आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१ जानेवारी, दिवस १, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १, ओवी १ ते २५, सार्थ तुकाराम गाथा अभंग १ ते १२
” दिवस १ ला, 1 जानेवारी”
सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
वार्षिक नित्य पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 1 January
राम कृष्ण हरी
आज दिनांक 1 जानेवारी असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १ ते १२ चे पारायण आपण करणार आहोत.
गीतेत किती श्लोक आहेत ?
उत्तरः भगवद्गीतेत एकूण ७०० श्लोक आहेत.
श्रीकृष्णाने :- 574 श्लोक सांगितले आहेत,
अर्जुनाने :- 84 श्लोक सांगितले आहेत,
धृतराष्ट्राने :- 1 श्लोक सांगितले आहेत आणि
संजयने :- 41 श्लोक सांगितले आहेत.
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः
एकूण श्लोक : 47
धृतराष्ट्राचे श्लोक :1
संजयाचे, श्लोक ४६
अर्जुनाचे श्लोक : भ. श्रीकृष्णाचे श्लोक
एकूण ओव्या : 275
अध्याय पहिला
1-1
ॐ नमो जी आद्या ।
वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या ।
आत्मरूपा ॥1. 1॥
आद्या, =जेथून सर्व जगत उत्पत्ती झाली ते तत्व. वेद प्रतिपाद्या = वेदांनी प्रतिपादन केलेले. स्वसंवेद्या, =स्वत: स्वत; ला जाणणारे.
(आत्मरूप-वंदन) अनादीसिद्ध वेदांनी वर्णन केलेल्या, ज्याच्या त्याच्या स्वतः प्रत्येयास येणाऱ्या, विश्वस्वरूप निर्गुण आत्मरूपा, तुझा जयजयकार करून तुला नमस्कार करत आहे. ॥1-1॥
2-1
देवा तूचि गणेशु ।
सकलार्थमतिप्रकाशु ।
म्हणे निवृत्तिदासु ।
अवधारिजो जी ॥1. 2॥
सकालार्थमतिप्रकाशु= सकल अर्थ आपल्या मतीत (बुद्धीत) प्रकाशित करणारे. अवधारिजो=ऐका
(ओंकार रूप गणेश वंदन) हे देवा ! सर्व विश्वाच्या बुद्धीला प्रकाश देणारा जो गणेश, तो तूच आहेस. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात, तो गणेश कसा आहे ते अवधानपूर्वक ऐक. ॥1-2॥
3-1
हे शब्दब्रह्म अशेष ।
तेचि मूर्ति सुवेष ।
जेथ वर्णवपु निर्दोष ।
मिरवत असे ॥1. 3॥
शब्दब्रह्म=वेद. अशेष=संपूर्ण. सुवेष=सुंदर. वर्णवपु=वर्ण(शब्द)रुपी देह.
संपूर्ण वेद हीच जणू काही पोषाख केलेली गणेशाची मूर्ती होय आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी शरीराचे सौंदर्य शोभून दिसते आहे. ॥1-3॥
4-1
स्मृति तेचि अवयव ।
देखा आंगीक भाव ।
तेथ लावण्याची ठेव ।
अर्थशोभा ॥1. 4॥
मन्वादिकांच्या स्मुर्ती हे त्याचे अवयव आहते. ते अवयव या स्मुर्तीतील अर्थ-सौंदर्याने जणू लावण्याची केवळ खाणच बनले आहेत. ॥1-4॥
5-1
अष्टादश पुराणे ।
तीचि मणिभूषणे ।
पदपद्धति खेवणे ।
प्रमेयरत्नांची ॥1. 5॥
अठरा पुराणे हे गणपतीच्या अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत. त्यामध्ये सांगितलेली ही रत्ने; आणि शब्दांची छंदयुक्त रचना ही त्यांची कोंदणे आहेत ॥1-5॥
6-1
पदबंध नागर ।
तेचि रंगाथिले अंबर ।
जेथ साहित्य वाणे सपूर ।
उजाळाचे ॥1. 6॥
लालित्यपूर्ण पदरचना हेच उत्कृष्ट रंगाने रंगविलेले वस्त्र आहे. शब्द-अलंकार आणि अर्थ-अलंकार हे त्या वस्रवरील तेज:पुंज दिसणारे जरीचे तलम तंतू आहेत. ॥1-6॥
7-1
देखा काव्य नाटका ।
जे निर्धारिता सकौतुका ।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका ।
अर्थध्वनि ॥1. 7॥
काव्य आणि नाटक यांचा कौतुकाने विचार केला आसता, त्या गणपतीच्या पायातील रूणझुंणाऱ्या छोट्या-छोटया घागऱ्या आहेत अर्थ हा त्या घागऱ्यांना बसविलेल्या घुंगराचा मंजूळ असा ध्वनी आहे. ॥1-7॥
8-1
नाना प्रमेयांची परी ।
निपुणपणे पाहता कुसरी ।
दिसती उचित पदे माझारी ।
रत्ने भली ॥1. 8॥
व्यास, वाल्मिकी, भरतमुनी यांच्या काव्य नाटकातील विविध सिद्धांताच्या शब्दांचा एकाग्रतेने अभ्यास केला, तर त्यात कवीचे अलौकिक कौशल्य दिसून येते. अशी ही अनमोल शब्द-घागऱ्यातील उत्तमोत्तम रत्ने आहेत ॥1-8॥
9-1
तेथ व्यासादिकांच्या मती ।
तेचि मेखळा मिरवती ।
चोखाळपणे झळकती ।
पल्लवसडका ॥1. 9॥
महर्षी व्यासादिकांची बुद्धी ही गणपतीची मेखला म्हणजे कटिभूषण होय. त्याला लोंबत असलेल्या मोत्यांच्या पदरातील घोष हे त्या बुद्धीतील शुद्धत्व सात्विकपणे झळकत आहे. ॥1-9॥
10-1
देखा षड्दर्शने म्हणिपती ।
तेची भुजांची आकृति ।
म्हणौनि विसंवादे धरिती ।
आयुधे हाती ॥1. 10॥
गणपतीचे सहा हात ही सहा शास्त्रे होत; म्हणून त्यातील विविध प्रकारचा अभिप्राय ही त्या त्या हातातील वेगवेगळी शस्त्रे होत. ॥1-10॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
11-1
तरी तर्कु तोचि फरशु ।
नीतिभेदु अंकुशु ।
वेदांतु तो महारसु ।
मोदकु मिरवे ॥1. 11॥
न्याय दर्शनातील सोळा पदार्थांचे विश्लेषण करणारा तर्क म्हणजे गणपतीच्या हातातील परशू होय. वैशेषिक दर्शनातील सात पदार्थांचा सिद्धांतभेद हा दुसऱ्या हातातील अंकुश आहे आणि उत्तरमीमांसा दर्शनातील ब्रम्हस्वरूप सिद्धांत हा गणपतीच्या हातातील अमृतमधुर मोदक होय. ॥1-11॥
12-1
एके हाती दंतु ।
जो स्वभावता खंडितु ।
तो बौद्धमतसंकेतु ।
वार्तिकाचा ॥1. 12॥
वार्तिककरांनी सांगितलेले आणि स्वभावतःच खंडीत झालेले जी बौद्ध मत आहे, ते एका हातात असणाऱ्या खंडित दाताच्या ठिकाणी शोभते. ॥1-12॥
13-1
मग सहजे सत्कारवादु ।
तो पद्मकरु वरदु ।
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु ।
अभयहस्तु ॥1. 13॥
सत्कारवाद हा गणपतीचा वर देणारा कामलासमान हात होय. हा धर्माची सिद्धी करतो आणि हा अभय देणारा हात आहे. ॥1-13॥
14-1
देखा विवेकवंतु सुविमळु ।
तोचि शुंडादंडु सरळु ।
जेथ परमानंदु केवळु ।
महासुखाचा ॥1. 14॥
गणपतीच्या ठिकाणी ब्रम्हानंद ही सरळ, निर्मळ आणि चांगले व वाईट याची निवड करण्यास समर्थ अशी सोंड आहे. ॥1-14॥
15-1
तरी संवादु तोचि दशनु ।
जो समता शुभ्रवर्णु ।
देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु ।
विघ्नराजु ॥1. 15॥
गुरू-शिष्याचा हा सुखसवांद म्हणजे गणपतीच्या मुखतील दात असून ब्रम्हज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी निर्माण होणारी समता हा त्या दातांचा पांढरा रंग होय. ज्ञानदृष्टी म्हणजे त्या विघ्नराजाचे सूक्ष्म असे नेत्र होत. ॥1-15॥
16-1
मज अवगमलिया दोनी ।
मिमांसा श्रवणस्थानी ।
बोधमदामृत मुनी ।
अली सेविती ॥1. 16॥
पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा हाच त्या गणपतीच्या कानांच्या ठिकाणी असून बोध हे त्याचे मदरूपी अमृत मुनिरूपी भ्रमर सेवन करतात, असे मला वाटते. ॥1-16॥
17-1
प्रमेयप्रवाल सुप्रभ ।
द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।
सरिसेपणे एकवटत इभ- ।
मस्तकावरी ॥1. 17॥
वेदशास्त्र पुराणात सिद्धांतरुपाने संगतलेली तत्वे ही गणपतीच्या अंगावरील तेजयुक्त पोवळी होत. द्वैत आणि अद्वैत मते ही मस्तकावरील गंडस्थळे असून सारखे पणाने ती तेथे एकत्र झाली आहेत. ॥
18-1
उपरि दशोपनिषदे ।
जिये उदारे ज्ञानमकरंदे ।
तिये कुसुमे मुगुटी सुगंधे ।
शोभती भली ॥1. 18॥
ज्ञानरूपी मकरंद ज्या मध्ये परिपूर्ण भरलेला आहे, अशी ईशावास्य इत्यादी दहा उपनिषदे ही जणू सुगंधी फुले असून ती गणपतीच्या मुकुटावर उत्तम तऱ्हेने शोभून दिसत आहेत. ॥
19-1
अकार चरण युगल ।
उकार उदर विशाल ।
मकार महामंडल ।
मस्तकाकारे ॥1. 19॥
ओंकाराची पहिली अकारमात्रा हे गणपतीचे दोन्ही पाय आहेत. दुसरी उकरमात्रा हे त्याचे मोठे पोट आहे. तिसरीमात्रा हा त्याचा मोठ्या वाटोळ्या मस्तकाच्या आकार आहे. ॥
20-1
हे तीन्ही एकवटले ।
तेथ शब्दब्रह्म कवळले ।
ते मिया श्रीगुरुकृपा नमिले ।
आदिबीज ॥1. 20॥
अकार, उकार, मकार या तिन्ही मात्रा एकत्रित झाल्या, म्हणजे त्या ओंकारात संपूर्ण वेद संक्षेपाने समाविष्ट होत असतो. त्या बिजरूप ओंकाररूप गणपती देवरायास मी सद्गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेने नमस्कार करतो. ॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
21-1
आता अभिनव वाग्विलासिनी ।
ते चातुर्यार्थकलाकामिनी ।
ते शारदा विश्वमोहिनी ।
नमिली मिया ॥1. 21॥
(सरस्वती-वंदन) या नंतर नित्यनूतन प्रतिभा आणि वाणीच्या रुपाने क्रीडा करणारे चातुर्य, अर्थ व कला यांची कामिनी, विविध रस आणि अलंकार युक्त मधुर भाषेद्वारा संपूर्ण विश्वाला मोहित करणारी अशी जी शारदा, तिला मी विनम्र भावाने नमस्कार करतो. ॥1-21॥
22-1
मज हृदयी सद्गुरु ।
जेणे तारिलो हा संसारपूरु ।
म्हणौनि विशेषे अत्यादरु ।
विवेकावरी ॥1. 22॥
(सद्गुरु-स्तवन) श्री सद्गुरूंनी सांगितलेले ज्ञान मी माझ्या हृदयामध्ये साठविले; त्या मुळे मला भवसागर तरुण जाता आला. म्हणून अंतःकरणातील विवेकावर माझे आत्यंतिक प्रेम आहे. ॥1-22॥
23-1
जैसे डोळ्या अंजन भेटे ।
ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे ।
मग वास पाहिजे तेथ ।
प्रगटे महानिधी ॥1. 23॥
ज्या प्रमाणे पायाळू माणसाच्या डोळ्यात अंजन घातले असता त्याची दृष्टी सर्वत्र पसरते आणि त्याला भूमीमध्ये असणाऱ्या संपत्तीचा ठसा दिसू लागतो. ॥1-23॥
24-1
का चिंतामणी जालिया हाती ।
सदा विजयवृत्ति मनोरथी ।
तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ति ।
ज्ञानदेवो म्हणे ॥1. 24॥
मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणी हाती आला असता सर्व हेतू पूर्ण होतात, त्या प्रमाणे सद्गुरु निवृत्तीनाथांच्या मूळे मी पूर्णकाम झालो आहे. माझ्या सर्व सदिच्छा पूर्ण झाल्या आहेत, असे ज्ञानदेव म्हणतात. ॥1-24॥
25-1
म्हणोनि जाणतेने गुरु भजिजे ।
तेणे कृतकार्य होईजे ।
जैसे मुळसिंचने सहजे ।
शाखापल्लव संतोषती ॥1-25॥
या साठी जाणकारांनी सद्गुरुवर परम श्रद्धा ठेवून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे, म्हणजे जीवन कृतकृत्य होईल. जसे, झाडाच्या मुळाला पाणी घातले असता फांद्या व पाने सहजच विकसित होतात. ॥1-25॥
दिवस १ ला
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
1) अभंग १ ते १२
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १
समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथे माझी हरी वृत्ति राहो ॥१॥
आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथे माझे आर्त नको देवा ॥धृपद॥
ब्रम्हादिक पदे दुःखाची शिराणी । तेथे दुश्चिंत झणी जडो देसी ॥२॥
तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥
अर्थ
हे हरी तुमचे चरण विटेवर सम आहेत तुमची दृष्टीही सम आहे आणि अशा तुमच्या साजर्या रूपावर माझी वृत्ती स्थिर राहो. ॥१॥ आणि देवा या व्यतिरिक्त मला कोणतेही माइक पदार्थ म्हणजे मायेने व्यापलेले पदार्थ नको व त्या ठिकाणी माझी तृष्णा इच्छा देखील राहू देऊ नका. ॥२॥ हे देवा ब्रह्मादिक पदे व या सारखे पदे उच्च ठिकाणी माझे मन जडू देऊ नको कारण ते पद म्हणजे एक प्रकारची दुःखाची शीराणीचा आहे. ॥३॥ तुकाराम महाराज म्हणतात देवा जे जे काही कर्म धर्म आहे त्याचे वर्म आता आम्हाला समजले आहे ते म्हणजे असे की हे सर्वकाही नाशिवंत आहे ॥४॥
अभंग क्र. २
नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाही देवे ॥१॥
नाही तयाविण भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल रामकृष्ण ॥धृपद॥
देवापाशी मागे आवडीची भक्ति । विश्वासेशी प्रीति भावबळे ॥२॥
तुका म्हणे मना सांगतो विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥३॥
अर्थ
: देवाने गोड स्वर दिला नसला, मला गोड गळ्याने तुझे स्वर गाता येत नसले तरी काही हरकत नाही. विठ्ठल त्या वाचून भूकेला नाही जसा जमेल तसा “राम कृष्ण” हा मंत्र जप. श्रद्धेने, निष्ठेच्या बळाने व प्रेमाने देवाची भक्तिपूर्ण आळवनि कर. तुकाराम महाराज म्हणतात हे मना तुला मी सांगतो ते तू ऐक की हरी विषयी तू दृढ निर्धार धर.
अभंग क्र. ३
सावध झालो सावध झालो । हरीच्या आलो जागरणा ॥१॥
तेथे वैष्णवाचे भार । जयजयकार गर्जतसे ॥धृपद॥
पळोनिया गेली झोप । होते पाप आड ते ॥२॥
तुका म्हणे तया ठाया । ओल छाया कृपेची ॥३॥
अर्थ
तुकाराम महाराज दोन वेळा सवध झालो असे म्हणून हरिच्या जागराला आलो असे म्हणतात. तेथे आता वैष्णवांची गर्दी झाली असून, हरी भजनांची गर्जना होत आहे. नाम साधनेच्या आड येणारी पापरूपी झोप आता उडून गेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात की त्या ठिकाणी हरीकृपेचा ओलाव व छाया आहे.
अभंग क्र. ४
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळी कन्यापुत्र होती जी सात्त्विक । तयाचा हरीख वाटे देवा ॥धृपद॥
गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचे ॥२॥
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाही ॥३॥
अर्थ
ज्याला आपल्या हिताची चिंता असते, ज्याला आपले हित कळते त्याचे माय बाप धन्य आहेत. ज्या कुळामधे सात्विक वृत्तीची मूली – मुले जन्माला येतात त्या कुळाविषयी परमेश्वरालादेखिल हरिख वाटतो. अशी सात्विक वृत्तीची मुले गीता-भागवत श्रवण करतात, विठ्ठलाचे अखंड चिंतन करतात. तुकाराम महाराज म्हणतात अश्या लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्या सारखा भाग्यवान मीच ठरेल.
अभंग क्र. ५
अंतरिची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥१॥
देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥धृपद॥
आपुल्या वैभवे । शृंगारावे निर्मळे ॥२॥
तुका म्हणे जेवी सवे । प्रेम द्यावे प्रीतीचे ॥३॥
अर्थ
परमेश्वर भक्ताच्या अतःकरणातील भक्तिचि गोडी स्विकारतो आणि त्याच्या अतःकरणातील भाव पाहतो. देव भक्ताचा सोयरा झालेला असतो असे महाराज तीन वेळा म्हणतात. आपुल्या जवळ जे वैभव आहे मग ते कसे का असेना पण ते वैभवाच निर्मळमानाने देव समजावे. तुकाराम महाराज म्हणतात तो हरी भक्तांबरोबर भोजन करतो व त्याच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करावा.
अभंग क्र. ६
पावले पावले तुझे आम्हा सर्व । दुजा नको भाव होऊ देऊ ॥१॥
जेथे तेथे देखे तुझीच पाउले । त्रिभुवन संचले विठ्ठला गा ॥धृपद॥
भेदाभेदमते भ्रमाचे संवाद । आम्हा नको वाद त्याशी देऊ ॥२॥
तुका म्हणे अणु तुजविण नाही । नभाहूनि पाही वाढ आहे ॥३॥
अर्थ
हे देवा अरे तुझे आम्हाला जे हवे आहे ते आम्हाला सर्व पावले आहे आता दुसरी भावना आमच्या मना मध्ये तू येऊ देऊ नकोस. अरे विठ्ठला मी जिथे तिथे पाहतो तेथे तुझीच पाऊले दिसतात आणि त्रिभुवनात तूच संचार केला आहे. देवा भेद आणि अभेद वाद आणि संवाद हि सर्व भ्रम आहेत आम्हाला त्याच्याशी वाद विवाद होईल असे होऊ देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात सगळ्यात छोटा असा अणु त्या मध्येही तू आहेस आणि जर पहिले तू तर नाभाहूनही मोठा आहेस.
अभंग क्र. ७
सुखे वोळंब दावी गोहा । माझे दुःख नेणा पाहा ॥१॥
आवडीचा मारिला वेडा । होय कैसा म्हणे भिडा ॥धृपद॥
अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर तूप पथ्या ॥२॥
दो पाहरा मज लहरी येती । शुद्ध नाही पडे सुपती ॥३॥
नीज नये घाली फुले । जवळी न साहती मुले ॥४॥
अंगी चंदन लाविते भाळी । सदा शूळ माझे कपाळी ॥५॥
निपट मज न चले अन्न । पायली गहू सांजा तीन ॥६॥
गेले वारी तुम्ही आणिली साकर । साता दिवस गेली साडेदहा शेर ॥७॥
हाड गळोनि आले मास । माझे दुःख तुम्हा नेणवे कैसे ॥८॥
तुका म्हणे जिता गाढव केला । मेलियावरी नरका नेला ॥९॥
अर्थ
एक भोगवादी स्त्री हि नवऱ्याला म्हणते खरे तर ती सुखी असते पण ती सोंग आणते आणि म्हणते तुम्ही माझे काही दुःख पाहत नाही मग तो पती तिच्या आवडीने वेडा झाल्या मुळे तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो. ती स्त्री त्या नवऱ्याला म्हणते मला अखंड पोटाची व्यथा आहे त्यामुळे त्याला पथ्य म्हणजे दुध तूप साखर घालून भात खावा लागेल. आहो मला दुसऱ्या प्रहराला चक्कर येते आणि मी बेशुध्द पडते मला शुध्द राहत नाही व त्या मुळे मला झोप लागत नाही. मला माझ्या खाली फुले टाकल्यावर झोप येते व हि माझी मुले माझ्या जवळ असल्यावर किरकिर करतात त्यामुळे ते मला सहन होत नाही. नाटक करत ती त्याला म्हणते कि मला कपाळ शूळ आहे त्यामुळे मी अंगाला व कपाळाला चंदन लावते. साधे अन्न मला जमत नाही मला तीन पायली गव्हाचा सांजा लागतो. गेल्या आठवड्या मध्ये तुम्ही जी साडे दहा शेर साखर आणली ती सातच दिवस गेली. आहो माझे हाडे बारीक होऊन माझे मांस वाढले केव्हढे माझे हे दुख आहे हे तुम्हाला कळत कसे नाही ? तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारे त्या माणसाचा जिवंत पणे गाढव केला आणि मेल्यावर तो नरकाला गेला.
अभंग क्र. ८
पुढे गेले त्यांचा शोधीत मारग । चला जाऊ माग घेत आम्ही ॥१॥
वंदू चरणरज सेवू उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडू ॥धृपद॥
अमुप हे गाठी बांधू भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हा जोगा ॥२॥
अवघे होती लाभ एका या चिंतने । नामसंकीर्तने गोविंदाच्या ॥३॥
जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥४॥
तुका म्हणे घालू जीवपणा चिरा । जाऊ त्या माहेरा निजाचिया ॥५॥
अर्थ
जे संत पुढे गेले त्यांची चरणवंदना करुण, त्यांचे उष्टे सेवन करू; त्यामुळे आपल्या पूर्व कर्मचि होळी होईल. हे ज्ञानभक्तिचे भांडवल पदरी बांधून, विठ्ठलास वश करुण घेऊ. गोविंदाचे केवळ नामस्मरणान व् चिंतनाने जीवनातील सर्व लाभ प्राप्त होतील. जन्ममृत्युच्या येरझार्या संपतील आणि संत सहवासाने हा जन्म सार्थकी लागेल. पुढे गेलेल्या संतसजनांच्या मार्गाने शोध करीत त्यांच्या मार्गाने आपण त्यांचा माग घेत पुढे जाऊ. तुकाराम महाराज म्हणतात की, या मार्गाने गेले असता मोक्षरुपी माहेराचा लाभ होईल.
अभंग क्र. ९
जेविले ते संत मागे उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥१॥
सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा । पासूनि सकळा अवघ्या दुरी ॥धृपद॥
परे परते मज न लागे सांगावे । हे तो देवे बरे शिकविले ॥२॥
दुसर्याते आम्ही नाही आतळत । जाणोनि संकेत उभा असे ॥३॥
येथे कोणी काही न धरावी शंका । मज चाड एका भोजनाची ॥४॥
लांचावला तुका मारितसे झड । पुरविले कोड नारायणे ॥५॥
अर्थ
संतसज्जनांच्या ज्ञानरूपी उष्ट्या भोजनाची मी अपेक्षा करतो आहे. मी सोवळे-ओवळे या कल्पनेच्या पलीकडे गेलो आहे. ब्रम्हरूपाचे तत्वज्ञान मला इतरांनी संगावयाचे कारण नाही; कारण प्रत्यक्ष भगवंताने मला ते सांगितले आहे. आमच्यामध्ये द्वैतभाव नाही म्हणून प्रत्येक्ष भगवंत आमच्या पाठीमागे उभा आहे. मी संतांच्या उच्छिष्टाच्या भोजनाची इच्छा बाळगत आहे. म्हणुन कोणीहि मनामधे शंका धरु नये. तुकाराम महाराज म्हणतात की, प्रत्यक्ष भगवंतनेच लालचवलेल्या माझ्या मनाची ही इच्छा पूर्ण केली आहे.
अभंग क्र. १०
देवाच्या प्रसादे करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥१॥
ब्रम्हादिकासि हे दुर्लभ उच्छिष्ट । नका मानू वीट ब्रम्हरसी ॥धृपद॥
अवघिया पुरते वोसंडले पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथे ॥२॥
इच्छादानी येथे वळला समर्थ । अवघेचि आर्त पुरवितो ॥३॥
सरे येथे ऐसे नाही कदाकाळी । पुढती वाटे कवळी घ्यावे ऐसे ॥४॥
तुका म्हणे पाक लक्षुमीच्या हाते । कामारी सांगाते निरुपम ॥५॥
अर्थ
संतसज्जनांच्या उच्छिष्टाच्या सेवनाने तुम्ही या अध्यात्ममार्गातील अधिकारी व्हाल. देवादिकांनाही न मिळणार हे उच्छिष्ट कनिष्ट मानु नका. सर्वाना पुरुन उरेल इतका ज्ञानरस ईथे भरला आहे, त्याचा सेवन करण्याचा अधिकार येथे सर्वाना आहे. जो जो मनुष्य इथे जी जी इच्छा करेल ती पूरविणारा इच्छादानी विठ्ठल येथे सर्वाची नमोकामना पूर्ण करीत आहे. या प्रसादाच्या सेवनात जो आनंद मिळतो तो चिरंतन टिकणारा आहे, त्याचे सेवन करण्याची इच्छा वारंवार होते. तुकाराम महाराज म्हणतात हे भोजन प्रत्यक्ष लक्ष्मी तयार करते तिच्याच हातून या भोजनाचा लाभ व्हावा.
अभंग क्र. ११
अवगुणाचे हाती । आहे अवघीच फजीती ॥१॥
नाही पात्रासवे चाड । प्रमाण ते फिके गोड ॥धृपद॥
विष तांब्या वाटी । भरली लावू नये होटी ॥२॥
तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥३॥
अर्थ
जगामद्धे अवगुणी लोकांची नेहमी फजीति होत असते. धातुचे भांडे चांगले की वाइट हे पहण्यापेक्षा त्यातील रस प्राशन करण्यास योग्य की अयोग्य हे प्रथम पहावे. विष तांब्याच्या वाटित जरी भरले तरी त्याचे सेवन करने हे अयोग्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे मनातील परमेश्वरा विषयीचा शुद्ध भाव महत्वाचा आहे, त्याचे सोंग घेऊ नये असे.
अभंग क्र. १२
हरिच्या जागरणा । जाता का रे नये मना ॥१॥
कोठे पाहासील तुटी । आयुष्य वेच फुकासाठी ॥२॥
ज्यांची तुज गुंती । ते तो मोकलिती अंती ॥२॥
तुका म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ॥३॥
अर्थ
हरिचे नामस्मरण करने, भक्ति करने हे तुझ्या मनात का बरे येत नाही ?. या संसारामधे तुझे जीवन व्यर्थ जात आहे, ती तूट भरून निघणार नाही. ज्यांच्यासाठी तू आपले आयूष्य व्यर्थ घालवित आहे, ते तुला शेवट पर्यंत साथ देणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, की तू आपल्या जीवनाचे सार्थक कश्यामध्ये आहे याचा विचार कर.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















