आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२० जानेवारी, दिवस २०, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा, ओवी २०१ ते २२५, सार्थ तुकाराम गाथा अभंग २२९ ते २४०
“२० जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 20 January
राम कृष्ण हरी आज दिनांक २० जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
201-2
म्हणोनि स्वधर्म हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील । आणि अपेश ते न वचेल । कल्पांतावरी ॥201॥
(एवढ्याच करीता अर्जुना आपला धर्म टाकू नको)
म्हणून स्वधर्मचा त्याग करशील, तर निश्चितच पापाला पात्र होशील, आणि कल्पांतपर्यंत (योगानुयुगे) अपकीर्तिचा डाग नाहिसा होणार नाही.
202-2
जाणतेनि तवचि जियावे । जव अपकीर्ति आंगा न पवे । आणि सांग पा केवी निगावे । एथ ोनिया ॥202॥
अपकीर्ति जोपर्यंत अंगाला स्पर्श करीत नाही, तोपर्यंतच शहाण्याने (व्यवहारी आणि सज्जनांनी) जगावे; असे असताना तू सांग, की युद्धातून कसे बरे निघून जावे ?
203-2
तू निर्मत्सरु सदयता । येथूनि निघसी कीर माघौता । परी ते गति समस्ता । न मनेल यया ॥203॥
तू मत्सररहित (कौरवांनी दिलेला त्रास त्याबद्दल आलेला राग विसरून) दयायूक्त (आप्तजना बद्दल मायेमुळे निर्माण झालेले प्रेम) अंतःकरणाने रणागणातून परत फिरशील. पण (तू कशामुळे माघारी फिरत आहेस) ही भूमिका सर्वाना कळणार नाही.
204-2
हे चहूकडून वेढितील । बाणवरी घेतील । तेथ पार्था न सुटिजेल । कृपाळुपणे ॥204॥
हे कौरव तुला चोहोबाजुंनी घेरतील व तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. पार्था ! तुझा या दयाळूूपणामुळे तूझी सुटका होणार नाही.
205-2
ऐसेनिही प्राणसंकटे । जरी विपाये पा निघणे घटे । तरी ते जियालेही वोखटे । मरणाहुनी ॥205॥
आणि जरी (मोठ्याकष्टाने) कदाचित तुझी या प्राणसंकटातून तूझी सुटका झाली, तरी ते तसे जगणे मरणापेक्षा वाईटच आहे.
भयाद् रणादुपरं मंस्यते त्वां महारथाः ।
येषां त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥2. 35॥
भावार्थ :-
हे सर्व महारथी, रणागणातून तू भयामुळे परत गेलास (पळून गेलास) असे मानतील. ज्यांना तुझ्याविषयी अभिमान वाटत होता, ते तुला तुच्छ मानतील.
206-2
तू आणिकही एक न विचारिसी । एथ संभ्रमे झुंजो आलासी । आणि सकणवपणे निघालासी । मागुता जरी ॥206॥
तू आणखी एक गोष्टीचा विचार करत नाहीस; तू या ठिकाणी मोठय़ा उत्साहाने लढण्यासाठी (आत्मविश्वासाने) आलास. आणि जर दया उत्पन्न झाल्याने परत माघारी फिरलास;
207-2
तरी तुझे ते अर्जुना । या वैरिया दुर्जना । का प्रत्यया येईल मना । सांगे मज ॥207॥
तर हे अर्जुना ! हे तुझे दयाळूपण, या दुष्ट वैऱ्यांच्या (कौरवांच्या) मनाला समजेल काय (कौरवांना खरे वाटेल काय) ? सांग बरे मला.
अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यंति तवाहिताः ।
निंदंतस्तव सामर्थ्य ततो दुःखतरं नु किम् ॥2. 36॥
भावार्थ :-
तुझे शत्रू तुला अनेक अपशब्द बोलतील. तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील. (सामर्थ्यवाण पुरुषाला निंदा ही मारणापेक्षा जास्त वाईट आहे. ) याहून अधिक दुःख कोणते ?
208-2
हे म्हणतील गेला रे गेला । अर्जुन आम्हा बिहाला । हा सांगे बोलु उरला । निका कायी ॥208॥
हे कौरव म्हणतील, ” हा पळाला रे पळाला ” ! अर्जुन आम्हाला भिऊन युद्ध सोडून पळून गेला ” . असा दोष सदैव तुझ्यावर राहिला, तर ते चांगले आहे का ? तूच सांग.
209-2
लोक सायासे करूनि बहुते । का वेचिती आपुली जीविते । परी वाढविती कीर्तीते । धनुर्धरा ॥209॥
लोक अनेक प्रकारचे कष्ट करतात किंवा प्रसंगी आपला प्राणही गमावतात; पण, हे धनुर्धरा, आपली किर्ती वाढवितात.
210-2
ते तुज अनायसे । अनकळित जोडिली असे । हे अद्वितीय जैसे । गगन आहे ॥210॥
ती कीर्ती तुला (आपोआप) अनायासे लाभलेली आहे. आकाश हे ज्याप्रमाणे अद्वितीय आहे;
211-2
तैसी कीर्ती निःसीम । तुझा ठायी निरुपम । तुझे गुण उत्तम । तिही लोकी ॥211॥
त्याप्रमाणे अमर्याद व उपमारहित अशी तुझी किर्ती आहे. त्रैलोक्यात तुझ्या गुणांची प्रसिद्धी आहे.
212-2
दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणिती । जे ऐकिलिया दचकती । कृतांतादिक ॥212॥
दाही दिशांचे राजे रजवाडे, भाट (स्तुतिपाठक) होऊन तुझ्या गुणांचे वर्णन गातात. ती ऐकून यमादिक देखिल दचकतात.
213-2
ऐसा महिमा घनवट । गंगा तैसी चोखट । जया देखी जगी सुभट । वांठ जाहली ॥213॥
अशी तुझी किर्ती असून, ती गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ व पवित्र आहे. आणि ती पाहून, ऐकून जगातील मी मी म्हणणारे योद्धां पण चकित होतात. त्यांना ज्ञानसंपादन करण्याची प्रेरणा मिळते. (मार्गदर्शन लाभते)
214-2
ते पौरुष तुझे अद्भुत । आइकोनिया हे समस्त । जाहले आथि विरक्त । जीवितेसी ॥214॥
असा तूझा अपूर्व शौर्याचा महिमा ऐकून, हे सर्व कौरव आपल्या जीविताची आशा सोडली आहे.
215-2
जैसा सिंहाचिया हाका । युगांतु होय मदमुखा । तैसा कौरवा अशेखा । धाकु तुझा ॥215॥
ज्या प्रमाणे सिंहाची गर्जना ऐकून उन्मत्त हत्तीला ही प्रलयकाळच जवळ आला आहे, असे वाटते. त्याप्रमाणे या कौरवांना तूझा धाक बसला आहे.
216-2
जैसे पर्वत वज्राते । ना तरी सर्प गरुडाते । तैसा अर्जुना हे तूते । मानिती सदा ॥216॥
ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरूडाला (भीतीच्या भावना) समजतात, त्याप्रमाणे (अर्जुना)हे कौरव सैन्य तुला घाबरतात.
217-2
ते अगाधपण जाईल । मग हिणावो अंगा येईल । जरी मागुता निघसील । न झुंजतचि ॥217॥
(असे असून सुद्धा) जर तू युद्ध न करता माघारी फिरशील; तर ही तूझी (मिळवलेली, अनायासे प्राप्त झालेली) किर्ती नाहीशी होईल, आणि मग तूझ्या अंगी हीनत्व प्राप्त होईल.
218-2
आणि हे पळता पळो नेदिती । धरूनि अवकळा करिती । न गणित कुटी बोलती । आइकता तुज ॥218॥
बरे ! (विचार करून किंवा यांच्या प्रेमापोटी) पळून जाऊ लागलास, तरी हे कौरव तुला पळून जाऊ देणार नाहीत. तूला पकडून तुझी (कारण न जाणता) फजिती करतील आणि तूझ्यासमोर (तोंडावर) तूझी अमर्याद निंदा करतील.
219-2
मग ते वेळी हिये फुटावे । आता लाठेपणे का न झुंजावे । हे जिंतले तरी भोगावे । पृथ्वीतल ॥219॥
ते (मर्मभेदक शब्द, ) निंदेचे शब्द ऐकून, मग तुझे अंतःकरण विदीर्ण होईल. त्यापेक्षा आत्ताच शौर्याने का बरे लढत नाहीस ? आणि जर तू यांना (कौरवांना) जिंकलेस, तर पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेशील.
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्षसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥2. 37॥
भावार्थ :-
हे कौंतेय ! ! जर या युद्धात मारला गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील; अथवा विजय प्राप्त झाला, तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून (हे अर्जुना) दृढ निश्चयाने युध्दासाठी उभा राहा.
220-2
ना तरी रणी एथ । झुंजता वेचले जीवित । तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥220॥
अथवा ह्या रणांगणावर युद्ध करताना तुझे प्राण खर्ची पडले; तर स्वर्गातील सुख तुला त्रासावाचून प्राप्त होईल.
221-2
म्हणोनि ये गोठी । विचारु न करी किरिटी । आता धनुष्य घेऊनि उठी । झुंजे वेगी ॥221॥
म्हणून हे अर्जुना ! युद्ध करावे अथवा करू नये, या गोष्टीचा विचार करत बसू नकोस, तर ऊठ हातात धनुष्य घेऊन लवकर युद्धास सुरुवात कर.
222-2
देखे स्वधर्मु हा आचरता । दोषु नासे असता । तुज भ्रांति हे कवण चित्ता । एथ पातकाची ॥222॥
असे पाहा की, या स्वधर्माचे आचरण केले असता सर्व पातके नष्ट होतात. असे असताना युद्धामुळे तुला पातक लागेल हा समज तूझ्या मनात कसा निर्माण झाला ?
223-2
सांगे प्लवेचि काय बुडिजे । का मार्गी जाता आडळिजे । परी विपाये चालो नेणिजे । तरी तेही घडे ॥223॥
तुच सांग अर्जुना, नावेत बसून जाणारा कोणी बुडेल का ? किंवा चांगल्या रस्त्यावरून चालताना ठेच लागेल का ? पण, जर नीट चालता येत नसेल तर होईल ही तसे.
224-2
अमृते तरीचि मरीजे । जरी विखेसी सेवीजे । तैसा स्वधर्मे दोषु पाविजे । हेतुकपणे ॥224॥
अमृतासमान असणाऱ्या गोष्टी विषासह सेवन केल्या, (दूध पिल्याने मृत्यू होणार नाही, पण दूधात विषाचे ही सेवन झाले तर मृत्यू येईल) तर मृत्यू प्राप्त होतो. त्याचप्रमाणे, स्वधर्माचे फलाच्या अपेक्षेने आचरण केल्याने दोष मात्र लागतील.
225-2
म्हणोनि तुज पार्था । हेतु सांडोनि सर्वथा । क्षात्रवृत्ती झुंजता । पाप नाही ॥225॥
म्हणून हे अर्जुना ! सर्व प्रकारे फळाची आशा सोडून क्षत्रिय धर्माने युद्ध कर, म्हणजे तुला मुळीच पाप (पातकाचा लेशहि तुला) लागणार नाही.
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥2. 38॥
भावार्थ :-
सुखदुःख, लाभऱ्हानी, जय-पराजय, याना समान मानून तू युद्धाला तयार हो, म्हणजे तुला पाप लागणार नाही.
दिवस २० वा, २० जानेवारी
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २२९ ते २४०
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 229
मी दास तयाचा जया चाड नाही । सुख दुःख दोहाविरहित जो ॥१॥
राहिलासे उभा भिवरेच्या तीरी । कट दोही करी धरोनिया ॥धृपद॥
नवल काई तरी पाचारिता पावे । न त्वरित धावे भक्तीकाजे ॥२॥
सर्व भार माझा त्यासी आहे चिंता । तोचि माझा दाता स्वहिताचा ॥३॥
तुका म्हणे त्यास गाईन मी गीती । आणीक ते चित्ती न धरी काही ॥४॥
अर्थ
मी त्याचा दास झालो आहे ज्याला कसलीही इच्छा नाही सुख व दुख या दोन्हीच्या पलीकडे आहे अशाचा मी दास झालो म्हणजे देवाचा. असा तो देव भिवरे च्या तीरी कमरेवर हात ठेऊन उभा आहे. आहो हा देव हाक मारली कि लगेच धावतो आणि भक्तांचे कार्य करण्या करिता तो त्वरेने येतो. माझा सर्व भार त्याच्या वर आहे व माझी सर्व चिंताही तोच करतो व तोच माझ्या स्वहिताचा विचार करणारा आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी त्याच विठोबाचे गीत माझ्या मुखाने गाईन व त्या वाचून दुसरे काही चित्तात येऊ देणार नाही.
अभंग क्र. 230
यासी कोणी म्हणे निंदेची उत्तरे । नागवला खरे तोचि एक ॥१॥
आड वाटे जाता लावी नीट सोई । धर्मनीत ते ही ऐसी आहे ॥धृपद॥
नाइकता सुखे करावे ताडण । पाप नाही पुण्य असे फार ॥२॥
जन्म व्याधि फार चुकतील दुःखे । खंडावा हा सुखे मान त्याचा ॥३॥
तुका म्हणे निंब दिधल्यावाचून । अंतरीचा शीण कैसा जाय ॥४॥
अर्थ
मी जे काही बोलणार आहे याला कोणी जर निंदेचे भाषण म्हंटले तर तो फसला जाईल. कोणी जर अधार्मा कडे जात असला त्याला निट सोईला लावणे हि धर्म नीती आहे. व आपण जर चांगले सांगत असतांना कोणी ऐकले नाही तर त्याच्याशी सुखाने भांडावे व त्याला मारही द्यावा यात कसलेही पाप नसून उलट आधी पुण्याच आहे जर आपण असे केले तर त्याची जन्म व्याधी व दुखे यातून खंडन होईल म्हणून त्याची मान खंडना सुखाने करावी. तुकाराम महाराज म्हणतात कडू लिंबासारखे कडू औषध असल्याशिवाय त्याचा ताप कसा जाईल दुर्जनालाही शिक्षा केल्याशिवाय तो कसा नीट होईल ?
अभंग क्र. 231
निवडे जेवण सेवटीच्या घासे । होय त्याच्या ऐसे सकळ ही ॥१॥
न पाहिजे झाला बुद्धीचा पालट । केली खटपट जाय वाया ॥धृपद॥
संपादिले व्हावे धरिले ते सोंग । विटंबणा व्यंग पडियाली ॥२॥
तुका म्हणे वर्म नेणता जे रांधी । पाववी ते बुद्धी अवकळा ॥३॥
अर्थ
एखाद्या गोष्टीचे मर्म जाणणे किती अवश्यक आहे हे सांगण्या साठी महाराज म्हणतात संपूर्ण जेवण झाले आणि शेवटचा घास जर गोड लागला तर जेवण चांगले लागते. आपली सद्बुद्धी हिचा पालट कधीही होऊ देवू नये कारण असे झाल्यास सर्व खटपट व्यर्थ ठरते. जे सत्कार्य हाती घेतले ते सत्कार्य पूर्ण पणे तडीस नेले पाहिजे नाही तर फजिती होते. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्याला जर स्वयंपाक येत नसेल आणि त्याने जर स्वयंपाक करण्याचा शहाण पण केला तर त्याची शेवटी फजित होते त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे मर्म हे माहित पाहिजे.
अभंग क्र. 232
दिली हाक मने नव्हे ती जतन । वेगाळले गुणे धाव घेती ॥१॥
काम क्रोध मद मत्सर अहंकार । निंदा हिंसा फार माया तृष्णा ॥धृपद॥
इंद्रियांचे भार फिरतील चोर । खाणे घ्यावया घर फोडू पाहे ॥२॥
माझा येथे काही न चले पराक्रम । आहे त्याचे वर्म तुझे हाती ॥३॥
तुका म्हणे आता करितो उपाय । जेणे तुझे पाय आतुडती ॥४॥
अर्थ
देवा तुला हाक देण्याचे कारण म्हणजे मनाने हरी चिंतन हरी जतन होत नाही मन ज्या गुणाने भरलेले आहे वृत्ती त्याच दिशेने धावा घेते. हे देवा माझ्या मना मध्ये काम क्रोध मद मत्सर अहंकार निंदा हिंसा माया तृष्ण फार बळावले आहेत. इंद्रिय रुपी चोर हे देह रूपातील घर फोडू पाहत आहे व जे काही परमार्थरूप धन येथे आहे ते धन चोरून नेण्यास हे चोर फिरत आहे. हे देवा या ठिकाणी माझे काहीही पराक्रम चालत नाही याचे वर्म तुझ्या हातात आहे हे मला माहित आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता मी तोच उपाय करणार आहे जेणे तुझे या पायाचे दर्शन घडेल.
अभंग क्र. 233
कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥
कृष्ण माझा गुरू कृष्ण माझे तारू । उतरी पैल पारू भवनदीचा ॥धृपद॥
कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥२॥
तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥३॥
अर्थ
कृष्ण माझी माता पिता बहिण बंधू चुलता आहे. कृष्ण माझा गुरु तारू आणि भाव नदीच्या पलीकडे नेणारी नौका कृष्णच आहे. कृष्ण माझे मन आहे कृष्ण माझे जन आहे कृष्ण माझा सोईरा सज्जन आहे. तुकाराम महाराज म्हणतात कृष्ण माझा विसावा म्हणजे विश्रांतीचे ठिकाण आहे व याला माझ्या पासून वेगळे करावे असे मला वाटत नाही.
अभंग क्र. 234
जातो वाराणसी । निरवी गाई घोडे म्हैसी ॥१॥
गेलो येतो नाही ऐसा । सत्य मानावा रे भरवसा ॥धृपद॥
नका काढू माझी पेवे । तुम्ही वरळा भूस खावे ॥२॥
भिकारियाचे पाठी । तुम्ही घेउनि लागा काठी ॥३॥
सांगाल जेवाया ब्राम्हण । तरी कापाल माझी मान ॥४॥
वोकलिया वोका । म्या खर्चिला नाही रुका ॥५॥
तुम्ही खावे ताकपाणी । जतन करा माझे लोणी ॥६॥
नाही माझे मनी । पोरे रांडा नागवणी ॥७॥
तुका म्हणे नष्ट । होते तैसे बोले स्पष्ट ॥८॥
अर्थ
एखादा मनुष्य काशीस निघाला आणि तो घरच्यांना सांगतो कि माझे गाई घोडे म्हैसी सांभाळा. असे म्हणून तो म्हणतो कि तुम्ही काळजी करू नका मी असा जातो आणि असा येतो काळजी करू नका. अरे माझ्या पेवेतील धान्य खाण्या करिता काढू नका तुम्ही भुसा मिश्रित फोलपट खावे. जर कोणी भिक मागण्या साठी भिकारी दारात आला तर तुम्ही त्याच्या मागे काठी घेऊन लागा व त्याला हाकलून द्या. तुम्ही जर जेवणा साठी एखादा ब्राम्हण घरी बोलावला तर तुम्हाला माझी मान कापल्याचे पाप लागेल. अरे मला कधी ओकारी आली तरी मी त्याच्या साठी कधी एक रुपयाही खर्च केला नाही. तुम्ही पातळ पाण्या सारखे जे दही ताक आहे ते घ्या पण माझे लोणी जतन करा. माझ्या मनात बायका पोरे या विषयी प्रेमच नाही कारण ते मला लुटणारी आहे. तुकाराम महाराज म्हणतात असा हा माणूस जे मनात येईल ते स्पष्ट बोलतो मग तो जरी बाहेर (काशीस) गेला तरी देवा कडे काय लक्ष असणार ?
अभंग क्र. 235
कास घालोनी बळकट । झालो कळिकाळावरी नीट । केली पायवाट । भवसिंधूवरूनि ॥१॥
या रे या रे लाहान थोर । याति भलते नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥धृपद॥
कामी गुंतले रिकामे । जपी तपी येथे जमे । लाविले दमामे । मुक्ता आणि मुमुक्षा ॥२॥
एकंदर शिक्का । पाठविला इहलोका । आलो म्हणे तुका । मी नामाचा धारक ॥३॥
अर्थ
मी कास बळकट करून काळीकाळाशीही लढण्या करिता पाय वाट बळकट केले आहे मी. आहो लहान मोठे भलत्या जातीचे पुरुष स्त्रिया या हो या येथे कोणाचाही विचार करायला नको. आहो येथे कामात गुंतलेले जपी तपी मुक्त झालेले मोक्षाची वाट पाहणारे सगळे या सर्वाना समजण्या साठी दमामे नौबती लावले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात हरिनामाचा शिक्का या इहलोक मध्ये सरसकट पाठविला आहे आणि हेच सांगण्यासाठी मी नामाचा धारक येथे आलो आहे.
अभंग क्र. 236
आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावे वर्ताया ॥१॥
झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥धृपद॥
अर्थे लोपली पुराणे । नाश केला शब्दज्ञाने । विषयलोभी मन । साधन हे बुडविली ॥२॥
पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जय जयकार आनंदे ॥३॥
अर्थ
आहो आम्ही वैकुंठाचे वासी आहोत परंतु आम्ही या भूतलावर पुराणातीला ऋषी मुनींनी जे वचन सांगितलेले आहेत भक्ती आचरण कसे करावे त्याचे प्रत्येक्ष अचारण करून दाखविणे यासाठी आलो आहोत. संतांचे मार्ग आम्ही झाडू अज्ञानरूपी जे जंगल आहे आम्ही ते साफ करू संतांचे उच्छिष्ट जे राहील ते आम्ही अतिशय आदराने सेवन ग्रहण करू. पुराणात जे अर्थे सांगितले आहेत त्याचा या शब्द ज्ञानी लोकांनी नाश केला आहे विषय लोभी झालेले माणसांनी पारमार्थिक साधने नष्ट केली आहेत. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भक्तीचा डांगोरा पिटू व त्यामुळे काळी काळास हि दरारा सुटतो व या कारण मुळे च हरी नामाचा आंनदाने जयजय कर करा.
अभंग क्र. 237
बळियाचे अंकित । आम्ही झालो बळिवंत ॥१॥
लाथाळीता संसारा । केला षड ऊर्मीचा मारा ॥धृपद॥
जन धन तन । केले तृणाही समान ॥२॥
तुका म्हणे आता । आम्ही मुक्तीचिया माथा ॥३॥
अर्थ
सर्व जगात जो स्वामी बळीवंत आहे त्याचे आम्ही अंकित झालो त्यामुळे आम्हीही बळीवंत झालो आहोत. त्यामुळे आम्ही या संसाराला लाथ मारून सहा उर्मींचा नाश केला आहे. जन धन व तन या सर्वाना आम्ही तृण म्हणजे कसपटा समान मानले आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता तर आम्ही मुक्तीच्याही माथ्यावर बसलो आहोत.
अभंग क्र. 238
मृत्युलोकी आम्हा आवडती परी । नाही एका हरीनामे विण ॥१॥
विटले हे चित्त प्रपंचापासूनि । वमन ते मनी बैसलेसे ॥धृपद॥
सोने रूपे आम्हा मृत्तिके समान । माणिके पाषाण खडे जैसे ॥२॥
तुका म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरी आम्हापुढे ॥३॥
अर्थ
हे मृत्यु लोक आम्हाला आवडते पण या मृत्यु लोकात हरी नामावाचुंन दुसरे काहीही आम्हाला आवडत नाही. आता आमचे चित्त प्रपंचा पासून विटले (ओकलेल्या अन्ना प्रमाणे) आहे मणि फक्त हरिनाम आहे. सोने रुपे आम्हाला माती प्रमाने तर माणिक हीरे आम्हाला हे दगडा प्रमाणे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात ज्या सुंदर नारी आहेत त्या आम्हाला अस्वाला प्रमाणे दिसतात.
अभंग क्र. 239
स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥
नाठवे हा देव न घडे भजन । लांचावले मन आवरे ना ॥धृपद॥
दृष्टिमुखे मरण इंद्रियाच्या द्वारे । लावण्य ते खरे दुःखमूळ ॥२॥
तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु । परी पावे बाधू संघष्टणे ॥३॥
अर्थ
महाराज म्हणतात देवा मला स्त्रियांचा संग नको आहे मग त्या लाकडी किंवा पाषाण मातीच्या असतील तरी नको. कारण त्यांच्या मुळे देवाचे भजन व देव हि आठवत नाही, कारण मन हे त्यांच्या ठिकाणी लांचावलेले असते त्यामुळे ते आवरत नाही. आहो दृष्टीने त्यांच्या कडे पहिले तरी मरण ओढवते व त्यांचे लावण्या हे खरे दु:खाचे मुळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात अग्नी हा उपकरी असला तरी पण त्याच्याशी संबंध आला कि तो आपल्यालाही बाधतो म्हणजे नष्ट करतो.
अभंग क्र. 240
पराविया नारी रखुमाईसमान । हे गेले नेमून ठायीचेचि ॥१॥
जाई वो तू माते न करी सायास । आम्ही विष्णुदास तैसे नव्हो ॥धृपद॥
न साहावे मज तुझे हे पतन । नको हे वचन दुष्ट वदो ॥२॥
तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे झाले ॥३॥
अर्थ
परनारी हि रखुमाई समान मानल्याने काही वाईट आहे काय ? एका बाईला उद्देशून महाराज म्हणतात कि हे माते तू येथून जा आम्ही विष्णु दास आहोत आम्ही तुला जसे वाटतो आहोत आम्ही तसे नाही. तुझे हे चाललेले पतन मला सहन होत नाही तू दुष्ट वचन वदत जाऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात अरे तुला पती पाहिजेच असेल तर या जगात पुरुष भरपुर आहेत.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















