आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२० सप्टेंबर, दिवस २६३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी २५१ ते २७५ + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३१४५ ते ३१५६
“२० सप्टेंबर ” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 20 September
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २० सप्टेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३१४५ ते ३१५६ चे पारायण आपण करणार आहोत.
२० सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी २५१ ते २७५ ,
251-16
तैसे पापपुण्याचे खिचटे । करोनि खाता बुद्धिचेष्टे । कडु मधुर न वाटे । ऐसी जे दशा ॥251॥
त्याप्रमाणेपापपुण्य इत्यादि भेदाभेद न मानता त्याची खिचडी (एकत्र) करून ज्याच्या सर्व क्रिया चालतात, व ज्याला इष्टानिष्ट भोग अशी काही कल्पनाही नसते, अशी जी स्थिति, 51
252-13
तिये नाम अज्ञान । या बोला नाही आन । एवं साही दोषांचे चिन्ह । सांगितले ॥252॥
त्याला अज्ञान असे म्हणावे ह्यात शंका नाहीं; ह्याप्रमाणे सहाही दोषांची लक्षणे आम्ही सांगितली. 52
253-16
इहीच साही दोषांगी । हे आसुरी संपत्ति दाटुगी । जैसे थोर विषय सुभगे अंगी । अंग साने ॥253॥
हे सहाच दोष खरे, पण, त्यांनीच ती फार बलिष्ठ झाली आहे. (सव्वीस गुण असलेल्या देवी संपत्तीपेक्षांही) (कारण पराक्रम संख्येवर अगर आकारावर नसतो). भुजंगी म्हणजे नागीण अंगाने दोरीप्रमाणे लहान असली तरी तिचे विष सर्व विषांत श्रेष्ठ असते. 53
254-16
का तिघा वन्हीच्या पांती । पाहता थोडे ठाय गमती । परी विश्वही प्राणाहुती । करू न पुरे ॥254॥
तीन प्रकारचे अग्नि (प्रलयाग्नि, विद्युदग्नि, वडवाग्नि ) ही संख्या लहान खरी, पण त्यांच्या प्राणाहुतीला विश्वही पुरे पडत नाही. 54
255-16
धातयाही गेलिया शरण । त्रिदोषी न चुके मरण । तया तिहीची दुणी जाण । साही दोष हे ॥255॥
त्रिदोष झाल्यावर ब्रह्मदेवाला शरण गेल्यानेही मरण चुकत नाही; हे सहा दोष म्हणजे त्या. तीन दोषांची सर्व बाजूनी दुप्पट आहे असे समज. 55
256-16
इही साही दोषी संपूर्णी । जाली इयेचि उभारणी । म्हणौनि आसुरी उणी । संपदा नव्हे ॥256॥
ह्या संपूर्ण सहा दोषांनी आसुरी संपत्तीची उभारणी झाली असली म्हणून काही ती आसुरी संपत्ति पराक्रमांत कमी नाही. 56
257-16
परी क्रूरग्रहांची जैसी । मांदी मिळे एकेचि राशी । का येती निंदकापासी । अशेष पापे ॥257॥
किंवा सर्व पापग्रहांची एकाच राशीवर एकेवेळी दृष्टि यावी, किंवा निंदकापाशी (पदरात) जशी अशेष पापे येतात. 57
258-16
मरणाराचे आंग । पडिघाती अवघेचि रोग । का कुमुहूर्ती दुर्योग । एकवटती ॥258॥
मरणाराच्या शरीराला जसे सर्व रोग व्यापतात किंवा कुमुहूर्तावर सर्वच कुयोग एकत्र येतात. 58
259-16
विश्वासला आतुडवीजे चोरा । शिणला सुइजे महापुरा । तैसे दोषी इही नरा । अनिष्ट कीजे ॥259॥
चोराला त्याच्यावर विश्वास ठेवणारा मनुष्य सापडावा, शिणलेला मनुष्य महापुरांत लोटावा, त्याप्रमाणे, ह्या सहा दोषांनी जीवाचे अत्यंत अहित होते. 59
260-16
का आयुष्य जातिये वेळे । शेळिये सातवेउळी मिळे । तैसे साही दोष सगळे । जोडती तया ॥260॥
किंवा मरण ओढवले म्हणजे शेळीला जशी सात नाग्यांची इंगळी चावावी तसे हे साही दोष ज्याचे वाटोळे व्हावयाचे आहे त्याच्या वाट्यास येतात. 260
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
261-16
मोक्षमार्गाकडे । जै यांचा आंबुखा पडे । तै न निघे म्हणौनि बुडे । संसारी तो ॥261॥
मोक्ष म्हणजे काय ह्याचे ह्याला मुळीच ज्ञान नसल्यामुळे, जो अखंड संसारसागरांत बुडलेलाच असतो. 61
262-16
अधमा योनींच्या पाउटी । उतरत जो किरीटी । स्थावरांही तळवटी । बैसणे घे ॥262॥
आणि अर्जुना, एकापेक्ष एक नीच योनीच्या क्रमाने घसरत घसरत जो अखेर स्थावर योनींतीलही शेवटची पायरी गांठतो. 62
263-16
हे असो तयाच्या ठायी । मिळोनि साही दोषी इही । आसुरी संपत्ति पाही । वाढविजे ॥263॥
हे असो; हे सहाही दोष एकत्र होऊन त्याच्या ठिकाणी ह्या आसुरी संपत्तीची अत्यंत वाढ करितात. 63
264-16
ऐसिया या दोनी । संपदा प्रसिद्धा जनी । सांगितलिया चिन्ही । वेगळाल्या ॥264॥
अशा जगात प्रसिद्ध असलेल्या ह्या दोन संपत्तींची लक्षणे आम्ही वेगवेगळाली सांगितली. 64
दैवी संपद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता ।
मा शुचः संपदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव ॥16. 5॥
265-16
इया दोन्हीमाजी पहिली । दैवी जे म्हणितली । ते मोक्षसूर्ये पाहली । उखाचि जाण ॥265॥
ह्या दोन संपत्तीपैकी पहिली जी दैवसंपत्ति, तो मोक्षसूर्याचा उषःकालच समज. 65
266-16
येरी जे दुसरी । संपत्ति का आसुरी । ते मोहलोहाची खरी । सांखळी जीवा ॥266॥
दुसरी जी आसुरी संपत्ति, ती जीवाला बद्ध करणारी मोहरूपी लोहबेडीच होय. 66
267-16
परी हे आइकोनि झणे । भय घेसी हो मने । काय रात्रीचा दिने । धाकु धरिजे ॥267॥
पण हे ऐकून तु कदाचित् मनात कचरशील हो ! अरे, रात्र गांठील अशी सूर्याला कधी भीति पडली आहे काय ? 67
268-16
हे आसुरी संपत्ति तया । बंधालागी धनंजया । जो साही दोषा यया । आश्रयो होय ॥268॥
जो ह्या सहाही दोषांचे आश्रयस्थान असतो, त्यालाच ही आसुरी संपत्ति बंधनाला कारण होते. 68
269-16
तू तव पांडवा । सांगितलेया दैवा । गुणनिधी बरवा । जन्मलासी ॥269॥
अर्जुना, तु तर वर सांगितलेल्या दैवी संपत्तीची जणू खाणच जन्माला आला आहेस. 69
270-16
म्हणौनि पार्था तू या । दैवी संपत्ती स्वामिया । होऊनि यावे उवाया । कैवल्याचिया ॥270॥
म्हणून पार्था, ह्या दैवी संपत्तीचा स्वामी होऊन कैवल्यरूप सुखाचा धनी हो. 270
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च ।
दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे श्रुणु ॥16. 6॥
271-16
आणि दैवा आसुरा । संपत्तिवंता नरा । अनादिसिद्ध उजगरा । राहाटीचा आहे ॥271॥
अरे, ह्या दैवी आणि आसुरी संपत्तींनी युक्त असलेल्या मनुष्यांचे जे अनादिसिद्ध असे रुळलेले मार्ग आहेत. 71
272-16
जैसे रात्रीच्या अवसरी । व्यापारिजे निशाचरी । दिवसा सुव्यवहारी । मनुष्यादिकी ॥272॥
ज्याप्रमाणे, निशाचरादिकांचे व्यवहार रात्रीच्या वेळी चालतात व दिवसा मनुष्यादिकांचे सरळ व्यापार सुरू असतात. 72
273-16
तैसिया आपुलालिया राहाटी । वर्तती दोन्ही सृष्टी । दैवी आणि किरीटी । आसुरी येथ ॥273॥
त्याप्रमाणे, पार्था, या जगात आपापल्या अधिकाराप्रमाणे दैवी व असुरी संपत्तीचे लोक ठरलेल्या भिन्न भिन्न मार्गानी रहाटत असतात. 73
274-16
तेवीचि विस्तारूनि दैवी । ज्ञानकथनादि प्रस्तावी । मागील ग्रंथी बरवी । सांगितली ॥274॥
त्याच प्रमाणे, मागे ज्ञानकथनप्रसंग (9 अध्यायात ) दैवी संपत्तीचे विस्ताराने आम्ही वर्णन केले आहे. 74
275-16
आता आसुरी जे सृष्टी । तेथिची उपलऊ गोठी । अवधानाची दिठी । दे पा निकी ॥275॥
आता जी आसुरीसृष्टि किंवा संपत्ति तिचे तुला अधिक कथन करितों; तिकडे नीट अवधान ठेव. 75
दिवस २६३ वा. २०, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३१४५ ते ३१५६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३१४५
लाभ पुढे करी । घात नारायण वारी ॥१॥
ऐसी भक्ताची माउली । करी कृपेची साउली ॥धृपद॥
माय बाळकासी । जीव भाव वेची तैसी ॥२॥
तुका म्हणे नाड । नाही शरणागता आड ॥३॥
अर्थ
अहो हा नारायण आपल्या भक्तांच्या पुढे लाभ करतो आणि त्या भक्तांवर येणारे घातपात तो स्वत: निवारण करतो. अशी ही भक्तांची माऊली आहे ती नेहमी तिच्या भक्तांवर कृपेची सावली करत असते. अहो ज्याप्रमाणे आई आपल्या मुलासाठी आपला जीवभाव देखील समर्पन करण्यास तयार असते अगदी त्याप्रमाणेच हा नारायण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “जे नारायणाला एकनिष्ठतेने शरण जातात त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही व त्यांची कोणतीही इच्छा अपूर्ण राहात नाही. ”
3:09
अभंग क्र. ३१४६
तुजविणं काही । स्थिर राहे ऐसे नाही ॥१॥
कळो आले बहुता रीती । पांडुरंगा माझ्या चित्ती ॥धृपद॥
मोकलोनी आस । सर्वभावे झालो दास ॥२॥
तुका म्हणे तूचि खरा । येर वाउगा पसारा ॥३॥
अर्थ
हे पाडूरंगा तुझ्यावाचून या त्रिभुवनामध्ये काही टिकेल असे दुसरे नाही. हे माझ्या चित्ताला विविध प्रकारच्या अनुभवाने कळून आले आहे. देवा मी सर्व प्रकारच्या इच्छा आशा अपेक्षा आस यांचा त्याग करुन सर्वभावे तुझा दास झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा सर्वामध्ये तूच एक खरा आहेस बाकी सर्व व्यर्थ पसारा आहे. ”
3:09
अभंग क्र. ३१४७
खोंकरी आधन होय पाकसिद्धी । हे तो घडो कधी शकेचि ना ॥१॥
खापराचे अंगी घासिता परिस । न पालटे कीस काढिलिया ॥२॥
पालथे घागरी रिचविता जळ । तुका म्हणे खळ तैसे कथे ॥३॥
अर्थ
खापराच्या फुटक्या मडक्यामध्ये पाण्याला आधन येईल किंवा पूर्ण स्वयंपाक त्याच्यामध्ये होईल असे कधीही घडू शकणार नाही. खापराच्या अंगावर कितीही वेळा परीस घासला आणि शेवटी त्या खापराचा कीस काढून पाहिला तर त्यामध्ये काहीही बदल झालेला दिसणार नाही त्याचे सोने झालेले आपणास दिसणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “पालथ्या घागरीवर आपण कितीही पाणी टाकले तरी ती घागर कधीही भरणार नाही त्याप्रमाणे दुष्ट मनुष्य कितीही हरीकथेमध्ये येऊन बसला तरी त्याच्या चित्तामध्ये काहीच बदल होणार नाही. ”
3:09
अभंग क्र. ३१४८
नागले देखोनि चांगले बोले । आपुले वेचूनि त्याजपुढे खुले ॥१॥
अधमाचे ओंगळ गुण । उचित नेणे तो धर्म कोण ॥धृपद॥
आर्तभूता न घली पाण्याचा चुळ । न मगे त्यासी घाली साखर गुळ ॥२॥
एकासी धड न बोले वाचा । एकासी म्हणे मी तुझे बांदीचा ॥३॥
एका देखोनि लपवी भाकरी । एकासी आड पडोनि होकरी ॥४॥
तुका म्हणे ते गाढवपशु । लाभेंविण केला आयुष्यनाशु ॥५॥
अर्थ
दुष्ट मनुष्याची एक सवय असते ती म्हणजे सुशिक्षित श्रीमंत शहरवासी अधिकारी पाहिला की त्याच्याशी तो अगदी चांगले बोलतो आपले स्वत:चे पैसे खर्च करुन त्याची व्यवस्था करतो व त्यांच्यापुढे खुलून मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलतो. असा तर या अधम लोकाचा वाईट गुण असतो उचित धर्म कोणता आहे हेच ते जाणत नाहीत. ज्याला खरच पाण्याची गरज आहे त्या माणसाला हे दुष्ट मनुष्य चूळकाभर देखील पाणी देणार नाही परंतू श्रीमंत लोकांना न मागता साखर गूळाचे भोजन घालतो. सामान्य मनुष्याबरोबर आपल्या मुखाने धड बोलत नाही चांगले बोलत नाही आणि श्रीमंत मनुष्याला म्हणतो की मी तुमचा बांधील आहे. असे हे दुष्ट मनुष्य एखादया गरीबाला पाहून भाकरी लपवून ठेवतात आणि एखादयापासून फायदा आहे किंवा एखादया श्रीमंत व्यक्तीपुढे पार आडवे पडून आज जेवणासाठी आमच्या घरी यायचे असे आग्रह करतो आणि तो जे मागेल त्याला हो करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “असे हे मनुष्य मनुष्य नसून गाढव पशूच आहेत यांनी आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ तर करुन घेतलेला नसतोच परंतू ते व्यर्थ आयुष्याचा नाशच करुन घेतात. ”
3:09
अभंग क्र. ३१४९
पिंडपोशकाच्या जळो ज्ञानगोष्टी । झणी दृष्टिभेटी न हो त्याची ॥१॥
नाही संतचिन्ह उमटले अंगी । उपदेशालागी पात्र झाला ॥धृपद॥
पोहो नये कासे लावितो आणिका । म्हणावे त्या मूर्खा काय आता ॥२॥
सिणले ते गेले सिणलियापासी । झाली त्या दोघासी एक गति ॥३॥
तुका म्हणे अहो देवा दिनानाथा । दरुषण आता नको त्याचे ॥४॥
अर्थ
पिंडाचे पोषण करुन ज्ञानाच्या गोष्टी करणाऱ्या लोकांच्या ज्ञानासंबंधीच्या गोष्टीला आग लागो अशा लोकांच्या दृष्टीला चुकून सुध्दा भेट होऊ नये. अशा लोकांच्या अंगामध्ये कोणत्याही प्रकाराने संतांची चिन्हे उमटलेली नसतात परंतू मी इतरांना उपदेश करण्यासाठी पात्र झालो आहे असे ते समजत असतात. अहो या लोकांना कसे पाहावे हे देखील कळत नाही त्यांना नीट पाहाता देखील येत नाही आणि आपल्या स्वत:च्या कासेला दुसऱ्याला धरायला लावतो अशा मूर्खांना आता काय म्हणावे ? अहो एखादा त्रासलेला व्यक्ती दुसऱ्या त्रासलेल्या व्यक्तीचे समाधान करण्यास त्याच्याजवळ गेला तर काय होईल दोघाची गती एकच होणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो देवा दीननाथा मला आता अशा मूर्खांचे दर्शन सुध्दा नको आहे. ”
3:10
अभंग क्र. ३१५०
संतचिन्हे लेउनि अंगी । भूषण मिरविती जगी ॥१॥
पडिले दुःखाचे सागरी । वहावले ते भवपुरी ॥धृपद॥
कामक्रोधलोभ चित्ती । वरीवरी दाविती विरक्ती ॥२॥
आशापाशी बांधोनि चित्त । म्हणती झालो आम्ही मुक्त ॥३॥
त्यांचे लागले संगती । झाली त्यासी तेचि गति ॥४॥
तुका म्हणे शब्दज्ञाने । जग नाडियेले तेणे ॥५॥
अर्थ
जे लोक संत चिन्हे म्हणजे बाह्य रंगाने वरवर माळ मुद्रा टिळे भगवे वस्त्र अंगावर घेऊन मिरवत असतात, असे लोक दु:खाच्या सागरामध्ये पडलेले असून भवनदीच्या महापूरामध्ये वाहून गेलेले आहेत. त्याच्या चित्तामध्ये काम क्रोध लोभ हे विकार असतात परंतू वरवर लोकांना आम्हाला वैराग्य झाले आहेत असे दाखवतात. यांचे चित्त खरे तर आशापाशाने बांधलेले असतात परंतू हे लोकांना सांगतात की आता आम्ही मुक्त झालो आहोत. आणि ज्या लोकांना या ढोंगी लोकांची संगती लाभते, त्या लोकांना देखील या ढोंगी लोकाप्रमाणेच अधोगती प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, “केवळ वरवर असणाऱ्या शब्दज्ञानाने या ढोंगी लोकांनी इतर लोकांना फसवलेले असते. ”
3:10
अभंग क्र. ३१५१
राम कृष्ण ऐसी उच्चारिता नामे । नाचेन मी प्रेमे संतांपुढे ॥१॥
काय घडेल ते घडो ये सेवटी । लाभ आणि तुटी देव जाणे ॥धृपद॥
चिंता मोह आशा ठेवीन निराळी । देईन हा बळी जीव पायी ॥२॥
तुका म्हणे काही उरो नेदी उरी । सांडीन हे थोरी ओवाळोनि ॥३॥
अर्थ
रामकृष्ण ही नामे मी माझ्या वाचेने उच्चारीन आणि संतापुढे प्रेमाने नाचेन. मग शेवटी काय घडेल ते घडो यापासून लाभ होईल की नुकसान होईल ते देवच जाणो. चिंता मोह आशा ही सर्व बाजूला ठेवून मी माझा जीव देवाच्या पायावर बळी देईन. तुकाराम महाराज म्हणतात, “मी माझ्याजवळ काहीही उरु देणार नाही काहीही राहू देणार नाही माझे मोठेपणा सर्व काही देवावरुन मी ओवाळून टाकीन. ”
3:10
अभंग क्र. ३१५२
का गा कोणी न म्हणे पंढरीची आई । बोलाविते पाही चाल नेटे ॥१॥
तेव्हा माझ्या मना होय समाधान । जाय सर्व शीण जन्मांतरिंचा ॥२॥
तुका म्हणे माझी होईल माउली । वोरसोनि घाली प्रेमपान्हा ॥३॥
अर्थ
मला कोणी असे का बरं म्हणत नाही की तुझी आई तुला पंढरीत बोलवित आहे ती तुझी वाट पाहात आहे चल लवकर. ज्यावेळी मला कोणी असे म्हणेन त्यावेळेस मला समाधान वाटेल आणि माझा जन्म जन्मांतरीचा शीण नाहीसा होईल. तुकाराम महाराज म्हणतात, “माझी आई विठाबाई आहे ती मला तिच्या प्रेमाचा पान्हा पाजेल. ”
3:10
अभंग क्र. ३१५३
वेद अनंत बोलिला । अर्थ इतुलाचि शोधिला ॥१॥
विठोबासी शरण जावे । निजनिष्ठा नाम गावे ॥धृपद॥
सकळशास्त्रांचा विचार । अंती इतुलाचि निर्धार ॥२॥
अठरापुराणी सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत ॥३॥
अर्थ
वेद अनंत विषया विषयी बोलला आहे परंतू शेवटी अर्थ एवढाच सांगितला आहे, की विठोबाला शरण जावे आणि एकनिष्ठेने, एकतत्वाने त्याचे नाम घ्यावे. सर्व शास्त्रांचा विचार करुन शेवटी एवढाच निर्धार केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आणि विठोबाला शरण जावे हाच सिध्दात अठरा पुराणांनी देखील सांगितलेला आहे. ”
3:10
अभंग क्र. ३१५४
नाही पाक होत उफराटे चाली । बोलिली ते केली व्हावी नीत ॥१॥
नाही मानू येत वांजटाचे बोल । कोरडेच फोल चवी नाही ॥धृपद॥
तरुवरा आधी कोठे आहे फळ । चावटा बरळ म्हणा त्यासी ॥२॥
तुका म्हणे किती ठकली बापुडी । गव्हा नाही गोडी मांडे पुऱ्या ॥३॥
अर्थ
स्वयंपाक चांगला करायचा असेल तर चुलीत तांदूळ आणि पातेल्यात विस्तव टाकून स्वयंपाक चांगला होणार नाही त्याच्यासाठी जी योग्य निती सांगितली आहे तीच करावी लागेल. ज्याच्याकडे अनुभव नाही अशा माणसाचे अनुभवशून्य कोरडे बोल हे टरफलाप्रमाणे फोल असतात ज्याच्या बोलण्यात कोणत्याही प्रकारची चव नाही अशा अनुभवशून्य वांझोटयाचे बोलणे कोणालाही मान्य होत नाहीत. अहो झाड लावण्याच्या आधीच कोठे झाडाला फळ येत असते काय त्याप्रमाणे जर आत्मसाक्षात्कारा शिवाय तुम्हाला मुक्ती मिळेल असे जर कोणी म्हणत असेल तर तो चावट असून उगाच काहीतरी बरळत आहे असे तुम्ही म्हणा. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो परमार्थामध्ये केवळ तातडी करुन कितीतरी लोक फसले गेले आहेत हे पाहा की जसे नुसती गव्हाला गोडी नसते तर त्याचे विविध प्रकारचे पदार्थ केल्यानंतर गव्हाचे वेगवेगळे पदार्थ म्हणजे मांडे, पुऱ्या केल्याने गव्हाला गोडी प्राप्त होते त्याप्रमाणे परमार्थामध्ये तातडी करु नये प्रथम साधना करावी गुरुभक्ती करावी वेदाभ्यास इत्यादी करावे नंतर आपल्याला अनुभवाने मोक्ष प्राप्त होतो. ”
3:10
अभंग क्र. ३१५५
झाली हरीकथा रंग वोरसला । उचितासी आला पांडुरंग ॥१॥
वाटितो हे प्रेम उचिताचा दाता । घेई रे तू आता धणीवरी ॥धृपद॥
प्रेम देऊनिया अवघी सुखी केली । जे होती रंगली विठ्ठली ती ॥२॥
तुके हे दुर्बळ देखियले संती । म्हणउनि पुढती आणियेले ॥३॥
अर्थ
संतांनी हरीकथा केली कथेचा रंग ओसरला आणि उचित दान देण्याकरता पाडूरंग तेथे आला. पाडूरंग दाता प्रेमाचे उचित दान सर्वाना वाटत आहे त्यामुळे तुम्ही तुमची तृप्ती होईपर्यंत पाडूरंगाचे प्रेमाचे दान घ्यावे. जी जी भक्त हरीकथेमध्ये अगदी रंगून गेले होते त्यांना सर्वाना विठ्ठलाने त्याचे प्रेमाचे दान देऊन सुखी केले. तुकाराम महाराज म्हणतात, “मी दुर्बळ आहे मी तर सर्व संतांच्या मागे होतो त्यामुळे संतांनी ओळखले की मला पाडूरंगाचा प्रसाद मिळाला नाही त्यामुळे त्यांनी मला हाताला धरुन पाडूरंगापुढे आणले व देवाचा प्रसाद मला प्राप्त करुन दिला. ”
3:11
अभंग क्र. ३१५६
भय नाही भेव । अनुतापी नव्हता जीव ॥१॥
जेथे देवाची तळमळ । तेथे काशाचा विटाळ ॥धृपद॥
उच्चारिता दोष । नाही उरो देत लेश ॥२॥
तुका म्हणे चित्त । होय आवडी मिश्रित ॥३॥
अर्थ
मी नेहमी नामसंकीर्तन करतो त्यामुळे मला कसल्याही प्रकारचे भय किंवा भिती राहिली नाही आणि माझ्या जीवालाही कोणत्याही प्रकारची पश्चात्ताप करण्याची वेळ आली नाही. जेथे देवाच्या नामसंकीर्तनाचीच नेहमी तळमळ असते तेथे कसला आणि कशाचा विटाळ आला ? हरीचे नाम उच्चारले असता तेथे कोणत्याही प्रकारचा दोषच राहात नाही आणि ते नाम कोणत्याही प्रकारचा लेष देखील तेथे उरु देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “माझे चित्त देवाच्या आवडीने व त्याच्या नामाने मिश्रित झाले आहे. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















