आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१० जुलै, दिवस १९१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ६५१ ते ६७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २२८१ ते २२९२
“१० जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १० July
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १० जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
१० जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ६५१ ते ६७५,
651-13
मग म्हणे या नांवे । ज्ञान एथ जाणावे । हे स्वमत आणि आघवे । ज्ञानियेही म्हणती ॥651॥
यानंतर लक्षणांवरून ज्ञान ओळखावे हे माझे स्वत:चे मत आहे आणि सर्व ज्ञानीही असेच म्हणतात असे श्रीकृष्ण म्हणाले.
652-13
करतळावरी वाटोळा । डोलतु देखिजे आंवळा । तैसे ज्ञान आम्ही डोळा । दाविले तुज ॥652॥
तळहातावर डोलत असलेला आवळा जसा सर्व अंगांनी पूर्णपणे दिसतो, त्याप्रमाणे आम्ही तुला डोळ्यांनी स्पष्ट दिसेल असे ज्ञान दाखवले.
653-13
आता धनंजया महामती । अज्ञान ऐसी वदंती । तेही सांगो व्यक्ती । लक्षणेसी ॥653॥
यानंतर विशाल बुद्धीच्या अर्जुना, अज्ञान जे म्हणतात तेही स्पष्ट लक्षणांनी सांगतो.
654-13
एऱ्हवी ज्ञान फुडे जालिया । अज्ञान जाणवे धनंजया । जे ज्ञान नव्हे ते अपैसया । अज्ञानचि ॥654॥
अज्ञानाची लक्षणे = सामान्य लक्षण
अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ज्ञान स्पष्ट झाल्यावर अज्ञान जाणता येईल. कारण की जे ज्ञान नाही ते आपोआप कोणीही न सांगता अज्ञानच आहे
655-13
पाहे पा दिवसु आघवा सरे । मग रात्रीची वारी उरे । वाचूनि काही तिसरे । नाही जेवी ॥655॥
अर्जुना असे पहा की ज्याप्रमाणे सर्व दिवस संपल्यावर मग रात्रीच्या येण्याची पाळी असते, याशिवाय तिसरे काही नसते.
656-13
तैसे ज्ञान जेथ नाही । तेचि अज्ञान पाही । तरी सांगो काही काही । चिन्हे तिये ॥656॥
त्याप्रमाणे जेथे ज्ञान नाही तेच अज्ञान समज. तरी पण ती काही लक्षणे सांगतो ऐक.
657-13
तरी संभावने जिये । जो मानाची वाट पाहे । सत्कारे होये । तोषु जया ॥657॥
अज्ञानाची लक्षणे = प्रतिष्ठा, मान, गर्विष्ठपणा
तरी जो प्रतिष्ठेकरता जगतो, जो मानाची वाट पहातो आणि ज्याला सत्काराने संतोष होतो.
658-13
गर्वे पर्वताची शिखरे । तैसा महत्त्वावरूनि नुतरे । तयाचिया ठायी पुरे । अज्ञान आहे ॥658॥
पर्वताची शिखरे जशी खाली लवत नाहीत, तसा जो गर्वाने मोठेपणावरून खाली येत नाही, त्याच्या ठिकाणी पुरे अज्ञान आहे असे समज.
659-13
आणि स्वधर्माची मांगळी बांधे । वाचेच्या पिंपळी । उभिला जैसा देउळी । जाणोनि कुंचा ॥659॥
आणि पिंपळाची मुंज केली म्हणजे त्या पिंपळाला जशी मुंज (मोळाची दोरी) सर्वाना उघड दिसेल अशी बांधतात, त्याप्रमाणे जो आपण केलेल्या स्वधर्माची मुंज आपल्या वाचारूपी पिंपळाला बांधतो, (म्हणजे आपण केलेला धर्म वाचेने लोकांना सांगतो) अथवा जसे देवळात सर्वाना उघड दिसेल असे मोर्चेल जाणूनबुजून ठेवलेले असते.
660-13
घाली विद्येचा पसारा । सूये सुकृताचा डांगोरा । करी तेतुले मोहरा । स्फीतीचिया ॥660॥
विद्येचा पसारा, दुकान घालतो, केलेल्या पुण्यकर्माची दवंडी पिटवतो आणि जेवढे म्हणून काही करतो, तेवढ्याचा मोर्चा कीर्तीकडे असतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
661-13
आंग वरिवरी चर्ची । जनाते अभ्यर्चिता वंची । तो जाण पा अज्ञानाची । खाणी एथ ॥661॥
स्वत:च्या अंगाला भस्म, गंध वगैरे लोकांना दिसेल अशा तर्हेने फासतो व लोक याची पूज्य म्हणून पूजा करत असता हा त्यास फसवीत रहातो, तो अज्ञानाची खाण आहे असे समज.
662-13
आणि वन्ही वनी विचरे । तेथ जळती जैसी जंगमे स्थावरे । तैसे जयाचेनि आचारे । जगा दुःख ॥662॥
अज्ञानाची लक्षणे = दुराचार, दुर्वचन
आणि ज्याप्रमाणे रानास वणवा लागला म्हणजे वृक्ष, प्राणी वगैरे सर्व पदार्थ जळतात, त्याप्रमाणे ज्याच्या वागणुकीने सर्व जगास दु:ख होते,
663-13
कौतुके जे जे जल्पे । ते सबळाहूनी तीख रुपे । विषाहूनि संकल्पे । मारकु जो ॥663॥
अणि जो सहज जे बोलेल, ते भाल्यापेक्षा जास्त तीक्ष्ण टोचते व जो संकल्पाने विषापेक्षा जास्त घात करणारा असतो.
664-13
तयाते बहु अज्ञान । तोचि अज्ञानाचे निधान । हिंसेसि आयतन । जयाचे जिणे ॥664॥
आणि ज्याचे वागणे हिंसेचे घरच असते, त्याच्याजवळ फार अज्ञान आहे (इतकेच नव्हे) तर तोच अज्ञानाचा खजिना आहे.
665-13
आणि फुंके भाता फुगे । रेचिलिया सवेचि उफगे । तैसा संयोगवियोगे । चढे वोहटे ॥665॥
अज्ञानाची लक्षणे = चित्ताचे असमत्व
जसा भाता फुंकल्याने फुगतो व त्यातील वारा सोडल्याने तो लागलीच रिकामा पडतो (संकोचित होतो) त्याप्रमाणे जो इच्छित वस्तूच्या लाभाने अथवा हानीने हर्षित व दु:खी होतो.
666-13
पडली वारयाचिया वळसा । धुळी चढे आकाशा । हरिखा वळघे तैसा । स्तुतीवेळे ॥666॥
वार्याच्या भोवर्यात धूळ सापडली असता ती जशी वर आकाशाकडे चढते तसा स्तुतीच्या वेळी आनंदाने चढून जातो.
667-13
निंदा मोटकी आइके । आणि कपाळ धरूनि ठाके । थेंबे विरे वारोनि शोखे । चिखलु जैसा ॥667॥
जराशी निंदा ऐकली की कपाळ धरून रहातो व जसा चिखल पाण्याच्या एकाक थेंबाने विरघळतो व थोड्याशा वार्याने तो वाळतो.
668-13
तैसा मानापमानी होये । जो कोण्हीहि उर्मी न साहे । तयाच्या ठायी आहे । अज्ञान पुरे ॥668॥
त्याप्रमाणे मानाने व अपमानाने ज्याची स्थिती होते व ज्याला कोणत्याही प्रकारचा वेग सहन होत नाही, त्याच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान आहे.
669-13
आणि जयाचिया मनी गाठी । वरिवरी मोकळी वाचा दिठी । आंगे मिळे जीवे पाठी । भलतया दे ॥669॥
अज्ञानाची लक्षणे = मनातून दुसर्याचा घात
आणि ज्याच्या मनामधे गाठ असते आपल्या मनातील गोष्ट दुसर्यास कधीही कळू देत नाही ज्याचे बोलणे व पहाणे वरून मोकळ्या मनाचे असते व तो वाटेल त्याच्याशी शरीराने मिळतो पण मनाने मात्र त्यास तोंडघशी पाडतो.
670-13
व्याधाचे चारा घालणे । तैसे प्रांजळ जोगावणे । चांगाची अंतःकरणे । विरु करी ॥670॥
पारध्याचे जनावरास चारा घालणे हे जसे असते वरून पहाणारास प्रामाणिक व सरळपणाचे दिसते, पण त्याच्या मनात घात करण्याचा हेतू असतो, त्याप्रमाणे सरळ ज्याचे दुसर्यास पोसणे अथवा सांभाळणे असते पण ते केवळ त्या पोसले जाणार्या माणसाच्या घाताकरताच असते व जो चांगल्या माणसाची अंत:करणे विरुद्ध करतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
671-13
गार शेवाळे गुंडाळली । का निंबोळी जैसी पिकली । तैसी जयाची भली । बाह्य क्रिया ॥671॥
शेवाळाने आच्छादलेली गारगोटी जशी वरून सुंदर दिसते अथवा पिकलेली लिंबोणी जशी वरून सुंदर दिसते, (परंतु आत कडू असते) तसे ज्याचे बाह्य आचरण दिसण्यात चांगले असते
672-13
अज्ञान तयाचिया ठायी । ठेविले असे पाही । याबोला आन नाही । सत्य मानी ॥672॥
त्याच्या ठिकाणी अज्ञान ठेवलेले आहे असे समज, यात अन्यथा नाही, हे खरे मान.
673-13
अज्ञानाची लक्षणे = गुरूविषयी अश्रद्धा
आणि गुरुकुळी लाजे । जो गुरुभक्ती उमजे । विद्या घेऊनि माजे । गुरूसीचि जो ॥673॥
आणि गुरुकुळी ज्याला लाज वाटते, जो गुरुभक्तीला कंटाळतो व गुरूपासून विद्या शिकून गुरूवरच उलटतो,
674-13
तयाचे नाम घेणे । ते वाचे शूद्रान्न होणे । परी घडले लक्षणे । बोलता इये ॥674॥
त्या अभक्ताचे नाव घेणे हे ब्राह्मणाच्या जिव्हेला शूद्राच्या अन्नाच्या स्पर्शाप्रमाणे आहे. पण काय करावे ? अज्ञानाची लक्षणे सांगताना त्या अभक्ताचे नाव घेणे भाग पडले.
675-13
आता गुरुभक्तांचे नांव घेवो । तेणे वाचेसि प्रायश्चित देवो । गुरुसेवका नांव पहा वो । सूर्यु जैसा ॥675॥
म्हणून आता गुरूच्या भक्ताचे नामस्मरण करू व त्यायोगाने वाचेस प्रायश्चित्त देऊ. गुरुभक्ताचे नाव म्हणजे जणू काय सूर्यच आहे असे समजा.
दिवस १९१ वा. १०, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २२८१ ते २२९२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २२८१
सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा । न लिंपे विटाळा अग्नी जैसा ॥१॥
सत्यवादी करी संसार सकळ । अलिप्त कमळ जळी जैसे ॥धृपद॥
घडे ज्या उपकार भूतांची दया । आत्मिस्थति तया अंगी वसे ॥२॥
नो बोले गुणदोष नाइके जो कानी । वर्तोनी तो जनी जनार्दन ॥३॥
तुका म्हणे वर्म जाणितल्याविण । पावे करिता सीण सांडीमांडी ॥४॥
अर्थ
ज्याने सर्वस्वाचा त्याग केला आहे तो सदा सोवळा म्हणजे शुद्ध आहे जसा अग्नी कधीही विटाळला जात नाही अगदी त्याप्रमाणे. जो सत्यवादी असतो तो संसारात तर असतोच परंतु असूनही नसतो म्हणजे जसे कमळ पाण्यात तर राहते पण कमळाच्या पानावर पाणी टाकले तरी ते पाणी कमळाच्या पानावर टिकत नाही अगदी त्याप्रमाणे. ज्याच्या कडून नेहमी इतरांवर उपकार घडतात भूतमात्रविषयी दया ज्याच्या अंतकरणात आहे त्याच्या अंगी आत्मस्थिती भाव बानलेला असतो. तो मनुष्य आपल्या मुखाद्वारे कोणाचेही गुणदोष सांगत नाही एवढेच नाही तर कानांनी ऐकतही नाही तो जगामध्ये तर वावरत असतो परंतु तो जनार्दन स्वरूप असतो. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थाचे खरे वर्म जाणल्याशिवाय कोणतेही कर्म केले तरी ते व्यर्थ शीणच ठरतात.
अभंग क्र. २२८२
कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन । कुळधर्मे निधान हाता चढे ॥१॥
कुळधर्म भक्ती कुळधर्म गति । कुळधर्म विश्रांति पाववील ॥धृपद॥
कुळधर्म दया कुळधर्म उपकार । कुळधर्म सार साधनाचे ॥२॥
कुळधर्म महत्त्व कुळधर्म मान । कुळधर्म पावन परलोकीचे ॥३॥
तुका म्हणे कुळधर्म दावी देही देव । यथाविध भाव जरी होय ॥४॥
अर्थ
जो ज्या कुळात जन्मला त्या कुळाप्रमाणे वागला तर त्या कुळ धर्माप्रमाणे त्याला ज्ञान होते त्याला विवेक आणि वैराग्य अशी साधने प्राप्त होतात आणि परमार्थात त्याला जे खरे वर्म जे निदान पाहिजे आहे ते त्याच्या हाती लागते. जो कुळ धर्माचे आचरण करतो व त्याच्या हातून योग्य भक्ती करतो त्याला योग्य गती आणि विश्रांती प्राप्त होईल. कुळ धर्माप्रमाणे आचरण केले तर दया उत्पन्न होते दुसऱ्यावर उपकार करण्याचे पुण्य होते आणि सर्व साधनांचे सारच कुळधर्म आहे. कुळ धर्माप्रमाणे आचरण केले तर आपल्याला महत्त्व प्राप्त होऊन मान-सन्मान मिळतो आणि त्यामुळे आपले परलोकीचे पित्र देखील पावन होतात. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या कुळ धर्माप्रमाणे आपण आचरण केले तर ते कुळधर्म आपल्याला आपल्या देहामध्ये देव आहे असे दाखवून देते परंतु जर आपले आपल्या कुळ धर्मावर यथाविधी भक्तिभाव असेल तरच.
अभंग क्र. २२८३
पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाही जोडा दुजा यासी ॥१॥
सत्य तोचि धर्म असत्य ते कर्म । आणीक हे वर्म नाही दुजे ॥धृपद॥
गति ते चि मुखी नामाचे स्मरण । अधोगति जाण विन्मुखते ॥२॥
संतांचा संग तोचि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥३॥
तुका म्हणे उघडे आहे हित घात । जयाचे उचित करा तैसे ॥४॥
अर्थ
पुण्य म्हणजे पर उपकार आणि पाप म्हणजे परपीडा आणि पाप व पुण्य यांना दुसरा कोणताही जोडा नाही. सत्य वागणे म्हणजेच धर्म आणि असत्या प्रमाणे वागणे म्हणजे अधर्म व अकर्म आहे आणि धर्म व अधर्म यांचे खरे वर्म सत्य आणि असत्य वागणे हेच आहे दुसरे कोणतेही नाही. नामाचे स्मरण जो करतो त्याला गती मिळते व जो नामाला विन्मुख असतो त्याची अधोगती होते. संतांचा संग करणे म्हणजेच स्वर्ग वासाची प्राप्ती करून घेणे आणि संतांच्या संगती विषयी उदास राहणे व अनात्म पदार्थांशी तादात्म्य ठेवणे म्हणजेच नरक वासाची प्राप्ती करून घेणे होय. तुकाराम महाराज म्हणतात आता मी सर्वाना हिताच्या व अहिताच्या गोष्टी उघडपणे सांगितल्या आहेत त्यामुळे आता ज्याला जसे वागायचे असेल त्याने तसे वागावे.
अभंग क्र. २२८४
न वजे वाया काही ऐकता हरीकथा । आपण करिता वाया न वजे ॥१॥
न वजे वाया काही देवळासी जाता । देवासी पूजिता वाया न वजे ॥धृपद॥
न वजे वाया काही केलिया तीर्थ । अथवा का व्रत वाया न वजे ॥२॥
न वजे वाया जाले संतांचे दर्शन । शुद्ध आचरण वाया न वजे ॥३॥
तुका म्हणे भाव असता नसता । सायास करिता वाया न वजे ॥४॥
अर्थ
हरिकथा संतांच्या मुखाने ऐकली तर ती केव्हाही वाया जाणार नाही एवढेच काय आपण स्वतः जरी हरिकथा केली तरीही ती वाया जाणार नाही. व देवळात जाऊन देवाची पूजा केली तर ती काही वाया जात नाही. तीर्थ केले किंवा कोणत्याही प्रकारचे व्रत केले तर ते वाया जात नाही. संतांचे दर्शन घेतले आणि शुद्ध आचरण ठेवले तर ते वाया जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी आता तुम्हाला जी काही सर्व कर्म सांगितले आहे ती करत असताना भक्ती भाव असो किंवा नसो परंतु चांगले कर्म करण्याचा सायास केला की ते वाया जात नाही.
अभंग क्र. २२८५
चित्ती धरीन मी पाउले सकुमार । सकळ बिढार संपत्तीचे ॥१॥
कंठी धरिन मी नाम अमृताची वल्ली । होईल राहिली शीतळ तनु ॥धृपद॥
पाहेन श्रीमुख साजिरे सुंदर । सकळा अगर लावण्यांचे ॥२॥
करिन अंगसंग बाळकाचे परी । बैसेन तो वरी नुतरी कडिये ॥३॥
तुका म्हणे हा केला तैसा होय । धरिली मने सोय विठोबाची ॥४॥
अर्थ
सर्व परमार्थिक संपत्तीचे बिढार असलेले हरीचे सुकुमार पावले मी माझ्या चित्तात धारण केले आहे. मी माझ्या कंठामध्ये अमृतवल्ली प्रमाणे असलेले हरिचे नाम धारण करेल त्यामुळे माझे सर्व अंग शितल होईल. सर्व लावण्याचे उगमस्थान असे हरीचे सुंदर व साजिरे श्रीमुख आहे ते मी पाहिन. मी लहान मुलाप्रमाणे हरीचा अंग संग करेल आणि त्याच्या कडावर बसेन जोपर्यंत मला त्याच्या कडा वरून खाली उतरावेसे वाटत नाही तोपर्यंत त्याच्या कडेवर बसून राहिल. तुकाराम महाराज म्हणतात हा विठोबा आपण त्याला जसे करू तसे तो होतो म्हणूनच तर माझ्या मनाने त्याचा ध्यास धरला आहे.
अभंग क्र. २२८६
बाळ मातेपाशी सांगे तहानभूक । उपायाचे दुःख काय जाणे ॥१॥
तयापरी करी पाळण हे माझे । घेउनिया ओझे सकळ भार ॥धृपद॥
कासया गुणदोष आणिसील मना । सर्व नारायणा अपराधी ॥२॥
सेवाहीन दीन पातकांची रासी । आता विचारिसी काय ऐसे ॥३॥
जेणे काळे पायी अनुसरले चित्त । निर्धार हे हित जाले ऐसे ॥४॥
तुका म्हणे तुम्ही तारिले बहुता । माझी काही चिंता असो द्यावी ॥५॥
अर्थ
लहान मूल आपल्या आईजवळ तहान व भूक लागली की सांगते परंतु तहान भुकेचे उपाय करताना किती कष्ट करावे लागतात हे ते लहान मुल जाणते काय ? त्याप्रमाणे देवा तु माझे पालन-पोषण, माझे सर्व ओझे सर्व योगक्षेमाचे भार घ्यावे. हे नारायणा मी सर्वतोपरी अपराधी आहे हे तुला माहित आहे त्यामुळे तु माझे गुणदोष कशाला मनात आणशील ? देवा मी तुझी सेवा कधीही केली नाही मी दीन आहे मी पातकांची राशी आहे हे तर तुला माहित आहे मग आता तु माझ्या विषयी काय विचार करतो आहेस ? देवा ज्याकाळी माझे चित्त तुझ्या पायाला अनुसरले त्याच वेळी माझा असा निर्धार पक्का झाला की माझे आता हितच झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही पुष्कळ भक्तांना तारले आहेत आता माझ्या विषयी थोडी चिंता तुमच्या मनात असू द्यावी.
अभंग क्र. २२८७
जीवनावाचूनि तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतो जीवा ॥१॥
न सापडे जाले भूमिगत धन । चरफडी मन तयापरी ॥धृपद॥
मातेचा वियोग जालिया हो बाळा । तो कळवळा जाणा देवा ॥२॥
सांगावे ते किती तुम्हासी प्रकार । सकळाचे सार पाय दावी ॥३॥
ये चि चिंते माझा करपला भीतर । का नेणो विसर पडिला माझा ॥४॥
तुका म्हणे तू हे जाणसी सकळ । यावरी कृपाळ होई देवा ॥५॥
अर्थ
पाण्यावाचून मासा जसा तळमळतो तसाच प्रकार माझ्या जीवाचा होत आहे. एखाद्या कंजूस मनुष्याने पुष्कळ धन जमविले आणि ते भूमीत पुरून ठेवले व काही दिवसांनी त्याला जर सापडले नाही तर त्याचे मन जसे चरफडत असते, मातेचा वियोग बाळाला जर झाला तर ते बाळ जसे तळमळते तसाच प्रकार माझा झाला आहे माझा हा कळवळा तुम्ही जाणून घ्यावा देवा. देवा मी तुम्हाला किती प्रकार सांगू हे सगळे प्रकार सांगण्याचे कारण एकच की तुम्ही मला तुमचे पाय दाखवा. आहो देवा तुमची मला भेट होणार की नाही या चिंतेने माझे अंतकरण करपून गेले आहे तुम्हाला माझा विसर का पडला हे मला काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही माझ्या विषयी तर सर्व काही जाणत आहात तरीही माझ्याविषयी तुम्ही कृपावंत व्हावे.
अभंग क्र. २२८८
शरण आले त्यासी नेदावी हे पाठी । ऐका जगजेठी विज्ञापना ॥१॥
अळविती तयांसी उत्तर झडकरी । द्यावे परिसा हरी विज्ञापना ॥धृपद॥
गांजिलियाचे करावे धावणे । विनंती नारायणे परिसावी हे ॥२॥
भागलियाचा होई रे विसावा । परिसावी केशवा विज्ञापना ॥३॥
अंकिताचा भार वागवावा माथा । परिसावी अनंता विज्ञापना ॥४॥
तुका म्हणे आम्हा विसरावे ना देवा । परिसावी हे देवा विज्ञापना ॥५॥
अर्थ
हे जगजेठी तुम्हाला शरण आलेल्या भक्तांकडे तुम्ही पाठ फिरऊ नका एवढी माझी विनंती तुम्ही ऐका. हे हरी तुम्हाला जे भक्त आळवित असतील त्यांना तुम्ही पटकन उत्तर द्यावे एवढीच माझी विज्ञापना म्हणजे विनंती आहे. हे नारायणा जे गांजलेले आहेत दुःखाने त्रस्त झालेले आहेत त्यांच्याकडे तुम्ही धावत जावे ही तुम्हाला विनंती आहे. हे केशवा दमलेल्या भागलेल्या लोकाचा तु विसावा हो एवढी माझी विनंती तुम्ही ऐका. हे अनंता तुला अंकित झालेल्या दासांचा योगाक्षेमाचा भार तु आपल्या माथ्यावर वागावा एवढी विनंती माझी ऐका. तुकाराम महाराज म्हणतात हे केशवा तु आम्हाला म्हणजेच तुला शरण आलेल्या, तुला आळवणाऱ्या, दुःखाने त्रस्त असणाऱ्या, दमलेल्या, भागलेल्या तुझ्या अंकित दासांना कधीही विसरू नये एवढी माझी विनंती ऐक.
अभंग क्र. २२८९
कोण आम्हा पुसे सिणले भागले । तुजविण उगले पांडुरंगा ॥१॥
कोणापाशी आह्मी सांगावे सुखदुःख । कोण तानभूक निवारील ॥धृपद॥
कोण या तापाचा करील परिहार । उतरील पार कोण दुजा ॥२॥
कोणापे इच्छेचे मागावे भातुके । कोण कवतुके बुझावील ॥३॥
कोणावरी आह्मी करावी हे सत्ता । होईल साहाता कोण दुजा ॥४॥
तुका म्हणे अगा स्वामी सर्व जाणा । दंडवत चरणा तुमच्या देवा ॥५॥
अर्थ
हे पांडुरंगा आम्ही दमलो आहोत का, शिणलो आहोत का असे तुझ्या वाचून आम्हाला दुसरे कोण विचारणार आहे ? देवा आम्ही आमचे सुख दुःख तुझ्या वाचून दुसरे कोणाला सांगावे आणि दुसरे तरी कोण आमची तहान भूक दूर करील ? आमच्या त्रिविधतापाचा परिहार तुझ्यावाचून दुसरा कोण करेल तसेच आम्हाला या भवसागरातून तुझ्या वाचून दुसरा कोण पार करील ? देवा आमच्या इच्छेचे भातुके आम्ही कोणाजवळ मागावे तूझ्या वाचून दुसरे कोण आमचे लाड पूर्ण करेल ? देवा आम्ही तुझ्या वाचून दुसरी कोणावर सत्ता करावी आणि आमची सत्ता सहन करणारा तुझ्यावाचून दुसरा कोणी आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात हे स्वामी माझ्या देवा तुम्ही सर्व जाणते आहात तुमच्या चरणावर माझा दंडवत आहे.
अभंग क्र. २२९०
प्रीति नाही राया वर्जिली ते कांता । परी तिची सत्ता जगावरी ॥१॥
तैसे दंभी जालो तरी तुझे भक्त । वास यमदूत न पाहाती ॥धृपद॥
राजयाचा पुत्र अपराधी देखा । तो काय आणिका दंडवेल ॥२॥
बत्तर खोडी परी देवमण कंठी । तैसो जगजेठी म्हणे तुका ॥३॥
अर्थ
बलाढ्य राजाने आपल्या पत्नीचा त्याग जरी केला तरी तिची सत्ता जगावर चालतेच. त्याप्रमाणे दंभाने का होईना परंतु मी तुझा भक्त झालो आहे देवा त्यामुळे यमदूत माझ्याकडे पाहणार सुद्धा नाहीत. राजाचा पुत्र अपराधी जरी असला तरी त्याला इतर लोक दंड करू शकतील काय ? तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या घोड्याच्या ठिकाणी बहात्तर खोडा असुद्या, परंतु कंठामध्ये एक देव मनी (देव मनी म्हणजे गळ्यावर केसांचा भवरा) असला तरी तो सुलक्षणी समजला जातो त्याप्रमाणे देवा माझ्या अंगी कितीही दोष असले, मी कितीही दांभिक असलो तरी मी तुझा भक्त आहे त्यामुळे मी ही चांगलाच समजला जात आहे.
अभंग क्र. २२९१
करावा उद्धार किंवा घ्यावी हारी । एका बोला स्थिरी राहे देवा ॥१॥
निरसने माझा होईल संदेह । अवघे चि आहे मूळ पायी ॥धृपद॥
राहिलो डीकोनी काही चि न कळे । कोणा नेणो काळे उदय भाग्य ॥२॥
तुका म्हणे बहु उद्वेगला जीव । भाकीतसे कीव देवराया ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही माझा उद्धार तरी करा किंवा उद्धार होत नाही म्हणून हार तरी माना तुम्ही तुमच्या कोणत्यातरी एका बोलण्यावर स्थिर रहा. देवा सर्व साधनांचे मूळ म्हणजे तुमचे पाय आहेत आणि त्या ठिकाणी माझा आश्रय आहे परंतु तुम्ही जर माझा उद्धार करण्याविषयी हार मानली तर माझी निराशा होईल व तुमच्या सामर्थ्याविषयी मला संदेह निर्माण होईल. देवा मी तुम्हाला चिटकून राहिलो आहे मला काहीच कळत नाही माझा उद्धार केव्हा होईल व असे भाग्य कोणत्या काळी उदयाला येईल हे मला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे देवराया या प्रपंच्या विषयी माझा जीव खूप त्रासला आहे त्यामुळेच मी तुमची कीव भाकीत आहे.
अभंग क्र. २२९२
आलिया भोगासी असावे सादर । देवावरी भार घालूनिया ॥१॥
मग तो कृपासिंधु निवारी साकडे । येर ते बापुडे काय रंक ॥धृपद॥
भयाचिये पोटी दुःखाचिया रासी । शरण देवासी जाता भले ॥२॥
तुका म्हणे नव्हे काय त्या करिता । चिंतावा तो आता विश्वंभर ॥३॥
अर्थ
देवावर आपल्या योगक्षेमाचा भार घालून आलेल्या आपल्या प्रारब्धानुसार संकटांना तोंड देण्यास तयार असावे. मग तो कृपासिंधू आपले सर्व संकट दूर करील इतर दीनबापडे यासंबंधी काय करणार आहेत. भयाच्या पोटामध्ये अनेक दुःखाच्याराशी लपलेल्या आहेत त्यामुळे देवाला शरण जाणे हेच उत्तम होय. तुकाराम महाराज म्हणतात या विश्वंभराला काय करणे अशक्य आहे त्यामुळे आता विश्वंभराचे चिंतन करत राहावे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















