२४ जुलै, दिवस २०५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी १००१ ते १०२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २४४९ ते २४६०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२४ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २४ July
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २४ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २४४९ ते २४६० चे पारायण आपण करणार आहोत.
२४ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी १००१ ते १०२५,

1001-13
तया अनार्ताची आर्ती । तया पूर्णाची तृप्ती । तया अकुळाची जाती- । गोत होय ॥13-1001॥
त्या इच्छारहिताची इच्छा, त्या पूर्णाची तृप्ती व त्या कुलरहिताची जाती व गोत देखील ही प्रकृती होते.
1002-13
तया अचर्चाचे चिन्ह । तया अपाराचे मान । तया अमनस्काचे मन । बुद्धीही होय ॥1002॥
ज्याच्या विषयी काही चर्चा करता येत नाही, अशा पुरुषाचे ही लक्षण होते, त्या अमर्याद पुरुषाचे ही माप होते व त्या मनरहित पुरुषाचे मन व बुद्धी ही प्रकृती होते.
1003-13
तया निराकाराचा आकारु । तया निर्व्यापाराचा व्यापारु । निरहंकाराचा अहंकारु । होऊनि ठाके ॥1003॥
त्या निराकार पुरुषाचा ही आकार होते, त्या व्यापाररहिताचा व्यापार आपण होते व त्या अहंकाररहित पुरुषाचा अहंकार ही होऊन रहाते.
1004-13
तया अनामाचे नाम । तया अजाचे जन्म । आपण होय कर्म- । क्रिया तया ॥1004॥
त्या नामरहिताचे ही नाम होते व त्या जन्मरहित पुरुषाचा जन्म ही होते आणि त्याची क्रिया कर्म आपण होते.
1005-13
तया निर्गुणाचे गुण । तया अचरणाचे चरण । तया अश्रवणाचे श्रवण । अचक्षूचे चक्षु ॥1005॥
त्या निर्गुणाचे गुण ही होते, त्या पायरहिताचे पाय ही होते. त्या कानरहिताचे कान ही होते व त्या नेत्ररहिताचे नेत्रही ही होते.


1006-13
तया भावातीताचे भाव । तया निरवयवाचे अवयव । किंबहुना होय सर्व । पुरुषाचे हे ॥1006॥
त्या भावातीताचे (जन्मादि सहा) भाव (विकार) ही होते व त्या अवयवरहित पुरुषाचे ही अवयव होते. फार काय सांगावे ? ही प्रकृती त्या पुरुषाचे सर्व काही होते.
1007-13
ऐसेनि इया प्रकृती । आपुलिया सर्व व्याप्ती । तया अविकाराते विकृती- । माजी कीजे ॥1007॥
याप्रमाणे प्रकृती ही आपल्या सर्वव्यापकपणामुळे अविकार जो पुरुष त्याला विकारवान करते.
1008-13
तेथ पुरुषत्व जे असे । ते ये इये प्रकृतिदशे । चंद्रमा अंवसे । पडिला जैसा ॥1008॥
तेथे (त्या पुरुषाचे ठिकाणी) जो पुरुषपणा आलेले आहे, ते या प्रकृतीच्या अवस्थेमुळे आलेले आहे. प्रकृतीशी संबंध केल्यामुळे पुरुष हा आपल्या तेजाला कसा मुकतो ते पुढे अनेक दृष्टांतांनी सांगतात. ज्याप्रमाणे चंद्र अमवास्येस पडतो म्हणजे तेजोहीन होतो.
1009-13
विदळ बहु चोखा । मीनलिया वाला एका कसु होय पांचका । जयापरी ॥1009॥
अतिशय शुद्ध असलेल्या वालभर सोन्यात अन्य हिणकस धातू मिसळला तर ज्याप्रमाणे त्याचा कस पाचावर येऊन बसतो,
1010-13
का साधूते गोंधळी । संचारोनि सुये मैळी । नाना सुदिनाचा आभाळी । दुर्दिनु कीजे ॥1010॥
अथवा पिशाच हे चांगल्या मनुष्याच्या अंगात संचार करून ज्याप्रमाणे त्यास पापकर्मात घालते, अथवा ढग हे चांगल्या दिवसाचा उदासीन असा दिवस करतात,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


1011-13
जेवी पय पशूच्या पोटी । का वन्हि जैसा काष्ठी । गुंडूनि घेतला पटी । रत्नदीपु ॥1011॥
गाईच्या पोटात दूध असताना जसे ते पांढरे स्वच्छ असे दिसत नाही अथवा लाकडात अग्नी असतांना जसा तो चकचकीत दिसत नाही. किंवा वस्त्रात तेजस्वी रत्न गुंडाळले असता त्याचे तेज जसे दिसत नाही.
1012-13
राजा पराधीनु जाहला । का सिंहु रोगे रुंधला । तैसा पुरुष प्रकृती आला । स्वतेजा मुके ॥1012॥
राजा शत्रूच्या स्वाधीन झाला असता जसा निस्तेज होतो, अथवा सिंह जसा रोगाने व्यापला म्हणजे जसा निस्तेज होतो, तसा पुरुष हा प्रकृतीच्या स्वाधीन झाला की स्वत:च्या तेजाला मुकतो.
1013-13
जागता नरु सहसा । निद्रा पाडूनि जैसा । स्वप्नीचिया सोसा । वश्यु कीजे ॥1013॥
जागृत पुरुष जसा निद्रेने एकदम पडला असता म्हणजे झोपेच्या स्वाधीन झाला असता, तो स्वप्नातील हावेच्या भरीस पडून सुखदु:खभोगास पात्र केला जातो.
1014-13
तैसे प्रकृति जालेपणे । पुरुषा गुण भोगणे । उदास अंतुरीगुणे । आतुडे जेवी ॥1014॥
त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या स्वाधीन झाल्याकारणाने त्याला गुण भोगणे भाग पडते. ज्याप्रमाणे विरक्त पुरुष स्त्रीच्या योगाने (सुखदु:खाच्या फेर्‍यात) सापडला जातो.
1015-13
तैसे अजा नित्या होये । आंगी जन्ममृत्यूचे घाये । वाजती जै लाहे । गुणसंगाते ॥1015॥
जेव्हा पुरुषास गुणांची संगती घडते, तेव्हा तो स्वभावत: जन्मशून्य व नित्य असूनही, त्याच्या अंगावर मृत्यूचे तडाखे बसतात.


1016-13
परि ते ऐसे पंडुसुता । तातले लोह पिटिता । जेवी वन्हीसीचि घाता । बोलती तया ॥1016॥
परंतु अर्जुना ते असे आहे की जसे तापलेल्या लोखंडावर घण मारले असता ते घणाचे तडाखे अग्नीलाच बसतात असे जसे म्हणतात,
1017-13
का आंदोळलिया उदक । प्रतिभा होय अनेक । ते नानात्व म्हणती लोक । चंद्री जेवी ॥1017॥
अथवा पाणी हलले असता चंद्राची अनेक प्रतिबिंबे होतात, त्यावेळी (अज्ञानी) लोक चंद्राचे ठिकाणी जसे अनेकत्व आहे असे म्हणतात,
1018-13
दर्पणाचिया जवळिका । दुजेपण जैसे ये मुखा । का कुंकुमे स्फटिका । लोहित्व ये ॥1018॥
आरशाच्या जवळपणामुळे पहाणार्‍याच्या मुखाला दुसरेपण येते अथवा केशराच्या सान्निध्यामुळे स्फटिकाला तांबडेपणा येतो.
1019-13
तैसा गुणसंगमे । अजन्मा हा जन्मे । पावतु ऐसा गमे । एऱ्हवी नाही ॥1019॥
त्याप्रमाणे हा पुरुष स्वत: अजन्मा असून गुणसंबंधाने जन्म पावतो असे वाटते. एरवी (गुणांचा संबंध टाकून पाहिले तर) तो जन्म पावत नाही.
1020-13
अधमोत्तमा योनी । यासि ऐसिया मानी । जैसा संन्यासी होय स्वप्नी । अंत्यजादि जाती ॥1020॥
ज्याप्रमाणे संन्यासी स्वप्नामधे अंत्यजादि होतो त्याप्रमाणे या पुरुषास नीच व उच्च योनी आहेत असे समज.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


1021-13
म्हणौनि केवळा पुरुषा । नाही होणे भोगणे देखा । येथ गुणसंगुचि अशेखा- । लागी मूळ ॥1021॥
म्हणून केवळ पुरुषाचा जन्मणे व भोगणे वगैरे सर्व गोष्टींशी जो संबंध दिसतो त्याला कारण पुरुषाला असलेली गुणांची संगती ही होय.

उपद्रष्टाऽनुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः ।
परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः ॥13. 22॥
भावार्थ :-
प्रकृतीच्या जवळ राहून प्रकृतीकार्याहून आपणास वेगळा पहाणारा, अनुमोदन देणारा (शास्ता) भर्ता, उपभोग घेणारा, महेश्वर, या शरीरामधे परमात्मा असे ज्याला म्हणतात, प्रकृतीच्या पलीकडचा असा पुरुष अशी ज्यासंबंधी वदंता आहे (तो हाच). पुरुष हा प्रकृतीपेक्षा
वेगळा आहे.
1022-13
हा प्रकृतिमाजी उभा । परी जुई जैसा वोथंबा । इया प्रकृति पृथ्वी नभा । तेतुला पाडु ॥1022॥
हा पुरुष प्रकृतीमधे उभा आहे खरा परंतु जुईच्या वेलास जसा आश्रयभूत खांब उभा केलेला असतो, त्या खांबाप्रमाणे हा पुरुष प्रकृतीला केवळ आश्रयभूत आहे. पृथ्वी व आकाश यामधे जेवढे अंतर आहे तेवढे अंतर प्रकृती व पुरुष यामधे आहे.
1023-13
प्रकृतिसरितेच्या तटी । मेरु होय हा किरीटी । माजी बिंबे परी लोटी । लोटो नेणे ॥1023॥
अर्जुना, प्रकृतीरूप नदीच्या तीरावर मेरुपर्वतासारखा हा असून तिच्यामधे याचे प्रतिबिंब पडते, परंतु तिच्या प्रवाहाबरोबर हा वहात जात नाही.
1024-13
प्रकृति होय जाये । हा तो असतुचि आहे । म्हणौनि आब्रह्माचे होये । शासन हा ॥1024॥
प्रकृती होते व जाते परंतु हा पुरुष आहे तसाच आहे. म्हणून हा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वाचे नियमन करणारा आहे.
1025-13
प्रकृति येणे जिये । याचिया सत्ता जग विये । इयालागी इये । वरयेतु हा ॥1025॥
प्रकृती याच्या योगाने जगते व याच्या सत्तेने जगास प्रसवते, म्हणून हिला हा नवरा आहे.

दिवस २०५ वा. २४, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २४४९ ते २४६०
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २४४९
कळले माझा तुज नव्हे रे आठव । काय काज जीव ठेवू आता ॥१॥
तू काय करिसी माझिया संचिता । धिग हे अनंता झाले जिणे ॥धृपद॥
पतितपावन राहिलो या आशा । आइकोनि ठसा कीर्ती तुझी ॥२॥
आता कोण करी माझा अंगीकार । कळले निष्ठुर झालासी तू ॥३॥
तुका म्हणे माझी मांडिली निरास । करितो जीवा नास तुजसाठी ॥४॥
अर्थ
देवा तुला माझी आठवण सुद्धा येत नाही हे मला समजले आहे कळले आहे त्यामुळे आता माझा जीव तरी मी कशासाठी सांभाळू. हे अनंता तु तरी आता माझ्या संचिता विषयी काय करशील माझे संचित तसे आहे की तुला माझी आठवण येत नाही त्यामुळे माझ्या जगण्याचा धिक्कार असो. देवा तु पतीत पावन आहेस तुझ्या किर्तीचा ठसा सर्वत्र पसरलेला आहे त्यामुळे तु माझा उध्दार करशील या आशेनेच मी निवांत राहिलो होतो. देवा तुझ्या वाचून दुसरा माझा कोण अंगिकार करणार आहे तुला इतकी हाक मारून देखील तु माझ्याकडे येत नाहीस तुझी भेट देत नाहीस याचा अर्थ असा की तु माझ्या विषयी निष्ठुर झाला आहेस हे मला समजले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तु माझ्या जीवाची निराशा केली आहेस त्यामुळे आता मी तुझ्यासाठी माझ्या जीवाचा ही नाश करेल.
4:16 Sdm:

अभंग क्र. २४५०
तरि का मागे वाया कीर्ती वाढविली । जनांत आपुली ब्रिदावळी ॥१॥
साच करिता आता फिरसी माघारा । ठायीचे दातारा नेंणवेचि ॥धृपद॥
संतासी श्रीमुख कैसे दाखविसी । पुढे मात त्यासी सांगईन ॥२॥
घेईन डांगोरा तुझिया नामाचा । नव्हे अनाथांचा नाथ ऐसा ॥३॥
तुका म्हणे आम्ही राहिलो मरोनि । तू का होसी धनी निमित्याचा ॥४॥
अर्थ
अरे देवा तू आपली ब्रिदावळी म्हणजे तू भक्तवत्सल आहेस दीनानाथ आहेस पतितपावन आहेस अशी कीर्ती पूर्वी जन माणसांमध्ये वाढविली आणि तू तर इतका कठोर आहेस हे मला समजले आहे मग तू व्यर्थ तू आपली ब्रिदावळी का वाढविली आहेस ? देवा एखाद्याला जर एखादी पदवी मिळालेली असेल तर त्या पद्धती प्रमाणे वागणे हे त्याचे कर्तव्य आहे मग हे सर्व तुला माहित असून देखील तू आपल्या ब्रिदापासून माघारी का फिरत आहेस ? देवा मी तुझी सर्व माहिती आता संतांना सांगणार आहे मग मी पाहतोच तु आपले श्रीमुख मग संतांना कसे दाखवितो ? मी आता तुझ्या नामाचा असा सर्वत्र डांगोरा पिटणार आहे की देव अनाथांचा नाथ नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा अहो आम्ही कसेही केले तरी मरणारच आहोत परंतु तुझी कृपा आमच्यावर झाली नाही म्हणूनच तुझा भक्त मेला असा तू ठपका स्वतःवर ओढवून घेण्याचा धनी विनाकारणच का होतोस ?
4:17 Sdm:

अभंग क्र. २४५१
लाजती पुराणे । वेदा येऊ पाहे उणे ॥१॥
आम्ही नामाचे धारक । किविलवाणी दिसो रंक ॥धृपद॥
बोलिले ते संती । बोल वायांविण जाती ॥२॥
तुका म्हणे देवा । रोकडी हे मोडे सेवा ॥३॥
अर्थ
देवा तु माझा उध्दार केला नाहीस आणि पुराने व वेद तर गर्जुन सांगतात की देव भक्तांचा उद्धार करतोच त्यामुळे पुराने देखील आज लज्जित झाले आहेत आणि वेदाला कमीपणा येऊ पाहत आहे. देवा आम्ही तुझे भक्त असून तुझ्या नामाचे धारक असून देखील केविलवाणे व दीन दिसत आहोत. पूर्वी संतांनी जे सांगितले आहे ते बोल म्हणज, देव भक्तांचा नामधारकाचा उध्दार करतो ते बोल आता वाया जात आहे असेच दिसते आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता तुझ्या सेवेचा मार्ग फार मोडकळीस आला आहे असे दिसते.
4:18 Sdm:

अभंग क्र. २४५३
आहारनिद्रे न लगे आदर । आपण सादर तेचि होय ॥१॥
परमितेविण बोलणे ते वाया । फार थोडे काया पिंड पीडी ॥धृपद॥
समाधान त्याचे तोचि एक जाणे । आपुलिये खुणे पावोनिया ॥२॥
तुका म्हणे होय पीडा ते न करी । मग राहे परी भलतिये ॥३॥
अर्थ
आहार आणि निद्रा या गोष्टी तुमच्याजवळ आपोआप येतात त्यासाठी इतर कष्ट करावे लागत नाही. आहार व निद्रेला जास्त महत्त्व देऊ नये तसेच मर्यादा सोडून कधीही जास्त बोलू नये तसेच व्यर्थ बोलू नये त्यामुळे आपल्या शरीराला फार नाही पण थोडे तरी कष्ट होतातच. जो आत्मस्थितीत प्राप्त होतो त्याला होणारे समाधान हे तोच एक जाणत असतो. तुकाराम महाराज म्हणतात जेणेकरून आपल्याला व दुसऱ्याला पीडा होईल असे काहीच करू नये मग तो कोणत्याही स्थितीत राहिला तरी हरकत नाही.
4:27 Sdm:

अभंग क्र. २४५४
भूमि अवघी शुद्ध जाणा । अमंगळ हे वासना ॥१॥
तैसे वोसपले जीव । सांडी नसता अंगी घाव ॥धृपद॥
जीव अवघे देव । खोटा नागवी संदेह ॥२॥
तुका म्हणे शुद्ध । मग तुटलिया भेद ॥३॥
अर्थ
सर्व भूमी शुद्ध आहे परंतु मनुष्याची वासना ही अमंगळ असते हे जाणून घ्यावे. त्याप्रमाणे काही जीव असे आहेत की जे विनाकारणच भीतीने घाबरतात एखाद्या जागेचा गुण दोष नसूनदेखील त्या जागेत ते विनाकारण घाबरतात त्याच्या अंगावर कोणत्याही प्रकारचा घाव होत नाही परंतु केवळ भीतीपोटी भूमीचा त्याग करतात. सर्व जीव परमार्थ दृष्टीने देव रूपच आहेत परंतु केवळ मी आणि माझे या खोट्या भ्रमाणेच मनुष्य नागवला जातो. तुकाराम महाराज म्हणतात एकदा की भेद नाहीसा झाला की सर्व सृष्टी, भूमी जीव हे ब्रम्‍हस्वरूपच आहेत हे तुम्ही जाणताल.
4:27 Sdm:

अभंग क्र. २४५५
सरते माझे तुझे । तरि हे उतरते ओझे ॥१॥
न लगे सांडावे मांडावे । आहे शुद्ध चि स्वभावे ॥धृपद॥
घातला तो आशा । मोहोजाळे गळा फासा ॥२॥
सुखदुःखाचा तो मान । नाही दुःखाचा तो शीण ॥३॥
करिता नारायण । एवढे वेचिता वचन ॥४॥
लाभ हानि हे समान । तैसा मान अपमान ॥५॥
तुका म्हणे याचे । नांव सोवळे साचे ॥६॥
अर्थ
एकदा की माझे व तुझे हे अंतकरणातून निघले की मग मनुष्याच्या देहावरून अभिमानाचे ओझेच उतरले असे समजावे. मग त्याला काहीही घ्यावे दयावे लागत नाही आणि विचार करून पाहिले तर मनुष्यस्वभाव सुद्धा शुध्द आहे. आशा व मोहजाळाने मनुष्याच्या गळ्याला फासा घातला आहे. असे जरी असले तरी मनुष्याने सुख झाले तरी त्याचा अभिमान वाटू देऊ नये आणि दुःख झाले तरी त्याचा शीण वाटू देऊ नये. मनुष्याने असे म्हणावे की सर्वकर्ता नारायणच आहे केवळ एवढेच शब्द जरी उच्चारले तरी कोणत्याही प्रकारचे सुखदुःख मनुष्याला होणार नाही. तसेच मान अपमान आणि लाभऱ्हानी हे सारखेच आहेत असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात याच अवस्थेला सोवळे असे खरे नांव आहे.
4:28 Sdm:

अभंग क्र. २४५६
तुज करिता होत ऐसे । मूढ चतुर पंडित पिसे ॥१॥
परि वर्म नेणे ते कोणी । पीडाखाणी भोगितील ॥धृपद॥
उल्लंघिते पागुळ गिरी । मुके करी अनुवाद ॥२॥
पापी होय पुण्यवंत । न करी घात दुर्जन ॥३॥
अवघे हेळामात्रे हरी । मुक्त करी ब्रम्हांड ॥४॥
तुका म्हणे खेळे लीळा । पाही वेगळा व्यापूनि ॥५॥
अर्थ
देवा तुझी जर कृपादृष्टी झाली तर मूर्ख मनुष्य देखील चतुर होतात आणि वेडे मनुष्य देखील पंडित होतात. परंतु हे वर्मच कोणाला समजत नाही त्यामुळे ते दुःखाच्या खानीच भोगतील. देवा तुझी जर कृपादृष्टी झाली तर पागळा मनुष्य देखील पर्वत ओलांडून जाऊ शकेल आणि मुका मनुष्य देखील वेदाचा अनुवाद करू शकेल. पापी मनुष्य पुण्यवंत होतात आणि दुर्जन मनुष्य केव्हाही दुसऱ्याचा घात करत नाही. याप्रमाणे हरी सर्व ब्रह्मांडाला एका क्षणात मुक्त करू शकतो. तुकाराम महाराज म्हणतात हरी हा विविध प्रकारच्या लीला करून खेळ खेळत असतो आणि सर्वत्र व्यापून देखील सर्वापेक्षा वेगळा होऊन सर्व जगाचे व्यवहार पाहत असतो.
4:28 Sdm:

अभंग क्र. २४५७
पिकवावे धन । ज्याची आस करी जन ॥१॥
पुरोनि उरे खाता देता । नव्हे खंडन मविता ॥धृपद॥
खोली पडे ओली बीज । तरी च हाता लागे निज ॥२॥
तुका म्हणे धणी । विठ्ठल अक्षरे या तिन्ही ॥३॥
अर्थ
लोक खूप आशेने आपल्या शेतात धन पिकवतात परंतु हे टिकणारे नाही. परंतु विठ्ठल रुपी धान्य कितीही खाल्ले आणि कितीही दुसऱ्याला दिले व त्याचे कितीही मोज माप केले तरी ते खंडन होत नाही. हे विठ्ठल रुपी बीज आपल्या हृदयरूपी जमिनीत प्रेमरूपी ओलाव्यात पेरले तर त्यापासून नीज स्वरूप रुपी धान्य आपल्या हाती लागते. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल या तीन अक्षरांनेच तृप्ती होते.
4:29 Sdm:

अभंग क्र. २४५८
करिसी लाघवे । तू हे खेळसी आघवे ॥१॥
केला अहंकार आड । आम्हा जगासी हा नाड ॥धृपद॥
इत्थंभुते यावे । दावू लपोही जाणावे ॥२॥
तुका म्हणे हो श्रीपती । आता चाळवाल किती ॥३॥
अर्थ
देवा तु या जगाची उत्पत्ती करून विविध प्रकारची लीला करतोस आणि तुच जगांमध्ये खेळ खेळत असतोस. परंतु देवा तु आम्हाला अहंकारावर बसविले आहेस आम्हाला असेच तु फसवत आहेस. देवा आपले स्वरूप केव्हा लपवावे व केव्हा दाखवावे हे तु चांगले जाणतो आहेस. तुकाराम महाराज म्हणतात अहो श्रीपती आता तुम्ही आम्हाला किती फसवणार आहात ?
4:29 Sdm:

अभंग क्र. २४५९
घालिती पव्हया । वाटे अनाथाच्या दया ॥१॥
तैसे का हे नये करू । पांडुरंगा आम्हा तारू ॥धृपद॥
रोगियासी काढा । देउनि वारितील पीडा ॥२॥
बुडत्यासाठी उडी । घालितील का हे जोडी ॥३॥
झाडिताती काटे । पुढे मागिलांचे वाटे ॥४॥
तुका म्हणे भार । घेती भागल्यांचा फार ॥५॥
अर्थ
काही मनुष्यांना अनाथांची दया वाटते त्यामुळे ते रस्‍त्या मध्ये पाणपोई घालतात आणि त्यांची तुष्णा भागवतात. तसेच तुम्ही का करत नाही पांडुरंगा तुम्हाला माझी दया येऊन तुम्ही मला या भवसागरातून तारत का नाही ? काही दयाळू वैद्य असे आहेत की जे रोगी मनुष्याला औषधे देऊन त्यांचे दुःख नाहीसे करतात. काही दयाळू माणसे असे आहेत की बुडत असलेल्या मनुष्यासाठी स्वतः पाण्यात उडी घेतात आणि त्या मनुष्याचे प्राण वाचवतात त्यांना त्यापासून काय फायदा असतो ? काही पुढे चालणारे मनुष्य इतके दयाळू असतात की त्यांना काटे दिसले तर मागच्याला ते काटे टोचू नये याकरता ते झाडतात व काटे बाजूला काढून टाकतात. तुकाराम महाराज महाराज काही दयाळू मनुष्य असे असतात की प्रवास करताना थकलेल्या मनुष्याच्या डोक्यावरचे ओझे आपल्या डोक्यावर घेऊन चालतात व त्यांना मदत करतात त्यांचे दुःख नाहीसे करतात त्याप्रमाणे देवा तु आम्हाला या भवसागरातून तरून जाण्यासाठी मदत का नाही करत ते सांगा.
4:30 Sdm:

अभंग क्र. २४६०
नका दंतकथा येथे सांगो कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ॥१॥
अनुभव येथे पाहिजे साचार । न चलती चार आम्हापुढे ॥धृपद॥
वर कोणी मानी रसाळ बोलणे । नाही झाली मने ओळखितो ॥२॥
निवडी वेगळे क्षीर आणि पाणी । राजहंस दोन्ही वेगळाली ॥३॥
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे । येरा गाबाळाचे काय काम ॥४॥
अर्थ
केवळ ब्रम्ह ज्ञानाच्या दंत कथा येथे कोणीही सांगू नाही तुमचे नुसतेच कोरडे बोल येथे कोण ऐकून घेणार आहे. येथ खरा अनुभव पाहिजे परमार्थ करत असताना आमच्या पुढे केवळ सोंग चालणार नाही. तुमचे वरवरचे रसाळ बोलणे हे कोण मानतो तुमचे मन अझुन परिपक्व झाले नाही शुद्ध झाले नाही हे आम्ही चांगलेच ओळखतो. राजहंस नावाचा पक्षी दुध आणि पाणी हे दोन्ही वेगवेगळे निवडतो. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जवळ शुद्ध अनुभव असणाऱ्या जातीचाच पाहिजे इतर सोंग घेणारा व इतर वरवर गप्पागोष्टी मारणाऱ्या गबाळ्याचे काय काम आहे ?

जुलै नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading