आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२४ सप्टेंबर, दिवस २६७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी ३५१ ते ३७५ + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३१९३ ते ३२०४
“२४ सप्टेंबर ” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 24 September
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २४ सप्टेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३१९३ ते ३२०४ चे पारायण आपण करणार आहोत.
२४ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी ३५१ ते ३७५,
351-16
ऐसेनि धना विश्वाचिया । मीचि होईन स्वामिया । मग दिठी पडे तया । उरो नेदी ॥351॥
ह्याप्रमाणे जगांतील सर्व संपत्तीचा मीच स्वामी होईन; मग ज्याच्यावर माझी दृष्टि पडेल तो उरणारच नाही ! 51
असौ मया हतः शत्रुऱनिष्ये चापरानपि ।
ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी ॥16. 14॥
352-16
हे मारिले वैरी थोडे । आणीकही साधीन गाढे । मग नांदेन पवाडे । येकलाचि मी ॥352॥
आतांपर्यंत मारले हे शत्रू काहीच नाहीत, आणखी जे पराक्रमी आहेत त्यांनाही मारून मग एकटा मीच सर्व मालक अशा थाटाने राहीन. 52
353-16
मग माझी होतील कामारी । तियेवाचूनि येरे मारी । किंबहुना चराचरी । ईश्वरु तो मी ॥353॥
माझे दास होतील तेवढे ठेवीन; बाकी सर्वाचा नाश करीन; किंबहुना ह्या चराचराचा मालक ईश्वर म्हणून जो म्हणतात, तो मीच होय. अन्य कोणी नाही. 53
354-16
मी भोगभूमीचा रावो । आजि सर्वसुखासी ठावो । म्हणौनि इंद्रुही वावो । माते पाहुनि ॥354॥
सर्व भोग्यसृष्टीचा मी राजा असून सर्व सुखांचाही मीच आधार व भोक्ता होय; म्हणून माझे ऐश्वर्य पाहून मनात इंद्रही लज्जित होईल. 54
355-16
मी मने वाचा देहे । करी ते कैसे नोहे । के मजवाचूनि आहे । आज्ञासिद्ध आन ? ॥355॥
मग मी कायावाचा मनाने जे करीन ते कसे घडणार नाही ? माझ्या आज्ञेवाचून दुसरी कोणती गोष्ट सिद्धीस जाणार आहे ? 55
356-16
तवचि बळिया काळु । जव न दिसे मी अतुर्बळु । सुखाचा कीर निखिळु । रासिवा मीचि ॥356॥
अतुल पराक्रमी जो मी, त्या मला पाहिले नाही तोंवरच काळाच्या सामर्थ्याची प्रतिष्ठा ! अरे, सर्व सुखांची मी केवळ रास आहे. 56
आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया ।
यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः ॥16. 15॥
357-16
कुबेरु आथिला होये । परी तो नेणे माझी सोये । संपत्ती मजसम नव्हे । श्रीनाथाही ॥357॥
कुबेर श्रीमंत असे म्हणतात खरे; पण त्याला माझी बरोबरी येणार नाही; श्रीविष्णू ही माझ्याइतका श्रीमंत नाहीं ! 57
358-16
माझिया कुळाचा उजाळू । का जातिगोतांचा मेळू । पाहता ब्रह्माही हळू । उणाचि दिसे ॥358॥
माझ्या कुळाचा नांवलौकिक व आप्तेष्टांचा समुदाय पहाता, ब्रह्मदेवालाही ती सर येणार नाही; 58
359-16
म्हणौनि मिरविती नांवे । वाया ईश्वरादि आघवे । नाही मजसी सरी पावे । ऐसे कोण्ही ॥359॥
म्हणून ईश्वरादिकांची थोरवी लोक गातात ती व्यर्थच होय; माझा बरोबरी करील असे कोणीही नाही. 59
360-16
आता लोपला अभिचारु । तया करीन मी जीर्णोद्धारु । प्रतिष्ठीन परमारु । यागवरी ॥360॥
सांप्रत अभिचार (जारणमारण) मंत्राचा लोप झाला आहे त्याचा मी जीर्णोद्धार करीन व लोकाचा उच्छेद करणारे याग त्यांचे अनुष्ठान करीन. 360
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
361-16
माते गाती वानिती । नटनाचे रिझविती । तया देईन मागती । ते ते वस्तु ॥361॥
माझे स्तुतिस्तोत्र गातील, माझे नटनाचादिकांनी रंजन करितील, त्यांचे इच्छित ते ते त्यांना देईन. 61
362-16
माजिरा अन्नपानी । प्रमदांच्या आलिंगनी । मी होईन त्रिभुवनी । आनंदाकारु ॥362॥
अन्नपानादिकांनी मत्त होऊन तरुणींच्या भोगालिंगनादिकांनी मी जगतांत आनंदरूप होऊन राहीन. 62
363-16
काय बहु सांगो ऐसे । ते आसुरीप्रकृती पिसे । तुरंबिती असोसे । गगनौळे तिये ॥363॥
आसुरी संपत्तीने पिसे झालेले ते लोक असे काय काय बरळतात म्हणून सांगावे ? अरे, गगनकुसुमांचा वास घेण्यासारख्या गोष्टींचे मनोरे ते रचीत असतात. 63
अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः ।
प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ॥16. 16॥
364-16
ज्वराचेनि आटोपे । रोगी भलतैसे जल्पे । चावळती संकल्पे । जाण ते तैसे ॥364॥
तापाच्या भरात रोगी वाटेल ते जसे बरळतो, त्याप्रमाणे, हे लोक मुखाने वाटेल ते संकल्प बरळत असतात असे समज. 64
365-16
अज्ञान आतुले धुळी । म्हणौनि आशा वाहटुळी । भोवंडीजती अंतराळी । मनोरथांच्या ॥365॥
यांच्या आशेच्या वावटळीने (माट्या) चित्तांतील अज्ञानरूप धुळीचे मनोराज्यरूप स्तंभ आकाशात गरगर फिरत असतात. 65
366-16
। का समुद्रोर्मी अभंग । तैसे कामिती अनेग । अखंड काम ॥366॥
आषाढांत ढगावर ढग यावे, किंवा समुद्राच्या लाटांना जसा खंड नसतो, त्याप्रमाणे त्यांच्या वैषयिक इच्छांची अखंड रांग चालू असते. 66
367-16
मग पै कामनाचि तया । जीवी जाल्या वेलरिया । वोरपिली कांटिया । कमळे जैसी ॥367॥
मग मनोरथरूपी वेलींचे जाळे त्यांच्या चित्तांत पसरल्यावर, कांटयावरून जशी कमळे ओढावीं. 67
368-16
का पाषाणाचिया माथा । हांडी फुटली पार्था । जीवी तैसे सर्वथा । कुटके जाले ॥368॥
किंवा दगडावर पडून मातीच्या हांडीचे शतशः तुकडे व्हावे, त्याप्रमाणे, अर्जुना, त्यांच्या मनोरथांची दशा होते, 68
369-16
तेव्हा चढतिये रजनी । तमाची होय पुरवणी । तैसा मोहो अंतःकरणी । वाढोचि लागे ॥369॥
त्यायोगे, रात्रीच्या वाढीबरोबर जसा अंधकारही वाढतो, तसा, त्यांच्या अंतःकरणात मोह वाढत जातो. 69
370-16
आणि वाढे जव जव मोहो । तव तव विषयी रोहो । विषय तेथ ठावो । पातकासी ॥370॥
आणि जसा जसा मोह वाढेल तशी तशी वैषयिक इच्छा वाढत जाते; आणि विषय म्हटले की, पातकाचे मूळ कारणच होय. 370
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
371-16
पापे आपलेनि थांवे । जव करिती मेळावे । तव जिताचि आघवे । येती नरका ॥371॥
पापांचा जोर होत होत ती जशी वाढतील तसा त्यास (आसुरी लोकास) जीवंतपणींच नरकयातनांचा भोग घडतो. 71
372-16
म्हणौनि गा सुमती । जे कुमनोरथा पाळिती । ते आसुर येती वस्ती । तया ठाया ॥372॥
म्हणून, अर्जुना, ज्यांच्या चित्तांत कुवासना नांदतात ते असुर लोक त्या ठिकाणी जन्माला येतात. 72
373-16
जेथ असिपत्रतरुवर । खदिरांगाराचे डोंगर । तातला तेली सागर । उतताती ॥373॥
जेथील वृक्षांची तलवारी-प्रमाणे तीक्ष्ण धारेचे पाने असतात, खैराच्या इंगळाचे डोंगर व तापलेल्या तेलाचे समुद्र उसळत असतात. 73
374-16
जेथ यातनांची श्रेणी । हे नित्य नवी यमजाचणी । पडती तिये दारुणी । नरकलोकी ॥374॥
जेणे यातनांना खंड नसून नित्य नवी यमजाचणी असते अशा घोर नरकलोकींचा वास त्यास घडतो. 74
375-16
ऐसे नरकाचिये शेले । भागी जे जे जन्मले । तेही देखो भुलले । यजिती यागी ॥375॥
असे शेलक्या नरक भोगाचे अधिकारी जे जे जन्माला येतात तेही, पाहू गेले असता, यज्त्रयागादिकांच्या भरीस भरतात. 75
दिवस २६७ वा. २४, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३१९३ ते ३२०४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३१९३
भक्तीचें वर्म जयाचिये हातीं ।
तया घरी शांति दया ॥१॥
अष्टमहासिद्धि वोळंगती द्वारीं ।
न वजती दुरी दवडितां॥२॥
तेथें दुष्ट गुण न मिळे नि:शेष ।
चैतन्याचा वास जयामाजी ॥३॥
संतुष्ट हे चित्त सदा सर्वकाळ ।
तुटली हळहळ त्रिगुणांची ॥४॥
तुका म्हणे त्याचा देव सर्व भार ।
चालवी कामार होऊनीयां ॥५॥
अर्थ :-
भक्तीचे वर्म ज्याचे हाती लागले आहे, त्याच्या घरी शांती, दया, क्षमा यांचा निवास असतो. अष्टमहासिद्धी त्यांच्या दारी सेवा करतात. त्यांना हाकलून दिले तरी त्या जात नाहीत.ज्याच्या चित्तात चैतन्याचा म्हणजेच श्रीहरीचा वास असतो, तेथे दुष्ट गुणांना थारा मिळत नाही. त्याचे चित्त सदासर्वकाळ संतुष्ट असते. त्याच्या वृत्तीत ब्राम्हचैतन्याचा वास असतो. (सत्त्व,रज ,तम) त्रिगुणांची हळहळ संपलेली असते. तुकाराम महाराज म्हणतात, देव त्याचा सेवक होऊन त्याचा सर्वतोपरी भार वाहतो
अभंग क्र. ३१९४
साच हा विठ्ठल साच हे करणे । संत जे वचने बोलियेले ॥१॥
साच ते स्वहित साच ते प्रचित । साच वेद नीत सांगतील ॥२॥
तुका म्हणे घेती साच साच भावे । लटिके वर्म ठावे नाही त्यासी ॥३॥
अर्थ
एक विठ्ठलच खरा आहे आणि त्याची भक्ती करणे हेच खरे आहे असे संतांचे वचन देखील खरेच आहे. वेदाने जी धर्मनीती सांगितली आहे ती देखील खरी आहे व त्याप्रमाणे जे वागतात त्यांचे स्वहित होते आणि त्यांना प्रचिती म्हणजे आत्मसाक्षात्कार देखील होतो हे देखील खरेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “जे खरे भक्त भाविक आहेत तेच संतांचे खरे वचन मान्य करतात अगदी भक्तीभावपूर्वक मान्य करतात आणि जे खोटे वागणारे आहेत अज्ञानी आहेत त्यांना संतांच्या वचनाचे खरे वर्मच ठाऊक नसल्यामुळे ते त्यांचा स्वीकार करत नाहीत. ”
3:24
अभंग क्र. ३१९५
संगे वाढे सीण न घडे भजन । त्रिविध हे जन बहु देवा ॥१॥
याचि दुःखे या जनाचा काटाळा । दिसताती डोळा नानाछंद ॥धृपद॥
एकविध भाव राहावया ठाव । नेदी हा संदेह राहो चित्ती ॥२॥
शब्दज्ञानी हित नेणती आपुले । आणीक देखिले नावडे त्या ॥३॥
तुका म्हणे आता एकलेचि भले । बैसोनि उगले राहावे ते ॥४॥
अर्थ
देवा जगामध्ये तीन गुणाचे लोक आहेत. त्यामध्ये रज आणि तम लोक संसाराकडे जास्त करुन प्रवृत्त होतात. त्यामुळे त्यांच्या जीवनात दु:ख वाढत चालते आणि सत्व रजाचे हरिभक्त असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये संतसंगतीने भजन वाढत चालते. त्यामुळे देवा मला आता संगतीचाच कंटाळा आला आहे हे लोक विविध प्रकारच्या छंदामध्ये अगदी रंगून गेले आहेत हे मला माझ्या डोळयांनीच दिसते आहे. त्यामुळे संदेह निर्माण होतो व संदेह निर्माण झाला की चित्तामध्ये जो एकनिष्ठ भक्तीभाव राहीला पाहिजे त्या एकनिष्ठ भक्तीभावालाच चित्तामध्ये राहण्यासाठी ठिकाण राहत नाही. जे लोक शब्दज्ञानी आहेत त्यांना आपले हित कशात आहे हेच कळत नाही तर ते दुसऱ्याला ज्ञान वाटून दुसऱ्याचे काय कल्याण करणार आहेत. त्यामुळे असल्याचे तोंड देखील पाहाणे मला आवडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “आता एकातामध्ये जावून राहावे व तेथेच नामस्मरण् करावे हेच चांगले. ”
3:24
अभंग क्र. ३१९६
पुण्यपापा ठाव नाही सुखदुःखा । हानि लाभ शंका नासलिया ॥१॥
जिंता मरण आले आप पर गेले । मूळ छेदियेले संसाराचे ॥धृपद॥
अधिकार जाती वर्णधर्मयाती । ठाव नाही सत्यअसत्याशी ॥२॥
जन वन भिन्न आचेत चळण । नाही दुजेपण ठाव यासी ॥३॥
तुका म्हणे देह वाहिला विठ्ठली । तेव्हाच घडली सर्व पूजा ॥४॥
अर्थ
माझ्या ठिकाणी देहभावच राहिला नाही देहाभिमान माझा नष्ट झाला आहे त्यामुळे पाप आणि पुण्य सुख आणि दु:ख यांना तर ठावठिकाणा राहिला नाहीच व त्यामुळे लाभ आणि हानी ही शंका देखील नाहीसी झाली आहे. देहाभिमान देहभाव माझा नाहीसा झाला त्यामुळे जिवंतपणीच मला मरण आले आणि आपला व परका हा भेदभाव नाहीसा झाला व संसाराचे जे मूळ अज्ञान त्याचाच मी छेद केला आहे. माझा सर्व देहाभिमानच नाहीसा झाला त्यामुळे अधिकार जात, वर्ण, धर्म, यती, कूळ, सत्य, असत्य यांना माझ्या ठिकाणी आधारच राहिलेला नाही. आता जन वन चेतन आणि जडत्व अशा भिन्नपणा असा भेद या सर्वाचा आधार राहिलाच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्यावेळी मी माझा देह विठ्ठलाला अर्पण केला त्याचवेळी विठ्ठलाची सर्व प्रकारे षोडोशोपचार पूजा माझ्याकडून घडली आहे. ”
3:24
अभंग क्र. ३१९७
संकोचितो जीव महत्वाच्या भारे । दासत्वचि बरे बहु वाटे ॥१॥
कळावी जी माझी आवडी हे संता । देणे तरि आता हेचि द्यावे ॥धृपद॥
तुमचे चरण पावविलो सेवा । म्हणउनि हेवा हाचि करी ॥२॥
विनवुनी तुका वंदितो चरण । लेखा रजरेण चरणींचा ॥३॥
अर्थ
हे संतजनहो मला मोठेपणा मिळाला की त्या मोठेपणाचा ओझ्याने माझा जीव संकुचित होतो त्यापेक्षा तुमचे दास्यत्वच मला खूप आवडते. त्यामुळे हे संतजनहो तुम्ही माझी आवड जाणून घ्यावी आणि तुम्हाला मला काही दयायचेच असेल तर एवढे तुम्ही मला दयावे, की तुमची तुमच्या चरणांची एकदा की तुमच्या चरणांची सेवा मी केली की तुमच्या चरणांची प्राप्ती मला होईल आणि हाच हेवा मी करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “एवढी विनंती करुन मी तुमच्या चरणांना वंदन करतो आणि तुमच्या चरणाचा मी एक रज:कण आहे एवढेच तुम्ही माना. ”
3:25
अभंग क्र. ३१९८
देव कैचा तया दुरी । भाका बरी करुणा ॥१॥
आळवित्या न लगे घर । माय जाणे रे भातुके ॥धृपद॥
नावे तरी ज्याचा भार । पैल पार जवळी त्या ॥२॥
आता परदेशी तुका । झाला लोकांवेगळा ॥३॥
अर्थ
देवाला वरच्यावर सारखी करुणा भाकत राहा मग तो तुमच्यापासून दूर कसा राहील ? विठाबाई माऊलीला प्रेमाने आळविले की मग तुम्हाला कोणाचीही आधाराची गरज लागणार नाही. कारण ती तुमच्या तहान भूकेची देखील चिंता वाहाते आणि तुमच्या खाण्यापिण्याची देखील व्यवस्था ती करतेच. ज्याने आपला सर्वस्व भार नामरुपी नौकेवर टाकला त्याला भवनदीचे पैलतीर पार करण्यास काहीच अडचण नाही कारण पलीकडचे तीर त्याच्यासाठी फारच जवळ असते. तुकाराम महाराज म्हणतात, “मी माझा सर्वभार नामावर टाकला आहे व परदेशी झालो आहे आणि सर्व लोकापेक्षा वेगळा होऊन राहिलो आहे. ”
3:25
अभंग क्र. ३१९९
भक्ती ज्याची थोडी । पूर्ण विषयांची गोडी ॥१॥
तो नरचि नव्हे पाही । खर जाणावा तो देही ॥धृपद॥
भजन पूजन ही नेणे । काय स्वरूपासी जाणे ॥२॥
तुका म्हणे त्याला । भोवंडून बाहेर घाला ॥३॥
अर्थ
ज्याच्या अंत:करणामध्ये भक्ती थोडी परंतू विषयाची पूर्ण गोडी आहे, त्याला मनुष्य म्हणून पाहूच नका तर तो मनुष्यरुपाने आलेला गाढवच आहे असे जाणावे. अहो जो भजन पूजनही जाणत नाही ज्याला भजन पूजन माहित नाही तो हरीच्या मूळस्वरुपाला काय जाणणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “जर तुमच्या घरी वरवर भक्तीचे सोंग दाखवणारा आणि संपूर्ण अंत:करणात विषयाची आसक्ती ठेवणारा असा कोणी मनुष्य आला तर तुम्ही त्याला गोल गोल फिरवा आणि बाहेर हाकला. ”
3:25
अभंग क्र. ३२००
संतांनी सरता केलो तैसेपरी । चंदनी ते बोरी व्यापियेली ॥१॥
गुण दोष याती न विचारिता काही । ठाव दिला पायी आपुलिया ॥२॥
तुका म्हणे आले समर्थाच्या मना । तरि होय राणा रंक त्याचा ॥३॥
अर्थ
चंदनाच्या झाडाजवळ जर बोरीचे झाड असेल तर चंदनाच्या सुगंधाने ते बोरीचे झाडही व्यापून जाते त्याप्रमाणे संतांच्या संगतीमध्ये मी राहिलो आणि संतांनी देखील जगामध्ये मला त्यांच्यासारखेच सरते केले. संतांनी माझ्या गुण, दोष, जात याचा काहीही विचार केला नाही त्यांनी मला त्यांच्या पायाच्या ठिकाणी आश्रय दिला आहे ठावठिकाणा दिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “जर समर्थाच्या मनात आले तर दरिद्री मनुष्याचा देखील राजा होतो. ”
3:25
अभंग क्र. ३२०१
अभंग क्र. ३२०१
चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान । अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण ॥१॥
हेचि एक तुम्हा देवा मागणे दातारा । उचित ते करा माझा भाव जाणूनि ॥धृपद॥
खुंटली जाणींव माझे बोलणे आता । कळो यावी तैसी करावी बाळकाची चिंता ॥२॥
तुका म्हणे आता नको देऊ अंतर । न कळे पुढे काय बोलो विचार ॥३॥
अर्थ
देवा माझ्या चित्तामध्ये तुझे पाय, डोळयामध्ये तुझे रुपाचे ध्यान आणि मुखामध्ये अखंड तुझे नाम व तुझे गुणगान मी अखंडपणे वर्णन करावे. हे उदार दातारा देवा एवढे एकच मागणे माझे तुमच्याजवळ आहे माझ्या अंत:करणातील भक्तीभाव जाणून जे उचित आहे जे योग्य आहे तेच तुम्ही करा. देवा माझे नेणतेपण व बोलणे आता खुंटले आहे त्यामुळे तुम्हाला जसे कळेल तसे या बाळाची चिंता तुम्ही करा. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा त्यामुळे आता तुम्ही मला तुमच्यापासून अंतर देऊ नका तुमच्यापुढे मला कोणते विचार बोलावेत हेच कळत नाही. ”
3:25
अभंग क्र. ३२०२
संतांच्या पादुका घेईन मोचे खांदी । हाती टाळ दिंडी नाचेन पुढे ॥१॥
भजनविधी नेणे साधन उपाय । सकळ सिद्धी पाय हरीदासांचे ॥धृपद॥
ध्यान गति मति आसन समाधि । हरीनाम गोविंदी प्रेमसुख ॥२॥
नेणता निर्लज्ज नेणे नादभेद । सुखे हा गोविंद गाऊ गीती ॥३॥
सर्व जोडी मज गोत आणि वित्त । तुका म्हणे संतमहंत पाय ॥४॥
अर्थ
मी संतांच्या पादूका व त्यांच्या वहाणा खांदयावर घेईन व त्यांच्यापुढे हातात टाळ व वीणा घेऊन नाचेन. देवाचे भजन देवाची विधीवत पूजा व इतर साधने उपाय हे मी काहीही जाणत नाहीत माझ्यासाठी तर हरीदासांचे पायच सर्व प्रकारचे साधने आहेत. ध्यान, गती, मती, आसन, समाधी हे मला काहीही कळत नाही परंतू हरी आणि गोविंद या नामाने मला सुख आणि प्रेम दोन्ही मिळते. मला नाद भेद ताल स्वर हे काहीही कळत नाही निर्लज्ज होऊन सुखाने आहे त्या सुरामध्ये गोविंदाचे आम्ही गीत गाऊ. तुकाराम महाराज म्हणतात, “संत महंत यांचे पायच माझ्यासाठी सर्व प्रकारचे लाभ आहेत तेच माझ्यासाठी आप्त इष्ट नातेवाईक आहेत व तेच माझ्यासाठी धन वित्त आहेत. ”
3:26
अभंग क्र. ३२०३
हरीजना प्राण विकली हे काया । अंकिला मी तया घरी झालो ॥१॥
म्हणिये सत्वर करीन सांगता । घेईन मी देता शेष त्यांचे ॥धृपद॥
आस करूनिया राहेन अंगणी । उच्छीष्ठाची धणी घ्यावयासी ॥२॥
चालता ते मार्गी चरणीचे रज । उडती सहज घेईन आता ॥३॥
दुरि त्यापासूनि न वजे दवडिता । तुका म्हणे लाता घेईन अंगे ॥४॥
अर्थ
जेवढे काही हरीजन भक्त आहेत मी त्यांना माझे प्राण व शरीर विकले आहे व त्यांच्या घरी मी त्यांचा अंकीत दास म्हणून झालो आहे. हरीजन मला जे काही काम सांगतील जी काही आज्ञा देतील ती मी तत्परतेने पूर्ण करीन आणि त्यांचे उच्चिष्ट राहिलेले त्यांनी मला दिले तरच मी ते घेईन. त्यांचे उच्चिष्ट मला तृप्ती होईपर्यंत सेवन करण्यास मिळो अशी अपेक्षा धरुन मी त्यांच्या अंगणात राहीन. ते हरीजन जेथे कोठे ज्या मार्गाने चालत असतील त्या मार्गाने मी त्यांच्या मागेच चालेन कारण त्यांच्या चरणाचे रज उडतील व ते मी अगदी सहजरित्या माझ्या अंगावर सुखाने घेईन. तुकाराम महाराज म्हणतात, “जरी हरीजनांनी मला लाथा मारुन दूर त्यांच्यापासून लावले तरी देखील मी त्यांच्यापासून दूर जाणार नाही त्यांच्या लाथा देखील माझ्या अंगावर मी सुखाने घेईन. ”
3:26
अभंग क्र. ३२०४
पुण्य फळले बहुता दिवसा । भाग्यउदयाचा ठसा । झालो सन्मुख तो कैसा । संतचरण पावलो ॥१॥
आजि फिटले माझे कोडे । भवदुःखाचे साकडे । कोंदटले पुढे । परब्रम्ह सावळे ॥धृपद॥
आळिंगने संताचिया । दिव्य झाली माझी काया । मस्तक हे पाया । वरी त्यांच्या ठेवितो ॥२॥
तुका म्हणे धन्य झालो । सुखे संताचिया धालो । लोटांगणी आलो । पुढे भार देखोनी ॥३॥
अर्थ
आज माझे खूप दिवसाचे पुण्य फळाला आलेले आहे आणि माझ्या भाग्याचा उदय झाल्याचा मला दिसत आहे. पहा मी या संतांच्या समोर कसा उभा राहिलो आहे आज मला संतचरण प्राप्त झाले आहे. आज माझे सर्व कोडे आणि भवदु:खाचे साकडे नाहीसे झाले आहे. आणि माझ्यापुढे संत उभे आहेत परंतू मला ते सावळे परब्रम्हच दिसत आहे व सर्वत्रच ते भरलेलेही दिसत आहेत. संतांच्या आलिंगनाने माझे शरीर परम पवित्र झाले असून संतांनी मला आलिंगन दिले व माझी काया म्हणजे शरीर दिव्य झाले. त्यांच्या पायावर मी मस्तक ठेवतो. तुकाराम महाराज म्हणतात, “मी आज धन्य झालो कारण मला संतांचे दर्शन झाले व संत दर्शनाच्या सुखाने मी तृप्त झालो. आणि पुढे संतांचा समुदाय पाहून मी लोटांगण घेत त्यांच्यापुढे आलो आहे. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















