१३ जुलै, दिवस १९४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ७२६ ते ७५० सार्थ तुकाराम गाथा अभंग २३१७ ते २३२८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१३ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १३ July
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १३ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
१३ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ७२६ ते ७५०,

726-13
जो लाटणे ऐसा न लवे । पाथरु तेवी न द्रवे । गुणियासि नागवे । फोडसे जैसे ॥१३-७२६॥
जो लाटण्यासारखा लवत नाही, जसा दगडाला तसा त्याला पाझर फुटत नाही, ज्याप्रमाणे फुरसे चावले असता मांत्रिकाला उतरवता येत नाही, त्याप्रमाणे मोठा ज्ञाता देखील त्याला ताळ्यावर आणू शकत नाही.
727-13
किंबहुना तयापाशी । अज्ञान आहे वाढीसी । हे निकरे गा तुजसी । बोलत असो ॥१३-७२७॥
फार काय सांगावे ? त्याच्याजवळ अर्जुना, अज्ञान वाढत्या प्रमाणात आहे हे आम्ही तुला निक्षून सांगतो.
728-13
आणिक पाही धनंजया । जो गृहदेह सामग्रिया । न देखे कालचेया । जन्माते गा ॥१३-७२८॥
(अज्ञानाची लक्षणे = मागील जन्माची आठवण नाही, मृत्यूचे स्मरण नाही, विषयसुखात रममाण) अर्जुना, आणखी असे पहा की जो, शरीर सामग्रीच्या योगाने घर वगैरे पसार्‍यात गुंतल्याने मागील जन्माची आठवण ठेवीत नाही
729-13
कृतघ्ना उपकारु केला । का चोरा व्यवहारु दिधला । निसुगु स्तविला । विसरे जैसा ॥१३-७२९॥
मागील जन्माला कसा विसरतो हे माऊली दृष्टांताने सांगतात, कृतघ्न मनुष्याच्या उपयोगी पडलेले ते जसे तो विसरतो अथवा चोराला भांडवल दिले असता तो जसा ते विसरतो अथवा कोडग्या पुरुषाची स्तुती केली असता तो जशी ती विसरतो
730-13
वोढाळिता लाविले । ते तैसेच कान पूंस वोले । की पुढती वोढाळु आले । सुणे जैसे ॥१३-७३०॥
कुत्रे ओढाळपणा करते म्हणून त्याचे कान व शेपूट कापून त्यास घराबाहेर हाकलून दिले तरी ते ओढाळ कुत्रे कान व शेपूट रक्ताने ओले असतानाच ते सर्व विसरून ज्याप्रमाणे पुन्हा घरात खोडी करण्याकरता शिरते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


731-13
बेडूक सापाचिया तोंडी । जातसे सबुडबुडी । तो मक्षिकांचिया कोडी । स्मरेना काही ? ॥731॥
बेडूक सापाच्या तोंडात सगळा गिळला जात असतानाही माशांचे समुदाय गिळतो पण ‘आपण मरतो ” ही आठवण ठेवीत नाही.
732-13
तैसी नवही द्वारे स्रवती । आंगी देहाची लुती जिती । जेणे जाली ते चित्ती । सलेना जया ॥733॥
त्याप्रमाणे शरीराची नाक तोंड वगैरे ही नऊ द्वारे मळाने पाझरत असून व शरीराला झालेले कुष्ट अंगावर प्रत्यक्ष असूनही ही स्थिती ज्या जन्माच्या योगाने प्राप्त झाली, ती गोष्ट ज्याच्या अंत:करणात सलत नाही,
733-13
मातृकोदरकुहरी । सूनि विष्ठेचा दाथरी । जठरी नवमासवरी । उकडला जो ॥733॥
आईच्या उदररूप गुहेत विष्ठेच्या थरांमधे घालून, त्या पोटात नऊ महिने पर्यंत ज्यावेळी शिजला.
734-13
ते गर्भीची जे व्यथा । का जे जाले उपजता । ते काहीचि सर्वथा । नाठवी जो ॥734॥
ती गर्भात असता झालेली पीडा अथवा जन्माच्या काळी झालेले कष्ट, ते काहीच जो मुळी आठवत नाही.
735-13
मलमूत्रपंकी । जे लोळते बाळ अंकी । ते देखोनि जो न थुंकी । त्रासु नेघे ॥735॥
विष्ठा व मूत्र यांच्या चिखलात लोळणारी मुले मांडीवर पाहून जो किळस घेत नाही व कंटाळत नाही.


736-13
कालचि ना जन्म गेले । पाहेचि पुढती आले । ऐसे हे काही वाटले । नाही जया ॥736॥
मागला जन्म नुकताच संपला नाही काय ? व लागलीच पुन: उद्या दुसरा जन्म मिळणार असे हे काही ज्याला वाटले नाही.
737-13
आणि पै तयाची परी । जीविताची फरारी । देखोनि जो न करी । मृत्युचिंता ॥737॥
आणि त्याचप्रमाणे आयुष्याची भरभराट पाहून ज्याला मरणाची काळजी वाटत नाही,
738-13
जिणेयाचेनि विश्वासे । मृत्यु एक एथ असे । हे जयाचेनि मानसे । मानिजेना ॥738॥
जगण्याचा त्याला इतका विश्वास असतो की, येथे एक मृत्यू आहे, हे ज्याच्या मनाला पटत नाही.
739-13
अल्पोदकीचा मासा । हे नाटे ऐसिया आशा । न वचेचि का जैसा । अगाध डोहा ॥739॥
थोडक्या पाण्यातील मासा हे पाणी आटणार नाही अशा आशेने जसा खोल डोहाला जात नाही.
740-13
का गोरीचिया भुली । मृग व्याधा दृष्टी न घाली । गळु न पाहता गिळिली । उंडी मीने ॥740॥
अथवा पारध्याच्या गाण्याला भुलून हरिणाची नजर जशी पारध्यावर जात नाही, अथवा गळास न पहाता, गळास लावलेले आमीष माशाने गिळावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


741-13
दीपाचिया झगमगा । जाळील हे पतंगा । नेणवेचि पै गा । जयापरी ॥741॥
दिव्याच्या चकाकीने हा दिवा आपल्याला जाळील हे ज्याप्रमाणे पतंगाला मुळीच कळत नाही.
742-13
गव्हारु निद्रासुखे । घर जळत असे ते न देखे । नेणता जेवी विखे । रांधिले अन्न ॥742॥
जसा एखादा मूर्ख आळशी मनुष्य निद्रेच्या सुखामुळे घर जळत असले तरी तिकडे लक्ष देत नाही किंवा एखादा मूर्ख खादाड मनुष्य विष घालून शिजवलेले अन्न असले, तरी तिकडे लक्ष न देता खातो.
743-13
तैसा जीविताचेनि मिषे । हा मृत्युचि आला असे । हे नेणेचि राजसे । सुखे जो गा ॥743॥
त्याप्रमाणे जगण्याच्या निमित्ताने हा मृत्यूच आला आहे हे जो रजोगुणापासून होणार्‍या सुखामुळे जाणतच नाही.
744-13
शरीरीची वाढी । अहोरात्रांची जोडी । विषयसुखप्रौढी । साचचि मानी ॥744॥
शरीराची होत असलेली वाढ, दिवस व रात्र यांचा (आयुष्याचा) लाभ, विषयसुखाचे महत्व, ह्या सर्व गोष्टी जो खर्‍याच मानतो.
745-13
परी बापुडा ऐसे नेणे । जे वेश्येचे सर्वस्व देणे । तेचि ते नागवणे । रूप एथ ॥745॥
वेश्येचे एखाद्या माणसाला सर्वस्व अर्पण करणे, हेच त्या मनुष्यास साक्षात लुटणे होय त्याप्रमाणे राजससुखाने शरीराची वाढ होणे म्हणजे आत्मनाश आहे. पण त्या बिचार्‍याच्या हे काहीच लक्षात येत नाही.


746-13
संवचोराचे साजणे । तेचि ते प्राण घेणे । लेपा स्नपन करणे । तोचि नाशु ॥746॥
आपल्या सोबतीस संभावित असलेल्या चोराची मैत्री ती मैत्री नव्हे तर प्राण घेणे होय अथवा भिंतीवर काढलेल्या चित्रास स्नान घालणे म्हणजे त्या चित्राचा नाश होय.
747-13
पांडुरोगे आंग सुटले । ते तयाचि नांवे खुंटले । तैसे नेणे भुलले । आहारनिद्रा ॥747॥
पंडुरोगाच्या सुजेने अंगाला पुष्टता आली तर ती वास्तविक आरोग्याची पुष्टता नव्हे, मग त्यातच पंडुरोग्याचे आयुष्य संपले आहे असे समजावे. त्याप्रमाणे खाणे व झोप यांच्या योगाने मोहित झालेले मूर्ख लोक विषयवृद्धीत खरी वृद्धी नसून खराखुरा नाशच आहे हे जाणत नाहीत.
748-13
सन्मुख शूला । धावतया पाये चपळा । प्रतिपदी ये जवळा । मृत्यु जेवी ॥748॥
समोर असलेल्या शूळाकडे जलद पावलाने धावून जाणारास ज्याप्रमाणे पावलोपावली मृत्यू जवळ येतो.
749-13
तेवी देहा जव जव वाढु । जव जव दिवसांचा पवाडु । जव जव सुरवाडु । भोगांचा या ॥749॥
त्याप्रमाणे जसजसा देह वाढेल, जसजशी दिवसाची वाढ होते म्हणजे जसजसे आयुष्याचे दिवस अधिक जातात आणि जसजशी विषयभोगांची विपुलता होईल,
750-13
तव तव अधिकाधिके । मरण आयुष्याते जिंके । मीठ जेवी उदके । घांसिजत असे ॥750॥
तसतसे अधिक अधिक मरण आयुष्याला जिंकते. ज्याप्रमाणे मीठ पाण्याने जसजसे अधिकाधिक घासले जाईल तसतसे विरघळत जाते
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस १९४ वा. १३, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २३१७ ते २३२८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २३१७
बैसो पाठमोरी । मना वाटे तैसे करी ॥१॥
परि तू जाणसी आवडी । बाळा बहुतांची परवडी ॥धृपद॥
आपुलाल्या इच्छा । मागो जया व्हावे जैशा ॥२॥
तुका म्हणे आई । नव्हसी उदास विठाई ॥३॥
अर्थ
देवा कधी कधी आम्ही तुझ्या कडे पाठ करून बसतो आणि मनाला वाटेल तसे करत असतो. परंतु तु विठाई आहे तू आम्हा लेकरांची सर्व आवड-निवड जाणून घेतेस व आमची काळजी करतेस देवा आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे काहीही मागावे आणि तू लाडाने तसे व्हावेस. तुकाराम महाराज म्हणतात हे आई विठाई तू आमची आई आहेस त्यामुळे तू आमच्या विषयी केव्हाही उदास नसतेस.
3:52

अभंग क्र. २३१८
विश्वंभरा वोळे । बहुत हात कान डोळे ॥१॥
जेथे असे तेथे देखे । मागितले ते आइके ॥धृपद॥
जे जे वाटे गोड । तैसे पुरवितो कोड ॥२॥
तुका म्हणे भेटी । काही पडो नेदी तुटी ॥३॥
अर्थ
मी विश्वंभराला शरण गेलो कारण त्याला खूप हात पाय कान डोळे आहेत. मी व त्याचे सर्व भक्त जिथे कोठे असतील तेथे तो त्यांना पाहून त्यांचे सर्व म्हणणे ऐकतो. भक्तांच्या जे जे काही आवडीचे आहे त्यांना जे जे काही गोड वाटते त्यांचे सर्व लाड हा देव पूर्ण करतो. तुकाराम महाराज म्हणतात विश्वंभर सर्वत्र व्यापक आहे त्यामुळे मला त्याची भेट केंव्हा ही घडते आमच्या भेटीत कधीही अंतर पडत नाही.
3:52

अभंग क्र. २३१९
दाटे कंठ लागे डोळिया पाझर । गुणाची अपार वृष्टि वरी ॥१॥
तेणे सुखे छंदे घेईन सोंहळा । होऊनि निराळा पापपुण्यां॥धृपद॥
तुझ्या मोहे पडो मागील विसर । आलापे सुस्वर करिन कंठ ॥२॥
तुका म्हणे येथे पाहिजे सौरस । तुम्हाविण रस गोड नव्हे ॥३॥
अर्थ
देवा तुझे गुण गाताना माझा कंठ दाटून येवो, डोळ्यातून आनंदाश्रूचा पाझर फुटो व तुझ्यावर अपार गुणाची वृष्टी मी करो. मग मी तुझ्या प्रेमसुखाच्या आनंदाचा सोहळा भोगीन व पाप पुण्या पेक्षा वेगळा होऊन राहील. देवा तुझ्या मोहाने मागील सर्व गोष्टीचा मला आता विसर पडो मग मी तुझ्या अपार गुण वर्णनाच्या अलापाणे माझा कंठ सुस्वर करील. तुकाराम महाराज म्हणतात देवा पण येथे तुझे प्रेम मला मिळाले पाहिजे कारण तुझ्या प्रेमावाचून भक्तिरस गोड होत नाही.
3:52

अभंग क्र. २३२०
पसरूनि राहिलो बाहो । सोयी अहो तुमचिये ॥१॥
आता यावे लागवेगे । पांडुरंगे धावत ॥धृपद॥
बैसायाची इच्छा कडे । चाली खडे रुपताती ॥२॥
तुका म्हणे कृपाळुवा । करीन सेवा लागली ॥३॥
अर्थ
अहो पांडुरंगा मी तुमच्या भेटी करता माझे दोन्ही बाहू पसरून उभा राहिलो आहे. हे पांडुरंगा त्यामुळे आता तुम्ही लवकर माझ्याकडे धावत यावे. देवा अहो मार्गाने चालतांना आमच्या पायाला खडे रुतत आहेत त्यामुळे आम्हाला तुमच्या कडावर बसण्याची इच्छा आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे कृपाळू वा परंतु आम्हालाच तुमची सेवा करावी लागत आहे तुमची सेवा करणे गत्यंतर आहे.
3:53

अभंग क्र. २३२१
आम्ही जालो एकविध । सुद्या सुदे असावे ॥१॥
यावरी तुमचा मोळा । तो गोपाळा अकळ ॥धृपद॥
घेतले ते उसणे द्यावे । काही भावे विशेषे ॥२॥
तुका म्हणे क्रियानष्ट । तरी कष्ट घेतसा ॥३॥
अर्थ
देवा आम्ही तुझ्याशी एकरूप झालो आहोत त्यामुळे तुम्ही ही आमच्याशी एकरूपता धरावी कारण व्यवहार सांगतो जो जसे वागेल तसे त्याच्याशी वागावे. परंतु हे गोपाळा तुमची रीतच आम्हाला कळत नाही. विशेष प्रसंगी ज्याच्याकडून जी काही वस्तू उसनी घेतली असेल ती त्याला परत द्यावी. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही क्रियानष्ट आहात केवळ आमच्याकडूनच सेवा रुपी कष्ट करून घेत आहात.
3:53

अभंग क्र. २३२२
आम्ही आर्तभूत जिवी । तुम्ही गोसावी तो उदास ॥१॥
वादावाद समर्थाशी । काशानशी करावा ॥धृपद॥
आम्ही मरो वेरझारी । स्वामी घरी बैसले ॥२॥
तुका म्हणे करिता वाद । काही भेद कळेना ॥३॥
अर्थ
देवा आम्ही आमच्या हृदयामध्ये तुमच्या भेटीविषयी आर्त इच्छा धरून बसावे आणि तुम्ही त्याविषयी खुशाल उदास होऊन बसावे. तुम्ही सर्व समर्थ आहात आणि तुमच्याशी आम्ही कशासाठी वादविवाद करावा. आम्ही तुमच्या घरी येरझाऱ्या घालून मरून जावे परंतु स्वामी घरी स्वस्थ बसलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमच्या स्वामीशी जरी काही वाद विवाद केला तरी ते काही बोलत नाही त्यामुळे आता त्यांच्या मनात कोणता भेद आहे तो काही आम्हाला कळेनासा झाला आहे.
3:53

अभंग क्र. २३२३
पुसावे ते ठाई आपुल्या आपण । अहंकारा शून्य घालूनिया ॥१॥
येर वाग्जाळ मायेचा अहंकार । वचनाशी थार अज्ञान ते ॥धृपद॥
फळ ते चि बीज बीज ते ची फळ । उपनावे मूळ न पालटे ॥२॥
तुका म्हणे अवघे गव्हांचे प्रकार । सोने अलंकार मिथ्या नांव ॥३॥
अर्थ
अहंकाराचा नाश करून आपण आपल्यालाच विचारले पाहिजे की आपण कोण आहोत. बाकी सर्व काही बोलणे म्हणजे व्यर्थ असून देहाविषयी मीपणा धरणे म्‍हणजे हा मायेचा प्रकार आहे व देहाविषयी अहंकार धरून जे काही बोलले जाते त्याला आधार म्हणजे अज्ञान आहे. फळ हे बीजाचेच स्वरूप आहे आणि बीजाचे स्वरूप फळ आहे म्हणजे बीज आणि फळ हे भेद केवळ नावापुरते आहेत परंतु दोन्हीही एकच रूप आहेत त्यामध्ये बदल होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात गव्हापासून अनेक प्रकार तयार होतात म्हणजे पोळी, करंजी, खीर इत्यादी परंतु त्यातील सत्य गहुच आहे आणि सोन्यापासून अनेक अलंकार तयार होतात परंतु अलंकार हे नांव मिथ्या असून त्यातील सत्य सोने आहे त्याप्रमाणेच जगत हे परमात्म्याच्या माये पासून उत्पन्न झाले आहे व जगतातील जेवढे काही नाम रूपे आहेत ते सर्व मिथ्या असून त्यातील सत्य एक परमात्माच आहे.
3:54

अभंग क्र. २३२४
माझी आता सत्ता आहे । तुम्हा पाया हे वरती ॥१॥
एकाविण नेणे दुजा । पंढरिराजा सर्वांगे ॥धृपद॥
पुरवावी केली आळी । जे जे काळी मागेन ते ॥२॥
तुका म्हणे सुटसी कैसा । धरूनि दिशा राहिलो ॥३॥
अर्थ
देवा आता माझी सत्ता तुमच्या पायावर आहे. हे पंढरीराया मी आता सर्वांगाने म्हणजे काया-वाचा-मनाने तुमच्या एकट्या वाचून दुसरे काहीही जाणत नाही. देवा ज्यावेळी मी जी काही तुम्हाला इच्छा मागेन ती इच्छा तुम्ही पूर्ण केली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू आता माझ्या हातून सुटशीलच कसा कारण मी सर्व दिशा धरून राहिलो आहे.
3:54

अभंग क्र. २३२५
फावले तुम्हा मागे । नवतो लागे पावलो ॥१॥
आलो आता उभा राहे । जवळी पाहे सन्मुख ॥धृपद॥
घरी होती गोवी जाली । कामे बोली न घडे चि ॥२॥
तुका म्हणे धडफुडा । जालो झाडा देई देवा ॥३॥
अर्थ
देवा जोपर्यंत मी तुमच्या मागे लागलो नाही तोपर्यंत तुम्हाला ती वेळ चांगलीच साधली होती. परंतु आता पहा मी तुमच्या जवळ अगदी येऊन उभा राहिलो आहे. देवा आज पर्यंत मी घर कामात गुंतलो होतो त्यामुळे मला तुमच्याशी बोलणेच घडत नव्हते. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही आजपर्यंत माझे काय कल्याण केले, याविषयी मला हिशोब द्यावा.
3:55

अभंग क्र. २३२६
आता नये बोलो अव्हेराची मात । बाळावरी चित्त असो द्यावे ॥१॥
तुज का सांगणे लागे हा प्रकार । परि हे उत्तर आवडीचे ॥धृपद॥
न वंची वो काही एकही प्रकार । आपणा अंतर नका मज ॥२॥
तुका म्हणे मोहो राखावा सतंत । नये पाहो अंत पांडुरंगा ॥३॥
अर्थ
देवा आता माझा अव्हेर करण्याच्या गोष्टी तू करू नकोस तुझ्या बाळावर तुझे चित्त असू द्यावे. देवा तुम्हाला या सर्व गोष्टी सांगण्याची गरज नाही परंतु मी केवळ तुमच्याशी आवडीने बोलत आहे. देवा आता मला कोणत्याही गोष्टीविषयी वंचित ठेवू नका आणि तुमच्या स्वतःपासून मला अंतर देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात अहो पांडुरंगा तुम्ही माझा अंत पाहू नका सतत माझ्याविषयी प्रेम राखावे.
3:56

अभंग क्र. २३२७
करूनि राहो जरी आत्माचि प्रमाण । निश्चळ नव्हे मन काय करू ॥१॥
जेवलिया विण काशाचे ढेकर । शब्दाचे प्रकार शब्द चि ते ॥धृपद॥
पुरे पुरे आता तुमचे ब्रम्हज्ञान । आह्मासी चरण न सोडणे ॥२॥
विरोधे विरोध वाढे पुढतोपुढती । वासनेचे हाती गर्भवास ॥३॥
सांडीमांडीअंगी वसे पुण्यपाप । बंधन संकल्प या चि नावे ॥४॥
तुका म्हणे नाही मुक्तता मोकळी । ऐसा कोण बळी निरसी देह ॥५॥
अर्थ
देवा मी मनाला समजावीत आहे की आत्मा नित्य शुद्ध आहे तो सदा मुक्त आहे तो नीसंग आहे तरीदेखील मन निश्चल होत नाही त्याला मी काय करू ? जेवल्या वाचून ढेकर कसा येईल त्याप्रमाणे आत्म्याचा कोणताही अनुभव नसताना आत्मा असा असतो तसा असतो असे म्हणणे म्हणजे शब्दांचेच प्रकार आहेत. देवा त्यामुळे आता तुमचे ब्रम्‍हज्ञान पुरे झाले खूप झाले आता तुमचे चरणच आम्हासाठी सर्व आहे ते आम्हाला सोडवत नाही. विरोधाने विरोध पुढे वाढतच जातो आणि जशी आपली अंतकाळी वासना असेल तसा आपल्याला जन्म प्राप्त होतो. विधी निषेधाच्या भानगडीत पडले की पाप-पुण्य आपल्या अंतकरणात वसत असते आणि “मी आणि माझे” असे समजणे म्हणजेच याला बंधन म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात मुक्ती मिळवणे ही गोष्ट काही सोपी नाहीये आणि देहअभिमानाचा निरास करणारा इथे कोण बलवंत आहे ?
3:56

अभंग क्र. २३२८
तुमचे स्तुतियोग्य कोटे माझी वाणी । मस्तक चरणी ठेवीतसे ॥१॥
भक्तीभाग्य तरी नेदी तुळसीदळ । जोडूनि अंजुळ उभा असे ॥धृपद॥
कैचे भाग्य ऐसे पाविजे संनिध । नेणे पाळू विध करुणा भाकी ॥२॥
संतांचे सेवटी उिच्छष्टाची आस । करूनिया वास पाहातसे ॥३॥
करी इच्छा मज म्हणोत आपुले । एखादिया बोले निमित्याच्या ॥४॥
तुका म्हणे शरण आलो हे साधन । करितो चिंतन रात्रदिवस ॥५॥
अर्थ
देवा तुमची स्तुती करण्या योग्य माझी वाणी कुठे आहे त्यामुळेच मी माझे मस्तक तुमच्या चरणावर ठेवत आहे. भक्तीच्या दृष्टीने मी भाग्यवान आहे असे म्हणावे तर मी तुम्हाला कधीही एक तुळशीचे पान देखील वाहिले नाही केवळ तुमच्या पुढे माझे दोन्ही हात जोडून उभा राहिलो आहे. देवा तुमच्या जवळ मी येऊ शकेल एवढे माझे भाग्य कुठे आहे शास्त्र मला पाळता येत नाही त्यामुळे तर मी तुमची करुणा भाकीत आहे. संतांचे उच्छिष्ट सेवन करायला मिळावे एवढीच एक इच्छा आहे त्यामुळेच मी तुमची वाट पाहत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुम्हाला शरण येऊन रात्रंदिवस तुमचे चिंतन करीत आहे आणि तुमच्या प्राप्तीचे हेच खरे वर्म कोणते आहे ते मला समजले आहे.

जुलै नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading