आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

९ सप्टेंबर, दिवस २५२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ५७६ ते ५९९ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३०१३ ते ३०२४
“९ सप्टेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 9 September
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ९ सप्टेंबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३०१३ ते ३०२४ चे पारायण आपण करणार आहोत.
९ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ५७६ ते ५९९,
576-15
म्हणौनि जगी गीता । मिया आत्मेनि पतिव्रता । जे हे प्रस्तुत तुवा आता । आकर्णिली ॥576॥
म्हणून प्रस्तुत तुला जिचे श्रवण घडले ती ही गीता, मला आत्मारामाला वरिल्यामुळे सर्व जगामध्ये पतिव्रता आहे. 76
577-15
साचचि बोलाचे नव्हे हे शास्त्र । पै संसारु जिणते हे शस्त्र । आत्मा अवतरविते मंत्र । अक्षरे इये ॥577॥
अर्जुना, खरे सांगतों; नुसत्या वाक्पांडित्यासठ हे गीताशास्त्र निर्माण झाले नाही, तर संसारशत्रुचा नाश करणारे हे शस्त्र आहे, अथवा, ही गीताक्षरे म्हणजे निर्गुण आत्म्याला मूर्त रूपाने अवतरित व्हावयास लावणारे जणु मंत्र आहेत. 77
578-15
परी तुजपुढा सांगितले । ते अर्जुना ऐसे जाले । जे गौप्यधन काढिले । माझे आजि ॥578॥
जवळचा गुप्त ठेवा बाहेर काढावा, तशासारखेच, आज तुला गीता ऐकविली, हे झालं. 78
579-15
मज चैतन्यशंभूचा माथा । जो निक्षेपु होता पार्था । तया गौतमु जालासि आस्था- । निधी तू गा ॥579॥
शंकराच्या जटेत गुप्त असलेल्या गंगेचे गौतमाच्या तपाने जसे अवतरण झाले त्याप्रमाणे चैतन्यशंभु जो मी, त्या माझ्या अंतःकरणात गुप्त असलेली जी ज्ञानगंगा, तिला मुखवाटे शब्दरूप प्रवाहाने अवतरविणारा तू दुसरा आस्थावान् गौतमच भेटलास म्हणावयाचा ! 79
580-15
चोखटिवा आपुलिया । पुढिला उगाणा घेयावया । तया दर्पणाचीचि परी धनंजया । केली आम्हा ॥580॥
आपल्या स्वच्छपणामुळे आरसा जसा पुढील वस्तूचे प्रतिबिंब आपल्यात आणतो त्याप्रमाणे धनंजया, तू आमच्या समोरील आरसाच झाला आहेस. 580
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
581-15
का भरले चंद्रतारांगणी । नभ सिंधू आपणयामाजी आणी । तैसा गीतेसी मी अंतःकरणी । सूदला तुवा ॥581॥
किंवा चंद्रतारांगणांनी भरलेले आकाश, सिंधु जसे आपल्यात प्रतिबिंबित करून घेतो, त्याप्रमाणे गीते सह तु मला आपल्या हृदयात प्रतिबिंबित करून घेतलेस. 81
582-15
जे त्रिविधमळिकटा । तू सांडिलासि सुभटा । म्हणौनि गीतेसी मज वसौटा । जालासि गा ॥582॥
अर्जुना, तुझ्या चित्तातील तिन्ही सळ (सत्वरजतम) नाहीसे झाले आहेत म्हणून गीतेचे व माझे तू निवासस्थान झाला आहेस. 82
583-15
परी हे बोलो काय गीता । जे हे माझी उन्मेषलता । जाणे तो समस्ता । मोहा मुके ॥583॥
ह्या गीतेची थोरवी काय बोलावी ! ही माझी ज्ञानवल्लीच होय. तिये ज्याला समग्र आकलन झाले तो सर्व मोहांपासून मुक्त होतो 83
584-15
सेविली अमृतसरिता । रोगु दवडूनि पंडुसुता । अमरपण उचिता । देऊनि घाली ॥584॥
अमृतगंगेचे पान केल्यावर रोग दवडून वर ती योग्य असे अमरत्व देते 84
585-15
तैसी गीता हे जाणितलिया । काय विस्मयो मोह जावया । परी आत्मज्ञाने आपणापया । मिळिजे येथ ॥585॥
त्याप्रमाणे गीता जाणल्यावर मोहमुक्त होईल ह्यात आश्चर्य हे काय ? पण आत्मज्ञानाने आपली आपल्याला भेट होणे (अपरोक्षज्ञान होणे) हे तिये जाणणे होय. 85
586-15
जया आत्मज्ञानाच्या ठायी । कर्म आपुलेया जीविता पाही । होऊनिया उतराई । लया जाय ॥586॥
आजवरच्या आपल्या श्रमायै चीज झाले म्हणून कर्म, आत्मज्ञानप्राप्तीचे उतराई होऊन लय पावते
587-15
हरपले दाऊनि जैसा । मागु सरे वीरविलासा । ज्ञानचि कळस वळघे तैसा । कर्मप्रासादाचा ॥587॥
हरवलेली जिन्नस शोधण्यासाठी ज्या खाणाखुणा अवश्य असतात त्यांची वस्तुप्राप्तीनंतर जशी गरज नसते त्याप्रमाणे कर्मरूप देवळाचा ज्ञान रूप कळस हाच शेवट होय. 87
588-15
म्हणौनि ज्ञानिया पुरुषा । कृत्य करू सरले देखा । ऐसा अनाथांचा सखा । बोलिला तो ॥588॥
म्हणून ज्ञानवानाचे विधिकिंकरत्व ( कर्तव्यबुद्धीने कर्म करणे ) संपले असे अनाथाचे नाथ (रमा रंग) म्हणाले. 88
589-15
ते श्रीकृष्णवचनामृत । पार्थी भरोनि असे वोसंडत । मग व्यासकृपा प्राप्त । संजयासी ॥589॥
ते श्री कृष्णवचनरूपी अमृत पार्थाच्या चित्तांत भरून वर उचंबळू लागले. तेच व्यासांच्या कृपेने संजयास प्राप्त झाले. 89
590-15
तो धृतराष्ट्र राया । सूतसे पान करावया । म्हणौनि जीवितांतु तया । नोहेचि भारी ॥590॥
ते अमृत, संजयाने राया धृतराष्ट्रास पाजिले. म्हणून त्याला (धृतराष्ट्राला) अंत समय कठिण गेला नाही. 590
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
591-15
एऱ्हवी गीताश्रवण अवसरी । आवडो लागता अनधिकारी । परि सेखी तेचि उजरी । पातला भली ॥591॥
पाहू गेले तर गीताश्रवणाच्या वेळीं, धृतराष्ट्र हा श्रवणाचा अधिकारी नाही असे वाटत असे; परंतु अंती तो उपदेश त्याला कामाला आला. 91
592-15
जेव्हा द्राक्षी दूध घातले । तेव्हा वाया गेले गमले । परी फळपाकी दुणावले । देखिजे जेवी ॥592॥
द्राक्षाच्या वेलास खत म्हणून दूध घालतात तेव्हा ते व्यर्थ गेले असे वाटले, तरी त्याचा परिपाक होऊन उत्तम पीक आले म्हणजे दुप्पट फायदा झाला असे जसे अनुभवास येते. 92
593-15
तैसी श्रीहरीवक्त्रीची अक्षरे । संजये सांगितली आदरे । तिही अंधु तोही अवसरे । सुखिया जाला ॥593॥
त्याप्रमाणे, श्रीहरीच्या मुखातील अक्षरे (उपदेश) संजयानं धृतराष्ट्रास सांगितली त्याने तो अंध धृतराष्ट्रही अंती सुखी झाला. 93
594-15
तेचि मऱ्हाटेनि विन्यासे । मिया उन्मेषे ठसेंठोंबसे । जी जाणे नेणे तैसे । निरोपिले ॥594॥
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तीच अक्षरे मराठी भाषेत माझ्या सामर्थ्याप्रमाणे मला समजली तशी ओबडधोबडपणे निरूपिली आहेत. 94
595-15
सेवंतीये अरिसि काही । आंग पाहता विशेषु नाही । परी सौरभ्य नेले तिही । भ्रमरी जाणिजे ॥595॥
शेवंतीच्या झाडाकडे पाहिले असता अरसिकला त्यात काही वैशिष्टय असेल असे वाटत नाही पण ते सुगंध सेवनाचे खरे अधिकारी जे भ्रमर त्यांनाच कळते 95
596-15
तैसे घडते प्रमेय घेइजे । उणे ते मज देइजे । जे नेणणे हेचि सहजे । रूप की बाळा ॥596॥
त्याप्रमाणे आपण धड म्हणजे सिद्धांताशौं पटणारे प्रमेय स्वीकारावे, प्रमाद घडले असतील ते माझे पदरांत टाकावे; कारण, मुले सहजच अजाण असावी हेच त्यांचे बालपण होय. 96
597-15
तरी नेणते जऱ्ही होये । तऱ्ही देखोनि बाप की माये । हर्ष केहि न समाये । चोज करिती ॥597॥
पण नेणत्या मुलाला पाहूनही आई व बाप ह्यांना अति हर्षे होऊन ते त्याचे कौतुक करितात. 97
598-15
तैसे संत माहेर माझे । तुम्ही मिनलिया मी लाडैजे । तेचि ग्रंथाचेनि व्याजे । जाणिजो जी ॥598॥
तसे संत हे माझे माहेर (आईबाप ) होय. तुमची भेट झाल्यावर मी लाडांत येतो ( हर्ष होतो ). ह्या हर्षातीलच ही कृति ( ग्रंथरचना ) असे समजावे. 98
599-15
आता विश्वात्मकु हा माझा । स्वामी श्रीनिवृत्तिराजा । तो अवधारू वा{क्} पूजा । ज्ञानदेवो म्हणे ॥599॥
अध्याय समाप्तीला महाराज म्हणतात, विश्वात्मक असे माझे स्वामी श्रीनिवृत्तिराज ते माझी वाक्पूजा स्वीकारोत. 599
॥ इति श्रीज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकायां पुरुषोत्तमयोगोनाम पञ्चदशोऽध्यायः ॥15॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 20॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 599॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २५२ वा. ९, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३०१३ ते ३०२४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३०१३
धन्य दिवस आजि डोळिया लाधला । आनंद देखिला धणीवरी ॥१॥
धन्य झाले मुख निवाली रसना । नाम नारायणा घोंष करू ॥धृपद॥
धन्य हे मस्तक सर्वांग शोभले । संताची पाउले लागताती ॥२॥
धन्य आजि पंथे चालती पाउले । टाळिया शोभले कर दोन्ही ॥३॥
धन्य तुका म्हणे आम्हासी फावले । पावलो पाउले विठोबाची ॥४॥
अर्थ
आज मी हरीचे आनंदस्वरुप माझ्या डोळयाची तृप्ती होईपर्यंत पाहिली त्यामुळे आजचा दिवस धन्य आहे. आज माझे मुख धन्य झाले आणि माझी जिव्हा म्हणजे रसना शांत झाली कारण ती नारायणाचा नामघोष करीत आहे. आज माझे मस्तक धन्य झाले कारण संतांची पाऊले या मस्तकाला लागलीत व त्यामुळे माझे सर्वांग शोभून दिसत आहे. आज माझे दोन्हीही पाऊले धन्य झाली आहेत कारण ते पंढरीच्या वाटेने चालत आहेत व चालताना हरीचे नाम घेऊन माझे दोन्हीही कर टाळया वाजवित आहेत त्यामुळे माझे हात देखील शोभत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “आज आम्ही धन्य झालो आहे कारण आम्हाला सहजरित्या विठोबाचे पाऊले प्राप्त झाली आहेत. ”
2:30
अभंग क्र. ३०१४
बरवी हे वेळ सांपडली संधि । साह्य झाली बुद्धी संचितासी ॥१॥
येणे पंथे माझी चालिली पाउले । दरुषण झाले संता पायी ॥धृपद॥
त्रासिले दरिद्रे दोषा झाला खंड । त्याचि काळे पिंड पुनीत झाला ॥२॥
तुका म्हणे झाला अवघा व्यापार । आली वेरझार फळासी हे ॥३॥
अर्थ
आज ही वेळ फार चांगली मिळाली आहे कारण माझ्या पूर्वसंचिताला बुध्दी साहाय्य झाली आहे. माझी बुध्दी मला साहाय्य झाली त्यामुळे मी परमार्थाच्या मार्गाने चालत आलो व त्या निमित्ताने मला संतांच्या पावलांचे दर्शन झाले. ज्या दारिद्रयाने ज्या दोषाने मला त्रास दिला त्याचा आता खंड झाला असून त्यावेळी माझा देह देखील पुनीत म्हणजे पुण्यवंत झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आता माझा सर्व व्यवहारच सरला असून माझी जन्ममरणरुपी येरझार फळाला आली आहे. ”
2:31
अभंग क्र. ३०१५
आपणा लागे काम वाण्याघरी गुळ । त्याचे याति कुळ काय कीजे ॥१॥
उकरड्यावरी वाढली तुळसी । टाकावी ते कैसी ठायागुणे ॥धृपद॥
गाईचा जो भक्ष अमंगळ खाय । तीचे दूध काय सेवू नये ॥२॥
तुका म्हणे काय सालपटासी काज । फणसांतील बीज काढुनि घ्यावे ॥३॥
अर्थ
आपले काम गूळाजवळ अडले आहे आणि गूळ वाण्याच्या घरी आहे मग त्याच्या जातीच्या आणि कुळाचे आपल्याला काय करायचे आहे आपण जावा आणि तो गूळ घेऊन यावा. उकिरडयावर जर तुळस वाढली तर मग त्या जागेच्या गुणामुळे तुळशीचा त्याग का करावा ? गाईचे खाणे अमंगळ असते म्हणून तिचे दुध आपण सेवन करु नये काय ? तुकाराम महाराज म्हणतात, “फणसातील सालपटयाशी (कातडे) आपले काय काम आहे तिचे तेवढे बीज गर काढून घ्यावा. ”
2:31
अभंग क्र. ३०१६
जयासी नावडे वैष्णवाचा संग । जाणावा तो मांग जन्मांतरी ॥१॥
अपवित्र वाचा जातीचा अधम । आचरण धर्म नाही जया ॥धृपद॥
मंजुळवदनी बचनागाची कांडी । शेवटी विघडी जीवप्राणा ॥२॥
तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध । तयासी गोविंद अंतरला ॥३॥
अर्थ
ज्यांना वैष्णवांची संगती आवडत नाही ते पूर्वजन्मी मांगच होते असे जाणावे. ज्याची वाचाच अपवित्र आहे आणि ज्याचे आचरण धर्मानुसार नाही तो जातीचाच अधम आहे असे समजावे. बचनागाची कांडी जर तोंडात घातली तर ती खाण्यास गोड लागते परंतू ती आपल्या जीवप्राणावर देखील बेतत असते त्याप्रमाणे अधम मनुष्याच्या संगतीने मनुष्याला त्रासच होत असतो जरी तो आपल्याशी चांगला वागत असला तरी. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्याचा पिताच शुध्द नाही त्याच्यापासून गोविंद अंतरला आहे. ”
2:31
अभंग क्र. ३०१७
वांझेने दाविले गऱ्हवार लक्षण । चिरगुटे घालून वाथयाला ॥१॥
तेवी शब्द झणी करिती चावटी । ज्ञान पोटासाठी विकूनिया ॥धृपद॥
बोलाचिच कढी बोलाचाचि भात । जेवुनिया तृप्त कोण झाला ॥२॥
कागदी लिहिता नामाची साकर । चाटिता मधुर गोडी नेदी ॥३॥
तुका म्हणे जळो जळो ते महंती । नाही लाज चित्ती निसुगाला ॥४॥
अर्थ
एखादया वांझ स्त्रीने जरी पोटाला चिरगुटी बांधून ती गर्भवती असल्याचे लक्षण दाखवले तरी ते व्यर्थच ठरते. त्याप्रमाणे काही लोक असे आहेत की त्यांना शब्दज्ञान आहेत परंतू लोकांच्यापुढे ते बडबड करतात आणि ते शब्दज्ञान पोटासाठी विकतात. अहो नुसतेच बोलले की कढी घ्या किंवा नुसतेच बोलले भात घ्या तर असे जेवण करुन कुणी तृप्त झाले काय ? एखादया कागदावर नुसतेच साखरेचे नांव लिहिले व त्या साखरेच्या नावावर जीभेने चाटले तर साखरेची गोडी आपल्याला चाटल्यावर लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा शब्दज्ञान असणाऱ्या माणसाच्या महतीला आग लागो ते जळून जाओ अशा कोडग्या माणसाची कितीही विटंबना झाली तरी त्याच्या चित्तात लाजच नसते. ”
2:31
अभंग क्र. ३०१८
जुंझायाच्या गोष्टी ऐकताचि सुख । करिता देह दुःख थोर आहे ॥१॥
तैसी हरीभक्ति सुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥धृपद॥
पिंड पोसिलिया विषयांचा पाइक । वैकुंठनायक कैचा तेथे ॥२॥
तुका म्हणे व्हावे देहासी उदार । रखुमादेवीवर जोडावया ॥३॥
अर्थ
युध्दाच्या केवळ गोष्टी ऐकण्यास सुख वाटते परंतू प्रत्यक्ष युध्द करण्याचा प्रसंग आला तर देहाला फार मोठे दु:ख होते. त्याप्रमाणेच हरीभक्ती म्हणजे सुळावरील पोळीच आहे आणि जो हरीभक्ती प्राप्त करतो तो हजारातून एखादाच बलवान शूर वेगळा निवडला जातो. जे देहाचे पालनपोषण करतात विषयांचे जे पाईक आहेत तेथे वैकुंठनायक कसा असेल ? तुकाराम महाराज म्हणतात, “रखुमादेवीवर जो पाडूरंग आहे त्याची प्राप्ती करुन घेण्यासाठी देहावर उदार व्हावे लागते. ”
2:31
अभंग क्र. ३०१९
अंगी ब्रम्हक्रिया खिस्तीचा व्यापार । हिंडे घरोघर चांडाळाचे ॥१॥
अंत्यजाची खिचडी घेताती मागून । गाळियाप्रधानि मायबहिणी ॥धृपद॥
उत्तमकुळी जन्म क्रिया अमंगळ । बुडविले कुळ उभयता ॥२॥
तुका म्हणे ऐसी कलयुगाची चाली । स्वार्थे बुडविली आचरणे ॥३॥
अर्थ
काही ब्राम्हण असे आहेत की जे व्याज बट्टयाचा व्यापार करतात आणि पैसे वसूल करण्याकरता चांडाळाच्या घरोघरी हिंडतात. हे असे लोक जर भूक लागली तर पोटासाठी अंत्यजाकडून देखील खिचडी मागून घेतात व खातात आणि व्यापार करताना एखादयाने पैसे दिले नाही तर त्याला त्याच्या माय बहिणीवर देखील शिव्या देतात. अशा ब्राम्हणांचा जन्म जरी उत्तम कुळात झाला असला तरी देखील त्यांचे कर्म अमंगळ असते त्यामुळे त्याने त्याच्या आई व वडील या दोन्ही कुळांना नरकामध्येच बुडवलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो हा तर कलीयुगाचा व्यापारच आहे कलीयुगामध्ये लोक स्वार्थासाठी आपले आचरण देखील बुडवत असतात. ”
2:32
अभंग क्र. ३०२०
पाषाण प्रतिमा सोन्याच्या पादुका । हे तो हाती एका समर्थाचे ॥१॥
अनामिका हाती समर्थाचा सिक्का । न मानिता लोका येईल कळो ॥२॥
तुका म्हणे येथे दुराग्रह खोटा । आपुल्या अदृष्टा शरण जावे ॥३॥
अर्थ
पाषाणाची मूर्ती तयार केली जाते विष्णूची मूर्ती तयार झाली की तिला सोन्याच्या पादूका बसवल्या जातात परंतू जेवढे सामर्थ्य मूर्तीच्या ठिकाणी आहे तेवढे सामर्थ्य पादूकाच्या ठिकाणी नसते कारण वेद हा एक समर्थ आहे की जो पाषाणामध्येही देवत्व आणत असतो व मंत्रोपचारानेच पाषाणाच्या ठिकाणी देवत्व येते. एखादया अंत्यज व्यक्तीच्या हातामध्ये राजाचा शिक्का मुद्रीत करुन कागद जरी दिला तरी लोकांना तो मान्य करावा लागतो अन्यथा मान्य केला नाही तर त्याचे दुष्परिणाम लोकांना कळून येईल. तुकाराम महाराज म्हणतात “येथे याविषयी दुराग्रह धरणे हे खोटे ठरते व्यर्थ ठरते त्यामुळे आपआपल्या संचिताला शरण जावे. ”
2:32
अभंग क्र. ३०२१
बहु या प्रपंचे भोगविल्या खाणी । ठाकोनिया मनी आला सीण ॥१॥
आता पायापाशी लपवावे देवा । नको पाहू सेवा भक्ती माझी ॥धृपद॥
बहु भय वाटे एकाच्या बोभाटे । आली घायवटे फिरोनिया ॥२॥
तुका म्हणे सिगे भरू आले माप । वियोग संताप झाला तुझा ॥३॥
अर्थ
देवा या प्रपंचाने मला खूप जन्ममरणाच्या खाणी भोगविल्या आहेत त्यामुळे आता मला त्याचा इतका शीण आला आहे की मनाला वाटते त्याला टाकून दयावे. देवा आता त्यामुळे तू मला तुझ्या पायापाशी लपव माझी सेवा भक्ती माझा भक्तीभाव काहीही पाहू नको. देवा मला त्या नरकाचा भोग वाटा ऐकून खूप भय वाटत आहे. आणि अनेक जीव यापूर्वी खूप जन्ममरणाचे दु:ख देखील भोगून फिरुन आले आहेत. या बोभाटयाने देखील मला भय वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा माझ्या आयुष्यरुपी मापाचे माप आता शिगेपर्यंत भरत आले आहे आणि मला तुझ्या वियोगाने संताप होत आहे व दु:खही होत आहे. ”
2:33
अभंग क्र. ३०२२
धरूनिया मनी बोलिलो संकल्प । होसी तरि बाप सिद्धी नेई ॥१॥
उत्कंठा हे आजी झाली माझे पोटी । मागीलया गोठी टाळाटाळि ॥धृपद॥
माझा मज असे ठाउका निर्धार । उपाधि उत्तर न साहे पै ॥२॥
तुका म्हणे जरि दिली आठवण । तरि अभिमान धरी माझा ॥३॥
अर्थ
देवा मी मनामध्ये जो काही तुझ्या भेटीचा संकल्प बोललो आहे तो तू माझा बाप आहेस म्हणून तो संकल्प तूच सिध्दीला न्यावा. देवा माझे मागील सगळे पाप आणि सर्व गोष्टी तू आता विसरुन जा आणि मला भेट दे कारण माझ्या मनामध्ये तुला भेटण्याची तीव्र उत्कंठा आज निर्माण झाली आहे. देवा माझा जो निर्धार आहे तो म्हणजे तुला कोणत्याही प्रकारचे उपाधी स्वरुप दान मागायचे नाही तो निर्धार मला ठाऊक आहे आणि त्यामुळे तू जर माझ्याशी उपाधी स्वरुपाचे काही बोलायचे ठरवलेच तर ते मला सहन होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा माझा जो निर्धार आहे मी त्याची आठवण तुला करुन दिली आहे तरी तू आता माझा अभिमान धरावा. ”
2:33
अभंग क्र. ३०२३
आजिवरी होतो संसाराचे हाती । आता ऐसे चित्ती उपजले ॥१॥
तुला शरणागत व्हावे नारायणा । अंगीकारा दिना आपुलिया ॥धृपद॥
विसरलो काम याजसाठी धंदा । सकळ गोविंदा माझे तुझे ॥२॥
तुका म्हणे विज्ञापना परिसावी । आवडी हे जीवी झाली तैसी ॥३॥
अर्थ
आतापर्यंत मी संसाराच्या हाती होतो परंतू आता माझ्या चित्तात असे आले आहे, की हे नारायणा तुम्हाला शरण यावे त्यामुळे आपल्या दीनभक्ताचा तुम्ही अंगीकार करावा. हे गोविंदा मी तुझ्यासाठी माझा सर्व कामधंदा आणि माझे तुझे ही भावना देखील विसरलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा माझ्या जीवाला जी तुम्हाला शरण येण्याची आवड निर्माण झाली आहे ती माझी विनंती तुम्ही मान्य करावी. ”
2:33
अभंग क्र. ३०२४
धन्यधन्य ज्यास पंढरीसी वास । धन्य ते जन्मास प्राणी आले ॥१॥
बहु खाणीमध्ये होत कोणी एक । त्रिगुण कीटक पक्षिराज ॥धृपद॥
उत्तम चांडाळ नर नारी बाळ । अवघेचि सकळ चतुर्भुज ॥२॥
अवघा विठ्ठल तेथे दुजे नाही । भरला अंतर्बाहि सदोदीत ॥३॥
तुका म्हणे तेथे होउनी राहेन । सांडोवा पाषाण पंढरीचा ॥४॥
अर्थ
ज्यांना पंढरीचा वास घडतो ते धन्य धन्य आहेत आणि जे प्राणी पंढरीतच जन्माला आहेत तेही धन्य आहेत. पंढरीमध्ये कोणीही जन्माला येवो मग ते कीटक असो, पक्षीराज असो, दीन असो, हीन असो, दरिद्री असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो किंवा राजस, तामस, सात्विक यापैकी कोणीही असो ते सर्व धन्यच आहेत. पंढरीमध्ये सर्वत्र एक विठ्ठलच आहे दुसरे तेथे काहीही नाही आतरबाह्य सर्वत्र सर्वकाळ विठ्ठलच तेथे भरलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “ जसा एखादा दगड टाकून द्यावाना तसा दगड सुध्दा होऊन मी त्या पंढरीत राहीन. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















