आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

६ ऑगस्ट, दिवस २१८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी १५१ ते १७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २६०५ ते २६१६
“६ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ६ August
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ६ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २६०५ ते २६१६ चे पारायण आपण करणार आहोत.
६ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी १५१ ते १७५,
151-14
म्हणे भाग्य ना माझे ? । आजि सुखिये नाही दुजे । विकाराष्टके फुंजे । सात्त्विकाचेनि ॥151॥
आणि म्हणतो, “माझे भाग्य उत्तम नाही काय ? आज माझ्यासारखा दुसरा कोणी सुखी नाही” असा अष्टसात्विक भावांनी गर्वाला चढतो किंवा फुलुन जातो.
152-14
आणि येणेही न सरे । लांकण लागे दुसरे । जे विद्वत्तेचे भरे । भूत आंगी ॥14-152॥
आणि एवढ्याने सरत नाही तर त्याच्या मागे दुसरे बंधन लागते ते हे की त्याच्या अंगात विद्वत्तारूपी भूताचा संचार होतो.
153-14
आपणचि ज्ञानस्वरूप आहे । ते गेले हे दुःख न वाहे । की विषयज्ञाने होये । गगनायेवढा ॥153॥
आपण स्वत: ज्ञानरूप आहोत ते आपले ज्ञानरूपत्व गेले, त्याचे दु:ख मानत नाही तर उलट विषयज्ञानाने आकाशाएवढा होतो. आपणास अत्यंत श्रेष्ठ मानतो.
154-14
रावो जैसा स्वप्नी । रंकपणे रिघे धानी । तो दो दाणा मानी । इंद्रु ना मी ? ॥154॥
जसा एखादा राजा स्वप्नात आपणा भिकारी आहोत असे समजून नगरात प्रवेश करतो व त्यास भिक्षा मागून दोन दाणे मिळाले की मी इंद्र नाही काय असे मानतो.
155-14
तैसे गा देहातीता । जालेया देहवंता । हो लागे पंडुसुता । बाह्यज्ञाने ॥155॥
अर्जुना, देहातीत जो आत्मा, तो देहवंत झाल्यावर (म्हणजे त्याने देहाशी तादात्म्य केल्यावर) त्याला बाह्यज्ञानाने तसे होऊ लागते,
156-14
प्रवृत्तिशास्त्र बुझे । यज्ञविद्या उमजे । किंबहुना सुझे । स्वर्गवरी ॥156॥
संसारसंबंधी शास्रे तो जाणतो, यज्ञाविद्या त्यास समजते, फार काय सांगावे ? त्यास स्वर्गापर्यंत सर्व समजते.
157-14
आणि म्हणे आजि आन । मीवाचूनि नाही सज्ञान । चातुर्यचंद्रा गगन । चित्त माझे ॥157॥
या जगात माझ्याव्यतिरीक्त दुसरा कोणी ज्ञानी नाही. आणि माझे चित्त हे चातुर्यरूपी चंद्राचे आकाश आहे असे तो म्हणतो.
158-14
ऐसे सत्त्व सुखज्ञानी । जीवासि लावूनि कानी । बैलाची करी वानी । पांगुळाचिया ॥158॥
याप्रमाणे सत्वगुण हा जीवाला सुख व ज्ञानरूपी दावे लावून पांगुळाच्या बैलासारखी म्हणजे नंदीबैलासारखी त्याची स्थिती करतो.
159-14
आता हाचि शरीरी । रजे जियापरी । बांधिजे ते अवधारी । सांगिजैल ॥159॥
आता हाच आत्मा देहामध्ये ज्या प्रकाराने रजोगुणाने बांधला जातो तो प्रकार सांगण्यात येईल. तरी ते तु ऐक श्रवण कर.
रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवम् ।
तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम् ॥14. 7॥
श्र्लोकार्थ- रजोगुण हा अभिलाषरूप असून तृष्णा व आसक्ती यापासून उत्पन्न होतात असे समज. हे कौतेया, तो कर्मसंगतीने प्राण्याला बद्ध करतो म्हणजे मी अमूक करीन, मी तमूक करीन अशा इच्छांनी बद्ध करतो.
160-14
हे रज याचिकारणे । जीवाते रंजऊ जाणे । हे अभिलाखाचे तरुणे । सदाचि गा ॥160॥
रजोगुणाला रज हे नाव याच कारणाकरता आहे की तो रजोगुण हा जीवाला विषयात रंजवण्याची कला जाणतो व रजोगुण हा अभिलाषेचे, लोभाचे कधीही कमी न होणारे तारुण्य आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-14
हे जीवी मोटके रिगे । आणि कामाच्या मदी लागे । मग वारया वळघे । तृष्णेचिया ॥161॥
या रजोगुणाने जीवात (अंत:करणात) थोडासा प्रवेश केल्याबरोबर तो जीव कामाच्या मस्तीत येतो आणि मग तो विषयांच्या चिंतनरूपी वार्यावर स्वार होतो.
162-14
घृते आंबुखूनि आगियाळे । वज्राग्नीचे सादुकले । आता बहु थेंकुले । आहे तेथ ? ॥162॥
पेटलेल्या अग्निकुंडातल्या अग्नीवर तूप शिंपडले असता. जया वज्राग्नी भडकला जातो. व त्यात कोणतीही लहान मोठी वस्तु आहे याचे त्यास भान रहात नाही. त्यातील सर्व वस्तुंचा तो नाश करुन टाकतो,
163-14
तैसी खवळे चाड । होय दुःखासकट गोड । इंद्रश्रीहि सांकड । गमो लागे ॥163॥
त्याप्रमाणे विषयाची इच्छा ज्याप्रमाने खवळते व त्यावेळी विषयसुखात दुःख असुनही विषयप्राप्तीच्या तीव्र इच्छेमुळे त्यामध्ये असलेले दु:ख सुद्धा गोड वाटु लागते. आणि त्यास इंद्रलोक जरी प्राप्त झाला, तरी त्याची भुक कमी होत नाही.
164-14
तैसी तृष्णा वाढिनलिया । मेरुही हाता आलिया । तऱ्ही म्हणे एखादिया । दारुणा वळघो ॥16॥
अशा प्रकारे विषयवासनेची चक्रे वाढल्यावर मग जरी मेरुपर्वत हाती आला तरी असे म्हणतो की याही पेक्षा भयंकर श्रमाने मिळणारे एखादे काम असेल तर तेही मिळवण्याचे प्रयत्न तो करु लागतो.
165-14
जीविताचि कुरोंडी । वोवाळू लागे कवडी । मानी तृणाचिये जोडी । कृतकृत्यता ॥165॥
एका कवडीसाठी तो आपले जीवन ओवाळुन टाकण्यास तो तयार असतो. आणि गवताच्या काडी इतकी जरी एखादी वस्तु त्यास प्राप्त झाली, तरी तो आपणास कृतकृत्य मानतो.
166-14
आजि असते वेचिजेल । परी पाहे काय कीजेल । ऐसा पांगी वडील । व्यवसाय मांडी ॥166॥
आज आपणाजवळील धन पैसा खर्च केले, तर उद्दा काय करणार, अशा काळजीमुळे तो धन मिळवण्यासाठी मोठमोठ्या उद्दोगधंद्यास सुरुवात करतो.
167-14
म्हणे स्वर्गा हन जावे । तरी काय तेथे खावे । इयालागी धावे । याग करू ॥167॥
आणि म्हणतो की आपणास स्वर्गाची प्राप्ती झाली असता. तेथे काय खावे असे म्हणतो व याकरता यज्ञ करण्यास धावतो.
168-14
व्रतापाठी व्रते । आचरे इष्टापूर्ते । काम्यावाचूनि हाते । शिवणे नाही ॥168॥
व्रतामागे व्रते आचरण करतो, इष्ट व पूर्त कर्मे करतो, जगाात वाहवा होण्याकरिता धर्मशाळा, बागा, विहिरी अशी समाज निगडीत कामे करतो. आणि काम्यकर्मावाचून दुसर्या कोणत्याही कर्मास हाताने स्पर्श करत नाही.
169-14
पै ग्रीष्मांतीचा वारा । विसांवो नेणे वीरा । तैसा न म्हणे व्यापारा । रात्र दिवस ॥169॥
हे अर्जुना, जसा ग्रीष्म ऋतूचा शेवटी वाहनारा वारा एक क्षणभर विश्रांती घेणे जाणत नाही, त्याप्रमाणे हा रजोगुणी पुरुष व्यापार करीत असता दिवस अथवा रात्र म्हणत नाही.
170-14
काय चंचळु मासा । कामिनीकटाक्षु जैसा । लवलाहो तैसा । विजूही नाही ॥170॥
अशा रजोगुणी माणसापुढे मासा कसला चंचल आहे ? जसा एखादी कामिनी स्त्रीचा नेत्रकटाक्ष जितका चंचल, इतका तो चंचल असतो तसा अशा मनुष्यास काम करण्याची जितकी घाई असते, चांचल्य असते, तेवढे विजेतदेखील नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
171-14
तेतुलेनि गा वेगे । स्वर्गसंसारपांगे । आगीमाजी रिगे । क्रियांचिये ॥171॥
तितक्या वेगाने स्वर्ग व संसार यांच्या प्राप्तीकरता कर्मरूपी अग्नीमधे उडी टाकण्यास तो कोणत्याही अडचनीस सामोरे जाण्यास मागेपुढे पाहत नाही.
172-14
ऐसा देही देहावेगळा । ले तृष्णेचिया सांखळा । खटाटोपु वाहे गळा । व्यापाराचा ॥172॥
देहापासून जीवात्मा वेगळा असता तो देहामधे असतो तेव्हा तृष्णेची बेडी (आपल्या पायामधे) अडकवून याप्रमाणे व्यापाराचा खटाटोपाचे लोढणे आपल्या गळ्यात अडकवून घेतो.
173-14
हे रजोगुणाचे दारुण । देही देहियासी बंधन । परिस आता विंदाण । तमाचे ते ॥173॥
देहधारी जो आत्मा त्यास देहामधे असताना हे रजोगुणाचे भयंकर बंधन असते, आता तमोगुणाचे कौशल्य ऐक.
तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम् ।
प्रमादालस्यनिद्राभिस्तन्निबध्नाति भारत ॥14. 8॥
श्लोकार्थ -: -: :- तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न होतो व म्हणून तो सर्व जिवाना मोहात पाडतो असे जाण. हे भारता, प्रमाद, आळस व निद्रा या तीन पाशांनी तो देहाला बंधनात अडकवितो.
(तमोगुण प्राण्याला कसा बद्ध करतो ? तमोगुणी माणसाचे शब्दचित्र)
174-14
व्यवहाराचेहि डोळे । मंद जेणे पडळे । मोहरात्रीचे काळे । मेहुडे जे ॥174॥
व्यवहाराचीही दृष्टी ज्या पडद्याने मंदावते, असा तमोगुण हा पडदा आहे व जो तमोगुण मोहरूपी रात्रीतील काळा ढग आहे.
175-14
अज्ञानाचे जियाले । जया एका लागले । जेणे विश्व भुलले । नाचत असे ॥175॥
त्या तमोगुणाला केवळ अज्ञानाचा जिव्हाळा (प्रेम)आहे व ज्या तमोगुणाच्या योगाने सर्व जीव भ्रमिष्ट होऊन वाटेल तसे कर्म करतात.
दिवस २१८ वा. ६, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २६०५ ते २६१६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २६०५
मज अनाथाकारणे । करी येणे केशवा ॥१॥
जीव झुरे तुजसाठी । वाट पोटी पहातसे ॥धृपद॥
चित्त रंगले चरणी । तुजवाचूनि न राहे ॥२॥
तुका म्हणे कृपावंता । माझी चिंता असावी ॥३॥
अर्थ
हे केशवा माझ्या अनाथासाठी तुम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करा. देवा तुझ्यासाठी माझा जीव झुरत आहे आणि मी ह्दयामध्ये तुझी वाट पाहात आहे. देवा माझे चित्त तुझ्या चरणाच्या ठिकाणी रंगले आहे ते त्या चरणावाचून ठिकाणी कोठेही स्थिर राहात नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, “माझी चिंता तुम्हाला असावी. ”
अभंग क्र. २६०६
कासया वाचूनि झालो भूमी भार । तुझ्या पायी थार नाही तरी ॥१॥
जाता भले काय डोळियांचे काम । जव पुरुषोत्तम न देखती ॥धृपद॥
काय मुख पेव श्वापदाचे धाव । नित्य तुझे नांव नुच्चारिता ॥२॥
तुका म्हणे आता पांडुरंगाविण । न वांचता क्षण जीव भला ॥३॥
अर्थ
देवा मला तुझ्या पायाच्या ठिकाणी थाराच नाही तर मग मी कशासाठी भूमीला भार झालो आहे ? माझ्या डोळयांनी जर पुरुषोत्त्माला पाहीलेच तर मग त्यांचे काय काम आहे ते नसलेले बरे. देवा तुझे नांव जर नित्य स्वरुपात माझ्या मुखाने उच्चारले नाही तर ते केवळ धान्य ठेवण्याचे एक पेव आहे किंवा श्वापदे राहाण्याची गुहाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “पाडूरंगावाचून एक क्षणभर देखील जीव नाही राहीला तरच चांगले होईल. ”
अभंग क्र. २६०७
नको मज ताठा नको अभिमान । तुजवीण क्षीण होतो जीवा ॥१॥
दुर्धर हे माया न होय सुटका । वैकुंठनायका सोडवी मज ॥२॥
तुका म्हणे तुझे झालिया दर्शन । मग निवारण होईल सर्व ॥३॥
अर्थ
देवा मला संपत्तीचा किंवा माझ्या देहाच्या सत्तेचा अभिमान नको कारण माझा जीव तुझ्यावाचून क्षीण होत आहे. हे वैकुंठनायका माया फार दुर्धर म्हणजे कठीण आहे अवघड आहे हिच्यातून सुटका होणे मला शक्य होत नाही त्यामुळे तूच मला यातून सोडव. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा एकदा की मला तुझे नीजस्वरुपाचे दर्शन झाले की सर्व माया, दु:खाचे निवारण होईल. ”
अभंग क्र. २६०८
चाल घरा उभा राहे नारायणा । ठेवू दे चरणांवरी माथा ॥१॥
वेळोवेळा देई क्षेमआलिंगन । करी अवलोकन कृपादृष्टी ॥धृपद॥
प्रक्षाळू दे पाय बैसे माजघरी । चित्त स्थिर करी पांडुरंगा ॥२॥
आहे त्या संचिते करवीन भोजन । काय न जेवून करिसी आता ॥३॥
करुणाकरे नाही कळो दिले वर्म । दुरी होता भ्रम कोण वारी ॥४॥
तुका म्हणे आता आवडीच्या सत्ता । बोलिलो अनंता करवीन ते ॥५॥
अर्थ
हे नारायणा माझ्या घरामध्ये चाल तेथे तू उभा राहा मला तुझ्या चरणावर माथा ठेवू दयावे. देवा तू वेळोवेळी मला प्रेमाने आलिंगन देत राहा आणि कृपादृष्टी माझ्यावर सतत ठेवत राहा. हे पाडूरंगा तू मला तुझे पाय धुवू दे नंतर माझ्या घराच्या माजघरामध्ये बैस आणि माझे चित्त स्थिर कर. देवा माझ्या संचितानुसार जेवढे काही भोजन माझ्या घरी आहे तेच भोजन मी तुला जेवू घालीन आता माझ्या घरी तू आला आहेस तर न जेवून तू आता काय करशील ? हे करुणाकरा तू जर नीजस्वरूपाचे खरे वर्म कळू दिले नाही सांगितले नाही आणि माझ्यापासून दूर निघून गेलास तर माझ्या भ्रमाचे निवारण कोण करील ? तुकाराम महाराज म्हणतात, “हे अनंता मी तुझ्याशी आता प्रेमसत्तेने बोलत आहे परंतू मी जे काही बोलत आहे ते तुझ्याकडून करवूनच घेईन. ”
अभंग क्र. २६०९
देवाची ते खूण आला ज्याच्या घरा । त्याच्या पडे चिरा संसारासी ॥१॥
देवाची ते खूण करावे वाटोंळे । आपणा वेगळे राहो नेदी ॥धृपद॥
देवाची ते खूण गुंतो नेदी आशा । ममतेच्या पाशा शिवो नेदी ॥२॥
देवाची ते खूण करावे तोंडाळ । आणिक सकळ जग हरी ॥३॥
देवाची ते खूण झाला ज्यासी संग । त्याचा झाला भंग मनुष्यपणा ॥४॥
देवाची ते खूण गुंतो नेंदी वाचा । लागो असत्याचा मळ नेदी ॥५॥
देवाची ते खूण तोडी मायाजाळ । आणि हे सकळ जग हरी ॥६॥
पहा देवे तेचि बळकाविले स्थळ । तुक्यापे सकळ चिन्हे होती ॥७॥
अर्थ
ज्याच्या ह्दयरुपी घरामध्ये देव आला आहे त्याची ओळखण्याची खूण म्हणजे त्याच्या संसारावर दगड पडत असतो त्याचे वाटोळे होते. देवाने त्याच्या भक्ताचे वाटोळे करावे आणि त्याच्या भक्ताला त्याचेपासून वेगळे राहू देऊ नये हीच त्याच्या कृपेची खरी खूण आहे. देवाची प्राप्तीची खरी खूण म्हणजे त्याचा भक्त आशापाशात गुंतत नाही आणि ममतेचे जाळे त्याला शिवत नाही. देवाची प्राप्तीची खूण म्हणजे देवाचा भक्त आपल्या मुखाने नेहमी हरीचेच नाम घेतो आणि संपूर्ण जगच हरीरुप करुन सोडतो. देवाच्या प्राप्तीची खूण म्हणजे ज्याला देवाचा संग झाला तो मनुष्य न राहता स्वत: देवच झाला म्हणजेच त्याच्या मनुष्यपणाचा भंगच झाला. देवाच्या प्राप्तीची खूण म्हणजे देवाचा भक्त आपल्या वाणीने हरीचेच नाम घेतो आणि भवसागरातील मायीक पदार्थांचे वर्णन करण्यात गुंतत नाही व असत्याचा मळ आपल्या वाणीला लावून घेत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “लोक हो पाहा देवाने माझे देहरुपी स्थळच बळकावले आहे आणि जे काही चिन्ह मी तुम्हाला देवप्राप्तीचे सांगितले ते सर्व माझ्या ठिकाणी आहेत. ”
अभंग क्र. २६१०
अनंताचे मुखी होसील गाइला । अमुप विठ्ठला दास तुम्हा ॥१॥
माझे कोठे आले होईल विचारा । तरीच अव्हेरा योग्य झालो ॥धृपद॥
सर्वकाळ तुम्ही असा जी संपन्न । चतुरा नारायण शिरोमणि ॥२॥
तुका म्हणे ऐसे कलियुगींचे जीव । तरी नये कीव बहुपापी ॥३॥
अर्थ
हे विठ्ठला या सृष्टीमध्ये तुझे वर्णन करणारे तुझे अनंत भक्त असतील आणि तुझे अनंत दासही असतील. त्यामुळेच हे विठ्ठला एवढ्या भक्तांमध्ये माझा विचार तरी तुम्हाला कसा होईल आणि तेथे माझे कोठे स्थान आहे त्यामुळेच माझा अव्हेर तुमच्याकडून झाला हेही बरेच झाले. हे नारायणा तुम्ही सर्व काळ संपन्न आहात आणि सर्व चतुरांचेही शिरोमणी तुम्ही आहात. तुकाराम महाराज म्हणतात, “हे देवा या कलियुगामध्ये खूप लोक पापी आहेत त्यामध्ये मीही एक आहे त्यामुळेच तुला यांची कीव येत नाही दया येत नाही. ”
अभंग क्र. २६११
न करावी चिंता । भय धरावे सर्वथा ॥१॥
दासा साहे नारायण । होय रक्षिता आपण ॥धृपद॥
न लगे परिहार । काही योजावे उत्तर ॥२॥
न धरावी शंका । नये बोलो म्हणे तुका ॥३॥
अर्थ
हरीच्या दासांनी कोणत्याही प्रकारची चिंता करु नये व कोणतेही भय मनात धरु नये. कारण नारायण त्याच्या दासांना नेहमी साहाय्य करतो व स्वत: त्यांचे रक्षण करण्यास तयार असतो. हरीजवळ कोणत्याही प्रकारचा परीहार देऊ नये आणि काही माहिती देण्यासाठी शब्दांची योजना देखील करु नये. तुकाराम महाराज म्हणतात, “कोणत्याही प्रकारची शंका तुम्ही धरु नका आणि काहीही बोलू नका. ”
अभंग क्र. २६१२
भांडवल माझे लटिक्याचे गाठी । उदीम तो तुटी यावी हेचि ॥१॥
कैसी तुझी वाट पाहो कोण्या तोंडे । भोवती किं रे भांडे गर्भवास ॥धृपद॥
बहू खाणीचिया रंगलोंसे संगे । सुष्ट दुष्ट अंगे धरूनिया ॥२॥
बहुतांचे बहु पालटलो सळे । बहु आला काळे रंग अंगा ॥३॥
उकलूनि नये दाविता अंतर । घडिचा पदर सारूनिया ॥४॥
तुका म्हणे आता करी गोळयासाठी । आपुल्या पालटी संगे देवा ॥५॥
अर्थ
माझ्या सारख्या खोटारडयाच्या पदरामध्ये एवढेच एक भांडवल आहे की कोणताही व्यापार मी केला तरी माझे नुकसानच होईल. देवा माझ्या भोवताली गर्भवासाच्या फेऱ्याच चालू आहेत त्यामुळे मी तुझी वाट कशी व कोणत्या तोंडाने पाहू ? मी अनेक जन्ममरणाच्या खाणी भोगल्या आहेत त्यामध्ये कधी चांगले तर कधी वाईट शरीर धारण करुन अनेक गुणाच्या रंगाने मी रंगलो होतो आणि मी खूप जन्मामध्ये खूप लोकांच्या संगतीत राहून पालटलो आहे पण भक्तांचे विविध प्रकारचे काळे गुण कर्माचे रंग माझ्या अंगाला लागले आहेत. माझे अंतरंग कसे विविध गुणकर्माने रंगले आहे पहा जसा साडीचा पदर बाजूला करुन साडीचा रंग दाखवता येतो त्याप्रमाणे दाखवता येणार नाही. तुकाराम महाराज महणतात, “माझे शरीर तुम्हाला घ्या त्याच्या बदल्यात मला तुमचे स्वरुप दाखवा. ”
अभंग क्र. २६१३
संतसंगती न करावा वास । एखादे गुणदोष अंगा येती ॥१॥
मग तया दोषा नाही परिहार । होय अपहार सुकृताचा ॥२॥
तुका म्हणे नमस्कारावे दुरून । अंतरी धरून राहे रूप ॥३॥
अर्थ
संतांच्या संगतीत किंवा संतांच्या बरोबर अगदी जवळ वास करु नये कारण त्यांच्या अंगीचा एखादा गुण दोष असेल तर आपल्या अंगी येऊ शकतो त्यांच्या संगतीमध्ये जर एखादा गुण दोष अंगी जडलाच तर त्याचा परिहार होत नाही याउलट आपल्याजवळ जो पुण्याचा साठा असतो त्याचाच अपहार म्हणजे नाश होतो. तुकाराम महाराज म्हणतात, “संतांना दुरुन नमस्कार करावा व त्यांचे रुप आपल्या ह्दयामध्ये धरुन राहावे. ”
अभंग क्र. २६१४
जे ज्याचे जेवण । तेचि याचकासी दान ॥१॥
आता जाऊ चोजवीत । जेथे वसतील संत ॥धृपद॥
होती धाली पोटे । मागे उरली उच्छिष्टे ॥२॥
तुका म्हणे धाव । पुढे खुंटईल हाव ॥३॥
अर्थ
जेवण करताना आपण जे अन्न खातो तेच अन्न याचकाला दान दयावे. आता संत ज्या ठिकाणी वस्ती करतात त्या ठिकाणाचा शोध घेऊन आपण तेथे याचक होऊन जाऊ. संतांनी जे उच्चिष्ट मागे ठेवले आहे तेच खाऊ व त्यानेच पोटाची तृप्ती होईल. तुकाराम महाराज म्हणतात, “संतांच्या उच्चिष्ट सेवनाने जन्ममरणाची धाव आणि इच्छा करण्याची हाव खुंटेल. ”
अभंग क्र. २६१५
धरावा तो बरा । ठाव वसतीचा थारा ॥१॥
निजलिया जागविती । निज पुरवूनि देती ॥धृपद॥
एक वेवसाव । त्यांचा संग त्याचा जीव ॥२॥
हिते कळे हित । ग्वाही एक एका चित्त ॥३॥
विषमाचे काही । आड तया एक नाही ॥४॥
तुका म्हणे बरी । घरा येतील त्या परी ॥५॥
अर्थ
जेथे संतांचे राहण्याचे ठिकाण आहे तेथेच आपण ठाव धरावा हेच चांगले आहे. मग संत जे अज्ञानामुळे झोपी गेले आहेत त्यांना जागवतात आणि हरीच्या नीजस्वरुपाची प्राप्ती करुन देतात. संतांचा व आपला एकच व्यवसाय पाहिजे संतांची संगती आणि आपला जीव एकच झाला पाहिजे. संतांची संगती केली की त्यांच्या हितातच आपले हित आहे म्हणजेच त्यांनी सांगितलेले साधन हिताचेच आहे व ते केल्याने आपले हितच होते हे असे कळून येते आणि हे समजून आले की त्याविषयी संत आणि आपले चित्तच हे एकमेकाला साक्ष असतात. संत आणि आपल्यामध्ये भेद केव्हाही आडवा येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “जी युक्ती केल्याने संत आपल्या घरी येतात ती युक्ती बरी आहे. ”
अभंग क्र. २६१६
त्यांचिया चरणा माझे दंडवत । ज्यांचे धनवित्त पांडुरंग ॥१॥
तेथे माझा जीव पावला विसावा । म्हणऊनि हावा भरलोसे ॥धृपद॥
चरणींचे रज लावीन कपाळा । जी पदे राउळा सोई जाती ॥२॥
आणिक ती भाग्ये येथे कुरवंडी । करुनिया सांडी इंद्राऐसी ॥३॥
वैष्णवाचे घरी देवाचे वसति । विश्वास हा चित्ती सर्वभावे ॥४॥
तुका म्हणे सखे हरीचे जे दास । आता पुढे आस दुजी नाही ॥५॥
अर्थ
ज्यांचे धन वित्तच पाडूरंग आहे त्या चरणांना माझे दंडवत असो. त्या ठिकाणी माझा जीव विश्रांत पावला असून त्याच ठिकाणच्या इच्छेने मी भरलो गेलो आहे. ज्यांची पावले हरीचे मुख पाहण्याकरता राऊळाकडे म्हणजे देवळाकडे जातात त्यांच्या चरणाचे रज म्हणजे माती मी माझ्या कपाळाला लावीन. आणि मी त्यांच्यावरुन इंद्रपदासारखे भाग्य देखील ओवाळून टाकीन. माझ्या चित्तामध्ये असा पूर्ण सर्वभावे दृढविश्वास आहे की वैष्णवांच्या घरी देवाची वस्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “जे हरीचे सखे आहेत त्यांचा मी दास व्हावे यापेक्षा माझी दुसरी कोणतीच इच्छा नाही. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















