२ ऑगस्ट, दिवस २१४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी ५१ ते ७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २५५७ ते २५६८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan August
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २५५७ ते २५६८ चे पारायण आपण करणार आहोत.
२ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी ५१ ते ७५

51-14
मग ते देहाचे बेळे । वोलांडूनि एकेचि वेळे । संवतुकी काटाळे । माझे जाले ॥51॥
मग दुबेळके (स्थूल व सूक्ष्म देह) एकाच वेळेला ओलांडून (निरास करून) ते पुरुष वजनात माझ्या बरोबरीचे झाले.
52-14
इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः ।
सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च ॥14. 2॥
श्लोकार्थ -: या ज्ञानाचा आश्रय करून माझ्या साधर्म्याप्रत प्राप्त झालेले (मजशी समानधर्मा होणारे) पुरुष सृष्टि-निर्माण काली जन्म पावत नाहीत आणि प्रलयकाली मरण अथवा दु:ख पावत नाहीत. (ज्ञानाचा महिमा)
जे माझिया नित्यत । तेणे नित्य ते पंडुसुता । परिपूर्ण पूर्णता । माझियाची ॥52॥
अर्जुना जी माझी नित्यता आहे, त्या नित्यतेने ते पुरुष नित्य आहेत व माझ्याच परिपूर्णतेने ते परिपूर्ण आहेत.
53-14
मी जैसा अनंतानंदु । जैसाचि सत्यसिंधु । तैसेचि ते भेदु । उरेचि ना ॥53॥
मी जसा अमर्याद व अनंत आहे व मी जसा सत्याचा समुद्र आहे, तसेच ते आहेत. त्यांच्यात व माझ्यात भेद शिल्लकच रहात नाही.
54-14
जे मी जेवढे जैसे । तेचि ते जाले तैसे । घटभंगी घटाकाशे । आकाश जेवी ॥54॥
कारण की मी जसा व जेवढा आहे तसेच व तेवढे ते ज्ञानाच्या योगाने झालेले असतात. कसे तर ज्याप्रमाणे घट फुटल्यावर घटाकाश महाकाश होते.
55-14
नातरी दीपमूळकी । दीपशिखा अनेकी । मीनलिया अवलोकी । होय जैसे ॥55॥
अथवा दिव्याच्या मूळ ज्योतीत दुसर्‍या अनेक ज्योती मिळाल्या असता जसे होते जशा त्या सर्व ज्योती एकरूप होऊन जातात त्याप्रमाणे समज.


56-14
अर्जुना तयापरी । सरली द्वैताची वारी । नांदे नामार्थ एकाहारी । मी तू विण ॥56॥
अर्जुना, त्याप्रमाणे त्या पुरुषाच्या ठिकाणी द्वैताची येरझार संपली व आता तो व मी असे दोघे देव व भक्त या दोघांच्या नामांचा अर्थ जे स्वरूप, त्या स्वरूपाचे ठिकाणी एका पंक्तीला ऐक्याने मी व तू अशा द्वैतभावाशिवाय नांदत आहेत.
57-14
येणेचि पै कारणे । जै पहिले सृष्टीचे जुंपणे । तेही तया होणे । पडेचिना ॥57॥
या कारणामुळे जेव्हा मूळ सृष्टी उत्पन्न होते, तेव्हाही त्यास जन्मास यावे लागत नाही.
58-14
सृष्टीचिये सर्वादी । जया देहाची नाही बांधी । ते कैचे प्रळयावधी । निमतील पा ? ॥58॥
सर्व सृष्टीच्या आरंभी ज्यांना देहाचा आकार घ्यावा लागत नाही ते आत्मज्ञानी पुरुष प्रलय काळाच्या वेळेस कसे मरतील ?
59-14
म्हणौनि जन्मक्षया । अतीत ते धनंजया । मी जाले ज्ञाना इया । अनुसरोनी ॥59॥
अर्जुना, म्हणून ते पुरुष या ज्ञानाचा मार्ग स्वीकारून जन्मक्षयातीत असे मद्रूप झाले.
60-14
ऐसी ज्ञानाची वाढी । वानिली देवे आवडी । तेवीचि पार्थाही गोडी । लावावया ॥60॥
असा ज्ञानाचा महिमा वर्णन करणे देवास प्रिय असल्यामुळे व त्याचप्रमाणे अर्जुनालाही गोडी लावण्याकरता देवांनी या प्रमाणे ज्ञानाचा महिमा वर्णन केला.


61-14
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तव तया जाले आन । सर्वांगी निघाले कान । सणई अवधान । आतला पा ॥61॥
(श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अर्जुनावर परिणाम = श्रवण)
असा ज्ञानाचा महिमा भगवंतांनी वर्णन केल्यावर अर्जुनाची वेगळीच स्थिती झाली. ती ही की त्याच्या सर्वागाला कान फुटले. फार काय सांगावे ? तो अवधानाने संपूर्ण व्यापला गेला. (अवधानाची मूर्तीच बनला).
62-14
आता देवाचिया ऐसे । जाकळीजत असे वोरसे । जे निरूपण आकाशे । वेटाळेना ॥62॥
अर्जुन सर्व अंगाने अवधानरूप झाला तेव्हा देवासारख्या सर्वज्ञाकडून केले जाणारे अफाट व्याख्यानही त्याचेकडून आकलन केले जात होते आणि (आपण जे सांगतो त्याचा उपयोग होत आहे असे देवाने जाणले). म्हणून देवाचे व्याख्यान आकाशाच्याही कवळीत येणार नाही एवढे विस्तृत होऊ लागले.
63-14
मग म्हणे गा प्रज्ञाकांता । उजवली आजि वक्तृत्वता । जे बोलायेवढा श्रोता । जोडलासी ॥63॥
मग श्रीकृष्ण म्हणाले, हे बुद्धीरूप स्त्रीच्या पती अर्जुना, आमचे एवढे व्याख्यान तेवढेच ज्याचे अवधान असा तू श्रोता मिळाल्यामुळे आज आमची वक्तृत्वरूपी कन्या विवाहित झाली. (कारण तिला तुझ्यासारखे योग्य स्थळ मिळाले).
64-14
तरि एकु मी अनेकी । गोविजे देहपाशकी । त्रिगुणी लुब्धकी । कवणेपरी ॥64॥
तरी मी एक असून त्रिगुणरूपी पारध्याकडून अनेक देहपाशात कोणत्या प्रकाराने अडकला जातो.
65-14
कैसा क्षेत्रयोगे । विये इये जगे । ते परिस सांगे । कवणेपरी ॥65॥
मी क्षेत्राच्या योगाने ही जगे कोणत्या प्रकाराने व कसा प्रसवतो ते सांगतो ऐक.


66-14
पै क्षेत्र येणे व्याजे । यालागी हे बोलिजे । जे मत्संगबीजे । भूती पिके ॥66॥
माझ्या संगरूपी बीजाने या अज्ञानात प्राणीरूपी पीक येते, याच कारणामुळे याचा (अज्ञानाचा) क्षेत्र नावाने उल्लेख केला जातो.
67-14
मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन्गर्भं दधामहम्यम् ।
संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॥14. 3॥
श्लोकार्थ -: -:(महद्ब्रह्म) ही माझे (सृष्टिरूप) गर्भ ठेवण्याचे ठिकाण आहे, तिच्यामधे मी गर्भ ठेवतो. हे भारता त्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती होते.
(सृष्ट्युत्पत्ती पुढे चालू = अज्ञान कशाला म्हणायचे ?
एऱ्हवी तरी महद्ब्रह्म । यालागी हे ऐसे नाम । जे महदादिविश्राम । शालिका हे ॥67॥
सहज विचार करून पाहिले तर महतत्वादिक तत्वांना हे विश्रांतिस्थान असल्यामुळे या अज्ञानाला महद्ब्रह्म असे नाव आहे.
68-14
विकारा बहुवस थोरी । अर्जुना हेचि करी । म्हणौनि अवधारी । महद्ब्रह्म ॥68॥
अर्जुना, हेच विकारांना पुष्कळसे वाढवते म्हणून हे महद्ब्रह्म आहे असे समज.
69-14
अव्यक्तवादमती । अव्यक्त ऐसी वदंती । सांख्याचिया प्रतीती । प्रकृति हेचि ॥69॥
अव्यक्तवादि लोकांच्या मताप्रमाणे याला अव्यक्त असे म्हणतात व सांख्यांच्या अनुभवाप्रमाणे यालाच प्रकृती असे म्हणतात.
70-14
वेदांती इयेते माया । ऐसे म्हणिजे प्राज्ञराया । असो किती बोलो वाया । अज्ञान हे ॥70॥
हे बुद्धिमंतांच्या राजा अर्जुना, वेदांती याला माया असे म्हणतात. उगीच पाल्हाळ किती करायचा ? तर हे बोलणे राहू दे. (थोडक्यात सांगायचे म्हणजे) हे अज्ञान आहे.


71-14
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
आपला आपणपेया । विसरु जो धनंजया । तेचि रूप यया । अज्ञानासी ॥71॥
अर्जुना आपला आपल्याला जो विसर पडला म्हणजे आपण आपले स्वकीय आत्मस्वरूप विसरणे तेच या अज्ञानाचे रूप आहे.
72-14
आणिकही एक असे । जे विचारावेळे न दिसे । वाती पाहता जैसे । अंधारे का ॥72॥
या अज्ञानाचा आणखी एक स्वभाव असा आहे की ज्याप्रमाणे दिव्याने अंधार पाहू गेले असता तो दिसत नाही, त्याप्रमाणे (अज्ञान) विचाराच्या वेळी दिसत नाही.
73-14
हालविलिया जाय । निश्चळी तरी होय । दुधी जैसी साय । दुधाची ते ॥73॥
ज्याप्रमाणे दुधाची साय दूध निश्चल असताना दिसते व दूध ढवळले असता दिसेनाशी होते
74-14
पै जागरु ना स्वप्न । ना स्वरूप अवस्थान । ते सुषुप्ति का घन । जैसी होय ॥74॥
ज्यामधे जागेपणा नाही व स्वप्न नाही अथवा स्वरूपस्थिती नाही अशी गाढ सुषुप्ती असते.
75-14
का न वियता वायूते । वांझे आकाश रिते । तया ऐसे निरुते । अज्ञान गा ॥75॥
अथवा अर्जुना, वायू उत्पन्न होण्यापूर्वी आकाश जसे निष्फळ रिकामे असते, त्यासारखे खरोखर अज्ञान आहे. (जेथे यथार्थस्वरूपाचे ज्ञान नाही अथवा विपरीत देहादिकांचे भाव नाही, अशी जी स्फुरणविरहित अवस्था, त्यासच अज्ञान म्हणावयाचे.

दिवस २१४ वा. १, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २५५७ ते २५६८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २५५७
कार्यचि कारण । तृष्णा पावविते सीण ॥१॥
काय करुनि ऐसा संग । सोसे चिंतू पांडुरंग ॥धृपद॥
रूपी नाही गोडी । हावे हावे ऊर फोडी ॥२॥
तुका म्हणे पडे भारी । ऐशा वरदळाचे थोरी ॥३॥
अर्थ
कार्य कारण या भावने मुळेच दुःख होते आणि प्रपंचातील इच्छे मुळेच शीण होत असतो. असे जर असेल तर मग अशा खोट्या प्रपंच्याचा संग करून काय उपयोग आहे मग त्यापेक्षा मनाच्या हौसेने पांडुरंगाचे चिंतन करू. ज्या पांडुरंगाच्या रूपाविषयी गोडी पाहिजे ती गोडीच नसून मनुष्य प्रपंचातील हाव वाढवतो आणि उरु फोडून घेतो म्हणजेच खूप कष्ट करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात अशा अल्प आणि बाह्यकारी सुखाच्या भरीला मूर्ख मनुष्य पडलेले असतात.
अभंग क्र. २५५८
संसाराच्या नावे घालूनिया शून्य । वाढता हा पुण्य केला धर्म ॥१॥
हरीभजने हे धवळिले जग । चुकविला लाग कळिकाळाचा ॥धृपद॥
कोणा ही नलगे साधनांचा पाग । करणे केला त्याग देहबुद्धी ॥२॥
तुका म्हणे सुख समाधि हरीकथा । नेणे भव्यकथा गाईल तो ॥३॥
अर्थ
मी संसाराच्या नावाने शून्य घातले असून म्हणजे संसारावर पाणी सोडले असून पुण्यधर्म वाढता केला आहे. मी हरी भजनाने सर्व जग शुद्ध केले असून कळीकाळाचा लाग चुकविला आहे. मी माझ्या देहबुद्धीचा म्हणजे देह अभिमानाचा त्याग केला त्यामुळे मला हरी भजना वाचून इतर कोणत्याही साधनांच्या आधीन राहावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जो हरी कथा गाईल त्याला सुख समाधि प्राप्त होईल आणि या भवसागरातील दुःख व्यथा राहणार नाही.
अभंग क्र. २५५९
विश्वासिया नाही लागत सायास । अनायासे रसा अंगा येतो ॥१॥
लेकराच्या हाते घास मागे माता । वोरसोनि चित्ता सुख पावे ॥धृपद॥
गौरव त्या मानी आरुषा वचनी । भूषण ते वाणी मिरवावी ॥२॥
तुका म्हणे आहेस सकळ ही साक्षी । माझा तो कईपक्षी पांडुरंग ॥३॥
अर्थ
जो आपल्या बरोबर आहे अश्या हरी वर जो विश्वास ठेवतो त्याला ब्रम्‍ह रसाची प्राप्ती करून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारे सायास करावे लागत नाही अनायसेच त्याच्या अंगी मला तसा अनुभव येतो. लेकराच्या हाताने आपल्याला एक घास खायला मिळावा अशी प्रेमळ मय इच्छा माता करत असते आणि तो घास जर खायला मिळाला तर तिच्या चित्ताला फार सुख प्राप्त होते. बोबड्या बोलाचे देखील त्या मातेला गौरव वाटते त्या शब्दाचे गौरव मानून ती सर्व लोकांमध्ये त्याचे भूषण मिरवते. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या सर्व बोबड्या बोलाला पांडुरंग साक्षी आहे आणि तोच माझा कैवारी आहे व माझ्यावर तो प्रसन्न आहे.
अभंग क्र. २५६०
वैभवाचे धणी सकळा शरणागत । सत्यभावे चित्त अर्पीले ते ॥१॥
नेदी उरो देव आपणावेगळे । भावाचिया बळे ठायाठाव ॥धृपद॥
जाणोनि नेणोनि अंगा आली दशा । मग होय इच्छा आपणचि ॥२॥
तुका म्हणे बरे धाकुटयाचे जिणे । माता स्तनपाने वाढविते ॥३॥
अर्थ
जे देवाला सत्य भावाने आपले चित्त अर्पण करतात आणि देवाला शरण गेले ते देवाच्या सर्व वैभवाचे मालक होतात. देव आपल्या भक्तांना आपल्यापेक्षा वेगळे उरू देत नाही परंतु असे असले तरी देखील भक्त भक्तीच्या अपेक्षेने आपल्याच जागेवर ठाम राहतात. मी ब्रम्‍हस्वरूप आहे हे जाणून देखील भक्त मला काही माहित नाही अशी दशा आंगी बाळगतात म्हणूनच देव भक्तांच्या इच्छानुसार होत असतो. तुकाराम महाराज म्हणतात धाकटे होऊन जगणे हेच बरे कारण माता त्याला स्वतः होऊन स्तनपान करून वाढविते.
अभंग क्र. २५६१
कई ऐसी दशा येईल माझ्या आंगा । चित्त पांडुरंगा झुरतसे ॥१॥
नाठवुनि देह पायाचे चिंतन । अवसान ते क्षण नाही मधी ॥धृपद॥
कई ऐसा पात्र होईन लाभासी । नेणो हृषीकेशी तुष्टईल ॥२॥
तुका म्हणे धन्य मानीन संचित । घेईन ते नित्य प्रेमसुख ॥३॥
अर्थ
पांडुरंगा माझ्या अंगी अशी दशा केव्हा येईल यासाठी माझे चित्त झुरत आहे, की मला माझ्या देहाची आठवणच राहणार नाही केवळ तुमच्या पायाचे चिंतन मला होईल आणि चित्तामध्ये एक क्षणभर देखील खंड पडणार नाही अशी दशा माझी केव्हा होईल हे पांडुरंगा. मी अशा लाभास केव्हा पात्र होईल की जेणेकरून ऋषिकेश माझ्यावर संतुष्ट होईल. तुकाराम महाराज म्हणतात असे जर झाले तर मी माझे पूर्व संचित धन्य मानेल.
अभंग क्र. २५६२
नाही वागवीत जाणिवेचे ओझे । स्वामिसेवेकाजे निर्धारु हा ॥१॥
आज्ञा ते प्रमाण हा मनी निर्धार । येणे फिटे भार निश्चयेसी ॥धृपद॥
आळीकर आम्ही एकविध चित्ते । तैसे होऊ येते मायबापे ॥२॥
तुका म्हणे माझी ये जातीची सेवा । घातलासे देवावरी भार ॥३॥
अर्थ
मी ज्ञानी पणाचे ओझे माझ्या खांद्यावर वागवत नाही कारण माझ्या स्वामींची सेवा करण्याचे कार्य करण्याचा निर्धार मी केला आहे. स्वामीची आज्ञा प्रमाण मानण्याचा माझ्या मनाने निर्धार केला आहे आणि त्याने माझ्या सर्व संसाराचा भार निश्चयाने नाहीसा होणार आहे. आम्ही हरीचे म्हणजे आमच्या स्वामीचे हट्ट करणारे लेकरे आहोत आमच्या चित्तामध्ये त्याच्याविषयी एकनिष्ठ भक्ती भाव आहे. त्यामुळेच आमचा मायबाप स्वामी आम्हाला वाटेल तसे होत असतो. तुकाराम महाराज म्हणतात माझी सेवा या प्रकारच्या जातीची आहे आणि माझा सर्व भार मी देवावर घातला आहे.
अभंग क्र. २५६३
काय नाही माझे अंतरी वसति । व्यापक हा भूती सकळा नांदे ॥१॥
चित्तासी प्रसाद होईल चळण । तेचि ते वळण मनासही ॥धृपद॥
सर्व शिक्त जीवी राहिल्या कुंटित । नाही केले होत आपुले ते ॥२॥
तुका म्हणे दोरी खांब सूत्र्या हाती । नाचवी नाचती जडे तैसी ॥३॥
अर्थ
जो हरी सर्वत्र व्यापक आहे सर्व भूत मात्रांमध्ये नांदतो तो माझ्या अंतःकरणात नाही काय ? त्याचा जसा प्रसाद मिळेल तसेच माझ्या मनाला वळण लागेल व माझ्या मनालाही तसेच वळण लागेल. माझ्या सर्व शक्ती जीवाशी कुंठित होऊन राहिल्या आहेत त्यामुळे मी स्वतः काही केले तरी ते होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात कळसूत्री बाहुल्यांची दोरी जशी दुसऱ्याच्या हातात असते त्याप्रमाणे या देहरूपी बाहुल्याची दोरी देवाच्या हातात आहे आणि तो या जिवाला जसे नाचवील तसे हा जीव नाचत असतो.
अभंग क्र. २५६४
देवाचे निर्माल्य कोण शिवे हाती । संकल्पासी होती विकल्प ते ॥१॥
वाहिले देह हे देवा एकसरे । होईल ते बरे तेणे द्वारे ॥धृपद॥
होता भार त्याची निवारली खंती । येथे आता रिती साठवण ॥२॥
तुका म्हणे इच्छे पावविले कष्ट । म्हणऊनि नष्ट दुरावली ॥३॥
अर्थ
देवाला काहीही अर्पण केले की त्याचे निर्माल्य होते आणि त्या निर्माल्याला पुन्हा कोण हातात घेईल किंवा कोण शिवेल कारण देवाला काहीही अर्पण केल्याचा संकल्प केला व तो पुन्हा घेण्याचा विकल्प कोण करेल ? हा देह देवाला एकदाच वाहिला आहे त्यामुळे या देहाचे चांगले होईल. देवाला देह अर्पण करण्याआधी त्याचा भार माझ्यावर होता आता देवालाच देह अर्पण केला त्यामुळे त्याची ही आता खंत नाहीशी झाली आहे आणि संसारा विषयी काळजी करण्याची ठेव देखील आता रिकामी झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात देहा विषयी मी आजवर इच्छा धरली आणि त्या इच्छेनेच मला खूप कष्ट दिले आहेत त्यामुळे त्या दुष्ट इच्छेलाच मी बाजूला टाकून दिले आहे.
अभंग क्र. २५६५
देव तीर्थ येर दिसे जया ओस । तोचि तया दोष जाणतिया ॥१॥
तया बरे फावे देवा चुकविता । संचिलाची सत्ता अंतराय ॥धृपद॥
शुद्धाशुद्धठाव पापुण्यबीजे । पाववील दुजे फळभोग ॥२॥
तुका म्हणे विश्वंभरा ऐसे वर्म । चुकविल्या धर्म अवघे मिथ्या ॥३॥
अर्थ
ज्याला तीर्थाच्या ठिकाणीच देव आहे आणि इतर सर्व ठिकाण देवा शिवाय ओस आहेत असे दिसते त्याच्या ज्ञानी पनातच दोष आहे, देव सर्वत्र आहे हे न कळल्याचा दोष त्याच्या ज्ञानी पनातच आहे असे समजावे. अशा भक्तांला देवाला चुकवण्यासाठी चांगली संधी मिळते आणि त्याच्यावर त्याच्या पूर्व पापाच्या संचिताची सत्ता असते त्यामुळे देवापासून तो अंतरतो. एखादे ठिकाण शुध्द आहे आणि एखादे ठिकाण अशुध्द आहे असे मानने म्हणजे पाप पुण्याचे बीज चित्तामध्ये उत्पन्न होणे व त्यामुळे जे हरीच्या कृपेचे फळ आपल्याला प्राप्त होणार असते ते न मिळता दुसरेच फळ आपल्याला मिळते आणि जन्म-मरण चालूच राहते. तुकाराम महाराज म्हणतात विश्वंभर सर्व विश्वात व्यापक आहे हे जर वर्म कोणाला समजले नाही आणि केवळ तीर्थव्रत केले तर त्याचे सर्व धर्म हे मिथ्या होतात.
अभंग क्र. २५६६
काय करू सांगतांही न कळे वर्म । उपस्थित भ्रम उपजवितो ॥१॥
मन आधी ज्याचे आले होईल हाता । तयावरी सत्ता केली चाले ॥धृपद॥
अभुकेचे अंगी चवी ना सवाद । मिथ्या ऐसा वाद दुराग्रह ॥२॥
तुका म्हणे आप राखावे आपणा । संकोचोचि कोणा नये आता ॥३॥
अर्थ
लोकांना परमार्थाचे वर्म सांगितले तरी कळत नाही या उलट नको तो भ्रम त्यांच्या ठिकाणी उत्पन्न होतो त्याला मी काय करू. ज्याच्या मनाचा निग्रह होईल आणि त्याचे मन त्याच्या हातात म्हणजे त्याच्या ताब्यात येईल त्याच्यावरच मी केलेल्या उपदेशाची सत्ता चालेल. अभुकेल्या मनुष्या पुढे कितीही पक्वांन्न कितीही मिष्टांन्न ठेवले तरी त्याचा काही उपयोग होत नाही त्याला स्वादही कळत नाही आणि चवही कळत नाही त्याप्रमाणे दुराग्रही माणसापुढे कितीही चांगला उपदेश केला, कितीही वाद घातला तरी तो मिथ्या ठरतो. तुकाराम महाराज म्हणतात यामुळेच आता कोणालाही उपदेश करू नये व संकोचही धरू नये आपल्या हिताचे जतन आपणच करावे.
अभंग क्र. २५६७
अमृत अव्हेरे उचंबळले आता । विष आर्त भूता आवश्यक ॥१॥
आदरासी मोल नये लावू केजे । धीर शुद्धबीजे गोमटा तो ॥धृपद॥
खऱ्याचिये अंगी आपणची चाली । लावणी लाविली काय लागे ॥२॥
तुका म्हणे चाडे करा वेवसाव । आम्हासी तो वाव धीर आहे ॥३॥
अर्थ
व्यसनाधीन मनुष्या जवळ अमृत असले तरी त्या अमृताचा अव्हेर तो करतो आणि गांज्या आफु या सारख्या विषाला जीवनावश्यक वस्तू समजतो. आपल्याला एखाद्याने आदराने काहीही दिले तरी त्याचे मोल होऊ शकत नाही जे कोणी सज्जन आहेत त्यांच्या पोटी सज्जन मुले जन्माला येतात आणि त्यांनाच व्यसनापासून दूर राहण्याचे धैर्य असते. जो मनुष्य खरा आहे त्याची वृत्ती देखील खऱ्याकडे वळते आणि जो खोटा आहे त्याच्या ठिकाणी कितीही खऱ्या वागण्याची लावणी केली तरी त्याला लागेल काय ? तुकाराम महाराज म्हणतात हे जण हो तुम्ही कोणताही व्यवसाय करा तो व्यर्थच आहे असे आम्ही मानू पण आमच्यात तसेच धैर्‍याला वाव आहे.
अभंग क्र. २५६८
अनुभवाचे रस देऊ आर्त भूता । सोडू चोजविता पुढे पोती ॥१॥
देवाचा प्रसाद रत्नाच्या ओवणी । शोभतील गुणी आपुलिया ॥धृपद॥
आधी भाव सार शुद्ध ते भूमिका । बीज आणि पिका चिंता नाही ॥२॥
तुका म्हणे ज्याचे नाम गुणवंत । ते नाही लागत पसरावे ॥३॥
अर्थ
आम्ही आमच्या भक्तिप्रेमाच्या अनुभवाचा रस, जो खरा मूमुक्ष आहे त्याला देऊ आणि त्याच्या पुढे सर्व परमार्थ रुपी धनाचे पोते सोडू. आम्ही जे परमार्थीक धनरुपी पोती सोडू ते म्हणजे देवाचा प्रसाद आहे आणि जो त्या प्रसादाचा सेवन करेल त्याच्या अंगी जसे रत्नांच्या माळा मनुष्याला शोभून दिसतात त्याप्रमाणे तो परमार्थिक गुणाने शोभून दिसेल. परमार्थ करणार्‍याच्या ठिकाणी आधी शुद्ध भक्तिभाव पाहिजे जर शुद्ध भक्तिभाव असेल तर परमार्थाचे बीज आणि पिक उत्पन्न होण्यासाठी काही चिंता करावी लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जी वस्तू नामाने व गुणाने उत्तम आहे तिचा प्रसार करावा लागत नाही ती आपोआप लोकांमध्ये प्रसारित होत असते.

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading