनात आणले तर तो काय करु शकत नाही सर्व काही करु शकतो परंतू भक्तांच्या पुढे तो आपली सत्ता धरतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “असा हा देव आपले दोन्हीही कर कटेवर ठेवून भक्तांचे कार्य करण्यासाठी विटेवर धीर धरुन उभा आहे. ”
अभंग क्र. २८०५
नाही मज कृपा केली पांडुरंगे । संताचिया संगे पोट भरी ॥१॥
चतुराचे सभे पंडित कुशल । मी काय दुर्बळ विष्णुदास ॥२॥
तुका म्हणे नेणे करू समाधान । धरिले चरण विठोबाचे ॥३॥
अर्थ
पाडूरंगाने अजूनही माझ्यावर कृपा केलेली नाही संतांच्या संगतीत राहूनच मी पोट भरीत आहे. चतुर लोकांच्या सभेमध्ये कुशल पंडीत लोकांना चांगले स्थान असते मी तर दुर्बळ विष्णूदास आहे माझी तेथे काय किंमत आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “त्यामुळे हे पंडीतजनहो मी काही बोलून तुमचे समाधान करु शकणार नाही कारण मला दुसरे काही आठवत नाही मी केवळ विठोबाचेच चरण धरलेले आहे. ”
अभंग क्र. २८०६
तुम्ही माझा देवा करा अंगीकार । हा नाही विचार मजपाशी ॥१॥
आता दोही पक्षी लागले लांछन । देवभक्तपण लाजविले ॥धृपद॥
एकांती एकले न राहे निश्चळि । न बैसे चपळ मन ठायी ॥२॥
पायी महत्वाची पडिली शृखळा । बांधविला गळा स्नेह हाती ॥३॥
शरीर सोकले देखिलिया सुखा । कदान्न हे मुखा रुचेचीना ॥४॥
तुका म्हणे झला अवगुणाचा थारा । वाढली हे निद्रा आळस बहु ॥५॥
अर्थ
देवा तुम्ही माझा अंगीकार करावा हा विचारच माझ्याजवळ राहीला नाही. त्यामुळे देवा आता देव आणि भक्त या दोन्हीही पक्षांना लांछन लागले आहे देवभक्तपणाला या गोष्टींमुळे लज्जास्पदरुप आले आहे. देवा माझे मन एकांती एकटे निश्चळ व एका ठिकाणी बसत नाही ते अतिशय चपळ झाले आहे. माझ्या पायात मोठेपणाची श्रृंखळा आणि या भवसागरातील स्नेहबंधनाने म्हणजे मोहाने गळा बांधला गेला आहे. माझ्या मुखाला कदान्न तर आवडतच नाही चांगले चांगले खाणे आवडते आणि शरीर विषयसुखाला सोकलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आळस आणि निद्रा हे माझ्या शरीरामध्ये खूप वाढले आहे त्यामुळे अवगुणाना माझ्या शरीरामध्ये स्थान मिळाले आहे. ”
अभंग क्र. २८०७
बोलिलिया गुणी नाही पाविजेत । देवा नाही होत हित तेथे ॥१॥
कवतुक तुझे न कळे यापरि । घेसील ते शिरी काय नव्हे ॥धृपद॥
नाही मिळे येत संताचिया मता । पुराणी पाहता अघटित ॥२॥
तुका म्हणे पायी निरोपिला भाव । न्याल तैसा जाव सिद्धी देवा ॥३॥
अर्थ
देवा मी तुम्हाला माझे अवगुण सांगितलेलेच आहे त्या अवगुणामुळे माझे हित कसे होणार ? देवा अरे तुझे कौतुक कोणालाही कळणार नाही कळतही नाही आमचे हित करणे हे जर तू तुझ्या माथ्यावर घेतले तर तू काय करु शकत नाहीस ? देवा आपले पूर्वपुण्य जर चांगले असेल तर आम्हाला तुझी प्राप्ती होईल, या संतांच्या मताला मी सहमत नाही कारण पुराण उघडून पाहिले तर सर्व अघटितच प्रकार लक्षात येतात तू यापूर्वी अशा काही भक्तांचा उध्दार केला आहे म्हणजे वाल्मिक अजामेळ गणिका असे काही भक्त तुझे झालेत की त्यांचे पूर्वपुण्य चांगले नव्हते तरी देखील त्यांना तुझी प्राप्ती झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता मी माझा भक्तीभाव जसा आहे तसा तुमच्या पायाजवळ निरुपण केला आहे आता माझा भक्तीभाव जसा सिध्दीला जाईल तसा जावो. ”
अभंग क्र. २८०८
हा तो नव्हता दीन । टाळायाचा ऐसा क्षण ॥१॥
का जी नेणो राखा हात । कैसे देखावे रडत ॥धृपद॥
दावूनिया आस । दूर पळविता काशास ॥२॥
तुका म्हणे धाव । येता न पुरेचि हाव ॥३॥
अर्थ
देवा दीनजणांची टाळाटाळी करण्याचा हा क्षण नव्हता. देवा तुम्ही असा हात राखून का वागता हे मला काही कळत नाही आणि आम्ही तुमच्यापुढे रडत आहोत हे तुम्हाला कसे देखवत आहे ? देवा तुम्ही मला फक्त प्रथम आशा दाखवता आणि नंतर मग दूर कशासाठी माझ्यापासून पळता ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुमच्याकडे सारखे सारखे धाव घ्यावा ही माझी हाव काही थांबत नाही. ”

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading