आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२९ सप्टेंबर, दिवस २७२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी १ ते २५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३२५३ ते ३२६४
“२९ सप्टेंबर ” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 29 September
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २९ सप्टेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १७ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३२५३ ते ३२६४ चे पारायण आपण करणार आहोत.
२९ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी १ ते २५,
॥ सार्थ श्रीज्ञानेश्वरी: ::॥ अथ सप्तदशोऽध्यायः अध्याय सतरावा ॥ श्रद्धात्रयविभागयोग ॥
अध्याय सतरावा
ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥ । अथ सप्तदशोऽध्यायः – अध्याय सतरावा॥। श्रद्धात्रयविभागयोगः ।
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1-17
विश्वविकासित मुद्रा । जया सोडी तुझी योगमुद्रा । तया नमोजी गणेंद्रा । श्रीगुरुराया ॥1॥
ज्या जीवांवर तुझ्या स्वरूपसमाधीचा प्रसाद होत नाही त्यास हे चराचर विश्व सत्य वाटते, असे सर्व गणाधीशरूप श्रीगुरुराया जे तुम्ही, त्या तुम्हास प्रणाम असोत. 1
2-17
त्रिगुणत्रिपुरी वेढिला । जीवत्वदुर्गी आडिला । तो आत्मशंभूने सोडविला । तुझिया स्मृती ॥2॥
श्रीशंकर त्रिपुरासुराचा वध तुझ्या स्मरणानंतरच करू शकले, त्याप्रमाणे, त्रिगुणात्मक मायारूप असुराने वेढलेला जीवदशेमध्ये अडकलेला जो आत्मरूपी शंकर तो ह्या संकटांतून गणाधीश, जो तू, त्या तुझ्या स्मरणाने मुक्त झाला. 2
3-17
म्हणौनि शिवेसी काटाळा । गुरुत्वे तूचि आगळा । तऱ्ही हळु मायाजळा- । माजी तारूनि ॥3॥
आपल्या स्मरणाने आत्मशंभूते माया त्रिपुराचा वध केला असल्यामुळे तुलनेने आपण (गुरुत्वांत) शंकरापेक्षांही श्रेष्ठ असून, जीवांस मायानदींतून पैलतीरावर नेणारे म्हणून नौके पेक्षांही हलके आहां. 3
4-17
जे तुझ्याविखी मूढ । तयांलागी तू वक्रतुंड । ज्ञानियांसी तरी अखंड । उजूचि आहासी ॥4॥
ज्यांना तुझ्या स्वरूपाचे ज्ञान नाही त्यांना तु वक्रतुंड आहेस असे वाटते, पण तत्त्ववेत्यांन तू सदैव उजु अथवा समच आहेस. 4
5-17
दैविकी दिठी पाहता सानी । तऱ्ही मीलनोन्मीलनी । उत्पत्ति प्रळयो दोन्ही । लीलाचि करिसी ॥5॥
हे गुरु गणपते, आपली दृष्टि (नेत्र) स्वभावतःच लहान आहे खरी, पण त्यांच्या मीलनोन्मीलनाने (उघडझांपीनें) जगाचा उत्पत्ति प्रलयादि व्यवहार सहज व्हावा असे तिचे सामर्थ्य आहे. 5
6-17
प्रवृत्तिकर्णाच्या चाळी । उठली मदगंधानिळी । पूजीजसी नीलोत्पली । जीवभृंगांच्या ॥6॥
आपल्या प्रवृत्तिरूप कर्णाच्या चलनाते गंडस्थलांतून वाहणाऱ्या मदाचा सुगंध आसमंतात पसरून, त्यायोगे जीवरूपी नील भ्रमर तेथे जमा होतात व जणू काही नीलकमलांनीच आपले पूजन केल्याप्रमाणे आपण शोभतां. 6
7-17
पाठी निवृत्तिकर्णताळे । आहाळली ते पूजा विधुळे । तेव्हा मिरविसी मोकळे । आंगाचे लेणे ॥7॥
मागाहून निवृत्तिरूप कर्णाच्या गतीने ती बांधलेली पूजा उधळून गेली (अंतर्मुखता आली) म्हणजे आपल्या शुद्ध स्वरूपाचे दर्शन होते. 7
8-17
वामांगीचा लास्यविलासु । जो हा जगद्रूप आभासु । तो तांडवमिसे कळासु । दाविसी तू ॥8॥
आपली वामांगा सरस्वती (आदिमाया) तिचा नृत्यविलासाचा प्रभाव, तोच हा जगदाभास होय; व ते तांडवकौशल्य प्रकाशन तुम्ही करितां. (तुमच्या प्रकाशाने होते) 8
9-17
हे असो विस्मो दातारा । तू होसी जयाचा सोयरा । सोइरिकेचिया व्यवहारा । मुकेचि तो ॥9॥
हे असो; दयाळा, आपला दुसरा चमत्कार काय सांगावा ? की, तुझ्याशी सोयरीक जोडतो तो सोयरिकीच्या व्यवहारांतून कायमचा मुक्त होतो. ( त्वद्रूप होतो, भिन्नत्वाने उरत नाही. ) 9
10-17
फेडिता बंधनाचा ठावो । तू जगद्बंधु ऐसा भावो । धरू वोळगे उवावो । तुझाचि आंगी ॥10॥
बंधनांतून मुक्त करणारे असे जगद्बंधु आपण आहां, ह्या भावनेने जो तुला शरण येऊ पहातो (त्याच्या ठिकाणी तुझ्याच आनंदाचा आविर्भाव होतो). 10
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
11-17
तव दुजयाचेनि नांवे तया । देहही नुरेचि पै देवराया । जेणे तू आपणपया । केलासि दुजा ॥11॥
त्या योगे, हे गुरुराया, ज्या देहामुळे मी एक व तू एक असा दैतव्यवहार सिद्ध होतो तो त्याचा देहच (देहात्मभावच) आपण दुजेपणाने उरू देत नाही. (देहबुद्धि बाधित होते) 11
12-17
तूते करूनि पुढे । जे उपाये घेती दवडे । तया ठासी बहुवे पाडे । मागांचि तू ॥12॥
तुला दृश्य विषय मानून जे तुझ्या दर्शनार्थ अनेक प्रकारचे उपाय योजून धावाधाव करितात, त्यांच्या तर तू प्रायः मागेच असतोस. ( त्यांना तुझे दर्शन होतच नाही ) 12
13-17
जो ध्याने सूये मानसी । तयालागी नाही तू त्याचे देशी । ध्यानही विसरे तेणेसी । वालभ तुज ॥13॥
जे ध्यान करून तुला चित्तांत आणू पहातात, त्यांन तर तुझा पत्ताच लागत नाहीं; उलट ध्यानासह ज्यांना देहबुद्धीचा विसर पडतो ते तुला फार प्रिय असतात. 13
14-17
तूते सिद्धचि जो नेणे । तो नांदे सर्वज्ञपणे । वेदांही येवढे बोलणे । नेघसी कानी ॥14॥
ज्याची सिद्धि केली जावी असा तू नसून तू स्वतःसिद्ध आहेस हे न जाणतांही जो वेद सर्वज्ञ म्हणून गणला जातो त्याने (वेदाने ) केलेले एवढे मोठे वर्णनही तुम्ही कानावर घेत नाही. 14
15-17
मौन गा तुझे राशिनांव । आता स्तोत्री के बांधो हाव । दिसती तेतुली माव । भजो काई ॥15॥
पत्रिकेवरून ” मौन ” हे तुझी राशिनाम आहे, मग अशा वस्तूची स्तुति करण्याची का हाव धरावी ? शिवाय जेवढे म्हणून दृश्यजात आहे ही आपली माया होय; मग भजावे तरी कसे ? 15
16-17
दैविके सेवकु हो पाहो । तरी भेदिता द्रोहोचि लाहो । म्हणौनि आता काही नोहो । तुजलागी जी ॥16॥
तुम्हाला सेव्य मानून सेवक होऊ असे म्हणावे तरी ह्या भेदभावनेने मी एकप्रकारे द्रोहीच ठरेन, म्हणून ” तुझा मी अमुक ” असे नाते लावण्याच्या भानगडत न पडणेच बरे. (त्वद्रूप होणे उत्तम) 16
17-17
जै सर्वथा सर्वही नोहिजे । तै अद्वया तूते लाहिजे । हे जाणे मी वर्म तुझे । आराध्य लिंगा ॥17॥
हे आराध्य गुरुराज ह्या सर्व दृश्याचा तत्त्वतः मजपाशी काहीही संबंध नाही असे जेव्हा मी पूर्णपणे जाणेन तेव्हांच मला आपल्या अद्वयस्वरूपाचा लाभ होईल हे आपल्या स्वरूपाचे वर्म मी ओळखतों. 17
18-17
तरी नुरोनि वेगळेपण । रसी भजिन्नले लवण । तैसे नमन माझे जाण । बहु काय बोलो ॥18॥
तरी दुजेपणाने न राहता मीठ जलाशी जसे एकरूप होते त्याचप्रमाणे तुला खरे नमन करणे म्हणजे तुझ्या स्वरूपाहून भिन्नत्वे न उरणे हे होय; मी आणखी काय बोलावे ? 18
19-17
आता रिता कुंभ समुद्री रिगे । तो उचंबळत भरोनि निगे । का दशी दीपसंगे । दीपुचि होय ॥19॥
असे पहा की, रिकामा कुंभ समुद्रांत बुडविला असता जसा भरून बाहेर येतो किंवा सुताची दशी ही दीपसंगानं दीपत्व पावते. 19
20-17
तैसा तुझिया प्रणिती । मी पूर्णु जाहलो श्रीनिवृत्ती । आता आणीन व्यक्ती । गीतार्थु तो ॥20॥
त्याप्रमाणे हे निवृत्तिनाथ श्रीगुरुराया, तुम्हाला प्रणाम केल्याने माझे अपूर्णत्व फिटले; ( मी पूर्ण झालो ) आता गीतार्थ स्पष्टपणे मांडतो. 20
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
21-17
तरी षोडशाध्यायशेखी । तिये समाप्तीच्या श्लोकी । जो ऐसा निर्णयो निष्टंकी । ठेविला देवे ॥21॥
तरी षोडशाध्यायाच्या अखेरच्या श्लोकात देवांनी जो असा असंदिग्ध निर्णय दिला आहे; 21
22-17
जे कृत्याकृत्यव्यवस्था । अनुष्ठावया पार्था । शास्त्रचि एक सर्वथा । प्रमाण तुज ॥22॥
की अर्जुना, कर्तव्य काय किंवा अकर्तव्य कोणते हे जाणणे तर शास्त्रप्रामाण्यावरूनच ती व्यवस्था तू ठरविली पाहिजे. 22
23-17
तेथ अर्जुन मानसे । म्हणे हे ऐसे कैसे । जे शास्त्रेवीण नसे । सुटिका कर्मा ॥23॥
तेव्हा अर्जुन मनात म्हणतो, कर्मालाही शास्त्रावाचून सुटका नसावी असे का असावे ? 23
24-17
तरी तक्षकाची फडे । ठाकोनि कै तो मणि काढे । कै नाकीचा केशु जोडे । सिंहाचिये ? ॥24॥
पण सर्वाच्या फणेला हात घालून त्यावरील मणि काढणार कसा ? किंवा सिंहाच्या नाकांतील केस कोणी उपटून आणू शकतो काय ? 24
25-17
मग तेणे तो वोविजे । तरीच लेणे पाविजे । एऱ्हवी काय असिजे । रिक्तकंठी ? ॥25॥
पण, हे घडेल तेव्हा त्या केसांत तो मणि ओवून मगच ते भूषण गळ्यात घालावे आणि एऱ्हवी गळा काय रिकामा ठेवावा ? 25
दिवस २७२ वा. २९, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३२५३ ते ३२६४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३२५३
घेऊ नये तैसे दान । ज्याचे धन अभिलाषी ॥१॥
तो ही येथे कामा नये । नरका जाय म्हणोनि ॥धृपद॥
विकी स्नानसंध्या जप । करी तप पुढिलांचे ॥२॥
तुका म्हणे दांभिक तो । नरका जातो स्वइच्छा ॥३॥
अर्थ
ज्याचे धन सत्मार्गाने कमवलेले नसते अशा अभिलाषी माणसाकडून दान घेऊ नये. त्याने दिलेले दान घेऊ नये कारण ते येथे कामाला येणार नाही म्हणून त्याचे दान आपण घेऊ नये कारण तो स्वत:च नरकाला जाणार आहे. जो ब्राम्हण स्नानसंध्या करुन दुसऱ्याकडून पैसे घेऊन त्याचे जप तप असे कर्म करतो, तुकाराम महाराज म्हणतात, “असे करणारे दांभिक असून ते स्वत:च्या इच्छेनेच नरकाला जातात. ”
3:40
अभंग क्र. ३२५४
सदा नामघोष करू हरीकथा । तेणे सदा चित्ता समाधान ॥१॥
सर्वसुख ल्यालो सर्व अळंकार । आनंदे निर्भर डुल्लतसो ॥धृपद॥
असो ऐसा कोठे आठवचि नाही । देहीच विदेही भोगू दशा ॥२॥
तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप । लागो नेदू पापपुण्य अंगा ॥३॥
अर्थ
आम्ही नेहमी हरीनामाचा घोष करु व हरीकथा करु त्याने आमच्या चित्ताला समाधान मिळते. आम्ही सर्व प्रकारचे सुख व परमार्थिक सर्व प्रकारचे अलंकार देहावर धारण केले आहेत व त्या आनंदानेच आम्ही डोलत आहोत. आम्ही कोठेही असो आम्हाला त्याचे भानच राहात नाही कोठे आहोत हे देखील आम्हाला आठवणीत राहात नाही. आम्ही या मनुष्य देहात तर आहोत तरी देखील हरीनामाचे चिंतन करुन आम्ही विजयी दशा भोगू. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्ही आता अग्नीरुप झालो आहोत जसे अग्नीला कोणीही विटाळू शकत नाही त्याप्रमाणे आम्ही झालो आहोत त्यामुळे आता आम्ही आमच्या अंगाला पाप आणि पुण्य हे लागूच देणार नाहीत. ”
3:40
अभंग क्र. ३२५५
वरीवरी बोले युद्धाचिया गोष्टी । परसैन्या भेटी नाही झाली ॥१॥
पराव्याचे भार पाहुनिया दृष्टी । कापतसे पोटी थरथरा ॥धृपद॥
मनाचा उदार रायांचा जुंझार । फिरंगीचा मार मारीतसे ॥२॥
धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप । अंगी अनुताप हरीनामे ॥३॥
तुका म्हणे साधु बोले खर्गधार । खोचती अंतर दुर्जनाचे ॥४॥
अर्थ
एखादा भित्रा शिपाई वरवर युध्दाच्या गोष्टी तर खूप बोलतो परंतू कोठपर्यंत, जोपर्यंत शत्रूच्या सैन्याची भेट होत नाही तोपर्यंतच. जेव्हा तो शत्रूच्या सैन्याचे थवेच्या थवे आपल्या दृष्टीने पाहतो ते पाहूनच त्याचे भितीने अंग थरथर कापायला सुरवात होते. जो युध्दाच्याप्रसंगी मनाचा उदार असतो आणि राजाचा खरा झुंजार शूरवीर योध्दा असतो तोच शत्रूवर तलवारीचा मार करत असतो. अगदी त्याप्रमाणे परमार्थामध्ये देखील परमार्थ करत असताना पूर्वी केलेल्या वाईट कर्माचा जो पश्चात्ताप करुन हरीनाम नेहमी घेतो त्याची मायबाप हे दोन्हीही धन्य आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो साधूचे बोलणे देखील तलवारीच्या धारेप्रमाणेच धारदार असते ते ज्यावेळी उपदेश करतात त्यावेळी दुर्जन लोकांच्या अंतरंगात ते लगेच खोचते. ”
3:41
अभंग क्र. ३२५६
गंधर्वनगरी क्षण एक राहावे । तेचि करावे मूळक्षेत्र ॥१॥
खपुष्पाची पूजा बांधोनि निर्गुणा । लक्ष्मीनारायणा तोषवावे ॥धृपद॥
वंध्यापुत्राचा लग्नाचा सोहळा । आपुलिया डोळा पाहो वेगी ॥२॥
मृगजळी पोहे घालुनि सज्ञाना । तापलिया जना तोषवावे ॥३॥
तुका म्हणे मिथ्या देहेंद्रियकर्म । ब्रम्हार्पण ब्रम्ह होय बापा ॥४॥
अर्थ
आपण जर आकाशात पाहिले तर आपल्याला वेगवेगळया ढगांचे वेगवेगळे नगरीत रुपातर झालेले दिसते परंतू ते काही क्षणाकरताच असते ते ढग क्षणभर देखील एका जागेवर राहात नाहीत परंतू जरी ते स्थिर झाले तर तेथे कोणी वास्तव्य करावे ? किंवा कोणीतरी आकाश पुष्पाचीच माळ तयार करावी आणि ती निर्गुण अशा लक्ष्मीचा पती जो नारायण त्याला घालावी व त्याला संतुष्ट करावे. नाहीतर मोठया तत्परतेने आपण आपल्या डोळयाने वांझोटया स्त्रीच्या मुलाचा लग्नाचा सोहळा आपल्या डोळयाने पाहावा. नाहीतर हे सज्ञान मनुष्या मृगजळाची पाणपोई घाल आणि त्या पाणपोईमधून पाणी काढून तृष्णेत झालेल्या लोकांना पाणी पाजून संतुष्ट कर. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे बापा त्याप्रमाणेच या देहाच्या अभिमानाने तू जे काही कर्म करशील ते सर्व मिथ्याच आहेत तू कोणतेही कर्म करताना जर ब्रम्हार्पणमस्तू असे म्हणून कर्म केले तर ते कर्म ब्रम्हालाच अर्पण होतात आणि तू देखील नंतर ब्रम्हरुपच होशील. ”
3:41
अभंग क्र. ३२५७
दासीचा जो संग करी । त्याचे पूर्वज नर्क द्वारी ॥१॥
ऐसे सांगो जाता जना । नये कोणाचिया मना ॥धृपद॥
बरे विचारूनी पाहे । तुज अंती कोण आहे ॥२॥
तुका म्हणे रांडलेका । अंती जासी यमलोका ॥३॥
अर्थ
जो दासीचा संग करतो त्याचे पूर्वज नरकाच्या द्वारात असतात. असे नीच कर्म कोणीही करु नका असे जर आम्ही लोकांना सांगण्यास गेलो तर ते कोणाच्याही मनाला पटत नाही. बरे ठीक आहे तुला आमचे बोलणे पटत नाही परंतू एक विचार मनाशीच करुन पहा जर तू चांगले कर्म केले नाही तर अंत:काळी तुझ्या मदतीला कोण येणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “अरे रांडेच्या लेका तू जर असे पाप कर्म करत राहशील तर शेवटी अंत:काळी यमलोकीच जाशील. ”
3:41
अभंग क्र. ३२५८
भाग्यवंत आम्ही विष्णुदास जगी । अभंग प्रसंगी धैर्यवंत ॥१॥
नाही ते पुरवीत आणुनि जवळी । गाउनी माउली गीत सुखे ॥धृपद॥
प्रीति अंगी असे सदा सर्वकाळ । वोळली सकळ सुखे ठायी ॥२॥
आपुल्या स्वभावे जैसे जेथे असो । तैसे तेथे दिसो साजिरेचि ॥३॥
वासनेचा कंद उपडिले मूळ । दुरिते सकळ निवारिली ॥४॥
तुका म्हणे भक्तजनांची माउली । करील साउली विठ्ठल आम्हा ॥५॥
अर्थ
या संपूर्ण जगामध्ये आम्ही विष्णूदास भाग्यवंत आहोत कारण प्रसंग कोणताही येवो आमच्या अंगामध्ये जे धैर्य आहे ते कधीही भंगत नाही. ज्या गोष्टीची आम्हाला गरज आहे व जी गोष्ट आमच्याजवळ नाही अशी गोष्ट आम्हाला विठू माऊली आणून देते आणि आमच्यासाठी ती गीत गाऊन आम्हाला प्रेमसुख देते. या विठूबाई माऊलीच्या अंगी आमच्याविषयी खूप प्रेम आहे त्यामुळे आम्ही काहीही जरी नाही केले तरी सर्व काही जागच्या जागीच आमच्याजवळ जे आम्हाला हवे आहे ते येते. आम्ही आमच्या स्वभावाने ज्या ठिकाणी जेथे कोठे असो तेथे आम्ही शोभूनच दिसतो. आम्ही वासनेचा जो मूळ गंध आहे तो म्हणजे “अविद्या अज्ञान” तोच उपटून काढला आहे आणि सर्व पातकाचा नाश देखील करुन टाकला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्हा भक्तजणांवर आमची विठू माऊली नेहमी तिची कृपेची छाया करीत राहील. ”
3:42
अभंग क्र. ३२५९
भोंदावया मीस घेऊनि संतांचे । करी कुटुंबाचे दास्य सदा ॥१॥
मनुष्याचे परी बोले रावा करी । रंजवी नरनारी जगामध्ये ॥धृपद॥
तिमयाचे बैल करी शिकविले । चित्रींचे बाहुले गोष्टी सांगे ॥२॥
तुका म्हणे देवा जळो हे महंती । लाज नाही चित्ती निसुंगाते ॥३॥
अर्थ
कुटूंबाची सेवा करण्यासाठी जो संतांचे सोंग घेऊन धन कमवतो, पोपट जसा मनुष्याप्रमाणे बोलतो आणि कर्म करतो अगदी त्याप्रमाणे हा मनुष्य जगामध्ये हरीकथा कीर्तन विनोदी शैलीमध्ये करुन जगातील नर आणि नारींची करमणूक करतो. ज्याप्रमाणे नंदी बैलाला आपण जेवढे शिकवू तसेच तो नंदीबैल वागतो आणि भिंतीवर काढलेल्या बाहुलीच्या चित्राला जसे विविध रंग टाकून रंगवले जाते त्याप्रमाणे हा संतांचे सोंग घेतलेला मनुष्य हरीकथा कीर्तन जगामधे तर करतो परंतू विविध प्रकारचे रंग त्या हरीकथेत टाकतो म्हणजेच विनोद वगैरे असे रंग टाकून हरीकथा करतो. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा अशा प्रकारे हरीकथा कीर्तन करुन ज्याला महंती मिळते अशा महंतीला आग लागो आणि अशा निसंग मनुष्याला हरीकथा कीर्तन करताना आपण दांभिकपणा दाखवतो याची थोडी देखील लाज चित्तात वाटत नाही. ”
3:42
अभंग क्र. ३२६०
अंगी घेऊनिया वारे दया देती । तया भक्ता हाती चोट आहे ॥१॥
देव्हारा बैसोनि हालविती सुपे । ऐसी पापी पापे लिंपताती ॥धृपद॥
एकी बेकी न्याये होतसे प्रचित । तेणे लोक समस्त भुलताती ॥२॥
तयाचे स्वाधीन दैवते असती । तरी का मरती त्यांची पोरे ॥३॥
तुका म्हणे पाणी अंगारा जयाचा । भक्त कान्होबाचा तो ही नव्हे ॥४॥
अर्थ
जगामध्ये असे अनेक लोक आहेत की जे क्षुद्र देवतांचे अंगामध्ये वारे घेतात आणि लोकांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देऊन त्यांना उपाय सांगून त्यांच्यावर दया करतात परंतू अशा भक्तांचा धिक्कार असो. काही मनुष्य तर देव्हार्यामध्ये बसून सुप हलवतात व शकुन सांगतात परंतू पापी मनुष्याच्या आपल्या अंगी आणखीपाप लिंपून घेतात. लहान मुले जसे एकबेकीचा खेळ खेळत असताना सहजच ते उत्तर देतात व सहज ते खरे ठरते त्याप्रमाणेच ह्या मनुष्याने चुकून एखादा उपाय सांगितला व तो खरा ठरला की त्यालाच सर्व लोक भुलतात आणि त्याच्या नादी लागतात. खरोखरच त्यांच्या स्वाधीन जर दैवत असते तर मग त्यांची पोरे मरतात ते का म्हणून ? तुकाराम महाराज म्हणतात, “ज्यांच्याजवळ तीर्थ आणि अंगारा आहे व जे लोकांना तीर्थ व अंगारा देतात ते कृष्णाचे भक्तच नाहीत. ”
3:42
अभंग क्र. ३२६१
अधमाचे चित्त अहंकारी मन । उपदेश शीण तया केला ॥१॥
पापियाचे मन न करी आचार । विधवे शृंगार व्यर्थ केला ॥धृपद॥
अधमाचे चित्त दुश्चित्त ऐकेना । वाया वीण मना करूनी काय ॥२॥
गर्दभासी दिली चंदनाची उटी । केशर ललाटी शुकराच्या ॥३॥
पतिवंचकेसी सांगता उदंड । परि ते पाषांड तिचे मनी ॥४॥
तुका म्हणे तैसे अभावीका सांगता । वाउगाचि चित्ता सीण होय ॥५॥
अर्थ
अधमाचे चित्त आणि मन हे अहंकाराने प्रभावित झालेले असते त्यामुळे त्याला कोणताही उपदेश केला तर उपदेश करणार्यालाच व्यर्थ क्षीण होतो. पापी मनुष्य कधीही सदाचार करत नाही जसा विधवेने केलेला श्रृंगार व्यर्थ ठरतो अगदी त्याप्रमाणे पापी मनुष्याला केलेला उपदेश देखील व्यर्थ ठरतो. अधमाचे चित्त हे नेहमी दु:श्चित असते त्याला कोणताही उपदेश केला तरी तो व्यर्थच ठरतो त्यामुळे त्याला उपदेश करुन तरी काय करावे ? गाढवाच्या अंगाला चंदनाची उटी आणि सुकराच्या कपाळाला भगव्या गंधाचा टिळा दिला तर ते व्यर्थच ठरते. नेहमी व्याभिचार करणाऱ्या स्त्रीला कितीही पतिव्रतेचे धर्म सांगितले महिमे सांगितले तरी तिला ते पटत नाही कारण तिच्या मनात नेहमी व्याभिचार करण्याचा वाईटच विचार असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “त्याप्रमाणे अभाविक मनुष्याला कितीही चांगला उपदेश सांगण्याचा प्रयत्न केला तरी सांगणारा व ऐकणारा या दोघाच्याही चित्ताला शीणच होतो. ”
3:42
अभंग क्र. ३२६२
संत देखोनिया स्वये दृष्टी टाळी । आदरे न्याहाळी परस्त्रीसी ॥१॥
वीट ये कर्णासी संतवाक्यामृता । स्त्रीशब्द ऐकता निवे कर्ण ॥धृपद॥
कथेमाजी निज वाटे नित्यक्षणी । स्त्रियेचे कीर्तनी प्रेमे जागे ॥२॥
तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावे । स्वभावा करावे काय कोणी ॥३॥
अर्थ
संतांना पाहून जो आपली दृष्टी फिरवतो आणि परस्त्रीला पाहून जो आदराने न्याहाळत बसतो, संतांच्या मुखातून निघलेले अमृतासारखे वाक्य ऐकताना त्याच्या कानाला वीट येतो परंतू स्त्रीच्या मुखातून निघलेले मधूर शब्द ऐकताना त्याचे कान मात्र अगदी तृप्त होऊन जातात. हरीकथा किंवा कीर्तन ऐकताना त्याला क्षणोक्षणाला झोप लागते व ती झोप सारखी वाढतच राहाते परंतू एखादया स्त्रीच्या मुखातून जर गाणी वगैरे ऐकू लागला तर त्याविषयी त्याच्या मनामध्ये प्रेम वाढत चालते. तुकाराम महाराज म्हणतात, “मी हे जे बोलत आहे याविषयी कोणीही क्रोधीत होऊ नये कारण ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार जो तो वागत असतो चांगले कर्म करण्याचा ज्याचा स्वभाव आहे तो चांगले कर्म करतो, वाईट कर्म करण्याचा ज्याचा स्वभाव आहे तो वाईटच कर्म करतो मग ज्याच्या त्याच्या स्वभावाला कोणी काय करावे ? ”
3:42
अभंग क्र. ३२६३
भोळे भाविक हे जुनाट चांगले । होय तैसे केले भक्तिभावे ॥१॥
म्हणउनि चिंता नाही आम्हा दासा । न भ्यो गर्भवासा जन्म घेता ॥धृपद॥
आपुलिया इच्छा करू गदारोळ । भोगू सर्वकाळ सर्व सुखे ॥२॥
तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात । नाही विसंबत येर येरा ॥३॥
अर्थ
आमचे विठ्ठल हे दैवत अतिशय भोळे भाविक आहे व ते खूप सनातनी आहे त्याला आम्ही भक्तीभावाच्या जीवावर जसे रुप देऊ तसे ते धारण करते. म्हणूनच आम्हा दासांना कोणत्याही प्रकारची चिंता नाही कितीही गर्भवास व जन्म आम्ही घेतला तरी आम्ही त्याला भीत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या इच्छेनुसार नेहमी हरीनामाचा गदारोळ करु व सर्वकाळ सर्वसुख आम्ही भोगू. तुकाराम महाराज म्हणतात, “देव आमच्या नेहमी बरोबरच असतो व आम्हीही देवाच्या नेहमी बरोबर असतो आम्ही कधीही एकमेकावाचून राहातच नाही. ”
3:42
अभंग क्र. ३२६४
नाही बळयोग अभ्यास कराया । न कळे ते क्रिया साधनाची ॥१॥
तुझिये भेटीचे प्रेम अंतरंगी । नाही बळ अंगी भजनाचे ॥धृपद॥
काय पांडुरंगा करू बा विचार । झुरते अंतर भेटावया ॥२॥
तुका म्हणे सांगा वडिलपणे बुद्धी । तुजविण दयानिधी पुसो कोणा ॥३॥
अर्थ
माझ्या अंगी योगाभ्यास करण्याइतके बळ नाही आणि इतर साधने व क्रिया कसे करावे हे देखील मला कळत नाही. पण देवा तुझ्या भेटीविषयी माझ्या अंतरंगात खूप प्रेम आहे साधे तुझे भजन करावे तर तेवढे देखील बळ माझ्या अंगात नाही. त्यामुळे हे पाडूरंगा मी काय करु तुझ्या भेटीसाठी विचार तरी कोणता करु कारण माझे मन तुला भेटावे यासाठी खूप झुरत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्हीच मला माझ्या वडिलांसारखे आहात तुमच्या भेटीसाठी काय उपाय करावा त्याची बुध्दी तुम्ही मला दयावी आणि हे दयानिधी तुमच्यावाचून तरी मी दुसऱ्या कोणाला काय विचारावे ? ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















