आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१० सप्टेंबर, दिवस २५३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी १ ते २५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३०२५ ते ३०३६
“१० सप्टेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 10 September
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १० सप्टेंबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३०२५ ते ३०३६ चे पारायण आपण करणार आहोत.
१० सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी १ ते २५,
सार्थ श्रीज्ञानेश्वरी: :: ॥ अथ षोडशोऽध्यायः अध्याय सोळावा ॥ दैवासुरसंपत्तिविभागयोगः ॥
अध्याय सोळावा
ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥ । अथ षोडशोशोऽध्यायः – अध्याय सोळावा॥। दैवासुरसंपत्तिविभागयोगः ।
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1-16
मावळवीत विश्वाभासु । नवल उदयला चंडांशु । अद्वयाब्जिनीविकाशु । वंदू आता ॥16a1॥
महाराज, अध्यायाच्या आरंभी श्रीसद्गुरूचे बोधरूपी सूर्याची उपमा देऊन नमन करितात ते असे. ज्या सूर्याच्या उदयानी, अद्वयकमलिनी विकास पाऊन प्रकट असलेले विश्वदर्शन मावळन जाते, असा विलक्षण प्रकार बडतो; त्या ज्ञानरूप सूर्यास नमस्कार असो. 1
2-16
जो अविद्याराती रुसोनिया । गिळी ज्ञानाज्ञानचांदणिया । जो सुदिनु करी ज्ञानिया । स्वबोधाचा ॥16a2॥
ज्याच्या उदयाने अविद्यारूप रात्र संपून ज्ञानाज्ञानरूपाने त्या रात्रींत चमकणाऱ्या चांदिण्या रात्री बरोबर निस्तेज होतात व जो उदय म्हणजे ज्ञानीजनांना आत्मबोधाचा मंगल दिन होय. 2
3-16
जेणे विवळतिये सवळे । लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे । सांडिती देहाहंतेची अविसाळे । जीवपक्षी ॥16a3॥
ज्याच्या प्रभातकाळी जीवरूप पक्षांचे आत्मज्ञाननेत्र प्रकाशित होऊन ते देहात्मबुद्धिची घरटी सोडून बाहेर पडतात. 3
4-16
लिंगदेहकमळाचा । पोटी वेचु तया चिद्भ्रमराचा । बंदिमोक्षु जयाचा । उदैला होय ॥16a4॥
ज्याच्या उदयानं लिंगदेहरूप कमलाच्या विकासाने त्यात गुंतून पडलेला जीवचैतन्यरूप भ्रमर मुक्त होतो. 4
5-16
शब्दाचिया आसकडी । भेद नदीच्या दोही थडी । आरडाते विरहवेडी । बुद्धिबोधु ॥16a5॥
शास्त्रांतील विरूद्ध वचनांची एकवाक्यता न झाल्यामुळे, अज्ञानरूप अंधकाराचे साम्राज्य पसरून, भेदसत्यत्व निश्चय होऊन, तीच कोणी एक नदी तिच्या दोन तीरांवर त्या अज्ञान रात्रीमुळे बुद्धिरूप (मादी) व बोधरूप (नर) चक्रवाक पक्षांची तटातूट होऊन (बुद्धीला परमात्मज्ञान न होऊन) ते जोडपे विरहदुःखाने ओरडत बसले आहे. 5
6-16
तया चक्रवाकांचे मिथुन । सामरस्याचे समाधान । भोगवी जो चिद्गगन । भुवनदिवा ॥16a6॥
चिदाकाशामध्ये ब्रह्मांडाला प्रकाशित करणाऱ्या ज्ञानरूप सूर्याचा उदय होऊन ते विरही चक्रवाक जोडपे (जीव व परमात्मा) ह्यांचे ऐक्य होऊन समाधान. 6
7-16
जेणे पाहालिये पाहाटे । भेदाची चोरवेळ फिटे । रिघती आत्मानुभववाटे । पांथिक योगी ॥16. 7॥
ज्या ज्ञानभानूच्या उदयाच्या किंचित् पूर्वीच (पहाटें) भेदरूपो चोर मागल्या पायाने जातात, व योगी जनरुपी पांथस्थ आत्मानुभवाची वाट आक्रमण करतात. 7
8-16
जयाचेनि विवेककिरणसंगे । उन्मेखसूर्यकांतु फुणगे । दीपले जाळिती दांगे । संसाराची ॥16a8॥
ज्या ज्ञानसूर्याच्या विचाररूप किरणांच्या योगे वृत्तिज्ञानरूप सूर्यकांतमणि प्रदीप्त होऊन संसाररूपी वने जाळून टाकितो. 8
9-16
जयाचा रश्मिपुंजु निबरु । होता स्वरूप उखरी स्थिरु । ये महासिद्धीचा पूरु । मृगजळ ते ॥16a9॥
ज्याचा तीव्र किरणसमूहप्रकाश जीवररूपी अज्ञानाच्या माळजमिनीवर स्थिर असतांना विश्वरूपी महासिद्धींचा पूर येतो. 9
10-16
जो प्रत्यग्बोधाचिया माथया । सोऽहंतेचा मध्यान्ही आलिया । लपे आत्मभ्रांतिछाया । आपणपा तळी ॥16 a10॥
जो सूर्य “प्रत्यगात्मबोधरूप ” सोऽहं ” भावाच्या माध्यान्हकाली माथ्यावर आला असता, आत्मस्वरूपविषयक भ्रांतिरूप छाया पायातळी येऊन नाहीशी होते. 10
11-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
ते वेळी विश्वस्वप्नासहिते । कोण अन्यथामती निद्रेते । सांभाळी नुरेचि जेथे । मायाराती ॥16a11॥
ज्याच्या उदयाने मूळमायारात्रीचाच नाश होतो, तेथे विपरीत विश्वादि स्वप्नदर्शनाची जननी जी अज्ञाननिद्रा तिचा कसा पत्ता असणार ? 11
12-16
म्हणौनि अद्वयबोधपाटणी । तेथ महानंदाची दाटणी । मग सुखानुभूतीची घेणी देणी । मंदावो लागती ॥16a12॥
मग अद्वयबोधरूपी नगरांत सगळीकडेच महानंदाची गर्दी उसळून, त्यामुळे सुखानुभवाची देवघेवही मंदावू लागते. 12
13-16
किंबहुना ऐसैसे । मुक्तकैवल्य सुदिवसे । सदा लाहिजे का प्रकाशे । जयाचेनि ॥16a13॥
किंबहुना, ज्या ज्ञानसूर्याच्या तेजाला मुक्ति किंवा कैवल्य ह्या मंगल दिवसाशिवाय अन्य वेळच माहीत नाही 13
14-16
जो निजधामव्योमींचा रावो । उदैलाचि उदैजतखेवो । फेडी पूर्वादि दिशांसि ठावो । उदोअस्तूचा ॥16a14॥
जो बोध सूर्य आत्मस्वरूपाकाशाचा राजा असून नित्य उदितच आहे; तरीही, अज्ञानप्रतिबंध दूर होऊन पुन्हा उदित झाल्यासारखा वाटतांच, पूर्वपश्चिमादि सर्व दिशा एकरूप करून उदय व अस्त ह्याचे नांवही उरू देत नाही. 14
15-16
न दिसणे दिसणेंनसी मावळवी । दोही झाकिले ते सैंघ पालवी । काय बहु बोलो ते आघवी । उखाचि आनी ॥16a15॥
समजणे व न समजणे हे ज्ञानाज्ञानाचे दोन्ही व्यवहार ज्या स्वरूपज्ञानाच्या टेक्यावर चालतात, ते यथार्थत्वाने प्रकट झाले असता त्या उषःकालाची काही अलौकिकच थोरवी आहे ती बोलून कशी वर्णन करवेल ? 15
16-16
तो अहोरात्रांचा पैलकडु । कोणे देखावा ज्ञानमार्तंडु । जो प्रकाश्येवीण सुरवाडु । प्रकाशाचा ॥16a16॥
रात्र व दिवस अशा लौकिक भेदाला अवसर नसून त्याच्याही पलीकडला असा तो ज्ञानसूर्य तो कोणाच्या ज्ञानाचा होणार ? ज्याच्या स्वरूपप्रकाशपुढे प्रकाश्य असा अन्यपदार्थच नाही असा तो केवळ प्रकाशरूप आहे. 16
17-16
तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती । आता नमो म्हणो पुढतपुढती । जे बाधका येइजतसे स्तुती । बोलाचिया ॥16a 7॥
असे चैतन्यसूर्य जे श्रीनिवृत्तिनाथ महाराज, त्यांना माझे वारंवार नमन असो; त्या अवाङ्मनमनसगोचरस्वरूपाची स्तुति करणे म्हणजे ही त्याला शब्दाची बाधा अगर विटाळ करू पहाणे होय. 17
18-16
देवाचे महिमान पाहोनिया । स्तुति तरी येइजे चांगावया । जरी स्तव्यबुद्धीसी लया । जाईजे का ॥16a 18॥
श्रीगुरूंच्या महात्म्यांच्या दृष्टीने विचार केला असता जर स्तवन करणारा स्तव्यबुद्धी सह लयाला जाईल (स्तवन करणारा अद्वैत-भूमिकेवर येईल) तेव्हांच श्रीगुरूची खरी किंवा आवडणारी स्तुति होते. 18
19-16
जो सर्वनेणिवा जाणिजे । मौनाचिया मिठीया वानिजे । काहीच न होनि आणिजे । आपणपया जो ॥16a19॥
जो सर्व लयाचाही साक्षी किंवा प्रकाशक आहे. त्याच्या स्वरूपवर्णनाविषयी मौन धारण करणे हीच त्याची खरी स्तुति होय, व अशेषविशेष भाव लयास जाऊन सहज स्थितीत असणे हीच ज्याची प्राप्ती होय. 19
20-16
तया तुझिया उद्देशासाठी । पश्यंती मध्यमा पोटी । सूनि परेसीही पाठी । वैखरी विरे ॥16a20॥
त्या तुमच्या स्वरूपाची स्तुति करू पहाणारी वैखरीवाणी, पश्यंती व मध्यमावाणींच्या पोटात प्रवेश करून अखेर परावाणी सह लय पावते. 20
21-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तया तूते मी सेवकपणे । लेववी बोलकेया स्तोत्राचे लेणे । हे उपसाहावेही म्हणता उणे । अद्वयानंदा ॥21॥
हे अद्वयानंद गुरुमूर्ते, अशा आपल्या स्वरूपाचे, सेवकभावाने मी केलेले स्तुतिस्तोत्र रूप भूषण आपण स्वीकारावे असे म्हणणंही वस्तुतः न शोभणारे आहे. 21
22-16
परी रंके अमृताचा सागरु । देखिलिया पडे उचिताचा विसरु । मग करू धावे पाहुणेरु । शाकाचा तया ॥22॥
एकाद्या दरिद्रयाने, अमृतसिंधु पाहुण आलेला पाहून, आपण काय करीत आहो त्याच्या औचित्याचे भान न राहून जसा त्याला भाजीपाल्यांचा पाहुणचार केला असता. 22
23-16
तेथ शाकुही कीर बहुत म्हणावा । तयाचा हर्षवेगुचि तो घ्यावा । उजळोनि दिव्यतेजा हातिवा । ते भक्तीचि पाहावी ॥23॥
त्याच्या आनंदाचा वेग पाहून तो शाकपाहुणचारही मोठा म्हणावा लागतो, किंवा सूर्याला निरांजनाने ओवाळिले असता प्रत्यक्ष कृतीकडे दुर्लक्ष करून कर्त्याचा भावच जसा लक्षात घेणे योग्य होय. 23
24-16
बाळा उचित जाणणे होये । तरी बाळपणचि के आहे ? । परी साचचि येरी माये । म्हणौनि तोषे ॥24॥
बालवयात उचित अनुचित कळू लागले तर मग बालपण ते काय ! म्हणून त्याच्या कोणत्याही गोष्टीचे माता कौतुक मानून संतोष पावते. 24
25-16
हा गा गावरसे भरले । पाणी पाठी पाय देत आले । ते गंगा काय म्हणितले । परते सर ? ॥25॥
अहो; गावचा ओढा गावातील घाणीसह गंगेत प्रवेश करू लागला असता तू मागे फिर असे का गंगा त्याला म्हणेल ? 25
दिवस २५३ वा. १०, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३०२५ ते ३०३६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३०२५
असंत लक्षण भूतांचा मत्सर । मनास निष्ठुर अतिवादी ॥१॥
अंतरीचा रंग उमटे बाहेरी । वोळखियापरी आपेआप ॥धृपद॥
संत ते समय वोळखती वेळ । चतुष्ट निर्मळ चित्त सदा ॥२॥
तुका म्हणे हित उचित अनुचित । मज लागे नित्य विचारावे ॥३॥
अर्थ
असंतपणाचे लक्षण म्हणजे भूतमात्रांचा मत्सर करणे, मनामध्ये निष्ठूरपणा असणे आणि नेहमी वाद करत राहाणे. त्याच्या अशा या वागण्याने त्याच्या अंतरंगात त्याचा मूळ रंग कोणता आहे ते आपोआपच बाहेर दिसून येतो व तो मनुष्य कसा आहे हे त्याच्या वागण्यावरुनच आपोआप ओळखले जाते. संत कोणाला म्हणावे तर जे वेळप्रसंग ओळखतात, नेहमी संतुष्ट व ज्यांचे चित्त नेहमी निर्मळ आहे त्यांनाच संत म्हणावे. तुकाराम महाराज म्हणतात, “मला हित काय आहे, उचित काय आहे, अनुचित काय आहे याचा नित्य म्हणजे नेहमीच विचार करावा लागतो. ”
2:34
अभंग क्र. ३०२६
विठ्ठलावाचोनि ब्रम्ह जे बोलती । वचन ते संती मानू नये ॥१॥
विठ्ठलावाचूनि ज्या ज्या उपासना । अवघाचि जाणा श्रमचि तो ॥धृपद॥
विठ्ठलावाचूनि सांगतील गोष्टी । वाया ते हिंपुटी होती जाणा ॥२॥
विठ्ठलांवाचूनि जे काही जाणती । तितुल्या वित्पत्ती वाउगीया ॥३॥
तुका म्हणे एक विठ्ठलचि खरा । येर तो पसारा वाउगाचि ॥४॥
अर्थ
विठ्ठलावाचून ब्रम्ह वेगळे आहे असे जे कोणी बोलत असतील त्यांचे बोलणे संतांनी मानूच नये. विठ्ठलावाचून ज्या ज्या काही उपासना आहेत त्या केवळ व्यर्थ श्रमच आहे असे जाणावे. विठ्ठलावाचून इतर कोणत्याही गोष्टी जे कोणी सांगेल ते सर्व दु:खी व कष्टी होतील. विठ्ठलावाचून जे काही ज्ञान ग्रहण केलेले आहे ती विद्वत्ता ते ज्ञान सर्व व्यर्थच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “या ब्रम्हांडामध्ये जर काही खरे असेल तर केवळ एक विठ्ठलच आहे बाकी सर्व व्यर्थ पसाराच आहे. ”
2:34
अभंग क्र. ३०२७
सर्व काळ डोळा बैसो नारायण । नयो अभिमान आड पुढे ॥१॥
धाड पडो माझ्या थोरपणावरी । वाचे हरीहरी उच्चारीन ॥धृपद॥
जळो अंतरीचे सर्व जाणपण । विवादवचन अहंतेचे ॥२॥
सकळा चरणी गळित माझा जीव । तुका म्हणे भाव एकविध ॥३॥
अर्थ
सर्व काळी नारायणच माझ्या डोळयामध्ये बसून राहो कोणत्याही प्रकारचा अभिमान माझ्यापुढे आडवा येऊ नये. माझ्या थोरपणावर धाड पडो म्हणजे माझा थोरपणा नाहीसा होवो मग मी वाचेने हरी हरी उच्चार करीन. माझ्या अंतरंगातील जाणतेपणाला म्हणजे अहंकाराला आग लागो आणि अहंमतेमुळे मी जे काही वादविवाद करण्याचा शब्द खर्च करत आहे त्या अहंमतेला देखील आग लागो. तुकाराम महाराज म्हणतात, “सर्वाच्या चरणी माझा जीवभाव नम्र होऊन सर्वाच्या चरणी अर्पण होवो आणि एका हरीच्या ठिकाणीच माझा एकविध भक्तीभाव असो. ”
2:34
अभंग क्र. ३०२८
मधुरा उत्तरासवे नाही चाड । अंतरंगी वाड प्रेम असो ॥१॥
प्राणावेगळा न करी नारायण । मग नसो ज्ञान मूर्ख बरा ॥धृपद॥
जननिंदा होय तो बरा व्यापार । थोरवीचा भार कामा नये ॥२॥
तुका म्हणे भाव निष्ठावंत चित्ती । दया क्षमा शांत सर्वा भूती ॥३॥
अर्थ
गोड बोलण्याविषयी तर मला अजिबात आवडच राहिली नाही केवळ हरीविषयी माझ्या अंतरंगात खूप प्रेम असो. माझ्या प्राणापेक्षा मी नारायणाला वेगळे करणार नाही मग मला कोणतेही ज्ञान नसले तरी चालेल मी मूर्ख जरी राहीलो तरी बरेच होईल. लोकांनी माझी निंदा केली तरी देखील चांगले होईल कारण मोठेपणाचे ओझे कामाला येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “माझ्या चित्तामध्ये केवळ एका देवाविषयी निष्ठावंत भक्तीभाव असावा आणि सर्व भूतमात्रांविषयी मनामध्ये दया, क्षमा, शांती असावी. ”
2:35
अभंग क्र. ३०२९
झाडे वरपोनि खाऊनिया पाला । आठवी विठ्ठला वेळोवेळा ॥१॥
वल्कले नेसुनि ढुंगा गुंडाळुन । सांडी देहभान जवळुनी ॥धृपद॥
लोकमान वमनासमान मानणे । एकांती राहणे विठोसाठी ॥२॥
सहसा करू नये प्रपंची सौजन्य । सेवावे अरण्य एकातवास ॥३॥
ऐसा हा निर्धार करी जो मनाचा । तुका म्हणे त्याचा पाग फिटे ॥४॥
अर्थ
खाण्यासाठी एकवेळेस काही नसेल तरी चालेल झाडाचा पाला तोडून खा पण वेळोवेळेला विठ्ठलाचे स्मरण करत राहा. एकवेळेला झाडाच्या साली किंवा चिंध्या शरीराला गुंडाळाव्यात परंतू जवळचा देहभान टाकून दयावा. लोकांनी दिलेला मानसन्मान हा ओकलेल्या अन्नाप्रमाणे मानावा आणि विठोबाच्या प्राप्तीसाठी एकातात जाऊन राहावा. प्रपंचामध्ये सहज कोणाशीही सौजन्य म्हणजे मैत्री करु नये कुणाशीही संबंध ठेवू नये आणि विठ्ठलाच्या प्राप्तीसाठी अरण्यामध्ये जाऊन एकातवास सेवन करावा. तुकाराम महाराज म्हणतात, “असा जो मनाचा निर्धार करेल त्याचे सर्व पागच फिटतील. ”
2:35
अभंग क्र. ३०३०
भक्तिभावे करी बैसोनि निश्चिंत । नको गोवू चित्त प्रपंचासी ॥१॥
एका दृढ करी पंढरीचा राव । मग तुज उपाव पुढिल सुचे ॥धृपद॥
नको करू काही देवतापूजन । जप तप ध्यान तेही नको ॥२॥
मानिसील झणी आपलिक काही । येरझार पाही न चुके कदा ॥३॥
ऐसे जन्म किती पावलासी देही । अझूनि का नाही कळली सोय ॥४॥
सोय धरी आता होय पा सावध । अनुभव आनंद आहे कैसा ॥५॥
सहज कैसे आहे तेथीचे ते गुज । अनुभवे निज पाहे तुकी ॥६॥
तुका म्हणे आता होई तू सावध । तोडी भवबंध एका जन्मे ॥७॥
अर्थ
निश्चिंत मनाने तू बसून भक्तीभाव कर चित्ताला प्रपंचामध्ये गुंतून देऊ नकोस. एका पंढरीरावा विषयीच मनामध्ये दृढनिश्चय कर मग तुला परमार्थातील पुढील उपाय आपोआपच सुचतील. अरे तू एका पंढरीरावावाचून इतर देवतांचे पूजन जप तप ध्यान हे काहीही करु नकोस. अरे या संसारामध्ये तू कोणाला जर तुझे मानशील तर त्याचा काहीच उपयोग नाही तर त्याने तुझे जन्ममरणाचे येरझार कधीही चुकणार नाहीत. अरे आजपर्यंत तुला किती देह प्राप्त झालेले आहेत तरी देखील तुला भक्ती करण्याविषयी कसे अजूनही कळले नाहीत ? त्यामुळे आता तू भक्तीचा मार्ग अवलंब आणि वेळी सावध होऊन भक्ती कर आणि परमार्थामध्ये भक्तीचा आनंद कसा आहे याचा अनुभव घेत राहा. अरे भक्तीमार्गामध्ये जे गुढ सुख आहे ते कसे आहे ते तू सहजरित्या पाहा आणि अनुभव घेत राहा. तुकाराम महाराज म्हणतात, “आता तू सावध हो आणि एका जन्मातच भवबंध तोडून टाक. ”
2:35
अभंग क्र. ३०३१
दोराच्या आधारे पर्वत चढला । पाउलासाठी केला अपघात ॥१॥
अष्टोत्तरशे व्याधि वैद्ये दवडुनी । तो वैद्य मारूनि उत्तीर्णता ॥धृपद॥
नव मास माया वाहिले उदरी । ते माता चौबारी नग्न केली ॥२॥
गायत्रीचे क्षीर पिळुनी घेऊनी । उपवासी बांधोनी ताडीतसे ॥३॥
तुका म्हणे गुरु निंदकाचे तोंड । पहाता नरककुंड पूर्वजांसी ॥४॥
अर्थ
एक मूर्ख दोराच्या साहाय्याने पर्वत चढला आणि पर्वत चढल्यानंतर त्याने तो दोर कापून खाली उतरण्याची आपली सोय नाहीशी करुन स्वत:च्याच पावलाचा आघात केला. शरीरातील एकशे आठ व्याधी वैदयाच्या साहाय्याने दूर केल्या आणि शेवटी त्याच वैदयाला मारुन त्याच्या ऋणातून तो उत्तीर्ण झाला. ज्या मातेने बालकाला नऊ महिने आपल्या उदरात वाढविले त्याच मातेला त्या मुलाने कालांतराने चव्हाटयावर नग्न केले. एकाने तर गाईचे सर्व दूध काढून घेतले आणि तिला विनाकारण खुंटीला बांधून काहीही चारा न टाकता व्यर्थ त्रास दिला. तुकाराम महाराज म्हणतात, “त्याप्रमाणे जो आपल्या गुरुची निंदा करतो त्याचे तोंड जरी कोणी पाहिले तर त्याच्या पूर्वजांना नरककुंड भोगावा लागतो. ”
2:36
अभंग क्र. ३०३२
न कळे ब्रम्हज्ञान आचार विचार । लटिका वेव्हार करीतसे ॥१॥
विश्वामित्रीपोटी तयाचा अवतार । नांव महाखर चांडाळाचे ॥धृपद॥
द्रव्यइच्छेसाठी करीतसे कथा । काय त्या पापिष्ठा न मिळे खाया ॥२॥
पोट पोसावया तोंडे बडबडी । नाही धडफुडी एक गोष्टी ॥३॥
तुका म्हणे तया काय व्याली रांड । येउनिया भंड जनामध्ये ॥४॥
अर्थ
आचार विचार ब्रम्हज्ञान काय आहे हेच मात्र कळत नाही परंतू खोटा व्यवहार तर करतो, अशा या चांडाळाचा जन्म गाढवीनीच्या पोटी झालेला असतो त्यामुळे त्याचे नांव महाखर असे असते. द्रव्याच्या प्राप्तीसाठी, द्रव्याच्या इच्छेसाठी तो हरीकथा करतो अशा पापिष्ठाला अन्न खायला मिळत नाही काय ? असा हा चांडाळ पोट पोसण्याकरता तोंडाने व्यर्थ बडबड करतो परंतू त्याची एक गोष्ट सुध्दा धडाची नसते. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा भांड, अशा लबाड मनुष्य ज्याला ब्रम्हज्ञान कळत नाही, आचारविचार कळत नाही धनाकरता जो हरीकथा करतो अशा पापिष्ठ माणसाला त्याच्या रांड आईने जन्मच का दिला असेल ? ”
2:36
अभंग क्र. ३०३३
नित्य उठोनिया खावयाची चिंता । आपुल्या तू हिता नाठवीसी ॥१॥
जननीचे पोटी उपजलासी जेव्हा । चिंता तुझी तेव्हा केली तेणे ॥धृपद॥
चातका लागूनि मेघ नित्य वर्षे । तो तुज उदास करील केवी ॥२॥
पक्षी वनचरे आहेत भूमीवरी । तयांलागी हरी उपेक्षीना ॥३॥
तुका म्हणे भाव धरुन राहे चित्ती । तरि तो श्रीपति उपेक्षीना ॥४॥
अर्थ
अरे दररोज उठून केवळ खाण्याचीच चिंता करत बसतोस परंतू आपल्या हिताविषयी तू कधीही विचार करत नाहीस. अरे ज्यावेळी तू तुझ्या आईच्या पोटातून जन्मलास त्यावेळी देखील त्यानेच तर तुझ्या खाण्यापिण्याची चिंता केली. जो चातकासाठी नेहमी मेघवर्षाव करतो तो तुला केव्हा उदास करीन ? अरे या पृथ्वीतलावर पशू पक्षी वनचर खूप आहेत त्यांची देखील हरी उपेक्षा करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे त्या श्रीपतीविषयी तू तुझ्या चित्तामध्ये एकनिष्ठ भक्तीभाव धरुन राहा मग तो तुझी कधीही उपेक्षा करणार नाही. ”
2:36
अभंग क्र. ३०३४
पूर्वीहूनि बहु भक्त सांभाळिले । नाही अव्हेरिले दास कोणी ॥१॥
जेजे शरण आले तेते आपंगिले । पवाडे विठ्ठले ऐसे तुझे ॥धृपद॥
मिरवे चरणी ब्रिद ऐसीये गोष्टीचे । भक्तासांभाळाचे प्रेम ऐसे ॥२॥
तुका म्हणे आम्हासाठी येणे रूपा । माझ्या मायबापा पांडुरंगा ॥३॥
अर्थ
देवा पूर्वीपासूनच तू खूप भक्तांचा सांभाळ केला आहेस तुला शरण आलेल्या दासांचा तू कधी अव्हेर केला नाहीस. हे विठ्ठला जे जे भक्त तुला शरण आले आहेत त्यांचा त्यांचा तू सर्वाचा स्वीकार केला आहेस अशी किर्ती पोवाडे तुझी सर्वत्र आहेत. तू भक्तांविषयी फार प्रेमळ आहेस आणि भक्तांचे सांभाळ देखील तू करतोस अशी ब्रीदावळीच तू तुझ्या पायामधे मिरवत असतोस. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पाडूरंगा माझ्या मायबापा तू आम्हा भक्तांसाठीच नामरुपाला येत असतोस. ”
2:36
अभंग क्र. ३०३५
भक्तकरुणा बहुत तुझिया अंतरा । मज विश्वंभरा कळो आले ॥१॥
पक्षीयासी तुझे नाम जे ठेविले । तये उद्धरिले गणिकेसी ॥धृपद॥
कुंटिणी ते दोष बहु आचरली । नाम घेता आली करुणा तुज ॥२॥
हृदय कोमळ तुझे नारायणा । ऐसे बहुता जना तारियेले ॥३॥
तुका म्हणे सीमा नाही तुझे दये । कोमळ हृदय पांडुरंगा ॥४॥
अर्थ
हे विश्वंभरा तुझ्या अंत:करणात भक्तांविषयी फार करुणा आहे हे मला कळून आले आहे. गणिका नावाच्या वेश्येने तिचा आवडता पक्षी पोपट ज्यावेळी पाळला त्या पोपटाचे नांव ठेवले राघव व तिला त्या पोपटाला सारखे राघव राघव असे म्हणण्याची सवय लागली व नकळत तिने तुझे नाम घेतले त्यामुळे तिचा देखील तू उध्दार केला. गणिका ही एक वेश्याच होती तिचे आचरण हे खूप दोषास्पद होते परंतू तिने तुझे नाम घेतले व तुला करुणा आली व तिचा तू उध्दार केलास. हे नारायणा अरे तुझे ह्दय फारच कोमळ आहे असे कितीतरी पापी लोक होते की जे नंतर तुझे भक्त झाले त्यांना देखील तू तारले आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पाडूरंगा तुझ्या दयेला सीमाचा नाहीय इतके तुझे ह्दय कोमळ आहे. ”
2:36
अभंग क्र. ३०३६
आजामेळा अंत मरणासी आला । तोवरी स्मरला नाही तुज ॥१॥
प्राण जातेवेळे म्हणे नारायण । त्यासाठी विमान पाठविले ॥धृपद॥
बहुत कृपाळु होसी जगन्नाथा । त्रैलोक्यसमर्था सोइरिया ॥२॥
तुका म्हणे भक्तकाज तू कैवारी । तुज साही चारी वर्णिताती ॥३॥
अर्थ
अजामेळ शेवटी मरणापर्यंत आला परंतू तरी देखील त्याने तुझे स्मरण केले नाही. देवा प्राण जात्यावेळी त्याने मुलाच्या निमित्ताने नारायणा असे नाम उच्चारले तर तू त्याच्यासाठी विमानच पाठवले. हे जगन्नाथा, सर्व समर्था तू त्रैलोक्याचा सोयरा आहेस भक्तांविषयी तू फारच कृपाळू होतोस. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तू भक्तराज आहेस भक्तांचा तू कैवारी आहेस असे तुझे वर्णन साही शास्त्र आणि चारही वेद वर्णन करुन सांगतात. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















