आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१३ सप्टेंबर, दिवस २५६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी ७६ ते १०० + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३०६१ ते ३०७२
“१३ सप्टेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 13 September
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १३ सप्टेंबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १५ अभंग, आज अभंग ३०६१ ते ३०७२ चे पारायण आपण करणार आहोत.
१३ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी ७६ ते १००,
76-16
नातरी वार्षिया नाही मांडिली । ग्रीष्मे नाही सांडिली । माजी निजरूपे निवडली । गंगा जैसी ॥76॥
किंवा, वर्षाऋतु संपून गेला आहे व ग्रीष्मऋतूस आरंभ नाही ह्या मधल्या कालांत गंगा जशी स्वत:च्या नित्यशुद्ध स्वरूपाने असते. 76
77-16
तैसी संकल्पविकल्पाची वोढी । सांडूनि रजतमाची कावडी । भोगिता निजधर्माची आवडी । बुद्धि उरे ॥77॥
त्याप्रमाणे, संकल्प व विकल्प ह्यांची ओढ व रज, तम, गुण, ह्यांची वस्ती ज्या बुद्धींतून । पार नाहीशी होऊन जिला निजधर्माची म्हणजे स्वस्वरूपाची आवड उत्पन्न झाली आहे. 77
78-16
इंद्रियवर्गी दाखविलिया । विरुद्धा अथवा भलीया । विस्मयो काही केलिया । नुठी चित्ती ॥78॥
इष्ट अगर अनिष्ट अशा कोणत्याही गोष्टीचे इंद्रियवर्गाने दर्शन करविले तरी ज्याचे चित्त चलित होत नाही. 78
79-16
गावा गेलिया वल्लभु । पतिव्रतेचा विरहक्षोभु । भलतेसणी हानिलाभु । न मनी जेवी ॥79॥
पतीच्या परदेश गमनामुळे विरहदुःखाने पीडित पतिव्रता जशी प्रापंचिक इतर लहानमोठी हानि मनावरही घेत नाही. 79
80-16
तेवी सत्स्वरूप रुचलेपणे । बुद्धी जे ऐसे अनन्य होणे । ते सत्त्वशुद्धी म्हणे । केशिहंता ॥80॥
तशी सत्वरूपाची आवड उत्पन्न जी बुद्धि त्या ठिकाण (सत्स्वरूपी) अनन्य होते तिला सत्वशुद्धि असे म्हणावे असे केशी दैत्यहन्त्या भगवंतांनी सांगितले. 80
81-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
आता आत्मलाभाविखी । ज्ञानयोगामाजी एकी । जे आपुलिया ठाकी । हावे भरे ॥81॥
आता, आत्मलाभासाठी ज्ञान अथवा योग ह्या दोन साधनांपैकी आपली बुद्धि ज्यावर स्थिर होईल. 81
82-16
तेथ सगळिये चित्तवृत्ती । त्यागु करणे या रीती । निष्कामे पूर्णाहुती । हुताशी जैसी ॥82॥
निष्काम यज्ञकर्म करणाराने अग्नीमध्ये जशी पूर्णाहुति द्यावी त्याप्रमाणे सर्व चित्तवृत्तीचा त्या आवडीच्या साधनाच्या ठिकाणी लय करावा. 82
83-16
का सुकुळीने आपुली । आत्मजा सत्कुळीचि दिधली । हे असो लक्ष्मी स्थिरावली । मुकुंदी जैसी ॥83॥
किंवा कुलीन गृहस्थाने सत्कुलांत अर्पण केलेली आपली कन्या जशी त्या कुळात अनन्य होते अथवा लक्ष्मी जशी श्रीमुकुंदचरण अनन्य आहे. 83
84-16
तैसे निर्विकल्पपणे । जे योगज्ञानीच या वृत्तिक होणे । तो तिजा गुण म्हणे । श्रीकृष्णनाथु ॥84॥
त्याचप्रमाणे, योग अथवा ज्ञान ह्यापैकी एका विषयाविषयी विकल्परहितत्वाने अनन्य असणे हा तिसरा गुण होय, असे भगवान् श्रीकृष्ण म्हणतात. 84
85-16
आता देहवाचाचित्ते । यथासंपन्ने वित्ते । वैरी जालियाही आर्ताते । न वंचणे जे का ॥85॥
आता कायावाचामने व शक्यनुसार धनी, आपला शत्रूही जर आर्त होऊन (अडून) पुढे आला तर त्याला विन्मुख न करणे असा जो गुण, 85
86-16
पत्र पुष्प छाया । फळे मूळ धनंजया । वाटेचा न चुके आलिया । वृक्षु जैसा ॥86॥
वाटेवरील वृक्षाची आलेल्या वाटसरूला, आपल्या फल, मूल, छाया वगैरेंचा उपभोग घेण्याला जशी कधी ना नसते. 86
87-16
तैसे मनौनि धनधान्यवरी । विद्यमाने आल्या अवसरी । श्रांताचिये मनोहारी । उपयोगा जाणे ॥87॥
त्याचप्रमाणे, असलेल्या धनधान्यादिकाचा आलेल्या याचकाला अथवा अतिथीला त्याच्या मनाप्रमाणे उपभोग घेऊ देऊन त्याचे समाधान करणे, 87
88-16
तया नांव जाण दान । जे मोक्षनिधानाचे अंजन । हे असो आइक चिन्ह । दमाचे ते ॥88॥
ह्याला ” दान ” असे म्हणतात व मोक्षरूप ठेवा दिसण्याचे ते एक अंजनच होय; आता “दम” म्हणजे काय त्याचे लक्षण ऐक. 88
89-16
तरी विषयेंद्रिया मिळणी । करूनि घापे वितुटणी । जैसे तोडिजे खड्गपाणी । पारकेया ॥89॥
शस्त्रधारी ज्याप्रमाणे शत्रूचा संबंध त्याच्या नाशाने तोडून टाकतो त्याचप्रमाणे, विषय व इंद्रिये यांचे सान्निध्य झाले असता जो त्याची ताटातुट करितो. 89
90-16
तैसा विषयजातांचा वारा । वाजो नेदिजे इंद्रियद्वारा । इये बांधोनि प्रत्याहारा । हाती वोपी ॥90॥
तसाच विषयमात्राचा उपद्रव इंद्रियद्वारा स्वतःला होऊ देत नाही व त्यांना (इंद्रियांना) प्रत्याहाराचे बंधन घालितो. 90
91-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
आंतुला चित्ताचे अंगवरी । प्रवृत्ति पळे पर बाहेरी । आगी सुयिजे दाहीहि द्वारी । वैराग्याची ॥91॥
दशेंद्रियांच्या द्वारांवर वैराग्यरूप अग्नि घातल्यामुळे चित्ताच्या आत दडून असलेली विषयविषयक प्रवृत्ति बाहेर पळून जाते. 91
92-16
श्वासोश्वासाहुनी बहुवसे । व्रते आचरे खरपुसे । वोसंतिता रात्रिदिवसे । नाराणुक जया ॥92॥
योग्याच्या प्राण निरोधनापेक्षांही कठीण अशी व्रते रात्रंदिवस आचरीत असल्याने ज्याला दुसरी सवडच नसते. 92
93-16
पै दमु ऐसा म्हणिपे । तो हा जाण स्वरूपे । यागार्थुही संक्षेपे । सांगो ऐक ॥93॥
ज्याला दम असे म्हणतात. त्यांचे हे स्वरूप होय. आता यज्ञ तो काय संक्षेपाने सांगतो ते श्रवण कर. 93
94-16
तरी ब्राह्मण करूनि धुरे । स्त्रियादिक पैल मेरे । माझारी अधिकारे । आपुलालेनि ॥94॥
तरी ब्राह्मणांपासून आरंभ करून स्त्रियांदिकापर्यंत आपापल्या अधिकारा प्रमाणे, 94
95-16
जया जे सर्वोत्तम । भजनीय देवताधर्म । ते तेणे यथागम । विधी यजिजे ॥95॥
ज्याला जे उचित असे भजनपूजनादि देवताधर्म शास्त्रविहित असतील, ते त्या आज्ञेप्रमाणे त्याने आचरावे. 95
96-19
जैसा द्विज षट्कर्मे करी । शूद्र तयाते नमस्कारी । की दोहीसही सरोभरी । निपजे यागु ॥96॥
उदाहरणार्थ, ब्राह्मणाने षट्कर्माचरण करावे व शूद्राने त्याला नुसता नमस्कार करावा, तरी दोघासही यज्ञाचे पुण्य घडते. 96
97-16
तैसे अधिकारपर्यालोचे । हे यज्ञ करणे सर्वाचे । परी विषय विष फळाशेचे । न घापे माजी ॥97॥
ह्याप्रमाणे आपापला अधिकार पाहून सर्वानी यज्ञाचरण करावे, पण, त्यापासून अमुक फलप्राप्ति व्हावी असे आशेचे विष मात्र पोटात नसावे. 97
98-16
आणि मी कर्ता ऐसा भावो । नेदिजे देहाचेनि द्वारे जावो । ना वेदाज्ञेसि तरी ठावो । होइजे स्वये ॥98॥
आणि ह्या यज्ञाचा मी कर्ता आहे असा देहबुद्धिद्वारा भाव उत्पन्न न होऊ देतांही वेदांज्ञा यथासांग पाळावी. 98
99-16
अर्जुना एवं यज्ञु । सर्वत्र जाण साज्ञु । कैवल्यमार्गींचा अभिज्ञु । सांगाती हा ॥99॥
अर्जुना, ह्याप्रमाणे यज्ञ हा सर्वत्र शास्त्राज्ञेप्रमाणेच असावा लागतो. (अथवा तसा असेल तोच यज्ञ होय) हा मोक्षमार्गातील एक उत्तम सोबती होय. 99
100-16
आता चेंडुवे भूमी हाणिजे । नव्हे तो हाता आणिजे । की शेती बी विखुरिजे । परी पिकी लक्ष ॥100॥
कोणीही भूईवर चेंडू आपटतो तो पुन्हा आपल्याच हाती यावा ह्या उद्देशानेच होय (इतस्ततः जावा म्हणून नव्हे) अथवा शेतात जे बी पेरतात ते पिकाकडे लक्ष देऊनच होय. 100
दिवस २५६ वा. १३, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३०६१ ते ३०७२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३०६१
जेणे माझे हित होईल तो उपाव । करिसील भाव जाणोनिया ॥१॥
मज नाही सुख दुःख तया खंती । भावना हे चित्ती नाना छंदे ॥धृपद॥
तोडी हे संबंध तोडी आशापाश । मज हो सायास न करिता ॥२॥
तुका म्हणे मी तो राहिलो निश्चिंत । कवळोनि एकांत सुख तुझे ॥३॥
अर्थ
देवा माझ्या मनातील भक्तीभाव जाणून घेऊन जेणेकरुन माझे हित होईल असाच उपाय तू करशील. देवा मला कोणत्याही प्रकारचे सुख दु:ख किंवा खंत नाहीच आणि माझ्या चित्तामध्ये तुझ्यावाचून इतर कोणत्याही प्रकारचे विविध प्रकारचे छंद आणि भावनाही नाहीत. देवा माझा संसारसंबंध आणि आशापाश मला कोणत्याही प्रकारचे सायास न होता तुम्ही तोडून टाका. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुझ्या सुखाला मी एकातात आलिंगन देऊन निश्चिंत राहीलो आहे. ”
2:49
अभंग क्र. ३०६२
शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तववरी तू जाण श्रुतिदास ॥१॥
त्याची तुज काही चुकताचि नीत । होसील पतित नरकवासी ॥धृपद॥
बहु झालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुको नको ॥२॥
शिखा सूत्र याचा तोडी तू संबंध । मग तुज बाध नाही.ाही ॥३॥
तुका म्हणे तरि वर्तूनि निराळा । उमटती कळा ब्रम्हीचिया ॥४॥
अर्थ
अरे तू जोपर्यंत शेंडी आणि जानवे यांच्यामध्ये गुंतला आहेस तोपर्यंत तू वेदाचा दास आहेस हे तू समजून घ्यावे. मग वेदाने जी धर्मनीती सांगितली आहे त्याप्रमाणे तू जर वागला नाहीस तर तुझ्या वागण्यात काही चूक घडली तर तू पतित होऊन नरकवाशी होशील. अरे तू कितीही मोठा पंडित शहाणा किंवा चतुर झालास तरी देखील शुध्द आचरण करण्यास चुकू नकोस. अरे तू शेंडी आणि जानवे यांचा संबंध तोडून टाक मग तुला कोणत्याही प्रकारची बाधा मुळीच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे तू संसारात राहून देखील संसारापेक्षा अलिप्त राहा व भक्ती कर मग तुझ्यामध्ये ब्रम्हानुभवाच्या कळा उमटतील. ”
2:50
अभंग क्र. ३०६३
पतिव्रता ऐसी जगामध्ये मात । भोगी पाच सात अंधारी ते ॥१॥
भ्रतारासी लेखी श्वानाचे समान । परपुरुषी मन संभ्रम तो ॥२॥
तुका म्हणे तिच्या दोषा नाही पार । भोगील अघोर कुंभपाक ॥३॥
अर्थ
एखादया स्त्रीची जगामध्ये पतीव्रता म्हणून ख्याती असते परंतू ती अंधारामध्ये पाच सात जणांचा भोग घेते. स्वत:च्या नवऱ्याला ती कुत्र्यासमान समजते आणि परपुरुषाच्या ठिकाणी तिचे मन गुंतलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा स्त्रीच्या दोषाला अंत:पारच नाही ती अघोर असा कुंभीपाक नरक भोगेल. ”
2:50
अभंग क्र. ३०६४
सिंदळीसी नाही पोराची पै आस । राहे बीज त्यास काय करी ॥१॥
अथवा सेती बीज पेरिले भाजोन । सारा देईल कोण काका त्याचा ॥२॥
तुका म्हणे नाही राखायाची चाड । तरि का लिगाड करुनी घेतो ॥३॥
अर्थ
व्याभिचारी स्त्रीला आपल्याला पोर व्हावे ही अपेक्षा नसते परंतू तिने जर जाराशी संबंध ठेवला आणि तिला गर्भ राहीला तर ती काय करेल ? शेती करताना जर भाजलेले बी शेतामध्ये पेरले तर ते पेरलेले बी उगणार पण नाही परंतू सारा देणे त्याला चुकणार पण नाही मग त्यावेळी सारा कोण देईल त्याचा काका देणार आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात, “अहो जर व्याभिचारी स्त्रीला मूलबाळ झाले तर त्यांचे रक्षण करायचे नसेल आणि शेतकऱ्याला पीकाचे रक्षण करायचे नसेल तर मग ते दोघेही व्यर्थ लचांड का करत असतात सारांश पाप कर्म आणि व्यर्थ कर्म कधीही करु नये. ”
2:51
अभंग क्र. ३०६५
संसारा आलिया एक सुख आहे । आठवावे पाय विठोबाचे ॥१॥
येणे होय सर्व संसार सुखाचा । न लगे दुःखाचा लेश काही ॥धृपद॥
घेतील तयासी सोपे आहे सुख । बोलियेले मुखे नारायण ॥२॥
सांगितली सोय करुणासागरे । तुम्हा काहो बरे न वाटते ॥३॥
तुका म्हणे तेणे उपकार केला । भोळया भाविकाला तरावया ॥४॥
अर्थ
संसारामध्ये आल्यानंतर एक सुख मात्र आहे ते म्हणजे विठोबाचे पायाचे चिंतन सतत करत राहाणे. असे जर केले तर संसार सुखाचा होईल आणि दु:खाचा कोणत्याही प्रकारचा लेश राहाणार नाही. जे भक्त आपल्या मुखाने नारायणाचे नाम घेतील त्यांना सुख अतिशय सोप्या रितीने प्राप्त होईल हे वचन भगवंतानेच भगवद्गीतेत सांगितलेले आहे. अहो करुणासागर नारायणाने एवढा सोपा मार्ग तुम्हाला सांगितला आहे मग तुम्हाला तो का बरे बरा वाटत नाही ? तुकाराम महाराज म्हणतात, “भोळया भाविकांना तारण्याकरता नारायणाने फार सोपा उपाय सांगितला आहे व भक्तांवर फार मोठा उपकार त्याने केला आहे. ”
2:52
अभंग क्र. ३०६६
चाले हे शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलविते हरीविण ॥१॥
देखवी ऐकवी एक नारायण । तयाचे भजन चुको नको ॥धृपद॥
मानसाची देव चालवी अहंता । मीचि एक कर्त्ता म्हणो नये ॥२॥
वृक्षाची ही पाने हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठे ॥३॥
तुका म्हणे विठो भरला सबाह्य । उणे काय आहे चराचरी ॥४॥
अर्थ
हे शरीर कोणाच्या सत्तेने चालते आणि हरीवाचून आपल्याला कोण बोलवित आहे ? अरे दाखविणारा ऐकविणारा एक नारायणच आहे त्यामुळे त्याचे भजन करण्यास कधीही चुकवू नको. मनाचा अहंकार देखील चालवणारा एक देवच आहे त्यामुळे मीच सर्व काही कर्ता आहे असे कधीच म्हणू नये. अहो जगामधे विचार करुन पाहिले तर वृक्षाचे पान देखील ज्याच्या सत्तेने हलते मग तेथे तुमचा अहंकार राहीलाच कोठे ? तुकाराम महाराज म्हणतात, “अहो चराचरामध्ये सर्वत्र विठोबाच भरलेला आहे त्याच्यावाचून एकही पदार्थ रिकामा नाही. ”
2:52
अभंग क्र. ३०६७
मायारूपे ऐसे मोहिलेंसे जन । भोगिती पतन नानाकर्मे ॥१॥
काय याची प्रीती करिता आदर । दुराविता दूर तेचि भले ॥धृपद॥
नाना छंदे अंगी वसती विकार । छळियेले फार तपोनिधि ॥२॥
तुका म्हणे ऐसे सिकवितो तुज । आता धरी लाज मना पुढे ॥३॥
अर्थ
मायेने लोक मोहित झालेले असून ते विविध प्रकारचे पाप कर्म करतात व पतनाला जाऊन शेवटी नरक भोगतात. अशा लोकांविषयी प्रेम आणि आदर तुम्ही का करता अहो त्यांच्यापासून दूर झालेले व त्यांना दूर केलेलेच चांगले. अनेक प्रकारचे छंद आणि विकार असलेल्या माणसाजवळ आपण जर गेलो तर ते विकार आपल्याही अंगी जडतात आणि विविध प्रकारचे छंद आणि विकाराने तपोनिधी ऋषींना म्हणजे विश्वामित्रा सारख्या तपसव्यांना देखील खूप छळलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मी आज तुला एक गोष्ट शिकवतो ती तू ऐक आता पापी लोकांची संगती करण्याविषयी मनामध्ये तू लाज धर व त्यांच्यापासून दूर राहा. ”
2:53
अभंग क्र. ३०६८
जेजे काही मज होईल वासना । तेते नारायणा व्हावे तुम्ही ॥१॥
काय भाव एक निवडू निराळा । जाणसी तू कळा अंतरीचे ॥धृपद॥
तुजविण मज कोण आहे सखा । जे सांगा आणिका जीवभाव ॥२॥
अवघे पिशुन झाले असे जन । आपपर कोण नाठवे हे ॥३॥
तुका म्हणे तूचि जीवाचे जीवन । माझे समाधान तुझे हाती ॥४॥
अर्थ
हे नारायण मला ज्या काही वासना इच्छा आवड निर्माण होतील त्या तुम्हीच व्हाव्या. अहो देवा माझ्या मनातील कोणता एक भाव मी वेगळा म्हणून निवडू, तुम्ही तर माझ्या अंत:करणातील सर्व भाव जाणता आहातच. देवा अहो तुमच्यावाचून माझा दुसरा कोण सखा आहे की ज्याला मी माझ्या अंत:करणातील जीव भाव सांगू ? देवा सर्व लोक मला दुष्टपणा सारखेच वाटत आहेत या ठिकाणी आपले कोण आणि परके कोण हे मला काहीच आठवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तूच एक माझ्या जीवाचे जीवन आहेस आणि माझे समाधान देखील तुझ्या हातात आहे. ”
2:53
अभंग क्र. ३०६९
कैसी करू आता सांग तुझी सेवा । शब्दज्ञाने देवा नाश केला ॥१॥
आता तुझे वर्म न कळे अनंता । तुज न संगता बुडू पाहे ॥धृपद॥
संध्या स्नान केली आचाराची नासी । काय तयापासी म्हणती एक ॥२॥
बुडविली भक्ती म्हणीते पाषाण । पिंडाचे पाळण स्थापुनिया ॥३॥
न करावी कथा म्हणती एकादशी । भजनाची नासी मांडियेली ॥४॥
न जावे देउळा म्हणती देवघरी । बुडविली या परी तुका म्हणे ॥५॥
अर्थ
देवा या शब्दज्ञानी लोकांनी सर्व भक्तीचा नाश केला आहे तुझी सेवा आता मी कशी करु ते तू सांग ? हे अनंता आता तुझ्या प्राप्तीचे वर्म कोणते आहे हे मला काही कळेनासे झाले आहे तूच जर आता सांगितले नाहीस तर मी या भवसागरात बुडून जाईन. या शब्दज्ञानी लोकांनी तर संध्यास्नान इत्यादी शुध्द आचरणाचा नाशच केला आहे ते म्हणतात की, संध्यास्नानापाशी असे एवढे काय आहे ? अहो काही नास्तिक लोक तर म्हणतात की, देवळातला देव दगड आहे आणि पिंडाचे म्हणजे देहाचे पालन पोषण करावे हीच खरी भक्ती आहे असा नवीन धर्मच त्यांनी स्थापन करुन भक्तीच बुडवून टाकली आहे. अहो हे लोक म्हणतात की, हरीकथा करु नये एकादशी देखील धरु नये आणि भजनाचा तर यांनी पूर्णच नाशच करुन टाकला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा अरे हे नास्तिक लोक तर म्हणतात की देव देवळात नाही तर देव आपल्या ह्दयमंदीरात आपल्या घरीच आहे असे म्हणून यांनी भक्तीचा आणि सत्मार्गाचा नाश करुन भक्तीच बुडवली आहे. ”
2:53
अभंग क्र. ३०७०
नमोनमो तुज माझे हे कारणे । काय झाले उणे करिता स्नान ॥१॥
संतांचा मारग चालतो झाडूनि । हो का लाभ हानि काहींतरि ॥धृपद॥
न करिसी तरि हेचि कोडे मज । भक्ती गोड काज आणीक नाही ॥२॥
करी सेवा कथा नाचेन रंगणी । प्रेमसुखधणी पुरेल तो ॥३॥
महाद्वारी सुख वैष्णवाचे मेळी । वैकुंठ जवळी वसे तेथे ॥४॥
तुका म्हणे नाही मुक्तिसवे चाड । हेचि जन्म गोड घेता मज ॥५॥
अर्थ
देवा मी तुला वारंवार नमस्कार करत आहे व एक निवेदन मी करत आहे, रोज जर स्नान केले तर काही बिघडेल काय त्यामुळे मी रोज स्नान करत जाणार आहे संत ज्या मार्गाने चालत आहे त्या मार्गाने मी पुढे झाडत चालत राहीन व त्यांच्या मागेही मी चालत राहीन मग मला तेथे लाभ होवो अथवा हानी होवो तरी काही हरकत नाही. देवा तू माझे लाड कोड कौतुक केले नाही तरी मला भक्तीच गोड वाटते आणि भक्तीशिवाय मला कशाशीही कर्तव्य नाही. देवा मी तुझी कथा तुझी सेवा करेन व आनंदाने तुझ्यापुढे नाचेन आणि तृप्ती होईपर्यंत तुझे प्रेमसुख घेत राहीन. महाव्दारात तसेच वैष्णवांच्या मेळाव्यामध्ये खूप सुख आहे आणि वैकुंठ देखील त्यांच्या जवळच वसलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मला सायुज्यमुक्तीची आवडच नाही मला देवाची भक्तीच फार गोड वाटते आणि त्या भक्तीसाठीच मला हा जन्म घेणे देखील गोड वाटते. ”
2:53
अभंग क्र. ३०७१
होऊनि संन्यासी भगवी लुगडी । वासना न सोडी विषयांची ॥१॥
निंदिती कदान्न इच्छिती देवान्न । पाहाताती मान आदराचा ॥धृपद॥
तुका म्हणे ऐसे दांभिक भजन । तया जनार्दन भेटे केवी ॥२॥
अर्थ
काही लोक संन्यासी होऊन भगवी लुगडी परिधान करतात परंतू विषयवासना काही सोडीत नाही. असे लोक भाकर चटणीसारख्या कदन्नाची निंदा करतात व पुरी बासुंदी पंचपक्वानासारख्या देवांन्नाची इच्छा करतात आणि जनमाणसामध्ये आपल्याला मान आदर मिळतो की नाही हे असे लोक सारखे पाहात असतात. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा दांभिक लोकांनी कितीही दांभिक भजन केले कितीही भजनाचे सोंग आणले तरी त्यांना जनार्दन भेटेलच कसा ? ”
2:53
अभंग क्र. ३०७२
लांबवूनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोटा करिताती ॥१॥
सर्वांगा करिती विभूतिलेपन । पाहाती मिष्टान्न भक्षावया ॥२॥
तुका म्हणे त्यांचा नव्हे हा स्वधर्म । न कळता वर्म मिथ्यावाद ॥३॥
अर्थ
असे कित्येक तरी लोक आहेत की ते लांब लांब जटा वाढवतात लंगोटी नेसतात आणि मोठा अभिमान त्याविषयी करतात. सर्वांगाला राख लावतात आणि मिष्ठान्न भक्षण करण्यास कसे मिळेल याची वाट ते पाहातात. तुकाराम महाराज म्हणतात, “खरे तर हा त्यांचा स्वधर्म नाही परंतू स्वधर्माचे वर्मच त्यांना न समजल्यामुळे ते मिथ्या वादात व आचरणात पडतात. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















