२५ सप्टेंबर, दिवस २६८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी ३७६ ते ४०० + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३२०५ ते ३२१६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२५ सप्टेंबर ” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 25 September
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २५ सप्टेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३२०५ ते ३२१६ चे पारायण आपण करणार आहोत.
२५ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी ३७६ ते ४००,

376-16
एऱ्हवी यागादिक क्रिया । आहाण तेचि धनंजया । परी विफळती आचरोनिया । नाटकी जैसी ॥376॥
अर्जुना, एऱ्हवी पाहू गेले असता, त्या यागादिक क्रिया खऱ्या, पण दंभानं नांटक्यासारख्या आचरल्या गेल्यामुळे त्या व्यर्थ होतात. 76
377-16
वल्लभाचिया उजरिया । आपणयाप्रति कुस्त्रिया । जोडोनि तोषिती जैसिया । अहेवपणे ॥377॥
आपल्या यजमानाच्या आश्रयावर, वेश्या ज्याप्रमाणे स्वतःस सौभाग्यवती समजून समाधान मानीत असतात, तसेच हे होय. 77

आत्मसंभाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः ।
यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम् ॥16. 17॥
378-16
तैसे आपणया आपण । मानिता महंतपण । फुगती असाधारण । गर्वे तेणे ॥378॥
आपली प्रतिष्ठा आपणच मानिता मानिता जे असामान्य गर्वाने फुगून जातात. 78
379-16
मग लवो नेणती कैसे । आटिवा लोहाचे खांब जैसे । का उधवले आकाशे । शिळाराशी ॥379॥
मग ओतीव लोखंडाच्या खांबाप्रमाणे ते कोणापुढेही नम्र न होता सदा ताठ असतात किंवा आकाशात उंच गेलेले पर्वत जसे सदा ताठ असतात तसेच हे होत. 79
380-16
तैसे आपुलिये बरवे । आपणचि रिझता जीवे । तृणाहीहूनि आघवे । मानिती नीच ॥380॥
त्याचप्रमाणे, आपल्या मोठेपणाचे आपणच मनात कौतुक करून रमता रमता त्यास आजूबाजूचे जग तृणापेक्षांही हलके वाहू लागले. 380
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


381-16
वरी धनाचिया मदिरा । माजूनि धनुर्धरा । कृत्याकृत्यविचारा । सवते केले ॥381॥
मग अर्जुना, संपत्तिमदाने माजून जाऊन कर्तव्य अकर्तव्य वगैरे विवेकास पार फाटा देतात. 81
382-16
जया आंगी आयती ऐसी । तेथ यज्ञाची गोठी कायसी । तरी काय काय पिसी । न करिती गा ? ॥382॥
अरे, ज्याची वृत्ति अशी बनलेली आहे त्याला यज्ञाची काय प्रतिष्ठा वाटणार आहे ? पण, पिसाट लोक काय करतील किंवा न करितील कोणी सांगावे ? 82
383-16
म्हणौनि कोणे एके वेळे । मौढ्यमद्याचेनि बळे । यागाचींही टवाळे । आदरिती ॥383॥
म्हणून, लहरीखातर एखादे वेळी मूर्खपणाच्या मदिरेच्या भरांत यज्ञादिक सोंगेही आरंभितात. 83
384-16
ना कुंड मंडप वेदी । ना उचित साधनसमृद्धी । आणि तयांसी तव विधी । द्वंद्वचि सदा ॥384॥
त्यात त्यांना कुंड, मंडप, वेदी आणि तदनुषंगाने लागणारी अन्यसामग्री काही लागत नाही, आणि विधिविषयी बोलावे तर त्यांचे त्याच्याशी सदैवच वैर असते. 84
386-16
देवा ब्राह्मणांचेनि नांवे । आडवारेनहि नोहावे । ऐसे आथी तेथ यावे । लागे कवणा ? ॥385॥
देव, ब्राह्मण इत्यादिकांच्या नुसत्या नांवाचाही वारा त्यांना सोसत नाही, मग त्यांच्या येण्याची गोष्टच कशाला ? 85


386-16
पै वासरुवाचा भोकसा । गाईपुढे ठेवूनि जैसा । उगाणा घेती क्षीररसा । बुद्धिवंत ॥386॥
परंतु धूर्तलोक गाईपुढे मेलेल्या वासराची पेंढा वगैरे भरून रक्षण केलेली आकृति ठेवून जसे तिचे दूध काढून घेतात. 86
387-16
तैसे यागाचेनि नांवे । जग वाऊनि हावे । नागविती आघवे । अहेरावारी ॥387॥
त्याप्रमाणे यज्ञाचा आव घालून तन्निमित्त इतरांना आमंत्रणे देऊन, त्यांच्याकडून सापडेल तो आहेर घेऊन त्यांना फसवितात. 87
388-16
ऐशा काही आपुलिया । होमिती जे उजरिया । तेणे कामिती प्राणिया । सर्वनाशु ॥388॥
त्याप्रमाणे यज्ञाचा दंभ माजवून ते प्राण्यांच्या सर्वनाशाची इच्छा करितात. 88

अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधम् च संश्रिताः ।
मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः ॥16. 18॥
389-16
मग पुढा भेरी निशाण । लाउनी ते दीक्षितपण । जगी फोकारिती आण । वावो वावो ॥389॥
मग स्वत:पुढे डंका, ध्वज वगैरे लाऊन आपल्या यज्ञदीक्षिततेची लोकात व्यर्थ प्रसिद्धि करितात. 89
390-16
तेव्हा महत्त्वे तेणे अधमा । गर्वा चढे महिमा । जैसे लेवे दिधले तमा । काजळाचे ॥390॥
अशा वृथा महत्त्वाने, त्या नीच जनांस अधिकच गर्व चढतो, व जणू काही अंधकाराला काजळाची पुटं द्यावी त्या प्रमाणे 390
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


391-16
तैसे मौढ्य घणावे । औद्धत्य उंचावे । अहंकारु दुणावे । अविवेकुही ॥391॥
त्यांचा मूर्खपणा अधिकच घट्ट होतो, उद्धटपणा वाढतो, आणि अहंकार व अविवेकही दुणावतो. 91
392-16
मग दुजयाची भाष । नुरवावया निःशेष । बळीयेपणा अधिक । होय बळ ॥392॥
मग आपल्यापेक्षा दुसरा कोणी अधिक बलवान् आहे अशी कोणी भाषाही काढू नये असे त्याला बळ चढते. 92
393-16
ऐसा अहंकार बळा । जालिया एकवळा । दर्पसागरु मर्यादवेळा । सांडूनि उते ॥393॥
ह्याप्रमाणे सामर्थ्य व अहंकार ह्यांचे ऐक्य झाल्यावर दर्परूपी समुद्राच्या लाह्या मर्यादा सोडून उचंबळू लागतात. 93
394-16
मग वोसंडिलेनि दर्पे । कामाही पित्त कुरुपे । तया धगी सैंघ पळिपे । क्रोधाग्नि तो ॥394॥
वर्षाची अशी वाढ झाली म्हणजे कामाचेही पित्त खवळते व त्या धगीने क्रोधाग्नीही भडकतो. 94
395-16
तेथ उन्हाळा आगी खरमरा । तेलातुपाचिया कोठारा । लागला आणि वारा । सुटला जैसा ॥395॥
मग उन्हाळघांत प्रखर अग्नि तेलातुपाच्या कोठारास लागून त्यातच आणखी जसा वारा सुटावा. 95


396-16
तैसा अहंकारु बळा आला । दर्पु कामक्रोधी गूढला । या दोहीचा मेळु जाला । जयांच्या ठायी ॥396॥
त्याप्रमाणे, बलवान असा अहंकार व कामक्रोध ह्यांनी गुफुटून गेलेला उन्मतपणा ह्या दोघांचे ऐक्य ज्यांच्या ठायी होते. 96
397-16
ते आपुलिया सवेशा । मग कोणी कोणी हिंसा । या प्राणियाते वीरेशा । न साधती गा ? ॥397॥
ते आपल्या इच्छेखातर किंवा इच्छेप्रमाणे कोणत्या प्राण्यांची हिंसा करणार नाहीत ? 97
398-16
पहिले तव धनुर्धरा । आपुलिया मांसरुधिरा । वेचु करिती अभिचारा- । लागोनिया ॥398॥
अर्जुना, अभिचारमंत्रसिद्धीकरिता हे प्रथम आपल्या अंगांतील रक्तमांस खर्च करितात. 98
399-16
तेथ जाळिती जिये देहे । यामाजी जो मी आहे । तया आत्मया मज घाये । वाजती ते ॥399॥
असा ते आपल्या देहास जो त्रास करून घेतात, त्यामध्ये आत्मरूपाने वास करणारा जो मी यालाच हे चटके बसतात. 99
400-16
आणि अभिचारकी तिही । उपद्रविजे जेतुले काही । तेथ चैतन्य मी पाही । सीणु पावे ॥400॥
आणि त्या अभिचारक मंत्रांनी ज्यांना ज्यांना उपद्रव द्यावयाचा असतो त्यांच्या ठिकाणी जीवचैतन्यरूपाने वास करणारा जो मी, त्या मलाच ते चटके बसतील; 400
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २६८ वा. २५, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३२०५ ते ३२१६
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ३२०५
भक्ती आम्ही केली सांडुनी उद्वेग । पावलो हे संग सुख याचे ॥१॥
सुख आम्हा झाले धरिता यांचा संग । पळाले उद्वेग सांडूनिया ॥२॥
तुका म्हणे सुख बहु झाले जिवा । घडली या सेवा विठोबाची ॥३॥
अर्थ
आम्ही प्रपंचाचा सर्व उद्वेग बाजूला टाकून हरीची भक्ती केली आहे त्यामुळे मला हरीचे संग सुख प्राप्त झाले आहे. आम्ही हरीची संगती धरली त्यामुळे सर्व उद्वेग आम्हाला सोडून पळून गेले व आम्ही सुखी झालो. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्हाला विठोबाची सेवा घडली त्यामुळे या जीवाला खूपच सुख झाले आहे. ”
3:26

अभंग क्र. ३२०६
इंद्रियांसी नेम नाही । मुखी राम म्हणोनि काई ॥१॥
जेवि मासीसंगे अन्न । सुख नेदी ते भोजन ॥धृपद॥
कीर्तन करावे । तैसे करूनी दावावे ॥२॥
हे तो अंगी नाही चिन्हे । गाइले वेश्येच्या ढव्याने ॥३॥
तुका म्हणे रागा । संत शिवू नेदिती अंगा ॥४॥
अर्थ
जरी इंद्रियांचा निग्रह केला नाही तर मुखाने केवळ रामनाम घेण्यात काय उपयोग आहे ? जर अन्नामध्ये माशी पडली आणि आपण तसेच भोजन केले तर ते भोजन आपल्याला सुख देत नाही आपल्याला लगेच वांत्या होतील. ज्याप्रमाणे आपण कीर्तनात बोलू त्याप्रमाणेच आपण बाहेर देखील वर्तन आपल्या बोलण्याप्रमाणेच करुन दाखवावे. आणि आपण ज्या प्रकारचे विषय कीर्तनात मांडू जसे आपण कीर्तनात बोलू त्याप्रमाणे आपल्या अंगी चिन्हे दिसले नाही तर आपले बोलणे म्हणजे वेश्येने गायिलेल्या गाण्याप्रमाणे होईल. तुकाराम महाराज म्हणतात “जे कोणी खरे संत आहेत ते आपल्या अंगाला राग क्रोध याला शिवू देखील देत नाहीत. ”
3:26

अभंग क्र. ३२०७
न लगे देवा तुझे आम्हासी वैकुंठ । सायुज्याचा पट्ट न लगे मज ॥१॥
देई तुझे नाम मज सर्वकाळी । मागेन वनमाळी हेचि तुज ॥धृपद॥
नारद तुंबर उद्धव प्रल्हाद । बळी रुक्मांगद नाम ध्याती ॥२॥
सिद्ध मुनिगण गंधर्व किन्नर । करिताती गजर रामनामे ॥३॥
तुका म्हणे हरी देई तुझे नाम । अखंडित प्रेम हेचि द्यावे ॥४॥
अर्थ
देवा तुझे वैकुंठ नको, सायुज्यमुक्ती नको, एखादे पट्टराज्य देखील आम्हाला नको आहे. हे वनमाळी सदा सर्वकाळ तुझेच नाम मुखामध्ये असावे हेच माझे मागणे तुझ्याजवळ आहे. देवा नारद, तुंबर, उध्दव, प्रल्हाद, बळी, रुक्मागंद यांच्या ध्यानी तुझेच नाम आहे. सिध्दमुनीगण, गंधर्व, किन्नर सर्व रामनामाचाच गजर करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “हे हरी तुझ्या नामाविषयी अखंड प्रेम माझ्या चित्तामध्ये राहावे हेच तुम्ही मला दयावे. ”
3:27

अभंग क्र. ३२०८
पावलो प्रसाद इच्छा केली तैसी । झाले या चित्तासी समाधान ॥१॥
मायबाप माझा उभा कृपादानी । विटे सम जोडूनि पादांबुजे ॥धृपद॥
सांभाळासी येऊ नेदीच उणीव । अधिकारगौरव राखे तैसा ॥२॥
तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे । जया तैसा राहे कवळूनी ॥३॥
अर्थ
मी ज्या प्रकारची इच्छा केली त्या प्रकारचा मला प्रसाद मिळाला त्यामुळे माझ्या चित्ताला समाधान झाले आहे. माझा मायबाप कृपादान देणारा आहे तो आपले दोन्ही समचरण विटेवर ठेवून उभा आहे. भक्ताचा जसा अधिकार असेल तसा त्याचा गौरव करतो व त्याच्या भक्तांचा सांभाळ करण्यासाठी कोणत्याही प्रकारची उणीव कमतरता तो येऊ देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “माझा देव सर्वत्र आतरबाह्य व्यापून उरलेला आहे परंतू ज्याचा जसा भाव असेल तसा देव त्याच्याजवळ राहातो. ”
3:27

अभंग क्र. ३२०९
मुखी विठ्ठलाचे नाम । मग कैचा भवभ्रम ॥१॥
चालता बोलता खाता । जेविता निद्रा करिता ॥धृपद॥
सुखे असो संसारी । मग जवळीच हरी ॥२॥
मुक्तिवरील भक्ती जाण । अखंड मुखी नारायण ॥३॥
मग देवभक्त झाला । तुका तुकी उतरला ॥४॥
अर्थ
मुखात जर विठ्ठलाचे नाम असेल तर मग प्रपंचाचा भ्रम राहिलच तरी कसा ? जो विठ्ठलाचे नाम चालताना बोलताना जेवताना चोखताना घेत असतो. मग तो संसारात जरी असला तरी सुखीच असतो कारण हरी त्याच्या जवळच असतो. चारही मुक्तीनंतर मुखाने नारायण नारायण असे नाम घेणे म्हणजे भक्ती आहे असे जाणावे. तुकाराम महाराज म्हणतात, “जर असे झाले तर भक्त देखील देवच झाले असे समजावे आणि या न्यायाने मी देखील देवाच्याच बरोबरीला उतरलो आहे. ”
3:27

अभंग क्र. ३२१०
क्षुधा तृषा काही सर्वथा नाठवे । पहावया धावे कोल्हांटासी ॥१॥
कथेसी साक्षेपे पाचारिला जरी । म्हणे माझ्या घरी कोणी नाही ॥धृपद॥
बलत्कारी जरी आणिला कथेसी । निद्रा घे लोडेंसी टेंकूनिया ॥२॥
तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥३॥
अर्थ
जिथे कोल्हाटाचा खेळ असेल, तमाशा चालू असेल तिथे धावत जाईन त्यावेळी त्याला तहान भूक काहीही आठवणार नाही परंतू हरीकथेला जर आग्रहाने बोलावले तर हा जात नाही त्यावेळी म्हणतो की माझ्या घराचे रक्षण करण्याकरता कोणीही नाही त्यामुळे मला येण्यासाठी जमणार नाही. आणि त्याला बळजबरी करुन जरी हरीकथेला आणले तरी तो पाठीमागे टेकण्यासाठी लोड घेतो व लोडाला टेकून झोप घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा मनुष्याच्या तोंडावर थुंका कारण हा पुढे यमपुरी भोगण्यासाठीच जातो. ”
3:27

अभंग क्र. ३२११
आता वांटो नेदी आपुले हे मन । न सोडी चरण विठोबाचे ॥१॥
दुजियाचा संग लागो नेदी वारा । आपुल्या शरीरावरूनिया ॥धृपद॥
यावे जावे आम्ही देवा चे सांगाते । मागूनी करीत हेचि आलो ॥२॥
काय वाया गेलो तो करू उद्वेग । उभा पांडुरंग मागे पुढे ॥३॥
तुका म्हणे प्रेम मागतो आगळे । येथे भोगू फळे वैकुंठीची ॥४॥
अर्थ
आता मी माझे मन कोठेही धावू देणार नाही आणि विठोबाचे चरण कधीही सोडणार नाही. मी विठोबावाचून दुसऱ्या कोणाचाही संग करणार नाही एवढेच काय माझ्या शरीरावरुन दुसऱ्या कोणाचाही वारा मी जाऊ देणार नाही. कोठेही येऊ जाऊ तेथे आम्ही देवाच्याच बरोबरीने राहणार आहोत आणि खूप योनीपासून आम्ही हेच करीत आलो आहोत. अहो प्रत्यक्ष पाडूरंगच माझ्या मागेपुढे आहे तर मग मी वायाला जाईनच कसा आणि मग मी उगाचच उद्वेग तरी कशाविषयी का करु ? तुकाराम महाराज म्हणतात, “आता मी देवाला एक आगळे वेगळेच प्रेम मागतो आहे आणि या पृथ्वीतलावर राहूनच वैकुंठाचे फळे आता मी भोगीन. ”
3:27

अभंग क्र. ३२१२
आता जावे पंढरीसी । दंडवत विठोबासी ॥१॥
चंद्रभागेचिया तिरी । आम्ही नाचो पंढरपुरी ॥धृपद॥
जेथे संतांची दाटणी । त्याचे घेऊ पायवणी ॥२॥
तुका म्हणे आम्ही बळी । जीव दिधला पाया तळी ॥३॥
अर्थ
आता पंढरीला जावे आणि विठोबाला साष्टांग दंडवत घालावे असे वाटते. आणि पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या तीरावर हरीनाम घेऊन त्या आनंदात आम्ही नाचू. जेथे संतांची गर्दी आहे तेथे जाऊन त्यांचे चरणतीर्थ आम्ही घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्ही एक विठोबावाचून दुसरे काहीही जाणत नाहीत म्हणूनच त्याच्या पायाखाली आम्ही आमचा जीव दिला आहे म्हणजे आम्ही आमचा देह विठ्ठलाला अर्पण केला आहे. ”
3:27

अभंग क्र. ३२१३
आम्हा नरका जाता काय येईल तुझ्या हाता । ऐसा तू अनंता विचारी पा ॥१॥
तुज शरण आलियाचे काय हेचि फळ । विचारा दयाळ कृपानिधी ॥धृपद॥
तुझे पावनपण न चले आम्हासी । ऐसे हृषीकेशी कळो आले ॥२॥
आम्ही दुःख पावो जन्ममरण व्यथा । काय तुझ्या हाता येत असे ॥३॥
तुका म्हणे तुम्ही खादली हो रडी । आम्ही धरली सेंडी नाम तुझे ॥४॥
अर्थ
हे अनंता आम्ही जर नरकात गेलो तर तुझ्या हातात काय येईल याचा जरा तू विचार कर. देवा तू दयाळू आहेस, कृपानिधी आहेस आणि तुला शरण आलो म्हणून याचे फळ आम्हाला हेच मिळणार आहे काय ? हे ऋषीकेशी तुझे पावनपण आमच्याबाबत चालत नाही हे आता आम्हाला कळून आले आहे. अहो देवा आम्हाला जन्ममरणाच्या व्यथा होतात त्यावेळी आम्हाला अनेक प्रकारचे दु:ख भोगावे लागते असे जर झाले तर मग तुझ्या हातात काय येते ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा परमार्थाचा खेळ खेळताना तुम्ही आता रडी आला आहात परंतू आम्ही आता तुझ्या नामाची शेंडी धरली आहे. ”
3:28

अभंग क्र. ३२१४
पांडुरंगे पाहा खादलीसे रडी । परिणाम सेंडी धरिली आम्ही ॥१॥
आता संतांनी करावी पंचाईत । कोण हा फजितखोर येथे ॥धृपद॥
कोणाचा अन्याय येथे आहे स्वामी । गर्जतसो आम्ही पातकी ही ॥२॥
याचे पावनपण सोडवाचि तुम्ही । पतितपावन आम्ही आहो खरे ॥३॥
आम्ही तव आहो अन्यायी सर्वथा । याची पावन कथा कैसी आहे ॥४॥
तुका म्हणे आम्ही मेलो तरी जाणा । परि तुमच्या चरणा न सोडावे ॥५॥
अर्थ
पाहा पाडूरंग आता रडी आला आहे परंतू आम्ही त्याची नामरुपी शेंडी हातात धरली आहे. आता संतांनीच आमच्या दोघामध्ये पंचायत बोलावून निवाडा करावा आणि आमच्या दोघामध्ये कोण फजितखोर आहे हे ठरवावे. हे संतजनहो येथे अन्याय कोण करीत आहे याचा तुम्ही निवाडा करा मी करतो की माझा स्वामी करतो हे तुम्ही सांगा आम्ही तर गर्जून सांगतो की आम्ही पातकी आहोत. आता तर तुम्ही देवाचे पतितपावन हे ब्रीद त्याच्यापासून वेगळे करा कारण खरे पतितपावन तर आम्हीच आहोत. अहो आम्ही तर सर्वथा अन्यायीच आहोत परंतू या देवाची कथा सर्वत्र प्रसिध्द आहे की हा पतितपावन आहे मग ती कथा खरी कशावरुन ती तुम्ही सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आम्ही असेच जरी मेलो तरी चालेल परंतू आम्ही तुमच्या चरणांना सोडणार नाही. ”
3:28

अभंग क्र. ३२१५
घालूनिया मध्यावर्ती । दाटुनि उपदेश देती ॥१॥
ऐसे पोटभरे संत । तया कैचा भगवंत ॥धृपद॥
रांडापोरांते गोविती । वर्षासने ते लाविती ॥२॥
जसे बोलती निरोपणी । तैसी न करिती करणी ॥३॥
तुका म्हणे तया । तमोगुणियांची क्रिया ॥४॥
अर्थ
शिष्य करण्यासाठी काही लोक मध्यस्थी कोणाला तरी घेतात आणि बळेच त्याला उपदेश करतात. असे हे पोट भरणारे संत आहेत मग त्यांना भगवंत तरी कसा प्राप्त होईल ? असे हे निर्लज्ज लोक भोळया भाबड्या बायका मुलांना आपल्या वचनामध्ये गुंतवून टाकतात आणि प्रतिवर्षी पैसे दयावेत असा करार त्यांच्याकडून करुन घेतात. कीर्तनामध्ये जसे बोल हे लोक बोलतात त्याप्रमाणे वागत तर नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा लोकांच्या प्रत्येक क्रिया म्हणजे तमोगुणानेच भरलेल्या आहेत. ”
3:28

अभंग क्र. ३२१६
जीवे जीव नेणे पापी सारिखाचि । नळी दुजयाची कापू बैसे ॥१॥
आत्मा नारायण सर्वा घटी आहे । पशुमध्ये काय कळो नये ॥धृपद॥
देखत हा जीव हुंबरे वरडत । निष्ठुराचे हात वाहाती कैसे ॥२॥
तुका म्हणे तया चांडाळासी नर्क । भोगिती अनेक महादुःखे ॥३॥
अर्थ
पशू हत्या करणारे जीवाला जीव जाणत नाहीत ते पापी दैत्यासारखेच कृती करतात पशूची हत्या करण्यासाठीच बसलेले असतात. नारायण हा आत्मरुपाने सर्व घटी व्यापलेला आहे मग तो जसा मनुष्यामध्ये आहे तसाच पशूमध्येही आहे हे त्या पशू हत्या करणाऱ्या पापी मनुष्याला समजू नये काय ? पशूची हत्या करताना तो पशू कसा हुंबरतो कसा ओरडतो हा तो पापी पाहात नाही काय मग तरी देखील पशूची हत्या करताना त्याचे हात तरी कसे चालतात ? तुकाराम महाराज म्हणतात. “तो चांडाळ नरकामध्ये जाणार नक्कीच परंतू नरकामध्ये जाऊन अनेक महादु:खे भोगीन. ”

सप्टेंबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading