१९ जुलै, दिवस २०० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ८७६ ते ९०० सार्थ तुकाराम गाथा अभंग २३८९ ते २४००

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१९ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १९ July
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १९ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २३८९ ते २४०० चे पारायण आपण करणार आहोत.
१९ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ८७६ ते ९००,

876-13
आणि समस्ताही ठाया । एके काळी धनंजया । आले असे म्हणौनि जया । विश्वाघ्रीनाम ॥876॥
आणि सर्व ठिकाणी एकाच काली ते ब्रह्म आहे, म्हणून अर्जुना, त्यास ‘विश्वांघ्रिज्याचे चरण सर्वत्र आहेत असा, हे नाव आहे.

877-13
पै सवितया आंग डोळे । नाहीत वेगळे वेगळे । तैसे सर्वद्रष्टे सकळे । स्वरूपे जे ॥877॥ जसे सूर्याला अंग व डोळे हे वेगळे नाहीत, तशी जी वस्तु ही पदार्थाच्या स्वरूपाने असल्यामुळे ती सर्वास पहाणारी आहे.

878-13
म्हणौनि विश्वतश्चक्षु । हा अचक्षूच्या ठायी पक्षु । बोलावया दक्षु । जाहला वेदु ॥878॥ म्हणून ‘विश्वतचक्षु ” (ज्याला सर्वत्र नेत्र आहेत असा) असा हा प्रकार, नेत्ररहिताच्या ठिकाणी बोलण्य़ास वेद तयार झाला.

879-13
जे सर्वाचे शिरावरी । नित्य नांदे सर्वापरी । ऐसिये स्थितीवरी । विश्वमूर्धा म्हणिपे ॥879॥ जे सर्वाच्या मस्तकावर नित्य सर्व प्रकाराने नांदत आहे अशी स्थिती असल्यामुळे त्यास ‘विश्वमूर्धा ” म्हटले जाते.

880-13
पै गा मूर्ति तेचि मुख । हुताशना जैसे देख । तैसे सर्वपणे अशेख । भोक्ते जे ॥880॥ अर्जुना, असे पहा कीश अग्नीच्या ठिकाणी जसे अग्नीचे स्वरूप तेच मुख असते, तसे जे ब्रह्म सर्व अंगाने भोगीत आहे,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

881-13
यालागी तया पार्था । विश्वतोमुख हे व्यवस्था । आली वाक्पथा । श्रुतीचिया ॥881॥ या कारणाने अर्जुना त्यालाविश्वतोमुख ” म्हणजे ज्याला सर्वत्र मुखे आहेत असा हा प्रकार श्रुतीच्या बोलण्यात आला.
882-13
आणि वस्तुमात्री गगन । जैसे असे संलग्न । तैसे शब्दजाती कान । सर्वत्र जया ॥882॥
आणि जसे आकाश सर्व वस्तूत मिळून असते त्याप्रमाणे ज्याला सर्वत्र शब्दमात्राच्या ठिकाणी कान आहेत.
883-13
म्हणौनि आम्ही तयाते । म्हणो सर्वत्र आइकते । एवं जे सर्वाते । आवरूनि असे ॥883॥
म्हणून आम्ही त्यास, सर्व ठिकाणी ऐकणारे ” असे म्हणतो. याप्रमाणे जे सर्व पदार्थमात्रास व्यापून आहे.
884-13
एऱ्हवी तरी महामती । विश्वतश्चक्षु इया श्रुती । तयाचिया व्याप्ती । रूप केले ॥884॥
ब्रह्माचे द्वैताने वर्णन का केले ?
हे बुद्धिमान अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ‘विश्वतचक्षु ” या श्रुतीने त्या वस्तूच्या व्याप्तीचे वर्णन केले.
885-13
वाचूनि हस्त नेत्र पाये । हे भाष तेथ के आहे ? । सर्व शून्याचा न साहे । निष्कर्षु जे ॥885॥
एरवी ब्रह्म हे सर्व शून्यपणाचा शेवट आहे, हाही सिद्धांत ज्या ठिकाणी सहन होत नाही, त्या ठिकाणी (ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी) हात, पाय, डोळे हे बोलणे कोठे आहे ?


886-13
पै कल्लोळाते कल्लोळे । ग्रसिजत असे ऐसे कळे । परी ग्रसिते ग्रासावेगळे । असे काई ? ॥886॥
एका लाटेने दुसर्‍या लाटेला गिळून टाकले असे कळते (वाटते), परंतु तेथे ग्रासणारे हे ग्रासले जाणार्‍याहून वेगळे आहे काय ?
887-13
तैसे साचचि जे एक । तेथ के व्याप्यव्यापक ? । परी बोलावया नावेक । करावे लागे ॥887॥
त्याप्रमाणे खरोखर हे जे एक आहे तेथे व्याप्य व व्यापक असा भेद क्षणभर करावा लागतो.
888-13
पै शून्य जै दावावे जाहले । तै बिंदुले एक पाहिजे केले । तैसे अद्वैत सांगावे बोले । तै द्वैत कीजे ॥888॥
शून्य (काही नाही) हे जेव्हा दाखवायचे असते, तेव्हा एक बिंदुले (पूज्य म्हणजे काही नाही, हे दाखवणारी आकृती) करावे लागते, त्याप्रमाणे अद्वैत जेव्हा शब्दांनी सांगावयाचे असते तेव्हा द्वैत करावे लागते.
889-13
एऱ्हवी तरी पार्था । गुरुशिष्यसत्पथा । आडळु पडे सर्वथा । बोल खुंटे ॥889॥
अर्जुना, अव्दैताचे वर्णन करण्याकरता द्वैत केले, नाही तर गुरुशिष्यांच्या सन्मार्गाला (संप्रदायाला) पूर्णपणे अडथळा येईल व बोलणेच खुंटेल.
890-13
म्हणौनि गा श्रुती । द्वैतभावे अद्वैती । निरूपणाची वाहती । वाट केली ॥890॥
अर्जुना, म्हणून श्रुतीने द्वैताच्या सहाय्याने अद्वैताच्या ठिकाणी वर्णन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


891-13
तेचि आता अवधारी । इये नेत्रगोचरे आकारी । ते ज्ञेय जयापरी । व्यापक असे ॥891॥
ते ज्ञेय (ब्रह्म) ज्या प्रकाराने या सर्व दृश्य आकारामधे व्यापून आहे, तोच प्रकार आता ऐक.

सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् ।
असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च ॥13. 14॥
भावार्थ ~> सर्व चक्षु आदि इंद्रिये व सत्वादि गुण यांच्या आकाराने ते भासते (असे दिसते), पण ते स्वत: सर्व इंद्रियानी विरहित आहे. ते (सर्वत्र) असक्त आहे, तथापि सर्वभृत् आहे. ते निर्गुण आहे, परंतु सर्व गुणांचे पालन करणारे आहे.
892-13
तरी ते गा किरीटी ऐसे । अवकाशी आकाश जैसे । पटी पटु होऊनि असे । तंतु जेवी ॥892॥
तरी हे अर्जुना, ते ब्रह्म असे आहे की जसे अवकाशाच्या ठिकाणी आकाश व्यापून आहे अथवा वस्त्रामधे तंतू जसा वस्त्र होऊन आहे.
893-13
उदक होऊनि उदकी । रसु जैसा अवलोकी । दीपपणे दीपकी । तेज जैसे ॥893॥
पहा की पाण्यामधे रस, जसा पाणी होऊन असतो, अथवा दिव्यामधे दिवा होऊन जसे तेज असते,
894-13
कर्पूरत्वे कापुरी । सौरभ्य असे जयापरी । शरीर होऊनि शरीरी । कर्म जेवी ॥894॥
ज्याप्रमाणे कापुरामधे सुगंध, कापूर होऊन असतो अथवा शरीरामधे जसे कर्म शरीर होऊन असते.
895-13
किंबहुना पांडवा । सोनेचि सोनयाचा रवा । तैसे जे या सर्वा । सर्वांगी असे ॥895॥
फार काय सांगावे ? अर्जुना, जसे सोनेच सोन्याचा तुकडा होऊन असतो, त्याप्रमाणे जे ब्रह्म या सर्वाच्या सर्व अंगात आहे.


896-13
परी रवेपणामाजिवडे । तव रवा ऐसे आवडे । वाचूनि सोने सांगडे । सोनया जेवी ॥896॥
येथून ब्रह्माची व्याप्ती जगामधे कशी आहे हे व्यतिरेक दृष्टीने दाखवतात). परंतु ते सोने तुकडेपणामधे असते, तेव्हा तो सोन्याचा तुकडा असे वाटते, पण वास्तविक पाहिले तर (तुकड्याच्या आकाराने असणारे) सोने हे सोन्यासारखेच आहे.
897-13
पै गा वोघुचि वाकुडा । परि पाणी उजू सुहाडा । वन्हि आला लोखंडा । लोह नव्हे की ॥897॥
हे मित्रा अर्जुना, पाण्याचा ओघ जरी वाकडा असला तरी पाणी जसे सरळच असते अथवा लोखंडात अग्नीचा प्रवेश झाला म्हणून तो अग्नी जसा लोखंड होत नाही.
898-13
घटाकारे वेटाळे । तेथ नभ गमे वाटोळे । मठी तरी चौफळे । आये दिसे ॥898॥
घटाच्या आकाराने वेटाळलेले आकाश घटामधे जसे वाटोळे आहे, असे वाटते व मठामधे सापडलेले आकाश हे चौकोनी आकाराचे दिसते.
899-13
तरि ते अवकाश जैसे । नोहिजतीचि का आकाशे । जे विकार होऊनि तैसे । विकारी नोहे ॥899॥
परंतु आकाश हे जसे ते अवकाश (घटातील वाटोळी पोकळी अथवा मठातील चौकोनी पोकळी) झाले नाही, त्याप्रमाणे जे ब्रह्म सर्व विकार (मनादि इंद्रिये अथवा सत्वादि गुणादिक) होऊन, जे विकारवान झाले नाही.
900-13
मन मुख्य इंद्रिया । सत्त्वादि गुणा यया- । सारिखे ऐसे धनंजया । आवडे कीर ॥900॥
अर्जुना ते ब्रह्म, मन ज्यात मुख्य आहे अशा इंद्रियांसारखे आणि सत्वरजादि गुणांसारखे असल्याचे (वरवर) दिसते खरे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २०० वा. १९, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २३८९ ते २४००
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २३८९
कैसा होतो कृपावंत । बहुसंत सांगती । पुसणे नाही यातीकुळ । लागो वेळ नेदावा ॥१॥
ऐसी काय जाणो किती । उतरती उतरले ॥धृपद॥
दावी वैकुंठीच्या वाटा । पाहाता मोठा संपन्न । अभिमान तो नाही अंगी । भक्तालागी न बैसे ॥२॥
आले द्यावे भलत्या काळे । विठ्ठल बळे आगळा । तुका म्हणे आळस निद्रा । नाही थारा त्या अंगी । ॥३॥
अर्थ
हरी भक्तांविषयी किती कृपावंत आहे याविषयी संत खूप वर्णन करुन सांगत असतात. त्याच्या भक्तांची जात कूळ तो तर विचारतच नाही परंतू त्यांचा उध्दार करण्यासाठी तो वेळ लावत नाही. असे कितीतरी भक्त आहेत की जे या भवसागराच्या पार उतरलेले आहेत व काही उतरतही आहेत ते किती आहेत हे देखील माहित नाही. हा हरी भक्तांना वैकुंठाच्या वाटा दाखवितो असा सर्वगुण संपन्न आहे. याच्या अंगी अभिमान तर नाहीच नाही परंतू भक्तांच्या भेटीकरता तो नेहमी वीटेवर उभा असून कधीही बसत नाही. त्याला शरण आलेला भक्त कोणत्याही भलत्या वेळेला येऊ दया त्यांचा तो अंगीकार करतोच असा हा विठ्ठल सर्वापेक्षा वेगळा व बलवान आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “या विठ्ठलाच्या अंगी आळस आणि निद्रेला अजिबात थारा नाही. ”
5:42

अभंग क्र. २३९०
सदैव हे वारकरी । जे पंढरी देखती । पदोपदी विठ्ठल वाचा । त्यासी कैचा संसार ॥१॥
दोष पळाले पळाले । पैल आले हरीदास ॥धृपद॥
प्रेमभाते भरले अंगी । निर्लज्ज रंगी नाचती । गोपीचंदनाची उटी । तुळसी कंठी मिरवती ॥२॥
दुर्बळा या शिक्तहीना । त्या ही जना पुरता ॥ तुका म्हणे देव चित्ती । मोक्ष हाती रोकडा । ३॥
अर्थ
जे वारकरी नेहमी आपल्या डोळयाने पंढरीला पाहातात ते धन्य आहेत. ज्यांच्या पावलापावला गणिक आपल्या वाचेत विठ्ठलनाम आहे त्यांना कसला संसार आला ? जे हरीदास चंद्रभागेच्या पैलतीरावर आले त्यांचे सर्व दोष पळाले. हरीदासांच्या अंगी प्रेमाचे भाते भरले असून ते हरीच्या रंगात निर्लज्ज होऊन नाचत असतात. गळयात तुळशीची माळ घालून कपाळाला चंदनाची उटी लावून ते एक सौभाग्यालंकार मिरवत असतात. देव विटेवर उभा केवळ वारकऱ्यांसाठीच नाही तर दीन दुर्बल शक्तीहीन लोकासाठीही उभा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याच्या हातामध्ये मोक्ष रोकडा आहे. ”
5:42

अभंग क्र. २३९१
ऐसी ठावी वर्मे । तरी सांडवलो भ्रमे ॥१॥
सुखे नाचतो कीर्तनी । नाही आशंकित मनी ॥धृपद॥
ऐसे आले हाता । बळ तरी गेली चिंता ॥२॥
सुखे येथे जाले तरी । नाही आणिकाची उरी ॥३॥
ऐसे केले देवे । पुढे काही चि न व्हावे ॥४॥
तुका म्हणे मन । आता जाले समाधान ॥५॥
अर्थ
मला हरीचे असे वर्म समजले आहे की त्यामुळे माझा सर्व प्रपंचाचा भ्रम निघून गेला आहे. त्यामुळेच मी कीर्तनामध्ये सुखाने नाचतो आणि नाचताना माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका येत नाही. अशा प्रकारचे फळ माझ्या हाती आले असून माझी सर्व चिंता दूर केली आहे. अशा प्रकारचे सुख मला प्राप्त झाले असून इतर काहीही माझ्या मनात उरलेले नाही. देवाने मला अशा पूर्णत्वास नेले आहे की पुढे काही व्हायचे राहीलेच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “आता त्यामुळेच माझे मन समाधानी झाले आहे. ”
5:42

अभंग क्र. २३९२
चित्ती बैसले चिंतन । नारायण नारायण ॥१॥
न लगे गोड काही आता । आणीक दुसरे सर्वथा ॥धृपद॥
हरपला द्वैतभाव । तेणे देह जाला वाव ॥२॥
तुका म्हणे आम्ही । जालो निष्काम ये कामी ॥३॥
अर्थ
नारायण नारायण असे चिंतन करणेच माझ्या चित्तामध्ये वसलेले आहे. मला या वाचून दुसरे काहीही गोड लागत नाही. नारायण आणि माझ्यातील आता द्वैत भाव हरपला आहे त्यामुळे सर्व प्रपंच हा व्यर्थ ठरला आहे. तुकाराम महाराज म्हणतात नारायण आमच्या चित्तात वसलेला आहे व त्यामुळे आम्हाला काही गोड लागत नाही व नारायण चित्तात वसल्यामुळे आमच्यातील द्वैत भाव हरपला आहे त्यामुळेच देहादी सर्व प्रपंच मिथ्या ठरला असून आम्ही निष्काम झालो आहोत.
5:42

अभंग क्र. २३९३
नव्हे परी म्हणवी दास । काही निमित्तास मूळ केले ॥१॥
तुमचा तो धर्मं कोण । हा आपण विचार ॥धृपद॥
नाही शुद्ध आचरण । परी चरण चिंतितो ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । ऐसे का गा नेणा हे ॥३॥
अर्थ
देवा मी तुमचा दास नाही परंतु स्वतःला तुमचा दास म्हणून घेतो कारण मी स्वतःला तुमचा दास म्हणून घेतले तर या निमित्त का होईना तुम्ही माझ्या कडे लक्ष द्याल मला तुमची प्राप्ती होईल. त्यामुळे हे देवा आता तुमचा धर्म काय आहे याविषयी तुम्ही स्वतःशीच विचार करा. देवा माझे आचरण शुद्ध नाही परंतु तुमच्या चरणाचे चिंतन मी करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा अहो तुम्ही हे सर्व जाणत नाही की काय ?
5:43

अभंग क्र. २३९४
व्यापिले सर्वत्र । बाहेरी भीतरी अंतर ॥१॥
ऐसे गोविंदे गोविले । बोले न वजाये बोलिले ॥धृपद॥
संचिताची होळी । करूनि जीव घेतला बळी ॥२॥
तुकयाबंधु म्हणे नाही । आता संसारा उरी काही ॥३॥
अर्थ
माझे अंतरंग व बाह्यरंग हरीने व्यापले आहे तो सर्वत्र व्यापून उरला आहे. अशाप्रकारे गोविंदा ने मला त्याच्यामध्ये संपूर्णपणे गुंतून टाकले आहे आणि माझी परिस्थिती सांगण्याची गेलो तर मला माझी परिस्थिती देखील सांगता येत नाही. देवाने माझ्या संचिताची होळी केली आहे आणि माझा जीवच नाहीस म्हणजे माझी जीव दशा नाहीशी केली आहे. तुकाराम महाराजांचे बंधू म्हणतात आता संसार काहीच उरला नाही.
5:43

अभंग क्र. २३९५
आम्हापाशी सरे एक शुद्ध भाव । चतुराई जाणींव न लगे कळा ॥१॥
सर्वजाण माझा स्वामी पांडुरंग । तया अंगसंगे गोपाळासी ॥२॥
तुका म्हणे कर्मधर्मे नये हाता । तयावरी सत्ता भाविकांची ॥३॥
अर्थ
आम्हा जवळ एक शुद्ध भक्तिभावच चालतो बाकी चतुराई, शब्द ज्ञान तसेच विविध प्रकारची कला आम्हाला लागत नाही. सर्वाना माहीत आहे की माझा स्वामी पांडुरंग आहे आणि त्या गोपाळाची अंगसंगती मला आहे. तुकाराम महाराज म्हणतात कर्म आचरणाने व धर्म आचरणे देव हाती येत नाही तो खऱ्या एकनिष्ठ भक्त भाविकांच्या सत्तेखाली राहतो.
5:43

अभंग क्र. २३९६
प्रीति करी सत्ता । बाळा भीती मातापिता ॥१॥
काय चाले त्याशी बळ । आळी करिता कोल्हाळ ॥धृपद॥
पदरी घाली मिठी । खेदी मागे पुढे लोटी ॥२॥
बोले मना आले । तुका साहिला विठ्ठले ॥३॥
अर्थ
प्रेमाने कोणावरही सत्ता गाजवता येते बाळ लहान जरी असले तरी प्रेमामुळे माता-पिता त्याला घाबरतात. जर लहान बाळाने हट्ट धरून आरडाओरडा केला तर त्याच्या पुढे त्याच्या माता-पित्याचे काय बळ चालते. जर बालकाने मातेच्या पदराला मिठी घातली तर त्या दोघाना देखील जसे बालक म्हणेल तसे मागेपुढे व्हावे लागले व बालकाच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनाही वागावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात या बोलण्याचे कारण असे माझ्या मनामध्ये असे आले आणि मी तसे बोललो आणि विठ्ठलाने देखील हे सर्व सहन केले व माझे सर्व हट्ट विठ्ठलाने पूर्ण केले असे तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात.
5:44

अभंग क्र. २३९७
आवडीचे भेटी निवे । चित्त पावे विश्रांती ॥१॥
बरवियाचा छंद मना । नारायणा अवीट ॥धृपद॥
तूळणे काही साम्या पुरे । हे तो नुरे ये रुचि ॥२॥
तुका म्हणे बरवे जाले । फावले हे कळे त्या ॥३॥
अर्थ
आवडीचा कोणताही मनुष्य भेटला किंवा कोणीही भेटले तरी चित्ताला विश्रांती मिळते. हे नारायणा चांगल्या गोष्टीचा छंद मनाला लागलेला चांगला कारण चांगल्या गोष्टीचा कधीही वीट येत नाही. अशा समान गोष्टीला दुसरी कोणतीही तुलना नाही व त्या गोष्टींमध्ये जी गोडी आहे ती दुसरी कशातही नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला ही गोष्ट समजली आणि त्याचा अनुभव ज्याला आला तो चांगलाच आहे.
5:44

अभंग क्र. २३९८
केलियाचे दान । करा आपुले जतन ॥१॥
माझी बुद्धी स्थिर देवा । नाही विषयांचा हेवा ॥धृपद॥
भावा अंतराय । येती अंतरती पाय ॥२॥
तुका म्हणे जोडी । आदी अंती राहो गोडी ॥३॥
अर्थ
देवा ज्या गोष्टीचे दान तुम्ही मला दिले आहे त्या गोष्टीचे जतन देखील तुम्हीच करा. देवा माझी बुद्धी सद्यस्थितीला अगदी स्थिर आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या विषयांचा हेवा नाही. परंतु देवा मला तुमच्या विषयी जो माझ्या अंतःकरणा मध्ये भक्तीभाव निर्माण झाला आहे त्यामध्ये जर अंतर पडले तर शेवटी मला तुमचे पाय अंतरतील. तुकाराम महाराज म्हणतात देवा सध्या माझ्या मनामध्ये जी तुमच्याविषयी भक्तिभाव उत्पन्न झाला आहे माझी बुद्धी तुमच्या ठिकाणी स्थिर आहे तसेच माझ्या बुद्धीमध्ये कोणत्याही प्रकारचा विषयांचा हेवा नाही हि गोष्ट मला जी प्राप्ती झाली आहे ती तशीच आरंभापासून शेवटपर्यंत राहू द्यावे एवढीच विनंती तुमच्याजवळ आहे.
5:45

अभंग क्र. २३९९
माझे हाती आहे करावे चिंतन । तुम्ही कृपादान प्रेम द्यावे ॥१॥
मागति या भांडवल आळवण । नामाची जतन दातियासी॥धृपद॥
बाळक धावोनि आड निघे स्तनी ॥ घालावा जननी प्रेम पान्हा ॥२॥
तुका म्हणे करी कासवाचे परी । आहे सूत्रदोरी तुझे हाती ॥३॥
अर्थ
देवा मी तुमचे सतत चिंतन करत राहावे आणि त्या बदल्यात तुम्ही माझ्यावर कृपादान व तुमचे प्रेम मला देत राहावे एवढेच मला ठाऊक आहे. मागणाऱ्याचे भांडवल काय आहे तर देणाऱ्या दात्याची आठवण काढत रहावी व त्याच्याकडे जावे आणि देणाऱ्या दात्याचे त्याचे भांडवल काय आहे तर येणाऱ्या याचकाला दान देत राहावे व आपल्या नामाचे जतन करावे. बालकाचे काम काय आहे तर पळत जावे मातेच्या मांडीवर पडून अगदी निश्चिंत मनाने स्तनपान करावे आणि बालकाच्या स्तन मुखात घालून त्याला प्रेम पान्हा पाजावा हे आईने काम करावे. तुकाराम महाराज म्हणतात देवा जसे कासवी आपल्या दृष्टीनेच तिच्या पिलांचे पोट भरत असते अगदी त्याप्रमाणे तू तुझ्या कृपादृष्टीने माझे रक्षण कर माझे पालन-पोषण कर सर्वाच्या रक्षणाची सुत्र दोरी तुझ्याच हाती आहे.
5:46

अभंग क्र. २४००
वाट दावी त्याचे गेले काय । नागवला जो वारिता जाय ॥१॥
ऐसी मागे ठकली किती । सांगता खाती विषगोळा॥धृपद॥
विचारोनि पाहे त्यास । न वजे जीवा नव्हे नास ॥२॥
तुका म्हणे जो रुसला जीवा । तयासी केशवा काय चाले ॥३॥
अर्थ
ज्याला चांगले मार्ग दाखवण्याची सवय आहे त्याचे काहीही खर्च होत नाही परंतु ज्याला चांगला मार्ग दाखवूनही वाईट मार्गाने जातो तो मात्र नक्कीच नागवला जातो. असे मागे म्हणजे पूर्वी कितीतरी लोक फसले गेले आहेत त्यांना वाईट मार्गाने जाऊ नका असे सांगितले तरी वाईट मार्गाच्या विष गोळ्या हे लोक खातातच. तुला खोटे वाटत असेल तर जो मनुष्य पूर्णपणे विचार करून निर्णय घेतो त्या मनुष्याला विचारून पहा जो मनुष्य पूर्णपणे विचार करून कोणताही निर्णय घेतो त्या मनुष्याच्या कधीही जिवाचा नाश होत नाही त्याच्या परमार्थाचा देखील कधीही नाश होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की जो आपल्या जीवावर रुसला असून जो आपल्या जीवनाचा नाश करून घेतो त्याच्यापुढे केशवाचे काय चालणार आहे ?

जुलै नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading