२२ जानेवारी, दिवस २२, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा, ओवी २५१ ते २७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २५३ ते २६४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२२ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 22 January

राम कृष्ण हरी आज दिनांक २२ जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

251-2
जैसा कर्पुराचा राशि कीजे । मग अग्नि लाऊनि दीजे । का मिष्टानी संचरविजे । काळकूट ॥251॥
ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि मग तिला अग्नी लाऊन द्यावा किंवा मिष्टान्नात जालीम विष घालावे.
252-2
दैवे अमृतकुंभ जोडला । तो पाये हाणोनि उलंडिला । तैसा नासिती धर्म निपजला । हेतुकपणे ॥252॥
किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लाथ मारून पालथा करावा त्याप्रमाणे फलाचा अभिलाष धरून ते आयता घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवतात.
253-2
सायासे पुण्य अर्जिजे । मग संसारु का अपेक्षिजे । परी नेणती ते काय कीजे । अप्राप्त देखे ॥253॥
मोठ्या सायासाने पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी ? पण पहा, ज्यांना सद्बुद्धी प्राप्त झालेली नाही अशा त्या अज्ञानी लोकांना हे समजत नाही त्याला काय करावे ?
254-2
जैसे रांधवणी रससोय निकी । करुनिया मोले विकी । तैसा भोगासाठी अविवेकी । धाडिती धर्मु ॥254॥
ज्याप्रमाणे एखाद्या सुग्रण स्त्रीने उत्तम पक्वान्ने करून ती केवळ द्रव्याच्या आशेने विकून टाकावी, त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुखोपभोगाच्या आशेने हातचा धर्म दवडतात.
255-2
म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा । तया वेदवादरता । मनी वसे ॥255॥
म्हणून अर्जुना, वेदांच्या अर्थवादामधे मग्न झालेल्या त्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करत असते हे लक्षात ठेव.

त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वंद्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥2-45॥


अर्थहे अर्जुना, वेद त्रिगुणात्मक (संसाराचे) प्रतिपादन करणारे आहेत. तू त्रिगुणातीत हो, द्वंद्वरहित हो, नित्य सत्वगुणी हो, योगक्षेमरहित हो आणि आत्मनिष्ठ हो. आत्मसुखाला विसरू नकोस.

256-2
तिन्ही गुणी आवृत्त । हे वेद जाणे निभ्रांत । म्हणोनि उपनिषदादि समस्त । सात्विक ते ॥256॥
तू असे नि:संशय समज की वेद हे सत्व, रज व तम या त्रिगुणांनी व्याप्त आहेत. म्हणून त्यापैकी उपनिषदादी जे भाग आहेत ते केवळ सात्विक आहेत.
257-2
येर रजतमात्मक । जेथ निरुपिजे कर्मादिक । जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा ॥257॥
आणि अर्जुना केवळ स्वर्गसूचक अशा कर्मादिकांचे ज्यात निरूपण केलेले आहे ते बाकीचे वेदांचे भाग रज व तम या गुणांनी युक्त आहेत.
258-2
म्हणोनि तू जाण । हे सुखदुःखासीच कारण । एथ झणे अंतःकरण । रिगो देसी ॥258॥
म्हणून हे केवळ सुखदु:खाला कारण होणारे आहेत असे तू समज व त्यांचे ठिकाणी कदाचित तुझे मन जाईल तर ते जाऊ देऊ नकोस.
259-2
तू गुणत्रयाते अव्हेरी । मी माझे हे न करी । एक आत्मसुख अंतरी । विसंब झणी ॥259॥
तू तिन्ही गुण टाकून दे, मी माझेपण धरू नकोस. पण अंत:करणात फक्त एका आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस.

यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके ।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः॥2. 46॥


260-2
जरी वेदे बहुत बोलले । विविध भेद सूचिले । तर्‍ही आपण हित आपुले । तेचि घेपे ॥260॥
जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत. अनेक प्रकारचे साधन मार्ग सूचविले आहेत, तरी *आपण त्यातिल आपले हित ज्यात आहे तेच घ्यावे.


261-2
जैसा प्रगटलिया गभस्ती । अशेषही मार्ग दिसती । तरी तेतुलेही काय चालिजती । सांगे मज ॥261॥
जसे सूर्योदय झाला की, सर्वच रस्ते दिसू लागतात; म्हणून त्या सर्वच मार्गांनी आपण जाऊ शकतो काय ? सांग बरे मला.
262-2
का उदकमय सकळ । जर्‍ही जाहले असे महीतळ । तरी आपण घेपे केवळ । आर्तीचजोगे ॥262॥
अथवा, पृथ्वीच्या पाठीवर वाटेल तेवढे जरी पाणी असले, तरी आपण आपल्याला हवे तेवढे पाणी घेतो.
263-2
तैसे ज्ञानिये जे होती । ते वेदार्थाते विवरिती । मग अपेक्षित ते स्वीकारिती । शाश्वत जे ॥263॥
त्याप्रमाणेच जे ज्ञानी आहेत, (ते विचारवान मुमुक्षू आहेत). ते वेदार्थाचा विचार करतात आणि आपल्याला अपेक्षित अशा शाश्वत परब्रम्हतत्वाचाच फक्त स्विकार करतात.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥2. 47॥


भावार्थ :-
अर्जुना ! तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे. कर्मफळांचा अधिकारी तू कधी होऊ नकोस. कर्माच्या फळाची इच्छादेखील धारण करू नकोस आणि कर्म न करण्याविषयीही आग्रह धरू नकोस.
264-2
म्हणौनि आइके पार्था । याचिवरी पाहता । तुज उचित होय आता । स्वकर्म हे ॥264॥
म्हणून अर्जूना, ऐक. या सर्व गोष्टींचा विचार करून पाहिले, असता तूला आता स्वकर्मच करणे उचित (निश्चित फलप्रद)आहे.
265-2
आम्ही समस्तही विचारिले । तव ऐसेचि हे मना आले । जे न संडिजे तुवा आपुले । विहित कर्म ॥265॥
आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पहिला, त्यावेळी असे दृष्टिस आले की आपले विहीत कर्म आपण कधीही सोडू नये.


266-2
आम्ही समस्तही विचारिले । आणि कुकर्मी संगति न व्हावी । हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ॥266॥
मात्र हे (विहीत कर्म करताना) या कर्माचे फल मिळेल ही इच्छा ठेवू नये. आणि निषिद्ध कर्माचे आचरण होऊ नये. म्हणून या सत्कर्माचेच निष्काम वृत्तीने आचरण करावेस.

योगस्थ कुरू कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय ।
सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥2. 48॥


भावार्थ :-
हे धनंजया ! तू आसक्तीचा त्याग करून पूर्ण व अपूर्ण यामध्ये समान बुद्धी ठेऊन योगस्थ स्थितीने कर्मे कर. असा जो मनाचा समतोलपणा त्यालाच योग् म्हणतात.
267-2
तू योगयुक्त होऊनी । फळाचा संग सांडुनी । मग अर्जुना चित्त देऊनी । करी कर्मे ॥267॥
अर्जूना तू समतारुपी योगाने युक्त हो, फलाची इच्छा टाकून मन एकाग्र करून कर्मे कर.
268-2
परी आदरिले कर्म दैवे । जरी समाप्तीते पावे । तरी विशेषे तेथ तोषावे । हेही नको ॥268॥
आणि आरंभिलेले कर्म दैवयोगानेच यथासांग पूर्ण झाले. तरी त्याचा विशेष संतोष मानू नकोस.
269-2
का निमित्ते कोणे एके । ते सिद्धी न वचता ठाके । तरी तेथिचेनि अपरितोखे । क्षोभावे ना ॥269॥
किंवा कोणत्याही कारणाने ते कर्म सिद्धीस गेले नाही, अर्थवट राहिले, तरी त्याबद्दल मनात असंतोष मानू नकोस व मनाला त्रासहि करून घेऊ नकोस.
270-2
आचरता सिद्धी गेले । तरी काजाचि कीर आले । परी ठेलियाही सगुण जहाले । ऐसेचि मानी ॥270॥
कर्म करताना जर ते शेवटास गेले (सफल झाले) तर ते खरोखर आपल्या उपयोगाला आले; परंतू कदाचित काही विघ्ने येऊन जर कर्म अपुरे राहिले, तरीही ते सफलच झाले, असे समजावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


271-2
देखे जेतुलाले कर्म निपजे । तेतुले आदिपुरुषी जरी अर्पिजे । तरी परीपूर्ण सहजे । जहाले जाणे ॥271॥
कारण असे पाहा की, जेवढे म्हणुन आपल्या हातून कर्म होईल, ते सर्वच ईश्वरचरणी अर्पण केले, म्हणजे सहजच परिपूर्ण झाले, असे समज.
272-2
देखे संतासंती कर्मी । हे जे सरिसेपण मनोधर्मी । तेचि योगस्थिति उत्तमी । प्रशंसिजे ॥272॥
अर्जूना हे पाहा ! पूर्ण आणि अपूर्ण (किंवा चांगले – वाईट) कर्माविषयी (बाबतीत आपले मन) मनाचा समतोलपणा राखणे, हीच योगस्थिति होय. याच योग्यस्तिथीची प्रशंसा करतात.

दूरेण ह्यत्वरं कर्म बुद्धियोगाद्धनंजय ।
बुद्धौ शरणमन्विछ कृपणाः फलहेतवः ॥2. 49॥


भावार्थ :-
हे अर्जुना, निष्काम बुद्धियुक्त होऊन केलेल्या कर्मपेक्षा (फळाच्या इच्छेने) सकाम कर्म अत्यन्त निकृष्ट होय. तू समत्वबुद्धीचा आश्रय घे. फलाचा हेतू मनात ठेवून कर्म करणारे दीन होत.

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत्दुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलं ॥2. 50॥


भावार्थ :-
समत्वबुद्धियुक्त मनुष्य या लोकीच पुण्य व पाप या दोन्हीचा त्याग करतो. म्हणून समत्वबुद्धीयोग साध्य करून घेण्याचा प्रयत्न कर. कारण योग म्हणजे कर्माचे कौशल्य होय. (म्हणजेच प्रम्यात्म्याच्या चरणी कर्म अर्पण करणे)

273-2
अर्जुना समत्व चित्ताचे । तेचि सार जाण योगाचे । जेथ मना आणि बुद्धीचे । ऐक्य आथी ॥273॥
अर्जूना ! यशपयशी चित्ताची समता हे योगाचे सार आहे. या योगात मन (क्रिया)व बुद्धी (ज्ञान) यांचे ऐक्य असते. (म्हणजे मनाचा संकल्प, व बुद्धीचा निश्चय यात विरोध नसतो हे वैशिष्ट्य)
274-2
तो बुद्धियोग विवरिता । बहुते पाडे पार्था । दिसे हा अरुता । कर्मभागु ॥274॥
पार्था ! या बुद्धीयोगाची आणि कर्मयोगाची तुलना केली, तर अनेक प्रमानांनी सकाम कर्मयोग कमी प्रतीचा वाटतो.
275-2
परि तेचि कर्म आचरिजे । तरीच हा योगु पाविजे । जे कर्मशेष सहजे । योगस्थिति ॥275॥
परंतु सुरुवातीला तेच सकाम कर्म जेंव्हा करावे तेंव्हाच (पुढे) निष्काम कर्मयोगाची प्राप्ती होते. त्या कर्माचे (निरहंकार व निष्काम बुद्धीने आचरण केले तरच हा बुद्धीयोग साध्य होतो) या कर्माची (शेवटची अवस्था) उत्तरावस्था तीच योगस्थिती होय.

दिवस २२ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २५३ ते २६४
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. 253
बोलो अबोलणे मरोनिया जिणे । असोनि नसणे जने आम्हा ॥१॥
भोगी त्याग जाला संगीच असंग । तोडियेले लाग माग दोन्ही ॥२॥
तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा । पुसणे ते पुसा पांडुरंगा ॥३॥
अर्थ
आम्ही बोललो तरी आम्ही अबोलण्या सारखे आहे देह बुद्धीने जरी मेलो असलो पण आत्म बुद्धीने जिवंत आहोत. व देह भाव नष्ट झाला म्हणजे मी मेलो असलो तरी आत्म रूपाने जिवंत आहे. आम्ही विषय भोगाचा त्याग केला आहे आमच्या भोवताली जरी सर्वाचा संग असला तरी आम्ही असंग आहोत. आहो देह बुद्धीने जरी संसारात असलो तरी माझा आत्मा असंग आहे संगा मध्ये गुंतवणारी जी देह बुद्धी आहे ती आम्ही उरू दिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे जन हो मी तुम्हाला ज्या प्रमाणे दिसतो तसा मी नाही आणि तुम्हाला जाणवायचे असेल तर तुम्ही त्या हरीला विचारा.
अभंग क्र. 254
अधिकार तैसा दावियेला मार्ग । चालता हे मग कळो येते ॥१॥
जाळू नये नांव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥२॥
तुका म्हणे रोग वैद्याचे अंगी । नाही करी जगी उपकार ॥३॥
अर्थ
संतानी ज्याचा जसा अधिकार असेल तसा त्याला मार्ग दाखविला आहे त्या त्या मार्गाने तो गेला तर त्याला फायदाच होईल. नौकेच्या सहाय्याने आपण पैला तीरावर गेलो म्हणून काम झाले म्हणून त्या नौकेला जाळू नये करणे मागे ती नौका अनेक जनांच्या कामी येणार आहे म्हणजे आत्म स्वरूप समजले असता त्याचे आचरण करावे व जे अज्ञानी असतात त्याना मार्गदर्शन करावे. तुकाराम महाराज म्हणतात वैद्याच्या अंगी रोग नसतो पण तो इतरांचे रोग बरे करण्या करता औषधे जवळ बाळगतो.
अभंग क्र. 255
संसार तीही केला पाठमोरा । नाही द्रव्य दारा जया चित्ती ॥१॥
शुभाशुभ नाही हर्षामर्ष अंगी । जनार्दन जगी होउनि ठेला ॥२॥
तुका म्हणे देहे दिला एकसरे । जयासि दुसरे नाही मग ॥३॥
अर्थ
ज्याच्या चित्तात मनात द्रव्य संसार नसतो त्याने संसाराला पाठीमागे टाकले समजावे. चांगल्या वाईट गोष्टी शुभ अशुभ या विषयी आंनद खेद ज्याच्या मनात नसतो तो या जगात जनार्धन रूप होऊन राहिलेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात आपला देह देवाला अर्पण केला त्याला या जगाशी काहीही कर्तव्य नसते.
अभंग क्र. 256
देहबुद्धि वसे लोभ जया चित्ती । आपुले जाणती परावे जे ॥१॥
तयासि चालता पाहिजे सिदोरी । दुःख पावे करी असत्य तो ॥२॥
तुका म्हणे धर्म रक्षाया कारणे । छाया इच्छी उन्हे तापला तो ॥३॥
अर्थ
जो देह मीच आहे असे मानतो त्याच्या चित्त लोभ वसलेला असतो आणि जो “हा आपला तो परका” असे मानतो. त्याला या भू लोकात जन्म मृत्यूची वाटचाल करण्या करता पाप पुण्याची शिदोरी बरोबर घ्यावी लागते आणि तो जर सारखा सारखाअधर्मच करत राहिला तर त्याला दुखच प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात उन्हात तापलेल्या मनुष्याला जसे छाया मिळावी असे वाटते तसे तुम्ही धर्म रक्षण करण्या करता प्रयत्न करा.
अभंग क्र. 257
काळे खादला हा अवघा आकार । उत्पत्ती संहार घडामोडी ॥१॥
बीज तो अंकुर आच्छादिला पोटी । अनंता सेवटी एकाचिया ॥२॥
तुका म्हणे शब्दे व्यापिले आकाश । गुढार हे तैसे कळो नये ॥३॥
अर्थ
या जगाचा आकार काळाने खाल्लेला आहे त्यामुळे कधी प्रलय तर कधी उत्पत्ती हे चालू असतात. ज्याप्रमाणे बीजापासून अंकुराची उत्पत्ती होते आणि पुन्हा ते अंकुर बिजामाध्येच लय पावते त्याप्रमाणे या जगताचा निर्माता, तो हरी आहे व हे जगही त्याच्यातच सामावले जाते. तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे आकाशामध्ये सर्व शब्दच व्यापलेले आहेत हे गूढार म्हणजे रहस्य कसे बरे कळत नाही ? (शब्द म्हणजे नाम आहे आणि हे नामच सर्व आकाशात व्यापून उरलेले आहे व त्याच्या साह्याने हरीची प्राप्ती होते.
अभंग क्र. 258
आणीक या काळे न चले उपाय । धरावे ते पाय विठोबाचे ॥१॥
अवघेचि पुण्य असे तया पोटी । अवघिया तुटी होय पापा ॥धृपद॥
अवघे मोकळे अवघिया काळे । उद्धरती कुळे नरनारी ॥२॥
काळ वेळ नाही गर्भवासदुःखे । उच्चारिता मुखे नाम एक ॥३॥
तुका म्हणे काही न लगे सांडावे । सांगतसे भावे घेती तया ॥४॥
अर्थ
या कलियुगामध्ये जर आपल्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर दुसरा कोणताही उपाय चालत नाही फक्त एक विठोबाचे पाय चित्तात साठवून ठेवावे. या जगतामध्ये जे काही पुण्य आहे ते सर्व या विठ्ठलाच्या पायामध्ये चरणांमध्ये आहे आणि त्याच्यानाम चिंतनाने च पापाचा नाश होतो. या विठोबाचे नामचिंतन कोणत्याही काळात करता येते आणि जे कोणी नरनारी या विठोबाचे नाम चिंतन करतात त्यांची सर्व कुळे उद्धरली जातात. या विठोबाचे नाम चिंतन करण्यासाठी कोणताही वेळकाळ पाहण्याची गरज नसते पहावा लागत नाही विठोबाचे नाम एकदा जरी घेतले तरी गर्भवासादि दुखे नाहीशी होतात. तुकाराम महाराज म्हणतात हे हरिनाम घेण्याकरता कशाचाही त्याग करायचा नाही आणि जे हरीचे नाम अगदी श्रध्देने घेतात त्यांनाच मी या हरिनामाचे महत्व सांगतो.
अभंग क्र. 259
न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥१॥
ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणीक लोकासी हेचि सांगे ॥धृपद॥
विटंबो शरीर होत का विपत्ती । परि राहो चित्ती नारायण ॥२॥
तुका म्हणे नासिवंत हे सकळ । आठवे गोपाळ तेचि हित ॥३॥
अर्थ
मला खायला नाही मिळाले तरी चालेल, पोटी संतान नाही झाले तरी चालेल परंतु नारायणाने माझ्यावर सतत कृपा करत राहावी. असाच उपदेश सतत माझी वाणी मला करत असते व लोकांना देखील हेच सांगत असते. माझ्या शरीराची कितीही विटंबना होवो किंवा माझ्यावर कशीही विपत्ती येवाे तरी चालेल परंतु माझ्या चित्तामध्ये सतत नारायणच रहावे. तुकाराम महाराज म्हणतात अरे हे सर्वकाही नाशवंत आहे त्यामुळे तो सतत गोपाळाची चिंतन करत राहा यातच तुझे हित आहे.
अभंग क्र. 260
पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान । विलास मिष्टान्न करूनिया ॥१॥
शरीर रक्षावे हा धर्म बोलती । काय असे हाती तयाचिया ॥धृपद॥
क्षणभंगुर हे जाय न कळता । ग्रास गिळि सत्ता नाही हाती ॥२॥
कर्वतिली देहे कापियेले मांस । गेले वनवासा शुकादिक ॥३॥
तुका म्हणे राज्य करिता जनक । अग्नीमाजी एक पाव जळे ॥४॥
अर्थ
चांगले गोड-धोड अन्न खाऊन हे शरीर पुष्ट बनवावे असे तत्त्वज्ञान, अधम लोकांचे असते. शरीर रक्षण करावे हे असे त्यांचे म्हणणे असते परंतु शरीराचे रक्षण करणे हे त्यांच्या हातात असते काय ? हे शरीर क्षणातच लय पावेल आणि हातात आपण घेतलेला घास गिळू असेसुद्धा आपण म्हणु शकत नाही कारण तेवढी सत्ता ही आपल्या हातात नाही. असे महान मुनि आहेत की ज्यांनी या देवा करतात आपल्या शरीरावर करवत चालविले आहे उदाहरणार्थ (शिबी राजा) आणि शुकमुनि तर या देहाविषयी उदास होऊन वनात राहण्यास गेले. तुकाराम महाराज म्हणतात जनक राजा राज्य करत असताना त्याचा एक पाय अग्नीत जळत होता परंतु त्याचा त्याच्या शरीराकडे लक्ष देखील नव्हते इतका तो हरिचिंतनात रममाण झालेला होता.
अभंग क्र. 261
जरी माझी कोणी कापितील मान । तरी नको आन वदो जिव्हे ॥१॥
सकळा इंद्रिया हे माझी विनंती । नका होऊ परती पांडुरंगा ॥धृपद॥
आणिकाची मात नाइकावी कानी । आणीक नयनी न पाहावे ॥२॥
चित्ता तुवा पायी रहावे अखंडित । होउनी निश्चिंत एकविध ॥३॥
चला पाय हात हेचि काम करा । माझ्या नमस्कारा विठोबासी ॥४॥
तुका म्हणे तुम्हा भय काय करी । आमुचा कैवारी नारायण ॥५॥
अर्थ
हे जिव्हे पांडुरंगा वाचून दुसरे कोणतीही नाम घेण्यासाठी कोणीही मला जबरदस्ती केली किंवा माझी मान जरी कापली तरी तू पांडुरंगा वाचून दुसरे काहिहि उच्चार करू नकोस. सर्व इंदियांना माझी विनंती आहे कि तुम्ही पांडुरंगाविषयी विन्मुख होऊ नका. माझ्या कानांनी या हरिनामा वाचूनच दुसरे काहीही ऐकू नये व माझ्या डोळ्यांनीही या पांडुरंग वाचून दुसरे काहिहि पाहू नये. हे माझ्या “चित्ता” तू सर्व काही चिंता टाकून एकविध मनाने एकनिष्ठ भावनेने या पांडुरंगाच्या चरणी अखंड राहा. हे माझ्या पायानो तुम्ही या विठोबाकडे चालत राहा आणि हे माझ्या हातांना तुम्ही या विठोबाला कायमस्वरूपी नमस्कार करत राहा. तुकाराम महाराज म्हणतात मग तुम्हाला कसलेही भय काय करणार आहे कारण आमचा कैवारी नारायण आहे.
अभंग क्र. 262
करिसी ते देवा करी माझे सुखे । परी मी त्यासी मुखे न म्हणे संत ॥१॥
जया राज्य द्रव्य करणे उपार्जना । वश दंभमाना इच्छे जाले ॥धृपद॥
जगदेव परी निवडीन निराळे । ज्ञानाचे आंधळे भारवाही ॥२॥
तुका म्हणे भय न धरी मानसी । ऐसियाचे विशी करिता दंड ॥३॥
अर्थ
हे देवा तुला माझे काय करायचे असेल ते कर पण माझ्या मुखाने मी त्यांना संत म्हणणार नाही. जे लोक राज्य द्रव्य इत्यादी विषयी हाव धरतात इत्यादी विषयी मिळावेत यासाठी प्रयत्न करतात आणि जे लोकं दांभिक आहेत त्यांना आपल्याला लोकांमध्ये मान सन्मान मिळावा असे वाटते अशा लोकांना मी संत म्हणणार नाही. देव जरी सर्व जगामध्ये भरलेला आहे असे असेल तरीदेखील सुद्धा मी अशा लोकांना निवडून वेगळेच काढिन कारण हे लोक यांना ब्रम्‍हज्ञानाचा काहीही अनुभव नाही तरी फक्त शब्द ज्ञानाचे भार वाहणारे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात अशा दांभिक लोकांना दंड करण्याविषयी मी माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे भय धरणार नाही.
अभंग क्र. 263
म्हणविती ऐसे आइकतो संत । न देखीजे होत डोळा कोणी ॥१॥
ऐसियांचा कोण मानिते विश्वास । निवडे तो रस घाईडाई ॥धृपद॥
पर्जन्याचे काळी वोहाळाचे नद । ओसरता बुंद न थारेचि ॥२॥
हिऱ्याऐशा गारा दिसती दूरोन । तुका म्हणे घन न भेटे तो ॥३॥
अर्थ
असे कित्येक लोक आहेत की जे स्वतःला दुसऱ्याकडून त्यांना स्वतःला संत म्हणवून घेतात परंतु मी माझ्या डोळ्यांनी आज पर्यंत असे संत पाहिले नाही. अशांचा कोण विश्‍वास ठेवतो जगाच्या सुखदुःखांमध्ये घावाडवा मध्ये ज्याची शांती ढळत नाही तोच खरा संत ओळखला जातो. जसे पर्जन्य कालामध्ये एखाद्या ओहोळांमध्ये नदीप्रमाणे पाणी वाहते म्हणजे ते ओहळ नदी आहे काय तर नाही पर्जन्य संपले की त्या ओहाळा मध्येही थेंब पाणी सुद्धा राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात गारगोटीला दुरून जर पाहिले तर अगदी हिर्‍याप्रमाणे दिसते परंतु कुठपर्यंत दिसते तर जोपर्यंत त्याची आणि घनाची भेट होत नाही तोपर्यंत म्हणजे कठीण प्रसंगी संत कोणते खरे आहेत हे लक्षात येते.
अभंग क्र. 264
अतिवाद लावी । एक बोट सोंग दावी ॥१॥
त्याचा बहुरूपी नट । नव्हे वैष्णव तो चाट ॥धृपद॥
प्रतिपादी वाळी । एक पुजी एका छळी ॥२॥
तुका म्हणे नाही । भूतदया ज्याचे ठायी ॥३॥
अर्थ
काही लोक कपाळाला गोपीचंदन लावतात आणि ते स्वतः वैष्णव आहेत असे सोंग आणत असतात, त्याचा वेष हा बहुरूपी नटाप्रमाणे असतो कारण तो खरा वैष्णव नसून खोटारडा असतो. तो एकचि स्तुती करतो तर दुसऱ्याचा तिरस्कार करतो एकाची पूजा करतो तर दुसऱ्याला छळतो. तुकाराम महाराज म्हणतात भूतदया ज्याच्या ठिकाणी असते तोच खरा वैष्णव आहे.

जानेवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading