आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

५ जुलै, दिवस १८६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ५२६ ते ५५०, सार्थ तुकाराम गाथा अभंग २२२१ ते २२३२
“५ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ५ July
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ५ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २२२१ ते २२३२ चे पारायण आपण करणार आहोत.
५ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ५२६ ते ५५०,
526-13
वर्णाश्रमपोषके । कर्मे नित्यनैमित्तिके । तयामाजी काही न ठके । आचरता ॥526॥
वर्णाश्रमधर्माला पोषक अशी नित्य नैमित्तिक कर्मे करीत असता त्यात काहीही रहात नाही.
527-13
परि हे मिया केले । की हे माझेनि सिद्धी गेले । ऐसे नाही ठेविले । वासनेमाजी ॥527॥
परंतु हे कर्म मी केले अथवा माझ्यामुळे हे सिद्धीला गेले असा अहंकार वासनेमधे ठेवला नाही.
528-13
जैसे अवचितपणे । वायूसि सर्वत्र विचरणे । का निरभिमान उदैजणे । सूर्याचे जैसे ॥528॥
ज्याप्रमाणे अहंकारावाचून वायूचा सर्वत्र संचार असतो किंवा सूर्याचे उगवणे हे जसे निरभिमान असते.
529-13
का श्रुति स्वभावता बोले । गंगा काजेविण चाले । तैसे अवष्टंभहीन भले । वर्तणे जयाचे ॥529॥
अथवा वेद जसे स्वभावत: बोलतात अथवा गंगा नदी जशी हेतूवाचून वहाते त्याप्रमाणे अहंकारावाचून ज्याचे चांगले वागणे असते.
530-13
ऋतुकाळी तरी फळती । परी फळलो हे नेणती । तया वृक्षांचिये ऐसी वृत्ती । कर्मी सदा ॥530॥
वृक्षास तर योग्य ऋतुकाळात फळे येतात परंतु आपणास फळे आली हे वृक्ष जाणत नाहीत. त्या वृक्षांप्रमाणे सर्व कर्मांमधे त्या पुरुषाच्या मनाची स्थिती नेहेमी असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
531-13
एवं मनी कर्मी बोली । जेथ अहंकारा उखी जाहली । एकावळीची काढिली । दोरी जैसी ॥531॥
ज्याप्रमाणे जशी एकपदरी माळेची दोरी काढली असता तिचे मणी जसे गळून पडतात, त्याप्रमाणे जेथे मनातून, कर्मातून आणि वाचेतून अहंकाराची हकालपट्टी होते.
532-13
संबंधेवीण जैसी । अभ्रे असती आकाशी । देही कर्मे तैसी । जयासि गा ॥532॥
ज्याप्रमाणे आकशातील ढग आकाशात चिकटल्याशिवाय असतात, त्याप्रमाणे देहात झालेली जी त्याची कर्मे त्या कर्माच्या ठिकाणी त्याचा अहंकार असल्यशिवाय ती कर्मे असतात.
533-13
मद्यपाआंगीचे वस्त्र । लेपाहातीचे शस्त्र । बैलावरी शास्त्र । बांधले आहे ॥533॥
मद्यपान केलेल्या मनुष्यास जशी आपल्या वस्त्राची आठवण नसते किंवा चित्राच्या हातात दिलेल्या शस्त्राचे जसे त्या चित्रास भान नसते अथवा बैलाच्या पाठीवर लादलेल्या शास्त्रांच्या पोथ्यांची त्याला जाणीव नसते.
534-13
तया पाडे देही । जया मी आहे हे सेचि नाही । निरहंकारता पाही । तया नांव ॥534॥
त्याप्रमाणे ज्याला आपण देहामधे आहो अशी आठवण नसते, त्याच्या त्या स्थितीला निरहंकारिता हे नाव आहे, असे समज.
535-13
हे संपूर्ण जेथे दिसे । तेथेचि ज्ञान असे । इयेविषी अनारिसे । बोलो नये ॥535॥
ही निरहंकारिता जेथे संपूर्ण दिसेल तेथेच ज्ञान आहे, याविषयी अन्यथा बोलू नये.
536-13
आणि जन्ममृत्युजरादुःखे । व्याधिवार्धक्यकलुषे । तिये आंगा न येता देखे । दुरूनि जो ॥536॥
जन्म-मृत्यू-जरा-व्याधी- व दोषाचे अनुदर्शन
जन्म = आणि जन्म, मृत्यू, दु:ख, रोग, जरा आणि पातके ही अंगावर आली नाहीत तोच दुरून प्राप्त होण्याच्या आधीपासूनच पहातो.
537-13
साधकु विवसिया । का उपसर्गु योगिया । पावे उणेयापुरेया । वोथंबा जेवी ॥537॥
जसे ठेव्यावर असलेल्या पिशाचाचा प्रतिबंध दूर करण्याविषयी साधक मांत्रिक किंवा ठेवा काढणारा मनुष्य जसा दक्ष असतो अथवा योगाभ्यास येणार्या अडथळ्यासंबंधाने योगी जसा दक्ष असतो किंवा भिंत वाकडी तिकडी येऊ नये म्हणून गवंडी जसा आधीच ओळंब्याची व्यवस्था करून ठेवतो.
538-13
वैर जन्मांतरीचे । सर्पा मनौनि न वचे । तेवी अतीता जन्माचे । उणे जो वाहे ॥538॥
जसे सर्पाच्या मनातून जन्मजन्मांतरीचे वैर जात नाही, त्याप्रमाणे मागील जन्मातील दोष जो मनात बाळगतो.
539-13
डोळा हरळ न विरे । घाईं कोत न जिरे । तैसे काळीचे न विसरे । जन्मदुःख ॥539॥
डोळ्यात गेलेला खडा जसा विरघळत नाही म्हणजे सारखा खुपत रहातो अथवा जखमेत जसे शस्त्र जिरत नाही तर एकसारखे खुपत रहाते, त्याप्रमाणे जो मागील जन्माचे दु:ख विसरत नाही.
540-13
म्हणे पूयगर्ते रिगाला । अहा मूत्ररंध्रे निघाला । कटा रे मिया चाटिला । कुचस्वेदु ॥540॥
तो म्हणतो, हाय, हाय, मी कसा या जन्मामुळे पुवाच्या खड्ड्यात शिरलो व मूत्रद्वाराने बाहेर निघालो. अरेरे स्तनावरील घाम मी चाटला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
541-13
ऐसाइसिया परी । जन्माचा काटाळा धरी । म्हणे आता ते मी न करी । जेणे ऐसे होय ॥541॥
याप्रमाणे जन्माचा तिरस्कार बाळगतो व म्हणतो की ज्या योगाने असे होईल (जन्म घ्यावा लागेल) ते मी यापुढे करणार नाही.
542-13
हारी उमचावया । जुंवारी जैसा ये डाया । की वैरा बापाचेया । पुत्र जचे ॥542॥
पणास लावून हरलेले द्रव्य परत मिळवण्याकरता जुगार खेळणारा माणूस जसा पुन्हा डाव खेळण्यास तयार होतो अथवा वडिलांच्या वैराबद्दल जसा मुलगा सूड घेण्यास परिश्रम करतो.
543-13
मारिलियाचेनि रागे । पाठीचा जेवी सूड मागे । तेणे आक्षेपे लागे । जन्मापाठी ॥543॥
(वडील भावाला) मारल्याचे रागाने जसा पाठचा भाऊ सूड मागतो (सूड घेण्यास खटपट करतो) तितक्या हट्टाने जो जन्माचे पाठीस लागतो.
544-13
परी जन्मती ते लाज । न सांडी जयाचे निज । संभाविता निस्तेज । न जिरे जेवी ॥544॥
परंतु संभावित मनुष्यास जसा अपमान सहन होत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला जन्मास आल्याची लाज केव्हाही सोडीत नाही.
545-13
आणि मृत्यु पुढा आहे । तोचि कल्पांती का पाहे । परी आजीचि होये । सावधु जो ॥545॥
मृत्यू =आणि पुढे कल्पांती येणारा असा इतका दूर जरी मृत्यू असला तथापि तो आजच आला आहे असे समजून तो सावध असतो.
546-13
माजी अथांव म्हणता । थडियेचि पंडुसुता । पोहणारा आइता । कासे जेवी ॥546॥
नदीमधे अथांग पाणी आहे असे म्हणतात, अर्जुना, पोहावयास तयार झालेला मनुष्य काठावर असताच जसा कासोटा बळकट घालतो.
547-13
का न पवता रणाचा ठावो । सांभाळिजे जैसा आवो । वोडण सुइजे घावो । न लागताचि ॥547॥
अथवा युद्धाच्या जागी जाण्यापूर्वीच जसे आपले अवसान सांभाळावे अथवा शस्त्राचा घाव लागण्यापूर्वीच ढाल पुढे करावी,
548-13
पाहेचा पेणा वाटबंधा । तव आजीचि होईजे सावधा । जीवु न वचता औषधा । धाविजे जेवी ॥548॥
उद्याच्या मुक्कामावर वाटमारा आहे असे कळल्यावर जसे आजच सावध व्हायला पाहिजे, प्राण जाण्याचे पूर्वीच औषधाकरिता वैद्याकडे धावत गेले पाहिजे.
549-13
येऱ्हवी ऐसे घडे । जो जळता घरी सापडे । तो मग न पवाडे । कुहा खणो ॥549॥
नाहीतर, ज्याप्रमाणे जळत्या घरात सापडलेला मनुष्य विहीर खणून पाण्याने आग विझवू शकत नाही, त्याप्रमाणे होईल.
550-13
चोंढिये पाथरु गेला । तैसेनि जो बुडाला । तो बोंबेहिसकट निमाला । कोण सांगे ॥550॥
खोल पाण्यात जसा दगड पडला त्याप्रमाणे जो पाण्यात बुडाला तो ‘मी बुडतो ” अशा ओरडण्यासह मेला, आता तो याप्रमाणे तो मेला असे कोण सांगेल ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १८६ वा. ५, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २२२१ ते २२३२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २२२१
नव्हती ते संत करिता कवित्व । संताचे ते आप्त नव्हती संत ॥१॥
येथे नाही वेश सरत आडनावे । निवडे घावडाव व्हावा अंगी ॥धृपद॥
नव्हती ते संत धरिता भोंपळा । करिता वाकळा प्रवार्णाशी ॥२॥
नव्हती ते संत करिता कीर्तन । सांगता पुराणे नव्हती संत ॥३॥
नव्हती ते संत वेदाच्या पठणे । कर्म आचरणे नव्हती संत ॥४॥
नव्हती संत करिता तप तीर्थाटणे । सेविलिया वन नव्हती संत ॥५॥
नव्हती संत माळामुद्रांच्या भूषणे । भस्म उधळणे नव्हती संत ॥६॥
तुका म्हणे नाही निरसला देहे । तो अवघे हे सांसारिक ॥७॥
अर्थ
कवित्व केले म्हणजे संत होत नाही किंवा संतांचे आप्तेष्ट नातेवाईक आहेत म्हणून नातेवाईक संत होत नाही. येथे केवळ संता सारखा वेश आहे म्हणून किंवा संतांचे आडनांव आहे म्हणून संत होत नाही तर जगाचे विविध प्रकारचे घाव डाव सहन करून संतपद प्राप्त होते. हातात भोपळा घेतला आणि वाकळाचे प्रावरण म्हणजे पागरून घेतले म्हणजे संत होत नाही. कीर्तन केले म्हणजे संत होत नाही पुराणेकथा सांगितले म्हणजे संत होत नाही. वेदाचे पठण केले किंवा कर्माचरण केले म्हणून कोणी संत होत नाही. तीर्थाटन केल्याने किंवा तप अनुष्ठान केल्याने किंवा वनात जाऊन राहिल्याने कोणी संत होत नाही. माळ मुद्रांचे पोषण केले आणि भस्म उधळले तर कोणी संत होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जोपर्यंत देहाविषयी ज्ञान आहे आणि ज्याच्या ठिकाणी देह भावना आहेत तोपर्यंत ते सर्व संसारीकच आहेत असे समजावे.
अभंग क्र. २२२२
हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥धृपद॥
न लगे मुक्ती आणि संपदा । संतसंग देई सदा ॥२॥
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आह्मासी ॥३॥
अर्थ
देवा मला जर दान द्यायचे असेल तर एकच दे की मला तुझा कधीही विसर होऊ नये. मग मी प्रेमाने तुझे आवडीने गुणगान गाईन आणि हाच माझा सर्व प्रकारचा लाभ आहे. देवा मला मुक्ती आणि संपदा काहीच नको पण मला संत संगती नेहमी घडू द्यावी. तुकाराम महाराज म्हणतात एवढे जर दान तु मला दिले देवा तर मला तु सुखाने मग गर्भवासात घाल त्याचे काहीच मला दुःख वाटणार नाही.
अभंग क्र. २२२३
भाग्यवंता हे परवडी । करिती जोडी जन्माची ॥१॥
आपुलाला लाहो भावे । जे ज्या व्हावे ते आहे ॥धृपद॥
इच्छाभोजनाचा दाता । न लगे चिंता करावी ॥२॥
तुका म्हणे आल्या थोऱ्या । वस्तु बऱ्या मोलाच्या ॥३॥
अर्थ
जे खरोखर भाग्यवंत आहोत ते जन्मभर पुरेल अशा लाभाची साठवण करून ठेवतात. ज्याला जे हवे आहे ते त्याच्या जवळ आहे. ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे भोजन पुरवणारा दाता म्हणजे देव आहे त्यामुळे चिंता करण्याचे काहीच कारण नाही. तुकाराम महाराज म्हणतात या देवाजवळ सर्व मोठ्या चांगल्या मोलाच्या वस्तू आलेल्या आहेत त्यामुळे भक्तांनी त्याचा लाभ करून घ्यावा.
अभंग क्र. २२२४
वंचुनिया पिंड । भाता दान करी लंड ॥१॥
जैसी याची चाली वरी । तैसा अंतरला दुरी ॥धृपद॥
मेला राखे दिस । ज्यालेपणे जाले वोस ॥२॥
तुका म्हणे देवा । लोभे न पुरे चि सेवा ॥३॥
अर्थ
आई बाप जिवंत असताना त्यांची सेवा करत नाही परंतु ते मेल्यावर काही लंड लोक भाताचे पिंडदान करतात. ज्याची जशी वागणूक असेल त्याप्रमाणे हरी त्याच्या पासून अंतर ला जातो त्याच्या पासून दूर जातो. आईबाप मेलेला दिवस लक्षात ठेवतो आणि श्राद्धही घालतो परंतु जिवंतपणी त्यांच्याकडे कधी पाहतही नाही. तुकाराम महाराज म्हणतात लोभाने केलेली देवाची सेवा देवाला केव्हाच आवडत नाही.
अभंग क्र. २२२५
अधीरा माझ्या मना ऐक एक मात । तू का रे दुश्चित निरंतर ॥१॥
हे चि चिंता काय खावे म्हणऊनि । भले तुजहूनि पक्षीराज ॥धृपद॥
पाहा ते चातक नेघे भूमिजळा । वरुषे उन्हाळा मेघ तया ॥२॥
सकळयातीमध्ये ठक हा सोनार । त्याघरी व्यापार झारियाचा ॥३॥
तुका म्हणे जळी वनी जीव एक । तयापाशी लेख काय असे ॥४॥
अर्थ
हे माझ्या अधीर मना एक गोष्ट तु ऐक अरे तु नेहमी दुःखी कष्टी का असतोस. अरे तुला ही चिंता लागली आहे की काय, आपण दररोज काय खावे तर तुझ्यापेक्षा ते पक्षी बरे आहेत. अरे तो चातक पक्षी पहा कितीही तहाण लागली तरी तो भूमीवरील जल कधीच पित नाही, भर उन्हाळ्यात देखील त्याच्यासाठी मेघाला वर्षाव करावा लागतो तेव्हा तो फक्त मेघाचेच पाणी पितो. सर्व व्यवसायिकांमध्ये जातीमध्ये सोनार हा ठक आहे म्हणजे फसवणारा आहे परंतु त्याच्या बरोबर सुद्धा झारेकरी व्यापार करून पोट भरतात. तुकाराम महाराज म्हणतात अरे पाण्यात, वनात, रानात राहणारे असे कितीतरी जीव आहेत की ज्यांच्या जवळ खाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे खाद्य नाही परंतु तरीदेखील त्यांची काळजी हा हरी करतो व त्यांच्यासाठी खाद्य पुरवतो.
अभंग क्र. २२२६
का रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो ॥१॥
बाळा दुधा कोण करिते उत्पत्ती । वाढवी श्रीपति सवे दोन्ही ॥धृपद॥
फुटती तरुवर उष्णकाळमासी । जीवन तयांसी कोण घाली ॥२॥
तेणे तुझी काय नाही केली चिंता । राहे त्या अनंता आठवूनि ॥३॥
तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर । त्याचे निरंतर ध्यान करी ॥४॥
अर्थ
अरे सर्व जगाला जो एकटाच पोसतो अशा कृपाळू देवाची तु आठवण का करत नाहीस ? अरे गर्भा मधील बालकाला कोण पोसते आणि त्याची भूक भागवण्यासाठी दुधाची उत्पत्ती कोण करते तर अर्थात हा श्रीपती करतो, तो गर्भात असलेल्या मुलाचे आणि स्तनात दुधाचे दोन्ही वाढवण्याचे काम करतो. भर उन्हाळ्यात झाडाना पालवी फुटते मग त्यांना पाणी घालण्याचे काम कोण करते ? अरे त्या आनंताने तुझी चिंता केली नाही की काय अर्थात केलेली आहे त्यामुळे त्याला आठवून तु निश्चिंत राहा. तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे नावच विशंभर आहे त्याचे तु निरंतर ध्यान करीत रहा.
अभंग क्र. २२२७
उदारा कृपाळा पतितपावना । ब्रिदे नारायणा साच तुझी ॥१॥
वर्णिलासी जैसा जाणता नेणता । तैसा तू अनंता साच होसी ॥धृपद॥
दैत्या काळ भक्तं मेघश्याममूर्ती । चतुर्भुज हाती शंख चक्र ॥२॥
काम इच्छा तया तैसा होसी राणी । यशोदेच्या स्तनी पान करी ॥३॥
होऊनि सकळ काहीच न होसी । तुका म्हणे यासी वेद ग्वाही ॥४॥
अर्थ
हे नारायणा तुझी उदारा कृपाळा पतितपावना ही सर्व ब्रिदे खरी आहेत. हे अनंता जो जसा तुझे वर्णन करीन मग त्याला तुझ्या स्वरूपाविषयी ज्ञान असो किंवा नसो तो जसा तुझे वर्णन करीन तसाच तु होतोस. तु दैत्याचा काळ आहेस आणि भक्तांसाठी चतुर्भुज हातांमध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेली मेघशाम मूर्ती होतोस. तु गोपिकाचा पती होऊन त्यांचे काम पूर्ण केलेस तसेच अर्जुनाची पत्नी त्याचेही काम पूर्ण केलेस आणि यशोदेचा बालक होऊन यशोदेचे स्तनपान केलेस. तुकाराम महाराज म्हणतात अरे देवा तु सगळं काही होऊन देखील काहीच होत नाही आणि याला साक्ष वेदच आहे.
अभंग क्र. २२२८
करूनी चिंतन खेळो भोवताले । चित्त येथे आले पायापाशी ॥१॥
येथे नाही खोटा चालत परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा ॥धृपद॥
सुखदुःखे तुज देऊनी सकळ । नाही ऐसा काळ केला आम्ही ॥२॥
तुका म्हणे जाला देहाचा विसर । नाही आता पर आप दोन्ही ॥३॥
अर्थ
देवा तुझे सारखे चिंतन करून करून माझे चित्त आता तुझ्या पाया भवताली खेळत आहे. अरे पांडुरंगा तुला खोटा परिहार देऊन चालणार नाही कारण तु सर्वाचे अंतकरण जाणतो आहेस. देवा आम्ही आमचे सर्व सुखदुःख तुला देऊन टाकले आहे आणि काळाचे खंडण केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता मला देहाचा विसर पडला आहे त्यामुळे माझ्यासाठी कोणी आपले व परके नाही.
अभंग क्र. २२२९
परिसाचे अंगे सोने जाला विळा । वाकणे या कळा हीन नेव्हे ॥१॥
अंतरी पालट घडला कारण । मग समाधान ते चि गोड ॥धृपद॥
पिकली सेंद पूर्वकर्मा नये । अव्हेरु तो काय घडे मग ॥२॥
तुका म्हणे आणा पंगती सुरण । पृथक ते गुण केले पाकें ॥३॥
अर्थ
विळ्याच्या अंगाला परिसाचा स्पर्श झाला तर पूर्वी जसा विळा वाकडा आणि काळा होता त्याप्रमाणे विळा वाकडा तर राहतो पण काळा मात्र राहत नाही. आपल्या अंतरंगात खऱ्या अर्थाने पालट व्हायला पाहिजे असे झाले की त्या कारणामुळे समाधान प्राप्त होते आणि ते समाधान अवस्था हेच गोड फळ असते. सेंद नावाचे फळ हे पूर्वी फार कडू असते परंतु पिकल्यानंतर ते फारच गोड होते मग त्याचा कोणी अव्हेव करेल ? तुकाराम महाराज म्हणतात सुरण हा कंद खाजट जरी असला तरी त्याला शिजवल्यानंतर त्याच्यामधला र्दुगंध नाहीसा होतो आणि अतिशय चविष्ट पदार्थ होतो मग तो पंगतीत खुशाल जेवणास वाढावा.
अभंग क्र. २२३०
पाहे तिकडे दिशा ओस । अवघी आस पायापे ॥१॥
मनिचे साच होईल कई । प्रमे देई भेटोनि ॥ध्रु॥
सर्वापरि पागुळ असे । न कळे कैसे ते तुम्हा ॥२॥
तुका म्हणे कृपावंता । तू तो दाता दीनाचा ॥३॥
अर्थ
देवा जिकडे पहावे तिकडची दिशा मला सर्व ओसच दिसत आहे आता मला केवळ तुझ्या पायाचे दर्शन घडावे एवढीच इच्छा आहे. देवा माझ्या मनातील इच्छा कधी सत्यत्वास येईल हे मला काही समजत नाही परंतु तु मला भेट देऊन मला तुझे प्रेम द्यावे एवढी इच्छा मात्र आहे. देवा मी सर्वपरीने म्हणजे ज्ञानाने क्रियेने पागळा झालेलो आहे हे तुम्हाला कसे कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे कृपावंता अरे तु तर दिनांचा दाता आहेस.
अभंग क्र. २२३१
चाळवणे काय । ऐसे अगे माझे माय ॥१॥
धाव पाव लवलाहे । कंठी प्राण वाट पाहे ॥धृपद॥
पसरूनि कर । तुज चालिलो समोर ॥२॥
देसील विसावा । तुका म्हणे ऐशा हावा ॥३॥
अर्थ
हे माझे माय पांडुरंगे तु मला असे का चाळवीत आहेस ? तु आता लवकर धाव मला भेट दे कारण तुझी वाट पाहता पाहता माझा प्राण कंठात आला आहे. मी माझे हात पसरून तुझ्या समोर येत आहे. तुकाराम महाराज म्हणतात कारण तु मला विसावा देशील विश्रांती देशील याच आशेने मी तुझ्याकडे येत आहे.
अभंग क्र. २२३२
मतिविण काय वर्णु तुझे ध्यान । जेथे पडिले मौन्य वेदश्रुती ॥१॥
करूनि गोजिरा आपुलिये मती । धरियेले चित्ती चरणकमळ ॥धृपद॥
सुखाचे ओतिले पाहो ते श्रीमुख । तेणे हरे भूक तान माझी ॥२॥
रसना गोडावली ओव्या गाता गीत । पावलेंसे चित्त समाधान ॥३॥
तुका म्हणे माझी दृष्टि चरणांवरी । पाउले गोजिरी कुंकुमाची ॥४॥
अर्थ
देवा जेथे वेद आणि श्रुती यांना तुझे वर्णन करताना मौन धारण करावे लागले तेथे मला कोणतेही ज्ञान नसताना तुझ्या रूपाचे वर्णन मी कसे करू ? देवा मी माझ्या मती प्रमाणे तुझ्या गोजिर्या रूपाची भावना करून तुझे चरण कमल माझ्या चित्तात धारण केले आहे. तुझे श्रीमुख म्हणजे सुखाचे ओतलेलेच आहे आणि ते पाहिले की माझी तहान भूक हरपून जाते. देवा तुझ्या ओव्याचे गीत गाताना माझी रसना गोडावली गेली आणि माझे चित्त समाधान पावले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा कुंकवा प्रमाणे असलेले तुमचे गोजिरे पावले आहेत आणि त्या चरणावरच माझी दृष्टी आहे
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















