३० जुलै, दिवस २११ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ११५१ ते ११६९ सार्थ तुकाराम गाथा अभंग २५२१ ते २५३२

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“३० जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ३० July
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ३० जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २५२१ ते २५३२ चे पारायण आपण करणार आहोत.
३० जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ११५१ ते ११६९,

1151-13
तैसे जी होतसे देवा । तया अवधानाचिया लवलवा । पाहता व्याख्यान चढले थांवा । चौगुणे वरी ॥1151॥
महाराज, तसे श्रीकृष्णास झाले. त्या अर्जुनाची ऐकण्याची टवटवी (श्रवण उत्सुकता पाहून त्यानाही सांगण्याला चौपटीपेक्षा जास्त जोर आला.
1152-13
सुवाये मेघु सांवरे । जैसा चंद्र सिंधु भरे । तैसा मातुला रसु आदरे । श्रोतयाचेनि ॥1152॥
अनुकूल वार्‍याने पाऊस पाडणारे मेघ जसे जमतात अथवा जशी पौर्णिमेच्या चंद्र दर्शनाने समुद्राला भरती येते, ऐकनार्‍यानी आदर दाखविला की वक्त्यालाही वक्तव्य करण्यास स्फुरण चढते.
1153-13
आता आनंदमय आघवे । विश्व कीजेल देवे । ते राये परिसावे । संजयो म्हणे ॥1153॥
संजय धृतराष्ट्रास म्हणतो कि, आता देव आपल्या मंजुळ वाणीतुन निघालेल्या भाषणांनी संपूर्ण विश्व आनंदमय केले जाईल, तो वृतांत महाराजांनी श्रवण करावा.
1154-13
एवं जे महाभारती । श्रीव्यासे आप्रांतमती । भीष्मपर्वी शांती । म्हणितली कथा ॥1154॥
(ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) याप्रमाणे अमर्याद आणि विशालबुद्धीच्या महर्षी व्यासांनी महाभारतात भीष्मपर्वामधे शांतिरसाने भरलेली कथा सांगितली.
1155-13
तो श्रीकृष्णार्जुनसंवादु । नागरी बोली विशदु । सांगोनि दाऊ प्रबंधु । ओवियेचा ॥1155॥
तो श्रीकृष्ण आणि अर्जुन संवाद ओवीबद्ध काव्यात सुंदर भावपुर्ण शब्दांनी स्पष्टपणे करून दाखवितो.


1156-13
नुसधीचि शांतिकथा । आणिजेल कीर वाक्पथा । जे शृंगाराच्या माथा । पाय ठेवीती ॥1156॥
केवळ शांतिरसाची कथा वाणीच्या रुपाने आपल्या समोर ठेवनार आहे. म्हणजे शब्दांनी सांगितली जाईल पंरतु ती शृंगाररसाच्या मस्तकावर पाय ठेवणारी शृंगाररसावर ताण आणनारी अशी कथा सांगितली जाईल.
1157-13
दाऊ वेल्हाळ देशी नवी । जे साहित्याते वोजवी । अमृताते चुकी ठेवी । गोडिसेपणे ॥1157॥
ज्या पद्धतिने देशी भाषा साहित्याला (अलंकाराला) सजविते व अमृताला देखिल आपल्या गोडपणाने मागे सारेल, अशा रीतीने अपूर्व उत्कृष्ट व सुंदर देशी भाषा (मराठी भाषा) उपयोगात आणू.
1158-13
बोल वोल्हावतेनि गुणे । चंद्रासि घे उमाणे । रसरंगी भुलवणे । नादु लोपी ॥1158॥
ज्या चंद्राच्या उदयापासुन चंद्रकांत मन्यालासुद्धा पाझर फुटतो, त्या चंद्रालाही माझ्या भावमधुर बोलांपासुन पाझर फुटेल. तसेच माझे शब्द आपल्या रसातील रंगाच्या मधुर शक्तिने नादब्रम्हास झाकुन टाकतील.
1159-13
खेचराचियाही मना । आणी सात्त्विकाचा पान्हा । श्रवणासवे सुमना । समाधि जोडे ॥1159॥
माझे निघालेले शब्द हे अज्ञानी असणार्‍या माणसाच्या मनात देखिल अष्ट सात्विक भावाचा पान्हा फुटेल. आणि ज्ञानी जिज्ञासु आणि शुद्ध अंत:करणाच्या लोकांना तर माझे शब्द ऐकल्याबरोबर समाधी लागेल.
1160-13
तैसा वाग्विलास विस्तारु । गीतार्थेसी विश्व भरू । आनंदाचे आवारू । मांडू जगा ॥1160॥
असा गीतेचा अर्थ सांगेन की किंवा वाणीच्या विलासाचा विस्तार करू व गीतार्थाने विश्व भरून टाकू व सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


1161-13
फिटो विवेकाची वाणी । हो काना मना जिणी । देखो आवडे तो खाणी । ब्रह्मविद्येची ॥1161॥
श्रवण केल्याने कानांचे आणि आत्म-साक्षात्काराने मनाचे जगणे सफल होईल. आणि त्यामुळे विचारांचे दैन्य फिटले जाईल. आणि चहुबाजुला ब्रह्मविद्देची खाण नजरेस पडेल.
1162-13
दिसो परतत्त्व डोळा । पाहो सुखाचा सोहळा । रिघो महाबोध सुकाळा- । माजी विश्व ॥1162॥
परब्रह्म तत्व सर्वाच्या दिव्यचक्षुस किंवा नजरेस दिसावा व सर्वञ आनंदाचा उत्सव उदयास येवो व सर्व विक्ष्वामध्ये ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेत प्रवेश व्हावा.
1163-13
हे निफजेल आता आघवे । ऐसे बोलिजेल बरवे । जे अधिष्ठिला असे परमदेवे । श्रीनिवृत्ती मी ॥1163॥
हे सर्व आता घडावे, असे मी भावमधुर शब्दाने बोलेन; श्रेष्ठ देव जे निवृत्तिनाथ, त्यांनी माझा अंगीकार केला असल्याने हे सर्व वर दिल्या प्रमानेच होईल.
1164-13
म्हणोनि अक्षरी सुभेदी । उपमा श्लोक कोंदाकोंदी । झाडा देईन प्रतिपदी । ग्रंथार्थासी ॥1164॥
एवढ्याकरता मर्म स्पष्ट करणार्‍या शब्दांनी उपमा व काव्य यांची अर्थालंकारांची रेलचेल करून या गीताग्रंथातील प्रत्येक पदाचा अर्थ स्पष्ट करून सांगेन.
1165-13
हा ठावोवरी माते । पुरतया सारस्वते । केले असे श्रीमंते । श्रीगुरुराये ॥1165॥
मला आमच्या श्रीमतं सद्गुरुनी येथपर्यंत डोक्यावर हात ठेऊन सर्व शास्ञामध्ये हुशार तरबेज केले आहे.


1166-13
तेणे जी कृपासावाये । मी बोले तेतुले सामाये । आणि तुमचिये सभे लाहे । गीता म्हणो ॥1166॥
महाराज, त्या कृपा आशिर्वादाने मी जितके बोलनार आहे, तितके तुम्हाला मान्य होत आहे आणि तुम्हा संतमंडळीमधे गितेचा भावार्थ सांगण्याचे सामर्थ्य मला आले आहे.
1167-13
वरी तुम्हा संतांचे पाये । आजि मी लाधलो आहे । म्हणोनि जी नोहे । अटकु काही ॥1167॥
ह्या शिवाय आणखी तुम्हा संतांच्या चरणकमलांजवळ आज मी प्राप्त झालो आहे, म्हणून काही अडचण किंवा प्रतिबंध होऊ शकनार नाही.
1168-13
प्रभु काश्मिरी मुके । नुपजे हे काय कौतुके । नाही उणी सामुद्रिके । लक्ष्मीयेसी ॥1168॥
हे देवा, प्रभु, दयाळा सरस्वतीच्या पोटी सहज देखील मुके बालक उत्पन्न होणार नाही. किंवा येऊ शकत नाही. व तसेच लक्ष्मीला चांगल्या सामुद्रिक चिन्हाची कधीच कमतरता पडत नसते.
1169-13
तैसी तुम्हा संतांपासी । अज्ञानाची गोठी कायसी । यालागी नवरसी । वरुषेन मी ॥1169॥
त्याप्रमाने तुम्हा संतांजवळ आल्यावर अज्ञानाची गोष्ट कसली ? अज्ञान राहिलच कसे म्हणून मी आता गीतार्थाच्या द्वारे भावपुर्ण नवरसांचा वर्षाव करीन.
1170-13
किंबहुना आता देवा । अवसरु मज देयावा । ज्ञानदेव म्हणे बरवा । सांगेन ग्रंथु ॥1170॥
फार काय सांगावे ? देवा ! श्रीसद्गुरुराया ! मला गीतेचा भावार्थ सांगण्यास आता संधी द्यावी, म्हणजे मी ग्रंथ चांगल्या रीतीने सांगेन, असे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
~~ हरि ॐ तत्सत्~ ॥ इति श्रीज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकायां क्षेञ-क्षेञज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः ॥13॥ ॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 34॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 1170॥ ॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥~~
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २११ वा. ३०, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २५२१ ते २५३२
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २५२१
निघाले दिवाळे । जाले देवाचे वाटोळे ॥१॥
आता वेचू नये वाणी । विचारावे मनिच्या मनी ॥धृपद॥
गुंडाळिली पोती । भीतरी लावियेली वाती ॥२॥
तुका म्हणे करा । ऐसा राहे माजी घरा ॥३॥
अर्थ
भक्तांचे कल्याणच होत नाही त्यामुळे आता देवाचे दिवाळे निघाले असून त्याचे वाटोळे झाले आहे. त्यामुळे आता आपण आपल्या वाणीने काहीही बोलू नये त्याविषयी आपल्या मनातल्या मानतच विचार करावा. देवाने आपल्या दुकानातील मालाचे पोते गुंडाळून ठेवले आहेत मापही पालथे घालून ठेवले आहे आणि त्यावर दिवा लावला आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे जन हो आता देवाकडे जाण्यात काहीच अर्थ नाही असे काहीतरी करावे जेणेकरून तोच आपल्या हृदयात राहील.
अभंग क्र. २५२२
तीर्थाचिये आसे । पंथ तो निदैव । पाविजेतो ठाव अंतराय ॥१॥
म्हणऊनि भले निश्चळचि स्थळी । मनाचिये मुळी बैसोनिया ॥धृपद॥
संकल्पारूढ ते पराधीन जिणे । कार्यचि कारणे वाढतसे ॥२॥
तुका म्हणे कामा नाही एक मुख । जिरविता सुख होते पोटी ॥३॥
अर्थ
जे नेहमी तीर्थयात्रेच्या मार्गाने चालत असतात ते दुर्दैवी असतात कारण तो नेहमी बहिरमुख असतो व हरिची प्राप्ती करून घेण्यासाठी तो अंतरत असतो. त्यामुळेच मनाची जी आत्मस्थिती आहे त्या ठिकाणी निश्चल होऊन बसणे हेच योग्य व चांगले. जे नेहमी संकल्प करत असतात त्यांचे जगणे हे संकल्पाच्या आधीन असते त्यामुळे त्यांचे जगणे पराधीन असते आणि संकल्प केलेले कार्य पूर्ण करण्यातच ते गुंतून राहून कार्यनेच कार्य वाढत असते. तुकाराम महाराज म्हणतात इच्छेला एक तोंड नसते अनेक तोंड असतात त्यामुळे ते जिरून टाकावे व असे केल्याने आपल्या पोटी आत्मसुख निर्माण होते.
अभंग क्र. २५२३
क्षणक्षणा हाचि करावा विचार । तरावया पार भवसिंधु ॥१॥
नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥धृपद॥
संतासमागमी धरूनि आवडी । करावी तांतडी परमार्थी ॥२॥
तुका म्हणे इहलोकींच्या वेव्हारे । नये डोळे धुरे भरूनि राहो ॥३॥
अर्थ
मनुष्याने भव सिंधू तरुन जाण्यासाठी क्षणाक्षणाला विचार करत राहावा, की हा देह नाशिवंत आहे तो कधी ना कधी जाणार आहे काळ आयुष्याला खात आहे त्यामुळे सावधान असावे. संतांची संगती करण्यास आवड धरून परमार्थ करण्याविषयी तातडी करावी. तुकाराम महाराज म्हणतात इह लोकातील व्यवहाराच्या धुराने डोळे भरून राहू नये तर परमार्थ साधावा.
अभंग क्र. २५२४
कोणाशी विचार करावा शेंवटी । एवढया लाभे तुटी झाल्यातरे ॥१॥
सांभाळितो शूर आला घावडाव । पुढे दिला पाव न करी मागे ॥धृपद॥
घात तो या नावे येथे अंतराय । अंतरल्या पाय गोविंदाचे ॥२॥
तुका म्हणे गडसंदीचा हा ठाव । केला तो उपाय कार्‍या येतो ॥३॥
अर्थ
मनुष्य देहासारखा एवढा मोठा लाभ आपल्या हाती आला आहे आणि तो जर हातून गेला मग शेवटी कोणाशी आणि कोणी विचार करावा ? परमार्थ करत असताना ज्याच्या अंगावर अनेक संकटे येऊन तो सहन करतो तोच खरा परमार्थात शुर आहे व तो परमर्थात टाकलेले पाऊल पुन्हा मागे टाकत नाही. परमार्थामध्ये गोविंदाचे पाय अंतरले तर खरा घात तोच आहे. तुकाराम महाराज म्हणतात मनुष्य देह म्हणजे संधीचे एक ठिकाण आहे या मनुष्य देहामध्ये जो उपाय जे कार्य आपण करू ते सफल होतात.
अभंग क्र. २५२५
असा जी सोवळे । आहा तैसेचि निराळे ॥१॥
आह्मी नयों तुमच्या वाटा । काय लटिकाचि ताठा ॥धृपद॥
चिंतनाचि पुरे । काय सलगी सवे धुरे ॥२॥
तुका म्हणे देवा । नका नावडे ते सेवा ॥३॥
अर्थ
देवा तुम्हाला सोवळ्या स्थितीत राहायचे असेल आणि आमच्यापासून निराळे राहायचे असेल तर तसेच रहा. देवा तुमच्या निर्गुण निराकारी वाटेला आम्ही येणारच नाहीत कारण तेथे ब्रम्‍हज्ञानाचा खोटा अभिमान निर्माण होतो आणि त्या खोट्या ब्रम्‍हज्ञानाच्या अभिमानाला घेऊन काय करावे ? आहो तुमच्या सारख्या निर्गुण निराकारी श्रेष्ठा बरोबर सलगी करून आम्हाला काय करायचे आहे आम्ही केवळ तुमचेच चिंतन करावे एवढेच आमच्यासाठी पुष्कळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या त्या सोवळ्या स्वरूपाची सेवा करणे मला आवडत नाही.
अभंग क्र. २५२६
अहंकार तो नासा भेद । जगी निंद्य ओवळा ॥१॥
नातळे तो धन्य यासी । जाला वंषी दीपक ॥धृपद॥
करवितो आत्महत्या । नेदी आप्ता आतळो ॥२॥
तुका म्हणे गुरुगुरी । माथा थोरी धरूनि ॥३॥
अर्थ
अहंकार जगामध्ये भेद निर्माण करतो आणि त्याचाच नाश करावा कारण तो जगात सर्वत्र निंद्या व ओवळा आहे. जो या अहंकाराला अतळतच नाही म्हणजे अहंकार त्याला स्पर्शच करत नाही तो धन्य आहे आणि तो त्याच्या वंशामध्ये कुलदीपच झाला आहे. हा अहंकार आत्म्याचे ज्ञान होऊ देत नाही म्हणजे तो आत्महत्या करतो आणि ज्याचा आप्त हरी आहे अहंकार त्याच्या जवळ येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हा अहंकार मिथ्या अभिमानाचे ओझे आपल्या डोक्यावर घेऊन आपल्याला गुरगुरायला लावतो.
अभंग क्र. २५२७
इच्छिले ते शकुनवंती । होय देती तात्काळ ॥१॥
क्षीरा नीरा निवाड करी । वरावरी विठ्ठल ॥धृपद॥
भाग्याविण कैचे फळ । अंतर मळमूत्राचे ॥२॥
तुका म्हणे संचित कुडे । ते बापुडे करीतसे ॥३॥
अर्थ
माझी विठाई ही शकुनवंती आहे जो जी इच्छा करेल ते त्याला तात्काळ देते. राजहंस पक्षी जसा दूध आणि पाणी वेगवेगळे करतो तसेच माझी विठाई खरा आणि खोटा यांचा निवडा करते. जर भाग्यच चांगले नसेल तर चांगले फळ तरी कसे मिळेल आणि अंतकरणात जर काम क्रोधाचे मलमूत्र असेल तरीदेखील चांगले फळ कसे प्राप्त होईल. तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे पूर्वसंचितच वाईट आहेत ते संचितच त्यांना दरिद्र करून ठेवते.
अभंग क्र. २५२८
काशासाठी आम्ही जाळिला संसार । न करा विचार ऐसा देवा ॥१॥
कैसे नेणो तुम्हा करवते उदास । माझा प्रेमरस भंगावया ॥धृपद॥
समर्पूनि ठेलो देह हा सकळ । धरिता विटाळ न लजा माझा ॥२॥
तुका म्हणे अवघी मोकलूनि आस । फिरतो उदास कोणासाठी ॥३॥
अर्थ
देवा आम्ही कशासाठी संसार जाळला याविषयी कोणी विचारच करत नाही. देवा आम्हा भक्तांना तुम्ही उदास तरी कसे करतात हे समजत नाही बहुतेक तुम्ही आमचा भक्ती प्रेम रस भंग करायचा म्हणून आम्हाला उदास करत आहात हो की नाही ? आम्ही तुम्हाला आमचा सर्व देह समर्पण केला तरीदेखील तुम्ही आमचा विटाळ धरता या गोष्टीची तुम्हाला लाज कशी वाटत नाही ? तुकाराम महाराज म्हणतात आहो आम्ही सर्व इच्छा त्यागून सर्वत्र उदास फिरतो ते कोणासाठी ?
अभंग क्र. २५२९
नाही तुम्हा काही लाविले मागणे । काटाळ्याच्या भेणे त्रासलेती ॥१॥
एखादिये परी टाळावी करकर । हा नका विचार देखो काही ॥धृपद॥
पायाच्या वियोगे प्राणासंवसाटी । ने घवेसी तुटी झाली आता ॥२॥
तुका म्हणे तुम्हा मागेन ते आता । हेचि कृपावंता चरणी वास ॥३॥
अर्थ
देवा तुमच्या मागे आम्ही कोणत्याही प्रकारची मागणे लावले नाही तरीदेखील हे भक्त काही तरी मागतील या भीतीने तुम्ही त्रासला आहात आणि त्यामुळेच तुम्ही आमचा कंटाळा करत आहात ? एखादे काहीतरी देऊन यांची आपल्या मागची ही करकर दूर करावी असा विचार तर तुम्ही करू नका. देवा तुमच्या पायाच्या वियोगाणे आमचा प्राण जाऊ पाहत आहे तुमच्या पायाचा वियोग आता व्हावा असे आम्हाला वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे कृपावंता आता तुला एकच मागणे आहे ते हे की तुमच्या चरणांजवळ आमचा वास असावा.
अभंग क्र. २५३०
जग अमंगळ । लागे देखता विटाळ ॥१॥
धर्म भूतांची ते दया । सत्य कारण ऐसीया ॥धृपद॥
नव्हे माझे मत । साक्षी करूनि सांगे संत ॥२॥
तुका म्हणे जीवे । दावी उमटूनि अनुभवे ॥३॥
अर्थ
जग हे अमंगळ आहे असे जो पाहतो उलट त्यालाच विटाळ लागून आपण अपवित्र होतो. सर्व प्राणिमात्रांवर दया करणे हीच प्रमुख धर्म नीती आहे व हे संत स्वतः सांगत आहेत. हे माझे मत नाही तर मी संतांना साक्षी धरून सांगत आहे. तुकाराम महाराज म्हणतात भूत दया कशी करावी याबद्दल मी स्वतःच्या अनुभवाने तुम्हाला सांगत आहे.
अभंग क्र. २५३१
दंड अन्यायाच्या माथा । देखोनि करावा सर्वथा ॥१॥
नये उगे बहुता घाटू । सिसे सोनियात आटू ॥धृपद॥
पापपुण्यासाठी । नीत केली आता खोटी ॥२॥
तुका म्हणे देवा । दोष कोणाचा तो दावा ॥३॥
अर्थ
जो कोणी अन्याय करतो त्याची शिक्षेची पात्रता पाहून त्याला शिक्षा म्हणजे दंड करावा. जे निरपराध आहेत त्यांना कदापिही दंड करू नये म्हणजे सिसे सोन्यामध्ये कधीच आटवू नये. देवा पाप आणि पुण्य यासाठी जी वेदनिती तुम्ही तयार केली तिच आता तुम्ही खोटी केली. तुकाराम महाराज म्हणतात देवा यामध्ये दोष कोणाचा आहे आता तो तुम्हीच दाखवा.
अभंग क्र. २५३२
आम्ही पापी तू पावन । हे तो पूर्वापार जाण ॥१॥
नवे करू नये जुने । सांभाळावे ज्याचे त्याणे ॥धृपद॥
मिरासीचा ठाव । राखी करोनि उपाव ॥२॥
वादे मारी हाका । देवा आइकवीतो तुका ॥३॥
अर्थ
देवा आम्ही पतीत आहोत आणि तु पतितपावन आहेस ही रीत पूर्वापार चालत आलेली आहे याची तुम्ही जाणीव ठेवा. त्यामुळे नवी रीत तयार करू नये आणि जुनी रीत सोडू नये ज्याची जशी रीत असेल तसेच त्यांनी सांभाळत रहावे. देवा जी आपली वतनदारी आहे ती कोणत्याही प्रकारचा उपाय करून रक्षण करावी. तुकाराम महाराज म्हणतात मी देवाशी वाद घालून त्याला हाका मारीत आहे मी जे काही बोलत आहे ते देवाला ऐकवित आहे.

जुलै नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading