११ सप्टेंबर, दिवस २५४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी २६ ते ५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३०३७ ते ३०४८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“११ सप्टेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 11 September
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ११ सप्टेंबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३०३७ ते ३०४८ चे पारायण आपण करणार आहोत.
११ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी २६ ते ५० ,

26-16
जी भृगूचा कैसा अपकारु । की तो मानूनि प्रियोपचारु । तोषेचिना शारङ्गधरु । गुरुत्वासी ? ॥26॥
पाहू गेले तर, भृगूने केवढा अपराध केला ? पण त्याने केलेला लत्ताप्रहार हा गुरुप्रसादच समजून, भगवंतांनी संतुष्ट होऊन ते प्रसादचिन्ह म्हणून हृदयावर धारण केले. 26
27-16
की आंधारे खतेले अंबर । झालेया दिवसनाथासमोर । तेणे तयाते पऱ्हा सर । म्हणितले काई ? ॥27॥
किंवा अंधकाराने गच्च भरलेले व्योम सूर्यासमोर आले असता, त्याने, तू असे मजसमोर येऊ नको असे त्यास कधी म्हटले आहे काय ? 27
28-16
तेवी भेदबुद्धीचिये तुळे । घालूनि सूर्यश्लेषाचे काटाळे । तुकिलासि ते येकी वेळे । उपसाहिजो जी ॥28॥
तसेच तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी नसलेला भेद उत्पन्न करून त्या तराजूमध्ये एका अंगाला सूर्य व एका अंगाला आपण अशी आपली तुला करु गेलो त्याची श्रीगुरो, मला क्षमा असावी. 28
29-16
जिही ध्यानाचा डोळा पाहिलासी । वेदादि वाचा वानिलासी । जे उपसाहिले तयासी । ते आम्हाही करी ॥29॥
(तू ध्यानाचा विषय नसतां) ज्यांनी तुझे ध्यान केले, ज्या वेदांदिकांनी वाणीने तुझे स्तवन केले, ते आपण जसे सहन केले, तीच दृष्टि माझ्याबद्दलही असावी. 29
30-16
परी मी आजि तुझ्या गुणी । लांचावलो अपराधु न गणी । भलते करी परी अर्धधणी । नुठी कदा ॥30॥
परंतु, तुमचे अखंड गुणगान करावे ह्याची मला अत्यंत हौस वाटते किंवा ही मला खोडच लागली आहे; म्हणून, तो अपराध असे गणू नये; आपण काय वाटेल ते करा; मी मात्र माझी सर्व इच्छा पूर्ण झाल्यावाचून येथून हालणार नाही. 30


31-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
मिया गीता येणे नांवे । तुझे पसायामृत सुहावे । वानू लाधलो ते दुणेन थावे । दैवलो दैवे ॥31॥
मी, गीतानामक आपले प्रसादामृत सेवू लागलो तों, मला आपल्या यशोवर्णनाचे दुप्पट बळ चढले व माझ्या नशिबाचेही नशीब उघडले. 31
32-16
माझिया सत्यवादाचे तप । वाचा केले बहुत कल्प । तया फळाचे हे महाद्वीप । पातली प्रभु ॥32॥
हे प्रभो, मला वाटते अनंत कल्प माझ्या वाणीला सत्यभाषणाचे तपाचरण घडले आहे. त्याचेच फल म्हणून मला ह्या गीतारूप महाद्वीपाचा लाभ झाला आहे. 32
33-16
पुण्ये पोशिली असाधरणे । तिये तुझे गुण वानणे । देऊनि मज उत्तीर्णे । जाली आजी ॥33॥
मी आजवर असामान्य पुण्याई संपादन केली त्याचा मोबदला म्हणून तुझे गुणवर्णन करण्याचे तिने मला सामर्थ्य देऊन ती आज माझी उतराई झाली आहे. 33
34-16
जी जीवित्वाच्या आडवी । आतुडलो होतो मरणगावी । ते अवदसाची आघवी । फेडिली आजी ॥34॥
देहबुद्धीमुळे मी जीवदशेच्या घोर अरण्यात गुंतून जन्ममृत्युच्या कचाट्यात आड्कलो होतो, ती माझी अवदशा, माझी जीवदशाच आज संपल्यामुळे, सर्व नष्ट झाली आहे. 34
35-16
जे गीता येणे नांवे नावाणिगी । जे अविद्या जिणोनि दाटुगी । ते कीर्ती तुझी आम्हाजोगी । वानावया जाली ॥35॥
जी गीता ह्या नांवाने ख्यातनाम्नी (प्रसिद्ध) असून अविवेचा पाडाव करून जिने आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे, अशा आपल्या गीतेचे म्हणजे आपले यश आम्ही वर्णन करणच योग्य होय. 3


36-16
पै निर्धना घरी वानिवसे । महालक्ष्मी येऊनि बैसे । तयाते निर्धन ऐसे । म्हणो ये काई ? ॥36
कल्पना करा, की दरिद्रयाच्या घरी महालक्षमीने एकाएक प्रवेश केला तरीही त्याला मग दरिद्री म्हणता येईल काय ? 36
37-16
का अंधकाराचिया ठाया । दैवे सुर्यु आलिया । तो अंधारुचि जगा यया । प्रकाशु नोहे ? ॥37॥
किंवा जेथे अंधकार आहे त्या स्थली दैववशात् सूर्य पातला, तर तो अंधकारच ह्या जगाला प्रकाशरूप होत नाही काय ? 37
38-16
जया देवाची पाहता थोरी । विश्व परमाणुही दशा न धरी । तो भावाचिये सरोभरी । नव्हेचि काई ? ॥38॥
ज्या परमात्मस्वरूपाचे महिमान पाहू गेले असता विश्वाला परमाणुइतकेही स्थान अगर इतकीही सत्ता नाही तो भक्तिभावाच्या बळावर काय करणार नाही ? अगर होणार नाही ? 38
39-16
तैसा मी गीता वाखाणी । हे खपुष्पाची तुरंबणी । परी समर्थे तुवा शिरयाणी । फेडिली ते ॥39॥
त्याप्रमाणे मी टीका व्याख्यान करावे, ही वस्तुतः आकाशपुष्पाचा सुगंध घेण्यासारखी अशक्य गोष्ट होय; परंतु आपणा समर्थाच्या कृपेने माझी तीही इच्छा पूर्ण केली. 39
40-16
म्हणौनि तुझेनि प्रसादे । मी गीतापद्ये अगाधे । निरूपीन जी विशदे । ज्ञानदेवो म्हणे ॥40॥
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या प्रसादाच्या योगे गीतेच्या श्लोकांचे मूळच्या खोल आर्थाप्रमाणे विवरण करीन. 40


41-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तरी अध्यायी पंधरावा । श्रीकृष्णे तया पांडवा । शास्त्रसिद्धांतु आघवा । उगाणिला ॥41॥
देवांनी, पंधराव्या अध्यायात अर्जुनाला सकलशास्त्र-सिद्धांत कथन केला आहे. 41
42-16
जे वृक्षरूपक परीभाषा । केले उपाधि रूप अशेषा । सद्वैद्ये जैसे दोषा । अंगलीना ॥42॥
उत्तम वैद्याने अंगांत मुरलेल्या दुखण्याची चिकित्सा करावी त्याप्रमाणे ब्रह्म बस्तूच्या ठिकाणी झालेल्या अनादि अनिर्वचनीय माया ह्या उपाधीच्या संबंधाने, ही त्रैलोक्यरचना कीशी निर्माण झाली हे वृक्षाच्या रूपकाने देवांनी दाखविले. 42
43-16
आणि कूटस्थु जो अक्षरु । दाविला पुरुषप्रकारु । तेणे उपहिताही आकारु । चैतन्या केला ॥43॥
आणि कूटस्थ (मायारूप उपाधि ज्याला आहे असा) अक्षर पुरुषाचा प्रकार म्हणून जो दाखविला व त्याचबरोबर तदुपहितचैतन्याचेही वर्णन केले. 43
44-16
पाठी उत्तम पुरुष । शब्दाचे करूनि मिष । दाविले चोख । आत्मतत्त्व ॥44॥
नतर उत्तमपुरुष शब्दाच्या वर्णनाच्या निमित्ताने केवल शुद्ध जे आत्मतत्त्व (ब्रह्म) त्याचे स्पष्टीकरण केले 44
45-16
आत्मविषयी आंतुवट । साधन जे आंगदट । ज्ञान हेही स्पष्ट । चावळला ॥45॥
व आत्मप्राप्तीचे श्रेष्ठ अंतरंग साधन जे ज्ञान याचेही कथन केले. 45


46-16
म्हणौनि इये अध्यायी । निरूप्य नुरेचि काही । आता गुरुशिष्या दोही । स्नेहो लाहणा ॥46॥
म्हणून ह्या अध्यायात निरूपण करण्यासारखे काही उरले नाही, परंतु गुरुशिष्यांच्या प्रेमसंवादाचा अनुवाद करू. 46
47-16
एवं इयेविषयी कीर । जाणते बुझावले अपार । परी मुमुक्षु इतर । साकांक्ष जाले ॥47॥
याप्रमाणे पंधराव्या अध्यायाने अनेक बुद्धिमंताची योग्य समज पडली तरी इतर जे मुमुक्षु त्यांच्या सर्व शंकांचे निरसन झाले नाही. 47
48-16
त्या मज पुरुषोत्तमा । ज्ञाने भेटे जो सुवर्मा । तो सर्वज्ञु तोचि सीमा । भक्तीचीही ॥48॥
असा जो मी “पुरुषोत्तम ” त्या माझे वर्म जाणून जो ज्ञानद्वारा मल भेटतो (मद्रूप होतो) तोच सर्वज्ञ होय व त्याची मजविषयींची भक्ति हीच सीमेची (कडेची) भक्ति होय. 48
49-16
ऐसे हे त्रैलोक्यनायके । बोलिले अध्यायात श्लोके । तेथे ज्ञानचि बहुतेके । वानिले तोषे ॥49॥
असे जे त्रैलोक्यनाथ भगवंतांनी पंधराव्या अध्यायाच्या शेवटी संतोषपूर्वक कथन केले आहे त्यात प्रायःज्ञानाचीच थोरवी सांगितली आहे. 49
50-16
भरूनि प्रपंचाचा घोटु । कीजे देखताचि देखतया द्रष्टु । आनंदसाम्राज्यी पाटु । बांधिजे जीवा ॥50॥
प्रपंचाचा ग्रास करून ब्रह्मदर्शन होताच, द्रष्टयाला दृश्यही आत्मस्वरूपाने दिसू लागते (सर्वात्मभाव होतो) व त्यायोगे जीवाला ब्रह्मात्मभाव येऊन तो आनंदसाम्राज्याचा स्वामी होतो. 50

दिवस २५४ वा. ११, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३०३७ ते ३०४८
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ३०३७
धर्म रक्षावया अवतार घेशी । आपुल्या पाळिसी भक्तजना ॥१॥
अंबॠषीसाठी जन्म सोसियेले । दुष्ट निर्दाळिले किती एक ॥धृपद॥
धन्य तुज कृपासिंधु म्हणतील । आपुला तू बोल साच करी ॥२॥
तुका म्हणे तुज वर्णिती पुराणे । होय नारायणे दयासिंधु ॥३॥
अर्थ
देवा तू धर्मरक्षण करण्याकरता अवतार घेतोस आणि आपल्या भक्तांचे पालनपोषण करुन दुष्टांपासून त्यांचे रक्षण करतोस. तुझ्या भक्त अंबरीश राजासाठी तू दहा जन्म सोसलेस आणि त्या दहा जन्मामध्ये कितीतरी दुष्टांचे तू निर्दालन केलेस. देवा तू कृपासिंधू आहेस आणि तू गीतेत जे वचन बोलला आहेस ते म्हणजे मी भक्तांचे रक्षण करेल व धर्माला ज्यावेळी ग्लानी येईल त्यावेळी अवतार घेईल हे तुझे बोल तू खरे करुन दाखव मग पुन्हा तुला लोक कृपासिंधू म्हणतील. तुकाराम महाराज म्हणतात, “नारायणा तू दयासिंधू आहेस असे पुराणे देखील तुझे वर्णन करतात त्यामुळे तू दयासिंधू व्हावेस. ”
2:37

अभंग क्र. ३०३८
येउनी जाउनी पाहे तुजकडे । पडिल्या साकडे नारायणा ॥१॥
आणीक कोणाचा मज नाही आधार । तुजवरी भार जीवे भावे ॥धृपद॥
निष्ठुर अथवा होई तू कृपाळ । तुज सर्वकाळ विसरेंना ॥२॥
आपुले वचन राहावे सांभाळून । तुम्हा आम्हा जाण पडिपाड ॥३॥
ज्याच्या वचनासी अंतर पडेल । बोल तो होईल तयाकडे ॥४॥
तुम्हा आम्हा तैसे नाही म्हणे तुका । होशील तू सखा जीवलगा ॥५॥
अर्थ
हे नारायणा माझ्यावर जर संकट आले तर मी येता जाता तुझ्याकडेच पाहतो. देवा तुझ्यावाचून दुसरा कोणताही मला आधार नाही त्यामुळे तुझ्यावर माझ्या योगक्षेमाचा भार मी जीवेभावे घातला आहे. देवा तू माझ्याविषयी निष्ठूर हो अथवा कृपाळू हो मी तुला कधीही विसरणार नाही सर्वकाळ तुझेच स्मरण करत राहीन. देवा आपआपले वचन सांभाळणे हे आपआपले कर्तव्य आहे त्यामुळे भक्ती करणे हे आमचे वचन आहे तर भक्तांचे रक्षण करणे हे तुमचे वचन आहे त्यामुळे दोघानीही आपल्या वचनाचे रक्षण केले तर आपली बरोबरी होईल हे तुम्ही जाणून घ्यावे. आणि आपआपले वचनाप्रमाणे जो कोणी वागणार नाही तर त्याच्याकडे दोष येईल. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आपल्या दोघामध्ये म्हणजेच तुम्हा आम्हामध्ये वचन मोडण्याचा प्रकार काही होणारच नाही आम्ही तुझी एकनिष्ठेने भक्ती करु आणि तू मग आमचा जिवलग सखा होशील. ”
2:37

अभंग क्र. ३०३९
आइके नारायणा वचन माझे खरे । सांगतो निर्धारे तुजपासी ॥१॥
नाही भाव मज पडिली लोककाज । राहिलेसे काज तुझे पायी ॥धृपद॥
वरदळ भक्ती करितो मी नित्य । परी नाही चित्त तुझे पाई ॥२॥
जरि तुज काही करणे उचित । तारी तू पतित तुका म्हणे ॥३॥
अर्थ
हे नारायणा मी तुझ्याजवळ निर्धाराने एक खरे खरे वचन सांगतो ते तू ऐक. देवा माझा तुझ्याविषयी खरा भक्तीभाव नाही मला तर लोकलज्जा आडवी येत आहे परंतू माझे सर्व कार्य तुझ्या पायाजवळच राहिले आहे. परंतू देवा तरी देखील मी दांभिकपणाने तुझी भक्ती नित्य करीत असतो. असे असले तरी माझे चित्त काही तुझ्या पायाच्या ठिकाणी राहात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा जर तुला काही उचित करावेसे वाटले तर या पतिताला तू तार. ”
2:37

अभंग क्र. ३०४०
अनाथ परदेशी हीन दीन भोळे । उगलेचि लोळे तुझे रंगी ॥१॥
आपुले म्हणावे मज नुपेक्षावे । प्रेमसुख द्यावे मायबापा ॥धृपद॥
कासवीचे परि दृष्टी पाहे मज । विज्ञानी उमज देवुनिया ॥२॥
तुका म्हणे तुझा झालो शरणागत । काया वाचा चित्त दुजे नाही ॥३॥
अर्थ
मी अनाथ परदेशी हीन दीन भोळा भक्त आहे उगाचच तुझ्या रंगामध्ये देवा मी लोळत आहे. त्यामुळे हे मायबापा मी कसाही असलो तरी देखील तू मला आपले म्हण माझी उपेक्षा करु नकोस आणि तुझे प्रेमसुख तू मला दयावे. देवा तू कासवीच्या कृपादृष्टीप्रमाणे माझ्याकडे पाहावे व माझी भूक तृप्त करावी आणि तुझा प्रत्येक साक्षात्कार मला येऊ दयावा. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुला शरण आलो आहे आणि माझ्या कायावाचामनामध्ये तुझ्यावाचून दुसरे काहीच नाही. ”
2:38

अभंग क्र. ३०४१
पावलो पंढरी वैकुंठभवन । धन्य आजि दिन सोनियाचा ॥१॥
पावलो पंढरी आनंदगजरे । वाजतील तुरे शंख भेरी ॥धृपद॥
पावलो पंढरी क्षेमआळींगनी । संत या सज्जनी निवविलो ॥२॥
पावलो पंढरी पार नाही सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥३॥
पावलो पंढरी येरझार खुंटली । माउली वोळली प्रेमपान्हा ॥४॥
पावलो पंढरी आपुले माहेर । नाही संवसार तुका म्हणे ॥५॥
अर्थ
मी आज भूवैकुंठ म्हणजे पंढरीला आलो आहे त्यामुळे आजचा दिवस धन्य आहे व सोन्याचा आहे. मी आज पंढरीमध्ये हरीनामाचा गजर करीत तसेच शंख नगारे तुतारे टाळ वीणाच्या गजरामध्ये आनंदाने पंढरीत आलो आहे. मी पंढरीत आल्यानंतर संत सज्जनाने मला क्षेम आलिंगन दिले व मला निश्चिंत केले. आता पंढरीला आल्यानंतर माझ्या सुखाला अंत:पारच राहीला नाही कारण माझा सखा मायबाप पाडूरंग मला भेटला. मी ज्यावेळी पंढरीक्षेत्रामध्ये आलो त्यावेळीच माझी जन्ममरणाची येरझार खुंटली आणि विठाबाई माऊलीने मला तिचा प्रेमपान्हा दिला. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्यावेळी मी पंढरीक्षेत्रामध्ये आलो त्यावेळी माझ्या माहेरीच मी आलो त्यामुळे आता मला संसारच राहीलेला नाही. ”
2:38

अभंग क्र. ३०४२
खिस्तीचा उदीम उदिमांत हीन । करिती ब्राम्हण कलीयुगी ॥१॥
वेवसाव करिता पर्वत मांगापासी । ते पै विटाळासी न मानिती ॥धृपद॥
मांगिणीशी नित्य करीतसे लेखा । तोंडावरी थुंका पडतसे ॥२॥
आशा माया रांडा नांव हे कागदी । आठवीना कधी नारायण ॥३॥
तुका म्हणे देह झाले पराधीन । पांडुरंगाविण गति नाही ॥४॥
अर्थ
व्याज बट्टयाचा व्यापार सर्व व्यापारामध्ये हीन आहे तरी देखील कलियुगामध्ये काही ब्राम्हण हा व्यापार करतात. एखादया पर्वत्या नावाच्या मांगाशी व्याज बट्टयाचा व्यापार हे ब्राम्हण लोक करतात, परंतू त्यावेळी त्याचा विटाळ हे मानत नाहीत. मांगीणीशी व्याज बट्टेचा व्यवसाय नित्य करताना हा त्याचा लेखा ठेवतो आणि त्या मांगीणीशी बोलत असतो व ती मांगीण त्याच्याशी बोलत असताना तिचा थुंका देखील त्याच्या तोंडावर उडतो. व्याज बट्टेचा व्यवसाय करताना हा ब्राम्हण आशा माया अशा रांडेंचे नांव कागदावर लिहून घेतो परंतू नारायणाला कधीही आठवित नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा या ब्राम्हणांचे देह हे नीच जातीच्या आधीन झाले आहेत त्यांना पाडूरंगावाचून गतीच नाही. ”
2:38

अभंग क्र. ३०४३
तू आम्हा सोयरा सज्जन सांगाति । तुज मज प्रीति चालो सदा ॥१॥
तू माझा जिव्हाळा जीवाचा जिवलग । होसी अंतरंग अंतरीचा ॥धृपद॥
गण गोत मित्र तू माझे जीवन । अनन्य शरण तुझ्या पायी ॥२॥
तुका म्हणे सर्वगुणे तुझा दास । आवडे अभ्यास सदा तुझा ॥३॥
अर्थ
देवा तू आमचा सोयरा सज्जन सोबती आहेस आपल्या दोघामध्ये प्रीती नेहमी असू दयावी. देवा तू माझा जिव्हाळा आहेस जिवाचा जिवलग आहेस माझ्या अंत:करणातील तू अंतरंग आहे. देवा तूच माझा गणगोत मित्र आणि तूच माझे जीवन आहेस. मी तुझ्या पायी अनन्यभावाने शरण आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा सर्व गुणाने मी तुझा दास आहे आणि नेहमी तुझाच अभ्यास करत राहाणे हेच मला आवडते. ”
2:41

अभंग क्र. ३०४४
आवडेल तैसे तुज आळवीन । वाटे समाधान जीवा तैसे ॥१॥
नाही येथे काही लौकिकाची चाड । तुजविण गोड देवराया ॥धृपद॥
पुरवी मनोरथ अंतरीचे आर्त । धायेवरी गीत गाई तुझे ॥२॥
तुका म्हणे लेकी आळवी माहेरा । गाऊ या संसारा तुज तैसे ॥३॥
अर्थ
देवा माझ्या जीवाला ज्या योगाने समाधान वाटेल आणि मला जसे आवडेल तसे मी तुला आळवीन. हे देवराया मला येथे कोणत्याही प्रकारच्या लौकिकाची आवडच राहिली नाही तुझ्यावाचून काहीही गोड मला वाटत नाही. देवा माझी तृप्ती होईपर्यंत मी तुझे गीत गात राहीन माझ्या अंतरंगातील आर्त मनोरथ तू पूर्ण कर. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा लेक सासरी राहून जशी माहेरची आठवण काढत असते त्याप्रमाणे मी संसारात राहून तुझे गीत गात राहीन. ”
2:41

अभंग क्र. ३०४५
माझे मुख नामी रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥१॥
अबद्ध चांगले गाऊ भलतैसे । बाळ वडे जैसे मायबापा ॥२॥
तुका म्हणे मज न लवी वाकडे । मी तुझे बोबडे बाळ तान्हे ॥३॥
अर्थ
माझे मुख नेहमीच सर्वकाळ राम कृष्ण गोविंद गोपाळ या नामात रंगो. लहान बाळ आई बापाजवळ कसेही वेडे वाकडे बोबडे बोल बोलते त्याप्रमाणे मी या हरीचे नाम शुध्द अबध्द चांगले जसे जमेल तसे गात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तू मला वाकडयात लावू नकोस मी तुझ्याशी बोबडे बोलणारे तुझे तान्हे बाळ आहे. ”
2:41

अभंग क्र. ३०४६
यालागी आवडी म्हणा रामकृष्ण । जोडा नारायण सर्वकाळ ॥१॥
सोपे हे साधन लाभ येतो घरा । वाचेसी उच्चारा राम हरी ॥धृपद॥
न लगती कष्ट न लगे सायास । करावा अभ्यास विठ्ठलाचा ॥२॥
न लगे तप तीर्थ करणे महादान । केल्या एक मन जोडे हरी ॥३॥
तुका म्हणे काही न वेचिता धन । डोले नारायण नामासाठी ॥४॥
अर्थ
लोकांनो नारायणाची प्राप्ती करुन घेण्यासाठी तुम्ही सर्वकाळ रामकृष्ण हरी या नामाचा उच्चार करा आणि नारायणाशी नाते जोडून घ्यावे. हरीची प्राप्ती करुन घेण्यासाठी नाम हे अतिशय सोपे साधन आहे व नाम घेतल्याने सर्व लाभ घरी चालत येतात त्यामुळे वाचेने राम हरी या नामाचा उच्चार करा. अहो नारायणाशी नाते जोडण्याकरता कोणत्याही प्रकारचे कष्ट किंवा सायास करावे लागत नाही केवळ विठ्ठलाचा अभ्यास करावा. नारायणाची प्राप्ती करुन घेण्यासाठी नारायणाशी नाते जोडण्याकरता कोणत्याही प्रकारचे तप तीर्थ किंवा महादान करण्याची गरज नाही केवळ एकाग्र मन केले की नारायणाशी नाते जोडले जाते. तुकाराम महाराज म्हणतात, “कोणत्याही प्रकारचे धन खर्च न करता केवळ हरीचे नाम घेतले की, नारायणाचा लाभ होतो. ”
2:42

अभंग क्र. ३०४७
पापिया चांडाळा हरीकथा नावडे । विषयी आवडे गाणे त्याला ॥१॥
ब्राम्हणा दक्षणा देता रडे रुका । विषयालागी फुका लुटी धन ॥धृपद॥
वीतभरि लंगोटी नेदी अतीताला । भोरप्यासी शाला वाटीतसे ॥२॥
तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥३॥
अर्थ
पापी आणि चांडाळ माणसांना हरीकथा कधीही आवडत नाही परंतू त्यांना वैशिक सुख देणारे गाणे फार आवडतात. ब्राम्हणांना एक रुपया दक्षिणा देण्यासाठी देखील हा रडत असतो परंतू विषयभोग भोगण्याकरता खूप धन लूटतानाही मागेपुढे पाहात नाही. अतिथीला हा वीतभर लंगोटी देखील देणार नाही परंतू बहुरुप्याला शाल जोड्या वाटत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा माणसाच्या तोंडावर थुंका कारण पुढे तो यमपुरीच भोगण्यासाठी जाईल. ”
2:42

अभंग क्र. ३०४८
क्षुधार्थी दुष्काळे अन्ने पीडियेले । मिष्टान्न देखिले तेणे जैसे ॥१॥
तैसे तुझे पायी लांचावले मन । झुरे माझा प्राण भेटावया ॥धृपद॥
मांजरे देखिला लोणियांचा गोळा । लावुनिया डोळा बैसलेसे ॥२॥
तुका म्हणे आता झडी घालू पाहे । पांडुरंगे माये तुझे पायी ॥३॥
अर्थ

दुष्काळामध्ये एखादा मनुष्य अन्न-पाण्यावाचून त्रासलेला असेल व त्याने अचानक मिष्ठान्न पाहिले तर त्याला जसा आनंद होईल, देवा अगदी त्याप्रमाणे माझे मन तुझे पाय पाहिल्यानंतर लांचावले आहे आणि तुला भेटण्यासाठी तर माझा प्राण अगदी झुरत आहे. मांजराने लोण्याचा गोळा पाहिला कि तिचे मन त्या लोण्याच्या गोळ्यावर जाते आणि ते खाण्यासाठी सारखे त्या लोण्याच्या गोळ्यावर डोळा ठेवून टपून बसते आणि वेळ भेटताच लोण्यावर झडप घालते. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगे माझे माय आता मी देखील तुझ्या पायावर अशीच झडप घालू पाहात आहे.

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading