आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

३१ जुलै, दिवस २१२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी १ ते २५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २५३३ ते २५४४
“३१ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 31 July
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ३१ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २५३३ ते २५४४ चे पारायण आपण करणार आहोत.
३१ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी १ ते २५,
सार्थ श्रीज्ञानेश्वरी: :: ॥ अथ चतुर्दशोऽध्यायःअध्याय चौदावा ॥ गुणत्रयविभागयोगः ॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अध्याय चौदावा
1-14
जय जय आचार्या । समस्तसुरवर्या । प्रज्ञाप्रभातसूर्या । सुखोदया ॥14-1॥
आचार्य आपण सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहात. जगामध्ये जेवढे पण सुख आहे. त्याचा उदय करणारे अन्य कोणी नसुन आपण आहात. आपला जयजयकार असो.
2-14
जय जय सर्व विसांवया । सोहंभाव-सुहावया । नाना लोक हेलावया । समुद्रा तू ॥14-2॥
तुम्ही सर्व जगाचे विश्रांति-स्थान आहात. =सर्वाच्या ह्रदयात ‘मी ब्रह्म आहे ” अशा भावनेस सेवन करविणारे (तुम्ही आहात). तुम्ही विविध चतुर्दश लोकरूपी लाटांचा विशाल असा समुद्र आहात. तुमचा जयजयकार असो.
3-14
आइके गा आर्तबंधू । निरंतरकारुण्यसिंधू । विशदविद्यावधू- । वल्लभा जी ॥14-3॥
देवा, तुम्ही दीनदयाळ असुन अखंड भरलेले ओहोटी नसलेले दयेचे समुद्र, शुद्धविद्यारूप अध्यात्मविद्यारूप स्त्रीचे प्रियकर असे महाराज, तुम्ही ऐका.
4-14
तू जयांप्रति लपसी । तया जग हे दाविसी । प्रकट तै करिसी । आघवेचि तू ॥14-4॥
तू ज्यांना लपवतोस, त्यांना हे जग दाखवतोस म्हणजे ज्यांच्यामधे तुझ्यासंबंधाने अज्ञान असते त्यांना तुझे स्वरूप न दिसता जग दिसते व तू ज्यांना प्रगट होतोस त्यावेळी त्यांना सर्व तूच करतोस. म्हणजे ज्यांच्यामधे तुझ्यासंबंधाने ज्ञान असते त्यांना जग न दिसता, सर्व तूच दिसतोस.
5-14
की पुढिलाची दृष्टि चोरिजे । हा दृष्टिबंधु निफजे । परी नवल लाघव तुझे । जे आपणपे चोरे ॥14-5॥
गारुडी जो नजरबंदीचा खेळ करुन समोरच्याची दृष्टि दोष घडवुन आणतो किंवा दृष्टी चोरतो आपण त्यास आपली स्वत:ची नजरबंदी करता येत नाही. परंतु आपण आपल्याला चोरून रहाणे स्वत:स स्वत: विषय न होणे ही तुझी अद्भुत जादू आहे. सद्गुरुराया हे जगतालाही आपले भान होऊ देत नाहीत व आपण स्वत: ज्ञानरूप असल्यामुळे आपले भानही आपल्या ठिकाणी घेत नाहीत.
6-14
जी तूचि तू सर्वा यया । मा कोणा बोधु कोणा माया । ऐसिया आपेआप लाघविया । नमो तुज ॥14-6॥
कारण की या सर्व विक्ष्वाला तूच तू आहेस. म्हणजे या जगात सर्व काही तूच आहेस. असे असून सुद्धा कोणाचे ठिकाणी तुझे ज्ञान आहे तर कोणाचे ठिकाणी तुझ्यासंबंधी माया (अज्ञान) आहे. असा जो तू स्वभावत: जादूगार, त्या तुला नमस्कार असो.
7-14
जाणो जगी आप वोले । ते तुझिया बोला सुरस जाले । तुझेनि क्षमत्व आले । पृथ्वियेसी ॥14-7॥
पृथ्वीतलावर चे द्रवरुप पाणी आहे. त्या पाण्याला तुमच्यामुळे गोडी आली आहे. भुतलावर भुतभाराची सहन करण्याची जी ताकत आली आहे ती तुमच्या मुळेच.
8-14
रविचंद्रादि शुक्ती । उदय करिती त्रिजगती । ते तुझिया दीप्ती । तेज तेजा ॥14-8॥
चंद्र आणि सुर्य हे विशाल शिंपल्याप्रमाने तेजोमय आहेत. परंतु त्यांचा जो तिन्ही लोकांवर पडनारा प्रकाश हा तुमच्याच तेजाच्या शक्तिचा प्रभाव आहे.
9-14
चळवळिजे अनिळे । ते दैविकेनि जी निजबळे । नभ तुजमाजी खेळे । लपीथपी ॥14-9॥
तुमच्या अलौकीक व स्वाभाविक बळामुळे वारा सर्वञ हालचाल करत असतो. आणि विशाल दिसले तरी तो तुमच्या पोटामध्ये लपडांव खेळत असते.
10-14
किंबहुना माया असोस । ज्ञान जी तुझेनि डोळस । असो वानणे सायास । श्रुतीसि हे ॥14-10॥
फार काय सांगावे ? महाराज अमर्याद असे जे मायाज्ञान संपूर्ण अन्यथाज्ञानाचे आपणच प्रकाशक आहात. परंतु हे वर्णन पुरे ! कारण आपले वर्णन करणे श्रुतिलाही कष्टप्रद आहे.
11-14
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
वेद वानूनि तवचि चांग । जव न दिसे तुझे आंग । मग आम्हा तया मूग । एके पांती ॥11॥
वेद तुझे उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे वर्णन करत असतात. जोपर्यंत तुझ्या खर्या स्वरुपाचे त्यांना दर्शन होत नाही. तोपर्यंत पण एकदा का तुझ्या निर्गुण निराकार स्वरुपाचे दर्शन झाले की आम्हाला व वेदाना एकाच लाईन मध्ये बसुन मुग गिळुन शांत बसावे लागते.
12-14
जी एकार्णवाचे ठाई । पाहता थेंबाचा पाडु नाही । मा महानदी काई । जाणिजती ॥12॥
महाराज, प्रलयाच्या वेळेस सर्व ठिकानचे वातावरण जलमय झाल्यावर पाण्याच्या एका थेबांचा सुद्धा पत्ता लागत नाही. मग महानद्या तरी कशा जाणल्या जातील ? (तर नाही. महानद्यांचा देखील प्रळयकालच्या महासमुद्रात पत्ता लागणार नाही).
13-14
का उदयलिया भास्वतु । चंद्र जैसा खद्योतु । आम्हा श्रुति तुज आंतु । तो पाडु असे ॥13॥
अथवा सूर्य उगवल्यावर चंद्राचा असणारा प्रकाश जसा काजव्यासारखा असतो, त्याप्रमाणे तुझ्या स्वरुपाच्या वर्णनाविषयी आमची व वेदांची योग्यता एकसारखीच आहे.
14-14
आणि दुजया थांवो मोडे । जेथ परेशी वैखरी बुडे । तो तू मा कोणे तोंडे । वानावासि ॥14॥
आणि द्वैताचा जेथे जोर नाहीसा होतो, असलेला आधार मोडुन जातो व परावाणीसह वैखरी नाहीशी होते, किंबा बुडुन जाते. असा जो तू त्या तुझे मग ‘परा, पश्यन्ती ” इत्यादि वाचांपैकी कोणत्या वाचेने, वाणीने वर्णन करावे ?
15-14
यालागी आता । स्तुति सांडूनि निवांता । चरणी ठेविजे माथा । हेचि भले ॥15॥
देवा याकरता आता तुझी स्तुती करण्याचे सोडून देऊन चुपचाप आपल्या चरणांवर मस्तक ठेवावे हेच चांगले.
16-14
तरी तू जैसा आहासि तैसिया । नमो जी श्रीगुरुराया । मज ग्रंथोद्यमु फळावया । वेव्हारा होई ॥16॥
(गुरूंकडे काव्यासंबंधी मागणे)
तर अहो गुरुमहाराज, आपण जसे आहात तशाच तुम्हाला मी आता नमस्कार करतो. आपण मजवर एवढी कृपा करा की माझा ग्रंथरूप उद्योग सफल होण्यास आपण सावकार व्हा.
17-14
आता कृपाभांडवल सोडी । भरी मति माझी पोतडी । करी ज्ञानपद्य जोडी । थोरा माते ॥17॥
आता कृपारूपी भांडवल सोडा व माझी बुद्धिरूपी पिशवी भरा आणि ज्ञानाने भरलेल्या काव्याच्या लाभाने मला थोर करा.
18-14
मग मी संसरेन तेणे । करीन संतांसी कर्णभूषणे । लेववीन सुलक्षणे । विवेकाची ॥18॥
मग मी त्या योगाने सावरेन आणि मग विचारांची चांगली लक्षणे असलेली सुंदर कर्णभूषणे (भिकबाळी) करून ती संतांना घालीन.
19-14
जी गीतार्थनिधान । काढू माझे मन । सुयी स्नेहांजन । आपले तू ॥19॥
महाराज, माझे मन गीतार्थरूपी ठेवा प्रगट करण्यास समर्थ व्हावे, या करता तुम्ही आपले कृपारूपी अंजन माझ्या बुद्धिरूपी डोळ्यात घाला.
20-14
हे वाक्सृष्टि एके वेळे । देखतु माझे बुद्धीचे डोळे । तैसा उदैजो जी निर्मळे । कारुण्यबिंबे ॥20॥
जेणे करून माझ्या बुद्धिचे डोळे सर्व शब्दसृष्टीला एकाच सपाट्यात माझ्या बुद्धीच्या ज्ञानाला आकलन करता येईल. या तर्हेने हे श्रीगुरुसूर्या, आपण आपल्या करुणारूप शुद्ध बिंबाने उदयाला यावे.
21-14
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
माझी प्रज्ञावेली वेल्हाळ । काव्ये होय सफळ । तो वसंतु होय स्नेहाळ । शिरोमणी ॥21॥
हे हे प्रेमळाचे शिरोमनी श्री सदगुरुराया श्रीगुरु, माझ्या बुद्धिरूपी सुंदर वेलाला काव्यरूपी फळे येण्यासाठी ज्या योगाने येईल, किंवा जो वसंतऋतु त्यासाठी पोषक लागते ते आपण व्हावे.
22-14
प्रमेय महापूरे । हे मतिगंगा ये थोरे । तैसा वरिष उदारे । दिठीवेनी ॥22॥
ज्या योगाने ही बुद्धिरूप गंगा ब्रह्मसिद्धांतरूपी बोधाचा महापूर येऊन चांगली फोफावेल, त्या प्रकाराने उदार दृष्टीचा वर्षाव होऊ दे.
23-14
अगा विश्वैकधामा । तुझा प्रसाद चंद्रमा । करू मज पूर्णिमा । स्फूर्तीची जी ॥23॥
हे सर्व जगताला एकच आश्रय असणार्या श्रीगुरुराया, तुझा प्रसन्नतारूप चंद्र माझ्या अंत:करणात उदयास येऊन स्फूर्तिरूप पौर्णिमा करो.
24-14
जी अवलोकिलिया माते । उन्मेषसागरी भरिते । वोसंडेल स्फूर्तीते । रसवृत्तीचे ॥24॥
महाराज, आपण मला कृपादृष्टीने पाहिले असता, माझ्या बुद्धिरूपी समुद्रात स्फूर्तीला शांत वगैरे नवरसांची भरती येईल.
25-14
तव संतोषोनि श्रीगुरुराजे । म्हणितले विनतिव्याजे । मांडिले देखोनि दुजे । स्तवनमिषे ॥25॥
(गुरूंची आज्ञा)
तेव्हा संतोषित होऊन गुरुराय म्हणाले, ज्ञानदेवा, विनंती करण्याच्या मिषाने स्तुतीच्या पांघरुणाखाली तू द्वैत केले असे आम्हास दिसून येते.
दिवस २१२ वा. ३१, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २५३३ ते २५४४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २५३३
पाडावी ते बरी । गाठी धुरेसवे खरी ॥१॥
नये मरो लंडीपणे । काय बापुडे ते जिणे ॥धृपद॥
लुटावे भांडार । तरी जया नाही पार ॥२॥
तुका म्हणे नावे । कीर्ती आगळीने ज्यावे ॥३॥
अर्थ
थोर व्यक्तीच्या गाठी पाडुन घ्याव्यात आणि त्यांचाच आश्रय घ्यावा हेच खरे आहे. भित्र्या पणाने जगु नये व अशा बापुडवाण्या जगण्याला तरी काय अर्थ आहे काय ? ज्याला अंतपारच नाही असे एखादे भांडार लुटावे. तुकाराम महाराज म्हणतात आपले नांव व आपली किर्ती विशेष रूपाने उरावी असेच जगावे.
अभंग क्र. २५३४
भांडणचि जाले । मग जीवाचे काय आले ॥१॥
येऊ नेदावी पुढती । आड भयाची ते जाती ॥धृपद॥
करिता सरोबरी । काही न ठेवावी उरी ॥२॥
तुका म्हणे शूर । व्हावे धुरेसींच धुरे ॥३॥
अर्थ
अन्याय झाला आहे आणि भांडण करण्याची वेळ त्यामुळे आली आहे तर तेथे जिवाचे काय आले आपल्या जीवावर उदार होऊन ते भांडण करावे. आपला स्वभाव जरी भित्रा असला तरी आपण निकराने भांडावे आपला भित्रा स्वभाव बाजूला ठेवून भांडावे. ज्या व्यक्तीशी आपण भांडण करत आहोत त्याच्याशी भांडण करताना त्याची बरोबरी आपण करूनच भांडावे आपल्या मध्ये कोणत्याही प्रकारची उणीव येऊ देऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात मोठ्याशी भांडताना आपणही मोठे शुर होऊनच भांडावे.
अभंग क्र. २५३५
जन्मांतरी शुद्ध नाही आचरण । यालागी चरण अंतरले ॥१॥
वोढवले संचित येणे जन्म पाहता । आता पंढरिनाथा कृपा करी ॥धृपद॥
पतितपावन ब्रिद साच करी देवा । यालागी कुढावा करी माझा ॥२॥
अपराधी पातकी दृष्ट दुराचारी । अहाळलो भारी संवसारे ॥३॥
कामक्रोध आदि कल्पनेच्या त्रासे । तुज न पवे ऐसे झाले देवा ॥४॥
हा ना तोसा ठाव झाला पांडुरंगा । नयेचि उपेगा काय करू ॥५॥
आपुलिया नावा धावणिया धावे । लवकरी यावे तुका म्हणे ॥६॥
अर्थ
अनेक जन्मजन्मांतर पासून माझे आचरण शुद्ध नव्हते त्यामुळे हे देवा तुझे चरण मला अंतरले आहेत. परंतु या जन्मी जर पाहिले तर काहीतरी पूर्वपुण्यच माझ्याकडे ओढवले आहे त्यामुळे हे पंढरीनाथा आता माझ्यावर तुम्ही कृपा करा. देवा तुमचे पतितपावन असे ब्रीद आहे ते तुम्ही खरे करा आणि माझे रक्षण करा. देवा मी अपराधी, पातकी, दृष्ट, दुराचारी आहे संसाराच्या त्रासाने त्रस्त झालो आहे. देवा आधीच काम क्रोधाने आणि त्यात विविध प्रकारच्या कल्पनेने मी त्रासलो आहे त्यामुळे मी तुला प्राप्त करून घेणार नाही, असेच झाले आहे. पांडुरंगा धड नाही संसार, नाही धड परमार्थ त्यामुळे मला दोन्हीकडेही ठावठिकाणा राहिला नाही त्यामुळेच मी निरुपयोगी ठरलो आहे आता मी काय करू ते सांग ? तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही तुमची ब्रिदे खरी करा आणि लवकर माझ्याकडे तुम्ही धावत यावे.
अभंग क्र. २५३६
प्रथमभेटी आळिंगण । मन चरण वंदावे ॥१॥
ऐसा माझा भोळा बाप । हरी ताप कवळोनि ॥धृपद॥
न संगता सीण भाग । पांडुरंग जाणतसे ॥२॥
तुका म्हणे कृपावंते । द्यावे भाते न मागता ॥३॥
अर्थ
पांडुरंगाच्या प्रथम भेटीला त्याला आलिंगन द्यावे नंतर त्याचे चरण वंदावे. असा माझा भोळा बाप पांडुरंग आहे त्यांनी भक्तांना एकदा जरी कवळले तरी त्यांचा त्रिविध तापाचा नाश होतो. पांडुरंगाला जरी काही सांगीतले नाही तरी तो न सांगता भक्तांचे सर्व शीण भार जाणत असतो. तुकाराम महाराज म्हणतात हा पांडुरंग इतका कृपावंत आहे की त्याला काहीही न मागता आपल्याला खाऊ खाण्यास देतो.
अभंग क्र. २५३७
वचनाचा अनुभव हाती । बोलविती देव मज ॥१॥
परि हे न कळे अभाविका । जडलोका जिवांसी ॥धृपद॥
अनुश्रुत हे प्रसादिक । कृपा भीक स्वामीची ॥२॥
तुका म्हणे वरावरी । जातो तरी सांगत ॥३॥
अर्थ
मी जे काही बोलत आहे त्याविषयी माझ्या हातात अनुभव आहे आणि मी बोलत नसून प्रत्यक्ष देवच मला बोलवीत आहे. परंतु हे अभावीक आणि मूर्ख लोकांना कळत नाही. मी जे काही अभंगरूपी शब्द बोलत आहे ते यापूर्वी कधीही न ऐकलेले आणि प्रासादिक आहेत याला कारण म्हणजे माझ्या स्वामिने माझ्यावर त्याच्या कृपेची भिक घातलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी हे रहस्य लोकांना सारखे वरवर सांगत जात आहे.
अभंग क्र. २५३८
का रे तुह्मी ठेवा बहुता निमित्ते । माझिया संचिते वोढवले ॥१॥
भक्तीप्रेमगोडी बैसली जिव्हारी । आनंद अंतरी येणे झाला ॥धृपद॥
पुसिले पडळ त्रिमिर विठ्ठले । जगचि भरले ब्रह्मानंदे ॥२॥
तुका म्हणे केलो कामनेवेगळा । आवडी गोपाळा असे वरी ॥३॥
अर्थ
लोकांनो मी संसार सोडला त्यामुळे तुम्ही माझ्यावर विविध आरोप का ठेवता खरे तर हे माझ्या पूर्व संचितामुळेच ओढावले आहे. हरीविषयी माझ्या अंत:करणामध्ये भक्ती प्रेम गोडी बसली त्यामुळे अंत:करणात आनंद निर्माण झाला. माझ्या ज्ञानदृष्टीवर अज्ञानाचा पडदा पडला होता तो त्या विठ्ठलाने दूर केला त्यामुळेच सर्व जगच मला ब्रम्हानंदाने भरलेले दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “या गोपाळाने मला वासनेपेक्षा वेगळे करुन ठेवले त्यामुळे माझी गोपाळावर आवड बसली आहे. ”
अभंग क्र. २५३९
आसन शयन भोजन गोविंदे । भरले आनंदे त्रिभुवन ॥१॥
अवघिया केली काळे तडातोडी । अवसर घडी पुरो नये ॥धृपद॥
वांटणी घातले शरीराचे भाग । दुजियाचा लाग खंडियेला ॥२॥
आवडीच्या आले आहारासी रूप । पृथक संकल्प मावळले ॥३॥
काम तरी क्रोध बुद्धी मन नासे । भ्रमाचे वोळसे गिळले शांती ॥४॥
तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग । बैसला अभंग एकविध ॥५॥
अर्थ
बसताना, झोपताना, जेवताना सारखे गोविंदाचे चिंतन चालू असते त्यामुळे त्रिभूवनात आनंद समवलेला मला दिसतोय. काळाने माझा आणि इतरांचा संबंधाचा ताडातोड केला असून माझ्या चित्तात गोविंदाचे स्मरण सारखे चालू असते व यामुळेच मला कोणाचेही स्मरण करण्यास अवसरच पडत नाही. माझ्या शरीराचे भाग पंचमहाभूताच्या ठिकाणी वाटणीला घातले असून व्दैतभावच मी खंडीत केला आहे. माझ्या आवडीचा आहार तो म्हणजे हरीची भक्ती हा मला पुष्कळ भेटत आहे त्यामुळे इतर सर्व व्यर्थ संकल्प मावळून गेले आहेत. काम, क्रोध, बुध्दी देणारे विविध निश्चय आणि हे सर्व ज्या ठिकाणी तयार होते असे मन नाहीसे झाले असून आता केवळ आत्मज्ञान झाल्यामुळे शांती निर्माण झाली असून भ्रमाचे सर्व ओळसे नाहीसे झाले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “माझ्या मनामध्ये श्रीरंगाचा रंग अभंग व एकनिष्ठ म्हणजे कधीही न भंगणारा बसला आहे. ”
अभंग क्र. २५४०
ज्वरल्यासी काढा औषध पाचन । मूढा नारायण स्मरवितो ॥१॥
भवव्याधि येणे तुटेल रोकडा । करूनिया झाड निश्चयेसी ॥धृपद॥
आणिका उपाया अनुपान कठिण । भोगे बरे सीण शीघ्रवत ॥२॥
तुका म्हणे केला उघडा पसारा । भाग्य आले घरा दारावरी ॥३॥
अर्थ
ताप आलेल्या व्यक्तीला वैद्य ज्याप्रमाणे काढा आणि पाचक औषध देतो अगदि त्याप्रमाणे मी मूढ लोकांना नारायणाचे चिंतन घडवीत असतो. नारायणाचे स्मरण केल्याने भवव्याधी तात्काळ नाहीशी होऊन संसार रुपी रोग निश्चयाने नाहीसे होतात. योग्ययागादी, यज्ञकर्म, अनुष्ठान सारखे अजूनही उपाय आहेत परंतु त्यांचे अनुपान फार कठीण आहे परंतु नारायणाचे स्मरण केल्याने सर्व दुःख शीण नाहीसे होतात. तुकाराम महाराज म्हणतात मी संसार रोग नाहीसा करण्याचा उघड पसारा मांडला आहे तरी असे भाग्य तुमच्या घरा दारावर स्वतःहून चालून आले आहे तरी तुम्ही याचा उपयोग करून घ्यावा.
अभंग क्र. २५४१
जपाचे निमित्त झोपेचा पसर । देहाचा विसरू पाडूनिया ॥१॥
ऐसी ती भजने अमंगळवाणी । सोंगसंपादणी बहुरूप्याची ॥धृपद॥
सेवेसी विकिले देहाचिये आसे । तया कोठे असे उरला देव ॥२॥
तुका म्हणे मानदंभ जया चित्ती । तयाची फजीती करू आम्ही ॥३॥
अर्थ
जपाचे निमित्त करून देहभान विसरून झोप घेतो. अशा व्यक्तीचे भजन म्हणजे अमंगळवाणीच असते बहुरूपी सोंग संपादन करतो त्याप्रमाणेच तो असतो. जो देहाच्या इच्छा पूर्ण करण्याकरता देवाच्या सेवेला मुकला देहाचे पालन पोषण करण्याकरता जो भक्ती व्यवसाय म्हणून करतो त्यांना देव कसा प्राप्त होईल. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या चित्तामध्ये मान सन्मान आणि दंभ आहे त्याची आम्ही फजिती करू.
अभंग क्र. २५४२
परद्रव्य परकांता । नातळे जयाचिया चित्ता । आणि कर्मी तो तत्वता । बांधला नव जाय ॥१॥
ऐसा अनुभव रोकडा । विश्वासीतो जीवा जोडा । एकांत त्या पुढा । अवघा करी उकल ॥धृपद॥
सकळ आंबले ते अन्न । शोधी तेचि मद्यपान । विषमाने भिन्न । केले शुद्धाशुद्ध ॥२॥
तुका म्हणे नित । बरवे अनुभवे उचित । तरी काय हित । मोले घ्यावे लागते ॥३॥
अर्थ
परद्रव्य आणि परनारी हे दोन विषय ज्याच्या चित्तात नसतात, तो इतर कोणत्याही पाप कर्माने बांधला जात नाही हे मी निश्चयाने सांगतो. अशा शुध्दवान माणसाला ब्रम्हाअनुभवाचा अनुभव विश्वासाने सांगावा. आणि एकातात बसून त्याच्यापुढे अधिकारी माणसाने सर्व गुह्यत ज्ञान उगड करून सांगावे. जो आंबलेले अशुद्ध अन्न खातो आणि त्याबरोबरच मद्यपानाचा जो शोध घेतो, त्याच्या मनात अनेक प्रकारचे कल्पित भेद निर्माण तयार होऊन हे शुद्ध आहे ते अशुद्ध आहे असे वैषम्य तयार होते. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारची धर्म नित आहे त्यामुळे योग्य रीतीने ब्रम्ह अनुभव घेणे उचित आहे. आपले हित करून घेण्यासाठी काही मोल देऊन विकत घ्यावे लागते काय ?
अभंग क्र. २५४३
भूक पोटापुरती । तृष्णा भरवी वाखती । करवी फजीती । हावे भार वाढला ॥१॥
कुळिकेसी लांस फांस । डोई दाढी बोडवी दोष । अविहितनाश । करवी वचन चुकता ॥धृपद॥
विधिसेवने विहिते । कार्यकारणापुरते । न वाटे जो चित्ते । अधर्माच्या तो त्यागी ॥२॥
आज्ञा पाळणे ते सेवा । भय धरोनिया जीवा । तुका म्हणे ठेवा । ठेविला तो जतन ॥३॥
अर्थ
भूक पोटा पुरतीच असते परंतू संसारातील आशा-अपेक्षा मुळे संचय केला जातो. त्यामुळे फजिती होती संसारात पोटापुरती भूक भागवण्यासाठी पैसे कमवावेत असं न वाटता संसारातील अपेक्षा आणि आशा यामुळे संसाराचा भार वाढतच जातं आहे. एखादयाला मुडशी किंवा अजीर्ण झाले तर बरे व्हावे यासाठी त्याने डोक्यावरील किंवा दाडीचे केस काढले तर त्याने तो बरा होईल का तर नाही याउलट तो दोषास्पद होईल. त्याप्रमाणे साधुसंतांनी व शास्त्राने सांगितलेले वचन म्हणजे शब्द जर ऐकले नाही आणि जर अविहित कर्म मनुष्याने केले तर त्याचा संसारात आणि व्यवहारात दोन्हीकडेही नाशच होतो. विधी नुसारच जो विषयाचे सेवन करून कारणा पुरताच जो सहकार्य करतो, ज्याचे चित्त अधर्माने कधीही बाटले जात नाही तो खरा त्यागी आहे. तुकाराम महाराज म्हणतात श्रुती व वेदाने ज्या अज्ञा आपल्याला सांगितल्या आहेत त्या आज्ञेचे पालन करावे व हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि त्या आज्ञेचे जर आपण पालन केले नाही तर आपल्याला पाप लागेल असे भय आपल्या जीवाला धरून राहावे. तुकाराम महाराज म्हणतात या प्रमाणे आपण वागलो तर आपण साठवून ठेवलेला जो पुण्याचा ठेवा आहे त्याचे जतन होत असते.
अभंग क्र. २५४४
कळे न कळे ज्या धर्म । ऐका सांगतो रे वर्म । माझ्या विठोबाचे नाम । अटटाहासे उच्चारा ॥१॥
तो या दाखवील वाटा । तया पाहिजे त्या नीटा । कृपावंत मोटा । पाहिजे तो कळवळा ॥धृपद॥
पुसता चुका होतो वाटा । सवे बोळावा गोमटा । मोडो नेदी काटा । घेऊ साटा चोरासी ॥२॥
तुका म्हणे मोल । न लगे द्यावे वेचा बोल । विठ्ठल विठ्ठल । ऐसा छंद मनासी ॥३॥
अर्थ
धर्म कोणाला कळत असेल किंवा नसेल तरी त्याचे एक वर्म मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही ऐका. ते म्हणजे तुम्ही माझ्या विठोबाचे नाम आटटाहासाने उच्चारा. ज्याला जी चांगली वाट पाहिजे ती वाट विठोबा त्याला दाखवील. तो खूप मोठा कृपावंत आहे परंतु त्याच्याविषयी आपल्या हृदयामध्ये कळवळा पाहिजे. जर एखाद्या अज्ञानी व्यक्तीला प्रवास करताना वाट विचारली तर आपण चुकण्याची शक्यता असते त्यामुळे तो जो ज्ञानी आहे त्यालाच मार्ग विचारतो. त्याप्रमाणे आपल्याला परमार्थामध्ये विठोबा सारखा सर्वज्ञानी वाटाड्या पाहिजे तो आपल्या बरोबर असला की तो आपल्याला नरकाच्या वाटा मोडू देणार नाहीये आणि आपल्या जवळील भक्ती प्रेमाचे सामान देखील कामक्रोधादी चोरांना घेऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात याच्या बदल्यांमध्ये त्या विठोबाला कोणत्याही प्रकारचे मोल द्यावे लागत नाही केवळ तुमच्या वाणीने एवढेच बोला. विठ्ठल विठ्ठल असे केवळ म्हणा आणि तो छंद मनाला लावा.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















