आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१४ ऑगस्ट, दिवस २२६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी ३५१ ते ३७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २७०१ ते २७१२
“१४ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १४ August
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १४ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २७०१ ते २७१२ चे पारायण आपण करणार आहोत.
१४ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ३५१ ते ३७५ ,
351-14
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
एऱ्हवी तरी सहजे । सुखदुःख तैचि सेविजे । देहजळी होईजे । मासोळी जै ॥351॥
सहज विचार करून पाहिले तर देहरूपी जलामधे जेव्हा मासोळी होऊन राहावे (पूर्ण देहतादात्म्य घ्यावे) तेव्हाच सुखदु:ख भोगावे लागते.
352-14
आता ते तव तेणे सांडिले । आहे स्वस्वरूपेंसीचि मांडिले । सस्याती निवडिले । बीज जैसे ॥352॥
ज्याप्रमाणे मळणी झाल्यावर दाणे हे कोंड्यापासून वेगळे काढावे, त्याप्रमाणे आता त्याने ते देहतादात्म्य टाकले आहे व तो आपल्या आत्मस्वरूपाने स्थिर राहिला आहे.
353-14
का वोघ सांडूनि गांग । रिघोनि समुद्राचे आंग । निस्तरली लगबग । खळाळाची ॥353॥
अथवा गंगेच्या पात्राला सोडून आणि समुद्राच्या पात्रात प्रवेश करून आपली खळबळ वाहाण्याची लगबग नाहीशी केली.
354-14
तेवी आपणपाचि जया । वस्ती जाली गा धनंजया । तया देही अपैसया । सुख तैसे दुःख ॥354॥
अर्जुना त्याप्रमाणे ज्याची वस्ती आपल्या ठिकाणी (आत्मस्वरूपी) झाली, त्याला सहजच देहामधे जसे सुख तसेच दु:ख असते.
355-14
रात्रि तैसे पाहले । हे धारणा जेवी एक जाले । आत्माराम देही आतले । द्वंद्व तैसे ॥355॥
जशी रात्र तसेच उजाडणे, हे खांबाला जसे एकसारखे असते, त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी रममाण झालेल्या गुणातीतास देहाला व्यापून असणारी सुखदु:खादि द्वंद्वे आहेत.
356-14
पै निद्रिताचेनि आंगेशी । सापु तैशी उर्वशी । तेवी स्वरूपस्था सरिशी । देही द्वंद्वे ॥356॥
ज्याप्रमाणे निजलेल्या पुरुषाच्या अंगावर जसा साप तशीच उर्वशी त्याप्रमाणे आत्मस्वरूपी ज्याची वस्ती झाली आहे, त्यास देहात द्वंद्वे सारखी आहेत.
357-14
म्हणौनि तयाच्या ठायी । शेणा सोनया विशेष नाही । रत्ना गुंडेया काही । नेणिजे भेदु ॥357॥
म्हणून त्याच्या ठिकाणी शेण व सोने यात कमीअधिकपणा नाही व रत्न व दगड यामधे त्यास काही फरक वाटत नाही.
358-14
घरा येवो पा स्वर्ग । का वरिपडो वाघ । परी आत्मबुद्धीसि भंग । कदा नव्हे ॥358॥
घराला स्वर्ग येवो अथवा त्याच्या अंगावर वाघ उडी घालो, परंतु त्याच्या आत्मबुद्धीला केव्हाही भंग होत नाही.
359-14
निवटले न उपवडे । जळीनले न विरूढे । साम्यबुद्धी न मोडे । तयापरी ॥359॥
ज्याप्रमाणे मेलेला मनुष्य जागा होत नाही, अथवा जळलेल्या बीजाला अंकुर फुटत नाही, त्याप्रमाणे त्याची आत्मैक्यबुद्धी मोडत नाही.
360-14
हा ब्रह्मा ऐसेनि स्तविजो । का नीच म्हणौनि निंदिजो । परी नेणे जळो विझो । राखोंडी जैसी ॥360॥
‘हा ब्रह्मदेव आहे ” असे म्हणून त्याची स्तुती केली अथवा ‘नीच ” म्हणून त्याची निंदा केली पण राख जशी जाळणे अथवा विझणे जाणत नाही.
361-14
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तैसी निंदा आणि स्तुती । नये कोण्हेचि व्यक्ती । नाही अंधारे का वाती । सूर्या घरी ॥361॥
त्याप्रमाणे तो कोणाची निंदा व स्तुती करत नाही किंवा दुसर्यानी जरी निंदा व स्तुती केली तरीही त्यास आनंद व दुःख कोणत्याच रूपाने व्यक्त होत नाहीत. सूर्याच्या घरी अंधार वा उजेड नाही ज्याप्रमाने सूर्याच्या घरी अंधार वा उजेड या दोन्हीही कल्पना नाही, त्याचप्रमाने त्याच्या अंतकरनात सुखदु:खाची कल्पना ही नाही.
362-14
मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः ।
सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते ॥14. 25॥
श्लोकार्थ -: :- मान व अपमान समान मानणारा, मित्र व शत्रु दोन्ही समान बुद्धी ठेवणारा प्रकृती सर्व करते अशा बोधावर आल्यामुळे बर्यावाईट सर्व कर्मांचा आरंभ न करणे हे ज्याचे शील, असा जो असतो त्याला गुणातीत म्हणतात.
ईश्वर म्हणौनि पूजिला । का चोरु म्हणौनि गांजिला । वृषगजी वेढिला । केला रावो ॥362॥
तो ईश्वर आहे असे समजुन त्याची पूजा केली अथवा तो चोर आहे, म्हणून त्यास छळले, तो बैल व हत्ती यांनी वेढला गेला अथवा त्याला राजा केला.
363-14
का सुहृद पासी आले । अथवा वैरी वरपडे जाले । परी नेणे राती पाहाले । तेज जेवी ॥14-363॥
अथवा मित्र जवळ आले अथवा शत्रू अंगावर धावुन आले, तरी पण तो मिञ असो अथवा शञु या दोघामध्येही समानता समजतो. किंवा कोणत्याही प्रकारचा भेद मानित नाही. ज्याप्रमाने सूर्याचे तेज राञ व दिवस जाणत नाही.
364-14
साही ऋतु येता आकाशे । लिंपिजेचि ना जैसे । तेवी वैषम्य मानसे । जाणिजेना ॥364॥
आकाशाच्या पोटात जरी सहा ऋतु येऊन गेले, तरी आकाश जसे त्यांच्याकडून लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो राग आणि द्वेष भेदभाव जाणत नाही. त्याप्रमाने त्याच्या बुद्धिला विषमता ही माहीतच नसते.
365-14
आणीकही एकु पाही । आचारु तयाच्या ठायी । तरी व्यापारासि नाही । जाले दिसे ॥365॥
आणखी एक आचार त्याच्या ठिकाणी आहे पहा. तो हाच की त्याच्या ठिकाणी कर्ममात्राचा अभाव झालेला दिसतो. कर्तृव्य, अहंकार व फळाच्या इच्छेचा त्याग करणे. हाच त्याचा आचार असतो.
366-14
सर्वारंभा उटकले । प्रवृत्तीचे तेथ मावळले । जळती गा कर्मफळे । ते तो आगी ॥366॥
ज्याप्रमाने त्याचे ऐहिक असणारे कर्म बंद पडते. पारलौकिक कर्म उदयास जाते. आणि त्याच्या ठिकानची कर्मफळे जळुन जातात. कारण तो त्याच क्षणी गुणातीत किंवा जणु ज्ञानाग्निरुप झालेला असतो.
367-14
दृष्टादृष्टाचेनि नांवे । भावचि जीवी नुगवे । सेवी जे का स्वभावे । पैठे होये ॥367॥
आपल्याला इहलोकीचे अथवा परलोकीचे भोग मिळावेत अशी इच्छाच त्याच्या अंत:करणात उत्पन्न होत नाही. प्रारब्धाने जे सहज प्राप्त होईल त्याचे तो सेवन करीत असतो.
368-14
सुखे ना शिणे । पाषाणु का जेणे माने । तैसी सांडीमांडी मने । वर्जिली असे ॥368॥
ज्याप्रमाणे दगड कोणत्याही उपचाराने सुखावला जात नाही व दु:खही पावत नाही, त्याप्रमाने तो ज्ञानाग्निरुप झालेला पुरुष प्रिय अथवा अप्रिय भोगाने सुखावला जात नाही आणि त्याची इच्छाही मनात धरत नाही. त्याप्रमाने भोगाविषयाची कोणतीच विचारचक्र त्याच्या मनामध्ये घर करत नाही.
369-14
आता किती हा विस्तारु । जाणे ऐसा आचारु । जयाते तोचि साचारु । गुणातीतु ॥369॥
आता ह्या बोलण्याचा किती विस्तार करावा ? ज्या पुरुषाचे असे आचरण असेल तोच खरोखर ज्ञानाग्निरुप झाला आहे असे समज.
370-14
गुणांते अतिक्रमणे । घडे उपाये जेणे । तो आता आईक म्हणे । श्रीकृष्णनाथु ॥370॥
ज्या उपायांनी गुणांचे उल्लंघन करता येते तो प्रकार आता यापुढे सांगत आहे ते तु ऐक. असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले.
371-14
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
मां च योऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते ।
स गुणान्समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते ॥14. 26॥
श्लोकार्थ अव्यभिचारी (अभेद) भक्तियोगाने जो माझी उपासना करतो, तो या गुणांच्या पूर्णपणे पलीकडे जाऊन त्यास ब्रह्मत्व प्राप्त होण्याची योग्यता येते.
गुणातीत कसे व्हावे ? भक्तियोग
तरी व्यभिचाररहित चित्ते । भक्तियोगे माते । सेवी तो गुणाते । जाकळू शके ॥371॥
तर माझ्यावाचून दुसरीकडे कोठेही मन गुंतू न देता भजनरूप मार्गाच्या द्वारा जो माझी उपासना करतो, तो गुणांना ताब्यात ठेऊ शकतो.
372-14
तरी कोण मी कैसी भक्ती । अव्यभिचारा काय व्यक्ती । हे आघवीचि निरुती । होआवी लागे ॥372॥
तर मी कोण आहे, भक्ती ती कशी असते व एकनिष्ठतेचे स्पष्ट स्वरूप काय, हा सर्व निर्णय झाला पाहिजे.
373-14
तरी पार्था परियेसा । मी तव येथ ऐसा । रत्नी किळावो जैसा । रत्नचि की तो ॥373॥
या विश्वात मी कोण आहे हे तुला सांगतो. तर अर्जुना, ऐक. मी तर या विश्वात असा आहे की ज्याप्रमाणे रत्नाचे ठिकाणी असलेले तेज रत्नच आहे.
374-14
का द्रवपणचि नीर । अवकाशचि अंबर । गोडी तेचि साखर । आन नाही ॥374॥
अथवा ओलेपणाच जसे पाणी आहे किंवा पोकळीच आकाश आहे अथवा गोडी तीच जशी साखर आहे, वेगळी नाही.
375-14
वन्हि तेचि ज्वाळ । दळाचि नांव कमळ । रूख तेचि डाळ- । फळादिक ॥375॥
अग्नी तोच जसा जाळ आहे, पाकळ्यांचेच नाव जसे कमळ आहे, वृक्ष तोच जसे फांद्या, फळे वगैरे आहे,
दिवस २२६ वा. १४, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २७०१ ते २७१२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २७०१
आधी सोज्वळ करावा मारग । चालता ते मग गोवी नाही ॥१॥
ऐसा चालोनिया आला शिष्टाचार । गोवीचा वेव्हार पापपुण्य ॥धृपद॥
पळणे तो पळो सांडुनि का बळे । उपाधीच्या मुळे लाग पावे ॥२॥
तुका म्हणे येथे शूर तो निवडे । पडिले बापुडे कालचक्री ॥३॥
अर्थ
आपल्याला ज्या मार्गाने चालायचे आहे तो मार्ग स्वच्छ करावा म्हणजे मग कोणताही अडथळा येत नाही. असा शिष्टाचार परमार्थमार्गामध्ये पूर्वीपासून चालत आलेला आहे जसे वेदाने सांगितले आहेच त्याचप्रमाणे परमार्थमार्गाने आपण चालावे या परमार्थमार्गामध्ये पाप आणि पुण्याचा व्यवहार आपल्याला अडथळा आणतात. जर या परमार्थामध्ये धावायचे असेल तर देहबुध्दी टाकून धावावे नाहीतर उपाधीमुळे सुख दु:ख आपल्या पाठीमागे लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, “जो परमार्थमार्गामध्ये विवेक आणि वैराग्य संपन्नशूर आहे तोच यातून सुटतो बाकी सर्व बापुडे लोक या कालचक्रात पडतात. ”
अभंग क्र. २७०२
उद्धत त्या जाती । द्रवे रंगल्या उद्धती ॥१॥
म्हणऊनि बहु फार । त्यासी असावे अंतर ॥धृपद॥
कैचे पाठी पोट । गोड विषासी सेवट ॥२॥
तुका म्हणे सापा । न कळे कुरवाळिले बापा ॥३॥
अर्थ
उध्दट जाती कोणत्या आहेत तर ज्याच्याकडे सत्ता संपत्ती द्रव्याचा माज असतो त्याच माणसाची जात उध्दट असते. म्हणूनच त्या मनुष्यापासून आपले फारच दूरवर अंतर असावे. अहो विषाला कसली पाठ आणि पोट विषमय झालेला कोणताही पदार्थ किंवा काहीही असो त्याचा शेवट गोड होतो काय ? तुकाराम महाराज म्हणतात, “हे बाबांनो सापाला कधीही कुरवाळू नये तो त्याचा मूळ स्वभाव दंश करण्याचा तो कधीही सोडत नाही त्याप्रमाणे उध्दट जातीच्या माणसाशी कधीही संगती करु नये तो आपल्याला दंशच करीन. ”
अभंग क्र. २७०३
आम्हा कथा आवश्यक । येर संपादूं लौकिक ॥१॥
जैसी तैसी माय बरी । मानिल्या त्या माना येरी ॥धृपद॥
व्यालीचा कळवळा । जीव बहुत कोवळा ॥२॥
कवतुके वावरे । तुका म्हणे त्या आधारे ॥३॥
अर्थ
आम्हाला हरीकथा कथन करणे हे आवश्यक आहे बाकी लौकिक आम्ही नंतर संपादन करु. बालकाने आपली आई कशी असो जशी असेल तशी तिला बरीच मानावे आणि इतर स्त्रियांना जसा मान देता येईल तसा दयावा. जन्म दिलेल्या बालकाविषयी आईचा फार कळवळा असतो, तिचा जीव फार कोवळा असतो तसा इतर स्त्रियांचा नसतो. तुकाराम महाराज म्हणतात, “मी ही हरीकथेच्या आधारानेच कौतुकानेच वावरत आहे. ”
अभंग क्र. २७०४
पाळितो वचन । परि बहु भीते मन ॥१॥
करितो पायाशी सलगी । नये बैसो अंगसंगी ॥धृपद॥
जोडोनिया कर । उभे असावे समोर ॥२॥
तुका म्हणे संत । तुम्ही मी बहु पतित ॥३॥
अर्थ
हे संतजनहो मी तुमचे “वचन” आज्ञा म्हणून पाळतो परंतू माझ्याकडून काही चुकले आहे काय म्हणून माझे मन फार भीत आहे. मी तुमच्या पायाजवळ बसलो आहे तुमच्या बरोबरीला किंवा तुमच्या अंगसंगतीला मी बसू शकत नाही कारण माझा तेवढा अधिकार नाही. तुकाराम महाराज म्हणतात अहो मी हात जोडून तुमच्यासमोर उभे असावे हेच माझे मुख्य कर्तव्य आहे. कारण तुम्ही संत आहात आम्ही फारच पतित आहे. ”
अभंग क्र. २७०५
जैसा तैसा आता । मज प्रमाण अनंता ॥१॥
पाया पडणे न सोडी । पोटी तेच वर तोंडी ॥धृपद॥
एका भावे चाड । आदी तेचि अंती गोड ॥२॥
तुका म्हणे आम्हा । टळणेंचि नाही नेमा ॥३॥
अर्थ
देवा आता तू जसा असशील तसा असशील आता मला तूच प्रमाण आहे. त्यामुळे मी तुझ्या पाया पडणे कधीही सोडणार नाही आणि जो माझ्या अंतरंगात भक्तीभाव आहे तोच भक्तीभाव माझ्या तोंडातही आहे. हे अनंता मला तुझ्याविषयी एकनिष्ठ आवड आहे आणि त्याच कारणामुळे सुरवातीला जसा नियम केला तसा त्याचा अंतही गोड व्हावा असे मला वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा जो गोड नियम सुरवातीला केलेला आहे तो आमच्याबाबतीत टाळायचा नाही. ”
अभंग क्र. २७०६
चुकलो या ऐशा वर्मा । तरी कर्मा सापडलो ॥१॥
पाठी लागे करी नास । गर्भवास भोगवी ॥धृपद॥
माझे तुझे भिन्नभावे । गळा दावे मोहाचे ॥२॥
तुका म्हणे पाठेळ केलो । नसत्या भ्यालो छंदासी ॥३॥
अर्थ
सर्व काही हरीला समर्पण करावे हे वर्म मी चुकलो त्यामुळेच मी कर्माच्या अडचणीत सापडलो. आणि आता तेच कर्म माझ्या पाठीशी लागले असून माझा नाश ते करीत आहे व मला गर्भवास भोगायला लावत आहे. माझे तुझे असे भिन्नभाव या कर्माने निर्माण केले आणि मोहाचे दावे गळयाला लावले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “या कर्माने मला पाठीवर बैलासारखे केले आहे आणि नसत्या या प्रपंचाच्या छंदाने मी ही भ्यालो आहे. ”
अभंग क्र. २७०७
देह प्रारब्धा शिरी । असोनि करी उद्वेग ॥१॥
धाव घाली नारायणा । माझ्या मना जागवी ॥धृपद॥
ऐसी चुकोनिया वर्मे । पीडा भ्रमे पावलो ॥२॥
तुका म्हणे कैचा भोग । नव्हे रोग अंगीचा ॥३॥
अर्थ
देह प्रारब्धाच्या माथ्यावर आहे हे माहित असताना देखील मी निष्कारण उव्देग करीत आहे. त्यामुळे हे नारायणा तू धाव घाल आणि माझ्या मनाला याविषयी मला जागृत कर. अहो सुख दु:ख हे तर प्रारब्धाच्या माथ्यावर आहे हेच खरे वर्म मी विसरलो त्यामुळे मी नसत्या भ्रमाने मी पिडीत झालो. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे शरीराला होणारे भोग हे एक प्रकारचे रोग नाहीत काय ? ”
अभंग क्र. २७०८
अनंताच्या ऐको कीर्ती । ज्याच्या चित्ती हरीनाम ॥१॥
उलंघूनि गेले सिंधु । हा भवबंधु तोडोनिया ॥धृपद॥
हळुहळु तेचि वाही । चालो काही अधिकारे ॥२॥
खुंटूनिया गेले नावा । नाही हेवा खोळंबला ॥३॥
न लगे मोल द्यावा रुका । भावे एका कारणे ॥४॥
भीमातिरी थडवा केला । उठा चला लवलाहे ॥५॥
तुका म्हणे पाहतो वाट । उभा नीट पाउली ॥६॥
अर्थ
मी अनंताची व ज्याच्या चित्तात हरीनाम आहे अशा भक्तांची किर्ती ऐकली आहे. ते भक्त भवबंध तोडून संसारसिंधू उल्लंधून गेले आहेत. आम्हीही आमच्या अधिकारप्रमाणे हळूहळू त्या मार्गानेच चालत राहू. ज्या नावेव्दारे हरीभक्त संसारसिंधू तरुन गेले आहेत ती नांव त्यांनी खुंटाला बांधून ठेवली आहे त्यामुळे आमचे ठेवेचा खोळंबा झाला नाही. त्या नावेत बसण्याकरता भक्तांना एक रुका देखील मोल मोजावे लागत नाही किंवा दयावे लागत नाही केवळ एकनिष्ठ भक्तीभाव भक्ताच्या ठिकाणी पाहिजे. त्या भवसिंधूतुन उतार हेण्यासाठी चंद्रभागेच्या तीरावर उतार केला आहे त्यामुळे लवकर उठा आणि चला. तुकाराम महाराज म्हणतात, “तो हरी आपली दोन्ही पावले विठेवर नीट ठेवून उभा आहे आणि भक्तांची वाट पाहातो आहे. ”
अभंग क्र. २७०९
तरीच म्या देवा । साटी करूनिया जीवा ॥१॥
येथे बैसलो धरणे । दृढ कायावाचामने ॥धृपद॥
आवरील्या वृत्ति । मन घेउनिया हाती ॥२॥
तुका म्हणे जरा । बाहेर येऊ नेदी घरा ॥३॥
अर्थ
देवा मी माझ्या जीवावर उदार होऊन, तुझ्याजवळ मी कायावाचामन दृढ धरुन धरणे धरुन बसलो आहे. मी माझे मन हातात घेतले आहे आणि माझ्या सर्व वृत्ती आवरल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता मी माझ्या मनरुपी घरामध्ये तुला कोंडून ठेवले आहे आणि त्या घरातून थोडे देखील बाहेर येऊ देणार नाही. ”
अभंग क्र. २७१०
हे तो एक संतांठायी । लाभ पायी उत्तम ॥१॥
म्हणविता त्याचे दास । पुढे आस उरेना ॥धृपद॥
कृपादान केले संती । कल्पांती ही सरेना ॥२॥
तुका म्हणे संतसेवा । हाचि हेवा उत्तम ॥३॥
अर्थ
संतांच्या पायाजवळच उत्तम प्रकारचा लाभ होतो. एकदा की स्वत:ला त्यांचा दास म्हणून घेतले की पुढे कोणत्याही प्रकारची अपेक्षा उरत नाही. एकदा की संतांनी कृपादान केले की ते कल्पांतापर्यंतही सरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हे देवा संतांची सेवा करणे हेच एक उत्तम साधन आहे. ”
अभंग क्र. २७११
नारायण ऐसा । सेवू नेणतील रसा ॥१॥
जेणे भवव्याध तुटे । दुःख मागुते न भेटे ॥धृपद॥
न लगे काही आटी । बाधा राहो न सके पोटी ॥२॥
कैवल्य ते जोडे । कृपा लवकरी घडे ॥३॥
जन्ममरणदुःख आटे । जाळे अवघेचि तुटे ॥४॥
तुका म्हणे झाला । याचा गुण बहुतांला ॥५॥
अर्थ
नारायण नामरसासारखे उत्तम रस सेवन करावे हे कोणीही जाणत नाही. ज्या नारायणाच्या नामरसाने भवव्याधी तुटते आणि आपल्याला दु:ख भेटत नाही. या नामरसाने कोणत्याही प्रकारची विकाराची बाधा आपल्या पोटात राहू शकत नाही व हे प्राप्त करुन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची आटाआटी करावी लागत नाही. या औषधाने कैवल्याची प्राप्ती होते व देवाची कृपाही लवकर घडते. या औषधाने जन्ममरणाचे दु:ख आटूनच जाते आणि सर्व प्रकारचे जाळे तुटून जाते. तुकाराम महाराज म्हणतात, या नारायण नामरस औषधाने खूप जणांना गुण आला आहे. ”
अभंग क्र. २७१२
मार्ग चुकले विदेशी एकले । तयावरी झाले दिशाभुली ॥१॥
हाती धरुनिया पावविले घरा । त्याच्या उपकारा काय द्यावे ॥२॥
तैसा मी कुडकुडा होतो केशीराजा । सेवा न घडे लाजा म्हणऊनि ॥धृपद॥
सांडियेला गर्भ उबगोनि माउली । नाही सांभाळिली भूमि शुध्द ॥३॥
उष्ण तहान भूक एवढे आकांती । वोसंगा लाविती काय म्हणु ॥४॥
खांद्यावरी शूळ मरणाचे वाटे । अन्यायहि मोठे साच केले ॥५॥
हातीचा हिरोनि घातला पाठीसी । तुका म्हणे ऐसी परी आली ॥६॥
अर्थ
एक परदेशी मार्ग चुकला व त्याला दिशाभूल झाली. अशा परिस्थितीमध्ये एका मनुष्याने त्याचा हात धरुन त्याच्या घरापर्यंत परदेशी मनुष्याला पोहोचवले मग त्या परदेशी मनुष्याने त्याच्या या उपकाराबद्दल त्याला काय दयावे ? हे केशीराजा त्याप्रमाणे मी देखील या संसाराच्या परदेशामध्ये चुकलो होतो तू माझ्या हाताला धरुन मला माझ्या घरापर्यंत (निज स्वरूप) पोहोचवले एवढे मोठे उपकार तू माझ्यावर केले तरी देखील मला तुझी सेवा घडत नाही म्हणून मला याची लाज वाटते. एखादया मुलाचा त्रास येऊन क्रूर आईने त्याचा त्याग करुन त्याला टाकून दयावे आणि जिथे टाकून दिले ती भूमी सुध्दा चांगली आहे किंवा नाही हे देखील त्या क्रूर मातेने पाहिले नाही. मग नंतर त्या बालकाला ऊन लागले तहान भूक लागली आणि आकांत करुन ते रडू लागले तर काय म्हणून ती क्रूर माता त्या बालकाला जवळ घेईन ? मग शेवटी खांदयावर शूळ घेऊन यमदूत तेथे आला आणि त्याला मरणाच्या वाटेवर लावले कारण त्या बालकाने देखील पूर्वजन्मात काहीतरी मोठे अन्याय केले असतील. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा नंतर यमाने त्याला हात धरुन न्यावे परंतू त्याचवेळी एखादया सज्जन व्यक्तीने त्याला यमाच्या हातातून धरुन त्याला सोडवून पाठीशी घालावे असाच काही प्रकार माझ्या बाबतीत झाला आहे देवा तूही मला यमाच्या तावडीतून सोडवून तुझ्या पाठीशी घातले आहे. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















