आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

४ सप्टेंबर, दिवस २४७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ४५१ ते ४७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २९५३ ते २९६४
“४ सप्टेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ४ September
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ४ सप्टेंबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २९५३ ते २९६४ चे पारायण आपण करणार आहोत.
४ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ४५१ ते ४७५,
451-15
जैसा आरिसा आलिया जवळा । दिसे आपणपे आपला डोळा । तैसा संवादिया तू निर्मळा । शिरोमणी ॥451॥
आरसा जवळ आणिला असता जसे आपले मुख आपल्यास दिसते, त्याप्रमाणे, शुद्धस्वरूपवस्तुविषयक संवाद करणारांमध्ये श्रेष्ठ असा तू, मला जणू आरसाच भेटल्यामुळे माझ्या सुखरूपतेचा त्यात मला पुन्हा भोग घडणार आहे. 51
452-15
तुवा नेणोनि पुसावे । मग आम्ही परिसऊ बैसावे । तो गा हा पाडु नव्हे । सोयरेया ॥452॥
अर्जुना, तुला माहित नाही म्हणून तू विचारीत आहेस, आणि म्हणून आम्ही सांगतो अशातला हा प्रकार नाही. 52
453-15
ऐसे म्हणौनि आलिंगिले । कृपादृष्टी अवलोकिले । मग देवो काय बोलिले । अर्जुनेसी ॥453॥
असे म्हणून देवांनी अर्जुनाला प्रेमाने आलिंगन दिले आणि त्याजकडे कृपादृष्टीने पाहून पुढे त्याला म्हणाले, 53
454-15
पै दोही वोठी एक बोलणे । दोही चरणी एक चालणे । तैसे पुसणे सांगणे । तुझे माझे ॥454॥
अरे, दोन ओठा मिळून शब्द एक, दोन पायांनी होणारे चालणे एक, त्याचप्रमाणे तुझे पुसणेआणि माझे सांगणे हा प्रकार आहे (प्रश्न आणि उत्तर दोही मिळून निष्पत्ति एक आत्मज्ञानच. ) 54
455-15
एवं आम्ही तुम्ही येथे । देखावे एका अर्थाते । सांगते पुसते येथे । दोन्ही एक ॥455॥
एकंदरीत, त्या विषयाबद्दल तुझी व माझी अर्थदृष्टि एकच आहे, म्हणून, मी सांगणारा व तू विचारणारा असे दिसले, तरी आपण दोघे एकच म्हटले पाहिजेत. 55
456-15
ऐसा बोलत देवो भुलला मोहे । अर्जुनाते आलिंगूनि ठाये । मग बिहाला म्हणे नोहे । आवडी हे ॥456॥
असे बोलणे चालले असता स्नेहाने मोहित होऊन गहिंवरून देवांनी अर्जुनाला पोटाशी आलिंगून धरिले व तसेच बसले; व थोडयाच वेळांत वृत्तीवर येऊन स्वतःशीच म्हणाले, ह्या प्रसंगी इतका मोह कामाचा नाही 56
457-15
जाले इक्षुरसाचे ढाळ । तरी लवण देणे किडाळ । जे संवादसुखाचे रसाळ । नासेल थिते ॥457॥
का की, उसाच्या रसाच्या ठेपीस नासू नये म्हणून क्षाराचे मिश्रण लागते. तसेच संवादसुख नुसते गोठू दिले तर नासेल. त्यालाही द्वैताचा, क्षार दिला तरच गोडी टिकेल. 57
458-15
आधीच आम्हा यया काही । नरनारायणासी भिन्न नाही । परी आता जिरो माझ्या ठाई । वेगु हा माझा ॥458॥
आम्हा नरनारायणात मूळचा भेद नाहीच; तरीही ह्या वेळी मला आलेला प्रेमाचा वेग माझ्या ठिकाणी जिरविलाच पाहिजे. 58
459-15
इया बुद्धी सहसा । श्रीकृष्ण म्हणे वीरेशा । पै गा तो तुवा कैसा । प्रश्नु केला ? ॥459॥
असा विचार करून, देव सावध झाल्यासारखे करून एकदम म्हणाले, अर्जुना, आतांच तू मला काय प्रश्न केलास रे ? 59
460-15
जो अर्जुन श्रीकृष्णी विरत होता । तो परतोनि मागुता । प्रश्नावळीची कथा । ऐको आला ॥460॥
इकडे अर्जुनाची वृत्तीही श्री कृष्णरूप होत होती, तो देवांच्या ह्या प्रश्नने देहभानावर येऊन, आपल्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यास तयार झाला. 460
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
461-15
तेथ सद्गदे बोले । अर्जुने जी जी म्हणितले । निरुपाधिक आपुले । रूप सांगा ॥461॥
व सद्गदित वाणीने म्हणाला, “ हो, हो, देवा, आपले निरुपाधिक रूप सांगा” असे मी म्हटले होते. 61
462-15
यया बोला तो शारङ्गी । तेचि सांगावयालागी । उपाधी दोही भागी । निरूपीत असे ॥462॥
अर्जुनाचे हे भाषण ऐकून, ते निरुपाधिक रूप सांगण्यासाठी भगवंतांनी प्रथम उपाधींचे दोन प्रकारे निरूपण केले. 62
463-15
पुसिलिया निरुपहित । उपाधि का सांगे येथ । हे कोण्हाही प्रस्तुत । गमे जरी ॥463॥
आपले निरुपाधिक रूपवर्णन ऐकण्याची इच्छा अर्जुनाने दर्शविली असता, देवांनी प्रथम उपाधींचे वर्णन का केले अशी जर कोणास शंका येईल. 63
464-15
तरी ताकाचे अंश फेडणे । याचि नांव लोणी काढणे । चोखाचिये शुद्धी तोडणे । कीडचि जेवी ॥464॥
तर असे पहा, की दह्यातील तक्रांश (तक) काढून टाकणे ह्याचेच नांव लोणी काढणे. (ती काही स्वतंत्र क्रिया नहीं) होय; किंवा शुद्ध सोने पाहिजे असेल तेव्हा त्यातील अशुद्ध धातु जाळून नाहीशी करणे हेच होय. 64
465-5
बाबुळीचि सारावी हाते । परी पाणी तव असे आइते । अभ्रचि जावे गगन ते । सिद्धचि की ॥465॥
शेवाळ बाजूला करणे ह्याचाच अर्थ पाणी शुद्ध करणे होय; (हे तर प्रथमच शुद्ध असते, करावे लागत नाही) अथवा, अभ्र मावळले की आकाश मूळचेच स्वच्छ आहे. 65
466-15
वरील कोंडियाचा गुंडाळा । झाडूनि केलिया वेगळा । कणु घेता विरंगोळा । असे काई ? ॥466॥
अशुद्धता आणणाच्या वरील कोंडयाचे वेष्टन बाजूस झाडून टाकले की शुद्ध धान्य प्राप्तीला वेळ कसला ? 66
467-15
तैसा उपाधि उपहिता । शेवटु जेथ विचारिता । ते कोणातेही न पुसता । निरुपाधिक ॥467॥
(उपहित चैतन्य विचाराचा विषय होऊ शकतें; शुद्ध चैतन्य नव्हे उपहितांतीलही केवळ उपाधीच विचारार्ह आहे, चैतन्य नव्हे म्हणून ) उपाधियुक्त वस्तूतील उपाधीचा जेथे विचाराने शेवट अंत होतो, त्याच्या पलिकडे जे राहिले ते निरुपाधिक; ते स्वप्रकाश आहे त्याला कोणाची संमंति नको. 67
468-15
जैसे न सांगणेवरी । बाळा पतीसी रूप करी । बोल निमालेपणे विवरी । अचर्चाते ॥468॥
लग्न झालेली लहान मुलगी (घोडनवरी नव्हे) जे नांव घेतले असता होय किंवा नही काही न म्हणता, खाली मान घालून उगी रहाते, हे तिच्या पतीचे नांव तिच्या मनाने ठरले त्याप्रमाणे त्या शुद्ध, निरुपाधिक, अनिदं स्वरूपाच्या वर्णनात श्रुतीने मौन पत्करून त्यांचे “आवाङ्मनसगोचरत्व ” दर्शित केले. 68
469-15
पै सांगणेया जोगे नव्हे । तेथीचे सांगणे ऐसे आहे । म्हणौनि उपाधि लक्ष्मीनाहे । बोलिजे आदी ॥469॥
म्हणून जे शब्दाने सांगण्यासारखे नसते त्याचे असे आजूबाजूने वर्णन करावे लागते, हे मनात आणून लक्ष्मीपति भगवंताने प्रथम उपाधीचे वर्णन केले. 69
470-15
पाडिव्याची चंद्ररेखा । निरुती दावावया शाखा । दाविजे तेवी औपाधिका । बोली इया ॥470॥
शुद्ध प्रतिपदेच्या चंद्रदर्शनार्थ जसा एखाद्या खांदीचा (फांदीचा) आधार दृष्टीला द्यावा लागतो, त्याप्रमाणे निरुपाधिक स्वरूपाचे वर्णन करितांना ते उपाधिद्वारांच करावे लागते. 470
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च ।
क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ॥15. 16॥
471-15
मग तो म्हणे गा सव्यसाची । पै इये संसारपाटणीची । वस्ती साविया टांची । दुपुरुषी ॥471॥
देव म्हणाले, अर्जुना, या संसाररूप नगरांत, फक्त दोनच पुरुषांची वस्ती आहे. (क्षर व अक्षर) 71
472-15
जैसी आघवाचि गगनी । नांदत दिवोरात्री दोन्ही । तैसे संसार राजधानी । दोन्हीचि हे ॥472॥
ज्याप्रमाणे, सर्व आकाशात दिवस आणि रात्र ही दोनच नांदतात त्याप्रमाणे ह्या संसार राजधानीत हे दोनच पुरुष नांदतात. 72
473-15
आणिकही तिजा पुरुष आहे । परी तो या दोहीचे नांव न साहे । जो उदेला गावेसी खाये । दोहीते यया ॥473॥
आणखीही एक तिसरा पुरुष आहे, पण त्याच्या पुढे या दोन पुरुषांचे नुसते नांवही घेण्याची सोय नाही; तो प्रगट झाला की, ह्या दोघांचा त्यांच्या नगरासह ग्रास करून टाकतो. 73
474-15
परी ते तव गोठी असो । आधी दोन्हीची हे परियेसो । जे संसारग्रामा वसो । आले असती ॥474॥
पण ह्या तिसन्या पुरुषाची गोष्ट तूर्त राहू दे; ह्या संसारग्रामात प्रथम वस्तीला आलेले जे दोन पुरुष यांची गोष्ट ऐक. 74
475-15
एक आंधळा वेडा पंगु । येर सर्वांगे पुरता चांगु । परी ग्रामगुणे संगु । घडला दोघा ॥475॥
त्यातील एक आंधळा, वेडा व पंगु असून दुसरा सर्वागपूर्ण व चांगला आहे; पण एकाच गावात आल्याने ही विषम मैत्री जडली. 75
दिवस २४७ वा. ४, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २९५३ ते २९६४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २९५३
न पडो आता हाडी घाव । मध्ये कीव नासक ॥१॥
करविली आत्महत्या । जीवा का द्वंदाच्या ॥धृपद॥
आशापाशी गुंतला गळा । तेणे कळाहीन झालो ॥२॥
तुका म्हणे लावू मुळी । जीवकुळी थारेसी ॥३॥
अर्थ
आता माझ्या देहावर अहंकाराचा घाव पडू नये कारण माझ्यामध्ये जे करुणतेचे गुण आहेत ते नाश पावेल. माझ्या जीवाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे व्दंव्द निर्माण होते ते केवळ अभिमानामुळे व त्यामुळे माझ्या आत्मसुखाचा नाश होतो त्यामुळेच आत्महत्या केल्यासारखे होते. आशा पाशाच्या ठिकाणी माझा गळा गुंतलेला आहे त्यामुळे मी अतिशय कळाहीन दीन झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “जे मूळ आहे त्या मूळाच्या ठिकाणीच आत्मस्वरुपाच्या ठिकाणीच आता स्थान निश्चिंत करायचे आहे. ”
अभंग क्र. २९५४
सामावे कारण । नाही सोसत धरणे ॥१॥
लादी थींके लाजिरवाणी । हीनकामाईची घाणी ॥धृपद॥
पुष्प जवळी नाका । दुर्गंधीच्या नावे थुंका ॥२॥
तुका म्हणे किती । उपदेशहीन जाती ॥३॥
अर्थ
एखादयाच्या घरामध्ये आपण त्याला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले त्याला काम करु लागलो तर त्याच्याजवळ आपल्याला प्रवेश तर मिळतो, परंतू विनाकारणच त्याच्या घराच्या समोर धरणे धरुन बसलो तर त्याला ते सहन होत नाही. एखादयाकडे लाजिरवाणेपणाने जाऊन शोक करण्यात काहीही अर्थ नसतो आणि हीनपणे केलेली कमाई तर अगदी वाईटच असते. सुगंधी फूल नाकाजवळ घेऊन वास घ्यावे परंतू दुर्गंधी वस्तू पाहिली की त्याच्यावर थुंकावे. तुकाराम महाराज म्हणतात, “या हीन (निर्लज्ज) जातीच्या लाजिरवाण्या माणसाला उपदेश तरी किती करत जावा. ”
अभंग क्र. २९५५
असाल ते तुम्ही असा । आम्ही सहसा निवडो ना ॥१॥
अनुसरलो एका चित्ते । हातोंहाते गींवसित ॥धृपद॥
गुणदोष काशासाठी । तुमचे पोटी वागवू ॥२॥
तुका म्हणे दुजे आता । कोठे चित्ता आतळो ॥३॥
अर्थ
हे लोकांनो तुम्ही जसे असाल तसे असाल आम्ही तुमच्यामधील गुणदोष कधीही निवडणार नाही. देवाला आम्ही हातोहात शोधीत गेलो व एकचित्ताने त्याला अनुसरलो आहोत. अहो तुमचे गुणदोष मी माझ्या पोटामध्ये का वाहवत बसलो ? तुकाराम महाराज म्हणतात, “आता आमच्या चित्ताने व्दैताच्या ठिकाणी कोठे स्पर्श करत बसावा ? ”
अभंग क्र. २९५६
सोवळा होऊ तो वोंवळे जडले । सांडीमांडी बोलतोंडी बीजी ॥१॥
एकसरी केली कलेवरे साटी । आता नका तुटी पायासवे ॥धृपद॥
संकल्पी विकल्प पापाचा सुकाळ । रज्जुसर्प मूळ मरणाचे ॥२॥
तुका म्हणे हे तू ब्रम्हांड चाळिता । मी का करू चिंता पांडुरंगा ॥३॥
अर्थ
देवा मी शुध्द होण्यास गेलो तर अनेक विकार माझ्या अंगी जडले व मूळ बीज जे आहे ते सोडून विधिनिषिदच मात्र बोलत आहे. त्यामुळे देवा मी आता माझे शरीर तुम्हाला अर्पण केले आहे. तुमच्या चरणाजवळ मी आलो आहे आता तुमच्या चरणाचा वियोग तुमच्या पायाचा वियोग मात्र मला आता होऊ देऊ नका. संकल्पाच्या ठिकाणी जर विकल्प उत्पन्न झाला तर तो पापासाठी सुकाळच ठरतो. जसे रज्जूच्या ठिकाणी अज्ञानामुळे सर्पाचा भास होतो व तो मरणासाठी मूळ कारणही ठरतो. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पाडूरंगा संपूर्ण ब्रम्हांडाचा तू चालक आहेस त्यामुळे मी चिंता तरी कशासाठी करु ? ”
अभंग क्र. २९५७
आहे ऐसा आता आहे ठायी बरा । ठेविलो दातारा उचिते त्या ॥१॥
वचनाचा भार पडिलिया शिरी । झाले मग भारी उतरेना ॥धृपद॥
अबोल्याची सवे लावुनिया मना । फाको नेदी गुणा ऐसे करू ॥२॥
तुका म्हणे आम्हा गोंवळ्याचा संग । राखावे ते अंग जाणतसो ॥३॥
अर्थ
हे दातारा मी जसा आहे तसा व ज्या ठिकाणी आहे तेथे बरा आहे कारण तुम्ही मला जसे ठेवले आहे तेच उचित आहे. देवा आता आमच्या बोलण्याचा भार तुमच्या शिरावर पडला आणि तो भार काही केल्याही उतरणार नाही. देवा त्यामुळे आता आम्ही आमच्या मनाला अबोला राहण्याची सवय लावू व तुमचे गुण आम्ही बाहेर पडू देणार नाही ते आमच्या हद्यातच आम्ही साठवून ठेवू. तुकाराम महाराज म्हणतात, “आता आम्हाला या गोपाळाची संगती लाभली त्यामुळे त्याची सेवा करण्यासाठी शरीर कसे राखावे हे आम्ही चांगले जाणतो आहोत. ”
अभंग क्र. २९५८
तू माझा कोंवसा । परी न कळे या धसा ॥१॥
कूट खाती मागे पुढे । जाती निरयगावा पुढे ॥धृपद॥
मज म्हणती कवी । निषेधुनि पापी जेवी ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । आता कोण लेखी जगा ॥३॥
अर्थ
देवा तू माझा आधार आहेस परंतू या धसाळ लोकांना हे मात्र कळतच नाही. देवा अहो हे लोक माझ्या पुढे किंवा मागे माझी निंदा करतात व निंदारुपी कुट हे लोक खातात याने ते नरकरुपी गावालाच पुढे नक्की जातील. हे पापी लोक माझा निषेध करुन मला कवी असे म्हणून माझी निंदा करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पाडूरंगा आता या जगाची कोण लेखी करते यांच्याशी मला काहीही एक कर्तव्य नाही. ”
अभंग क्र. २९५९
दर्पणासी बुजे । नखटे तोंड पळवी लाजे ॥१॥
गुण ज्याचे जो अंतरी । तोचि त्यासी पीडा करी ॥धृपद॥
चोरा रुचे निशी । देखोनिया विटे शशी ॥२॥
तुका म्हणे जन । देवा असे भाग्यहीन ॥३॥
अर्थ
आरशात आपले तोंड एखादया नकट्याने पाहिले तर तो उगाचच बुजतो आणि लाजेने स्वत:चे तोंड लपवतो. ज्याच्या अंत:करणात जो दोष असतो तोच त्याला त्रास देत असतो. चोरांना रात्र खूप आवडत असते परंतू चंद्राला जरी त्यांनी पाहिले तरी त्यांना त्याचा वीट येतो. तुकाराम महाराज म्हणतात. “देवा हे असे लोक भाग्यहीन आहेत. ”
अभंग क्र. २९६०
म्हणउनि शरण जावे । सर्वभावे देवासी ॥१॥
तो हा उतरील पार । भवदुस्तरनदीचा ॥धृपद॥
बहु आहे करुणावंत । अनंत हे नाम ज्या ॥२॥
तुका म्हणे साक्षी आले । तरी केले प्रगट ॥३॥
अर्थ
भवसागरातून तरुन जाण्यासाठी सर्वभावे देवाला शरण जावे. मग हा देव कठीण अशा भवनदीच्या पार आपल्याला उतरवील. ज्याला अनंत असे नाम आहे तो खूपच कृपावंत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “प्रत्यक्ष माझ्या अनुभवाला या गोष्टी आल्या आहेत म्हणूनच तुमच्यासमोर मी या गोष्टी प्रकट केल्या आहेत. ”
अभंग क्र. २९६१
ऐसी वर्मे आम्हा असोनिया हाती । का होऊ नेणती दिशाभुली ॥१॥
पोटाळुनी पाय कवळीन उभा । कृपे पद्मनाभा झालो नेदी ॥धृपद॥
आपुले इच्छेसी घालीन संपुष्टी । श्रीमुख ते दृष्टी न्याहाळीन ॥२॥
तुका म्हणे बहु सांडियेली मते । आपुल्या पुरते धरुनी ठेलो ॥३॥
अर्थ
भक्तीसारखे एवढे चांगले वर्म आमच्या हाती असून देखील आम्ही दिशाभूल झाल्यासारखे का होऊ ? त्या पद्मनाभाच्या पायाला मी आलिंगन देईन व “माझ्यावर कृपा कर तोपर्यंत मी तुला हलू देणार नाही” असे त्याला सांगेन. मी माझ्या इच्छेने त्या श्रीहरीला माझ्या ह्दयरुपी संपुष्टात साठवून ठेवीन आणि श्रीहरीचे श्रीमुख माझ्या दृष्टीने न्याहाळीन. तुकाराम महाराज म्हणतात, “मी आतापर्यंत खूप जणांचे मते ऐकले व ते सोडूनही दिले आहेत टाकूनही दिले आहेत आता माझे हित ज्याच्यात आहे तेवढेच वर्म मी माझ्या हाती धरुन राहिलो आहे. ”
अभंग क्र. २९६२
रत्नाच्या वोवणी कांचे ऐशा घरी । आव्हेरुनी दुरी अधिकारे ॥१॥
जातिचा स्वभाव आला डोळ्या आड । तया घडे नाड न कळता ॥धृपद॥
कामधेनु देखे जैशा गाईम्हैसी । आणिकाते ऐसी करोनिया ॥२॥
तुका म्हणे काय बोलोनिया फार । जयाचा वेव्हार तया साजे ॥३॥
अर्थ
एखादा मूर्ख मनुष्य त्याच्या अधिकाराने रत्नाची माळ काचे प्रमाणे समजून तिचा अव्हेर करुन तिला दूर फेकून देत असतो. खरा तर तो त्याच्या जातीचाच स्वभाव आहे असे समजावे कारण तो मूर्खच आहे व त्याला त्याचा मूर्खपणाच्या जातीचा स्वभावच डोळयाच्या आड आला व त्याला रत्नपरीक्षा झाली नाही त्यामुळे त्याचे व्यावहारीक नुकसान झाले आहे. ज्याप्रमाणे सामान्य गाई म्हशी असतात त्याप्रमाणे कामधेनूला तो सामान्य पशु समजून त्या कामधेनूला पाहात असतो, तुकाराम महाराज म्हणतात, “आता जास्त बोलून काय उपयोग आहे कारण जो जसा व्यवहार करतो तो त्याला शोभून दिसत असतो त्यामुळे चांगल्या वस्तू या चांगल्याच माणसाला समजत असतात. ”
अभंग क्र. २९६३
तरीच ही केली । दाने वाईट चांगली ॥१॥
एक एका शोभवावे । केले कवतुक देवे ॥धृपद॥
काय त्याची सत्ता । सूत्र आणीक चाळिता ॥२॥
तुका म्हणे धुरे । डोळे भरिले परि खरे ॥३॥
अर्थ
देवाने जगाला चांगले व वाईट मनुष्य दान केले आहेत ती केवळ यामुळेच, कारण वाईट मनुष्यामुळे तर खऱ्या चांगल्या मनुष्याची किंमत कळते व एकमेकांमुळे एकमेकांची शोभा वाढत असते असे कौतुक या देवाने केले आहे. अहो त्या देवाची सत्ता काय म्हणून सांगायची सर्व जगाचा चालक व सर्व जगाची सूत्रे त्याच्याच हातात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो लोकांचे डोळे तर विषय सुखाने व विकाराच्या धुरानेच भरले आहेत परंतू मी तुम्हाला देवाचे जे काही वर्णन सांगितले आहेत ते मात्र खरे आहे. ”
अभंग क्र. २९६४
करी आणिकाचा अपमान । खळ छळवादी ब्राम्हण । तया देता दान । नरका जाती उभयता ॥१॥
तैसे झाले दोघाजणा । मागतिया यजमाना । जाळियेले वना । आपणासहित कांचणी ॥धृपद॥
घडिता दगडाची नांव । मोल क्लेश गेले वाव । तरता नाही ठाव । बुडवी तारू तरतीया ॥२॥
चोरा दिधला साटा । तेणे मारियेल्या वाटा । तुका म्हणे ताठा । हे तव दोघे नाडती ॥३॥
अर्थ
जो नेहमी इतरांचा अपमान करतो खळ म्हणजे जो दुष्ट आहे व इतरांना जो ब्राम्हण छळत असतो, त्याला कोणी दान दिले तर देणारा आणि घेणारा दोघेही नरकात जातात. अगदी त्याप्रमाणे दान देणारा दाता आणि दान मागणारा याचक हे दोघेही जर छळवादी दुष्ट आणि इतरांचे अपमान करणारे असतील तर तेही नरकाला जातात. अहो लाकडावर लाकडाचे घर्षण केले की अग्नी उत्पन्न होतो व ते लाकूड स्वत:ही जळते व इतरांनाही जाळते. जर दगडाची नांव तयार केली तर त्याचे मोलही वायाला जाते व केलेले कष्टही वायाला जातात. अहो ती नांव स्वत:ही तरु शकत नाही आणि त्याच्यात जे तरुन जाणारे आहेत त्यांनाही तारु शकत नाही उलट ती स्वत:ही बुडते व इतरांनाही बुडवतेच. तुकाराम महाराज म्हणतात, “जर एखादया चोराला आपण थोडयाशा धनासाठी सहकार्य करण्याचे ठरवले व त्याच्याबरोबर जाऊन चोरी केली तर ते दोघेही फसतात व दोघानाही शिक्षा होते. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















