आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२८ जुलै, दिवस २०९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ११०१ ते ११२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २४९७ ते २५०८
“२८ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २८ July
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २८ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २४९७ ते २५०८ चे पारायण आपण करणार आहोत.
२८ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ११०१ ते ११२५,
1101-13
उजियेडा आणि अंधारेया । जो पाडु मृता उभेया । तोचि गा आत्मया । देहा जाण ॥1101॥
उजेड व अंधार यात जे सादृश्य, अथवा मेलेला व जिवंत यात जे सादृश्य तेच सादृश्य आत्मा व देह यामधे आहे असे समज.
1102-13
रात्री आणि दिवसा । कनका आणि कापुसा । अपाडु का जैसा । तैसाचि हा ॥1102॥
रात्र व दिवस, सोने व कापूस, यामधे जितके असादृश्य आहे तसेच असादृश्य आत्मा व देह यामधे आहे.
1103-13
देह तव पांचांचे जाले । हे कर्माचे गुणी गुंथले । भंवतसे चाकी सूदले । जन्ममृत्यूच्या ॥1103॥
(देहाचे स्वरूप)
हा देह तर पंचमहाभूतांचा आहे व कर्माच्या दोराने गुंफलेला आहे व जन्ममृत्यूच्या चाकावर घातलेला असून गरगरा फिरत आहे.
1104-13
हे काळानळाच्या तोंडी । घातली लोणियाची उंडी । माशी पांखु पाखडी । तव हे सरे ॥1104॥
कालरूपी अग्नीच्या कुंडात हा देह लोण्याचा गोळा घातलेला आहे. व माशी आपले पंख फडकावते तोच (तितक्या कालातच) हा देह नाश पावतो.
1105-13
हे विपाये आगीत पडे । तरी भस्म होऊनि उडे । जाहले श्वाना वरपडे । तरी ते विष्ठा ॥1105॥
हा देह कदाचित अग्नीत पडला तर राख होऊन उडून जातो व कुत्र्याच्या तावडीत जर हा देह सापडला तर त्याची विष्ठा होते.
1106-13
या चुके दोही काजा । तरी होय कृमींचा पुंजा । हा परिणामु कपिध्वजा । कश्मलु गा ॥1106॥
वरील या दोन परिणामाला जर तो चुकला तर तो देह किड्यांचा ढीग होतो. असा हा देहाचा परिणाम अर्जुना वाईट आहे.
1107-13
या देहाची हे दशा । आणि आत्मा तो एथ ऐसा । पै नित्य सिद्ध आपैसा । अनादिपणे ॥1107॥
(आत्म्याचे स्वरूप)
या देहाची अशी अवस्था आहे आणि आत्मा तर असा आहे की अनादिपणामुळे तो आत्मा स्वभावत: नित्य व सिद्ध आहे.
1108-13
सकळु ना निष्कळु । अक्रियु ना क्रियाशीळु । कृश ना स्थुळु । निर्गुणपणे ॥1108॥
तो आत्मा निर्गुण असल्यामुळे भागसहित नाही अथवा भागरहित नाही. तो कर्मसहित नाही अथवा कर्मरहित नाही. तो रोडका नाही वा लठ्ठही नाही.
1109-13
आभासु ना निराभासु । प्रकाशु ना अप्रकाशु । अल्प ना बहुवसु । अरूपपणे ॥1109॥
तो आत्मा अरूप असल्यामुळे दृश्य नाही अथवा अदृश्यही नाही, तो प्रकाशयुक्त नाही अथवा प्रकाशरहितही नाही, थोडा नाही अथवा पुष्कळ नाही.
1110-13
रिता ना भरितु । रहितु ना सहितु । मूर्तु ना अमूर्तु । शून्यपणे ॥1110॥
तो आत्मा शून्य असल्यामुळे रिकामा नाही अथवा भरलेला नाही. तो कोणत्याही गोष्टीने रहित नाही अथवा कोणत्याही गोष्टीने युक्त नाही. तो प्रगट नाही अथवा अप्रकट नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1111-13
आनंदु ना निरानंदु । एक ना विविधु । मुक्त ना बद्धु । आत्मपणे ॥1111॥
तो आत्मा असल्यामुळे आनंद (सुख) नाही अथवा आनंदरहित (दु:ख) नाही. तो एक नाही अथवा नाना प्रकारचा नाही, तो मुक्त अथवा बद्ध नाही.
1112-13
येतुला ना तेतुला । आइता ना रचिला । बोलता ना उगला । अलक्षपणे ॥1112॥
तो आत्मा कोणास विषय होत नसल्यामुळे इतका नाही, तितका नाही, स्वत:सिद्ध नाही, अथवा तयार केलेला नाही, बोलणारा नाही अथवा मुका नाही.
1113-13
सृष्टीच्या होणा न रचे । सर्वसंहारे न वेचे । आथी नाथी या दोहीचे । पंचत्व तो ॥1113॥
सृष्टीच्या होण्याबरोबर तो होत नाही अथवा सर्व सृष्टीचा संहार झाला तरी याचा नाश होत नाही. हा आत्मा आहेपणाचे व नाहीपणाचे लयस्थान आहे.
1114-13
मवे ना चर्चे । वाढे ना खाचे । विटे ना वेचे । अव्ययपणे ॥1114॥
तो आत्मा अव्यय असल्यामुळे तो मोजला जात नाही व त्याचे वर्णन करता येत नाही. तो वाढत नाही अथवा कमी होत नाही. तो विकार पावत नाही अथवा खर्च होत नाही.
1115-13
एवं रूप पै आत्मा । देही जे म्हणती प्रियोत्तमा । ते मठाकारे व्योमा । नाम जैसे ॥1115॥
हे प्रियोत्तमा अर्जुना, अशा प्रकारचा तो आत्मा देहात आहे असे जे म्हणतात, ते म्हणणे मठाच्या आकारात सापडलेल्या आकाशास मठाकाश म्हणण्यासारखे आहे.
1116-13
तैसे तयाचिये अनुस्यूती । होती जाती देहाकृती । तो घे ना सांडी सुमती । जैसा तैसा ॥1116॥
त्याप्रमाणे त्याच्या अखंड असण्यावर देहाचे आकार होतात व जातात, पण अर्जुना, तो आत्मा देहाकृति घेत नाही व टाकीतही नाही, तर जशाचा तसाच असतो.
1117-13
अहोरात्रे जैशी । येती जाती आकाशी । आत्मसत्ते तैसी । देहे जाण ॥1117॥
आकाशामधे जसे दिवस व रात्र येतात व जातात त्याप्रमाणे आत्मसत्तेवर देह येतात व जातात असे समज.
1118-13
म्हणौनि इये शरीरी । काही करवी ना करी । आयताही व्यापारी । सज्ज न होय ॥1118॥
म्हणून या शरीरात आत्मा काही करत नाही व करवीत नाही व सहज घडून येणार्या व्यापाराचे ठिकाणी ‘तो व्यापार मी केला ” असे म्हणत नाही.
1119-13
यालागी स्वरूपे । उणा पुरा न घेपे । हे असो तो न लिंपे । देही देहा ॥1119॥
याकरता तो आत्मा स्वरूपाने उणेपणास व पुरेपणास वश होत नाही. हे असो. तो आत्मा देहाच्या ठिकाणी असून देहाने लिप्त होत नाही.
यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते ।
सर्वत्रावस्थितो देहे तथाऽऽत्मा नोपलिप्यते ॥13. 32॥
श्लोकार्थ -: :- ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाश सूक्ष्मत्वामुळे कोणत्याही वस्तूशी लिप्त होत नाही. त्याप्रमाणे आत्मा सर्व देहामधे स्थित असला तरी लिप्त होत नाही. आत्मा व देह यात फरक आहे.
1120-13
अगा आकाश के नाही ? । हे न रिघेचि कवणे ठायी ? । परी कायिसेनि कही । गादिजेना जैसे ॥1120॥
अर्जुना, आकाश कोठे नाही ? व हे आकाश कोणत्या ठिकाणी प्रवेश करत नाही ? परंतु ज्याप्रमाणे ते आकाश कशानेही व कधीही लिप्त होत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1121-13
तैसा सर्वत्र सर्व देही । आत्मा असतुचि असे पाही । परि संगदोषे एकेही । लिप्त नोहे ॥1121॥
तसा आत्मा सर्वत्र सर्व देहात आहेच आहे. (परंतु) पहा तो एकाही संबंधाच्या विकाराने किंवा (संसर्ग-दोषाने) विटाळला जाऊ शकत नाही.
1122-13
पुढतपुढती एथे । हेचि लक्षण निरुते । जे जाणावे क्षेत्रज्ञाते । क्षेत्रविहीना ॥1122॥
आत्म्याचे हेच खरे लक्षण आहे, असे वेळोवेळी (वांरवार) जानावे कि क्षेञज्ञ आत्मा या देहात राहुनही क्षेञ हे धर्मरहित आहे.
1123-13
संसर्गे चेष्टिजे लोहे । परी लोह भ्रामकु नोहे । क्षेत्रक्षेत्रज्ञा आहे । तेतुला पाडु ॥1123॥
लोहचुंबकाच्या सबंधाने लोखंड हालले जाते. पण लोहचुंबक कधि लोखंडाची जागा घेऊ शकत नाही किंवा लोखंड होऊ शकत नाही तसे क्षेत्रज्ञाच्या सत्तेवर क्षेञाचे व्यवहार होतात; पंरतु क्षेञज्ञ कधिही क्षेञ होऊ शकत नाही.
1124-13
दीपकाची अर्ची । राहाटी वाहे घरीची । परी वेगळीक कोडीची । दीपा आणि घरा ॥1124॥
दिव्याची प्रज्वलित झालेली ज्योत घरातील सर्व व्यवहार चालवते किंवा सर्व घर प्रकाशाने उजळविते. परंतु दिव्याची ज्योत आणि घर यांच्यात स्वभावत: अतिशय वेगळेपणा आहे.
1125-13
पै काष्ठाच्या पोटी । वन्हि असे किरीटी । परी काष्ठ नोहे या दृष्टी । पाहिजे हा ॥1125॥
अर्जुना, लाकडाच्या पोटात अग्नी आहे पण अग्नी हा कधी लाकुड होत याप्रमाने क्षेञामध्ये क्षेञज्ञ आहे. पंरतु क्षेञज्ञ कधि क्षेञ होऊ शकत नाही या दृष्टीने देह व आत्मा यातील फरक जाणून घ्यावा.
दिवस २०९ वा. २८, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २४९७ ते २५०८
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २४९७
सरलियाचा सोस मनी । लाजोनिया राहिलो ॥१॥
आवडीने बोलावितो । येथे ते तो लपावे ॥धृपद॥
माझे ते चि मज द्यावे । होते भावे जोडिले ॥२॥
तुका म्हणे विश्वंभरा । आळीकरा बुझावा ॥३॥
अर्थ
देवा माझ्या मनातून तुझे भक्ती प्रेम सरले आहे आणि त्याच्या विषय पुन्हा हेवा मनात वाढत आहे परंतु तुला ते कसे मागावे यामुळे मला लाज वाटत आहे. देवा मी तुला आवडीने बोलवतो आणि येथे न येता तु लपून बसतोस. देवा मी आज पर्यंत भक्तिभावाने जे काही मिळवले तेच तुम्ही माझे मला द्यावे. तुकाराम महाराज म्हणतात हे विश्वंभरा आम्ही हट्ट करणारे आहोत त्यामुळे तुम्ही आमचे हट्ट पूर्ण करा.
4:53 Sdm:
अभंग क्र. २४९८
नाचावेसे वाटे मना । छंद गुणा अधीन ॥१॥
चेष्टविली माझी गात्रे । सत्तासूत्रे हालती ॥धृपद॥
नामरूपे रंगा आली । ते चि चाली स्वभावे ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगे । अंग संगे कवळिलें ॥३॥
अर्थ
माझ्या मनाला हरी नामाच्या छंदात नाचावेसे वाटते कारण छंद हा सत्व, रज, तम या तीन गुणा पैकी कोणत्याही एका गुणाच्या अधीन असतो. माझ्या शरीराच्या सर्व इंद्रियांचे सूत्र हरीच्या हातात आहेत आणि तोच त्यांच्या सत्तेने माझे शरीर इंद्रिय हलवित आहे. आहो माझे शरीर आणि इंद्रिय हे हरीच्या नाम रूपामुळेच रंगाला आली आहेत त्यामुळे ते हरी कडे चाल घेणे हे स्वाभाविकच आहे. तुकाराम महाराज म्हणतात या पांडुरंगाने आमच्यातील द्वैत भावच नाहीसा केला आहे व त्याच्याशी माझा एक स्वरूप करून त्याने मला कवटाळले आहे.
4:54 Sdm:
अभंग क्र. २४९९
खेळतो ते खेळ पायाच्या प्रसादे । नव्हती ही छंदे नासिवंत ॥१॥
माझा मायबाप उभा विटेवरी । कवतुके करी कृपादान ॥धृपद॥
प्रसादाची वाणी वदे ती उत्तरे । नाही मतांतरे जोडियेली ॥२॥
तुका म्हणे रस वाढितिया अंगे । छाया पांडुरंगे केली वरी ॥३॥
अर्थ
मी जो काही अभंग करण्याचा खेळ खेळत आहे तो देवाच्या पायाच्या प्रसादानेच त्यामुळे मला जो छंद लागलेला आहे तो कधीही नाश पावणार नाही. माझा माय बाप विटेवर उभा आहे तो माझ्यावर कृपादान करून माझे कौतुक करत आहे. मी माझ्या वाणीने जे काही बोलत आहे ते देवाच्याच प्रसादा ने बोलत आहे त्यामध्ये इतर कोणाचेही मत किंवा मतांतरे मी जोडलेले नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी जो अभंग रचनेचा खेळ खेळत आहे त्यामध्ये हरिभक्ती विषयी वाढता रस आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होत राहतो कारण माझ्या वाणीवर पांडुरंगाने कृपेची छाया केली आहे.
4:54 Sdm:
अभंग क्र. २५००
अखंड मुडतर । सासुरवास करकर ॥१॥
याची जाली बोळवण । आता न देखो तो शीण ॥धृपद॥
बहुतांची दासी । तये घरी सासुरवासी ॥२॥
तुका म्हणे मुळे । खंड झाला एका वेळें ॥३॥
अर्थ
संसारा मध्ये अखंड मूर्खपणा आणि सासरवास असतो आणि अभिमानी व मूर्ख लोकांची करकर ही आपल्या पाठीशी असते. परंतु आता याची मला बोळवण म्हणजेच या दुःखाचे निवारण झाले आहे आता हा त्रास मला माझ्या डोळ्यांना दिसत देखील नाही. संसार रुपी घर होते त्यामध्ये मला सासुरवासणी प्रमाणे खूप जणांची दासी बनून राहावे लागत होते. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा पांडुरंगा तुझ्यामुळेच आता या सर्व लोकाचा खंड एका क्षणात झाला आहे.
अभंग क्र. २५०१
अभंग क्र. २५०१
अवघा भार वाटे देवा । संतसेवा न करीता ॥१॥
कसोटी हे असे हाती । सत्य भूती भगवंत ॥धृपद॥
चुकलोंसा दिसे पंथ । गेले संत तो ऐसा ॥२॥
तुका म्हणे सोंग वाया । कारण या अनुभवे ॥३॥
अर्थ
संत सेवा जर केली नाही आणि नुसते देवाची पूजा करून देवाची भक्ती केली तर तो देवाला केवळ भारच वाटत असतो. आपल्यावर भगवंताची कृपा झाली की नाही याविषयी कसोटी आपल्या हातात आहे जर आपल्याला सर्व भूत मात्र मध्ये एक सत्य भगवंत आहे अशी प्रचिती येऊ लागली तर आपल्यावर भगवंताची कृपा झाली आहे असेच समजावे. परंतु आत्ताचे लोक पूर्वी संत ज्या मार्गाने गेले आहेत त्या मार्गने न जाता ते मार्ग चुकले आहेत असेच मला दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात संतांची सेवा न करता केवळ परमार्थ करण्याचे सोंग केले तर ते वाया जाते आणि सर्वत्र एक सत्य भगवंत आहे अशी प्रचिती येऊ लागली तर भगवंताची कृपा झाली असे समजावे कारण मी जे काही बोलत आहे ते सर्व माझ्या अनुभवाने मला वाटत आहे.
अभंग क्र. २५०२
आता तुम्ही कृपावंत । साधु संत जिवलग ॥१॥
गोमटे ते करा माझे । भार ओझे तुम्हासी ॥धृपद॥
वंचिले ते पायापाशी । नाही यासी वेगळे ॥२॥
तुका म्हणे सोडिल्या गाठी । दिली मिठी पायासी ॥३॥
अर्थ
हे कृपावंत साधुसंत तुम्ही जिवलग आहात त्यामुळे तुम्ही आता, माझे हीत कशात आहे ते तुम्ही पहा व माझे हीत ज्यात आहे तेच तुम्ही करा कारण मी माझा सर्व योगक्षमाचा भार तुमच्यावर घातला आहे. मी तुमच्या पाया जवळ सर्व गोष्टीचे विवरण केले आहे आता त्यापेक्षा वेगळे काहीच उरले नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या मनातील सर्व गाठी तुमच्या पायाजवळ मोकळ्या करून तुमच्या पायाला मिठी दिली आहे.
अभंग क्र. २५०३
सुख वाटे परी वर्म । धर्माधर्म न कळे ॥१॥
गाये नाचे एवढे जाणे । विठ्ठल म्हणे निर्लज्ज ॥धृपद॥
अवघे माझे एवढे धन । साधन ही सकळ ॥२॥
तुका म्हणे पाया पडे । तुमच्या कोडे संतांच्या ॥३॥
अर्थ
विठ्ठल विठ्ठल म्हणताना मला सुख वाटते परंतु धर्म-अधर्माचे वर्म काय आहे ते मला समजत नाही. विठ्ठलाचे नाम गावे त्याच्या आनंदात नाचावे आणि निर्लज्ज होऊन विठ्ठल विठ्ठल म्हणावे एवढेच मी जाणतो. माझे सर्व धन आणि सर्व साधन ही विठ्ठल नामच आहे. तुकाराम महाराज म्हणतात लाडाने कौतुकाने तुम्हा संतजणांच्या पाया पडावे हेच मी जाणतो आहे.
अभंग क्र. २५०४
धरिली जी होती चित्ती । डोळा तेचि दिसती ॥१॥
आले आवडीस फळ । जाले कारण सकळ ॥धृपद॥
घेईन भातुके । मागोनिया कवतुके ॥२॥
तुका म्हणे लाड । विठोबा पुरवील कोड ॥३॥
अर्थ
ज्याला चित्तात धारण केले होते आता तो डोळ्यांने दिसू लागला आहे. माझ्या आजपर्यंतच्या आवडीला फळ आले असून माझे सर्व कार्य पूर्ण झाले आहे. मी आता हरी कडून कौतुकाने त्याचा प्रेम रुपी खाऊ मागून घेईल. तुकाराम महाराज म्हणतात विठोबा माझे सर्व लाड पूर्ण करून माझे सर्व कोड कौतुक पूर्ण करीन.
अभंग क्र. २५०५
बहुता दिसांची आजि जाली भेटी । जाली होती तुटी काळगती ॥१॥
येथे सावकासे घेईन ते धणी । गेली अडचणी उगवोनि ॥धृपद॥
बहु दुःख दिले होते घरी कामे । वाढला हा श्रमेंश्रम होता ॥२॥
बहु दिस होता सांडिला मारग । क्लेशाचा त्या त्याग आजि झाला ॥३॥
बहु होती केली सोंगसंपादणी । लौकिकापासूनि निर्गमले ॥४॥
तुका म्हणे येथे झाले अवसान । परमानंदी मन विसावले ॥५॥
अर्थ
खूप दिवसा नंतर देवाची आणि माझी भेट झाली आहे काळाच्या गतीमुळे आमच्या दोघाचा वियोग झाला होता. आता मी देवाच्या भेटीचा आनंद सावकाश व तृप्ती होईपर्यंत घेईन हरी ची भेट झाल्यामुळे माझ्या सर्व अडचणी नाश पावल्या आहेत. मला या घरातील कामाने आजपर्यंत खूप दुःख दिले होते आणि संसाराच्या श्रमाने श्रम वाढत होता. प्रपंच्याच्या सानिध्यामुळे मी खूप दिवसापासून भक्तीचा मार्ग सोडूनच दिला होता परंतु आता त्या सर्व विषयांचा त्याग झाला आहे. लौकिकासाठी मी आज पर्यंत खूप प्रकारचे सोंग संपादने केली आहे परंतु आता लौकिका पासून माझे मन बाजूला निघाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता सर्व विषयांचा नाश झाला असून माझे मन परमानंदाच्या ठिकाणी विश्रांत पावले आहे.
अभंग क्र. २५०६
पुत्र जाला चोर । मायबापा हर्ष थोर ॥१॥
आता काशासाठी जोडी । हाड धांटे गुंडगे घडी ॥धृपद॥
आइते अपाहार । आणूनिया भरी घर ॥२॥
मानिली निश्चिंती । नरका जावया उभयती ॥३॥
झोडाझोडगीचे पोटी । फळे बीजे ती करंटी ॥४॥
तुका म्हणे बेटया । भांडवल न लगे खटया ॥५॥
अर्थ
आपला स्वतःचा मुलगा जर चोर झाला तर वाईट वृत्ती असणाऱ्या आई-वडिलांना आनंद होत असतो. ते स्वत:शीच विचार करतात आता कष्ट तरी कशासाठी करायचे हात पाय दुखून तरी का घ्यायचे. कारण चोर झालेला आपला मुलगा आयते सर्व काही आपल्याला घरी आणून देऊन आपले घर भरणार आहे. मुलगा असे वाईट कृत्य करतो त्याचे त्यांना समाधान तर होतेच परंतु ते दोघेही निश्चिंत होतात, त्यांना नरकात जाणे हेच समाधान वाटते. अशा निर्लज्ज असणाऱ्या आईबापाच्याच पोटी अशी करंटी जन्माला येतात कारण जसे बीज असते तसेच फळ येते. तुकाराम महारज म्हणतात अशा खट्याळ चोरट्या मुलाला पैसा कमवण्यासाठी भांडवलच नको असते.
अभंग क्र. २५०७
एवढी अपकीर्ती । ऐकोनिया फजीती ॥१॥
जरि दाविल वदन । थुंका थुंका तो देखोन ॥धृपद॥
काळिमेचे जिणे । जीवोनिया राहे सुने ॥२॥
तुका म्हणे गुण । दरुषणे अपशकुन ॥३॥
अर्थ
हा मुलगा चोर आहे किंवा यांचा मुलगा चोर आहे एवढी अपकिर्ती आणि फजिती ऐकली तरीही, असे निर्लज्ज तरीही तोंड दाखवत असेल तर लोकांनो तुम्ही ही त्यांच्या तोंडावर थुंका आणि मी ही थुंकतो. अशी अपकिर्ती व फजिती पाहूनही जर एखादा जगत असेल तर ते काळीम्याचे जगणे आहे आणि त्याचे जगणे म्हणजे कुत्र्यासारखे आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशा निर्लज्ज माणसाच्या दर्शनाने अपशकुन होतो, असा वाईट गुण त्याच्या अंगी असतो.
अभंग क्र. २५०८
समर्थासी नाही वर्णावर्णभेद । सामुग्री ते सर्व सिद्ध घरी ॥१॥
आदराचे ठायी बहुच आदर । मागितले फार ते ते वाढी ॥धृपद॥
न म्हणे सुह्रद सोयरा आवश्यक । राजा आणि रंक सारिखेचि ॥३॥
भाव देखे तेथे करी लडबड । जडा राखे जड निराळेची ॥३॥
कोणी न विसंभे याचकाचा ठाव । विनवुनी देव शंका फेडी ॥४॥
तुका म्हणे पोट भरुनी उरवी । धाले ऐसे दावी अनुभवा ॥५॥
अर्थ
जो खरोखर समर्थ असतो श्रीमंत ऊदार असतो त्याच्या घरी उच्च, नीच असा भेद नसतो आणि त्याच्या घरी सर्व प्रकारच्या सामग्री सज्ज असतात. घरी जेवणासाठी कोणीही येऊ तो भेद करत नाही आलेल्या सर्व आदरणीय व्यक्तींचा तो खूपच आदर करतो आणि ते जे जे मागतील ते त्यांना आग्रह करून वाढतो. घरी जेवण करण्यास आलेले व्यक्ती हा माझा प्रेमळ आहे किंवा हा माझा सोयरा आहे असे तो केव्हाही म्हणत नाही वाढताना सर्वाना सारखेच प्रमाण धरून वाढतो राजा आणि रंक त्याला दोन्ही सारखेच असतात. ज्यांच्याजवळ खरा भक्ती भाव आहे त्यांच्याजवळ तो लडबड करतो आणि त्यांना वेगळ्या पद्धतीने तो वागवीत असतो. घरी आलेला अतिथीमध्ये कोणालाही तो समर्थ व्यक्ती विसरत नाही आणि सर्वाना विनंती करून त्यांना देव समजून त्यांच्या सर्व शंका दूर करतो. तुकाराम महाराज म्हणतात त्या समर्थाच्या घरी सर्वाचे पोट भरून अन्न उरते असा अनुभव लोकांना येतो.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















