३१ ऑगस्ट, दिवस २४३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ३५१ ते ३७५+ सार्थ तुकाराम गाथा अभंग २९०५ ते २९१६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“३१ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 31 August
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ३१ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २९०५ ते २९१६ चे पारायण आपण करणार आहोत.
३१ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ३५१ ते ३७५

351-15
किंबहुना आत्मा चोखटु । होऊनि प्रकृतीसी एकवटु । बांधे प्रकृतिधर्माचा पाटु । आपणपया ॥351॥
काय सांगावे ! आत्मा चोखट खरा ! (शुद्धअसंग ) पण, प्रकृतीपाशी ऐक्य पावून तिच्या सर्व धर्माचा भार आपल्या माथ्यावर घेतो. 51
352-15
पै मनादि साही इंद्रिये । श्रोत्रादि प्रकृतिकार्ये । तिये माझी म्हणौनि होये । व्यापारारूढ ॥352॥
मन धरून होणारी सहा ज्ञानेंद्रिये ही वस्तुतः प्रकृतिकार्ये आहेत, ती माझी असे म्हणून, त्यांच्याकडून होणाच्या व्यापाराचा हाच कर्ता होतो. 52
353-15
जैसे स्वप्नी परिव्राजे । आपणपया आपण कुटुंब होईजे । मग तयाचेनि धाविजे । मोहे सैरा ॥353॥
ज्याप्रमाणे स्वनांत एखाद्या संन्याशाने आपणच आपले कुटुंब बनून त्यांच्या मोहाने इतस्ततः धावावे, 53
354-15
तैसा आपलिया विस्मृती । आत्मा आपणचि प्रकृती- । सारिखा गमोनि पुढती । तियेसीचि भजे ॥354॥
याप्रमाणे, स्वस्वरूपाच्या विस्मृतीमुळे (स्वप्नातील कुटुंबाप्रमाणे) आत्मा हा आपणच प्रकृतीसारख बनून पुन्हा तिचींच कार्यं करू लागतो. 54
355-15
मनाच्या रथी वळघे । श्रवणाचिया द्वारे निघे । मग शब्दाचिया रिघे । रानामाजी ॥355॥
ती अशी-मनाच्या रथावर आरूढ होऊन, श्रवणेंद्रियद्वारा बाहेर पडून शब्दारण्यात प्रवेश करितो;


356-15
तोचि प्रकृतीचा वागोरा । त्वचेचिया मोहरा । आणि स्पर्शाचिया घोरा । वना जाय ॥356॥
मग त्या रथाचा मोर्चा बदलून त्वगिंद्रियद्वारा स्पर्शरूपी घोर वनांत शिरतो. 56
357-15
कोणे एके अवसरी । रिघोनि नेत्राच्या द्वारी । मग रूपाच्या डोंगरी । सैरा हिंडे ॥357॥
कधी नेत्रद्वारा बाहेर पडून रूपविषयरुपी पर्वतावर स्वैर संचार करितो. 57
358-15
का रसनेचिया वाटा । निघोनि गा सुभटा । रसाचा दरकुटा । भरोचि लागे ॥358॥
किंवा, अर्जुना, जिव्हेच्या द्वाराने निघून रसांची दरी जे उदर तेच भरु लागतो. 58
359-15
नातरी येणेचि घ्राणे । जै देहांशु करी निघणे । मग गंधाची दारुणे । आडवे लंघी ॥359॥
किंवा घ्राणेंद्रियद्वारा, माझा अंश जो हा जीव तो जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा गंधाची मोठाली अरण्ये ओलांडतो. 59
360-15
ऐसेनि देहेंद्रियनायके । धरूनि मन जवळिके । भोगिजती शब्दादिके । विषयभरणे ॥360॥
अशारीतीने देहेंद्रियांचा स्वामी जो जीव तो, मनाला हाताशी धरून शब्दस्पर्शादि पंचविषयांचा भोग घेतो. 360
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः ।
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात् ॥15. 8॥
361-15
परी कर्ता भोक्ता ऐसे । हे जीवाचे तैचि दिसे । जै शरीरी का पैसे । एकाधिये ॥361॥
पण जीवावे हे कर्तुत्व, भोक्तृत्व, तो जेव्हा एखाद्या शरीराचा आश्रय करील तेव्हांच अनुभवाला येतं. 61
362-15
जैसा आथिला आणि विलासिया । तैचि वोळखो ये धनंजया । जै राजसेव्या ठाया । वस्तीसि ये ॥362॥
पुरुषाची संपन्नता किंवा त्याचा विलासीपणा, हीं, तो जेव्हा एखाद्या राजवाडासारख्या बंगल्यात रहावयास येतो, तेव्हांच प्रत्ययाला येतात. 62
363-15
तैसा अहंकर्तृत्वाचा वाढु । का विषयेंद्रियांचा धुमाडु । हा जाणिजे तै निवाडु । जै देह पाविजे ॥363॥
जीवाला जेव्हा देह प्राप्त होतो तेव्हांच त्याच्या अहंकर्ता ह्या बुद्धीची वाढ, व विषयेंद्रियांचा धुमाकूळ ह्याचा निवाडा (स्पष्टता) होतो. 63
364-15
अथवा शरीराते सांडी । तऱ्ही इंद्रियांची तांडी । हे आपणयांसवे काढी । घेऊनि जाय ॥364॥
अथवा, शरीरत्याग करतांना जीव आपल्याबरोबर येथील मन व ज्ञानेंद्रिये ह्यांचा समुदाय बरोबर घेऊन अन्य शरीरांत जातो. 64
365-15
जैसा अपमानिला अतिथी । ने सुकृताची संपत्ति । का साइखडेयाची गती । सूत्रतंतू ॥365॥
अपमान करून अतिथीला विन्मुख केल्यास तो आपल्याबरोबर जसे यजमानाचे आणखी पुण्यही हरण करून नेतो, अथवा कळसूत्री खेळाचा दोरा काढून नेल्यास त्याबरोबर त्या चित्रांची गतीही जाते. 65


366-15
नाना मावळतेनि तपने । नेइजेती लोकांची दर्शने । हे असो द्रुती पवने । नेईजे जैसी ॥366॥
अथवा सूर्य अस्तास जातांना बरोबर जशी लोकांची दृष्टीही नेतो, किंवा हे असो वारा आपल्याबरोबर जसा गंध (वास) नेतो. 66
367-15
तेवी मनःषष्ठा यया । इंद्रियाते धनंजया । देहराजु ने देहा- । पासूनि गेला ॥367॥
त्याप्रमाणे, अर्जुना, हा देहस्वामी जो जीव, तो, हा देह सोडून जातांना, आपल्याबरोबर, मनासह असणाच्या सहा ज्ञानेंद्रियांना घेऊन जातो. 67

श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च ।
अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते ॥15. 9॥
368-15
मग येथ अथवा स्वर्गी । जेथ जे देह आपंगी । तेथ तैसेचि पुढती पांगी । मनादिक ॥368॥
मग येथे असो, अथवा स्वर्गात असो; त्याला जेथे जो देह प्राप्त होईल या देहांत ह्या मनादिकांची तशीच व्यवस्था लावतो. 68
369-15
जैसा मालवलिया दिवा । प्रभेसी जाय पांडवा । मग उजळिजे तेथ तेधवा । तैसाचि फाके ॥369॥
अर्जुना, दिवा मालविला असता जसा आपल्या प्रभेसह जातो व पुन्हा लावला तर प्रभेसहच लावावा तेथे प्रकट होतो. 69
370-15
तरी ऐसैसिया राहाटी । अविवेकियांचे दिठी । येतुले हे किरीटी । गमेचि गा ॥370॥
असे आहे, तरी, अर्जुना, हा क्रम चालू असता अविवेकी जनाला एवढे तरी वाटणारच: 370
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


371-15
जे आत्मा देहासि आला । आणि विषयो येणेचि भोगिला । अथवा देहोनि गेला । हे साचचि मानिती ॥371॥
की, आत्माच जन्माला आला, आणि विषयही त्यानेच भोगिला, तसेच आत्माच मेला; त्यांच्या दृष्टीने हा सर्व व्यवहार सत्य आहे. 71
372-15
एऱ्हवी येणे आणि जाणे । का करणे हा भोगणे । हे प्रकृतीचे तेणे । मानियेले ॥372॥
एऱ्हवी विचारदृष्टीने पाहता, येणे, जाणे, करणं, भोगणे हे सर्व प्रकृतीचे धर्म आहेत; पण तो ते आत्मधर्म असे मानतो. 72

उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं ।
विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः ॥15. 10॥
यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं ।
यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः ॥15. 11॥
373-15
परी देहाचे मोटके उभे । आणि चेतना तेथ उपलभे । तिये चळवळेचेनि लोभे । आला म्हणती ॥373॥
देहाच्या आकाराच लहानसा पिंड उत्पन्न होऊन तेथे चेतना दिसू लागली की आत्मा आला असे म्हणतात. 73
374-15
तैसेचि तया संगती । इंद्रिये आपुलाल्या अर्थी वर्तती । तया नांव सुभद्रापती । भोगणे जया ॥374॥
त्याच प्रमाणे, अर्जुना, त्याच्या संगतीने इंद्रिये आपापल्या विषयांचा व्यापार करू लागली की तो त्याच भोग चालू आहे असे म्हणतात. 74
375-15
पाठी भोगक्षीण आपैसे । देह गेलिया ते न दिसे । तेथे गेला गेला ऐसे । बोभाती गा ॥375॥
भोग घेण्याचे संपून, आपोआप देह गेल्यावर चेतना दिसेनाशी झाली की, आत्मा गेला रे गेला अस एकच गिल्ला करितात. 75

दिवस २४३ वा. ३१, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २९०५ ते २९१६
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २९०५
विषम वाटे दुरवरी । चालूनि परती घरी । मागील ते उरी । नाही उरली भयाची ॥१॥
मुख्य न व्हावा तो नाड । सेवटाचे हाती गोड । सरलिया चाड । मग कैचे उद्योग ॥धृपद॥
होता पहिला अभ्यास । समयी घालावया कास । तेव्हा लटिके दोष । योगे अनुतापाच्या ॥२॥
तुका म्हणे आहे । बुद्धी केलियाने साहे । जवळीच पाहे । देव वाट स्मरणाची ॥३॥
अर्थ
लोकहो तुम्ही भेदबुध्दीच्या वाटेने चालत जाऊन जाऊन खूप दूरवर अनेक योनीमध्ये पोहोचला आहात परंतू आता तरी या मनुष्य देहामध्ये पुन्हा देवाकडे माघारी फिरा. मग तुम्हाला मागे जे दु:ख झाले त्याचे भय पुढे उरणारच नाही. मुख्य म्हणजे भेदबुध्दीचा नाड येऊ नये जर असे झाले तर आपल्या हाती शेवट गोड येणार आहे. एकदा की इच्छा नाहीसा झाल्या मग कसले दु:ख राहाते ? पहिले तुम्हाला संसारामध्ये कंबर कसून जो अभ्यास होता फक्त आता वेळप्रसंग पाहून तसाच अभ्यास आपली कंबर कसून परमार्थामध्ये करावा. एकदा की तुला पश्चात्ताप झाला की त्या योगाने सर्व पूर्वीचे दोष खोटे होतील. तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थामध्ये आपली बुध्दी शुध्द करावी व देवाला अनुकूल करुन घ्यावे मग पाहा देव तुम्हाला आपोआप प्राप्त होईल. देव तुमच्या नामस्मरणाचीच वाट पाहात आहे. ”
अभंग क्र. २९०६
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखिलिया ॥१॥
भाग गेला सीण गेला । अवघा झाला आनंदु ॥धृपद॥
प्रेमरसे बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ॥२॥
तुका म्हणे आम्हा जोगे । विठ्ठल घोगे खरे माप ॥३॥
अर्थ
देवा आता तुमचे चरण पाहिल्यानंतर माझे मन कोठे धाव घेईल ? तुमचे चरण दर्शन झाले त्यामुळे माझा सर्व भाग क्षीण गेला असून सर्वत्र आनंद झाला आहे. तुमचे प्रेमरसामुळे तुमच्या पायाला माझी मिठी बसली असून तुमचे नाम घेण्याची मोठी आवड माझ्या मुखाला लागली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आमच्या योग्यतेनुसार आमचे जोगेच विठ्ठलाचे खरे माप आमच्या पदरात पडले आहे. ”
अभंग क्र. २९०७
विश्वी विश्वंभर । बोले वेदांतींचा सार ॥१॥
जगी जगदीश । शास्त्रे वदती सावकाश ॥धृपद॥
व्यापिले हे नारायणे । ऐसी गर्जती पुराणे ॥२॥
जनी जनार्दन । संत बोलती वचने ॥३॥
सूर्‍याचिया परी । तुका लोकी क्रीडा करी ॥४॥
अर्थ
सर्व विश्वामध्ये विश्वंभरच सारभूत आहे असे वेदांतच बोलत आहे. सर्व जगामध्ये एक जगदीश्वरच आहे असे शास्त्रच सावकाशपणे सांगत आहे. नारायणाने सर्व चराचर व्यापून टाकले आहे असे पुराणे गर्जून सांगतात. सर्व लोकांमध्ये जनांमध्ये एक जनार्दन आहे असे संत सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, “सूर्य सर्व विश्वाला प्रकाश तर देतो परंतू कोणत्याही गोष्टीमध्ये लिप्त होऊन राहात नाही त्याप्रमाणे मी सर्व लोकांमध्ये वावरतो क्रिडा करतो व्यवहार तर करतो परंतू मी कोणामधेही राहात नाही मी सर्वामध्ये राहून देखील अलिप्त राहतो. ”
अभंग क्र. २९०८
निरोधती परि न मोडे विकार । बहु ही दुस्तर विषयद्वारे ॥१॥
राहातेति तुम्ही भरोनि अंतरी । होतो तदाकारी निर्विषयची ॥धृपद॥
कृपेचिया साक्षी असती जवळी । वचने मोकळी सरत नाही ॥२॥
तुका म्हणे ताळा मेळवणीपाशी । विनंती पायाशी हेचि करी ॥३॥
अर्थ
मी मनाला फार विरोध करतो परंतू काम क्रोधादी विकार काही केल्या मोडलेच जात नाही आणि विषय ज्या माध्यमातून घुसतात ते इंद्रियरुपी व्दार अडवणेही फारच कठीण आहे. देवा तुम्ही जर माझ्या अंत:करणात भरुन असतात तर मी निर्विषय होऊन तदाकार झालो असतो. देवा तुमच्या कृपेचा जर अनुभव माझ्याकडे असता तर मी काहीही बोलणे हे योग्य ठरले असते परंतू तुमच्या कृपेचा अनुभवच माझ्याजवळ नाही आणि नुसतेच कोरडे बोलून ते काही उपयोगाचे ठरणार आहे काय तर नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा कोणताही व्यापार जर केला तर त्याचा ताळमेळ बसवावा लागतोच नाही तर तो व्यापार देखील सफल ठरत नाही त्याप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या व आमच्या मनाचा ताळमेळ बसवा हीच मी विनंती तुमच्या पायाजवळ बोलतो आहे. ”
अभंग क्र. २९०९
अद्वय चिद्वय झालेचि कारण । धरिले नारायणे भक्तिसुख ॥१॥
अपरोक्ष आकार झाला चतुर्भुज । एकतत्व बीज भिन्न नाही ॥धृपद॥
शून्य निरसुनी राहिले निर्मळ । ते दिसे केवळ विटेवरी ॥२॥
सुखे घ्यावे नाम वदनाही वाड । सरिता वापी आड एक पाणी ॥३॥
तुका म्हणे मीच आहे तेणे सुखे । भेद नाही मुखे नाम गाता ॥४॥
अर्थ
नारायण हा पूर्वी अव्दैत स्थितीत होता आता परंतू तो व्दैत स्थितीत आला आहे याला मुख्य कारण म्हणजे भक्तीसुखाची आवड त्याने धरली आहे. हा नारायण जरी चतुर्भूज झाला आहे सगुण आकाराला आला आहे तरी देखील त्याचे जे एकतत्व बीज आहे त्यापासून तो भिन्न नाही. सर्व शून्याचा निराश करुन जे निर्मळ स्वरुप आहे तेच केवळ विटेवर आपल्याला प्रत्यक्ष रुपाने दिसत आहे. नारायणाचे नाम सुखाने घ्यावे याचीच आवड माझ्या मुखाला आहे आणि नदी आड विहीर यांच्यामधे जसे पाणी एकच असते त्याप्रमाणे सगुण असो किंवा निर्गुण असो त्यामध्ये एकनारायणच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हेच वर्म मी जाणून घेतले त्यामुळे मी सुखी झालो आहे आणि नारायणाचे नाम मी माझ्या मुखाने गात असताना नारायणाचा सगुण किंवा निर्गुण स्वरुपाचा भेदच माझ्या ठिकाणी राहिला नाही. ”
अभंग क्र. २९१०
उदार चक्रवर्ती । वैकुंठीचा भूपति । पुंडलिकाचिया प्रीती । विटेवरी राहिला ॥१॥
सर्वसिद्धीचा दातार । सवे आणिला परिवार । भक्त अभयंकर । घ्याघ्या ऐसे म्हणतसे ॥धृपद॥
जेणे हे विश्व निर्मिले । महर्षीदेवा संस्थापिले । एकवीस स्वर्गाते धरिले । सत्तामात्रे आपुलिया ॥२॥
तुका म्हणे कृपावंत । इच्छिले पुरवी मनोरथ । रिद्धिसिद्धिमोक्ष देतसे । शेखी संग आपुला ॥३॥
अर्थ
उदार असा वैकुंठाचा भूपती चक्रवर्ती, पुंडलिकाच्या प्रेमासाठी विटेवर उभा राहिला आहे. सर्व सिध्दीचा दाता असलेल्या पाडूरंगाने आपल्याबरोबर लक्ष्मी गरुड असा परिवार देखील आणला आहे. भक्तांना अभय देऊन तो भक्तांना हवे ते घ्या घ्या असे म्हणत आहे. ज्याने हे विश्व निर्माण केले आहे सप्तर्षी व ब्रम्हदेव यांची निर्मिती करुन त्यांना त्यांचे काम नेमून दिले आहे, आणि एकवीस स्वर्गाला त्याने आपल्या सत्तेच्या बळावर धरले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “असा हा कृपावंत आहे जो इच्छा करेल त्याचे मनोरथ हा पूर्ण करतो, ज्याला रिध्दी हवी असेल ज्याला सिध्दी हवी असेल ज्याला मोक्ष हवे असेल ते त्याला देतो आणि त्याची संगती हवी असेल ती संगतीही शेवटी त्याला तो देतोच. ”
अभंग क्र. २९११
सकल गुणे संपन्न । एक देवाचे लक्षण ॥१॥
वरकड कोठे काही कोठे काही । एक आहे एक नाही ॥धृपद॥
षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक । भगवंती जाण ॥२॥
तुका म्हणे जेंजे बोला । तेते साजे या विठ्ठला ॥३॥
अर्थ
सर्व गुणाने संपन्न असणे म्हणजे हे एक देवाचेच लक्षण आहे. इतरांच्या ठिकाणी काही लक्षणे आहेत तर काही नाहीत. षडगुण ऐश्वर्य संपन्न ही एक भगवंतच आहे हे मात्र जाणून घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, “या विठ्ठलाला जे जे गुण किंवा जे जे लक्षण आपण ऐकवू त्याच्याविषयी जे काही बोलू ते त्याला शोभूनच दिसते. ”
अभंग क्र. २९१२
सुख पंढरिये आले । पुंडलिके साठविले ॥१॥
घ्या रे घ्या रे माझे बाप । जिव्हा घेउनि खरे माप । करा एक खेप । मग नलगे हिडणे ॥धृपद॥
विभव गुंडोनी पसारा । धाव घाला पंढरपुरा ॥२॥
आयुष्य वेच जव आहे । तोंची धावोनिया जाये ॥३॥
आळस न करी या लाभाचा । तुका विनवी कुणबियाचा ॥४॥
अर्थ
निजस्वरूप रूप जे सुख आहे ते पंढरीला आले आहे पुंडलीकाने ते पंढरीमध्ये साठवून ठेवलेले आहे. हे माझे बाप हो तुम्ही जिभेच्या द्वारे नामाचे खरे माप घेऊन नाम घ्यावे नाम घ्यावे. अहो त्या नीजस्वरूपी सुखाची तुम्ही एकच वेळ खेप करा त्यामुळे तुम्हाला जन्ममरणाची येरझार करत अनेक योनीमध्ये हिंडत बसावे लागणार नाही. सर्व प्रकारच्या भोगाचा पसारा गुंडाळून तुम्ही पंढरपूर कडे धाव घ्यावी. जोपर्यंत आयुष्य नामक खर्ची तुमच्याकडे आहे तोपर्यंतच तुम्ही पंढरीला धावत जावे. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारच्या सुखाचा लाभ करून घेण्याकरता तुम्ही आळस करू नका, मी कुणब्याचा तुका तुम्हाला अशी विनंती करत आहे.
अभंग क्र. २९१३
देवाचे चरित्र नाठवे सर्वथा । विनोदार्थ कथा गोड वाटे ॥१॥
हातावरी हात हासोनि आफळी । वाजविता टाळी लाज वाटे ॥२॥
तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥३॥
अर्थ
परमार्थामध्ये क्षुद्र असणाऱ्या लोकांना देवाचे चरित्र कधीच आवडत नाही परंतू विनोदाच्या गप्पागोष्टी त्यांना फार आवडतात. विनोदाच्या गोष्टी करतांना ते हातावर हात देऊन मोठया आनंदाने टाळी देऊन मोठ मोठयाने हसत असतात परंतू हरीकथेमध्ये टाळी वाजताना त्यांना लाज वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा मनुष्याच्या तोंडावर थुंका तो आपल्या कर्माने निश्चिंतच यमपुरी भोगायला जात असतो. ”
अभंग क्र. २९१४
अद्वैती तो नाही माझे समाधान । गोड हे चरण सेवा तुझी ॥१॥
करुनी उचित देई हेची दान । आवडे कीर्तन नाम तुझे ॥धृपद॥
देव भक्त सुखाच सोहळा । ठेउनी निराळा दावी मज ॥२॥
तुका म्हणे आहे तुझे हे । सकळ कोण्या एके काळे देई मज ॥३॥
अर्थ
देवा अव्दैत स्थितीत माझे समाधान होत नाही तुझी चरणसेवाच करणे मला फार गोड वाटते. त्यामुळे देवा जे योग्य आहे असे व्दैताचे दान तू मला दे व माझे उचित कर कारण मला तुझे नामसंकीर्तन करणे खूप आवडते. तुझ्या अव्दैत स्वरुपाच्या पासून मला वेगळा ठेवून देवभक्तपणाचा सुख सोहळा दाखव. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा सर्व विश्व हे तुझेच स्वरुप आहे असे असले तरी देखील मला देवभक्तपण सुख सोहळा भोगू दे आणि योग्य वेळ आली की अव्दैत स्थिती ही माझ्या ठिकाणी मनात येऊ दयावे. ”
अभंग क्र. २९१५
हेचि माझे तप हेचि माझे दान । हेचि अनुष्ठान नाम तुझे ॥१॥
हेचि माझे तीर्थ हेचि माझे व्रत । सत्य हे सुकृत नाम तुझे ॥धृपद॥
हेचि माझा कर्म हाचि माझा धर्म । हाचि नित्यनेम नाम तुझे ॥२॥
हाचि माझा योग हाचि माझा यज्ञ । हेचि तपध्यान नाम तुझे ॥३॥
हाचि कुळाचार हाचि कुळधर्म । हाचि नित्यनेम नाम तुझे ॥४॥
हा माझा आचार हा माझा विचार । हा माझा निर्धार नाम तुझे ॥५॥
तुका म्हणे दुजे सांगायासि नाही । नामेविण काही धनवित्त ॥६॥
अर्थ
देवा तुझे नाम घेणे म्हणजे हेच माझ्यासाठी तप हेच दान आणि हेच माझ्यासाठी अनुष्ठान आहे. देवा तुझे नाम हेच माझ्यासाठी तीर्थ हेच माझ्यासाठी व्रत सत्य आणि सुकृत हे देखील तुझे नामच आहे. देवा तुझे नाम म्हणजे माझे कर्म तोच माझा धर्म आणि नित्य नेम देखील हेच आहे. देवा तुझे नाम म्हणजे हाच माझा योग हेच माझे यज्ञ हेच तप आणि ध्यान आहे. देवा हाच माझा कुळाचार, कुळधर्म हाच आणि नित्य नियम देखील हाच आहे की तुझे नाम घ्यावे. देवा तुझे नाम म्हणजे हाच माझा आचार आहे हाच माझा विचार आहे आणि हाच माझा निर्धार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुझ्या नामावाचून माझ्याजवळ दुसरे काहीही सांगण्यासारखे धन वित्त नाही. ”
अभंग क्र. २९१६
कोणे साक्षीविण । केले उद्धारा भजन ॥१॥
ऐसे सांगा जी दातारा । माझी भक्ति परंपरा ॥धृपद॥
कोणे नाही केली आळी । ब्रम्हज्ञानाहुनि वेगळी ॥२॥
कोणाचे तो कोड । नाही पुरविला लाड ॥३॥
कोणाच्या उद्धारा । केला विलंब माघारा ॥४॥
तुका म्हणे भिन्न । काहो बोले साक्षीविण ॥५॥
अर्थ
देवा तुझे भजन केल्याने उध्दार होतो अशी संतांची यापूर्वी साक्ष मिळाली, त्यामुळेच का कोणी तुझे भजन करीत आहे ? देवा माझी कुळ परंपरा भक्तीची आहे त्यानुसारच मी चालत आहे मग याविषयी हे दातारा तुम्हीच अधिक मला सांगावे. देवा ब्रम्हज्ञानावाचून दुसरा काही हट्ट यापूर्वी कोणी केलाच नाही की काय ? आणि देवा यापूर्वी तू कोणाचे लाड कोड कौतुक पुरवले नाही काय ? देवा तुम्ही आजपर्यंत तुमच्या भक्तांचा उध्दार करण्यासाठी केव्हा माघार घेतली आणि केव्हा विलंब केला आहे ते सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, “मी जे काही बोलतो आहे देवा ते संतांच्या साक्षेवाचून काही वेगळे भिन्न बोलत आहे काय ? ”

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading