आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१० नोव्हेंबर, दिवस ३१४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ६२६ ते ६५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३७५७ ते ३७६८
“१० नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 10 November
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १० नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३७५७ ते ३७६८ चे पारायण आपण करणार आहोत.
१० नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ६२६ ते ६५०,
626-18
तैसे कृत्याकृत्य सरकटित । आपपर नुरवित । कर्म होय ते निश्चित । तामस जाण ॥626॥
तसे योग्य-अयोग्य एके ठिकाणी रगडून आपले व दुसऱ्याचे हा भेद असे उरू देत नाही, ते तामस कर्म असे समज. 626
627-18
ऐसी गुणत्रयभिन्ना । कर्माची गा अर्जुना । हे केली विवंचना । उपपत्तीसी ॥627॥
याप्रमाणे अर्जुना, गुणांच्या भिन्नपणाने कर्म तीन प्रकारचे कसे झाले हे तुला दाखवल्यास स्पष्ट करून सांगितले. 627
628-18
आता ययाचि कर्मा भजता । कर्माभिमानिया कर्ता । तो जीवुही त्रिविधता । पातला असे ॥628॥
आता या कर्माचा अभिमान बाळगून त्याचे आचरण करणारा जो जीव, तो याचे योगाने तीन प्रकारचा झाला आहे. 628
629-18
चतुराश्रमवशे । एकु पुरुषु चतुर्धा दिसे । कर्तया त्रैविध्य तैसे । कर्मभेदे ॥629॥
ज्याप्रमाणे, एकाच पुरुषावर ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, व संन्यास या चार आश्रमांच्या योगे चार अवस्था दिसतात, त्याचप्रमाणे कर्माचा भेदाने कर्त्याला तीन अवस्था येतात. 629
630-18
तरी तया तिही आंतु । सात्विक तव प्रस्तुतु । सांगेन दत्तचित्तु । आकर्णी तू ॥630॥
तर त्या तिहींपैकी सात्विक अवस्थेचे प्रथम वर्णन करतो, ते पूर्ण लक्ष देऊन ऐक. 630
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
मुक्त सङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः ।
सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते ॥18. 26॥
631-18
तरी फळोद्देशे सांडिलिया । वाढती जेवी सरळिया । शाखा का चंदनाचिया । बावन्नया ॥631॥
ज्याप्रमाणे मलय पर्वतावरील चंदनाच्या फांद्या फळाची इच्छा न धरिता सरळ वाढतात, तथापि त्या झाडाच्या सर्व भागांस उत्तम सुवासच असतो; 631
632-18
का न फळताही सार्थका । जैसिया नागलतिका । तैसिया करी नित्यादिका । क्रिया जो का ॥632॥
किंवा नागवेल न फळताही सार्थकी लागतो, नागवेल लाजरी फळ येत नाही तरी तिची पानेच उपयोगी पडतात, त्याप्रमाणे जी सर्वतोपरी उत्तम आहेत, त्या नित्यनैमित्तिक कर्मांच्या फळांची इच्छा न धरता जो त्यांचे आचरण करतो, 632
633-18
परी फळशून्यता । नाही तया विफळता । पै फळासीचि पंडुसुता । फळे कायिसी । ॥633॥
पण त्याला फळशून्य असे म्हणू नये; कारण त्या कर्माला विफलता नाहीच म्हणून अर्जुना, फळाला फळे कुठून येणार ? 633
634-18
आणि आदरे करी बहुवसे । परी कर्ता मी हे नुमसे । वर्षाकाळीचे जैसे । मेघवृंद ॥634॥
आणि ती कर्मे आदराने करितो पण कर्तृत्वाचा अभिमान बाळगत नाहीत; ज्याप्रमाणे पावसाळ्यातील मेघ समुदाय काही गर्जना न करिता वृष्टी करितात, 634
635-18
तेवीचि परमात्मलिंगा । समर्पावयाजोगा । कर्मकलापु पै गा । निपजावया ॥635॥
त्याप्रमाणे परमात्म्याला अर्पण करण्यास योग्य होतील अशी कर्मे करण्याकरिता, 635
636-18
तया काळाते नुलंघणे । देशशुद्धिही साधणे । का शास्त्रांच्या वाती पाहणे । क्रियानिर्णयो ॥636॥
काळाची मर्यादा न सोडता, देहशुद्धी साधून कर्माच्या योग्यायोग्यतेचा निर्णय शास्त्ररूप दिव्याने पाहतो- कर्माच्या योग्यायोग्यतेचा निर्णय शास्त्रानुरोधे करितो. 636
637-18
वृत्ति करणे येकवळा । चित्त जावो न देणे फळा । नियमांचिया सांखळा । वाहणे सदा ॥637॥
इंद्रिये व वृत्ती यांचे ऐक्य करून फळाकडे चित्तास न जाऊ देता, जो नियमांची बेडी पायात बाळगतो, 637
638-18
हा निरोधु साहावयालागी । धैर्याचिया चांगचांगी । चिंतवणी जिती आंगी । वाहे जो का ॥638॥
ही अट सहन करण्याकरिता उत्तम प्रकारचे धैर्य आपल्या अंगी असावे, अशा विषयी जो आपल्या मनात जिवंत चिंता वाहतो, ( अहोरात्र त्याजविषयी विचार करीत असतो, ) 638
639-18
आणि आत्मयाचिये आवडी । कर्मे करिता वरपडी । देहसुखाचिये परवडी । येवो न लाहे ॥639॥
आणि आत्म्याचे प्राप्तीविषयी कर्म करीत असता देह सुखाच्या नाश याची पर्वा करीत नाही, 639
640-18
आळसा निद्रा दुऱ्हावे । क्षुधा न बाणवे । सुरवाडु न पावे । आंगाचा ठावो ॥640॥
तो आळस व झोप टाकून देतो त्याला भुकेचीही आठवण होत नाही आणि त्यायोगे जो जो सुख आवस्था दूर दूर पळते, 640
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
641-18
तव अधिकाधिक । उत्साहो धरी आगळीक । सोने जैसे पुटी तुक । तुटलिया कसी ॥641॥
तो तो, सोने ज्याप्रमाणे आंचीत घातल्यावर वजनास कमी भरले तरी कसाच जास्त लागते, त्याप्रमाणे कर्म करण्याविषयी नाना प्रकारे अधिकाधिक उत्साह धरतो. 641
642-18
जरी आवडी आथी साच । तरी जीवितही सलंच । आगी घालिता रोमांच । देखिजती सतिये । ॥642॥
जेथे खरोखर प्रीती आहे तेथे जीवितही तुच्छ असते. सहगमन करताना अग्नीत उडी टाकिते समयीही पती प्रेमामुळे पतिव्रता स्त्री च्या अंगावर रोमांच उभे राहतात ! 642
643-18
मा आत्मया येवढीया प्रिया । वालभेला जो धनंजया । देहही सिदता तया । काय खेदु होईल ? ॥643॥
मग अर्जुना आत्मप्राप्ती सारखी प्रिय वस्तू प्राप्त होण्याविषयी ज्याला इच्छा झाली आहे, त्याचे शरीरास जरी कष्ट झाले तरी याच खेद होईल काय ? 643
644-18
म्हणौनि विषयसुरवाडु तुटे । जव जव देहबुद्धि आटे । तव तव आनंदु दुणवटे । कर्मी जया ॥644॥
म्हणून विषय सुखेच्छा नाहीशी होऊन जो जो देहाविषयी अभिमान कमी होतो, तो तो कर्म करण्याविषयी त्याला दुप्पट आनंद होतो. 644
645-18
ऐसेनि जो कर्म करी । आणि कोणे एके अवसरी । ते ठाके ऐसी परी । वाहे जरी ॥645॥
याप्रमाणे कर्म करीत असता एखादेवेळी ते कर्म जरी बंद पडले, तरी 645
646-18
तरी कडाडी लोटला गाडा । तो आपणपे न मनी अवघडा । तैसा ठाकलेनिही थोडा । नोहे जो का ॥646॥
गाडा डोंगरावरून आपोआप खाली पडून त्याचे तुकडे झाले तरी जसे त्याला त्याबद्दल अवघड वाटत नाही, तसे कर्म राहिले असता तो यत्किंचितही खेद मानीत नाही, 646
647-18
नातरी आदरिले । अव्यंग सिद्धी गेले । तरी तेही जिंतिले । मिरवू नेणे ॥647॥
अथवा आरंभिलेले कर्म सिद्धीस गेले असतानाही त्याबद्दल प्रतिष्ठा मिरवू जाणत नाही, 647
648-18
इया खुणा कर्म करिता । देखिजे जो पंडुसुता । तयाते म्हणिपे तत्त्वता । सात्विकु कर्ता ॥648॥
अर्जुना, कर्माचे आचरण करीत असता, ही लक्षणे ज्याचे ठिकाणी आढळतील, त्याला निश्चयाने सात्त्विक कर्ता म्हणावे. 648
649-18
आता राजसा कर्तेया । वोळखणे हे धनंजया । जे अभिलाषा जगाचिया । वसौटा तो ॥649॥
हे धनंजया, आता राजस कर्त्याची चिन्हे तुला सांगतो. कारण, जगातील सर्व अभिमानांचे ही माहेरघरच होय. 649
रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मकोऽशुचिः ।
हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः ॥18. 27॥
450-18
जैसा गावीचिया कश्मळा । उकरडा होय येकवळा । का स्मशानी अमंगळा । आघवयांची ॥650॥
ज्याप्रमाणे गावातील सर्व घाणेरडे पदार्थ टाकण्याची उकिरडा हे ठिकाण असते, अथवा सर्व अमंगल पदार्थ जसे स्मशानात टाकतात, 650
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ३१४ वा. १०, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३७५७ ते ३७६८
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३७५७
तुज सवे येतो हरी । आम्हा लाज नाही तरी । उचलिल्या गिरी । चांग तई वांचलो ॥१॥
मोडा आता खेळ । गाई गेल्या झाला वेळ । फाकल्या ओढाळ । नाही तेच आवरा ॥धृपद॥
चांग दैवे यमुनेसी । वांचलो बुडता । निलाजिरी आम्ही । नाही भय धाक या अनंता ॥२॥
खातो आगी माती । आता पुरे हा सांगाती । भोवता भोवेल । आम्हा वाटते हे चित्ती ॥३॥
तुका म्हणे उरी नाही तुजसवे । शाहाणिया दुरी छंद भोळीया भावे ॥४॥
अर्थ
बाळ गोपाळ कृष्णाला म्हणतात हे हरी आम्हाला लाजच नाही म्हणून आम्ही तुझ्याबरोबर येतो, कारण हे हरी आम्ही ज्यावेळी संकटात होतो म्हणजे इंद्राने क्रोधित होऊन मुसळधार पाऊस पडला त्यावेळी तू आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला म्हणून आम्ही त्यावेळी चांगलेच वाचलो होतो. आता चला खेळ मोडा गायी गेल्या आहेत खूप वेळ झालेला आहे, आता गाई ओढाळ पणे कुठे जाण्याच्या आतच त्यांना आपण आवरा. आमचे दैव चांगले होते त्यामुळे तर आम्ही यमुनेत बुडता बुडता वाचलो, आम्ही नीलाजिरी होऊन अनंता सोबत राहिलो, तर या अनंताला देखील कसले भय नाही कसला धाक नाही. अरे हा अग्नी माती काहीही खातो त्यामुळे आता याची संगती पुरे झाली आम्हाला हा सोबतीच नको आहे, कारण त्याची संगती जर आम्ही केली तर आम्हाला भोवेल असे आमच्या चित्ताला वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्याशी बरोबरी करणे आम्हाला जमणार नाही परंतु तू शहाण्या माणसा पासून दूर आणि भोळ्या वेडगळ भाविकांचे जवळ राहतोस याचे मला विशेष वाटते.
12:53
अभंग क्र. ३७५८
नको आम्हासवे गोपाळ । येऊ ओढाळा तुझ्या गाई ॥१॥
कोण धावे त्यांच्या लागे । मागे मागे येरझारी ॥धृपद॥
न बैसती एके ठायी । धावती दाही दाही वाटा ॥२॥
तुका म्हणे तू राख मनेरी । मग त्या येरी आम्ही जाणो ॥३॥
अर्थ
श्रीकृष्ण गोपाळांना म्हणतो हे गोपाळांनो, तुमच्या गाई (इंद्रिय) फार ओढाळ आहेत तूम्ही माझ्या बरोबर येवू नका. त्यांच्या मागे मागे सारख्या एझारे कोण घालतो ? कोण धावत जातो ? त्या गाई एकाजागि बसत नाहीत. सारख्या दहा वाटांना उधळतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू फक्त आमची मनरूपी गाय सांभाळ इतर गाई कश्या सांभाळायच्या, ते आम्हाला ठाऊक आहे.
12:53
अभंग क्र. ३७५९
मागायास गेलो सिदोरी । तुझ्या मायेघरी गांजियेलो ॥१॥
तुजविण ते नेदी कोणा । सांगता खुणा जिवे गेलो ॥धृपद॥
वायाविण केली येरझार । आता पुरे घर तुझी माया ॥२॥
तुका म्हणे तू आम्हा वेगळा । राहे गोपाळा म्हणउनी ॥३॥
अर्थ
आम्ही शिदोरि मागायला तुझ्या घरी गेलो तर तुझ्या आईने आम्हाला खुप त्रास दिला. ती तुझ्या शिवाय इतरांना काही देत नाही. ओळखीच्या काहि खुणा सांगून सांगून जीव जाण्याची वेळ आली. फुकटच हेलपाटा मात्र झाला. तुझे घर, तुझी आई यांचा संबंध आम्हाला नको. तुकाराम महाराज म्हणतात, हे श्रीकृष्णा, आम्हाला सोडून तू राहतोस म्हणून हे असे होते.
12:53
अभंग क्र. ३७६०
काकुलती येतो हरी । क्षणभरी निवडिता ॥१॥
तुमची मज लागली सवे । ठायीचे नवे नव्हो गडी ॥धृपद॥
आणीक बोलाविती फार । बहु थोर नावडती ॥२॥
भाविके त्यांची आवडी मोठी । तुका म्हणे मिठी घाली जिवे ॥३॥
अर्थ
क्षणभर जरी आम्ही हरीला बाजूला केले तरी तो काकुळतीला येतो. तो म्हणतो, तुमचा मला लळा लागलेला आहे. तुम्ही माझे सुरवातिपासूनचे सवंगडि आहात, नविन नाहीत. इतर अनेक थोर, श्रेष्ट लोक मला बोलवितात; परंतु ते मला अवडत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, त्याला भाविक भक्तांची फार आवड आहे. त्यांना तो जीवे भावे मीठी मारतो.
12:53
अभंग क्र. ३७६१
वरता वेघोनि घातली उडी । कळंबा बुडी यमुनेसी ॥१॥
हरी बुडाला बोंब घाला । घरची त्याला ठावा नाही ॥धृपद॥
भवनदीचा न कळे पार । काळिया माजी थोर विखार ॥२॥
तुका म्हणे काय वाउग्या हाका । हातीचा गमावुनि थिंका ॥३॥
अर्थ
यमुना तीरी असलेल्या कदंब वृक्षावर श्रीकृष्ण चढला व तेथून त्याने यमुनेत उडी मारली. ‘श्री हरी बुडाला’ अशी तेव्हा चहुकडे ओरड झाली. त्याच्या घरच्या लोकांना तर कोणालाच काळाले नाही. यमुने च्या पात्रात विषारी कालिया आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हाती असलेला हरी सोडता आणि आता उगाच हाका मारता आणि का रडत बसता ?
12:53
अभंग क्र. ३७६२
अवघी मिळोनि कोल्हाळ केला । आता होता म्हणती गेला ॥१॥
आपल्याला रडती भावे । जयासवे जयापरी ॥धृपद॥
चुकलो आम्ही खेळता खेळ । गेला गोपाळ हातीचा ॥२॥
तुका म्हणे धावती थडी । न घाली उडी आत कोणी ॥३॥
अर्थ
सर्व गोपाळानि एकत्र जमुन आरड़ा-ओरडा केला. ते म्हणू लागले, आत्ता पर्यंत हा हारी इथेच होता आणि एकदम नाहिसा कसा काय झाला. ज्याची त्याच्यावर जशी श्रदधा होती, जसे प्रेम होते, तसे ते रडत होते. खेळताना त्याची आणि आमुची चुकामुक झाली आणि तो हातचा गेला. तुकाराम महाराज म्हणतात, धावत सर्व जण काठावर गेले; परंतु कोणीच उडी घेइना.
12:54
अभंग क्र. ३७६३
भ्याली जिवा चुकली देवा । नाही ठावा जवळी तो ॥१॥
आहाकटा करिती हाय । हात डोके पिटिती पाय ॥धृपद॥
जवळी होता न कळे आम्हा । गेल्या सीमा नाही दुःखा ॥२॥
तुका म्हणे हा लाघवी मोठा । पाहे खोटा खरा भाव ॥३॥
अर्थ
गोपाळ स्वतःच्या जीवाला घाबरले आणि त्यामुळे ते भगवंताला मोकलले. वास्तविक तो त्यांच्या जवळच, त्यांच्या अंतकरणात होता; परंतु त्यांना ते ठाऊक नव्हते. ते सर्वजन ‘आहा’ ‘हायऱ्हाय’ करू लागले. आपापले हात-पाय डोके पिटून घेऊ लागले. देव जवळ होता, पण तो आम्हाला काळाला नाही. तो गेल्यावर आता आमच्या दुःखला पारावार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देव मोठा लाघवि आहे. प्रत्येकाच्या मनातला खरा-खोटा भाव तो ओळखतो.
12:54
अभंग क्र. ३७६४
काळिया नाथूनि आला वरी । पैल हरी दाखविती ॥१॥
दुसरिया भावे न कळे कोणा । होय नव्हेसा संदेह मना ॥धृपद॥
रूपा भिन्न पालट झाला । गोरे सांवळेंसा पै देखिला ॥२॥
आश्वासीत आला करे । तुका खरे म्हणे देवा ॥३॥
अर्थ
लोकाहो, तो पहा, भगवान श्रीकृष्ण कालियाचे मर्दन करून पाण्यातून वर आला आहे. ‘ तो पहा, पलीकडे दिसतो आहे, ‘ असे म्हणत ते गोपाळ एकमेकांना दाखवु लागले. प्रेमपूर्वक श्रद्धेवाचुन दुसऱ्या कोणत्याही भावनेने कोणालाही देव दिसणार नाही. शुद्ध, भाव, प्रेम नसले तर देव जवळ असूनही ‘तो नाही’ ‘तो दिसत नाही’ असा भ्रम मनात निर्माण होतो. देव अवतार घेतो म्हणजे त्याच्या ब्रम्हरूपात बदल होतो. पूर्वीच्या रामआवतारात दिसणारा देव गोरा होता, तर आताच्या कृष्ण आवतारात तो काळा दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ‘गोपाळांनो, भिवु नका, मी आलोच’ असे म्हणत आश्वासन देत, देव तुमच्याजवळ आला.
12:54
अभंग क्र. ३७६५
हरी गोपाळांसवे सकळा । भेटे गळ्या गळा मेळवूनी ॥१॥
भाविके त्यांची आवडी मोठी । सांगे गोष्टी जीविंचिया ॥धृपद॥
योगियांच्या ध्याना नये । भाकरी त्यांच्या मागोनि खाये ॥२॥
तुका म्हणे असे शाहाणिया दुरी । बोबडिया दास हाका मारी ॥३॥
अर्थ
सर्व गोपाळा सोबत मिळून हरीने त्यांच्या गळ्याला गळाला लावून सर्वाची भेट घेतली. भाविक गोपाळांची देवाला खूप मोठी आवड आहे त्यामुळे आपल्या अंतरंगातील गुह्य गोष्टी तो गोपाळांना सांगू लागला. जो हरी योग्यांच्या ध्यानस्थ अवस्थेमध्ये त्यांच्या ध्यानी लवकर येत नाही तोच गोपाळांना भाकरी मागून खात आहे. तुकाराम महाराज म्हणतात शहाण्या शब्द ज्ञानी मनुष्य पासून देव दूर राहतो तसेच बोबड्या गोपाळांनी त्याला हाक मारली की तो त्यांच्यापुढे दासा सारखा उभा राहतो.
12:54
अभंग क्र. ३७६६
धाव कान्होबा गेल्या गाई । न म्हणे मी कोण काई ॥१॥
आपुलियांचे वचन देवा । गोड सेवा करीतसे ॥धृपद॥
मागता आधी द्यावा डाव । बळिया मी तो नाही भाव ॥२॥
तुका म्हणे ऐशा सवे । अनुसरावे जीवेभावे ॥३॥
अर्थ
कान्होबा, अरे, गाई दूर गेल्या. धाव (असे गोपाळ त्याला म्हणतात) मी कोण आहे ? असली हलकी कामे मला का सांगता ? असे श्रीकृष्ण कधीच म्हणत नव्हता. देवाला आपल्या खऱ्या भक्ताचे बोलने गोड वाटते. तो त्यांची सेवा करतो. देवा, तू आज अगोदर डाव द्यायला पाहिजे. असे जर सवांगड्यानि म्हंटले तर ” मी सामर्थ्यवान आहे ” मी का म्हणून आधी डाव देवु ? ” असा विचार तो कधीच करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, श्रीकृष्ण ज्या गोपाळांचा दास होतो, अश्या भक्त गोपाळांना शरण जावे व त्यांचे अनुकरण करावे, असे मला वाटते.
12:54
अभंग क्र. ३७६७
आणीके काय थोडी । परि ते फार खोटी कुडी ॥१॥
सदा मोकळीच गुरे । होती फजीत ती पोरे ॥धृपद॥
सदा घालिती हुंबरी । एक एकाचे न करी ॥२॥
तुका म्हणे घरी । माय वेळोवेळा मारी ॥३॥
अर्थ
जगामध्ये गोपाळाची मुले थोडी आहेत काय परंतू ती फार वाईट आणि वाईट वृत्तीचे आहेत. त्या गोपाळांच्या पोरांची इंद्रियरुपी गुरे नेहमी मोकळीच असतात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नसतात त्यामुळे त्या पोरांची नेहमी फजितीच होते. नेहमी ती पोरे एकमेकांशी भांडत असतात कधीही कोणाचे काहीच ती पोरे ऐकत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, “या पोरांच्या घरी त्यांची आई त्यांना नेहमी मारत असते म्हणजेच मायेमुळे यांना अनेकवेळा फजित व्हावे लागते. ”
12:54
अभंग क्र. ३७६८
बहुतांचे संगती । बहु पावलो फजिती ॥१॥
बरे केले नंदबाळे । मागिलांचे तोंड काळे ॥धृपद॥
माझा करितील तंटा । लपती आलिया बोभाटा ॥२॥
तुका म्हणे काई । किती म्हणो बाप आई ॥३॥
अर्थ
संसारामध्ये मी खूप जणांची संगती केली त्यामुळे माझी खूप फजिती होत आहे. परंतु या नंद बाळाने हे खूप चांगले केले ते म्हणजे माझा अंगीकार केला आणि माझे पूर्वसंचित पूर्णपणे जाळून टाकले. संसारामध्ये माझे सोबती असलेले माझ्याशी भांडणं करतात माझ्याशी भांडण करुन त्याचा बोभाटा करतात आणि माझ्यावर काही संकट आले की, मग ते लपून बसतात. तुकाराम महाराज म्हणतात, “या संसारात आईबापाना आता किती वेळा आईबाप म्हणावे खरा मायबाप तर भगवान श्रीकृष्णच आहे. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















