१४ जानेवारी, दिवस १४, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा, ओवी ५१ ते ७५, सार्थ तुकाराम गाथा अभंग १५७ ते १६८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१४ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 14 January

राम कृष्ण हरी आज दिनांक 14 जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

51-2
हे जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलो लागला । म्हणे देवो का चित्त या बोला । देतीचिना ॥51॥
(आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत), हे लक्षात आल्यावर अर्जुन मनात गोंधळला (, घाबरला). मग पुनः बोलू लागला. तो म्हणाला, देवा ! माझ्या या बोलण्याकडे आपण का लक्ष देत नाही ?

न चैतद् विद्मः करतन् नो गरीयो यद् वा जयेम यदि वा नो जयेयुः ।
यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥2. 6॥

भावार्थ :-
आम्हाला या युद्धात जय मिळेल, अथवा ते आम्हाला जिंकतील ? या दोन्हीमध्ये कोणती गोष्ट श्रेयस्कर आहे, हे आम्हाला समजत नाही. ज्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही, तेच कौरव युद्धाला सज्ज होऊन आमच्या समोर उभे आहेत. ॥6॥
52-2
येर्‍हवी माझ्या चित्ती जे होते । ते मी विचारूनि बोलिलो एथे । परि निके काय यापरौते । ते तुम्ही जाणा ॥52॥
अजून जे जे काही विचार माझ्या मनात होते ते मी आपणा समोर स्पष्ट करून बोललो, परंतु याच्यापेक्षा काय चांगले आहे, ते तुम्हासच ठाऊक ! !
53-2
पै विरु जयांसी ऐकिजे । आणि या बोलाचि प्राणु सांडिजे । ते एथ संग्रामव्याजे । उभे आहाती ॥53॥
ज्यांच्याशी (आप्तजांना उद्देशुन) वैर करण्याची गोष्ट ऐकूनच (ऐकल्याबरोबर) आम्ही प्राण त्याग करावा, तेच या रणांगणावर युद्ध करण्यासाठी आमच्यासमोर उभे आहेत.
54-2
आता ऐसेयाते वधावे । की अव्हेरुनिया निघावे । या दोहोमाजी काइ करावे । ते नेणो आम्ही ॥54॥
(समोर उभे असलेल्या) अशांचा वध करावा, कि युद्ध सोडून निघून जावे ?; या दोहोमध्ये चांगली गोष्ट कोणती, ते आम्हाला मुळीच समजत नही.
कार्पण्यदोषोपहत्स्वभावः
पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः ।
यत् श्रेयः स्यान् निश्चितं ब्रूहि तन् मे
शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥2. 7॥

भावार्थ :-
कारुण्याने व्याप्त दोषाने माझे हे मन धर्म-अधर्म काही जाणेना, चित्त मोहित झालेला मी आपणास विचारीत आहे की, जे निःसंशय श्रेयस्कर असेल ते मला सांग. मी तुझा शिष्य आहे. तुला शरण आलेल्या मला आपण उपदेश करा. ॥7॥
55-2
आम्हा काय उचित । ते पाहता न स्फुरे एथ । जे मोहे येणे चित्त । व्याकुळ माझे ॥55॥
आम्हाला काय उचित आहे आणि काय करणे अनुचित आहे, हे विचार करून पाहिले तरी स्फुरत (सुचत, समजत) नाही. कारण या मोहाने माझे चित्त व्याकूळ झाले आहे.


56-2
तिमिराविरुद्ध जैसे । दृष्टीचे तेज भ्रंशे । मग पासीच असता न दिसे । वस्तुजात ॥56॥
जसे अंधाराने डोळ्याचे तेज संपले. (दिसेनासे झाले)की दृष्टीचे तेज लोप पावते, आणिे मग जवळची वस्तूही दिसत नाही.
57-2
देवा मज तैसे जाहले । जे मन भ्रांती ग्रासिले । आता काय हित आपुले । तेही नेणे ॥57॥
हे देवा ! , तशी माझी अवस्था झाली आहे. माझे मन भ्रांतीने (मोहाने) ग्रासले आहे, त्यामुळे माझे हित कशात आहे ते ही समजेनासे झाले आहे.
58-2
तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे । निके ते आम्हा सांगावे । जे सखा सर्वस्व आघवे । आम्हासी तू ॥58॥
म्हणून हे श्रीकृष्णा ! आमचे कल्याण कशात आहे, हे आपण विचार करून पहावे, आणि योग्य मार्ग सुचवावा. कारण आमचा सखा, मित्र आमचे सर्वकाही तूच आहेस.
59-2
तू गुरु बंधु पिता । तू आमची इष्ट देवता । तूचि सदा रक्षिता । आपदी आमुते ॥59॥
तूच आमचा गुरू, बंधू, पिता आहेस. तूच आमची (कुलदैवत) इष्टदेवता आहेस. आणि नेहमीच संकट समयी आमचे रक्षण करणारा ही तूच आहेस.
60-2
जैसा शिष्याते गुरु । सर्वथा नेणे अव्हेरु । की सरितांते सागरु । त्यजी केवी ॥60॥
ज्याप्रमाणे गुरू शिष्याला कधिही अव्हेर (दूर) करत नाही, किंवा समुद्र कधी नद्यांचा (त्याग) अव्हेर करत नाही, त्याप्रमाणे तुही आम्हाला अव्हेरु शकत नाहीस.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

61-2
नातरी अपत्याते माये । सांडुनि जरी जाये । तरी ते कैसेनि जिये । ऐके कृष्णा ॥61॥
देवा ऐका ! जर आई आपल्या लहान बाळाला सोडून निघून गेली, तर ते लहान बाळ (आई विना) कसे जगू शकेल. ?
62-2
तैसा सर्वापरी आम्हासी । देवा तूचि एक आहासी । आणि बोलिले जरी न मानिसी । मागील माझे ॥62॥
त्याप्रमाणे देवा, सर्व दृष्टींनी विचार केला, तर तूच आम्हला एक आधार आहेस, आत्ता पर्यंतचे माझे बोलणे जर तुम्हाला पटत नसेल,
63-2
तरी उचित काय आम्हा । जे व्यभिचरेना धर्मा । ते झडकरी पुरुषोत्तमा । सांगे आता ॥63॥
तर हे पुरूषोत्तमा ! जी गोष्ट आम्हाला करण्यासाठी उचित आहे, व ती धर्मविरूद्ध पण नाही तर ती (गोष्ट) ताबडतोब सांगा पाहू.

भग्वद्गीता अध्याय 2 रा श्लोक 8 वा
न हि प्रपश्यामि ममापुनुद्याद् यच्छोकमुछोषणमिन्द्रियाणाम् ।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥2. 8॥


भावार्थ :-
भूलोकवरील निष्कटंक (काटे नसलेला) व समृद्ध असे राज्य आणि देवाचे आधिपत्य (इंद्रलोक) ही मिळाले. तरीहि माझ्या इंद्रियांचे शोषण करून टाकणारा माझा शोक दूर होईल, असे मला दिसत नाही.
64-2
हे सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपजलासे मनी । तो तुझिया वाक्यावाचुनि । न जाय आणिके ॥64॥
हे सर्व गोत्रज पाहून माझ्या मनात जो शोक उत्पन्न झाला आहे तो मात्र आपल्या उपदेशाशिवाय दूर होणार नाही.
65-2
एथ पृथ्वीतळ आपु होईल । हे महेंद्रपदही पाविजेल । परि मोह हा न फिटेल । मानसीचा ॥65॥
या वेळी पृथ्वीचे संपूर्ण राज्य जरी मला मिळाले किंबहुना, इंद्रपद जरी मिळाले तरी, माझ्या मनात जो मोह उत्पन्न झाला आहे, तो दूर होणार नाही.


66-2
जैसी बीजे सर्वथा आहाळली । तरी सुक्षेत्री जर्‍ही पेरिली । तरी न विरुढती सिंचली । आवडे तैसी ॥66॥
जसे पूर्ण भाजलेले (करपलेले) बी चांगल्या सुपिक जमिनीत जरी पेरले आणि त्यास योग्य प्रमाणात पाणी घातले, तरी ते उगवत नाही.
67-2
ना तरी आयुष्य पुरले आहे । तरी औषधे काही नोहे । एथ एकचि उपेगा जाये । परमामृत ॥67॥
जिथे सर्व आयुष्यच सरलेले(मृत्यू पूर्वीची शेवटची वेळ) असेल, त्यावेळी कोणत्याही औषधाचा काहीच उपयोग होत नाही, तेथे फक्त परमामृतच (भगवंताची प्रार्थना, श्रद्धा करणे) उपयोगी पडेल, .
68-2
तैसे राज्यभोगसमृद्धि । उज्जीवन नोहे जीवबुद्धि । एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझे ॥68॥
अगदी तसेच, माझ्या मोहित झालेल्या या बुध्दीला(स्वतःला उद्देशून)सर्व राज्यभोग, समृद्धी याचा मूळीच उपयोग होणार नाही. हे कृपानिधे ! (कृपा करणारा), तुझ्या कृपेचा जिव्हाळाच मला उपयोगी पडेल.
69-2
ऐसे अर्जुन तेथ बोलिला । जव क्षण एक भ्रांति सांडिला । मग पुनरपि व्यापिला । उर्मी तेणे ॥69॥
जेंव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती (माया) दूर झाली, तेव्हा अर्जुन असे बोलला; परंतु पून्हा त्याला मायेच्या लहरींने व्यापले.
70-2
की मज पाहता उर्मी नोहे । हे अनारिसे गमत आहे । तो ग्रासिला महामोहे । काळसर्पे ॥70॥
(अर्जूनाची रणांगणावर झालेली स्तिथीवर श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात की), ही मोहाची लहर नसून महामोहरूपी (अविद्या रूपी मोहानेच) काळसर्पानेच अर्जूनास ग्रासलेले (दंश केलेला) असावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


71-2
सवर्म हृदयकल्हारी । तेथ कारुण्यवेळेचा भरी । लागला म्हणोनि लहरी । भांजेचि ना ॥71॥
अतिशय कोमल मर्माचे स्थान जे हृदयरुपी कमळाचे ठिकाणी आणि करुण्यरूपी संध्याकाळी (ऐन दुपारी) (म्हणजे ह्रदयात कारूण्य भाव उत्पन्न झाला) अशी संधी साधून त्या महामोहरूपी काळसर्पाने त्याला दंश केला. त्यामूळे (भ्रमरूपी, मोहरुपी, किंवा निर्माण झालेले अज्ञान) या लहरी उतरत नव्हते.
72-2
हे जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवे विष फेडी । तो धावया श्रीहरी गारुडी । पातला की ॥72॥
अशा (सर्पदंश झाल्यामुळे) त्या विषाची तिव्रता जाणून, ज्याच्या कृपादृष्टीने या (मोहरूपी सर्पाच्या) विषाची तिव्रता नष्ट (दूर) करतो, तो श्रीहरि रूपी गारूडी अर्जूनाच्या हाकेसरसा त्याच्या रक्षणासाठी धावून आला.
73-2
तैसिया पंडुकुमरा व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्ण जवळा । तो कृपावशे अवलीळा । रक्षील आता ॥73॥
तशा त्या शोकाने, मोहाने व्याकुळ झालेल्या अर्जुनाजवळ भगवान श्रीकृष्ण (गारुडी श्रीहरि)शोभत होता. आपल्या कृपादृष्टीने (आपला प्रिय मित्राचे) सहजच रक्षण करील.
74-2
म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु । म्या म्हणितला हा हेतु । जाणोनिया ॥74॥
(कृष्ण भगवान अर्जुनाचे रक्षण करणारच) हे कारण जाणूनच अर्जुनाला मोहरुपी सर्पाने दंश केला. असे मी येथे कथन केले.
75-2
मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळूनु । जैसा घनपडळी भानु । आच्छादिजे ॥75॥
जसे सूर्य ढगांनी आच्छादिला जातो; त्याप्रमाणेच त्या प्रसंगी अर्जून मोहाने (गोंधळून जाणे, अज्ञान)आच्छादिला गेला होता असे समजा.

दिवस १४ वा, १४ जानेवारी
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १५७ ते १६८
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा

अभंग क्र. 157
करणे ते देवा । हेचि एक पावे सेवा ॥१॥
अवघे घडे येणे सांग । भक्त देवाचे ते अंग ॥धृपद॥
हेचि एक वर्म । काय बोलिलो तो धर्म ॥२॥
तुका म्हणे खरे । खरे त्रिवाचा उत्तरे ॥३॥
अर्थ

देवाला संतांची भक्ती, सेवा करणे आवडते त्या प्रकारची भक्ती, सेवा मनुष्याने करावी. कारण संत हे त्या परमेश्वराचा अंग आहे. देवाला आपल्याप्रमाने संतांची पूजा केलेली आवडते, हेच धर्माचे रहष्य व खरे वर्म आहे तेच मी सांगत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हेच खरे सत्य मी त्रिवार सांगत आहे.


अभंग क्र. 158
मागे नेणपणे घडले ते क्षमा । आता देतो सीमा करूनिया ॥१॥
परनारीचे जया घडले गमन । दावीतो वदन जननीरत ॥धृपद॥
उपदेशा वरी मन नाही हाती । तो आम्हा पुढती पाहू नये ॥२॥
तुका म्हणे साक्षी असो द्यावे मन । घातली ते आण पाळावया ॥३॥
अर्थ

मागे अजाणतेपणाने तुमच्याकडून काही गुन्हा घडला असेल तर आता पश्चातापाने प्रायश्चित्त घेऊन भक्तीमार्ग धरल्यास आम्ही तुमच्या सर्व चुका माफ करतो. पुन्हा जर अशी परस्त्री अभिलाषा धरल्याचे पाप केले तर मातेशी संग केल्याचे पाप लागेल. चांगला उपदेश केल्यानंतरहि जो सुधारणा करत नाही, त्याचे तोंडहि पाहण्याची आमची इच्छा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही केलेले उपदेश पाळण्याची शपथ तुम्ही स्वतःचे मन साक्षी ठेवून घ्या.


अभंग क्र. 159
आणिकाच्या घाते । ज्यांची निवतील चित्ते ॥१॥
तेचि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥धृपद॥
कान पसरोनी । ऐके वदे दुष्ट वाणी ॥२॥
तुका म्हणे भांडा । धीर नाही ज्याच्या तोंडा ॥३॥
अर्थ
दुसर्‍याचा घात झालेला पाहुन ज्यांना आनंद होतो असे लोक पापी आहे असेच समजावे. शीघ्रकोपि मनुष्य अंती नरकाला जातात. ज्याला परनिंदा, वाईट बोलने ऐकायला, बोलायला आवडते, तोहि पापी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भांडखोर व ज्याच्या तोंडाला धैर्य नसलेला मनुष्यही असाच पापी असतो.


अभंग क्र. 160
केली सीताशुद्धी । मूळ रामायणा आधी ॥१॥
ऐसा प्रतापी गहन । सकळ भक्तांचे भूषण ॥धृपद॥
जाऊनि पाताळा । केली देवीची अवकळा ॥२॥
राम लक्षुमण । नेले आणिले चोरून ॥३॥
जोडूनिया कर । उभा सन्मुख समोर ॥४॥
तुका म्हणे जपे । वायुसुता जाती पापे ॥५॥
अर्थ

मूळ रामायाणाच्या प्रारंभी मारुती रायाने सितेचा शोध केला, ही कीर्ति वर्णीलि आहे. असा हा हनुमंत महान पराक्रमी असून भक्तांचे भूषण आहे. पातळात जावून त्याने राक्षसांच्या देवीची फजीती केली. अहिरावण-महिरावण या राक्षसांनी राम लक्ष्मणाला चोरून नेले होते; त्या दृष्टांचा वध करुन मारुतीरायाने राम-लक्ष्मण यांना सोडवून आणले. तो हनुमंत रामा समोर हात जोडून उभा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या वायुसुताचा जप केला तर पाप नाहीशी होतात.


अभंग क्र. 161
काम बांदवडी । काळ घातला तोडरी ॥१॥
तया माझे दंडवत । कपिकुळी हनूमंत ॥धृपद॥
शरीर वज्रा ऐसे । कवळी ब्रम्हांड जो पुच्छे ॥२॥
रामाच्या सेवका । शरण आलो म्हणे तुका ॥३॥
अर्थ

देवा, ज्या मारुतिरायाने कामाला जिंकून बंदीवासात ठेवले, कळाला बेडया ठोकल्या. त्या कपिकुळातील हनुमंताला माझा दंडवत असो. ज्याचे शारीर वज्रा सारखे आहे, आपल्या शेपटीने जो ब्रम्हांडाला वेढा घालू शकतो. तुकाराम महाराज म्हणतात अश्या रामरायाच्या सेवका, तुला मी शरण आलो आहे.


अभंग क्र. 162
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥धृपद॥
करोनी उड्डाण । केले लंकेचे शोधन ॥२॥
जाळीयेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥३॥
अर्थ

महाबलवंत, महापराक्रमी अशा हनुमंताने रावनाची दाढी जाळली होती. त्यांना मी वारंवार, निरंतर नमस्कार करतो. महान अश्या समुद्रावर उड्डाण करुण लंकेचे निरिक्षण केले. तुकाराम महाराज म्हणतात, रावणाची लंका ज्याने जाळली, त्या मारुतिरायाचा पराक्रम धन्य होय.


अभंग क्र. 163
शरण शरण जी हनुमंता । तुज आलो रामदूता ॥१॥
काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥धृपद॥
शूर आणि धीर । स्वामिकाजी तू सादर ॥२॥
तुका म्हणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा ॥३॥
अर्थ

हनुमंता, तुम्ही प्रभु राम चंद्रांचे सेवक आहात. म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे. हे श्रेष्ट वीरा, भक्तीच्या वाटा कोणत्या आहेत, त्या आम्हाला दाखवा. तुम्ही शुर वीर धैर्यवान आहात. पुरुषार्थ करने तुम्हीच जानता व स्वामीची तत्परतेने सेवा करता. तुकाराम महाराज म्हणतात, हे रुद्र, तुम्ही अंजनिमातेचे सुपुत्र आहात.


अभंग क्र. 164
धिग जीणे तो बाइले आधीन । परलोक मान नाही दोन्ही ॥१॥
धिग जीणे ज्याचे लोभावरी मन । अतीतपूजन घडेचि ना ॥धृपद॥
धिग जीणे आळस निद्रा जया फार । अमित आहार अघोरिया ॥२॥
धिग जीणे नाही विवेक वैराग्य । झुरे मानालागी साधुपणा ॥३॥
तुका म्हणे धिग ऐसे जाले लोक । निंदक वादक नरका जाती ॥४॥
अर्थ

जो गृहस्थ पत्नीच्या आहारी गेलेला आहे त्याच्या जीवनाचा तुकाराम महाराज धिक्कार करतात, त्याला इहलोक व परलोकि मान मिळत नाही. जो मनुष्य सतत लोभाचाच विचार करत असतो, त्याचा हातून अतिथी- पूजा घडत नहीं, त्या मनुष्याचाहि धीक्कार असो. ज्याला आळस, निद्रा, भरपूर आहार याची आवड आहे, त्या पुरुषयाचाहि धिक्कार असो. जो मनुष्य विवेक आणि वैराग्याविना साधुत्वाची अपेक्षा करतो, त्याचाहि धीक्कार असो. तुकाराम महाराज म्हणतात, परनिंदा करणारा आणि निष्कारण वाद घालनाराहि अंती नरकात जातात, त्यांच्याही जीवनाचा धिक्कार असो.


अभंग क्र. 165
अरे हे देह व्यर्थ जावे । ऐसे जरी तुज व्हावे ।
द्यूतकर्म मनोभावे । सारीपाट खेळावा ॥१॥
मग कैचे हरीचे नाम । निजेलिया जागा राम ।
जन्मोजन्मींचा अधम । दुःख थोर साधिले ॥धृपद॥
विषयसुखाचा लंपट । दासीगमनी अतिधीट ।
तया तेचि वाट । अधोगती जावया ॥२॥
अणीक एक कोड । नरका जावयाची चाड ।
तरी संतनिंदा गोड । करी कवतुके सदा ॥३॥
तुका म्हणे ऐसे । मना लावी राम पिसे ।
नाही तरी आलिया सायासे । फुकट जासी ठकोनी ॥४॥
अर्थ

हा नरदेह वाया जावा असे तुला वाटेत असेल तर तू खुशाल सारिपाट द्यूत खेळत रहा. मग हरिचे नाम तुझ्या मुखी येणार नाही, तू अज्ञानाच्या निद्रित असल्यामुळे राम तुला भेटणार नाही, त्यामुळे तुला जन्मो जन्मीचे दुःख भोगावे लागेल. प्रपंच्यातील विषयसुखाची लंपटता, परस्त्री आसक्ति या सर्व अधोगतिला जाणाऱ्या वाटा आहेत. नरकात जाण्यासाठी संतनिंदा हा आणखी एक मार्ग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नारादेहाचे सार्थक व्हावे असे वाटत असेल तर मनाला रामाचे वेड लाउन घे, नाहीतर नारजन्माचे सर्व कष्ट फुकट जातील.


अभंग क्र. 166
अवघे ब्रम्हरूप रिता नाही ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ॥१॥
नाही भाव तया सांगावे ते किती । आपुल्याला मती पाखांडिया ॥धृपद॥
जया भावे संत बोलिले वचन । नाही अनुमोदन शाब्दिकासि ॥२॥
तुका म्हणे संती भाव केला बळी । न कळता खळी दूषिला देव ॥३॥
अर्थ

सर्व चराचर सृष्टिमध्ये ब्रम्ह भरून राहिले आहे, म्हणजे तो पाषाणाच्या धातुच्या मूर्तिमध्ये कसा नसणार ? पाखंडी किंवा नास्तिक मनुष्याला हे सांगून काय उपयोग ? संतांच्या मनातील श्रद्धा व भक्ती ‘शब्दपंडीतांच्या मनी नसल्यामुळे त्याना अनुभवाचे महत्त्व कळणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, संत सगुणभक्तीचा अनुभव खळांना नसल्यामुळे ते सगुण भक्तीचा निषेध करतात.


अभंग क्र. 167
एक तटस्थ मानसी । एक सहज चि आळसी ॥१॥
दोन्ही दिसती सारिखी । वर्म जाणे तो पारखी ॥धृपद॥
एक ध्यानी करिती जप । एक बैसुनि घेती झोप ॥२॥
एका सर्वस्वाचा त्याग । एका पोटासाठी जोग ॥३॥
एका भक्ति पोटासाठी । एका देवासवे गाठी ॥४॥
वर्म पोटी एका । फळे दोन सांगे तुका ॥५॥
अर्थ

एक व्यक्ती नामस्मरण भक्ती करतांना तटस्त बसली आहे, तर दूसरी व्यक्ती आळसामुळे तटस्त बसली आहे. अश्या दोन्ही व्यक्तींच्या शारीरिक अवस्था एकच असली तरी त्यांच्या मानसिकतेतिल फरक जाणकारालाच कळेल. एक भगवंत चिंतन करताना डोळे मिटुन ध्यानस्थ बसतो आणि दूसरा बसून झोप घेतो. एक सर्वस्वाचा त्याग करुण साधू होतो, तर दूसरा पोट भरण्यासाठी साधू होतो. एकजण देवाची भेट होण्यासाठी भक्ती करतो, तर दूसरा पोटासाठी भक्ती करतो. तुकाराम महाराज म्हणतात, दोघेही एकाच प्रकारचे आचरण करीत असले तरी त्यांच्यातील मनातील भाव वेगळे असल्यामुळे त्यांना फळेही वेगवेगळ्या प्रकारची मिळतात.


अभंग क्र. 168
काय कळे बाळा । बाप सदैव दुबळा ॥१॥
आहे नाही हे न कळे । हाती काय कोण्या वेळे ॥धृपद॥
देखिले ते दृष्टी । मागे घालूनिया मिठी ॥२॥
तुका म्हणे भावे । माझे मज समजावे ॥३॥
अर्थ

लहान मुलाला आपला बाप श्रीमंत आहे की गरीब आहे हे कळत नसते. आपल्याला एखादी वास्तु देणे शक्य होईल की नाही हे त्याला समजत नसते. एखादि वस्तु पाहिली की हट्ट करुण ती घेणे एवढेच त्याला कळते. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मनातहि विठ्ठलाविषयी प्रती असाच भाव आहे. तो त्याने समजून घेऊन, मला जाणावे.

जानेवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading