आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२६ जुलै, दिवस २०७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी १०५१ ते १०७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २४७३ ते २४८४
“२६ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २६ July
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २६ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २४७३ ते २४८४ चे पारायण आपण करणार आहोत.
२६ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी १०५१ ते १०७५,
यावत्संजायते किंचित्सत्त्वं स्थावरजंगमम् ।
क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात्तद्विद्धि भरतर्षभ ॥13. 26॥
श्लोक अर्थ:- हे भरतश्रेष्ठा, जो जो स्थावर अथवा जंगम पदार्थ उत्पन्न होतो, तो तो क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून होतो असे जाण.
सृष्ट्युत्पत्ती
1051-13
तरी क्षेत्रज्ञ येणे बोले । तुज आपणपे जे दाविले । आणि क्षेत्रही सांगितले । आघवे जे ॥1051॥
तर क्षेत्रज्ञ या शब्दाने जे मी आपले स्वरूप तुला दाखवले आणि जे सर्व क्षेत्र सांगितले.
1052-13
तया येरयेरांच्या मेळी । होईजे भूती सकळी । अनिलसंगे सलिली । कल्लोळ जैसे ॥1052॥
वार्याच्या संबंधाने जशा पाण्यावर लाटा येतात त्याप्रमाणे या क्षेत्र-क्षेत्रज्ञांच्या एकमेकांच्या मिलाफात (संबंधात) सर्व प्राणी उत्पन्न होतात.
1053-13
का तेजा आणि उखरा । भेटी जालिया वीरा । मृगजळाचिया पूरा । रूप होय ॥1053॥
अथवा सूर्यकिरणे व बरड जमीन यांचा संबंध आला म्हणजे अर्जुना, मृगजळाचा महापूर जसा प्रत्यक्ष दिसतो.
1054-13
नाना धाराधरधारी । झळंबलिया वसुंधरी । उठिजे जेवी अंकुरी । नानाविधी ॥1054॥
अथवा पर्जन्याचा धारांनी वृष्टीने भिजलेल्या पृथ्वीमधे जसे नाना प्रकारचे अंकुर उगवतात.
1055-13
तैसे चराचर आघवे । जे काही जीवु नावे । ते तो उभययोगे संभवे । ऐसे जाण ॥1055॥
त्याप्रमाणे जीव या नावाने जे काही चराचर आहे ते तर उभयतांच्या (क्षेत्र-क्षेत्रज्ञांच्या) मिलाफाने उत्पन्न होते असे समज.
1056-13
इयालागी अर्जुना । क्षेत्रज्ञा प्रधाना- । पासूनि न होती भिन्ना । भूतव्यक्ती ॥1056॥
अर्जुना या करता आकाराला आलेले सर्व पदार्थ हे पुरुष व प्रकृती यांच्या पासून भिन्न नाहीत
समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम् ।
विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥13. 27॥
श्लोक भावार्थ- सर्व भूतांच्या ठिकाणी सारख्याच असणार्या व नाश पावणार्या भूतांमधे अविनाश असलेल्या अशा परमेश्वरास जो जाणतो, तोच ज्ञान्यातील डोळस होय.
ज्ञानी मनुष्याची लक्षणे सर्व प्राणिमात्रात एकच परमात्मा आहे.
1057-13
पै पटत्व तंतु नव्हे । तरी तंतूसीचि ते आहे । ऐसा खोली डोळा पाहे । ऐक्य हे गा ॥1057॥
वस्त्र जे जरी सूत नाही, तरी पण वस्त्रपणा हा सूतावरच आहे. अशा सूक्ष्म विचाराने हे ऐक्य समजून घे.
1058-13
भूते आघवीचि होती । एकाची एक आहाती । परी तै प्रतीती । यांची घे पा ॥1058॥
सर्व भूते ही एकाच वस्तूपासून होतात व ती सर्व एकच आहेत, परंतु ही भूते पहाणारास भिन्न भिन्न रूपाने अनुभवास येतात.
1059-13
यांची नामेही आनाने । अनारिसी वर्तने । वेषही सिनाने । आघवेयांचे ॥1059॥
या भूतांची नावेही निरनिराळी आहेत, यांच्या वागणुकीसुद्धा भिन्न भिन्न आहेत व या सर्वाचे वेषही भिन्न भिन्न आहेत.
1060-13
ऐसे देखोनि किरीटी । भेद सूसी हन पोटी । तरी जन्माचिया कोटी । न लाहसी निघो ॥1060॥
अर्जुना, असे पाहून तू जर आपल्या पोटात (मनात) द्वैताच्या कल्पनेचा शिरकाव होऊ देशील तर कोट्यावधी जन्म गेले तरी तुला या जन्मातून बाहेर पडता येणार नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1061-13
पै नानाप्रयोजनशीळे । दीर्घे वक्रे वर्तुळे । होती एकाचीच फळे । तुंबिणीयेची ॥1061॥
अनेक कारणांमुळे लांब व वाकडी व वाटोळी अशा वेगवेगळ्या आकाराची दुध्या भोपळ्याची फळे जशी एकाच भोपळ्याच्या वेलीपासून उत्पन्न होतात.
1062-13
होतु का उजू वाकुडे । परी बोरीचे हे न मोडे । तैसी भूते अवघडे । परी वस्तु उजू ॥1062॥
बोरीचे झाडाची फांदी सरळ अथवा वाकडी असेना का, पण तिला बोरीचीच म्हणतात. त्याप्रमाणे प्राणी जरी भिन्न भिन्न प्रकारचे असले तरी (त्यात व्यापून असणारी) ब्रह्मवस्तू सरळच(एकच) आहे.
1063-13
अंगारकणी बहुवसी । उष्णता समान जैशी । तैसा नाना जीवराशी । परेशु असे ॥1063॥
निखार्याच्या पुष्कळ ठिणग्यातून उष्णता जशी एकसारखी असते त्याप्रमाणे अनेक जीवराशीतून एक परमात्मा आहे.
1064-13
गगनभरी धारा । परी पाणी एकचि वीरा । तैसा या भूताकारा । सर्वांगी तो ॥1064॥
अर्जुना, पावसाच्या धारा जरी सर्व आकाशभर असल्या तरी पण त्या सर्वातून जसे पाणी एकच आहे त्याप्रमाणे या भूताकाराच्या सर्वागात तो परमात्मा आहे.
1065-13
हे भूतग्राम विषम । परी वस्तू ते एथ सम । घटमठी व्योम । जियापरी ॥1065॥
ज्याप्रमाणे घागरीत व घरात आकाश एकच असते, त्याप्रमाणे हे भूतसमुदाय जरी वेगवेगळे आहेत, तरी त्यात व्यापून असणारी जी वस्तू, ती एकसारखीच आहे.
1066-13
हा नाशता भूताभासु । एथ आत्मा तो अविनाशु । जैसा केयूरादिकी कसु । सुवर्णाचा ॥1066॥
ज्याप्रमाणे बाहुभूषणादिक अनेक अलंकारातून सोन्याचा कस एकच असतो आणि त्या केयूरादिक अलंकारांची वाटणी केली असता जसा सोन्याचा कस नाश पावत नाही, त्याप्रमाणे हा भूताभास नाश पावणारा आहे पण या भूताभासात असणारा आत्मा अविनाश आहे.
1067-13
एवं जीवधर्महीनु । जो जीवेसी अभिन्नु । देख तो सुनयनु । ज्ञानियांमाजी ॥1067॥
याप्रमाणे परमात्मा हा जीवधर्मरहित आहे व तो सर्व जीवात व्यापून आहे. याप्रमाणे जो परमात्म्याला जाणतो, तो ज्ञान्यांमधे चांगला डोळस आहे.
1068-13
ज्ञानाचा डोळा डोळसा- । माजी डोळसु तो वीरेशा । हे स्तुति नोहे बहुवसा । भाग्याचा तो ॥1068॥
अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जे चांगले डोळस आहेत, त्यामधे तो डोळस आहे. ही त्याची स्तुती नसून तो फारच भाग्यवान आहे.
समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् ।
न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥13. 28॥
श्लोकार्थ -::- ईश्वर सर्वत्र समानत्वाने स्थित आहे असे जाणणारा स्वत:चा घात करत नाही. देह मी आहे असे समजत नाही. नंतर म्हणजे असे जाणल्यानंतर, तो श्रेष्ठ अभेदभावाने पहातो तो श्रेष्ठगती प्राप्त करतो.
1069-13
जे गुणेंद्रिय धोकोटी । देह धातूंची त्रिकुटी । पांचमेळावा वोखटी । दारुण हे ॥1069॥
कारण की देह हा गुण व इंद्रिये यांची रहाण्याची धोकटी आहे, देह हा (कफ, वात व पित्त) या तीन धातूंपासून बनलेला आहे. हा पंचमहाभूतांचा समुदाय आहे. तो वाईट आहे व भयंकर आहे.
1070-13
हे उघड पांचवेउली । पंचधा आगी लागली । जीवपंचानना सांपडली । हरिणकुटी हे ॥1070॥
हा देह म्हणजे उघड पांच नाग्यांची इंगळी आहे (अथवा) वेगवेगळ्या पाच ठिकाणी दंश करणारी आहे. जीवरूप सिंहाला हा देह हे एक हरणाचे (रहाण्याचे) घरच सापडले आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1071-13
ऐसा असोनि इये शरीरी । कोण नित्यबुद्धीची सुरी । अनित्यभावाच्या उदरी । दाटीचिना ॥1071॥
त्याप्रमाणे या देहात हा जीव असा सिंहासारखा असंग, नित्य, शुद्ध, बुद्ध व स्वतंत्र असून आपण नित्य आहोत अशी ही बुद्धिरूपी सुरी अनित्य भावाच्या पोटात कशी चालवीत नाही ? आपल्या नित्यभावाच्या स्मृतीने अनित्यभावाचा नाश का करत नाही ? हे एक आश्चर्य आहे.
1072-13
परी इये देही असता । जो नयेचि आपणया घाता । आणि शेखी पंडुसुता । तेथेचि मिळे ॥1072॥
येथेपर्यंत देहाशी तादात्म्य करून असणार्या मूर्खाची स्थिती सांगितली व या ओवीपासून पुढे मागे सांगितलेल्या भाग्यवान ज्ञानी पुरुषाचे वर्णन करतात). परंतु ज्ञानी पुरुष या देहात असताना (देहतादात्म्याने) आपल्या घातावर येत नाही. (म्हणजे आपला घात करून घेत नाही). आणि अर्जुना, शेवटी मरणानंतर तो तेथे (ब्रह्मस्वरूपात मिळतो).
1073-13
जेथ योगज्ञानाचिया प्रौढी । वोलांडूनिया जन्मकोडी । न निगो इया भाषा बुडी । देती योगी ॥1073॥
कोट्यावधी जन्म ओलांडून, योग व ज्ञान यांच्या बलाने योगी लोक आपण त्या ब्रह्मस्वरूपातून बाहेर पडणारा नाही, अशा कृतनिश्चयाने, ज्या ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी बुडी देऊन रहातात.
1074-13
जे आकाराचे पैल तीर । जे नादाची पैल मेर । तुर्येचे माजघर । परब्रह्म जे ॥1074॥
जे आकाररूप नदीचा पलीकडला काठ आहे, (निराकार आहे) व जे ब्रह्म नादाची पलीकडली कड आहे (शब्दातीत आहे) व जे परब्रह्म तूर्यावस्थेचे मध्यघर (गाभा) आहे,
1075-13
मोक्षासकट गती । जेथे येती विश्रांती । गंगादि आपांपती । सरिता जेवी ॥1075॥
ज्याप्रमाणे गंगा वगैरे नद्या समुद्राच्या ठिकाणी विश्रांतीला येतात, त्याप्रमाणे मोक्षसुद्धा सर्व साध्ये, जेथे (ब्रह्माच्या ठिकाणी) विश्रांतीला येतात.
दिवस २०७ वा. २६, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २४७३ ते २४८४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २४७३
जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत । त्यांचे पायी चित्त ठेवीन मी ॥१॥
जयांसी आवडे विठ्ठलाचे नाम । ते माझे परम प्राणसखे ॥धृपद॥
जयांसी विठ्ठल आवडे लोचनी । त्यांचे पायवणी स्वीकारीन ॥२॥
विठ्ठलासी जिही दिला सर्व भाव । त्यांच्या पायी जीव ठेवीन मी ॥३॥
तुका म्हणे रज होईन चरणींचा । म्हणविती त्यांचा हरीचे दास ॥४॥
अर्थ
जे विठ्ठलाचे गीत अखंड गातात त्यांच्या पायी मी माझे चित्त ठेवीन. ज्यांना विठ्ठलाचे नाम आवडते ते माझे परम प्राणसखे आहेत. ज्यांना विठ्ठलाला आपल्या लोचनाने म्हणजे डोळ्यांनी पाहणे आवडते त्यांच्या पायाचे तीर्थ देखील मी स्वीकारील. ज्यांनी विठ्ठलाच्या ठिकाणी सर्व भक्ती भाव दिला आहे त्यांच्या पायी मी माझा जीव ठेवीन. तुकाराम महाराज म्हणतात हरीचा दास मी आहे असे जे म्हणून घेतात त्यांच्या पायाची माती मी होईल.
4:39 Sdm:
अभंग क्र. २४७४
काय तो विवाद असो भेदाभेद । साधा परमानंद एका भावे ॥१॥
निघोनि आयुष्य जाते हातोहात । विचारी पा हित लवलाही ॥२॥
तुका म्हणे भावभक्ती हे कारण । नागवी भूषण दंभ तोचि ॥३॥
अर्थ
भेद आणि अभेद याविषयी वादविवाद करून काय होणार आहे त्यापेक्षा एका परमानंदाला भक्तिभावाने साध्य करून घ्यावा. अहो तुमचे आयुष्य हातोहात निघून जात आहे त्यामुळे आपले हित कशात आहे याविषयी घाई करून विचार करून पहावा. तुकाराम महाराज म्हणतात परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याला मुख्य कारण म्हणजे भक्तिभाव आहे नाही तर मनुष्याला स्वतःचे भुषण आणि दंभ हे दोनच गोष्टी नागवे करत असतात.
4:39 Sdm:
अभंग क्र. २४७५
देवकीनंदने । केले आपुल्या चिंतने ॥१॥
मज आपुलिया ऐसे । मना लावूनिया पिसे ॥धृपद॥
गोवळे गोपाळा । केले लावूनिया चाळा ॥२॥
तुका म्हणे संग । केला दुरि नव्हे मग ॥३॥
अर्थ
देवकीनंदनाचे मी चिंतन केले त्यामुळे त्यानेही मला त्याच्यासारखेच केले आहे. त्याने माझ्या मनाला त्याचे वेड लावले आहे. गोवळे आणि गोपाळ यांना देखील त्याने त्यांचा चाळा लावून त्यांना आपल्यासारखेच करून टाकले आहे. तुकाराम महाराज म्हणतात एकदा की त्याचा संग आपण केला की मग तो आपल्यापासून केव्हा ही दूर जात नाही.
4:40 Sdm:
अभंग क्र. २४७६
माझिया जीवासी हेचि पै विश्रांति । तुझे पाय चित्ती पांडुरंगा ॥१॥
भांडवल गाठी झालेंसे पुरते । समाधान चित्ते मानियेले ॥धृपद॥
उदंड उच्चारे घातला पसरु । रूपावरी भरु आवडीचा ॥२॥
तुका म्हणे मज भक्तीची आवडी । अभेदी तांतडी नाही ह्मुण ॥३॥
अर्थ
हे पांडुरंगा तुझे पाय माझ्या चित्तात सदैव असावे हीच माझ्या जीवाला विश्रांती आहे. देवा हेच भांडवल माझ्या कडे माझ्या पदरात भरपूर बांधले आहे त्यामुळे माझ्या चित्ताने समाधान मानले आहे. माझ्या वाणीने तुझ्या नामाचा उच्चार खूप केला असून त्याचा विस्तारही केला आहे व तुझ्या रूपावर माझ्या आवडीचा म्हणजे प्रेमाचा भर आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला तुझ्या भक्तीची खूप आवड आहे त्यामुळे आपल्यातिल अभेद असाच राहून आपल्यातील भेद नष्ट व्हावा या विषयी अजिबात मला तातडी नाही.
4:40 Sdm:
अभंग क्र. २४७७
एकविध आम्ही न धरू पालट । न संडू ते वाट सांपडली ॥१॥
म्हणवूनि केला पाहिजे सांभाळ । माझे बुद्धीबळ पाय तुझे ॥धृपद॥
बहुत न कळे बोलता प्रकार । अंतरा अंतर साक्षी असे ॥२॥
तुका म्हणे आगा जीवांच्या जीवना । तू चि नारायणा साक्षी माझा ॥३॥
अर्थ
आम्ही एक निष्ठ हरिभक्त आहोत त्याबद्दल आम्ही कधीही पलटणार नाहीत आणि आम्हाला जो भक्तीचा मार्ग सापडला आहे तो आम्ही कधी सोडणार नाही. म्हणूनच देवा तु आमचा सांभाळ केला पाहिजे तुमचे चरण म्हणजे माझ्या बुध्दीचे बळ आहे. देवा या विषयी जास्त बोलण्याचा प्रकार केल्याने ते काही कळणार नाही याविषयी माझे अंतकरण व तुझे अंतकरणच साक्षी आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा तूच माझ्या जीवाचे जीवन आहेस व माझी भक्ती निष्ठा याविषयी देखील साक्षी तूच आहेस.
4:41 Sdm:
अभंग क्र. २४७८
राहो येचि ठायी । माझा भाव तुझे पायी ॥१॥
करीन नामाचे चिंतन । जाऊ नेदी कोठे मन ॥धृपद॥
देईन ये रसी । आता बुडी सर्वविशी ॥२॥
तुका म्हणे देवा । साटी करोनिया जीवा ॥३॥
अर्थ
देवा तुझ्या पायाच्या ठिकाणीच माझा भक्तिभाव राहो. मी तुझ्या नामाचे चिंतन करीन आणि तुझ्या पाया वाचून माझ्या मनाला इतर कोठेही जाऊ देणार नाही. देवा तुझ्या भक्तिरसातच आता मी सर्वतो परी बुडी देईल. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझ्यासाठी जीवावर उदार होऊन तुझी भक्ती करीन.
4:41 Sdm:
अभंग क्र. २४७९
तैसे नहो आम्ही विठ्ठलाचे दास । यावे आणिकास काकुलती ॥१॥
स्वामिचिया सत्ता ठेंगणे सकळ । आला किळकाळ हाताखाली ॥धृपद॥
अंकिताचा असे अभिमान देवा । समर्पूनि हेवा असो पायी ॥२॥
तुका म्हणे आम्हा इच्छेचे खेळणे । कोड नारायणे पुरवावे ॥३॥
अर्थ
आम्ही विठ्ठलाचे दास असे तसे नाही आहोत की आम्ही विठोबाला सोडून इतर कोणाला काकुळतीला येऊ. आमचा स्वामी विठोबा आहे आणि त्याच्या सत्तेने आम्हाला सर्व काही ठेंगणे वाटत आहे आणि आमच्या स्वामीच्या सत्तेमुळे कळी काळ आमच्या हातात आला आहे. अंकित असणाऱ्या भक्तांचा देवाला खूप अभिमान असतो त्यामुळेच तर आम्ही सर्व आमच्या आशा-अपेक्षा देवाला अर्पण करून त्याच्यात पायी राहत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात नारायण आमच्या इच्छेप्रमाणे खेळत आहे आणि आमचे सर्व लाडही तो पूर्ण करत आहे.
4:42 Sdm:
अभंग क्र. २४८०
मोक्ष देवापाशी नाही । लटिक्या घाई विव्हळता ॥१॥
काय खरे न धरी शुद्धी । गेली बुद्धी भ्रमले ॥धृपद॥
अहंकारास उरले काई । पाचांठायी हे वांटे ॥२॥
तुका म्हणे कुंथे भारे । लटिके खरे मानुनिया ॥३॥
अर्थ
मोक्ष देवापाशी नाही जर सूक्ष्म विचार करून पाहिले तर मोक्ष आपल्या जवळच आहे कारण आपण कोणत्याही बंधनात नाहीच आहोत आपण नित्य मुक्त आहोत परंतु तरीही मनुष्य व्यर्थ सुखदुःखाच्या घावाने विव्हळत असतो. खरे तर हे मनुष्य गाढवच आहेत यांची शुद्धी गेली असून बुद्धी भ्रमिष्ट झाली आहे. अरे तु देहाविषयी मिथ्या अभिमान धरतोस परंतु हा देह पाच तत्वाचा बनलेला आहे आणि हे पाच तत्व त्या पाच तत्वामध्ये पुन्हा विलीन झाले तर तुझा अहंकार कुठे राहतो याविषयी जरा बारीक विचार कर. तुकाराम महाराज म्हणतात खोट्याला खरे मानून देहाविषयीच्या अभिमानाचा भार आपल्या माथ्यावर घेऊन निष्कारणच हे लोक कुंथत बसले आहेत.
4:42 Sdm:
अभंग क्र. २४८१
आपला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेविण जीवा सुख नव्हे ॥१॥
येर ती माइके दुःखाची जनिती । नाही आदिअंती अवसानी ॥धृपद॥
अविनाश करी आपुलिया ऐसे । लावी मना पिसे गोविंदाच्या ॥२॥
तुका म्हणे एका मरणेंचि सरे । उत्तमचि उरे कीर्ती मागे ॥३॥
अर्थ
जर आपल्याला सुख मिळवायचे असेल तर देवाला आपलेसे करून घ्या देवाला आपलेसे केल्यावाचून सुख जीवाला मिळणारच नाही. एक देव सोडला तर बाकी सर्व पदार्थ माईक आहेत म्हणजे दुःख देणारे आहेत त्यांच्या आधी आणि अंति सुख देण्याचे अवसानच नाही. अविनाश अशा गोविंदालाच आपलेसे करून घ्यावे आणि आपल्या मनाला त्याचेच वेड लावावे. तुकाराम महाराज म्हणतात जो देवाला आपलासा करून घेतो त्याला एकदाच मरण येते पुन्हा त्याला जन्म येत नाही आणि त्याची उत्तम किर्ती मागे उरते.
4:43 Sdm:
अभंग क्र. २४८२
आजिचे हे मज तुह्मी कृपादान । दिले संतजन मायबापी ॥१॥
आली मुखावाटा अमृतवचने । उत्तीर्ण ती येणे नव्हे जन्मे ॥२॥
तुका म्हणे तुह्मी उदार कृपाळ । शृंगारिले बाळ कवतुके ॥३॥
अर्थ
हे संतजन हो माय बाप हो तुम्ही आज मला हे कृपा दान दिले आहे, तुमच्या कृपेमुळे माझ्या वाणीद्वारे भक्ती बोधपर अमृत वचने बाहेर पडत आहे त्यामुळे या जन्मी तरी मी तुमच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे संतांनो तुम्ही कृपाळू आहात उदार आहात तुम्ही तुमचे आध्यात्मिक अलंकार माझ्या म्हणजेच तुमच्या बालकाच्या अंगावर चढवले आणि त्याचे तुम्हीच कौतुक करत आहात.
4:43 Sdm:
अभंग क्र. २४८३
स्तुती अथवा निंदा करावी देवाची । अधम तो वेची व्यर्थ वाणी ॥१॥
आइकोनि होती बहिर हे बोल । वेचूनि ते मोल नरका जाती ॥धृपद॥
इह लोकी थुंका उडे तोंडावरी । करणे अघोरी वास लागे ॥२॥
तुका म्हणे माप वाचेऐसे निके । भरले नरके निंदेसाठी ॥३॥
अर्थ
स्तुती किंवा निंदा करायची असेल तर देवाचीच करा व त्याच्याच ठिकाणी एकनिष्ठ रहा सामान्य माणसाची निंदा व स्तुती जो करतो तो अधम असतो व त्याची वाणी तो व्यर्थ खर्च करत असतो. काही लोक पारमार्थिक बोल ऐकून देखील न ऐकल्यासारखे करतात त्यावेळी ते जणू बहिरे च होतात आणि इतरांची निंदा करून ते नरकाला जातात. निंदा केल्यामुळे इहलोकी लोक त्याच्या तोंडावर थुंकतात आणि मेल्यानंतर त्याला अघोर असा नरकवास भोगावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात अहो ज्या वाणीने हरीनाम घ्यावे त्याच वाणीने हे लोक इतरांची निंदा करतात आणि नरकवास भोगतात.
अभंग क्र. २४८४
लोह कफ गारा सिद्ध हे सामुग्री । अग्नी टणत्कारी दिसो येतो ॥१॥
सांगावे ते काई सांगावे ते काई । चित्ता होय ठायी अनुभव तो ॥धृपद॥
अन्ने सांगो येतो तृप्तीचा अनुभव । करूनि उपाव घेऊ हेवा ॥२॥
तुका म्हणे मिळे जीवनी जीवन । तेथे कोणा कोण नांव ठेवी ॥३॥
अर्थ
लोह म्हणजे लोखंड, कफ म्हणजे कापूस आणि गार म्हणजे गारगोटी या तीन सामुग्री जर सिद्ध असतील तर एक विशिष्ट प्रक्रिया केल्यानंतर अग्नी उत्पन्न होतो त्याप्रमाणे साधकाने आपले चित्त शुद्ध ठेवले की त्याला ब्रम्ह अनुभवाचा अनुभव येतो. ब्रह्मानुभवाचा जो आनंद प्राप्त होतो तो शब्दात कसा सांगावा तो आपल्या चित्ताच्या ठिकाणीच अनुभवायास मिळेल. सरस असे भोजन मिळाल्यानंतर त्या भोजनाचा आनंद वर्णन करता येत नाही त्याप्रमाणे ब्रम्हानुभव देखील आहे तो ब्रह्मानुभव आणखी प्राप्त व्हावा यासाठी आम्ही उपाय करू व त्याचाच हव्यास करू. तुकाराम महाराज म्हणतात गंगेतील पाणी व लोट्यातील पाणी हे दोन्ही एकत्र केले तर ते ओळखता येणार नाही त्याप्रमाणे मुमुक्षू जीव आणि ब्रम्हस्वरूप हे दोन्ही जर एकत्र झाले तर मग मुमुक्षू जीव कोणता आणि ब्रम्हस्वरूप कोणते हे कसे सांगता येईल ?
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















