आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

६ जुलै, दिवस १८७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ५५१ ते ५७५, सार्थ तुकाराम गाथा अभंग २२३३ ते २२४४
“६ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ६ July
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ६ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २२३३ ते २२४४ चे पारायण आपण करणार आहोत.
६ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ५५१ ते ५७५,
551-13
म्हणौनि समर्थेंसी वैर । जया पडिले हाडखाइर । तो जैसा आठही पाहर । परजून असे ॥551॥
म्हणून समर्थ पुरुषाशी हाडवैर पडले आहे, तो जसा आठही प्रहर शस्त्र हातात घेऊन सज्ज असतो.
552-13
नातरी केळवली नोवरी । का संन्यासी जियापरी । तैसा न मरता जो करी । मृत्युसूचना ॥552॥
अथवा लग्नाचा निश्चय घेऊन गडंगनेर झालेली कुमारी माहेराविषयी उदासीन असते व सासरी जाण्याविषयी मनाची आगाऊ तयारी करून ठेवते किंवा संन्यासी सर्वस्वाविषयी ज्याप्रमाणे अगोदरच उदासीन असतो, त्याप्रमाणे प्रत्यक्ष मरण येण्याचे अगोदरच तो पुढे येणार्या मरणासंबंधी विचार करून उदास झालेला असतो.
553-13
पै गा जो ययापरी । जन्मेचि जन्म निवारी । मरणे मृत्यु मारी । आपण उरे ॥553॥
अर्जुना, याप्रमाणे जो या मनुष्यजन्माने भावी जन्माचे निवारण करतो व जो या मनुष्यदेहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो व आपण जन्मक्षयातीत अशा स्वरूपाने उरतो.
554-13
तया घरी ज्ञानाचे । सांकडे नाही साचे । जया जन्ममृत्युचे । निमाले शल्य ॥554॥
अशा रीतीने ज्याच्या अंत:करणात जन्ममृत्यू हे काट्यासारखे सलत रहातात, त्याच्या ठिकाणी खरोखर ज्ञानाची काहीच उणीव नसते.
555-13
आणि तयाचिपरी जरा । न टेकता शरीरा । तारुण्याचिया भरा- । माजी देखे ॥555॥
जरा = आणि त्याचप्रमाणे शरीराला म्हातारपण येण्याच्या अगोदरच ऐन उमेदीत असतानाच जो पुढे येणार्या म्हातारपणाबद्दल विचार करतो.
556-13
म्हणे आजिच्या अवसरी । पुष्टि जे शरीरी । ते पाहे होईल काचरी । वाळली जैसी ॥556॥
तो म्हणतो, आजच्या वेळी (भर तारुण्यात) ही जी शरीरात पुष्टी आहे, ती उद्या वाळलेल्या काचरीसारखी होईल.
557-13
निदैव्याचे व्यवसाय । तैसे ठाकती हातपाय । अमंत्र्या राजाची परी आहे । बळा यया ॥557॥
दैवहीनाने केलेले सर्व उद्योग जसे आतबट्ट्याचे असतात तसे हातापायांच्या सर्व सामर्थ्यास ओहोटी लागून ते थकतील. आज तारुण्यात असलेल्या सर्व शक्तीची परिस्थिती, प्रधान नसलेल्या राज्यासारखी दुबळी होणारी आहे.
558-13
फुलांचिया भोगा- । लागी प्रेम टांगा । ते करेयाचा गुडघा । तैसे होईल ॥558॥
फुलांच्या (सुवासाच्या) भोगाकरता ज्या नाकाचे प्रेम गुंतलेले असते ते नाक उंटाचा गुडघा जसा असतो तसे विद्रूप व वास घेण्याला असमर्थ होईल.
559-13
वोढाळाच्या खुरी । आखरु आते बुरी । ते दशा माझ्या शिरी । पावेल गा ॥559॥
ओढाळ गुरांच्या खुरांनी जसी गुरे बसण्याच्या जागेची दुर्दशा झालेली असते (म्हणजे त्यात कोठे गवत उगवते व कोठे उगवत नाही) त्याप्रमाणे माझ्या मस्तकाची अवस्था होईल.
560-13
पद्मदळेसी इसाळे । भांडताति जे हे डोळे । ते होती पडवळे । पिकली जैसी ॥560॥
कमळाच्या पाकळीशी स्पर्धेने भांडणारे जे हे डोळे, ते म्हातारपणात जशी पिकलेली पडवळे असतात तसे होतील.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
561-13
भंवईची पडळे । वोमथती सिनसाळे । उरु कुहिजैल जळे । आंसुवाचेनि ॥561॥
भुवईचे पडदे झाडाच्या जुन्या सालीप्रमाणे खाली लोंबतील व अश्रूंच्या पाण्याने ऊर कुजेल.
562-13
जैसे बाभुळीचे खोड । गिरबडूनि जाती सरडे । तैसे पिचडी तोंड । सरकटिजैल ॥562॥
ज्याप्रमाणे बाभळीचे खोड सरडा गिरबिडून टाकतात, सरड खोडावरुन खालीवर जात राहतो त्यामुळे डिंक पायाला लागून खोड गुळगुळीत होते त्याप्रमाणे तोंड थुंकीच्या पिचकारीने गिरबिडून जाईल.
563-13
रांधवणी चुलीपुढे । पऱ्हे उन्मादती खातवडे । तैसीचि ये नाकाडे । बिडबिडती ॥563॥
स्वयंपाक करण्याच्या चुलीपुढे खाचेत अगर चरात (उष्टे पाणी साचून) जसे दुर्गंधीयुक्त बुडबुडे उसळतात, त्याप्रमाणे नाकात शेंबडाचे दुर्गंधीयुक्त बुडबुडे येतील.
564-13
तांबुले वोठ राऊ । हासता दात दाऊ । सनागर मिरऊ । बोल जेणे ॥564॥
ज्या मुखाचे ओठ मी विड्याने (तारुण्यावस्थेत रंगवतो) व ज्यातील दात हसताना दाखवतो व ज्या मुखाने चांगले सुंदर बोलतो,
565-13
तयाचि पाहे या तोंडा । येईल जळंबटाचा लोंढा । इया उमळती दाढा । दातांसहित ॥565॥
त्याच तोंडाला उद्या म्हातारपणी कफाचा लोंढा येईल आणि या दाढा दातासकट उखडून जातील.
566-13
कुळवाडी रिणे दाटली । का वांकडिया ढोरे बैसली । तैसी नुठी काही केली । जीभचि हे ॥566॥
शेतकीचा धंदा जसा कर्जाने ग्रस्त झाला असता ऊर्जित दशेला येत नाही, अथवा वाकडीच्या पावसाने (झडीच्या पावसाने) जशी एकदा गुरे बसली म्हणजे उठत नाहीत, त्याप्रमाणे म्हातारपणी काही केल्याने जीभ उठत नाही.
567-13
कुसळे कोरडी । वारेनि जाती बरडी । तैसा आपत्य तोंडी । दाढियेसी ॥567॥
माळजमिनीतील वाळलेली कुसळे जशी वार्याने उडून जातात, त्याप्रमाणे मुखाच्या ठिकाणी दाढीची दुर्दशा होते.
568-13
आषाढीचेनि जळे । जैसी झिरपती शैलाची मौळे । तैसे खांडीहूनि लाळे । पडती पूर ॥568॥
आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने जशी पर्वताची शिखरे पाझरतात त्याप्रमाणे दातांच्या खिंडीतून लाळेचे पूर वहातील.
569-13
वाचेसि अपवाडु । कानी अनुघडु । पिंड गरुवा माकडु । होईल हा ॥569॥
वाणीला नीट बोलण्याचे सामर्थ्य रहाणार नाही, कानाची कवाडे बंद होतील व हे पुष्ट असलेले शरीर म्हातार्या माकडासारखे बेडौल होईल.
570-13
तृणाचे बुझवणे । आंदोळे वारेनगुणे । तैसे येईल कापणे । सर्वागासी ॥570॥
गवताचे बुजगावणे जसे वार्याने हालते, त्याप्रमाणे पुढे म्हातारपणी सर्वागात कापरे भरेल.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
571-13
पाया पडती वेगडी । हात वळती मुरकुंडी । बरवेपणा बागडी । नाचविजैल ॥571॥
पायात पाय अडकतील, हात वाकडे पडतील व हल्लीचा सुंदरपणा त्यावेळी सोंगासारखा नाचवला जाईल. म्हणजे हल्लीचा सुंदरपणा जाऊन देहाची आकृती सोंगासारखी होईल.
572-13
मळमूत्रद्वारे । होऊनि ठाकती खोंकरे । नवसिये होती इतरे । माझिया निधनी ॥572॥
मळमूत्रांची द्वारे फुटक्या भांड्यासारखी होतील व इतर लोक माझ्या मरणाविषयी नवस करतील.
573-13
देखोनि थुंकील जगु । मरणाचा पडैल पांगु । सोइरिया उबगु । येईल माझा ॥573॥
अशी माझी अवस्था पाहून सर्व लोक माझ्यावर थुंकतील व मला मरण लवकर येणार नाही आणि सोयर्या-धायर्या लोकांना माझा कंटाळा येईल.
574-13
स्त्रिया म्हणती विवसी । बाळे जाती मूर्छी । किंबहुना चिळसी । पात्र होईन ॥574॥
बायका मला पिशाच म्हणतील व मुले मला भिऊन मूर्च्छित होतील. फार काय सांगावे ? मी सर्वाच्या किळसेला पात्र होईन.
575-13
उभळीचा उजगरा । सेजारिया साइलिया घरा । शिणवील म्हणती म्हातारा । बहुतांते हा ॥575॥
शेजारच्या घरात निजलेल्या माणसांना माझ्या खोकल्याच्या ढासेने होणार्या जागरणामुळे, हा म्हातारा पुष्कळांना शिणवील ” असे ते म्हणतील.
दिवस १८७ वा. ६, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २२३३ ते २२४४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २२३३
ओस जाल्या मज भिंगुळवाणे । जीवलग नेणे मज कोणी ॥१॥
भय वाटे देखे श्वापदांचे भार । नव्हे मज धीर पांडुरंगा॥धृपद॥
अंधकारापुढे न चलवे वाट । लागतील खुंटे काटे अंगा ॥२॥
एकला निःसंग फांकती मारग । होतो नव्हे लाग चालावया ॥३॥
तुका म्हणे वाट दावूनि सद्गगुरु । राहि हा दुरू पांडुरंग ॥४॥
अर्थ
देवा मला या प्रपंचातील सर्व दिशा ओस झालेल्या आहेत असे वाटून भीती वाटत आहे असे असतानाही येथे माझे कोणीही जिवलग नाही असेच मला वाटत आहे. हे पांडुरंगा अशा या प्रपंचाच्या अरण्यांमध्ये षड विकारांचे श्वापदे हे मोकाट फिरत आहेत आणि त्यांना पाहून मला भीती वाटत आहे त्यामुळे हे पांडुरंगा मला आता धीर निघत नाही. देवा अज्ञानाचा अंधकार असल्यामुळे मला या प्रपंचरुपी अरण्यात पुढे चालवत नाही आणि लौकिकाचे खुंट काटे माझ्या अंगाला लागत आहेत. देवा या अरण्यामध्ये मी एकटाच आहे आणि अनेक मार्ग येथे आहेत चुकीच्या मार्गाने जाऊ नये यामुळे मी पुढे जाण्यास भीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात हा पांडुरंग मला सद्गुरू च्या रूपाने येऊन भेटला आणि परमार्थाची वाढ दाखवून दूर पंढरीला जाऊन उभा राहिला.
अभंग क्र. २२३४
जे केली आळी ते अवघी गेली वाया । उरला पंढरिराया श्रम माझा ॥१॥
काय समाधान केले कोण वेळे । कोणे माझे लळे पाळियेले ॥धृपद॥
आभास ही नाही स्वप्नी दुश्चिता । प्रत्यक्ष बोलता कंइचा तो ॥२॥
आता पुढे लाज वाटे पांडुरंगा । भक्त ऐसे जगामाजी जाले ॥३॥
तुका म्हणे आता नाही भरवसा । मोकलीसी ऐसा वाटतोसी ॥४॥
अर्थ
हे पंढरीराया मी आजपर्यंत तुमच्याकडे जो जो हट्ट केला तो व्यर्थ गेला आणि माझ्या हाती व्यर्थ समज उरला आहे. देवा तु आज पर्यंत माझे काय काय समाधान केले आणि माझे लाड तरी आतापर्यंत कोणी पुरवले का ? देवा मला आजपर्यंत स्वप्नात देखील तुझे दर्शन किंवा आभास झाला नाही आणि मला केवळ त्यामुळेच दुःख वाटत आहे आणि तुझ्या समोर अस प्रत्यक्ष बोलताना मला चिंता आणि भय कसलं ? हे पांडुरंगा माझी आज पर्यंत जगामध्ये तुझा भक्त म्हणून चांगलीच मान्यता झाली आहे परंतु मला तुझे दर्शन होत नाही त्यामुळे मला तुझा भक्त म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता माझा तुझ्यावर भरोसा राहिला नाही कारण तु आता मला मोकार टाकून देतोस की काय याची भीती मला वाटत आहे.
अभंग क्र. २२३५
भलते जन्मी मज घालिसील तरी । न सोडी मी हरी नाम तुझे ॥१॥
सुख दुःख तुज देईन भोगिता । मग मज चिंता कासयाची ॥धृपद॥
तुझा दास म्हणवीन मी अंकिला । भोगिता विठ्ठला गर्भवास ॥२॥
कासया मी तुज भाकितो करुणा । तारी नारायणा म्हणवुनि ॥३॥
तुका म्हणे तुज येऊ पाहे उणे । तारिसील तेणे आम्हा तया ॥४॥
अर्थ
हे हरी तु मला कोणत्याही जन्मास घातले तरी मी तुझे नाम सोडणार नाही. देवा तु मला कुठेही जन्माला घातले तरी त्या जन्मातील जी सुखदुःखे आहेत ती सर्व सुखदुःख तुला अर्पण करीन तुलाच भोगायला लावीन मग मला चिंता कसली आहे ? हे विठ्ठला मी कोणताही गर्भवास भोगत असलो तरी स्वतःला तुझाच अंकित आहे असे म्हणून घेईन. हे नारायणा अरे मी तुला करुणा का भाकत आहे कारण तु मला या भवसागरातून तारावे म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात तु जर आम्हाला तारले नाहीस तर तुझे जगामध्ये उणेपणा म्हणजे कमीपणा होईल या भीतीने तरी तु आम्हाला तारशील.
अभंग क्र. २२३६
गातो नाचतो आनंदे । टाळघागरिया छंदे ॥१॥
तुझी तुज पुढे देवा । नेणो भावे कैसी सेवा ॥धृपद॥
नेणो ताळ घात मात । भलते सवा पाय हात ॥२॥
लाज नाही शंका । प्रेम घाला म्हणे तुका ॥३॥
अर्थ
हरिनामाच्या छंदांमध्ये मी हातामध्ये टाळ घेऊन पायामध्ये घागरा बांधून हरी छंदात आनंदाने गातो व नाचतो आहे. देवा तुझ्यापुढे मी तुझ्या छंदात या क्रिया करत असताना भक्तिभाव कसा धरावा आणि तुझी सेवा कशी करावी हे मला काहीही कळतच नाही. देवा तुझ्या छंदांमध्ये मला काहीही समजत नाही ताल म्हणजे कसा असतो ते देखील मला माहित नाही आणि ताल चुकला तर घात होतो हे देखील मला माहीत नाही ताला मध्ये कसे नाचावे व टाळी कशी वाजवी हे सुद्धा मला समजत नाही भलतेच क्रिया माझ्या कडून होत आहेत मला साधे तालामध्ये टाळी सुद्धा वाजवता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा अशा प्रकारची क्रिया करताना मला कोणत्याही प्रकारची शंका येत नाही किंवा लाज देखील वाटत नाही मी केवळ प्रेमाने या क्रिया करत आहे त्यामुळे जरी माझ्याकडून काही चुकले तरी तू तुझ्यापासून मला दूर करू नको.
अभंग क्र. २२३७
मरण माझे मरोन गेले । मज केले अमर ॥१॥
ठाव पुसिले बुड पुसिले । वोस वोसले देहभावा ॥धृपद॥
आला होता गेला पूर । धरिला धीर जीवनी ॥२॥
तुका म्हणे बुनादीचे । जाले साचे उजवणे ॥३॥
अर्थ
माझे मरण मरून गेले कारण मला ब्रम्हज्ञानाचे ज्ञान झाले आणि या ब्रम्हज्ञानानेच मला अमर केले. मरण मानणे म्हणजे देहाविषयी अहंता मानणे आणि माझा देह भावच नाहीसा झाला त्यामुळे मी सर्व देहा संबंधीचे विषय पुसून टाकले आहेत. मी देहाविषयी आसक्ती धरली त्यामुळे अनेक प्रकारचे विकाराचे व विषयांचे पूर आले आणि आता ते नाहीसे झाले आहेत आता माझ्या जीवनाला केवळ ब्रम्हज्ञानाचा धीर असून तेच माझे जीवन आहे. तुकाराम महाराज म्हणतात देहाविषयी अहंता धरणे हे अज्ञान खूप जन्मापासून माझ्या अंतःकरणात होते त्यामुळे जन्म मरण मला सत्य वाटत होते आणि आता मला ब्रम्हज्ञान झाले त्यामुळे मी खरोखर कृतार्थ झालो आहे.
अभंग क्र. २२३८
माझे लेखी देव मेला । असो त्याला असेल ॥१॥
गोष्ट न करी नांव नेघें । गेलो दोघे खंडोनी ॥धृपद॥
स्तुतिसमवेत निंदा । केला धंदा उदंड ॥२॥
तुका म्हणे निवांत ठेलो । वेचित आलो जीवित्व ॥३॥
अर्थ
माझ्या लेखी आता देव मेला आहे ज्याच्यासाठी तो आहे असे वाटत असेल त्याच्यासाठी तो खुशाल असो. देवाविषयी कोणतीही वाच्यता करणे किंवा त्याचे नांव मी आता घेणार नाही कारण आमच्या दोघातील ही द्वैताची उपाधी आता खंडित होऊन गेली आहे. मी आजवर देवाची स्तुती आणि निंदा करण्याचा व्यवहार उदंड केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवाची सेवा आणि भक्ती करण्यातच माझे जीवित्व खर्च झाले आहे परंतु आज आमच्यातील द्वैहित नाहीसे झाले त्यामुळे मी निवांत झालो आहे.
अभंग क्र. २२३९
लवविले तया सवे लवे जाती । अभिमाना हाती सापडेना ॥१॥
भोळिवेचे लेणे विष्णुदासा साजे । तेथे भाव दुजे हारपती ॥धृपद॥
अर्चन वंदन नवविधा भक्ती । दया क्षमा शांति ठायी ॥२॥
तये गावी नाही दुःखाची वसती । अवघा चि भूती नारायण ॥३॥
अव घें चि जाले सोवळे ब्रम्हांड । विटाळाचे तोंड न देखती ॥४॥
तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा । याही भूमंडळामाजी कीर्ती ॥५॥
अर्थ
वैष्णवांच्या पुढे जो जसा लवेल तसेच वैष्णव त्याच्यापुढे लवतात कारण त्यांच्या हातात आपल्याला कधीही अभिमान सापडणार नाही. वैष्णवांना भोळेपणाचा अलंकार शोभून दिसतो कारण त्यांच्या ठिकाणावरून द्वैतपणा हरपलेला असतो. अर्चन, वंदन, नवविधाभक्ती असून दया, क्षमा, शांती वैष्णवांच्या ठिकाणी असते. वैष्णवांच्या ठिकाणी दुःखाची केव्हाच वस्ती नसते आणि सर्व भूती हा नारायणच आहे अशी त्यांची भावना असते. सर्व ब्रह्मांडच नारायण स्वरूप झाले त्यामुळे सर्वत्र सोवळे झाले आहेत आणि ते विकाररूपी विटाळाचे तोंड देखील पाहत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात वैष्णवाचा वैकुंठात देखील डंका गाजत असतो आणि भूमंडळावर देखील त्यांची अक्षय कीर्ति राहते.
अभंग क्र. २२४०
संपदा सोहळा नावडे मनाला । करी ते टकळा पंढरीचा ॥१॥
जावे पंढरिसी आवडी मनासी । कधी एकादशी आषाढी हे ॥२॥
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥३॥
अर्थ
संपदा सोहळा मनाला आवडत नाही तर केवळ पंढरीचा ध्यास मनाला लागलेला आहे. पंढरीला जाणे मनाला फार आवडते आणि कधी एकादशी आषाढी येईल आणि मी पंढरपूरला जाईल असे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात अशी आर्त इच्छा ज्याच्या मनात असते त्याची चक्रपाणि हरी वाट पाहत असतो.
अभंग क्र. २२४१
पंढरीची वारी आहे माझे घरी । आणीक न करी तीर्थव्रत ॥१॥
व्रत एकादशी करीन उपवासी । गाइन अहिर्निशी मुखी नाम ॥२॥
नाम विठोबाचे घेईन मी वाचे । बीज कल्पांतीचे तुका म्हणे ॥३॥
अर्थ
पंढरीची वारी माझ्या घरीच आहे या वाचून मी दुसरे कोणतेही तीर्थ आणि व्रत करीत नाही. मी एकादशी व्रत करून त्या दिवशी उपवासी राहिल आणि रात्रंदिवस हरिनाम घेत त्याचे गुणगान गाईन. तुकाराम महाराज म्हणतात कल्पंतीचे बीज असलेले विठोबाचे नाम मी माझ्या मुखाने सतत गात राहील.
अभंग क्र. २२४२
कथनी पठणी करूनि काय । वाचुनि रहणी वाया जाय ॥१॥
मुखी वाणी अमृतगोडी । मिथ्या भुके चरफडी ॥धृपद॥
पिळणी पाक करिता दगडा । काय जडा होय ते ॥२॥
मधु मेळवूनि माशी । आणिका सांसी पारधिया ॥३॥
मेळऊनि धन मेळवी माती । लोभ्या हाती ते चि मुखी ॥४॥
आपले केले आपण खाय । तुका वंदी त्याचे पाय ॥५॥
अर्थ
हरिकथा करून आणि वेदपठण करून काय उपयोग आहे जर सदाचारच नसेल तर सर्व व्यर्थ आहे. मुखात अमृतासारखी गोड वाणी आहे परंतु भूक लागली की ती सहनच झाली नाही की रागावतो आणि तरफड करतो मग ती अमृतवाणी ही व्यर्थ आहे. दगडाला शिजवले तर तो पिळण्या इतका नरम होईल काय ? मधमाशी अनेक प्रकारचे मध गोळा करते परंतु त्याचा उपयोग पारदि आणि इतर लोकासाठी जास्त होत असतो. लोभी मनुष्य आयुष्यभर केवळ धनच गोळा करतो परंतु त्याच्या हातात आणि मुखात शेवटी मातीच पडते. तुकाराम महाराज म्हणतात जो स्वतः कमावुन स्वतःच खाईल त्याचेच पाय मी वंदीन म्हणजेच जो कथा वेद पठण करून त्याप्रमाणे आचरण करेल त्यालाच मी नमस्कार करीन.
अभंग क्र. २२४३
उमटती वाणी । वाटे नामाचिया ध्वनी ॥१॥
बरे सेवन उपकारा । द्यावे घ्यावे या उत्तरा ॥धृपद॥
सरळ आणि मृद । कथा पाहावी ते उर्ध ॥२॥
गात जात तुका । हाचि उपदेश आइका ॥३॥
अर्थ
माझ्या वाणीद्वारे वाणी वाटे नामाच्या ध्वनी उमटत आहेत. नाम सेवन करणे आणि दुसऱ्याला ऐकवणे हा परउपकार आहे हे चांगले आहे त्यामुळे नाम घ्यावे व द्यावे त्याचा असाच व्यवहार करावा. असे हे नांव आणि हरी कथा सरळ आणि मृदू आहे ते आपल्याला नेहमी उर्ध्व गतीला नेत असते. तुकाराम महाराज म्हणतात मी हरी नामाची कथा आणि हरीचे नाम गात या जीवन मार्गात जात आहे तरी सर्वानी हा उपदेश ऐकावा.
अभंग क्र. २२४४
कथाकाळींची मर्यादा सांगतो ते भावे वंदा । प्रीतीने गोविंदा हे चि एक आवडे ॥१॥
टाळ वाद्या गीत नृत्य अंतःकरणे प्रेमभरित । वाणिता तो कीर्त तद्भावने लेखावा ॥धृपद॥
नये अळसे मोडू अंग कथे कानवडे हुंग । हेळणेचा रंग दावी तो चांडाळ ॥२॥
तोंडी विडा माने ताठा थोरपणे धाली गेंठा । चित्त नेदी नामपाठा गोष्टी लावी तो चांडाळ ॥३॥
कथे इच्छी मान दावूनिया थोरपण रजा संकोच न लुगडी सांवरी तो चांडाळा ॥४॥
आपण बैसे बाजेवरी सामान्य हरीच्या दासा धरी । तरि तो मूळावरी वाहिजे निश्चयेसी ॥५॥
येता न करी नमस्कार कर जोडोनिया नम्र । न म्हणविता थोर आणिका खेटी तो चांडाळ ॥६॥
तुका विनवी जना कथे नाणावे अवगुणा । करा नारायणा ॠणी समर्पक भावे ॥७॥
अर्थ
हरी कथा चालू असताना कसे वागावे याची मर्यादा कशी असते हे मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही भक्तिभावाने ऐका. तुम्ही त्याप्रमाणे वागा कारण जो या मर्यादे प्रमाणे वागेल त्यालाच गोविंद प्रीतीने जवळ घेईल. हरी कथेमध्ये टाळ, वीणा, मृदंग इत्यादी वाद्ये घेऊन अंतकरणात हरी विषयी प्रेम भरून त्याच्या आनंदात गीत गाऊन नुत्य करावे. जो कथेमध्ये हरीची कीर्ति वर्णन करतो तो हरी रूपच आहे असे समजावे. हरिकथा चालू असताना कधीही आळस देऊन अंग मोडू नये आणि आपले ढुंगण वाकडे करू नये. कारण असे केल्याने हरीची हेळणा केल्यासारखे होते आणि तो मनुष्य चांडाळच समजावा लागतो. जो मनुष्य हरी कथेत जेठा घालून बसतो आणि तोंडात विडा धरून मान ताठ करून बसतो, आणि जो हरीच्या नामा कडे चित्त देत नाही, हरी कथेत गप्पागोष्टी करतो तो चांडाळच आहे. कथेमध्ये आपला मान सन्मान व्हावा म्हणुन जो मोठेप
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















