५ ऑगस्ट, दिवस २१७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी १२६ ते १५० सार्थ तुकाराम गाथा अभंग २५९३ ते २६०४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“५ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan August
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ५ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २५९३ ते २६०४ चे पारायण आपण करणार आहोत.
५ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी १२६ ते १५०,

126-14
की विरूढलिया जोंधळा । कणिसाचा निर्वाळा । वेचला की आगळा । दिसतसे ॥126॥
जोंधळ्याचा बी पेरल्यानंतर त्याला अंकुर फुटून कणीस निवडून आल्यावर म्हणजे कणीस परिपक्व झाल्यावर तो पहिला पेरलेला दाणा नाहीसा झाला का ? का तो दाना अनेक पटीने वाढला.
127-14
म्हणौनि जग परौते । सारूनि पाहिजे माते । तैसा नोव्हे उखिते । आघवे मीचि ॥127॥
म्हणून असे समजु नको की जग पलीकडे सारून मला पहावे असे नाही, तर सर्व सरसकट मीच आहे असे पहावे.
128-14
हा तू साचोकारा । निश्चयाचा खरा । गाठी बांध वीरा । जीवाचिये ॥128॥
हे वीर अर्जुना, हा निश्चयाचा खरा सिद्धांत तू जीवाच्या गाठीस गच्च बांधून ठेव. म्हणजे तू आपल्या अंत:करणात या सिद्धांताचा दृढ निश्चय करुन ठेव.
129-14
आता मिया मज दाविला । शरीरी वेगळाला । गुणी मीचि बांधला । ऐसा आवडे ॥129॥
आता अनेक भिन्न भिन्न किंवा निरनिराळ्या शरीरात माझे दर्शन माझ्याकडूनच होते आणि त्या शरीरांमधे गुणांनी मीच बांधला गेल्यासारखा दिसतो.
130-14
जैसे स्वप्नी आपण । उठूनिया आत्ममरण । भोगिजे गा, जाण । कपिध्वजा ॥130॥
भगवान म्हणतात कि हे अर्जुना, ज्याप्रमाणे स्वप्नामधे आपले मरण आपणच आपल्या कल्पनेने तयार करून त्या स्वकल्पित मरणाचे दु:ख आपण स्वत:च भोगतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


131-14
का कवळाते डोळे । प्रकाशूनि पिवळे । देखती तेही कळे । तयांसीचि ॥131॥
अथवा एखादी पांढरी वस्तू पिवळी दिसली म्हणजे आपल्यास कावीळ झाली असे समजते. हे कावीळ झाल्याचे ज्ञान आपल्यास डोळ्यांमुळे होते व तेच डोळे पिवळ्याचे प्रकाशन करतात. (ह्याप्रमाणे डोळ्याकडून काविळीचे ज्ञान होऊन त्यामुळे दिसणार्‍या पिवळेपणाचेही तेच डोळे प्रकाशन करतात.
132-14
नाना सूर्यप्रकाशे । प्रकटी तै अभ्र भासे । तो लोपला हेही दिसे । सूर्येचि की ॥132॥
अथवा सूर्य आपल्या प्रकाशाने ज्यावेळेस आपल्यावर आलेल्या ढगांचे प्रकाशन करतो, त्यावेळेस ते ढग आपणास दिसतात व सूर्यबिंबावर आलेल्या ढगाने सूर्यास झाकून टाकले आहे हे देखील सूर्याच्या प्रकाशामुळेच समजण्यात येते.
133-14
पै आपणपेनि जालिया । छाया गा आपुलिया । बिहोनि बिहालिया । आन आहे ? ॥133॥
अर्जुना, आपल्यापासून झालेल्या छायेला भ्याले असता ती छाया भ्यालेल्या पुरुषाहून काही वेगळी आहे का ? तर नाही, म्हणजे त्या छायेचे प्रकाशन आपणच केले आहे.
134-14
तैसी इये नाना देहे । दाऊनि मी नाना होये । तेथ ऐसा जो बंधु आहे । तेही देखे ॥134॥
त्याप्रमाणे हे अनेक देह दाखवून (प्रकाशून) मी अनेक होतो आणि त्या अनेक शरीरात मी गुणांकडून बांधला गेलो आहे असे जे वाटते त्या वाटण्याचे प्रकाशनही मीच करतो.
135-14
बंधु का न बंधिजे । हे जाणणे मज माझे । नेणणेनि उपजे । आपलेनि ॥135॥
माझे मला यथार्थ ज्ञान असणे हे गुणांचा बंध दिसत असून त्या बंधाकडून न बांधले जाण्यास कारणीभूत होते व आपल्या नेणण्यानेच आपल्या यथार्थस्वरूपाच्या अज्ञानानेच बंध उत्पन्न होतो.


136-14
तरी कोणे गुणे कैसा । मजचि मी बंधु ऐसा । आवडे ते परियेसा । अर्जुनदेवा ॥136॥
तर अर्जुनदेवा, कोणत्या गुणाने व कसा मी बद्ध आहे असे वाटते ते ऐका.
137-14
गुण ते किती किंधर्म । कायि यया रूपनाम । के जाले हे वर्म । अवधारी पा ॥137॥
गुण किती आहेत व त्यांचे धर्म काय ? त्यांचे नाव व रूप काय ? व ते कोठे उत्पन्न झाले ? हे वर्म ऐक.

सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः ।
निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् ॥14. 5॥
भावार्थ हे महाबाहो, सत्व, रज व तम हे गुण आहेत व प्रकृती यांची जन्मभूमी आहे. हे त्रिगुण देहामध्ये अविनाशी जो देही (आत्मा) त्याला बंधन करतात.
(त्रिगुणांचे सामान्य स्वरूप)
138-14
तरी सत्त्वरजतम । तिघांसि हे नाम । आणि प्रकृति जन्म- । भूमिका यया ॥138॥
तरी सत्व, रज व तम ह्या तिघांनाही गुण म्हणतात आणि यांची प्रकृती ही जन्मभूमी आहे.
139-14
येथ सत्त्व ते उत्तम । रज ते मध्यम । तिहीमाजी तम । सावियाधारे ॥139॥
या तीन गुणात सत्वगुण हा उत्तम, रजोगुण हा मध्यम व तमोगुण हा सहज कनिष्ठ आहे.
140-14
हे एकेचि वृत्तीच्या ठायी । त्रिगुणत्व आवडे पाही । वयसात्रय देही । येकी जेवी ॥140॥
ज्याप्रमाणे एका देहाचे ठिकाणी वयाच्या तीन अवस्था बाल्य, तारुण्य व वार्धक्य भासतात, त्याप्रमाणे एकाच अंत:करणवृत्तीच्या ठिकाणी त्रिगुणत्व भासते असे समज.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


141-14
का मीनलेनि कीडे । जव जव तूक वाढे । तव तव सोने हीन पडे । पांचिका कसी ॥141॥
अथवा हिणकस धातू सोन्यात मिसळला असता जसे जसे त्या सोन्याचे वजन वाढते, तसे तसे सोने पाच रुपये तोळा किंमतीपर्यंतच्या कसाचे हलके होते.
142-14
पै सावधपण जैसे । वाहविले आळसे । सुषुप्ति बैसे । घणावोनि ॥142॥
आळसाने सावधपणा नाहीसा झाल्यावर मग गाढ झोप दृढ होऊन बसते.
143-14
तैसी अज्ञानांगीकारे । निगाली वृत्ति विखुरे । ते सत्त्वरजद्वारे । तमही होय ॥143॥
त्याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून बाहेर पडलेली वृत्ती ज्या वेळेस फैलावते त्यावेळेस ती सर्व, रज होऊन तम देखील होते.
144-14
अर्जुना गा जाण । यया नाम गुण । आता दाखऊ खूण । बांधिती ते ॥144॥
अर्जुना यांना गुण असे म्हणतात, असे समज. आता हे गुण (आत्म्याला) कसे बांधतात ते वर्म दाखवतो.
145-14
तरी क्षेत्रज्ञदशे । आत्मा मोटका पैसे । हे देह मी ऐसे । मुहूर्त करी ॥145॥
तर आत्मा हा जीवदशेत थोडासा प्रवेश करतो न करतो तोच (अज्ञानाचा थोडासा स्वीकार करतो न करतो) तोच हा देह मी आहे असे म्हणावयास आरंभ करतो.


146-14
आजन्ममरणांती । देहधर्मी समस्ती । ममत्वाची सूती । घे ना जव ॥146॥
जन्मापासून तो मरणापर्यंत सर्व देहधर्माच्या ठिकाणी ममत्वाचा जन्ममरण वगैरे जे सर्व देहाचे धर्म आहेत ते माझे आहेत असा अभिमान घेतो न घेतो इतक्यात
147-14
जैसी मीनाच्या तोंडी । पडेना जव उंडी । तव गळ आसुडी । जळपारधी ॥147॥
ज्याप्रमाणे माशाच्या तोंडात आमिष पडते न पडते तोच धीवर गळास हिसका देतो,

*तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् ।
सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ ॥14. 6॥
*भावार्थ* 👉त्यामधे सत्वगुण निर्मल असल्यामुळे प्रकाश व उपद्रवरहित आहे हे पापरहिता अर्जुना, तो सत्वगुण सुखाच्या व ज्ञानाच्या संगतीने या दोन पाशांनी प्राण्याला बद्ध करतो. म्हणजे मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे अशी जाणीव उत्पन्न करतो.
(सत्वगुण प्राण्याला कसा बद्ध करतो ?
148-14
तेवी सत्त्वे लुब्धके । सुखज्ञानाची पाशके । वोढिजती मग खुडके । मृगु जैसा ॥148॥
त्याप्रमाणे सत्वगुणरूपी पारध्याकडून सुख व ज्ञानरूपी पाश ओढले जातात पण हरण जसा पारध्याच्या पाशात अडकतो तसा तो सुख आणि ज्ञान यांच्या पाशात अडकतो.
149-14
मग ज्ञाने चडफडी । जाणिवेचे खुरखोडी । स्वयं सुख हे धाडी । हातीचे गा ॥149॥
मग ज्ञानाने चरफडावयास लागतो व जाणीवरूपी लाथा झाडतो आणि अरे, आपल्यापाशी असलेले आपले आत्मसुख आपणच व्यर्थ घालवतो.
150-14
तेव्हा विद्यामाने तोखे । लाभमात्रे हरिखे । मी संतुष्ट हेही देखे । श्लाघो लागे ॥150॥
तेव्हा अविद्येने व मानाने संतुष्ट होतो. कोणताही लाभ झाला तर आनंद पावतो, आपण संतुष्ट आहोत हेही पहातो व आपणास धन्य मानतो. ॥150॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २१७ वा. ५, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २५९३ ते २६०४
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २५९३
सोसे बहुगर्भवासी । मेलो असो उपवासी । नाही सखी ऐसी । येथे कोण भेटली ॥१॥
करी करी रे स्वहित । देह तव हे अनित्य । नाही दिले चित्त । सोडवू मोहापासोनि ॥धृपद॥
पाळी तोंडींचिया घासे । तेचि होय अनारिसे । ज्या नव्हे ऐसे । खेदी परि सोडवीना ॥२॥
तुका म्हणे धनमाने । माझ्या बाटलो मीपणे । नाही दिला मने । देखो लाभे हा लाभ ॥३॥
अर्थ
आपण आता पर्यंत किती तरी गर्भवास सोसलेले आहेत आणि कितीतरी वेळ उपवासी मेलेलो आहोत. पण या दुःखातून मुक्त करु शकेल अशी सखी येथे कोणीही भेटली नाही. त्यामुळे हे बाबांनो तुम्ही आपले स्वहित करून घ्यारे देह तर अनित्य आहे. आणि या प्रपंच्याने तर आपले चित्त कधीही आपल्याला सोडू दिले नाही. तोंडातला घास काढून जी माता आपल्या मुलाचे पालनपोषण करते तीच त्याच्या अंतकाली बाजूला सरकते. तिला याचे वाईट वाटत नाही का परंतु तीही आपल्याला काळापासून सोडू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपण धन, मान, सन्मान, मी आणि माझे यांनेच बाटलेलो आहोत. या मनाने कधीही परमार्थाच्या लाभाणे लाभ झालेला आनंद पाहून दिला नाही

अभंग क्र. २५९४
इच्छिती तयांसी व्हावे जी अरूप । आम्हासी स्वरूप स्थिती चाड ॥१॥
आता नव्हे माझा भाव अनारिसा । पावलानी इच्छा गोवियेली ॥धृपद॥
लेकरासी कोठे जाणत्याची परी । करू येते दुरी धरावया ॥२॥
लागली न सुटे नामाची आवडी । माझी भावजोडी भंगू नका ॥३॥
घेसी वेढे मुक्तीच्या अभिळासे । चाळवी जा पिसे ब्रम्हज्ञानी ॥४॥
तुका म्हणे माझा कोठे भक्तीरस । पाडावया ओस चाळविसी ॥५॥
अर्थ
देवा तुझ्या ज्या भक्तांना तुझ्या निर्गुण स्वरूपाची आवड आहे त्यांच्यासाठी तु निर्गुण हो परंतु मला तुझ्या स्वरूप तिथीची आवड आहे. आता देवा मला तुझ्या स्वरूपच स्थितीचीच आवड लागल्यामुळे इतर कोठेही माझी आवड जाणार नाही कारण माझ्या सर्व इच्छा तुझ्या पावलांनीच बांधून टाकल्या आहेत. अज्ञानी लेकराला जाणत्या व्यक्तीप्रमाणे दूर करता येते काय देवा ? देवा मला तुझ्या नामाची आवड लागली आहे ती काही केल्या सुटत नाही त्यामुळे माझा जो एकनिष्ठ भक्तीभाव तुझ्या ठिकाणी आहे तो भंगु देऊ नका. देवा आम्ही तुला मोक्ष मागू असे वाटत असेल परंतु आम्हाला तो मोक्ष नकोच आहे जे कोणी वेडे ब्रम्‍हज्ञानी असतील त्यांना तो मोक्ष देऊन फवसत राहा. तुकाराम महाराज म्हणतात देवा अरे त्या मोक्षा पुढे माझा भक्तिरस कोठे कमी आहे भक्ती सुखाचा रस ओस पडण्याकरता मोक्ष भोग इत्यादी गोष्टींचे लालच देऊन आम्हाला तु फसवित असतो.
अभंग क्र. २५९५
आम्हा भाविकांची जाती । एकविध जी श्रीपती । अळंकारयुक्ति । सरो शकेचि ना ॥१॥
जाणे माउली त्या खुणा । क्षोभ उपजो नेंदी मना । शांतवूनि स्तना । लावी अहो कृपाळे ॥धृपद॥
तुज अवघे होऊ येते । परी मज वाटो नये चित्ते । उपासने परते । नये काही आवडो ॥२॥
करू रूपाची कल्पना । मुखी नाम नारायणा । तुका म्हणे जना । जनस्थळ देखता ॥३॥
अर्थ
हे श्रीपती तुमच्याविषयी एकनिष्ठता राहावी हीच आम्हा भाविकांची जात आहे. अहो श्रीपती आम्हाला तुम्ही कितीही श्रीमंतीचा भोग मोक्ष इत्यादी अलंकार देण्याची युक्ती केली तरी आम्हाला तुमच्याविषयी जी एकनिष्ठ भक्त आहे ती आम्ही विसरू शकत नाही. माऊली आपल्या मुलाच्या सर्व खुणा जाणत असते त्याला केव्हाही दुःख होऊ देत नाही. त्याप्रमाणे हे कृपाळूआ ती आई मुलगा रडायला लागले तर त्याला स्तनाला लाऊन शांत करते तसेच तुम्ही तुमच्या प्रेमरूपी स्तनाला मला लावून मला शांत करा. तुला सर्व काही होता येते परंतु अनेक रूपे घेऊन तू माझ्या चित्ताला विभागू नये. मला तुझी उपासना करणे हेच एक आवडते दुसरे काहीही आवडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही सर्वत्र तुझ्याच रूपाची कल्पना करू आणि मुखाने नारायण असे नाम घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही लोकांमध्ये पाण्यामध्ये व ठिकाणांमध्ये तुझेच रुप पाहू.
अभंग क्र. २५९६
ज्यावे हीनपणे । कासयाच्या प्रयोजने ॥१॥
प्रारब्धी संसार । बरी हिंमतीची थार ॥धृपद॥
होणार ते काही । येथे अवकळा नाही ॥२॥
तुका म्हणे देवे । कृपा केलिया बरवे ॥३॥
अर्थ
काय म्हणून हीन पणाच्या स्थितीत जगावे ? संसार प्रारब्धाच्या ठिकाणी ठेऊन आपण धैऱ्याच्या ठिकाणी थारा धरावा. देवाच्या कृपेने संसारात कधीही अवकळा येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवाने जर कृपा केली तर सर्व काही बरेच होते.
अभंग क्र. २५९७
किती रांडवडे । घालूनि व्हाल रे बापुडे । संसाराचे भिडे । कासावीस झालेती ॥१॥
माझ्या स्वामी शरण रिघा । कृपाळुवा पांडुरंगा । ठेवी अंगसंगा । विश्वासिया जवळी ॥धृपद॥
काही न मागता भले । होईल तेचि काम केले । नसावे आथिले । काही एका संकल्पे ॥२॥
तुका म्हणे भाव । पाववील ठायाठाव । एकविध जीव । ठेविलिया सेवेसी ॥३॥
अर्थ
अरे तुम्ही एकमेकांना शिवी घालून किती दीनवाणे होताल ? आणि तुम्ही संसाराच्या बिळात पडून किती कासावीस झाला आहात. त्यापेक्षा तुम्ही माझ्या स्वामीला म्हणजे कृपाळू पांडुरंगाला शरण जावे. तुम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवला तर तो नेहमी तुम्हाला त्याच्या जवळच ठेवील. तुम्ही त्याला काहीही न मागितलेलेच बरे तुम्ही काही मागितले नाही तर तुमचे काम होतील. तुम्ही त्याला एकनिष्ठेने शरण जावे परंतु शरण जाताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचे मागणे किंवा संकल्प नसावा. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही तुमचा एकनिष्ठ भक्ती भाव पांडुरंगाच्या ठिकाणी ठेवला, आणि तुम्ही तुमची सेवा त्या पांडुरंगाच्या ठिकाणी ठेवली तर तो तुम्हाला त्याच्या पासून वेगळे होऊ देणार नाही.
अभंग क्र. २५९८
बाप करी जोडी लेकराचे ओढी । आपुली कुरवंडी वाळवूनी ॥१॥
एकाएकी केला मिरासीचा धनी । कडिये वागवूनी भार खांदी ॥धृपद॥
घालुऊनी पाहे डोळा अळंकार । ठेवा दावी थोर करूनिया ॥२॥
तुका म्हणे नेदी गांजू आणिकासी । उदार जीवासी आपुलिया ॥३॥
अर्थ
बाप आपल्या देहाला कष्ट देऊन मुलांसाठी खूप पैसा मिळवून ठेवतो. ज्या मुलाला लहानपणी कडेवर खांद्यावर घेऊन बाप भार वाहत होता तोच मुलगा एकदा मोठा झाला की त्या बापाने जमवलेला सर्व पैसा एकदम देऊन सर्व संपत्तीचा त्याला मालक करून टाकतो. लहानपणी त्या मुलाच्या अंगावर विविध प्रकारचे अलंकार घालून त्याला कौतुकाने पाहतो आणि त्याच मुलाला मोठे केल्यानंतर आपण जमविलेल्या सर्व संपत्तीचा ठेवा त्याला दाखवतो. तुकाराम महाराज म्हणतात त्या मुलाला इतर कोणाकडूनही थोडे देखील कष्ट तो बाप होऊ देत नाही वेळ प्रसंगी आपल्या जिवावर देखील उदार त्या मुलासाठी बाप होतो.
अभंग क्र. २५९९
काय वृंदावन माखियेले गुळे । काय जिरे काळे उपचारिले ॥१॥
तैसी अधमाची जातीच अधम । उपदेश श्रम करावा तो ॥धृपद॥
न कळे विंचासी कुरवाळिले अंग । आपले ते रंग दावीतसे ॥२॥
तुका म्हणे नये पाकासी दगड । शूकरासी गोड जैसी विष्ठा ॥३॥
अर्थ
कडू वृंदावनात कितीही गुळात माखले आणि काळे जिऱ्यावर कितीही साखर टाकली तर त्याचा काही उपयोग होणार आहे काय त्याचा कडूपणा जाणार आहे काय ? त्याप्रमाणे अधम लोकांची जातच अधम असते ते नीचच असतात त्यांना कितीही उपदेश केला तरी तो श्रमच होतो. विंचवाला प्रेमाने कुरवाळले तरी त्याला कळत नाही की आपल्याला या माणसाने प्रेमाने कुरवाळले आहे त्याला हात लावला की तो लगेच नांगी मारण्याचा आपला मूळ रंग दाखवतोच. तुकाराम महाराज म्हणतात दगडाला कधीही शिजवले जात नाही आणि जशी सुकराला विष्टा गोड लागते त्याप्रमाणे अधम मनुष्य असतात ते दगडाप्रमाणे व सुकराप्रमाणे आहेत त्यांना कितीही चांगला उपदेश करण्याचा प्रयत्न केला तरी तो त्यांना आवडत नाही.
अभंग क्र. २६००
स्तवूनिया नरा । केला आयुष्याचा मातारा ॥१॥
नारायणचिया लोपे । घडली अवघीच पापे ॥धृपद॥
जीव ज्याचे दान । त्याचा खंडूनिया मान ॥२॥
तुका म्हणे वाणी । आइके त्या दोष कानी ॥३॥
अर्थ
माणसाने माणसाची स्तुती करून आपल्या आयुष्याचा मातेरा केलेला असतो. एक नारायणाचा विसर पडला की त्यामुळे सर्व पापेच आपोआप घडतात. अहो ज्याने आपल्याला जीवाचे महत्त्व दिले त्याच नारायणाचा विसर पाडून त्याचा अवमान करू नये. तुकाराम महाराज म्हणतात वाणीने मनुष्याचे वर्णन केले आणि कानाने मनुष्याचे वर्णन ऐकले तर त्या दोघानाही पापच लागते दोषच लागतो.
अभंग क्र. २६०१
अभंग क्र. २६०१
मी तव बैसलो धरुनिया आस । न करी उदास पांडुरंगा ॥१॥
नको आता मज दवडू श्रीहरी । मागाया भिकारी जालो दास ॥धृपद॥
भुकेलो कृपेच्या वचनाकारणे । आशा नारायणे पुरवावी ॥२॥
तुका म्हणे येऊनिया देई भेटी । कुरवाळुनी पोटी धरी मज ॥३॥
अर्थ
हे पांडुरंगा मी तुझ्या भेटीची आस धरुन तुझ्या दारात बसलो आहे त्यामुळे तू मला उदास करु नकोस. हे श्रीहरी मी भिकारी होऊन तुझ्या दारात भीक मागत आहे तुझा दास झालो आहे त्यामुळे तू मला दवडवू नकोस. हे नारायणा मी तुझ्या कृपावचनेचा भुकेला झालो आहे आणि तुझे कृपावचन ऐकण्यासाठी मी भुकेला झालो असून एवढीच एक आशा माझी तुम्ही पुरवावी. तुकाराम महाराज म्हणतात, “हे नारायणा तुम्ही आता मला येऊन भेट दयावी आणि मला कुरवाळून तुमच्या पोटाशी धरा. ”
अभंग क्र. २६०२
आता तुझे नाम गात असे गीती । म्हणोनी मानिती लोक मज ॥१॥
अन्नवस्त्रचिंता नाही या पोटाची । वारिली देहाची थोर पीडा ॥धृपद॥
सज्जन संबंधी तुटली उपाधी । रोकडा या बंदी सुटलोंसे ॥२॥
घ्यावा द्यावा कोणे करावा सायास । गेली आशापाश वारोनिया ॥३॥
तुका म्हणे तुज कळेल ते आता । करा जी अनंता मायबापा ॥४॥
अर्थ
देवा मी तुझे नाम आता गीतरुपात गात आहे म्हणूनच लोक मला मानसन्मान देतात. देवा तुझे नाम मी गीतरुपात गात आहे त्यामुळे मला अन्न वस्त्र आणि पोट भरण्याची चिंताच राहिली नाही देहाची मोठी पीडाच दूर झाली आहे. मी माझ्याशी संबंध असलेले माझे आप्तेष्ट यांच्याशी संबंध तोडल्यामुळे आता माझी उपाधीच तुटली आहे आणि त्यांच्या बंधनातून मी उघड उघड सुटलो आहे. त्यामुळे प्रपंचातील आता देवाणघेवाण करण्याचे कष्ट कोण करेल आता तर सर्व आशा पाशच निवारण झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे अनंता मायबापा आता तुम्हाला जे कळेल ते माझ्याविषयी तुम्ही करा. ”
अभंग क्र. २६०३
कामक्रोध माझे लावियेले पाठी । बहुत हिंपुटी झालो देवा ॥१॥
आवरीता तुझे तुज नावरती । थोर वाटे चित्ती आश्चर्य हे ॥धृपद॥
तुझिया विनोदे आम्हा प्राणसाटी । भयाभीत पोटी सदा दुःखी ॥२॥
तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण । तुला हासे कोण समर्थासी ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही आमच्या पाठीमागे काम क्रोधरुपी कुत्री लावली आहेत त्यामुळे आम्ही फार कष्टी झालो आहोत. अरे देवा तुझे हे कुत्रे तू आवरावयास गेला तर तुला ते आवरत नाही याचेच मोठे आश्चर्य माझ्या चित्ताला वाटत आहे. देवा तुझ्यासाठी हा विनोद झाला परंतु तुझा हा विनोद आमच्या प्राणावर बेतला आहे तुझ्या अशा वागण्यामुळे मी भयभीत झालो असुन माझ्या ह्दयात भय उत्पन्न झाले असुन मी कायमचा दु:खी झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा हा सर्व माझ्या नशीबाचाच गुण आहे तुझ्यासारख्या समर्थाला कोण हसणार आहे ? ”
अभंग क्र. २६०४
स्वमुखेचि तुह्मी सांगा मज सेवा । ऐसे माझे देवा मनोरथ ॥१॥
निघो आम्ही काही चित्तवित्त घरे । आपुल्या उदारे जीवावरी ॥धृपद॥
बोल परस्परे वाढवावे सुख । पाहावे श्रीमुख डोळेभरी ॥२॥
तुका म्हणे सत्य बोलतो वचन । करुनी चरण साक्ष तुझे ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही तुमच्या स्वमुखानेच मला तुमची सेवा कशी करावी हे सांगा असे माझे मनोरथ तुमच्याजवळ आहे. आम्ही आमचे चित्त वित्त घरदार सर्व तुला समर्पण केले आहे ते देखील आमच्या जीवावर उदार होऊन त्यामुळे आम्ही ते परत कधीही तुझ्याकडून घेणार नाही. देवा आपण दोघानी परस्पराशी बोलावे त्यामुळे माझे सुख वाढवावे आणि मी तुमचे श्रीमुख डोळे भरुन पाहावे एवढीच माझी इच्छा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुझ्या चरणाला साक्ष धरुन जे काही बोलत ते सत्यवचन बोलत आहे. ”

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading