६ सप्टेंबर, दिवस २४९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ५०१ ते ५२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २९७७ ते २९८८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

” ६ सप्टेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ६ September
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ६ सप्टेंबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २९७७ ते २९८८ चे पारायण आपण करणार आहोत.
६ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ५०१ ते ५२५,

501-15
एवं जीवचैतन्य आघवे । हे क्षर पुरुष जाणावे । आता रूप करू बरवे । अक्षरासी ॥501॥
ह्याप्रमाणे, जेवढे म्हणून जीवचैतन्य, तो क्षर पुरुष असे जाण. आता पुढे, अक्षर पुरुषाची लक्षणे सांगतो. 1
502-15
तरी अक्षरु जो दुसरा । पुरुष पै धनुर्धरा । तो मध्यस्थु गा गिरिवरा । मेरु जैसा ॥502॥
अर्जुना, दुसरा जो अक्षर पुरुष म्हणून आहे तो, पर्वतश्रेणींमध्ये मेरू पर्वत जसा मध्यभागी आहे तसा मध्यस्थ आहे. (म्हणजे एका टोंकास शुद्ध परमात्मा व दुसच्या टोकास अशुद्ध व क्षणिक जगत असे जे ” मध्यस्थ ” परमात्मविषयक अज्ञान ते आहे उपाधि ज्या चैतन्याला व अक्षर पुरुष होय=मायाविशिष्ट चैतन्य ) 2
503-15
जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी । इही न भेदे तिही भागी । तैसा दोही ज्ञानाज्ञानांगी । पडेना जो ॥503॥
तो मेरूपर्वत, स्वर्ग, पृथ्वी व पाताळ ह्या तीन लोकांपैकी अमक्या लोकातला असे म्हणता न येता जसा सर्वत्र समच आहे, तसा हा अक्षर पुरुष शुद्ध ज्ञानही नव्हे किंवा अज्ञानकार्य जगत् तद्रूपही नव्हे असा मध्यस्थ आहे. 3
504-15
ना यथार्थज्ञाने एक होणे । ना अन्यथात्वे दुजे घेणे । ऐसे निखिळ जे नेणणे । तेचि ते रूप ॥504॥
ज्या स्थितीत जीवाला यथार्थं ब्रह्मौक्य ज्ञानही नसते, किंवा विक्षेपकार्य जो व्यवहार तद्रूपही तो नसतो, अशी जी त्याची मध्यस्थ घनसुषुप्त अवस्था, ते अक्षर पुरुषाचे रूप होय. 4
505-15
पांसुता निःशेष जाये । ना घटभांडादि होये । तया मृत्पिंडा ऐसे आहे । मध्यस्थ जे ॥505॥
ढेपूळता तर निःशेष मोडलेली, पण अद्याप घडयागाडग्यांच्या आकाराला न आलेला असा जो मध्यस्थ मृत्पिंड (मातीचा गोळा) तसे ह्या अक्षर पुरुषाचे स्वरूप जाणावे. 5


506-15
पै आटोनि गेलिया सागरु । मग तरंगु ना नीरु । तया ऐशी अनाकारु । जे दशा गा ॥506॥
ज्या स्थलावरील समुद्राचे पाणी ओहोटून ओसरले आहे, त्या स्थलाच्या निराकार दशेप्रमाणे जी स्थिति (निराकारता अशी की, त्या स्थलाला समुद्र म्हणावे, तर लाटाही नाहीत व पाणीही नाही; पृथ्वीचे क्षेत्र म्हणावे, तर, पुढल्या क्षणाला समुद्र तेथे आपला अंमल गाजवणार). 6
507-15
पार्था जागणे तरी बुडे । परी स्वप्नाचे काही न मांडे । तैसिये निद्रे सांगडे । न्याहाळणे जे ॥507॥
पार्था, जागृति लोप पावली आहे आणि स्वप्नादि व्यवहार बंद आहे अशी जी झोप याप्रमाणे हे समजावे. 7
508-15
विश्व आघवेचि मावळे । आणि आत्मबोधु तरी नुजळे । तिये अज्ञानदशे केवळे । अक्षरु नाम ॥508॥
सर्व विश्वदर्शन मावळले आहे पण आत्मबोधाचा तर उदय नाही अशी जी केवळ अज्ञानावस्था तिला “अक्षर” असे नांव आहे. 8
509-15
सर्वा कळी सांडिले जैसे । चंद्रपण उरे अंवसे । रूप जाणावे तैसे । अक्षराचे ॥509॥
सर्व कलाशून्य (गडद अंधकाररूप) अमावास्येच्या चंद्राप्रमाणे ” अक्षराचे रूप समजावे. 9
510-15
पै सर्वोपाधिविनाशे । हे जीवदशा जेथ पैसे । फळपाकांत जैसे । झाड बीजी ॥510॥
पक्वफळाच्या बीजांत तरु जसा सूक्ष्मरूपाने असतो त्याप्रमाणे जागृदादि सर्व उपाधिनाशानंतर ही जीवदशा ज्या ठिकाणी लीन होऊन असते. 510
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


511-15
तैसे उपाधी उपहित । थोकोनि ठाके जेथ । तयाते अव्यक्त । बोलती गा ॥511
तसेच उपाधि व उपाधीने युक्त असणारे जेथे लीन होतात त्या स्थानाला ” अव्यक्त ” असे म्हणतात. 11
512-15
॥ घन अज्ञान सुषुप्ती । तो बीजभावो म्हणती । येर स्वप्न हन जागृती । फळभावो तयाचा ॥512॥
गाढ अज्ञानरूप जी सुषुप्त्यवस्था तिला ” बीजभाव ” म्हणतात व दुसऱ्या ज्या स्वप्न व जागृती हा तिचा फलभाव होय. 12
513-15
जयासी का बीजभावो । वेदांती केला ऐसा आवो । तो तया पुरुषा ठावो । अक्षराचा ॥513॥
वेदान्तांत ज्या स्थितीला ” बीजभाव ” असे म्हणतात ते त्या अक्षर पुरुषाचे स्थान होय. ( तोच अक्षर पुरुष होय. ) 13
514-15
जेथूनि अन्यथाज्ञान । फांकोनि जागृति स्वप्न । नानाबुद्धीचे रान । रिगाले असे ॥514॥
जेथून विपरीत ज्ञान उत्पन्न होऊन ते जागृति, स्वप्न व नाना तऱ्हेचे बुद्धितरंग या रूपांनी विस्तारते. 14
515-15
जीवत्व जेथुनी किरीटी । विश्व उठतचि उठी । ते उभय भेदांची मिठी । अक्षरु पुरुषु ॥515॥
अर्जुना, जीवत्व आणि विश्व ह्यांचा उदय जेथून होतो व हे दोन भेद पुन्हा शेवटी जेथे ऐक्य किंवा लय पावतात त्या अज्ञानोपहित चैतन्याला अक्षर पुरुष म्हणतात. 15


516-15
येरु क्षर पुरुषु का जनी । जिही खेळे जागृती स्वप्नी । तिया अवस्था जो दोन्ही । वियाला गा ॥516॥
दुसरा जो क्षर पुरुष म्हणून म्हणतात व ज्याचा व्यवहार जागृति व स्वप्न ह्या अवस्थांत चालतो व त्या दोन्ही अवस्था जेथून उत्पन्न होतात. 16
517-15
पै अज्ञानघनसुषुप्ती । ऐसैसी जे का ख्याती । या उणी एकी प्राप्ती । ब्रह्माची जे ॥517॥
किंवा गाढ अज्ञानदशा जी, लोकात “सुषुप्ति ” ह्या नांवाने प्रसिद्ध आहे व जिला ब्रह्मा का म्हणू नये याला एकच कारण आहे. 17
518-15
साचचि पुढती वीरा । जरी न येता स्वप्न जागरा । तरी ब्रह्मभावो साचोकारा । म्हणो येता ॥518॥
अर्जुना, खरोखर, ह्या सुषुप्त्यवस्थेतून जीव स्वप्न व जागृति ह्या अवस्थाना येताच ना, तर त्या सुषुप्तीलाच आम्ही ब्रह्मस्थिति असे म्हटले असते. 18
519-15
परी प्रकृतिपुरुषे दोनी । अभ्रे जाली जिये गगनी । क्षेत्रक्षेत्रज्ञु स्वप्नी । देखिला जिये ॥519॥
पण त्या सुषुप्तिरूप ज्ञानशून्य गगनांत प्रकृति व पुरुष असे दोन ढग येऊन क्षेत्र व क्षेत्रज्ञ असे भेद जिच्या स्वप्नात दिसतात. ( म्हणून सुषुप्त्यवस्थेला ब्रह्मस्थिति म्हणता येत नाही. ) 19
520-15
हे असो अधोशाखा । या संसाररूपा रुखा । मूळ ते रूप पुरुषा । अक्षराचे ॥520॥
हे राहू दे, अधःशाख ( खाली खांद्या असलेला ) अशा ह्या संसारवृक्षाचे जो प्रथम मूळ ( वस्तूच्या ठिकाणी अज्ञानाचे आर घेणे ) तो हा अक्षर पुरुष होय. 520
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


521-15
हा पुरुषु का म्हणिजे । जे पूर्णपणेचि निजे । पै मायापुरी पहुडिजे । तेणेही बोले ॥521॥
आता ह्याला पुरुष का म्हणतात ? तर- ” पूर्णतया शेते ” गाढ निद्रा घेतो म्हणून किंवा “ मायापुऱ्या शेते” मायापुरीमध्ये शयन करितो म्हणूनही पुरुष म्हणावा. 21
522-15
आणि विकारांची जे वारी । ते विपरीत ज्ञानाची परी । नेणिजे जिये माझारी । ते सुषुप्ती गा हा ॥522॥
विपरीत ज्ञानाचे खेळ जे विकारादि ते ज्या अवस्थेत मुळीच नसतात ती सुषुप्ति (व तोच अक्षर पुरुष होय. )
523-15
म्हणौनि यया आपैसे । क्षरणे या नसे । आणिकेही हा न नाशे । ज्ञानाउणे ॥523॥
त्या अक्षर पुरुषाच्या अज्ञानोपाधीचा स्वभावतः किंवा ज्ञानावाचून अन्य कशानेही नाश होणे शक्य नाही.
524-15
यालागी हा अक्षरु । ऐसा वेदांती डगरु । केला देशी थोरु । सिद्धांताच्या ॥524॥
म्हणूनच वेदान्त सिद्धान्ताच्या प्रदेशात ह्याला “ अक्षर ” अशी संज्ञा दिली आहे. 24
525-15
ऐसे जीवकार्य कारण । जया मायासंगुचि लक्षण । अक्षर पुरुषु जाण । चैतन्य ते ॥525॥
ज्या चैतन्याशी असलेला मायेचा संबंध जीवत्वदशा व जगत् कार्यं ह्यांना कारण आहे ते मायोपहित चैतन्य अक्षर पुरुष जाण. 25
उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः ॥
यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः ॥15. 17॥

दिवस २४९ वा. ६, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २९७७ ते २९८८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २९७७
तातडीची धाव अंगा आणि भाग । खोळंबा तो मग निश्चिंतांचा ॥१॥
म्हणउनि वरी विचारावी चाली । उरीचि ते बोली कामा येते ॥धृपद॥
कोरडे वैराग्य माजिरा बडिवार । उतरे तो शूर अंगींचे ते ॥२॥
तुका म्हणे बरी झऱ्याची ते चाली । साठवण्या खोली कासयांची ॥३॥
अर्थ
कोणत्याही गोष्टीसाठी जर तातडी केली धावाधाव केली तर आपल्या अंगाला व्यर्थ शीणभाग होऊन कामामध्ये निश्चिंतीचा खोळंबा येतो. त्यामुळे कोणतेही कार्य करताना विचारानेच केलेले चांगले राहाते आणि त्याविषयी मर्यादा ठेवून बोललेलेच कामाला येत असते. विवेक नसताना केवळ वैराग्याच्या कोरडया गोष्टी केल्या तर काही उपयोग होत नाही त्यामुळे केवळ उन्मत्तपणा आणि अविचारीपणाच वाढत जातो आणि ज्याच्या अंगी विवेक आणि वैराग्य आहे तोच खरा शूर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो झऱ्याची झुळझुळ वाहणारी चाल ही उत्तम परंतू साठवण झालेल्या पाण्याची खोली काय कामाची ठरते. ”
अभंग क्र. २९७८
मी तो बहु सुखी आनंदभरित । आहे साधुसंता मेळींकारी ॥१॥
काही व्हावे ऐसे नाही माझ्या जीवा । आणीक केशवा तुजविण ॥धृपद॥
न लगे वैकुंठ मोक्ष सायुज्यता । सुख वाटे घेता जन्म ऐसे ॥२॥
मृत्युलोकी कोण धरिले वासना । पावावया जनासवे दुःख ॥३॥
तुका म्हणे तुझा दास ऐसे लोका । काही सकळिका कळो यावे ॥४॥
अर्थ
साधूसंतांच्या भेटीमुळे व त्यांच्या मेळाव्यामध्ये मी खूपच सुखी व आनंद भरीत आहे. हे केशवा तुझ्या प्राप्तीवाचून इतर काही मला मिळावे किंवा मी काही व्हावे असे मला वाटत नाही. मला वैकुंठ किंवा सायुज्य मोक्ष नको आहे केवळ साधूसंतांच्या मेळाव्यामध्ये जन्म घ्यावा असे मला वाटते व त्यामुळेच मला सुख होते. या मृत्यूलोकामध्ये सामान्य लोकाबरोबर दु:ख भोगण्याकरीता जन्म मिळावा अशी वासना कोण धरतेय ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुझा दास झालो आहे त्यामुळे मी आनंदभरीत व सुखी झालो आहे हे सर्व लोकांना कळून यावे याकरताच मी हे सर्व सांगत आहे. ”
अभंग क्र. २९७९
घ्या रे लुटी प्रेम सुख । फेडा आजि धणी । चुकला तो मुकला । झाली वेरझारी हाणी ॥१॥
घाला घातला वैकुंठी । करूनिया जीवे साटी । पुरविली पाठी । वैष्णवी काळाची ॥धृपद॥
अवघे आणिले अंबर । विठोसहित तेथे धुर । भेदूनि जिव्हार । नामबाणी धरियेला ॥२॥
संचित प्रारब्ध क्रियमाण । अवघी झाली गहन । केली पापपुण्ये । देशधडी बापुडी ॥३॥
आनंदे गर्जती निर्भर । घोष करिती निरंतर । कापती असुर । वीर कवणा नागवती ॥४॥
जे दुर्लभ ब्रम्हादिका । आजि सापडले फुका । घ्या रे म्हणे तुका । सावचित्त होउनी ॥५॥
अर्थ
अरे तुम्ही प्रेमसुख घ्या ते लुटा आणि तुमची इच्छा पूर्ण करुन घ्या. आणि जो हे प्रेमसुख लुटण्याबाबत घेण्याबाबत व आपली इच्छा पूर्ण करुन घेण्याबाबत चुकला तो कायमचाच मुकला आणि जन्ममरणाची हानी त्याला प्राप्त झाली हेच समजावे. अहो वैष्णवांनी आपल्या जीवावर उदार होऊन वैकुंठावर घाला घातला आहे म्हणजे तेथे आपले स्थान निश्चिंत केले आहे. आणि वैष्णवांनी त्या कळीकाळाची पाठच पुरवली म्हणजे त्याच्यावर सत्ताच गाजवली आहे. वैष्णवांनी त्या विठोबाला त्याच्या परीवारासहीत अंबर म्हणजे आकाशातून खाली भूतलावर आणले आहे. आणि नामरुपी बाणाने त्याचे ह्दय भेदून त्याला विदीर्ण केले आहे. संचित प्रारब्ध आणि क्रियामान हे खूपच गहन आहे असे म्हणतात. परंतू वैष्णव त्यांच्यापेक्षाही गहन आहेत त्यांनी बिचाऱ्या पाप पुण्याला देखील देशोधडीला पोहोचविले आहे. वैष्णव हे आनंदी असतात आनंदाने हरीनामाचा जयघोष करतात हरीनामाचा गजर करतात व कोणावरही ते निर्भर नसतात. अशा वैष्णवांच्या पुढे असुर देखील थरथर कापतात ते कोणापुढेही नागवत नाहीत म्हणजे पराजीत होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “त्यामुळे हे लोकांनो जे हरीचे प्रेमसुख ब्रम्हादिकांना देखील दुर्लभ आहे ते तुम्हाला आज फुकट सापडले आहे. त्यामुळे तुम्ही सावधान व्हा चित्त सावध करा आणि मग हरीचे प्रेमसुख लुटा. ”
अभंग क्र. २९८०
तुझिया दासांचा हीन झालो दास । न धरी उदास मायबापा ॥१॥
तुजविण प्राण कैसा राहो पाहे । वियोग न साहे क्षणभरि ॥धृपद॥
आणिक माझ्या जीवे मोकलिली आस । पाहे तुझी वास पांडुरंगा ॥२॥
सर्वभावे तुज आणिला उचित । राहिलो निश्चिंत तुझे पायी ॥३॥
तुका म्हणे तुज असे माझा भार । बोलतो मी फार काय जाणे ॥४॥
अर्थ
हे मायबापा देवा मी तुझ्या दासांचाही हीन दास झालो आहे त्यामुळे माझ्याविषयी तू उदासीनता धरु नकोस. अहो देवा तुझा वियोग मला क्षणभर देखील सहन होत नाही मग तुझ्यावाचून माझा प्राण कसा राहील हे तूच आता पाहा. हे देवा पाडूरंगा माझ्या जीवाने आता सर्व इच्छांचा त्याग केला आहे ते केवळ तुझीच वाट पाहात आहेत. कायावाचामनाने मी माझा देह तुझ्याठिकाणी अर्पण केला आहे व तो देहच तुला अर्पण करण्यासाठी योग्य आहे उचित आहे व तो तुला अर्पण करुन तुझ्या पायाच्या ठिकाणी मी निश्चिंत राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी फारच बोलतो मला काय कळतेय परंतू एवढे मात्र कळते की, माझ्या योगक्षेमाचा भार तुझ्या खांदयावर आहे. ”
अभंग क्र. २९८१
तेचि करी मात । जेणे होईल तुझे हित ॥१॥
काय बडबड निमित्य । सुख जिव्हारी सिणविसी ॥धृपद॥
जो मुळव्याधी पीडिला । त्यासी देखोन हासे खरजुला ॥२॥
आराथ करी सोसी । त्यासि हासे तो आळसी ॥३॥
क्षयरोगी म्हणे परता । सर रोगिया कुष्ठता ॥४॥
वडस दोही डोळा वाढले । आणिका काने कोंचे बोले ॥५॥
तुका म्हणे लागो पाया । शुद्ध करा आपणिया ॥६॥
अर्थ
जेणेकरुन तुझे हित होईल अश्याच गोष्टी तू बोलत जा. अरे एखादया सुखी जीवाला निरर्थक बडबड करुन का शिणवतोस का त्रास देतोस ? ज्याला मूळव्याध झाला आहे त्याला पाहून खरुज झालेला व्यक्ती हसतोय. एखादा कष्ट करुन पूजा करतो परंतू त्याला आळशी मनुष्य हसत असतो. क्षयरोग असणारा व्यक्ती कृष्ठरोग असणाऱ्या व्यक्तीला म्हणतो अरे कोडल्या बाजूला सरक. ज्याच्या दोन्ही डोळयामध्ये वडस आलेले आहे ज्याचे दोन्ही डोळे तिरळे आहेत तो दुसऱ्याला तिरळा म्हणून टोचून बोलत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे मी तुमच्या पाया पडतो दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा तुम्ही स्वत:ला शुध्द करा एवढी विनंती करतो. ”
अभंग क्र. २९८२
कळो आला भाव माझा मज देवा । वायाविण जीवा आटकेली ॥१॥
जोडूनि अक्षरे केली तोंडपिटी । न लगे शेवटी हाती काही ॥धृपद॥
देव जोडे म्हणोन सांगतसे लोका । माझा मीच देखा दुःख पावे ॥२॥
तुका म्हणे माझे गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥३॥
अर्थ
देवा माझा आतरभाव मला आत कळून आला आहे इतक्या दिवस मी व्यर्थ जीवाची आटाआटीच केली आहे. मी अक्षराला अक्षर जोडून केवळ तोंडपिटी केली आहे परंतू शेवटी देखील माझ्या हाती काहीच लागले नाही अरे मी लोकांना सांगत होतो की, तुम्ही देवाची प्राप्ती करुन घ्या परंतू देवाची प्राप्ती करुन घेण्याविषयी मी समर्थ राहिलो नाही त्यामुळे मी दु:ख भोगत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा अरे मला संसारही नाही आणि तुझे पायही नाही असा प्रकारे दोन्ही ठिकाणी मला आता आधार राहिलाच नाही. ”
अभंग क्र. २९८३
आता तरी मज सांगा साच भावे । काय म्या करावे ऐसे देवा ॥१॥
चुकालिया वर्म नोहे ते कारण । केला होय सीण अवघाचि ॥धृपद॥
कळे म्हणवूनी करीतसे वाद । दिसे भेदाभेद अंतरीचा ॥२॥
तुका म्हणे नको पाहू तू निर्वाण । देई कृपादान याचकासी ॥३॥
अर्थ
अहो देवा आता तरी खऱ्या भावनेने तुम्ही सांगा की, मी काय करावे ? कोणतेही कार्य करत असताना जर त्या कार्‍याचे वर्म चुकले तर ते कार्य पूर्ण होत नसून आपल्याला तो त्रासच ठरतो व ते सर्व कर्म व्यर्थ ठरते. देवा अहो तुमच्या अंत:करणातील माझ्याविषयी भेदाभेद मला दिसतो आहे आणि तो मला कळला आहे म्हणूनच तर मी तुमच्याशी वाद तुमच्याशी भांडण करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा अरे तू माझा फार अंत पाहू नकोस मला याचकाला तू कृपादान दयावेस. ”
अभंग क्र. २९८४
बोल नाही तुझ्या दातृत्वपणासी । आम्ही अविश्वासी सर्वभावे ॥१॥
दंभे करी भक्ती सोंग दावी जना । अंतरी भावना वेगळिया ॥धृपद॥
चित्ताचा तू साक्षी तुज कळे सर्व । किती करू गर्व आता पुढे ॥२॥
तुका म्हणे देवा तू काय करिसी । कर्मा दुस्तरासी आमुचिया ॥३॥
अर्थ
अरे तुझ्या दातृत्वपणा विषयी बोलण्यासारखे काहीच नाही परंतू आम्हीच सर्वभावे अविश्वाशी आहोत. अहो आम्ही भक्ती तर करतो परंतू दंभाने भक्ती करतो लोकांना दाखवण्यासाठी आम्ही भक्ती करतो परंतू आमच्या अंत:करणात काहीतरी वेगळयाच भावना असतात. अरे देवा आमच्या चित्तात तूच साक्ष आहे तुला सर्व काही कळते पुढे आता आम्ही किती गर्व करावा ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा या आमच्या अवघड कर्मापुढे तू तरी काय करणार आहेस ? ”
अभंग क्र. २९८५
का हो पांडुरंगा न करा धावणे । तरि मज कोणे सोडवावे ॥१॥
तुझा म्हणऊनि आणिकापे उभा । राहो हे तो शोभा नेदी आता ॥धृपद॥
काळे पुरविली पाठी दुरवरी । पुढे पाय स्थिरी राहो नेदी ॥२॥
नको आणू माझे संचित मनासी । पावन आहेसी पतिता तू ॥३॥
तुका म्हणे चाले आणिकाची सत्ता । तुज आठविता नवल हे ॥४॥
अर्थ
अहो पाडूरंगा तुम्ही माझ्यासाठी का धावत नाहीत तुमच्यावाचून मला दुसरा कोण सोडवील ? अहो देवा मी स्वत:ला तुमचा म्हणून घेतो आणि दान मागण्यासाठी जर मी दुसऱ्यापुढे उभा राहिलो तर ते शोभण्यासारखे दिसणार नाही. काळाने तर माझा खूप जन्मापासून पाठलाग केला आहे तो काही मला एका जागी स्थिर राहू देत नाही. देवा अरे तू मागचे माझे पूर्वसंचित काही मनात आणू नकोस मी पतित आहे आणि तू पतितांना पावन करणारा आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे पाडूरंगा मी तुझे सारखे चिंतन करतो तरी देखील माझ्यावर दुसऱ्याची सत्ता चालावी हे फार नवलच वाटते. ”
अभंग क्र. २९८६
कावळ्याच्या गळा मुक्ताफळमाळा । तरी काय त्याला भूषण शोभे ॥१॥
गजालागी केला कस्तुरीचा लेप । तिचे तो स्वरूप काय जाणे ॥धृपद॥
बकापुढे सांगे भावार्थे वचन । वाउगाचि सीण होय त्यासी ॥२॥
तुका म्हणे तैसे अभाविक जन । त्यासी वाया सीण करू नये ॥३॥
अर्थ
कावळयाच्या गळयामध्ये मोत्याची माळ जरी घातली तरी त्याला ते शोभून दिसते काय ? हत्तीच्या अंगाला जरी कस्तुरीचा लेप लावला तरी कस्तुरीचे स्वरुप कस्तुरीचा सुगंध तो हत्ती काय जाणणार आहे ? बगळयाला कितीही समजून सांगितले की अरे मासे पकडण्यासाठी तू जे ध्यानस्थ बसण्याचे सोंग करतो तसे करु नये तरी त्याला ते पचनी पडणार आहे काय त्याला ते शब्द रुजणार आहेत काय उलट जो त्याला चांगले उपदेश वचन सांगेल त्यालाच त्याचा शीण होईल. तुकाराम महाराज म्हणतात, “अगदी त्याप्रमाणे जे अभाविक लोक आहेत त्यांना चांगला परमार्थिक उपदेश करण्याचा त्रास करुन घेऊ नये व व्यर्थ आपल्याला श्रमही करुन घेऊ नये. ”
अभंग क्र. २९८७
न कळसी ज्ञाना न कळसी ध्याना । न कळसी दर्शना धुंडाळिता ॥१॥
न कळसी आगमा न कळसी निगमा । न बोलवे सीमा वेदा पार ॥२॥
तुका म्हणे तुझा नाही अंतपार । म्हणोनि विचार पडिला मज ॥३॥
अर्थ
अहो देवा तुम्ही ज्ञानाने कळत नाही ध्यानाने कळत नाहीत साही दर्शनाने तुम्हाला सापडण्यास गेले तरीही तुम्ही सापडत नाहीत. देवा तू आगमाला आणि निगमाला म्हणजे शास्त्राला आणि वेदाला देखील कळत नाहीस तसेच ब्रम्हादिक देवांना देखील तुझे स्वरुपाची सीमा बोलवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुझा अंत:पारच कळत नाही त्यामुळे तुझी प्राप्ती कशी करुन घ्यावी हाच विचार मला पडत आहे. ”
अभंग क्र. २९८८
मायबापे सांभाळिती । लोभाकारणे पाळिती ॥१॥
तैसा नव्हे देवराव । याचा कृपाळु स्वभाव ॥धृपद॥
मनासारिखे न होता । बाळकासी मारी माता ॥२॥
तुका म्हणे सांगू किती । बाप लेंकासी मारिती ॥३॥
अर्थ
मायबाप मुलाचा सांभाळ करतात कारण पुढे जाऊन मुलगा आपल्याला सुख देईन या लोभानेच ते मुलाचे पालनपोषण करतात. परंतू माझा देवराव तसा नाही याचा स्वभावच मूलत:च कृपाळू आहे. जर आईच्या मनासारखे मुलाने केले नाही तर त्या बालकाला ती आई मारत असते. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो किती सांगावे बाप देखील मुलाला त्याच्या लेकराला मारत असतो. ”

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading