आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१९ जानेवारी, दिवस १९, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा, ओवी १७६ ते २००, सार्थ तुकाराम गाथा अभंग २१७ ते २२८
“१९ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 19 January
राम कृष्ण हरी आज दिनांक १९ जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
176-2
तैसिया योगीश्वरांचिया मती । मिळणीसवे एकवटती । परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना ॥176॥
त्या प्रमाणे थोर योगीश्वरांची बुद्धी आत्मसाक्षात्काराने तद्रूप होते. मग ते योगी पुनः विचार करूनदेखील देहबोधावर (संसारात किंवा देहादि मायाजालात) येत नाहीत.
देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥2. 30॥
भावार्थ :-
हे अर्जुना, सर्वाच्या देहामध्ये असणारा हा आत्मा सर्वदा अमर आहे; म्हणून तू कोणत्याही प्राणिमात्राबद्दल शोक करू नकोस.
177-2
जे सर्वत्र सर्वही देही । जया करिताही घातु नाही । ते विश्वात्मक तू पाही । चैतन्य एक ॥177॥
अर्जुना, जे सर्वत्र, सर्वच देहा मध्ये आहे, कोणत्याही प्रयत्नाने त्याचा घात(नाश) होत नाही, ते चैत्यन्य विश्वामध्ये सम प्रमाणात भरलेले आहे, हे तू लक्षात घे.
178-2
याचेनिचि स्वभावे । हे होत जात आघवे । तरी सांग काय शोचावे । एथ तुवा ॥178॥
हे सर्व जग विश्वचैतन्याच्या सत्येने (मर्जीने) उत्पन्न होते आणि नाहीसे होते, तर मग तू का म्हणून शोक करावास ? ते सांग.
179-2
एर्हवी तरी पार्था । तुज का नेणो न मने चित्ता । परी किडाळ हे शोचिता । बहुती परी ॥179॥
अर्जुना, विचार करून पाहिले तर तूझ्या मनाला (आत्म्याच्या अमर तत्वाचा) विचार का पटत नाही, ते मलाही कळत नाही. परंतू या गोष्टीचा शोक करणे हे विविध प्रकाराने वाईट आहे, हे सिद्ध होते.
स्वधर्मपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते ॥2. 31॥
भावार्थ :-
आणि स्वधर्माचा विचार केला, तर या युद्धापासून परावृत्त होणे तुला योग्य नाही. (व्याकुळ होणे). कारण क्षेत्रीयांला कर्तव्यप्राप्त (धर्मयुद्धा) युद्धाशिवाय दुसरे कोणतेही कल्याणाचे साधन नाही.
180-2
तू अझुनि का न विचारिसी । काय हे चिंतितु आहासी । स्वधर्मु तो विसरलासी । तरावे जेणे ॥180॥
तू अजून (ह्याचा) का बरे विचार करत नाहीस ? काय हे मनात घेऊन बसला आहेस ? या भवसागरातून तारून नेणारा (आपला धर्म) स्वधर्म तू का विसरला आहेस ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
181-2
या कौरवा भलते जाहले । अथवा तुजचि काही पातले । की युगचि हे बुडाले । जर्ही एथ ॥181॥
या कौरवाचे वाटेल ते झाले, किंवा युद्ध करताना तुझ्यावरच काही संकट आले अथवा हे युग जरी बुडाले, (युगांत जरी झाला) (तरी हे अर्जुना)
182-2
तरी स्वधर्मु एक आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे । मग तरिजेल काय पाहे । कृपाळुपणे ॥182॥
स्वधर्म म्हणून जो एक आहे, तो कोणत्याही कारणाने त्यागणे योग्य नाही. (स्वधर्म मुळीच टाकता येत नाही). मग अस असताना येथे लक्षात घ्यावे :- अर्जुन हा क्षत्रिय आहे, आणि क्षत्रियाचा स्वधर्म युद्ध करणे, पण अर्जुनाच्या मनात गोंधळ उत्पन्न झाल्याने कौरवांच्या (आप्तजन) विरूद्ध युद्ध करण्यास नकार देत असल्याने】तूझ्या मनात जो दयाभाव निर्माण झाला आहे, यामूळे तू तरला जाशील काय ? याचा विचार कर.
183-2
अर्जुना तुझे चित्त । जर्ही जाहले द्रवीभूत । तर्ही हे अनुचित । संग्रामसमयी ॥183॥
हे अर्जुना ! तुझे चित्त जरी दयेने विरघळून गेले; तरी तसे होणे या युद्ध प्रसंगी अयोग्य आहे. (स्वधर्म विसरणे योग्य नाही, किंवा आपले कर्तव्य विसरून जाणे)
184-2
अगा गोक्षीर जरी जाहले । तरी पथ्यासि नाही म्हणितले । ऐसेनिहि विष होय सुदले । नवज्वरी देता ॥184॥
जसे गायीचे दूध हे पवित्रच, (मनात आप्तजनाबद्दल दयाभाव उत्पन्न होणे हे योग्य जरी असेल) पण वैद्याने पथ्य सांगितले असतानाही, (म्हणजे घेऊ नये असे सांगितले) ते दूध (आग्रहाने) नवज्वारांत दिले, तर ते विषासमान मारक होते.
185-2
तैसे आनी आन करिता । नाशु होईल हिता । म्हणऊनि तू आता । सावध होई ॥185॥
त्या प्रमाणे भलत्या ठिकाणी भलते कर्माचरण (आचरण) केले, तर त्याच्या हिताचा नाश होतो. म्हणून तू आता सावध हो.
186-2
(त्याच्या :- आपले कर्त्यव्य पार न पडणारा)
वायाचि व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु पाही । जो आचरिता बाधु नाही । कवणे काळी ॥186॥
तू विनाकारण (व्यर्थ)शोकाकुल का होतोस, (मोहाने का बरे व्याकुळ होतोस) ज्याचे आचरण केले असता केंव्हाही दोष लागत नाही; त्या आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे.
187-2
(ज्याचे :- आपल् कर्त्यव्य पार पडणारा)
जैसे मार्गेचि चालता । अपावो न पवे सर्वथा । का दीपाधारे वर्तता । नाडळिजे ॥187॥
ज्या प्रमाणे सरळ रस्त्याने चालले असता; कधीही अपाय होत नाही किंवा (रात्रीच्या समयी) दिव्याच्या उजेडात चालले असता ठेच लागत नाही;
188-2
तयापरी पार्था । स्वधर्मे राहाटता । सकळ कामपूर्णता । सहजे होय ॥188॥
त्याप्रमाणे हे पार्था स्वधर्माने वागले असता (त्याच्या) सर्व इच्छा सहजच पूर्ण होतात.
189-2
म्हणोनि यालागी पाही । तुम्हा क्षत्रिया आणीक काही । संग्रामावाचूनि नाही । उचित जाणे ॥189॥
म्हणून तू ऐक, तूम्हा क्षत्रियांना युद्धवाचून दूसरे काहीही (तारून जाण्यासाठी) योग्य नाही, हे लक्षात घे.
190-2
निष्कपटा होआवे । उसिणा घाई जुंझावे । हे असो काय सांगावे । प्रत्यक्षावरी ॥190॥
निष्कपट भावाने (मनात कपट न धरता), समोरासमोर उभे राहून शौर्याने युद्ध करावे, पण हे बोलणे राहूदे, (तूही हे सगळे जाणतोस), (आत्ता तर) प्रत्यक्ष युद्धाची वेळ आली आहे, तेंव्हा जास्त काय सांगावे ! ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृत्तम् ।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभंते युद्धमीदृशम् ॥2. 32॥
भावार्थ :-
हे अर्जुना ! सहजपणे प्राप्त झालेला हे युद्ध म्हणजे आपोआप उघडलेले स्वर्गाचे द्वार होय; असे हे युद्ध भाग्यशाली क्षित्रियांनाच हे प्राप्त होते.
191-2
अर्जुना झुंज देखे आताचे । हे हो काय दैव तुमचे । की निधान सकळ धर्माचे । प्रगटले असे ॥191॥
हे अर्जुना ! आताचे हे युद्ध म्हणजे तूमचे पूर्व जन्मीचं भाग्य होय. अथवा सर्व धर्माचा ठेवाच तुमच्यापुढे प्रकटलेला आहे.
192-2
हा संग्रामु काय म्हणिपे । की स्वर्गुचि येणे रूपे । मूर्त का प्रतापे । उदो केला ॥192॥
याला काय साधे युद्ध म्हणावे ? अरे या युद्धाच्या (निमित्ताने) रूपाने हा मूर्तिमंत स्वर्गच अवतरला आहे. अथवा, तुझा मूर्तिमंत प्रताप प्रकटला आहे. (अवतरला आहे)
193-2
ना तरी गुणाचेनि पतिकरे । आर्तिचेनि पडिभरे । हे कीर्तीचि स्वयंवरे । आली तुज ॥193॥
किंवा तुझ्या शौर्यगुणांचा लौकिक ऐकून तूझ्यावर आसक्त होवून कीर्तिरूप स्त्री उत्कट इच्छेने तुला वरण्यास (लग्न करण्यास) आली आहे.
194-2
क्षत्रिये बहुत पुण्य कीजे । ते झुंज ऐसे हे लाहिजे । जैसे मार्गे जाता आडळिजे । चिंतामणीसी ॥194॥
(अर्जुना ! असे हे धर्मयुद्ध सहज प्राप्त होत नाही, कारण) क्षत्रिया ने पुष्कळ पुण्य करावे, तेंव्हा त्याचा जिवनात असे धर्मयुद्ध करावयास मिळते. जसे सहज रस्त्याने जाताना ठेच लागावी काय लागले म्हणून पाहताच मनातील इच्छा पूर्ण करणारा चिंतामणी सापडावा,
195-2
ना तरी जांभया पसरे मुख । तेथ अवचटे पडे पीयूख । तैसा संग्रामु हा देख । पातला असे ॥195॥
किंवा जांभाई देण्यासाठी तोंड उघडावे; आणि अचानक अमृत येऊन तोंडात पडावे. त्याप्रमाणे हे धर्मयुद्ध प्रसंग अनायासे आला आहे, असे समज.
अथ चेत् त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्यसि ॥2. 33॥
भावार्थ :-
आता असे धर्माला अनुकूल युद्ध करणार नसशील, तर स्वधर्म आणि कीर्ती यांचा त्याग करून पाप मात्र मिळवशील.
196-2
आता हा ऐसा अव्हेरिजे । मग नाथिले शोचू बैसिजे । तरी आपण आहाणा होईजे । आपणपेया ॥196॥
आता, असा हा संग्राम टाकून भलत्याच गोष्टींचा शोक करत बसलास; तर आपणच आपला घात केल्यासारखे होईल.
197-2
पूर्वजांचे जोडले । आपणचि होय धाडिले । जरी आजि शस्त्र सांडिले । रणी इये ॥197॥
आज जर तू या (धर्म) युद्धात शस्त्र टाकून दिलेस; तर तूझीच नाही, तर तूझ्या पूर्वजांनी मिळविलेली पुण्यकीर्ति आपणच घालविल्यासारखे होईल.
198-2
असती कीर्ति जाईल । जग अभिशापु देईल । आणि गिंवसित पावतील । महादोष ॥198॥
इतकेच नाही तर तुझी असलेली कीर्तिं संपून जाईल, सगळे जग तुझी निंदा करेल, तुला नावे ठेवील आणि महापातके तुझ्याजवळ राहण्यासाठी तुझा शोध घेत येतील.
199-2
जैसी भ्रतारेहीन वनिता । उपहृती पावे सर्वथा । तैशी दशा जीविता । स्वधर्मेवीण ॥199॥
ज्याप्रमाणे पतिविरहीत स्त्रीचा सर्वाकडून अपमान होत असतो. त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण न केल्याने (स्वधर्माचा त्याग केल्याने) जिवाची तशी दशा होते.
(त्याकाळची प्रथे नुसार लिहिले आहे, बदला नुसार ओव्यांचे योग्य अर्थ आपण येथे समजून घेऊ, भाव समजून घ्यावे)
200-2
ना तरी रणी शव सांडिजे । ते चौमेरी गिधी विदारिजे । तैसे स्वधर्महीन अभिभविजे । महादोषी ॥200॥
किंवा रणभूमीवर टाकून दिलेल्या प्रेताला (मृत शरीराला) ज्याप्रमाणे चोहोबाजुनी गिधाडे टोचे मारीत असतात, त्याप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष त्रास देत असतात.
अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यंति तेऽव्याम् ।
संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥2. 34॥
भावार्थ :-
आणि सर्व लोक अनेक दिवस तुझी अपकीर्ती बोलत राहतील. सन्मान्य माणसाला अपकीर्ती मारणापेक्षाही अधिक दुःखकारक असते.
दिवस १९ वा, १९ जानेवारी
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २१७ ते २२८
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 217
वैष्णव तो जया । अवघी देवावरी माया ॥१॥
नाही आणीक प्रमाण । तन धन तृण जन ॥धृपद॥
पडता जड भारी । नेमा न टळे निर्धारी ॥२॥
तुका म्हणे याती । हो का तयाची भलती ॥३॥
अर्थ
ज्याची पूर्ण श्रद्धा व प्रेम विठ्ठलावर (देवावर) आहे, इतर कोणत्याही वस्तुवर नाही, तोच खरा विष्णुभक्त होय. ज्याला तन, धन, जन हे विठ्ठलासमोर तृणासमान वाटतात, ज्याला केवळ एक भगवंत (विठ्ठल) देवच मान्य आहे कोणत्याही कठिण प्रसंगी जो आपली उपासना खंडित करत नाही, तुकाराम महाराज म्हणतात, त्याची जात कोणतीही असो, तो वैष्णवच आहे.
अभंग क्र. 218
करोत तपादि साधने । कोणी साधो गोरांजने ॥१॥
आम्ही न वजो तया वाटा । नाचूं पंढरीचोहटा ॥धृपद॥
पावोत आत्मिस्थिति । कोणी म्हणोत उत्तम मुक्ति ॥२॥
तुका म्हणे छंद । आम्हा हरीच्या दासा निंद्य ॥३॥
अर्थ
परमेश्वराची प्राप्ती होण्यासाठी कोणी तपच्यर्या करतो, तर कोणी देह अग्नीला अर्पण करतो. आम्ही मात्र त्या वाटेला जाणार नाही ; तर पंढरीच्या वाटेवर भक्तीने, श्रध्देने नाचत जाऊ. कोणाला आत्मस्थिति प्राप्त होवो अथवा कुणाला मुक्ती मिळो. तुकाराम महाराज म्हणतात, हरिच्या नामस्मरणाशिवाय इतर छंद आम्हाला (हरिदासांना) वर्ज आहेत.
अभंग क्र. 219
देव सखा जरी । जग अवघे कृपा करी ॥१॥
ऐसा असोनि अनुभव । कासाविस होती जीव ॥धृपद॥
देवाची जतन । तया बाधू न शके अग्न ॥२॥
तुका म्हणे हरी । प्रल्हादासी यत्न करी ॥३॥
अर्थ
देवा तू ज्यांचा सखा-सोयरा आहे, पाठिराखा आहे, त्यांच्यावर सर्व जग माया प्रेम करते. असा प्रत्यक्ष अनुभव येवून सुद्धा भगवंताची कृपा संपादन न करता काहीचा जिव संसारिक विषयांसाठी कासाविस होतो. ज्याचे रक्षण देव करतो, त्याला अग्निचेही भय नसते. तुकाराम महाराज म्हणतात, भक्त प्रल्हादा करता भगवंताने असेच् प्रयत्न केले होते.
अभंग क्र. 220
भले म्हणविता संतांचे सेवक । आइत्याची भीक सुखरूप ॥१॥
ठसाविता बहु लागती सायास । चुकल्या घडे नाश अल्प वर्म ॥धृपद॥
पाकसिद्धी लागे संचित आइते । घडता सोई ते तेव्हा गोड ॥२॥
तुका म्हणे बर्या सांगताचि गोष्टी । रणभूमि दृष्टी न पडता ॥३॥
अर्थ
आपण जर स्वतःला संतांचेसेवक म्हणावले तर त्यांच्या ज्ञानाची, तपाची, संचिताची शिदोरि आपोआप आपल्याकडे चालत येते एखादी परमार्थिक गोष्ट पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात त्यात थोडी जरी चूक झाली तर नाश होतो. पाकशुद्धी करण्यासाठी सर्व पदार्थ व्यवस्तीत व प्रमाणात असावे लागतात, त्यातून जेवण रुजकर बनेले तरच ती पाकशुद्धी सफल होते. तुकाराम महाराज म्हणतात, जो पर्यंत रणभूमी दिसत नाही तो पर्यंतच युद्धकथा गोड वाटतात.
अभंग क्र. 221
संतसमागम एखादिया परी । राहावे त्याचे द्वारी श्वानयाती ॥१॥
तेथे रामनाम होईल श्रवण । घडेल भोजन उच्छिष्टाचे ॥धृपद॥
कामारी बटीक सेवेचे सेवक । दीनपण रंक तेथे भले ॥२॥
तुका म्हणे सर्व सुख त्या संगती । घडेल पंगती संताचिया ॥३॥
अर्थ
एखाद्या बरोबर राहून जर संतसहवास घडत असेल तर त्याच्या दारात इनामी कुत्र्याप्रामाने राहावे. जेथे राम नाम व संतवचन श्रवण करण्यास मिळेल येथील उष्टे भोजनहि करावे. अश्या संतांच्या घरी आपण सेवक बनून राहिलो असता आपले दैन्य निगुण जातील. तुकराम महाराज म्हणतात, संतांच्या सहवासात, पंगतित बसले असता जीवनातील सर्व सुखांचा लाभ होतो.
अभंग क्र. 222
वाघाचा कलभूत दिसे वाघाऐसा । परी नाही दशा साच अंगी ॥१॥
बाहेरील रंग निवडी कसोटी । संघष्टणे भेटी आपेआप ॥धृपद॥
सिकविले तैसे नाचावे माकडे । न चले त्यापुढे युक्ति काही ॥२॥
तुका म्हणे करी लटिक्याचा साटा । फजित तो खोटा शीघ्र होय ॥३॥
अर्थ
वाघाचे नुसते कातडे घेऊन त्या मध्ये भुसा भरून उभे केले तर ते खरे वाटते पण वाघाच्या अंगी जे काही गुण असते ते त्या ठिकाणी नसते. मुलाम्यचे नाणे कसोटीला लावले म्हणजे त्याचा खरा रंग दिसतो म्हणजे एखाद्याचे जास्त संबंध झाले तर त्याचा स्वभाव लक्षात येतो. ज्या प्रमाणे माकडाला शिकविले तर त्याला तेवढेच नाचणे खेळ करणे तेवढेच त्याला येते पण त्या पुढे त्याला स्वतःच्या बुद्धीने काही जमत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्यांनी खोट्याचा साठा केला आहे अश्यांची फजिती हि प्रसंगी होते.
अभंग क्र. 223
सिंदळीचे सोयरे चोराचीया दया । ते ही जाणा तया संवसर्गी ॥१॥
फुकासाठी भोगे दुःखाचा वाटा । उभारोनी काटा वाटेवरी ॥धृपद॥
सर्प पोसूनिया दुधाचा नास । केले थीता विष अमृताचे ॥२॥
तुका म्हणे यासी न करिता दंडण । पुढिल खंडण नव्हे दोषा ॥३॥
अर्थ
एखाद्या व्यभिचारिण स्त्रीचे नातेवाईक आप्तेष्ट आणि चोराला दया दाखविणार माणूस हे सारखेच. असे माणसे फुकटच्या साठी दुखाचाही वाटा भोगायला तयार होतात कारण हे माणसे चांगल्या वाटेवर काटे पसरविणाऱ्या माणसासारखे असतात. आहो सापाला जरी दुध पाजले तरी त्याचे विष होते. तुकाराम महाराज म्हणतात दुष्ट लोकांना दंड केले नाही तर त्यांच्या पापाचे खंडन होत नाही.
अभंग क्र. 224
तेणे सुखे माझे निवविले अंग । विठ्ठल हे जग देखियेले ॥१॥
कवतुके करुणा भाकीतसे लाडे । आवडी बोबडे बोलोनिया ॥धृपद॥
मज नाही दशा अंतरी दुःखाची । भावना भेदाची सर्व गेली ॥२॥
तुका म्हणे सुख झाले माझ्या जीवा । रंगलो केशवा तुझ्या रंगे ॥३॥
अर्थ
विठ्ठल रुपी जग पहिल्या नंतर व मी हि विठ्ठल रूप झाल्या नंतर मला अतिशय सुख झाले. मी या विठ्ठलाचे लाडाने आणि बोबड्या शब्दाने कवतुकाने करूणा करतो. आहो माझ्या अंतरंगात दुख:च राहिले नाही कारण माझी भावना समूळ गेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे केशवा माझ्या जीवाला अपार सुख झाले आहे कारण हरीच्या रंगात मी रंगलो आहे.
अभंग क्र. 225
विठ्ठल सोयरा सज्जन विसावा । जाइन त्याच्या गावा भेटावया ॥१॥
सीण भाग त्यासी सांगेन आपुला । तो माझा बापुला सर्व जाणे ॥धृपद॥
माय माउलिया बंधुवर्गा जना । भाकीन करुणा सकळीकासी ॥२॥
संत महंत सिद्ध महानुभाव मुनि । जीवभाव जाऊनि सांगेन त्या ॥३॥
माझिये माहेरी सुखा काय उणे । न लगे येणे जाणे तुका म्हणे ॥४॥
अर्थ
हा विठ्ठल माझा सोयरा सज्जन व विसावा आहे त्याला भेटण्यासाठी मी त्याच्या गावाला जाईन. माझा भाग शिण सर्व काही मी त्या विठोबाला सांगेन कारण तो माझा बापूला आहे तो माझा सर्व जानतो. त्या ठिकाणी माझी माया बहिण बंधू हे सर्व आहेत व मी त्या ठिकाणी जाऊन सर्वासमोर माझी करून भाकीन सांगेन. तेथे संत महंत सिद्ध मुनी महानुभाव आहेत आणि त्यांना मी माझ्या जीव भाव चे सर्व गोष्टी सांगेन. तुकाराम महाराज म्हणतात अहो हे माझे माहेर आहे तेथे सुखाला काय उणे आहे तेथे गेलो कि माझ्या जन्म मृत्युच्या फेऱ्या चुकतात.
अभंग क्र. 226
ध्याइन तुझे रूप गाइन तुझे नाम । आन न करी काम जिव्हामुखे ॥१॥
पाहिन तुझे पाय ठेविन तेथे मी डोई । पृथक ते काही न करी आन ॥धृपद॥
तुझेचि गुणवाद आइकेन कानी । आणिकाची वाणी पुरे आता ॥२॥
करिन सेवा करी चालेन मी पायी । आणीक न वजे ठायी तुजविण ॥३॥
तुका म्हणे जीव ठेवीन मी पायी । आणीक ते काई देऊ कवणा ॥४॥
अर्थ
देवा मी तुझेच रूप ध्यानी ठेवीन तुझेच नाम गाईन आणि दुसरे कोणतेही काम माझी जीभ करणार नाही. हे देवा मी माझ्या डोळ्याने तुझेच पाय चरण पाहीन व माझे मस्तक त्या ठिकाणी ठेवीन त्याशिवाय दुसरे काही करणार नाही. तुझेच गुणगान मी गाईन व व्यर्थ बडबड पुरे आता. मी पायी चलत येऊन तुझीच सेवा करीन व तुला सोडून दुसरे कोठेही मी जाणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी माझा जीव तुझ्या पायी ठेवीन आणि आता कोणालाही काही देण्या साठी माझ्या कडे काय आहे.
अभंग क्र. 227
माझे चित्त तुझे पायी । राहे ऐसे करी काही । धरोनिया बाही । भव हा तारी दातारा ॥१॥
चतुर तू शिरोमणि । गुणलावण्याची खाणी । मुगुट सकळ मणि । धन्य तूचि विठोबा ॥धृपद॥
करी या त्रिमिराचा नाश । उदयो होउनि प्रकाश । तोडी आशापाश । करी वास हृदयी ॥२॥
पाहे गुंतलो नेणता । माझी असो तुम्हा चिंता । तुका ठेवी माथा । पायी आता राखावे ॥३॥
अर्थ
हे दातारा दयाघना माझे चित्त तुझ्या पायी राहीन असा काही तरी उपाय कर आणि माझे बाही म्हणजे हात धरून हा भवसागर तार. हे नारायण तू चतुर शिरोमणी आहेस व लावण्याची खाण आहेस सर्वाचा मुकुट मनी आहेस हे विठोबा तू धन्य आहेस. तू सर्व तीमिरांचा म्हणजे माझ्या अज्ञान रुपी अंधकाराचा नाश कर व माझ्या हृदयातच प्रकट हो प्रकाशित हो व तेथील आशा पाश तोडून टाकून तू तेथेच म्हणजे माझ्या हृदयात वास कर. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी या प्रपंचात गुंतलो आहे तुम्हाला माझी काळजी घ्यावी लागेल मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवतो आहे तुम्ही मला तुमच्या चरणाशी आश्रय द्या.
अभंग क्र. 228
आमुचे उचित हेचि उपकार । आपलाचि भार घालू तुज ॥१॥
भूक लागलिया भोजनाची आळी । पाघुरणे काळी शीताचिये ॥धृपद॥
जेणे काळे उठी मनाची आवडी । तेचि मागो घडी आवडे ते ॥२॥
दुःख येऊ नेदी आमचिया घरा । चक्र करी फेरा भोवताला ॥३॥
तुका म्हणे नाही मुक्तीसवे चाड । हेचि आम्हा गोड जन्म घेता ॥४॥
अर्थ
हे पांडुरंगा आम्हा भक्तांचे योग क्षेमाचा भार तुमच्यावर घालून स्वस्त बसावे एवढेच काम आमचे हेच तुझ्यावर उपकार आहेत. हे पांडुरंगा भूक लागली कि आम्ही तुलाच आळवणार व थंडी लागली कि आम्ही पाघरून तुझ्या जवळच मागणार. आम्हाला मनाने ज्या वेळी जे आवडेल ते तुमच्या जवळ त्या वेळी आम्ही तुला मोठ्या प्रेमाने मागु. तुझे सुदर्शन चक्र हे देवा आमच्या घरा मध्ये व मना मध्येही दुखला येऊ देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला मुक्तीची चाढ नाही कारण सारखे सारखे जन्म घेऊन तुझ नाम घेणे त्यातच गोडी वाटते.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















