२ सप्टेंबर, दिवस २४५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ४०१ ते ४२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २९२९ ते २९४०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२ सप्टेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २ September
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २ सप्टेंबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २९२९ ते २९४० चे पारायण आपण करणार आहोत.
२ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ४०१ ते ४२५,

गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा ।
पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥15. 13॥
401-15
मी रिगालो असे भूतळी । म्हणौनि समुद्र महाजळी । हे पासूचि ढेपुळी । विरेचिना ॥401॥
मी पृथ्वीमध्ये प्रवेश केला आहे म्हणून, समुद्रासारख्या महाजलाशयात, ही रजःकणांनी बनलेली पृथ्वीरूप ढेपळी विरून जात नाही. 1
402-15
आणी भूतेही चराचरे । हे धरितसे जिये अपारे । तिये मीचि धरी धरे । रिगोनिया ॥402॥
आणि ही पृथ्वी, जी असंख्य स्थावरजंगमभूते आपल्यावर धारण करते त्या पृथ्वीमध्ये प्रवेशून मीच तिला धारण करतो. 2
403-15
गगनी मी पंडुसुता । चंद्राचेनि मिसे अमृता । भरला जालो चालता । सरोवरु ॥403॥
अर्जुना, मी गगनांत चंद्राच्या रूपाने जणु काही अमृताचे चालते सरोवर झालो आहे. 3
404-15
तेथूनि फांकती रश्मिकर । ते पाट पेलूनि अपार । सर्वौषधींचे आगर । भरित असे मी ॥404॥
तेथून (चंद्रापासून) अमृतश्राव करणारी किरणे फांकतात. त्यांचे ओघ बनवून सर्व औषधींच्या वनाचे मी पोषण करितों. 4
405-15
ऐसेनि सस्यादिका सकळा । करी धान्यजाती सुकाळा । दे अन्नद्वारा जिव्हाळा । भूतजाता ॥405॥
अशाप्रकारे सर्व जातीच्या धान्यादि पिकांचे पोषण करून, त्यांचा सुकाळ करितो व अन्नद्वारा सर्व भूतांचे मी रक्षण करतो. 5


406-15
आणि निपजविले अन्न । तरी तैसे कैचे दीपन । जेणे जिरूनि समाधान । भोगिती जीव ॥406॥
आणि अन्न जरी तयार केले तरी ते पचवून जीवांना समाधान होईल अशी त्यांच्या ठिकाणी दीपक (पाचक) शक्ति कोठची असणार ? 6
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥15. 14॥
407-15
म्हणौनि प्राणिजातांच्या घटी । करूनि कंदावरी आगिठी । दीप्ति जठरीही किरीटी । मीचि जालो ॥407॥
म्हणुन (पचन व्हावे म्हणून) प्राणिजातांच्या शरीरात नाभिकंदावर आगटी ठेवून अर्जुना, जठराग्नीही मीच झालो. 7
408-15
प्राणापानाच्या जोडभाती । फुंकफुंकोनिया अहोराती । आटीतसे नेणो किती । उदरामाजी ॥408॥
प्राण व अपान या वायूच्या जोड भात्याने अहोरात्र ती शेगडी फुंकून, फुंकून उदरामध्ये किती अन्न जिरविले असेल ते सांगता नये. 8
409-15
शुष्के अथवा स्निग्धे । सुपक्वे का विदग्धे । परी मीचि गा चतुर्विधे । अन्ने पची ॥409॥
ओली, सुकी, शिजलेली, भाजलेली वगैरे चारी प्रकारची अन्ने मीच पचवितों. 9
410-15
एवं मीचि आघवे जन । जना निरविते मीचि जीवन । जीवनी मुख्य साधन । वन्हिही मीचि ॥410॥
अशाप्रकारे सर्व प्राणी मीच आहे, त्यांच्यानिर्वाहास लागणारे अन्न मीच आहे; व अन्न पचविण्याचे मुख्य साधन जो जठराग्नि तोही मीच आहे, 41०
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


411-15
आता ऐसियाहीवरी काई । सांगो व्याप्तीची नवाई । येथ दुजे नाहीचि घेई । सर्वत्र मी गा ॥411॥
आता याहीपेक्षा माझ्या व्यापकपणाची नवाई तुला काय सांगू ? अरे, जगात दुसरे असे काही नाहीच; सर्वत्र मीच आले असे जाणः 11
412-15
तरी कैसेनि पा वेखे । सदा सुखिये एके । एके तिये बहुदुःखे । क्रांत भूते ॥412
( पुढील दोन ओव्यात अर्जुनाच्या संभाव्य शंकेचे देव आपणच उत्थापन करून म्हणतात. ) तर मग काही भूतांचे आकार (मनुष्यादि) सुखी असावे व काहीचे (पश्वादि) सदा दुःखाक्रान्त असावे असे का ? 12
413-15
जैसी सगळिये पाटणी । एकेचि दीपे दिवेलावणी । जालिया का न देखणी । उरली एके ॥413॥
जसे सर्व नगरांत एकाच जातीचे दिवे लावल्यास त्यातील काही प्रकाशतात, काही प्रकाशतच नाहीत असे होईल का ? 13
414-15
ऐसी हन उखिविखी । करित आहासि मानसी की । तरी परिस तेही निकी । शंका फेडु ॥414॥
अर्जुना, तुझ्या मनात असे तर्कवितर्क येत असणारच; पण त्या शंकेचेही निरसन करितो ते ऐक. 14
415-15
पै आघवा मीचि असे । येथ नाही कीर अनारिसे । परी प्राणियांचिया उल्लासे । बुद्धि ऐसा ॥415॥
हे पहा सर्वत्र माझी व्याप्ति आहे अथवा सर्व मीच आहे ह्याबद्दल विवादच नाही; परंतु, विचित्रता दिसण्याचे कारण प्राण्यांच्या बुद्धि उपाधींचे वैचित्र्य होय. (माझ्यात बदल नाही. ) 15


416-15
जैसे एकचि आकाशध्वनी । वाद्यविशेषी आनानी । वाजावे पडे भिन्नी । नादांतरी ॥416॥
आकाशाचा ध्वनि सदा एकरूप असूनही, भिन्न भिन्न वाद्यांच्या उपाधिद्वारा श्रवणावर येऊ लागला म्हणजे आकाशाच्या ध्वनीतच भिन्नता आहे अस वाटते. 16
417-15
का लोकचेष्टी वेगळाला । जो हा एकचि भानु उदैला । तो आनानी परी गेला । उपयोगासी ॥417॥
उगवलला एकच सूय किंवा सूर्यप्रकाश जस लोकांच्या भिन्नभिन्न व्यापाराला उपयोगी पडतो. 17
418-15
नाना बीजधर्मानुरूप । झाडी उपजविले आप । तैसे परिणमले स्वरूप । माझे जीवा ॥418॥
किंवा पाणी तेच; पण त्या त्या बीजधर्मानुसार वृक्षांमध्ये भिन्न भिन्न परिणाम पावते, तसे मी नित्य एकरूप असता उपाधीच्या योगे भिन्न भिन्न स्वरूपाचा वाटतो. 18
419-15
अगा नेणा आणि चतुरा । पुढा निळयांचा दुसरा । नेणा सर्पत्वे जाला येरा । सुखालागी ॥419॥
अरे, अज्ञ आणि तज्ज्ञ (अशा दोन पुरुषांपुढे पडलेला एकच दोन पदरी नीलमण्यांचा हार पहिल्याला सर्पभ्रांतीमुळे दुःखाला कारण झाला तर दुसऱ्याला (तज्ज्ञाला) हार अशी प्रज्ञा होऊन सुखास कारण झाला. 19
420-15
हे असो स्वातीचे उदक । शुक्ती मोती व्याळी विख । तैसा सज्ञानांसी मी सुख । दुःख तो अज्ञानांसी ॥420॥
किंवा आणखी दृष्टांत एकाच स्वातिनक्षत्राचे पाणी शुक्तीत पडले तर मोती होते, सर्प मुखात पडले तर आणि विष रूपाने परिणाम पावते, त्याप्रमाणे ज्ञान्यांना सुखरूप जो मी, तो सुखाला कारण होतो व तोच सुखरूप मी अज्ञान्याला दुःखाला कारण होतो. 420
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेवचाहम् ॥15. 15॥
421-15
एऱ्हवी सर्वाच्या हृदयदेशी । मी अमुका आहे ऐसी । जे बुद्धि स्फुरे अहर्निशी । ते वस्तु गा मी ॥421॥
अरे, थोडक्यात माझी खूण अशी आहे. ” मी म्हणून एक असा आहे ” असे जे स्फुरण (ज्ञान) प्राण्यांच्या ठिकाणी रात्रंदिवस असते, ते माझे स्वरूप होय. 21
422-15
परी संतासवे वसता । योगज्ञानी पैसता । गुरुचरण उपासिता । वैराग्येसी ॥422॥
परंतु (ते वस्तु, (मत्स्वरूप, ) यथार्थत्वाने केव्हा कळणार ? तर, ) संत समागम करशील, योग आणि ज्ञान अथवा ज्ञानयोगाचा अभ्यास करशील व वैराग्ययुक्त होत्साता सद्गुरू ह्या बुद्धीने त्यांची सेवा करशील 22
423-15
येणेचि सत्कर्मे । अशेषही अज्ञान विरमे । जयांचे अहं विश्रामे । आत्मरूपी ॥423॥
तेव्हां, आणि ह्याच एका पुण्याचरणाने (माझ्या प्राप्तीच्या आड येणारें, ) अज्ञान समूळ नाश पावतें; (त्याची खूण काय ?) ज्यांचा अहंकार, त्याला प्रकाशित करणाऱ्या आत्मस्वरूप दर्शनाने विश्रांतीला गेला आहे, (म्हणजे बाधित होऊन ज्याचे पूर्वस्वरूप गेले आहे) 23
424-5
ते आपेआप देखोनि देखी । मिया आत्मेनि सदा सुखी । येथे मीवाचून अवलोकी । आन हेतु असे ? ॥424॥
त्यांना आत्मदर्शन म्हणजे सुखरूप जो मी त्या माझेच दर्शन झाल्यामुळे, ते सदा सुखी असतात. मग हे पहा ! या व्यवहारांत त्यांच्या सुखाचा माझ्यावाचून अन्य कोणता हेतु आहे ? 24
425-15
अगा सूर्योदयो जालिया । सूर्ये सूर्यचि पहावा धनंजया । तेवी माते मिया जाणावया । मीचि हेतु ॥425॥
अर्जुना, दिवस उगवल्यावर, सूर्याच्या तेजानेच सूर्य पहावा लागतो, त्याप्रमाणे, माझे ज्ञाननही माझ्या सहाय्यानेच (मजकडूनच) होत असते. 25

दिवस २४५ वा. २, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २९२९ ते २९४०
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २९२९
आता देवा मोकलीले । तुम्ही भले दिसेना ॥१॥
आता नाही जीवभाव । उरला ठाव वेगळा ॥धृपद॥
सांभाळुन घ्यावे देवा । आपणासवा यावरी ॥२॥
तुका म्हणे नग्न भाज । तरि ते लाज स्वामीसी ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही आता मला मोकाट सोडले आहे परंतू हे तुमच्यासाठी चांगले दिसत नाही. आता माझ्या जीवाभावाचे दुसरे वेगळे कोणते ठिकाण राहिले नाही. देवा तुम्ही माझा स्वीकार करा आणि “हा आपलाच आहे” असे समजून माझा सांभाळ करा. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा जर एखादया व्यक्तीची बायको नग्न अवस्थेत बाहेर पडली तर त्याची सर्वस्वी लाज तिच्या पतीला वाटते अगदी त्याप्रमाणेच आपल्या दोघाचे संबंध आहेत. ”
अभंग क्र. २९३०
आशाबद्ध आम्ही भाकितसो कीव । तत्पर हा जीव कार्‍यापाशी ॥१॥
प्रतिउत्तराची पाहातसे वाट । करूनि बोभाट महाद्वारी ॥धृपद॥
आपुल्या उचिते करूनिया ठेवी । संबंध गोसावी तोडोनिया ॥२॥
तुका म्हणे एक झालिया निवाड । कोण बडबड करी मग ॥३॥
अर्थ
देवा आमचा जीव आशाबध्द आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला करुणा भाकीत आहोत. आमचा जीव तुमचे कार्य करण्यासाठी तत्पर आहे. देवा आम्ही तुमच्या महाव्दारामध्ये उभा राहून तुमच्या नामाचा जयघोष करत आहोत व तुमच्या प्रत्युत्तराची वाट पाहात आहोत. हे माझ्या स्वामी तुम्ही आपल्या योग्यतेप्रमाणे मला करुन ठेवा आणि माझा संसारसंबंध तोडून टाका. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा अहो एकदा की आपण दोघेही एकमेकाच्या कार्‍याविषयी तत्पर झालो की मग व्यर्थ बडबडच कोण करील ? ”
अभंग क्र. २९३१
खद्योते फुलविले रविपुढे ढुंग । साक्षी तव जग उभयता ॥१॥
आपल्या आपण नाही शोभो येत । चार करी स्फीत दाखवूनि ॥धृपद॥
खाणार ताकाचे असे त मांजर । आपणचि अधीर कळो येते ॥२॥
तुका म्हणे जळो मैंदाची मवाळी । दावूनिया नळी कापी सुखे ॥३॥
अर्थ
काजव्याने सूर्‍याकडे ढुंगण करुन त्याचा प्रकाश प्रकाशीत केला तर सूर्य आणि काजवा या दोघामधे जास्त प्रकाश कोणाचा आहे याविषयी सर्व जगच साक्षी राहाणार आहे. आपला मोठेपणा आपण राखविणे हे योग्य नाही परंतू काही मूर्ख लोक असे आहेत की जे आपला मोठेपणा सर्व जगभर मिरवत फिरत असतात. ताक सेवन करणारा मांजरा असतो त्याच्या त्या कर्मानुसारच तो किती अधीर आहे हे कळून येते. तुकाराम महाराज म्हणतात, “मैंद लोकांचे बोलणे म्हणजे लबाड लोकांचे बोलणे कितीही गोड असो परंतू त्याचा काहीही उपयोग नाही त्यांच्या बोलण्याला आग लागो त्यांचे बोलणे म्हणजे बकऱ्यांना जसा लोभ दाखवून त्यांना जवळ घेऊन खाटीक त्याची मान सुखाने कापतो तसे मैंद लोकांचे बोलणे घातक असते. ”
अभंग क्र. २९३२
नाही सरो येत कोरड्या उत्तरी । जिव्हाळ्याची बरी ओल ठायी ॥१॥
आपुलिया हिता मानिसी कारण । सत्या नारायण साह्य असो ॥धृपद॥
निर्वाणी निवाड होतो आगीमुखे । तप्त लोह सुखे धरिता हाती ॥२॥
तुका म्हणे नेम न टळता बरे । खऱ्यासीचि खरे ऐसे नांव ॥३॥
अर्थ
ब्रम्हज्ञानाच्या नुसत्या कोरड्या गप्पा मारुन उपयोग होत नाही ते लोकांना मान्यही होत नाही तर ब्रम्हज्ञानाच्या अनुभवाचा जिव्हाळाही लागतो तरच त्याचे बोलणे चांगले ठरते. आपले हित व्हावे यासाठी जर खरा परमार्थ तू केला तर नारायण देखील तुला त्यात साहाय्य करेल कारण नारायण सत्यकर्म करताना त्याला नेहमी साहाय्य करत असतो. एखादा मनुष्य निर्दोष असेल आणि मी निर्दोष आहे हे सिध्द करुन दाखवण्यासाठी तो अतिशय तप्त झालेला लोह हातामध्ये अगदी सुखाने धरतो आणि त्यावेळी त्याच्या हाताला पोळत देखील नाही यावरुन अग्नीच्या मुखातून अशा निर्वाणीच्यावेळी निवाडा होतो की हा मनुष्य निर्दोष आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “यामुळे खरे कार्य करण्यासाठी जो नियम आहे तो नियम टाळू नये हेच बरे कारण जे खरे आहे त्याचे नांव नेहमी खरेच असते. ”
अभंग क्र. २९३३
आलो उल्लंघुनि दुःखाचे पर्वत । पायापाशी हित तुमच्या तरी ॥१॥
न देखेचि लासा दुःखी होते मन । कठिणे कठिण वाटतसे ॥धृपद॥
नव्हे सांडी परि वाटते निरास । न ये माझा दिस संकल्पाचा ॥२॥
तुका म्हणे तुम्ही सदैव जी देवा । माझ्या हाचि जीवा एक ठाव ॥३॥
अर्थ
देवा तुमच्या पायाजवळ माझे हित आहे त्यामुळेच तर सर्व दु:खाच्या पर्वताचे उल्लंघन करुन मी तुमच्या पायाजवळ आलो आहे. परंतू देवा माझे हित होताना मला काही दिसत नाही त्यामुळे माझे मन दु:खी होत आहे आणि सर्व काही कठीणच वाटत आहे. देवा मी तुमचे चरण सोडणार नाही हे मात्र खरे आहे पण माझा संकल्पही पूर्ण होत नाही त्यामुळे मन निराश होत आहे आणि माझा संकल्प पूर्ण होत नाही की काय असे मला वाटायला लागले आहे. तुकाराम महाराज म्हणतात “देवा अहो तुम्ही तर सदैव भाग्यवानच आहात त्यामुळे तुम्हाला आमची गरज वाटत नाही परंतू माझ्या जीवाला तर एक तुमचाच एक आश्रय आहे. ”
अभंग क्र. २९३४
किती सोसिती करंटी । नेणो संसाराची आटी । सर्वकाळ पोटी । चिंतेची हळहळ ॥१॥
रिकामिया तोंडे राम । काय उच्चारिता श्रम । उफराटा भ्रम । गोवा विषय माजिरा ॥धृपद॥
कळता न कळे । उघडे झाकियेले डोळे । भरले त्याचे चाळे । अंगी वारे मायेचे ॥२॥
तुका म्हणे जन । ऐसे नावबुद्धीहीन । बहुरंगे भिन्न । एकी एक न मिळे ॥३॥
अर्थ
ही करंटी माणसे संसाराचे दु:ख किती सोसत आहेत हे कळत नाही. यांच्या पोटामध्ये सदा सर्वकाळ चिंता आणि हळहळ एवढेच असते. रिकाम्या तोंडाने रामाच्या नामाचा उच्चार जर केला तर या लोकांना काही श्रम होणार आहे की काय ? परंतू ते उलट भ्रम आणि विषयभोग यामधे ते गुंतून पडतात व त्यांना ते उन्मत्त करतात या लोकांना सर्व काही कळते परंतू न कळल्याचे सोंग करतात जसे डोळे उघडे आहे पण झाकल्यासारखे ते करतात. कारण यांच्या अंगामध्ये मायेचे वारे भरले आहे व ते मायेचे वारेच यांच्याकडून अनेक प्रकारचे चाळेच करुन घेत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा प्रकारच्या लोकांचे नांव बुध्दीहीनच असते. प्रत्येक अज्ञानी लोकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतात हे बहुरंगी असतात त्यामुळे तर यांचा स्वभाव एकमेकांशी मिळत नाही. ”
अभंग क्र. २९३५
मंगळाचा मंगळ साटा । विट तोटा नेणे ते ॥१॥
हे भरा साते आले । भले भले म्हणवावे ॥धृपद॥
जनी जनार्दन वसे । येथे दिसे ते शुद्ध ॥२॥
तुका म्हणे बहुता मुखे । खरे सुखे ठेवावे ॥३॥
अर्थ
मंगळाकडे नेहमी मंगळ गोष्टींचा साठा असतो त्यामुळे ते कधीही वीट आणि नुकसान जाणत नाही. त्यामुळे या त्रिभूवनामधे जे मंगळ आहे ते हरीचे नाम आहे ते हरीरामरुपी मंगल माल तुम्ही भरुन घ्या आणि संताकडून भले भले असे म्हणून घ्यावे. एकदा की तुम्ही हरीनामरुपी मंगल माल भरुन घेतला की मग जगामधे जनार्दन कसा वसलेला आहे हे दिसून येईल. तुकाराम महाराज म्हणतात, “अनेक संतांच्या मुखातून जे खरे हरीनामरुपी मंगल नाम आले आहे ते सुखाने आपल्याजवळ साठवून ठेवावे. ”
अभंग क्र. २९३६
नामाचा महिमा बोलिलो उत्कर्ष । अंगी काही रस न येचि तो ॥१॥
कैसे समाधान राहे पांडुरंगा । न लगेचि अंगा आणी काही ॥धृपद॥
लाभाचिये अंगी सोस कवतुके । फिक्याचे ते फिके वेवसाव ॥२॥
तुका म्हणे करा आपुला महिमा । नका जाऊ धर्मावरी माझ्या ॥३॥
अर्थ
देवा मी तुमच्या नामाचा महिमा तसेच उत्कर्ष खूप लोकांना सांगितला आहे परंतू तसा रस अनुभव मला काही अजून आला नाही. देवा अहो तुमच्या नामाचा व उत्कर्षाचा अनुभव माझ्या अंगी आलाच नाही तर अंगामध्ये समाधान तरी कसे राहील ? हे देवा अहो जर एखादा व्यवसाय करताना त्या व्यवसायात आपल्याला लाभ झाला तरच त्या व्यवसायाविषयी अधिक अंगी कौतुकही निर्माण होते व त्याचा हव्यासही वाढतो परंतू त्या व्यवसायात लाभ जर झालाच नाही तर तो व्यवसाय फिका ठरतो. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता तुम्ही माझ्या धर्मावर माझ्या जातीवर माझ्या अधिकारावर जाऊ नका तर तुमच्या नामाचा महिमा दाखवा आणि माझा उध्दार करा. ”
अभंग क्र. २९३७
हेचि वारंवार । पडताळुनी उत्तर ॥१॥
करितो पायासी विनंती । नुपेक्षावे कमळापती ॥धृपद॥
गंगोदके गंगे । अर्घ्य द्यावे पांडुरंगे ॥२॥
जोडोनिया हात । करी तुका प्रणिपात ॥३॥
अर्थ
अहो देवा मी सारखे सारखे तेच बोलणे पडताळून पाहून तुमच्याशी बोलत आहे व तुमचे लक्ष वेधून घेत आहे. हे कमळापती मी तुमच्या पायाजवळ हीच विनंती करीत आहे की माझी तुम्ही उपेक्षा करु नका. हे पाडूरंगे जसे गंगेचे पाणी घेऊन गंगेलाच अर्ध्य दयावे त्याप्रमाणे मी तुमचेच बोलणे घेऊन तुम्हालाच ते समर्पित करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी हात जोडून तुम्हाला प्रणिपात करीत आहे. ”
अभंग क्र. २९३८
अवचित या तुमच्या पाया । देवराया पावलो ॥१॥
बरवे झाले देशाउर । आल्या दुर सारिखे ॥धृपद॥
राहोनिया जातो ठाया । आलियाची निशानी ॥२॥
तुका म्हणे चरणसेवा । जोडी हेवा लाधली ॥३॥
अर्थ
हे देवराया मी अकस्मातच तुमच्या पायाजवळ आलो आहे. देवा मला तुमचे दर्शन झाले हे फार बरे झाले आणि देश ओलांडून खूप दुरुन आल्यासारखेच मला वाटत आहे. देवा मी तुमच्या पायाजवळ आलो याची निशाणी म्हणून मी माझे चित्त तुमच्या पायाजवळ ठेवून राहातो मी जेथे राहतो तेथे परत जात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मला तुमची चरणसेवा करण्याचा हेवा लागला आहे त्यामुळेच तर मला तुमचा लाभ झाला आहे. ”
अभंग क्र. २९३९
आता पाविजेल घरा । या दातारा संगती ॥१॥
पायावरी ठेवू माथा । सर्वथा हा नुपेक्षी ॥धृपद॥
येथून तेथवरी आता । नाही सत्ता आणिकाची ॥२॥
तुका म्हणे चक्रपाणी । शिरोमणी बळियांचा ॥३॥
अर्थ
या दातारा देवाच्या संगतीने मी माझ्या मूळ घराला प्राप्त होईल. मनामध्ये एक भक्ती ठेवून त्याच्या पायावर माथा ठेवला की हा भक्तांची कधीही उपेक्षा करतच नाही. माझ्या सत्य स्थितीपासून ते ब्रम्हानुभवाच्या आनंदापर्यंत माझ्यावर देवावाचून कोणाचीही सत्ता नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हा चक्रपणी सर्व बलवानांचा देखील शिरोमणी आहे. ”
अभंग क्र. २९४०
बरवे माझ्या केले मने । पंथे येणे निघाले ॥१॥
अभयाचे जावे ठाया । देवराया प्रतापे ॥धृपद॥
साधनाचा न लगे पाग । अवघे सांग कीर्तन ॥२॥
तुका म्हणे सत्ता थोरी । कोण करी खोळंबा ॥३॥
अर्थ
माझे मन आता भक्तीपंथाच्या मार्गाने गेले ते त्याने हे खूप चांगले केले आहे. आता देवराया हरी त्याचा प्रताप दाखवील अभया च्या ठिकाणी म्हणजे जेथे कोणत्याही प्रकारचे भय नाही अशा ठिकाणी तो मला त्याच्या समर्थ्याने पोहोचवेल व त्याच्या मदतीने मी तिथे पोहोचले. आता परमार्थ करण्यासाठी केवळ हरीचे कीर्तन हेच मुख्य साधन आहे इतर कोणत्याही साधनांच्या बरोबर जाण्याची गरज राहिली नाही हरीच्या कीर्तनाने सर्वकाही सांग म्हणजे सफल होईल. तुकाराम महाराज म्हणतात हरी ची सत्ता खूप मोठी आहे मग आपण कोणतेही कार्य करत असताना जर त्याची कृपा आशीर्वाद आपल्यावर असेल तर आपल्या कार्‍यात कोण खोळंबा करेल ?

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading